बुधवार, २६ जुलै, २०२३

रेवडी कल्चर

'रेवडी कल्चर' आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. अनेक मुद्दे समोर येतील. अनेक विषयांवर चर्चा होईल. यात भाजपसह सगळ्याच पक्षांची कसोटी लागणार आहे. एक मुद्दा सहज मनात आला. सध्या फक्त तेवढाच.

- गरजूंना मदत वा सवलती द्याव्या. बाकीच्यांना नको. हे बरोबरच आहे. पण पाचेक हजार कमावणाऱ्यांना साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... अन लाखो किंवा करोडो कमावणारे किंवा देशातले पहिले अमुक इतके श्रीमंत यांनाही साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... याचाही विचार व्हायला हवा.

************

एक इशारा : भाजपचे अश्विनी उपाध्याय यांनीच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अन या फुकट संस्कृतीवर आळा नाही घातला तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ शकेल, असेही त्यात म्हटले आहे. समर्थकांनी किती अन कसे समर्थन करत राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

- श्रीपाद कोठे

२७ जुलै २०२२

सोमवार, २४ जुलै, २०२३

सिलेंडर पोहोचवणारे

गॅस सिलेंडर संपलं होतं. नंबर लावला अन आज आलं. त्याला बिल दिलं अन नेहमीप्रमाणे त्याने वरचे पैसे घेतलेच. त्याला सहज म्हटलं - एकीकडे सरकार लुटते, दुसरीकडे तुम्हीही. त्याला ते लागलं. नंतर वाटलं बरं झालं आपण असं बोललो अन त्याला ते लागलं. कारण त्यावर तो मनातलं सगळं बोलला. तो म्हणाला, 'आम्हाला एका सिलेंडरमागे १४ रुपये मिळतात. दिवसाला २०-२५ सिलेंडर पोहोचवतो. गाडी आमचीच. गाडीत डिझेल आमचं. दुरुस्ती वगैरे आमचीच. गोडाऊनला जाणे. गाडी भरणे. सिलेंडर पोहोचवणे. सगळं मीच करायचं. साथीदार वगैरे नाही. कंपनी पगार देत नाही. फक्त कमिशन. काय करावं आम्ही?' खरंच वाईट वाटलं. रागही आला. अन लाजही वाटली. एका सिलेंडरचे १४ रुपये म्हणजे, दिवसाला ३५० रुपये. त्यातले १०० रुपये तरी गाडी, डीझेलवर जात असणार. कसा चालवत असेल घर? गाडीचे हप्ते कसे भरत असेल? अन तो वरचे पैसे घेतो त्याचा राग मावळला. त्याला विचारलं - 'सगळ्याच कंपन्यांचं असं आहे का?' ते काही तो सांगू शकला नाही. पण एवढं बोलला जाता जाता - 'पगार मिळाला असता तर कशाला तुम्हाला दहा वीस रुपये मागितले असते?'

एक मनात आलं - गॅस कंपन्यांचे चपराशासह general manager पर्यंतचे सगळेच कर्मचारी नक्कीच एवढ्या हलाखीत नसणार. इकडे रोज भाव वाढत असतातच. कारण त्यांचे पगार, भत्ते, बोनस सांभाळायचे असतात. नफेखोरी आणि संवेदनहीनता फोफावली आहे एवढं खरं.

खूप लिहिता येईल. बोलता येईल. ते अनेकांना न पटणारं असतं. कारण, 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' हे फक्त प्रतिज्ञेपुरतं तोंडात असतं. ते हृदयात उतरतच नाही. भारत माझा आहे अन सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण तूप फक्त माझ्या पोळीवर आलं पाहिजे. ते आलं म्हणजे बाकी काही उरतच नाही. जग हे नंदनवनच असतं. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात तरी ही प्रतिज्ञा सगळ्यांच्या हृदयात उतरो. प्रत्येक घरावर तिरंगा हा उत्सव न राहता, ती उर्मी व्हावी; हीच अमृत महोत्सवी प्रार्थना.

अशा विचारांसाठी कोणाला मला डावा वगैरे म्हणायचं असेल तर खुशाल त्याचा आनंद घ्यावा. मी मात्र 'जे का रंजले गांजले...' सांगणाऱ्या तुकोबांचा वारसा जपत राहणार.

- श्रीपाद कोठे

२५ जुलै २०२२

शनिवार, २२ जुलै, २०२३

एकांगीपणा

धावपळ, दगदग, पळापळ करणारी माणसे, कामे, संस्था यांच्याबद्दल सगळ्यांना आदर, उत्सुकता, विश्वास, आस्था वगैरे असतात. हे लोक समाजासाठी, लोकांसाठी बरंच काही करत असतात असा सामान्य समज असतो आणि तो समज खराही असतो. परंतु कुठलीही धावपळ न करणारे झाड किंवा दिवा किंवा अगदी दगड सुद्धा; सावली देणे, उजेड देणे, विश्रांती देणे; अशी फार मोठी कामे करत असतातच. समाजातही अशी झाडे, दिवे आणि दगड असतात. त्यांच्याबद्दल मात्र फार आदर, उत्सुकता, विश्वास, आस्था दिसून येत नाही. समाजाच्या रक्तातच थोडासा एकांगीपणा भिनला असावा बहुतेक.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०२२

विश्लेषण ठीक, उपाय काय?

अनेक दिवसांनी आज चर्चा ऐकली. सुसह्य होती म्हणून. प्रा. शरद कोहली हे एक अर्थतज्ज्ञ आहेत. टीव्ही चर्चांमध्ये अनेकदा येतात. त्यांच्या मते इथून पुढचा काळ आर्थिक दृष्टीने आणखीन कठीण राहणार आहे. कल्पना करता येणार नाही असा. भारतातील inflation जगाच्या तुलनेत खूपच नियंत्रणात आहे असंही मत त्यांनी मांडलं. तरीही काळ कठीण राहणार हे त्यांचं मत होतं. प्रा. कोहली हे उजवे, भांडवलवादी, भाजपच्या धोरणांचे समर्थक समजले जातात. यावर उपाय काय या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते. सगळ्या तज्ज्ञ लोकांची म्हणूनच नेहमीच गंमत वाटते. ते फक्त शास्त्राच्या चौकटीत बोलतात आणि विचार करू शकतात. Original thinking शून्य म्हटलं तरी चालेल. त्यांना अन्य काही सुचतच नाही. अन समजतही नाही. ही एक विडंबना आहे. सगळ्या अर्थकारणाची मुळातून फेरमांडणी करण्याची गरज आहे. गेली काही दशके तरी ही गरज जाणवते आहे पण कोणीही... अगदी कोणीही (भाजपसह) त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही. बाकी आकडे, तर्क अन भांडणे माझ्या दृष्टीने अर्थशून्य आहेत.


By the way - पश्चिम बंगालमध्ये कॅश मोजणे सुरू आहे. अशा शेकडो बातम्या येत असतात. गेल्या दहा वर्षात अशा प्रकारे जप्त केलेली संपत्ती किती आहे आणि त्याचे काय केले, हे जाहीर व्हायला हवे. (तसे जाहीर झाले असेल वा होत असेल तर सांगावे.) अन देशातल्या प्रत्येक घराची अन सरकारी, गैरसरकारी, कॉर्पोरेट इमारतींची अशीच झडती घेऊन एकदा सोक्षमोक्ष लावून टाकावा. सुरुवात नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या अन उद्योगपतींच्या घरांपासून करावी. तसेच tds चे चिंधी अर्थकारण करण्यापेक्षा सगळ्या बँका आणि वित्तसंस्थांचे सगळे लॉकर्स तपासावे.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०२२

बुधवार, १९ जुलै, २०२३

Gst

ब्रँडेड पॅकेज वस्तूंवर gst लागणार आहे. आजकाल स्थानिक छोटे घरगुती उत्पादक सुद्धा पापड, शेवया, सांडगे, सोजी सारख्या वस्तू पॅकेज करून विकतात. त्यांना ब्रॅण्डेड म्हटले जाईल का? अन त्यावर gst लागेल का?

******

ज्या देशात मीठ, दूध, दही, पाणी या गोष्टी उसन्या दिल्या तरी परत घेत नाहीत; ज्या देशात अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा विकू नये अशी परंपरा होती; त्या देशात... ... ... असो.

*********

भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व केवळ मंदिरे, उपासना, लोकसंख्या, मारामाऱ्या यांच्यापुरते नाही. भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व हे जीवनाचे प्रतिशब्द आहेत. हे भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व मानणाऱ्या व्यक्ती, संस्था, सरकारे यांच्या व्यवहारातून सिद्ध व्हायला हवे.

*********

(कृपया प्रश्न विचारण्यात बुद्धी वाया घालवू नये. उत्तरे शोधण्यात बुद्धी लावावी.)

- श्रीपाद कोठे

२० जुलै २०२२

मंगळवार, १८ जुलै, २०२३

निरुपयोगी

ज्या गोष्टींचा उपयोग नसतो त्या गळून पडतात. उदा. माणसाचे शेपूट.

असंच जाती, धर्म यांचा उपयोग बंद केला की त्या गोष्टीही गळून पडतील. अगदी कोणाच्या भल्यासाठी किंवा बुद्धीची खाज बोळवणारी सर्वेक्षणे, अभ्यास यासाठीही जात, धर्म यांचा वापर बंद केला; तर या गोष्टी आपोआप गळतील. सवाल वाईटपणा घेऊनही उपयोग बंद करण्याची हिंमत दाखवण्याचा आहे.

असेच अल्पसंख्य, बहुसंख्य या शब्दांचेही.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०२२

सोमवार, १७ जुलै, २०२३

रेवडी कल्चर

'रेवडी कल्चर'ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सरकार ज्या सवलती वा सबसिडी देतात त्यांच्यावर तर टीकाटिप्पणी होते; पण सगळेच राजकीय पक्ष फुकट देण्याची चढाओढ करतात अन निवडणूक जिंकतात. त्याची चर्चा होत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला फुकट देण्याची लालूच दाखवता येणार नाही असा काही कायदा मात्र नाही करण्यात येत. राजकीय पक्ष दाखवतात ती लालूच आणि सरकार सामाजिक जबाबदारी म्हणून देते त्या सवलती यात फरक करायला हवा. शिवाय मंत्र्यांपासून तर शिपायापर्यंत सगळ्या सरकारी लोकांना मिळणारे लाभ, सवलती आणि होणारे काम यांचेही ऑडिट का नको? लोकप्रतिनिधींना मिळणारे लाभ हे 'रेवडी कल्चर' नाही का? शेकडो सरकारी योजना असताना पुन्हा कोटयवधी रुपयांची 'मतदारसंघ विकास निधी'ची रेवडी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कशाला हवी? की सामान्य माणूस सामान्यच असतो, त्यामुळे कापा त्याला सगळे मिळून. चोर चोर मौसेरे भाई !!

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०२२

रविवार, १६ जुलै, २०२३

दिगंबर आणि नग्न

सध्या नागा साधू, त्यांची नग्नता यावरून टीकाटिप्पणी, टिंगलटवाळी सुरु आहे. पण दिगंबर आणि नग्न यातील फरक यांच्या गावी नसतो. एवढेच कशाला अशी टीकाटिप्पणी वा टिंगलटवाळी करणाऱ्यांच्या आधीच्या हजार पिढ्या आणि भावी हजार पिढ्या एकत्र आल्या तरी दिगंबर व नग्न यातील अंतर समजण्याची त्यांची कुवत नाही. अन नावाने हिंदू वा भारतीय असणारे पण त्यातील भावाशी कणभरसुद्धा संबंध नसणारे लोकही त्यांच्या हो मध्ये हो मिसळायला तयारच असतात.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१५

`कारल्याचा गोडवा'

महानगरातील वृत्तवाहिनीच्या कार्यालयात मुख्य संपादक आपल्या कार्यालयात डोक्याला हात लावून सचिंत बसले होते. शिपायाने रोजच्याप्रमाणे आणून ठेवलेला नक्षीदार भारी चहाच्या कपातील वाफाळता चहा, `चहाची लस्सी' होण्याच्या स्थितीत येत होता. सकाळच्या मिटींगसाठी संपादक विभागातील वरिष्ठ सहकारी केबिनमध्ये आले तेव्हा त्यांना, नेहमी उत्साहाचे कारंजे असलेले संपादक सचिंत बसलेले दिसले. सगळे निमूट बसले. मिनिटभरात मुख्य संपादक बोलू लागले- `आज सकाळीच प्रसार विभागाचा अहवाल आला. आपली लोकप्रियता घसरते आहे. टीआरपी सतत चौथ्या आठवड्यात घसरला आहे. आपल्या चर्चांमध्ये आता लोकांना काही रस वाटेनासा झाला आहे. काय करायचे? या आठवड्यात टीआरपी वाढलाच पाहिजे असे व्यवस्थापनाचे आदेश आहेत.' काही मिनिटे शांततेत गेल्यावर चर्चेच्या कार्यक्रमाची जबाबदारी असलेला सहकारी घाबरतच बोलू लागला- `पण सर, गेल्या दोन आठवड्यात आपण चांगल्या चर्चा घेतल्या. राजकारण कधी शुद्ध होणार आणि राजकारणातून घराणेशाहीचे उच्चाटन; असे दोन जबरदस्त विषय घेतले होते.' वातावरण हलकेफुलके ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेला एक सहकारी बोलला- `या दोन्ही गोष्टी कालत्रयी शक्य नाहीत हे माहीत असूनही सगळे किती अहमहमिकेने बोलत होते नाही.' तिसऱ्याची विश्लेषणात्मक प्रतिक्रिया- `असेच हवे असते या व्यवसायात. जे अशक्यच आहे त्याचीच चर्चा अन तीही अहमहमिकेने. तेव्हाच ना वाढणार टीआरपी.' शांतपणे ऐकत बसलेले संपादक वैतागून बोलले- `ते ठेवा बाजूला. टीआरपी वाढत नाहीय. तो एका आठवड्यात वाढण्यासाठी काय करायचे?' एकाने सूचना केली- `सर, आपल्या वार्ताहरांची मिटींग बोलवा. त्यांना लोकांची नाडी ठाऊक असते.' ठरले. दुपारी वार्ताहरांसकट संपूर्ण संपादक विभागाची बैठक झाली. सकाळचाच विषय चर्चेला ठेवण्यात आला. प्रास्ताविकानंतर शांतता पसरली. उत्साहाचे आणि चैतन्याचे झाड अशा एका नवीनच रुजू झालेल्या वार्ताहर मुलीने अदबीने सूचना केली- `सर, मी लहान आहे. मला अनुभव पण नाही. पण आम्हाला असं शिकवण्यात आलंय की, कुत्रा माणसाला चावला तर त्यात कोणालाच रस नसतो. पण माणूस जर कुत्र्याला चावला तर मात्र सगळे कान टवकारतात. म्हणून मला वाटतं, कडू कारलं गोड का नाही? कारलं गोड कसं होईल? कारलं गोड होण्यासाठी कोणी कोणी काय काय करायला हवं? विशेषत: राजकारणी लोक काय करणार? या विषयातील आजवरचे संशोधनात्मक आणि वैचारिक प्रयत्न कोणते? या साऱ्यावर चर्चा घ्याव्यात. मोठमोठे राजकारणी, अभ्यासक, कार्यकर्ते बोलवावेत. विदेशी वाहिन्यांना सहभागी करून घ्यावे आणि ते लाइव्ह असावे. मला वाटतं याने फायदा होईल.' निवृत्तीकडे झुकलेले एक सहकारी उभे राहिले अन म्हणाले- `अहो असे कधी असते का? कारल्याचा गोडपणा. हा काय विषय आहे? लोक हसतील आपल्याला.' पण संपादकांनी काहीतरी नोंद घेतली अन जाहीर केले. या आठवड्यात `कारल्याचा गोडवा' हा चर्चेचा विषय राहील. त्याच्या नियोजनासाठी निवडक चार लोकांना त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले. सूचना करणारी ती नवीन वार्ताहर अर्थातच विशेष निमंत्रित. सगळी योजना झाली. शनिवार, रविवार खास आठवड्याचा `विक एंड' `कारल्याचा गोडवा' यावरील चर्चेने गाजला. वाहिनीने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले. नवीन आठवड्याच्या सोमवारी संपादक मिठाईचा बॉक्स घेऊनच ऑफिसला आले. सगळ्यांची मिटिंग बोलावली अन सगळ्यांनी पोटभर मिठाई खावी असे सांगून म्हणाले- `ही मिठाई कारल्याची नाही बरं. उसाच्या साखरेचीच आहे.'

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १७ जुलै २०१५

बौद्ध जीवनपद्धती

बीफ खाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते दलित असल्याने त्यांचा प्रतिवाद केला तर लगेच त्याला जातीय रंग दिला जाऊ शकेल. तरीही एक प्रश्न विचारावासा वाटतो. बीफ तर दूरची गोष्ट, मांसाहार बौद्ध जीवन पद्धतीत बसेल का? दलित समाज मोठ्या प्रमाणात बौद्ध मतानुयायी आहे. अहिंसा हे ज्याप्रमाणे जैन संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे तसेच बौद्ध संप्रदायाचे देखील आहे. आज बौद्ध संप्रदाय केवळ राजकीय अंगानेच पाहिला जातो. उच्चवर्णीय द्वेष, आरक्षण, स्मारके, राजकीय शक्तीगट हेच स्वरूप राहिले आहे. जीवनपद्धती म्हणून त्याचा विचार होतच नाही. सुरापान, मांसाहार किंवा एकूणच पंचशील वगैरेचा विचार होत नाही. बौद्ध मताचा जीवन पद्धती या अंगाने विचार व्हायला हवा असे वाटते.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१७

सुमार विद्वान

नागपुरात काल एक कार्यक्रम झाला. चार-पाच वक्ते बोलले. विषय होता - संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? एका विद्वान वक्त्याचे भाषण ऐकले. मी कार्यक्रमाला गेलो नव्हतो आणि सगळी भाषणेही ऐकली नाहीत. पण जे ऐकले ते इतके सुमार होते आणि विषयाला सोडून होते की, अशा लोकांबद्दल काय म्हणावे? भूईला भार एवढेच म्हणता येईल. ते संघाचे विरोधक आहेत हा मुद्दा नाही, त्यांची अपार निरर्थकता हा मुद्दा आहे. असो. त्या निमित्ताने एक मुद्दा पुन्हा विचारार्थ ठेवावासा वाटतो. त्यात धर्म हा विषय येणे स्वाभाविक होते. अन धर्म या शब्दाचा उपयोग त्या वक्त्यांनी रिलीजन याच अर्थाने केला. हे सर्रास झाले आहे. त्याचे कोणास काही वाटत नाही. प्रश्न विद्वानांचा आहे. ते मुजोरी करतात. त्यांच्यासाठी एक प्रश्न धर्म म्हणजे जर रिलीजन तर पंथ आणि संप्रदाय म्हणजे काय? पंथ, संप्रदाय कशाला म्हणायचे? त्यांची लक्षणे काय? मी ज्या वक्त्यांची चर्चा करतो आहे असे लोक समाजाच्या सुमारीकरणासाठी अन अध:पातासाठी कारण असतात.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१८

शरिया न्यायालये

शरिया न्यायालयांची चर्चा सुरु झाली आहे. सर्वसाधारणपणे त्याला विरोध आहे. माझे मत मात्र जरा वेगळे आहे. अनेकांना कदाचित पटणार नाही असे आहे. पण विचार करून पाहावा. मला वाटते शरिया न्यायालयांना विरोध करू नये.

१) एकतर देश म्हणून आपली न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. काही समस्या येईल तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचेच चालणार. २) दुसरे म्हणजे ती काही मुस्लीमेतरांना लागू होणारी व्यवस्था नसेल. फक्त इस्लाम मतानुयायी एवढीच त्यांची कक्षा असेल. ३) शरियानुसारच्या कठोर शिक्षा मुस्लिम समाज किती मान्य करेल वा स्वीकारेल? एखादी जरी हात तोडण्याची शिक्षा अमलात आली तर मुस्लिमांमध्येच त्याची प्रतिक्रिया निर्माण होईल. अशा प्रकारांमुळे मुस्लिम समाज दुबळा आणि विस्कळीत व्हायला मदत होईल. कारण ठप्पा इस्लामचा पण जगणे आधुनिक ही मुस्लिमांची स्थिती आहे. जी योग्य आणि स्वाभाविक आहे. परंतु याला शरिया न्यायालयांची सक्रियता छेद देईल जे चांगले लक्षण ठरेल. एक तर त्यातून इस्लामच्या भारतीयीकरणाची सुरुवात होईल किंवा इस्लाम नष्ट होण्याची. ४) राहिला प्रश्न मुस्लिम महिलांचा. त्यांना त्रास होईल हे खरे पण तो फार नाही. कारण एक तर त्या व्यक्तिगत वा सामूहिक बंड करतील किंवा इस्लाम सोडतील किंवा मुस्लिम कुटुंबांमध्ये असंतोषाचा भडका उसळेल. यातील काहीही कोणताही समाज २०१८ मध्ये सहन करू शकणार नाही. जर असे झालेच तर हिंदूंनी मुस्लिम महिलांना सामावून घेण्याची तयारी करावी. शरिया न्यायालयांना त्यांच्याच नशिबाने वाट करून द्यावी.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१८

खुजे

संतापजनक आहे. काल एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी छोटीशी कमेंट टाकली. तर त्यावर जे लोक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विक्षिप्त प्रकारे व्यक्त झाले (काहींनी ते नक्कीच योग्य स्पिरिटने घेतले.) ते खरे तर कीव करण्याचाही पलीकडचे आहेत. पोटदुखी, दुस्वास, आपण याचं काहीही बिघडवू शकत नाही आणि आपल्याशिवाय कोणी कसा जगू शकतो याची मळमळ कशी असते याचं उदाहरण आहे हे. मी सातत्याने लिहितो त्यावर कधीही व्यक्त न होणारे आपले खुजेपण घेऊन जेव्हा माझ्यावर चिखलफेक करण्याचा सभ्य प्रयत्न करतात तेव्हा ते स्वतःचं खुजेपण जगाला दाखवतात एवढंच. गेली दहा एक वर्ष मी समाज माध्यमात आहे. कधीही व्यक्तिगत बोललो नाही. पण आज राहवलं नाही. मी या वृत्तीकडे दुर्लक्ष करतो.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१९

महिला

स्त्रिया वा महिलांबद्दल बोलणं, लिहिणं, टिप्पणी करणं; गुन्हा आहे? पाप आहे? हीन अभिरुची आहे? कसं ठरवायचं? स्त्री ही माणूस या गोष्टीला अपवाद आहे? समाज या गोष्टीला अपवाद आहे? स्त्री ही वेगळ्या ग्रहावरून आलेली कोणी विशेष आहे की ज्यांना पृथ्वीवरच्या गोष्टी लागू होत नाहीत?

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१९

नेपाळ

अनेकांना आवडणार नाही, रागही येईल. बाकी, मी कामातून गेलो आहे यावर तर आता बहुतेक शिक्कामोर्तब झालं आहे. तरी एक मनात आलेला विचार पुढे ठेवतो.

नेपाळमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. वर्तमान स्टेटस माहिती नाही पण त्यांच्या घटनेतही नेपाळ हिंदू राष्ट्र असल्याचे घोषित केले होते. तरीही आज नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणता येईल का? सत्ता, संपत्ती आणि सुरक्षा एवढ्या बळावर राष्ट्र म्हणून एखादा समाज उभा राहतो आणि टिकतो का? या गोष्टी कधी दगा देतील याचा काय भरवसा? नेपाळकडे या तिन्ही गोष्टी नाहीत म्हणूनच त्याची आजची गत झाली असं म्हणता येईल. पण या तिन्ही गोष्टींचं जाणंयेणं तर सुरूच राहतं. त्या नसतानाही वा त्यांना धक्का लागल्यावरही तो समाज राष्ट्र म्हणून टिकायचा असेल तर वेगळं काहीतरी लागतं हे स्पष्ट आहे. सत्ता, संपत्ती, सुरक्षा, संख्या यापेक्षा वेगळं असं तत्व आहे जे राष्ट्र घडवतं. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असं म्हणताना ते तत्व अभिप्रेत असतं. त्याकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे. कारण नेपाळ असो वा श्रीलंका हिंदू समाज हिंदुत्व वा राष्ट्रीयत्वाचे ते मूलतत्व सांभाळू आणि विकसित करू शकला नाही. भारतात काय होईल?

मी ज्योतिषी नाही.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०२०

शनिवार, १५ जुलै, २०२३

तो अन ती

एक तो अन एक ती. कसे भेटले, कुठे भेटले हे गौण. एकमेकांना ओळखणारे. विशीच्या आसपासचे. रोज भेटत. संध्याकाळी तळ्यावर जाऊन बसत. परत जात. दोघांच्याही घरच्यांची चलबिचल सुरु झाली. त्यांनी हेर ठेवले त्यांच्या मागावर. हेरांनी पाळत ठेवली. घरी येऊन सांगितले- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' तेथून हा रोजचा क्रम सुरु झाला. घरच्यांना प्रश्न पडला यांचं काय आहे? आहे का काही? सांगावं ना. पण काहीच नाही. एकदोनदा त्यांनाच विचारून झालं पण त्यावर ते फक्त हसले. होता होता दोघेही चाळीशी पन्नाशीत पोहोचले. नित्यक्रम सुरूच होता. आईवडील म्हातारे झाले, थकले, देवाघरी गेले. हेर यांच्याकडे पोहोचले. म्हणाले- `गेली तीसेक वर्ष हेच काम करतोय. यावरच आमचं घर, कुटुंब, आयुष्य. तुमच्या आईवडिलांच्या सांगण्याने तुमच्यावर पाळत ठेवली. ते पैसे देत. आता आम्ही रस्त्यावर आलो. काय करावे?' दोघांनीही हेरांना काम सुरु ठेवण्यास सांगितले. तेच त्यांना पैसे देऊ लागले, स्वत:वर पाळत ठेवण्याचे. पण अहवाल कोणाला द्यायचा? हेरांची समस्या शेजारपाजाऱ्यांनी सोडवली. अहवाल घ्यायला ते तयारच होते. पुन्हा नित्यक्रम सुरु झाला. शेजाऱ्यांच्या प्रवेशाने थोडे वेगळे वळण मिळाले. त्यांच्यात शंका उत्पन्न झाली- तेच पैसे देत आहेत. त्यामुळे ते कसे थांग लागू देतील त्यांच्यात काही आहे वा नाही? मग ठरले, हेरांनी नोकरीचा राजीनामा द्यायचा. हेर दोघांना भेटले. राजीनामा देतो असे सांगितले. दोघांनी माना डोलावल्या. त्या हेरांना शेजारपाजाऱ्यांनी नोकरीवर ठेवले. काम तेच. पैसे शेजारपाजारी देणार. सुरु झाला क्रम. आताही अहवाल पहिल्या दिवशीचाच- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' पाहता पाहता दोघांनी साठीही पार केली. हेरांनीही राम म्हटले. शेजारपाजाऱ्यांनी दुसरे हेर ठेवले. क्रम सुरु राहिला. अहवाल तोच कायम राहिला. दहावीस वर्ष अशीच गेली. एक दिवस नेहमीप्रमाणे हेर आले. पण आविर्भाव रोजचा नव्हता अन अहवालही रोजचा नव्हता. अहवाल होता- `आज ते आलेच नाहीत. आम्ही पूर्ण वेळ थांबलो. पण ते आलेच नाहीत.' लोकांनी शोध घेतला. दोघेही आपापल्या घरात निष्प्राण पहुडले होते. पुढचे सगळे सोपस्कार पार पडलेत दुसऱ्या दिवशी. दहनघाट पलीकडेच होता, हे दोघे बसत त्या तळ्याच्या. सारे लोक विधी आटोपून परतत होते. गेली कित्येक वर्षे त्या रस्त्यावरील पिंपळपारावर धुनी लावून भजने गात बसणारा अवलिया तसाच भजन गात बसला होता. कोणीतरी म्हणालं- `हा तर त्यांना रोज पाहत असेल. याला विचारावं, त्यांचं काही होतं का?' सगळे गेले. नमस्कार करून त्यांना दोघांच्याही स्वर्गवासाची बातमी सांगितली. अवलिया हसला आणि पुटपुटला काही तरी. काही क्षण गेले. एकाने धीर करून सगळ्यांच्या मनातला मुरलेला प्रश्न विचारलाच. `महाराज त्यांचं काही होतं का?' अवलिया मोठ्ठ्याने हसला. सारं अवकाश गडगडून जावं असा. अन म्हणाला- `हो !!!' सगळे अवाक. प्रश्नार्थक. `ते खूप बोलत असत. त्यांच्यात खूप काही होतं. काय काय सांगायचं...' अवलिया बोलला. आणखी एकाला कंठ फुटला, `महाराज काही तर सांगा.' अवलिया उठून उभा राहिला. प्रथम आकाशाकडे आणि नंतर विचारणाऱ्याच्या डोळ्यात पाहून म्हणाला- `नाही सांगणार. कारण, सांगताच नाही येणार. कारण, ते त्यांच्या भाषेत बोलत असत. तुम्हाला ती भाषाच येत नाही.' अन पार उतरून भजन म्हणत अवलिया चालू लागला. दुसरा पिंपळपार जवळ करायला.

- श्रीपाद कोठे

१६ जुलै २०१५

गुरुवार, १३ जुलै, २०२३

ज्ञानी

ज्ञानी (आध्यात्मिक अर्थाने) माणसाची लक्षणे निश्चित सांगता येत नाहीत. गीतेत सुद्धा ज्ञानयोग असा अध्याय नाही. ज्ञानविज्ञान योग आहे, पण ज्ञानयोग नाही. कारण तो माणूस अमुक गोष्टींवरून ओळखता येत नाही. विशिष्ट वेष, विशिष्ट कर्म, विशिष्ट साधनापद्धती, मठ, मंदिर, ईश्वरी प्रतिमा, दैनंदिन आचरण; इत्यादी काहीच सांगता येत नाही. या बाह्य गोष्टीतील काही असेल किंवा नसेल. अनेकदा, विशेषतः विकासाच्या पुढील पुढील अवस्थेत यातील काहीच नसतं. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीची आध्यात्मिकता समजत नाही. अनेकदा तर तो सामान्यच वाटतो किंवा अतिशय सामान्य. ज्ञानी व्यक्तीला त्याने फरक पडत नाही. परंतु त्याचं आकलन न झाल्याने त्याच्याशी जो व्यवहार केला जातो वा जे संबंध निर्माण होतात; त्याचा मात्र त्याला त्रास होतो. कारण व्यवहार आणि संबंध म्हटले की; इच्छा, अपेक्षा, मागण्या, समज, perception अशा अनेक गोष्टी येऊन आदळत असतात. त्यांनी विघ्न निर्माण होते. ज्ञानी साधकासमोर ही मोठी समस्या असते. येणारा भविष्यकाळ ज्ञानमार्गाचा असेल. पण त्यातल्या या अडचणींमुळे हा प्रवास गोंधळ आणि गुंतागुंतीचा राहील.

- श्रीपाद कोठे

१४ जुलै २०२२

रविवार, ९ जुलै, २०२३

हिंदू अर्थशास्त्राचे मूलभूत घटक

 - बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

- अडीच वर्षात साडेसहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

- पुढील वर्षी मंदीची शक्यता

- विवोचे संचालक देशातून फरार

- शिंजो ऍबे यांची हत्या

- श्रीलंकेत अंदाधुंदी

- पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

- रशिया युक्रेन युद्ध


या अलीकडच्या काही घटना. त्यांची बरीच चर्चा आणि विश्लेषणे होत असतात. आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवस्था हे घटक या सगळ्यात महत्वाचे आहेत. ज्या देशांबद्दल आज चर्चा होते ते आज जात्यात आहेत. बाकीचे सुपात. जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती... एवढाच फरक. यातून बाहेर पडण्यासाठी एका वेगळ्या आर्थिक चिंतनाची गरज आहे. त्याला हिंदू अर्थशास्त्र म्हणता येईल. हिंदू अर्थशास्त्र म्हणजे हिंदूंचे हिंदूंनी हिंदूंसाठी बनवलेले अर्थशास्त्र नाही. हिंदू अर्थशास्त्र म्हणजे, हिंदूंनी जगाच्या कल्याणासाठी दिलेले जीवनाचे अर्थशास्त्र. त्याची तीन मुख्य लक्षणे. ही लक्षणेच त्याचा आधारही. १) विपुलता, २) उतरत्या किमती, ३) बचत. Scarcity, inflation, loan या वर्तमान आधारघटकांच्या बरोबर विरुद्ध असे हे घटक आहेत. हिंदू अर्थशास्त्राच्या आधारघटकांकडे कसं जाता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मूलभूत आहे. सगळे उपाय आणि अन्य गोष्टी करताना हे आधारघटक बळकट होतायत की नाही याकडे लक्ष दिलं तर भविष्य आहे. अन्यथा जात्यातले अन सुपातले सुरूच राहील.

- श्रीपाद कोठे

१० जुलै २०२२

गुरुवार, ६ जुलै, २०२३

माँ काली विवाद

सध्या माँ काली वरून विवाद सुरू झाला आहे. का होतात असे विवाद? कारण दृष्टी वेगवेगळी असते. मूर्त जीवनाला अमूर्ततेकडे घेऊन जाण्यासाठी प्रतिके असतात, ही हिंदू जीवनदृष्टी आहे. अन अमूर्ततेला मूर्त करण्यासाठी प्रतिके असतात, ही अन्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे प्रतीक म्हणजे ईश्वर नाही. प्रतीक हे, मानवी अपूर्णतेला आकलन झालेले ईशत्व दाखवते. ते प्रतीक हे पूर्णत्व नाही. विकासाच्या एका अवस्थेत प्रतीक बाजूला सारून पूर्णतेकडे जायचे असते. तर हिंदू व्यतिरिक्त अन्य विचार ही भेदपूर्ण सृष्टी म्हणजेच पूर्णता मानतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने प्रतीक म्हणजेच ईश्वर. अन हा ईश्वर या भेदपूर्ण मूर्ततेला साहाय्य करणारा. त्यामुळे प्रतिकांची मोडतोड त्यांना अयोग्य वाटत नाही. मग दोन गट तयार होतात. एक प्रतिकांची मोडतोड होऊ नये असे वाटणारा अन दुसरा प्रतिकांची मोडतोड झाल्यास त्यात काही गैर नाही असे वाटणारा. या वादाला अंत नाही. पण त्यातून मार्ग काढायचा असेल तर जीवनदृष्टी अधिक विस्ताराने, तपशीलाने अन तटस्थपणे वारंवार मांडावी लागेल. त्यातूनच नीट विचार विकसित होईल. अमुक गोष्ट आमची आहे एवढं पुरेसं नाही. आमची असलेली गोष्ट काय आहे? तिचे अर्थ आणि अन्वयार्थ काय? जीवनाच्या व्यापक संदर्भात त्याचे विवेचन. मर्यादा अन बलस्थाने. हे सगळंच मांडत राहावे लागेल. हे सगळं आधीच सांगून झालं आहे. अमक्या पुस्तकात आहे, तमक्याने म्हटलं आहे; याला अर्थ नाही. ते सामान्य माणसाच्या विचारांचा, विचार प्रक्रियेचा भाग झाला आहे का? हा प्रश्न आहे. तसे झाले नाही अन आमचे आणि तुमचे हाच केंद्रबिंदू झाला तर, मूर्ततेला अमूर्ततेकडे घेऊन जाणारी आध्यात्मिकता लोप पावेल. जे कोणाच्याही हिताचे नसेल.

- श्रीपाद कोठे

७ जुलै २०२२

बुधवार, ५ जुलै, २०२३

समानार्थी नव्हे वेगळे

१) कणखरपणा आणि कर्कश्शपणा,

२) हसणे आणि दात काढणे,

३) गांभीर्य आणि घुमेपणा,

४) स्वाभिमान आणि उर्मटपणा,

५) मनमिळावू आणि बिनकण्याचा,

६) नम्रता आणि दुबळेपणा,

७) संवेदनशीलता आणि रडकेपणा,

८) आग्रही आणि आक्रस्ताळेपणा,

९) आनंद आणि उन्माद,

१०) उपभोग आणि उधळेपणा,

वेगवेगळे शब्द आहेत. म्हणूनच त्यांचे अर्थही वेगवेगळे आहेत. पण खूपदा म्हणजे खूपचदा ते समानार्थक असल्यासारखंच आपलं वागणं असतं नाही का?

- श्रीपाद कोठे

६ जुलै २०१५

मंगळवार, ४ जुलै, २०२३

द्वेष कसा कमी होईल?

द्वेषयुक्त भाषण विरोधी कायदा करण्यावर सरकार विचार करीत असल्याची बातमी आहे. ठीक आहे. सरकार सरकारचं काम करेल. पण एखाद्याच्या मनातील द्वेष कायदा करून दूर करता येतो का? उलट कायद्याने दाबून टाकलेला द्वेष अन्य मार्गाने बाहेर पडेल. त्याचा त्रास समाजालाही होऊ शकतो किंवा त्या त्या व्यक्तीलाही. अथवा दोघांनाही. मनातला द्वेष काढून टाकणे ही मुख्य गोष्ट आहे. त्यासाठी काय करायचे यावर खलच होत नाही, तर प्रयत्न कसे होणार? द्वेष या गोष्टीची आज व्याख्या नाही त्यामुळे अडचणी येतात. कायदा करताना द्वेष या शब्दाची व्याख्या केली जाईल. अन कारवाई करताना त्याचा फायदा होईल असाही एक युक्तिवाद करता येईल. पण जगाचा अनुभव काय आहे? अमेरिकेत कालच तेथील स्वातंत्र्यदिन मिरवणुकीवर गोळीबारात सहा जण ठार झाले. याला mass shooting म्हणतात. अशा mass shooting ची कायदेशीर व्याख्या आहे. तरीही अशा घटनांमध्ये अलीकडे दररोज पन्नासेक माणसे मारली जात आहेत. काय उपयोग व्याख्येचा? 'बुद्धी' या गोष्टीची जादू आपल्यावर इतकी आहे की तिची मर्यादा लक्षात घेण्याचीच आपली तयारी नसते. व्याख्या, चर्चा, तर्क, योजना, कायदा, जबाबदारी, शिक्षा, सजा, भय; यापलीकडे आपली धाव जात नाही. दर्शनीय नसलेले घटकही मानवी जगण्यावर परिणाम करतात हे लक्षात येत नाही. वातावरण आणि मानसिक घटक याकडे खूप जास्त लक्ष दिल्याशिवाय तरणोपाय नाही. अन वातावरण आणि मानसिक घटक हे सुद्धा सुटे नसतात. आर्थिक रचना, सामाजिक discourse, इच्छा, आकांक्षा, जगण्याच्या कल्पना अशा सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या असतात. आज या दृष्टीने खूप मोठी पोकळी आहे.

- श्रीपाद कोठे

५ जुलै २०२२