रविवार, १६ जुलै, २०२३

`कारल्याचा गोडवा'

महानगरातील वृत्तवाहिनीच्या कार्यालयात मुख्य संपादक आपल्या कार्यालयात डोक्याला हात लावून सचिंत बसले होते. शिपायाने रोजच्याप्रमाणे आणून ठेवलेला नक्षीदार भारी चहाच्या कपातील वाफाळता चहा, `चहाची लस्सी' होण्याच्या स्थितीत येत होता. सकाळच्या मिटींगसाठी संपादक विभागातील वरिष्ठ सहकारी केबिनमध्ये आले तेव्हा त्यांना, नेहमी उत्साहाचे कारंजे असलेले संपादक सचिंत बसलेले दिसले. सगळे निमूट बसले. मिनिटभरात मुख्य संपादक बोलू लागले- `आज सकाळीच प्रसार विभागाचा अहवाल आला. आपली लोकप्रियता घसरते आहे. टीआरपी सतत चौथ्या आठवड्यात घसरला आहे. आपल्या चर्चांमध्ये आता लोकांना काही रस वाटेनासा झाला आहे. काय करायचे? या आठवड्यात टीआरपी वाढलाच पाहिजे असे व्यवस्थापनाचे आदेश आहेत.' काही मिनिटे शांततेत गेल्यावर चर्चेच्या कार्यक्रमाची जबाबदारी असलेला सहकारी घाबरतच बोलू लागला- `पण सर, गेल्या दोन आठवड्यात आपण चांगल्या चर्चा घेतल्या. राजकारण कधी शुद्ध होणार आणि राजकारणातून घराणेशाहीचे उच्चाटन; असे दोन जबरदस्त विषय घेतले होते.' वातावरण हलकेफुलके ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेला एक सहकारी बोलला- `या दोन्ही गोष्टी कालत्रयी शक्य नाहीत हे माहीत असूनही सगळे किती अहमहमिकेने बोलत होते नाही.' तिसऱ्याची विश्लेषणात्मक प्रतिक्रिया- `असेच हवे असते या व्यवसायात. जे अशक्यच आहे त्याचीच चर्चा अन तीही अहमहमिकेने. तेव्हाच ना वाढणार टीआरपी.' शांतपणे ऐकत बसलेले संपादक वैतागून बोलले- `ते ठेवा बाजूला. टीआरपी वाढत नाहीय. तो एका आठवड्यात वाढण्यासाठी काय करायचे?' एकाने सूचना केली- `सर, आपल्या वार्ताहरांची मिटींग बोलवा. त्यांना लोकांची नाडी ठाऊक असते.' ठरले. दुपारी वार्ताहरांसकट संपूर्ण संपादक विभागाची बैठक झाली. सकाळचाच विषय चर्चेला ठेवण्यात आला. प्रास्ताविकानंतर शांतता पसरली. उत्साहाचे आणि चैतन्याचे झाड अशा एका नवीनच रुजू झालेल्या वार्ताहर मुलीने अदबीने सूचना केली- `सर, मी लहान आहे. मला अनुभव पण नाही. पण आम्हाला असं शिकवण्यात आलंय की, कुत्रा माणसाला चावला तर त्यात कोणालाच रस नसतो. पण माणूस जर कुत्र्याला चावला तर मात्र सगळे कान टवकारतात. म्हणून मला वाटतं, कडू कारलं गोड का नाही? कारलं गोड कसं होईल? कारलं गोड होण्यासाठी कोणी कोणी काय काय करायला हवं? विशेषत: राजकारणी लोक काय करणार? या विषयातील आजवरचे संशोधनात्मक आणि वैचारिक प्रयत्न कोणते? या साऱ्यावर चर्चा घ्याव्यात. मोठमोठे राजकारणी, अभ्यासक, कार्यकर्ते बोलवावेत. विदेशी वाहिन्यांना सहभागी करून घ्यावे आणि ते लाइव्ह असावे. मला वाटतं याने फायदा होईल.' निवृत्तीकडे झुकलेले एक सहकारी उभे राहिले अन म्हणाले- `अहो असे कधी असते का? कारल्याचा गोडपणा. हा काय विषय आहे? लोक हसतील आपल्याला.' पण संपादकांनी काहीतरी नोंद घेतली अन जाहीर केले. या आठवड्यात `कारल्याचा गोडवा' हा चर्चेचा विषय राहील. त्याच्या नियोजनासाठी निवडक चार लोकांना त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले. सूचना करणारी ती नवीन वार्ताहर अर्थातच विशेष निमंत्रित. सगळी योजना झाली. शनिवार, रविवार खास आठवड्याचा `विक एंड' `कारल्याचा गोडवा' यावरील चर्चेने गाजला. वाहिनीने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले. नवीन आठवड्याच्या सोमवारी संपादक मिठाईचा बॉक्स घेऊनच ऑफिसला आले. सगळ्यांची मिटिंग बोलावली अन सगळ्यांनी पोटभर मिठाई खावी असे सांगून म्हणाले- `ही मिठाई कारल्याची नाही बरं. उसाच्या साखरेचीच आहे.'

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १७ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा