शनिवार, ८ एप्रिल, २०२३

महागाई

महागाई हा माणसांच्या जगण्याचा विषय आहे. दुर्दैवाने आज तो तसा राहिलेला नाही. हां, एक मात्र मान्य केले पाहिजे की, महागाई हा एक गंभीर विषय आहे हे आता भाजप समर्थकांनाही जाणवले असावे. कारण, 'महागाई कमी करण्यासाठी काही आम्ही मोदीजींना निवडून दिले नाही' असे मेसेज आलेले नाहीत. असो.

तर... महागाई हा माणसांच्या जगण्याचा विषय राहिलेला नाही. या विषयावर बोलणारे दोन गटात मोडतात. १) देश चालवण्याची जबाबदारी सरकारची असल्याने महागाईसाठी सरकारच जबाबदार आहे. अन सरकार महागाई कमी करत नाही म्हणजे ते कुचकामी, बेजबाबदार आणि निरर्थक आहे. २) महागाईसाठी जागतिक परिस्थिती जबाबदार आहे. त्यासाठी सरकारला दोष देणे चुकीचे आहे. जगात सर्वत्र महागाईची समस्या मोठी आहे. तरी त्यामानाने आपल्या इथे परिस्थिती नियंत्रणात आहे.

एक गट महागाईचे विश्लेषण करतो तर दुसरा गट महागाईची जबाबदारी निश्चित करतो. 'महागाई कमी व्हायला हवी की नको?' या प्रश्नावर मात्र दोन्ही गटातील बहुसंख्य मंडळी स्पष्ट उत्तर देणार नाहीत. कारण, एका गटातील मंडळींना सरकारची जबाबदारी स्वीकारणे कठीण जाईल तर दुसऱ्या गटाकडे महागाई कमी करण्याचे काहीही उपाय नाहीत. अन सामान्य माणूस तर काय... नेहमीच अगतिक असतो. आपापले हितसंबंध, नफ्यातोट्याचे हिशेब दूर ठेवून यावर बोलणारे मात्र कोणी दिसत नाहीत. तसे बोलणारे ही समाजाची गरज आहे हे मात्र निश्चित.

इंधन हा एक मुद्दा घेऊ. महागाई ही मूलतः त्यामुळेच आहे. पण इंधनावर आपले नियंत्रण नाही. इंधन, त्यावर आपले नियंत्रण नसणे अन परिणामी महागाई; या गोष्टी काही आजच्या नाहीत. खूप जुन्या आहेत. पण आपल्या हाती सत्ता असली की ही समस्या चुटकीसरशी सोडवू, याहून अधिक सखोल विचार दोन्ही बाजूंकडे नाही. इंधन ही गोष्ट जर आपल्या हाती नाही तर त्याला पर्याय दिला पाहिजे याची पुरेशी जाणीव कोणाकडेच नाही. पर्याय याचा अर्थ केवळ पर्यायी इंधन असा होत नाही. अर्थात त्या पर्यायावरही खूप उशिरा विचार सुरू झाला. पण केवळ पर्यायी इंधन उपलब्ध केल्याने महागाईची समस्या सुटेल का? त्या पर्यायी इंधनाचे जागतिकीकरण होणारच, त्यात भांडवली नफेखोरी येणारच. म्हणजे समस्या जिथल्या तिथेच राहणार. मग उपाय काय? उपाय आहे १) अल्प इंधनभक्षी जीवन. २) एकमेकांत गुंतलेली अर्थव्यवस्था मोकळी करून स्वतंत्र प्रादेशिक अर्थव्यवस्थांचा विकास आणि या प्रादेशिक अर्थव्यवस्थांचे सहकार्य. ३) मानसिक परिवर्तन.

मानसिक परिवर्तन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. कारण त्यात सवयी, कल्पना, समज अशा पुष्कळ गोष्टींची नव्याने व्याख्या आणि मांडणी करावी लागेल. जसे - मानवी आणि पशुऊर्जेचा वापर, या पर्यायासाठी माणसाला स्वतःशीच मोठा संघर्ष करावा लागेल. मानवी व पशु ऊर्जेचा वापर करण्यासारख्या व्यवस्था आणि रचना विकसित कराव्या लागतील. त्यातील समस्यांचा क्षमता, सन्मान अशा अनेक अंगांनी विचार करावा लागेल. थोडक्यात म्हणजे, आज डोळ्यासमोर नसलेला पर्याय विकसित करावा लागेल. हा पर्याय विकसित केल्याने देश आणि देशवासी अधिक संख्येत आणि अधिक चांगल्या प्रकारे सुखी होऊ शकतील, पण जगाच्या दृष्टीने कदाचित अमुक बिलिअन अर्थव्यवस्था वगैरे होऊ शकणार नाही. ही किंमत देखील चुकवावी लागेल. इतका सखोल विचार करण्याची आणि किंमत चुकवण्याची तयारी असेल तर महागाईवर बोलणे इष्ट ठरेल. अन त्यासाठी महागाई कमी होणे आवश्यक आहे हे स्वतःला पटवावे लागेल. त्यासाठी महागाई हा जगण्याचा प्रश्न आहे हे आतून जाणवावे लागेल. नाही तर विश्लेषणे आणि जबाबदारीच्या निरर्थक चर्चा होतच राहतील. अन अगतिक माणूसही तसाच राहील.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ९ एप्रिल २०२२

Jayant Joshi हो. पण संघटित कामगारांना ज्या प्रमाणात वाढ मिळते त्या प्रमाणात ती आहे का? दुसरे असे की या भाव वाढीने रुपयाचे मूल्य सतत कमी होत राहते. संपत्ती याचा अर्थ केवळ चलन नाही. अशा खूप गोष्टी आहेत. माझी विनंती राहील की, सखोल आणि गांभीर्याने अर्थविषयक चिंतन करावे. सतत भाव वाढत राहणे हे सगळ्याच अर्थाने घातक असते. मुख्य म्हणजे विचार करताना १५० कोटी चेहरे समोर ठेवावेत.

Surendra Deshpande Gaulkar शास्त्र म्हणतं म्हणून तेच योग्य असतं असं नाही. जगभरच्या सगळ्या माणसांना किमान सन्मानाचं जीवन विद्यमान अर्थशास्त्र का देऊ शकत नाही? हां, माझं जीवन व्यवस्थित आहे एवढं ज्यांना पुरेसं वाटतं त्यांचा प्रश्नच वेगळा.

Surendra Deshpande Gaulkar हास्यास्पद. अजीर्ण होणारे भोग आणि साधनसंपत्तीची उधळपट्टी हे आपल्याला दिसत नाही. फक्त लोकसंख्या दिसते. मानव कितीही पशू झाला तरी चालेल पण आम्ही याच मार्गाने जाणार असाच हट्ट असेल तर मला काही बोलायचे नाही. अजब आहे एकूण.

Surendra Deshpande Gaulkar practical असायला हरकत नाही. जीवनाशी फारकत घेऊ नये. जीवनाशी फारकत घेत असेल तर ते जाळून टाकावं. राहिला प्रश्न माझा. तर मला कशातलंही काही कळत नाही हे मला ठाऊक आहे.

rohini kale dani पोळी, भाजी, फळं, गॅस, औषधे, चपला, कपडे हे कसे शेअर करणार? प्रश्न नुसता जाण्यायेण्याच्या पेट्रोलचा नाही. अर्थकारणाच्या समग्रतेचा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा