शनिवार, १५ जुलै, २०२३

तो अन ती

एक तो अन एक ती. कसे भेटले, कुठे भेटले हे गौण. एकमेकांना ओळखणारे. विशीच्या आसपासचे. रोज भेटत. संध्याकाळी तळ्यावर जाऊन बसत. परत जात. दोघांच्याही घरच्यांची चलबिचल सुरु झाली. त्यांनी हेर ठेवले त्यांच्या मागावर. हेरांनी पाळत ठेवली. घरी येऊन सांगितले- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' तेथून हा रोजचा क्रम सुरु झाला. घरच्यांना प्रश्न पडला यांचं काय आहे? आहे का काही? सांगावं ना. पण काहीच नाही. एकदोनदा त्यांनाच विचारून झालं पण त्यावर ते फक्त हसले. होता होता दोघेही चाळीशी पन्नाशीत पोहोचले. नित्यक्रम सुरूच होता. आईवडील म्हातारे झाले, थकले, देवाघरी गेले. हेर यांच्याकडे पोहोचले. म्हणाले- `गेली तीसेक वर्ष हेच काम करतोय. यावरच आमचं घर, कुटुंब, आयुष्य. तुमच्या आईवडिलांच्या सांगण्याने तुमच्यावर पाळत ठेवली. ते पैसे देत. आता आम्ही रस्त्यावर आलो. काय करावे?' दोघांनीही हेरांना काम सुरु ठेवण्यास सांगितले. तेच त्यांना पैसे देऊ लागले, स्वत:वर पाळत ठेवण्याचे. पण अहवाल कोणाला द्यायचा? हेरांची समस्या शेजारपाजाऱ्यांनी सोडवली. अहवाल घ्यायला ते तयारच होते. पुन्हा नित्यक्रम सुरु झाला. शेजाऱ्यांच्या प्रवेशाने थोडे वेगळे वळण मिळाले. त्यांच्यात शंका उत्पन्न झाली- तेच पैसे देत आहेत. त्यामुळे ते कसे थांग लागू देतील त्यांच्यात काही आहे वा नाही? मग ठरले, हेरांनी नोकरीचा राजीनामा द्यायचा. हेर दोघांना भेटले. राजीनामा देतो असे सांगितले. दोघांनी माना डोलावल्या. त्या हेरांना शेजारपाजाऱ्यांनी नोकरीवर ठेवले. काम तेच. पैसे शेजारपाजारी देणार. सुरु झाला क्रम. आताही अहवाल पहिल्या दिवशीचाच- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' पाहता पाहता दोघांनी साठीही पार केली. हेरांनीही राम म्हटले. शेजारपाजाऱ्यांनी दुसरे हेर ठेवले. क्रम सुरु राहिला. अहवाल तोच कायम राहिला. दहावीस वर्ष अशीच गेली. एक दिवस नेहमीप्रमाणे हेर आले. पण आविर्भाव रोजचा नव्हता अन अहवालही रोजचा नव्हता. अहवाल होता- `आज ते आलेच नाहीत. आम्ही पूर्ण वेळ थांबलो. पण ते आलेच नाहीत.' लोकांनी शोध घेतला. दोघेही आपापल्या घरात निष्प्राण पहुडले होते. पुढचे सगळे सोपस्कार पार पडलेत दुसऱ्या दिवशी. दहनघाट पलीकडेच होता, हे दोघे बसत त्या तळ्याच्या. सारे लोक विधी आटोपून परतत होते. गेली कित्येक वर्षे त्या रस्त्यावरील पिंपळपारावर धुनी लावून भजने गात बसणारा अवलिया तसाच भजन गात बसला होता. कोणीतरी म्हणालं- `हा तर त्यांना रोज पाहत असेल. याला विचारावं, त्यांचं काही होतं का?' सगळे गेले. नमस्कार करून त्यांना दोघांच्याही स्वर्गवासाची बातमी सांगितली. अवलिया हसला आणि पुटपुटला काही तरी. काही क्षण गेले. एकाने धीर करून सगळ्यांच्या मनातला मुरलेला प्रश्न विचारलाच. `महाराज त्यांचं काही होतं का?' अवलिया मोठ्ठ्याने हसला. सारं अवकाश गडगडून जावं असा. अन म्हणाला- `हो !!!' सगळे अवाक. प्रश्नार्थक. `ते खूप बोलत असत. त्यांच्यात खूप काही होतं. काय काय सांगायचं...' अवलिया बोलला. आणखी एकाला कंठ फुटला, `महाराज काही तर सांगा.' अवलिया उठून उभा राहिला. प्रथम आकाशाकडे आणि नंतर विचारणाऱ्याच्या डोळ्यात पाहून म्हणाला- `नाही सांगणार. कारण, सांगताच नाही येणार. कारण, ते त्यांच्या भाषेत बोलत असत. तुम्हाला ती भाषाच येत नाही.' अन पार उतरून भजन म्हणत अवलिया चालू लागला. दुसरा पिंपळपार जवळ करायला.

- श्रीपाद कोठे

१६ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा