स्वामी विवेकानंदांचे एक शिष्य शरच्चंद्र चक्रवर्ती यांनी १८९८ सालची एक घटना नमूद केली आहे. त्यावर्षीचा श्रीरामकृष्ण जन्मोत्सव बेलूरला भाड्याने घेतलेली जी जागा होती तेथील मठात झाला. बेलूरला आज असलेल्या मठाच्या जवळच ही जागा होती. स्वामीजींनी शरच्चंद्र चक्रवर्ती यांना त्या दिवशी खूप जानवी आणून ठेवण्यास सांगितली होती. त्यांनी त्यानुसार जानवी आणली आणि स्वामीजींना विचारले ही कशासाठी? त्यावर स्वामीजी म्हणाले- `आज पूजेसाठी जे लोक येतील, त्यांना गंगास्नानानंतर ही जानवी द्यायची आहेत. ब्राम्हणेतर भक्तांनाही गायत्री मंत्र द्यायचा आहे. हळूहळू देशातील साऱ्याच लोकांना ब्राम्हण पदवीला घेऊन जावयास हवे. ठाकुरांच्या भक्तांबद्दल तर बोलावयासच नको. सारेच हिंदू एकमेकांचे बंधू होत. शिवू नका, शिवू नका असे म्हणून म्हणून आपणच त्यांना हीन करून टाकले आहे. याचमुळे तर सारा देश हीनता, भीरुता, मूर्खपणा आणि वीर्यहीनता यांच्या अगदी चरम सीमेला जाऊन पोहोचला आहे. त्या साऱ्यांना सांगावयास हवे- तुम्हीही आमच्यासारखीच माणसे आहात. तुम्हालाही आमच्यासारखेच अधिकार आहेत. आले ना लक्षात मी काय म्हणतो ते?' हा प्रसंग अतिशय लक्षणीय आहे. तो आजपासून शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात घेतल्यास त्याचे महत्व अधिकच जाणवते. ज्यांना धर्म, आध्यात्म यांच्याशी घेणेदेणे नाही त्यांना काही वाटणार नाही. मात्र ज्यांची त्यावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे. एक तर सगळ्यांना यज्ञोपवीत देऊन स्वामीजींनी धार्मिक एकत्वाच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांच्या समतेचे जे उद्गार त्यांनी काढले आणि अस्पृश्यतेवर प्रहार केला तो सामाजिक परिवर्तनाचा आशयही अत्यंत मोलाचा म्हटला पाहिजे. अन हे करीत असतानाच- भाषा, खाणे पिणे, व्यवहार, स्पर्श, सामाजिक किंवा धार्मिक दर्जा; एवढ्याचपुरती मर्यादित दृष्टी न ठेवता; सगळ्यांना ब्राम्हण पदाला नेण्याचे जे ध्येय प्रतिपादन केले ते सगळ्यात महत्वाचे. बोली भाषेत म्हणायचे तर `नराचा नारायण' होणे, हे ते ध्येय. या प्रसंगानंतरच्या प्रदीर्घ कालावधीत आपण जो अनुभव घेतला त्यातून हे सिद्ध होते की; केवळ सामाजिक उपक्रम, आंदोलने, घोषणा, प्रबोधन, कायदे, आर्थिक, सामाजिक विकास, इत्यादी गोष्टींनी खूप काही साध्य होत नाही. हे सारे कितीही केले तरीही माणूस आतून उन्नत होणे याला पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येकापुढे जीवनाचा सर्वोच्च आदर्श ठेवायला हवा. त्या बळावर प्रत्येक जण पुढे जाईल तेव्हाच हे आंतरिक परिवर्तन येईल. हिंदू परंपरेने यालाच ब्रम्हज्ञ होणे म्हटले. लोकपरंपरा यालाच नराचा नारायण होणे म्हणते. स्वामीजींनी त्याचाच उच्चार केला आणि सगळ्यांपुढे एक उच्च आदर्श ठेवला.
- श्रीपाद कोठे
१६ एप्रिल २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा