पुण्यातील रद्द झालेले नास्तिक संमेलन, हिंदुत्व, रामनवमी, कालच्या घटना; असे सगळे बिंदू जोडताना गांधीजींचं एक वाक्य आठवलं - 'हिंदुत्व हे सत्याच्या अखंड शोधाचं दुसरं नाव आहे.' हिंदुत्वाचं हे फार सुंदर आणि नेमकं वर्णन आहे. या अर्थाने सगळ्यांनीच हिंदुत्वाचा स्वीकार करायला हवा. आपापल्या भूमिका निश्चित करून, त्या यावच्चंद्रदिवाकरौ अपरिवर्तनीय आहेत आणि असायला हव्यात, असा हट्ट न करता; सतत सत्याचा शोध घेत राहावे. अन एक निश्चित की, सत्य गवसल्यानंतर तेच आपल्याला या सगळ्या असत्याकडे (सापेक्ष सत्याकडे) कसं पाहावं, या सापेक्ष सत्यामध्ये वावरताना काय करावे हे समजून देईल. या दृष्टीने, नास्तिक मेळावा रद्द करायला नको होता असं वाटतं. आधीही नास्तिक मेळावे झालेले आहेत. त्याने काही फरक पडत नाही. पण मेळाव्याने सुद्धा नास्तिकता हेच सत्य असं करू नये. त्या ऐवजी नास्तिकतेच्या भूमिकेच्या साहाय्याने सत्य काय याचा शोध घ्यावा. काल रामनवमी होती. त्यामुळे पोलिसांना अशांततेची भीती वाटली. पण त्यांनाही ही भीती वाटू नये अन तशी भीती वाटू नये यासाठी रामभक्तांनीही रामाच्या साहाय्याने सत्याचा शोध घ्यावा. खरे तर नास्तिक परिषदेवर बंदी घालून पोलिसांनी एक प्रकारे हिंदूंचा अपमानच केला आहे. हिंदू समाज अथवा रामभक्त दुसरी भूमिका सहन करू शकत नाहीत असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. जो चुकीचा आहे. हां, असेच भय श्रीराम वा हिंदू न मानणारे आहेत त्यांचेही वाटू शकते. आपले भय वाटणार नाही याची खबरदारी घेणे हे नास्तिक वा हिंदू विरोधकांचे काम आहे. हेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि बंगाल वा गुजरातमध्ये झालेल्या घटनांबाबत म्हणता येईल. या वा त्या बाजूने स्वतःला सत्य सिद्ध करण्याची धडपड न करता, सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हावा. तसा झाला तर कोणालाही कोणावर आक्षेप राहणार नाही.
- श्रीपाद कोठे
११ एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा