मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

संस्कृती म्हणजे...

संस्कृती म्हणजे काय? खूप ऐकायला मिळतं, आमची संस्कृती तुमची संस्कृती. लोकसंस्कृती, पाश्चात्य संस्कृती, ब्राह्मणी संस्कृती, वैदिक संस्कृती, इस्लामी संस्कृती, हिंदू संस्कृती, देशी संस्कृती, गंगाजमुनी संस्कृती, मिलिजुली संस्कृती, काश्मिरी संस्कृती, बंगाली संस्कृती, मराठी संस्कृती, ऐतिहासिक संस्कृती, प्रागैतिहासिक संस्कृती, खाद्यसंस्कृती; इत्यादी इत्यादी इत्यादी. अन सुरू होतात वाद. कारण संस्कृती या शब्दाचा अर्थ समजून न घेताच आपण तो वापरतो. संस्कृती म्हणजे तो घटक जो माणसाला सुसंस्कृत बनवतो. संस्कृती म्हणजे सवयी, परंपरा, विशिष्ट कृती, विशिष्ट प्रतिके, विशिष्ट शब्द, विशिष्ट पोशाख, विशिष्ट पदार्थ, विशिष्ट कलाप्रकार; इत्यादी नाही. या सगळ्या गोष्टीतून माणसाला सुसंस्कृतपणाकडे घेऊन जाणारे तत्त्व म्हणजे संस्कृती. त्यामुळेच अमुक संस्कृती, तमुक संस्कृती हे एक प्रकारे misnomer आहे. वर नमूद केलेल्या सगळ्या बाबी स्थळ, काळ, परिस्थिती, गरजा, आवश्यकता यानुसार असतात, त्यानुसार बदलतात किंवा स्थिर राहतात. पण त्यातील कोणतीही गोष्ट संस्कृतीसाठी अपरिहार्य नाही. या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक आहेत की नाहीत हे मात्र सतत पाहणे मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते. हे पाहण्याचा मापदंड एकच आहे, तो म्हणजे; ती ती गोष्ट माणसाला सुसंस्कृत बनवते अथवा नाही. बाकीचा फक्त गोंधळ.

- श्रीपाद कोठे

१९ एप्रिल २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा