बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

कहाणी महासत्तेची

आपण ज्यांना डोक्यावर घेतो; कपडेलत्ते, दागदागिने, शृंगार इत्यादीत ज्यांचं अनुकरण आणि अनुसरण करतो; ज्यांच्या मतांना, विचारांना वजन आणि महत्व देतो; त्यांना स्वयंपाकातलं काही येत नाही, हे उत्तम स्वयंपाक करणारे महिला पुरुष आवडीने पाहतात. त्यांचा स्वयंपाकातील 'ढ' पणा enjoy करतात. अन अशा तऱ्हेने आपण एक 'आनंदी (!??)' समाज होतो. अशा तऱ्हेने ते सेलिब्रिटी तसेच सेलिब्रिटी राहतात. त्यांची किंमत आणखीन वाढते. तुम्हा आम्हाला  'आनंदी (!??)' करून ते कोट्यवधी रुपये कमावतात. त्यासाठी अनेक जण उदार होऊन त्यांना कोट्यवधी रुपये देतात. हे कोट्यवधी रुपये त्यांना देण्यासाठी हे दानशूर कोट्यवधी लोकांकडून ते कमावतात.

अन सरतेशेवटी आपण सगळी लाजलज्जा कोळून पिऊन 'महासत्ता' होतो.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. पंढरीनाथ महाराज की जय.

- श्रीपाद कोठे

२९ डिसेंबर २०२१

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

चर्चा हिंदुत्वाची

हिंदू इतिहास, हिंदू परंपरा, हिंदू रूढी इत्यादींची जेवढी चर्चा आणि विश्लेषणे होतात; तेवढी चर्चा आणि विश्लेषणे हिंदू आर्थिक दर्शन, हिंदू सामाजिक दर्शन, हिंदू राजकीय दर्शन, हिंदू भक्ती दर्शन, हिंदू मानव दर्शन, हिंदू जीवन दर्शन, हिंदू कला दर्शन, हिंदू नीती दर्शन इत्यादींची होत नाहीत. जे होत नाही त्यावर आता फोकस हवा. ते जास्त गरजेचेही आहे आणि शक्ती प्रदान करणारेही.

- श्रीपाद कोठे

२२ डिसेंबर २०२१

मनोबौद्धिक कुष्ठरोग

१) भारतीय वंशाच्या एका गृहस्थाला १७,५०० कोटी रुपये वेतनाचे पॅकेज देण्यात आले आहे.

२) टेस्ला कंपनीचे सीइओ ८५ हजार कोटी एवढा कर भरणार आहेत.

- एस.टी. संपाचे घोंगडे भिजत पडले आहे.

- चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त कडाक्याच्या थंडीत मोबदला मागण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात उघड्यावर झोपत आहेत.

- कुपोषणाचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अर्थकारण, अर्थतज्ज्ञ, अर्थपंडित, नियोजनकार यांना हे सगळं ठाऊक असतं का? यावर त्यांना काही उपाय सुचतात का? मानव समाजाला बहुतेक मनोबौद्धिक कुष्ठरोग झालेला आहे.

- श्रीपाद कोठे

२२ डिसेंबर २०२१

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

गुरूचरित्र ग्रंथातील विश्वरूप दर्शन

'विश्वरूप दर्शन' म्हटलं की आपल्याला भगवद्गीतेची आठवण होते. ते योग्यही आहे आणि स्वाभाविकही. अन भगवद्गीतेशिवाय अन्यत्र कुठे 'विश्वरूप दर्शनाचा' उल्लेख आहे का? तसा प्रसंग आहे का? यावर बहुतेक नकारार्थीच उत्तर येईल. मात्र भगवद्गीतेशिवाय अन्यत्र असा एक उल्लेख आहे. तो आहे दत्त संप्रदायातील गुरुचरित्र या ग्रंथात. भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचा हा ग्रंथ. त्यात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे त्रिविक्रम भारती नावाच्या मुनींना विश्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. बहुधा २४ व्या अध्यायात. भगवद्गीता आणि गुरुचरित्र या दोन्हीतील विश्वरूप दर्शनाच्या वर्णनात मात्र थोडासा फरक आहे. गीतेतील हे दर्शन सृजन आणि विसर्जन दोन्ही दाखवणारं थोडं भयोत्पादक दर्शन होतं. श्रीकृष्णच हे सारं करत होते. गुरुचरित्रात मात्र त्रिविक्रम भारती यांना फक्त सगळीकडे लहानमोठे नृसिंह सरस्वतीच दिसत होते. हे थोडं शांत दर्शन होतं.

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

संन्याशाचा अहंकार

असं म्हणतात की, संन्याशाचा अहंकार सगळ्यात मोठा असतो. संन्यस्त असणं ही फारच मोठी गोष्ट असते अन कठीणही. नि:संशय संन्यासी थोरच. पण ही थोरवीच त्याचा अहंकार तयार करते, वाढवते, जोजवते, जोपासते. मात्र हा अहंकार का एकदा त्याच्या डोक्यावर बसला की सगळंच बिनसतं. त्यामुळे त्याचं संन्यस्तपण उणावत नाही. मात्र ते दोषपूर्ण होतं. अन्य सारं कमअस्सल असं वाटायला लागतं. व्रत जोपासण्यासाठी जवळ केलेले उपाय गुलाबाच्या संरक्षक काट्यांसारखे न राहता बाभळीसारखे होतात. हाच तो दोष. सगळ्याच व्रतांचं आणि व्रतस्थतेचं असंच असतं बहुधा.

- श्रीपाद कोठे

१५ डिसेंबर २०२१

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

छायाचित्राचा संदेश

काशी कॉरिडॉरचं काम करणाऱ्या कामगारांसोबत जेवतानाचं पंतप्रधानांचं छायाचित्र काल भरपूर व्हायरल झालं. ज्यांना मोदी सलतात त्यांचा प्रश्नच नाही, पण मोदी समर्थकांनी त्यातून काही मेसेज घेतला असेल का? 'मोदीजी किंवा नेतृत्व असं असं आहे' एवढं कौतुक पुरेसं म्हणता येईल का? नक्कीच नाही. श्रमप्रतिष्ठा, शारीरिक श्रमांचा आदर, शरीर श्रमाचा निश्चय, साधेपणा, गरीब - श्रीमंत भावनेला तिलांजली, सत्ता आणि संपत्ती नसलेल्यांबद्दल आदराची सहृदय वागणूक; हे सगळं त्या छायाचित्रातून झिरपलं तर त्याचं सार्थक म्हणता येईल. काशी विश्वनाथ त्यासाठी आशीर्वाद देवो.

- श्रीपाद कोठे

१४ डिसेंबर २०२०

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

हिंदू अर्थशास्त्र

सध्याच्या चर्चांमध्ये एका गोष्टीची आठवण झाली. इ.स. १९९३. अयोध्येतील विवादित बाबरी ढाचा पडल्यानंतर रा.स्व. संघावर बंदी घालण्यात आली होती तो काळ. नागपूरला रेशीमबाग येथे एक बैठक होती. त्यावेळी सहसरकार्यवाह असलेले सुदर्शनजी त्या बैठकीला होते. २५-३० जणांची ती दिवसभराची बैठक होती. त्यात दुपारी चहानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. म गो. बोकरे यांना बोलावले होते. त्यांनी नुकताच Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी त्यांचा विषय मांडला आणि मग त्यावर अघळपघळ चर्चाही झाली. एक नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, संघटनेवर बंदी असतानाही रा. स्व. संघ अशा गोष्टी करीत असतो. राजकीय डावपेच, बंदी, त्यासाठी करावयाच्या बाबी हे सगळे असतानाही मुलभूत कामही सुरूच असते. हा संघाचा विशेष आहे. तर कट्टर कम्युनिस्ट असलेले डॉ. म. गो. बोकरे दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रयत्नाने अन संपर्काने पूर्ण हिंदुत्वनिष्ठ होऊन त्यांनी Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. त्यातील चार महत्वाचे मुद्दे-

१) हिंदू अर्थशास्त्र विपुलतेचे अर्थशास्त्र आहे.

२) वर्तमान अर्थशास्त्रानुसार वस्तू वा सेवांचे भाव सतत वाढतात. हिंदू अर्थशास्त्रानुसार भाव सतत खाली यायला हवेत.

३) इस्लामी अर्थशास्त्रातील बिनव्याजी कर्जाची कल्पना उत्तम असून तिचा अंगीकार कसा करता येईल याचा सखोल विचार व्हायला हवा.

४) हिंदू अर्थशास्त्र हे दानाचे अर्थशास्त्र आहे.

- श्रीपाद कोठे

१३ डिसेंबर २०१६

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कायदा व विश्वास

रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांची एक आठवण संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांनी नोंदवली आहे. बाळासाहेब तामिळनाडू प्रांतात एका शिबिरात गेले होते. नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरे झाली. एका स्वयंसेवकाने संघाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बाळासाहेबांचं उत्तर महत्वाचं आहे. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या स्वयंसेवकाला त्याची माहिती विचारली. मग त्याला म्हणाले, 'तुमच्या घराची कागदपत्रे असतील. ती तुम्ही पाहिली का?' तो नाही म्हणाला. बाळासाहेब पुढे म्हणाले, 'तरीही कागदपत्रे असणारच. ती काढण्याचं, त्यांची चर्चा करण्याचं प्रयोजन तेव्हाच येईल जेव्हा, तुम्हा चार भावांना काही हवं आहे. जोवर काही नको असेल तोवर कपाटातल्या कागदांची आठवण येत नाही.' पुढे म्हणाले, 'आपल्या घटनेची प्रत कार्यालयात उपलब्ध असते. तुम्ही पाहू शकता.'

मानवी जीवन आणि कायदे, नियम याबद्दलचं मूलभूत चिंतन स्व. बाळासाहेबांच्या या उत्तरात आहे. आज सर्वत्र जो discourse चालतो तो पाहून वारंवार या प्रसंगाची आठवण येते. विश्वास आणि निखळ मन... That's all.

- श्रीपाद कोठे

१२ डिसेंबर २०१९

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

Conversion

1) hindus were converted by every hook and crook for last centuries.

2) country of hindus was looted and devided for centuries with the tool of conversion.

3) Pope threatens to convert the country to christianity.

4) rajiv gandhi promised mizoram to make it a christian state, in an election campaign. was it not `LALACH'?

5) what these secularists want? hindus to be decimated?

6) if global forces can prepare budgets for conversion of hindus, why not hindus to protect themselves?

7) you can only sermon not to be reactionary. you can't stop reaction.

- shripad kothe

Dec. 11, 2014

भुर्दंड

नागपूरचा शुक्रवार तलाव (गांधीसागर तलाव) रिकामा करण्याचं काम सुरू आहे. स्वच्छता आणि नवीन कामे या दोन कारणांसाठी. ही चांगली गोष्ट आहे. हा जुना तलाव एक चांगले स्थळ होईल अशी आशा करू. अशी आशा करतानाच एक गोष्ट मात्र खटकते. ती म्हणजे, यापूर्वी जी जी कामे झाली, सौंदर्यीकरण झालं, व्यावसायिक सुविधा झाल्या; ते सगळं मातीत गेलं आहे. बरं, या साऱ्या गोष्टींचा पुरेसा वापर करून झाल्यावर त्या मातीत गेल्या तर काही वाटणार नाही. मात्र याआधीच्या सगळ्या गोष्टी वापर/ उपयोग न होताच वाया गेल्या. त्यावर झालेला खर्च हा नागरिकांवर एक प्रकारे भूर्दंडच नाही का? शुक्रवार तलाव हे एक उदाहरण झाले पण अशी असंख्य उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला, अनुभवायला मिळतात. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी 'आम्ही अमुक केले' हे सांगण्यापुरत्या आणि हे सांगण्यासाठीच केल्या जातात की काय असे वाटते. या भुर्दंडाचा गंभीरपणे विचार व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे

११ डिसेंबर २०२१

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

निरभ्र

कपड्यावर भांडे हा प्रकार माहिती होता, पण आज दारावर एक बाई आली होती - केसांवर भांडे. या वेगळ्या प्रकाराला किती दाद मिळते, कोण कोण कशी कशी दाद देतात पाहायला दारात उभा होतो. कोणी काही दाद दिली नाही. तेव्हा उत्सुकतेने पाहत असलेल्या माझ्याकडे वळून तिने मलाच विचारले. मी डोक्यावरून हात फिरवत म्हटले - केसच नाहीत काय देऊ? ती इतकं मनमोकळं हसली की कित्येक दिवसात इतकं मोकळं, निरभ्र हसू पाहायला मिळालं नव्हतं.

- श्रीपाद कोठे

९ डिसेंबर २०१७

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

शेतीवर आयकर

शेती उत्पन्नावर आयकर लावावा अशी चर्चा होत असते. मात्र शेतीतील अडचण ही की सरसकट निर्णय घेणे शक्य नाही. अमिताभ सारखे किंवा अनेक डॉक्टर्स, वकील, सीए, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी आदींनी आपले खरे उत्पन्न लपवण्यासाठी शेती घेतली आहे. पण करोडो शेतकरी असे आहेत की ज्यांना शेतीचा खर्च आणि जगणे यांची तोंडमिळवणी करणेही कठीण होते. शिवाय शेतीच्या समस्याच वेगळ्या आहेत. एकाच गावी आजूबाजूला असलेल्या शेतीतून सुद्धा सारखे उत्पन्न होईल असे नाही. एकाने माल काढून घरी आणला अन दुसऱ्याचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आला तर एक तरला दुसरा बुडला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सरसकटीकरण नाही करता येत.

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२०

जबाबदारी

साधेपणा, सचोटी, सद्भाव या मार्गाने चालणारा समाज असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण त्यासाठी प्रथम समाजाला याविषयी किमान आस्था असायला हवी. चांगुलपणा ही सिद्ध करण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची आणि अनुभव देण्याची गोष्ट आहे ही समज हवी. घरातल्या दोन व्यक्तींमध्येही चढाओढ सुरू झाली तर त्याचे रूपांतर कलहात होते. समाज तर कधीच कुटुंबाएवढा एकजिनसी नसतो. समाजात कलह होऊ नये आणि तो अधिकाधिक एकजिनसी व्हावा यासाठी केवढी काळजी घ्यावी लागेल? कोणी घ्यायची ही काळजी? ज्याला ती जबाबदारी आपली वाटते त्याने.

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२०

ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ

संजीवन समाधीच्या दिवशी सहज एक मनात आलं; ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दोन्ही रचना माऊलींच्याच, पण दोन्हीच्या भाषेत एवढा फरक का? ज्ञानेश्वरीची भाषा कष्टपूर्वक समजून घ्यायलाही कष्टच होतात. उलट हरिपाठ सहज लक्षात येतो. असं का असावं. भाषेचा हा फरक कसा समजून घेता येईल?

- श्रीपाद कोठे

७ डिसेंबर २०२१

आशयानुसार भाषा जड वा सुलभ असूच शकते, नव्हे असतेच. जसे गीतारहस्य वाचताना अर्थ कदाचित लागणार नाही पण भाषा जड असूनही अडचणीची वाटत नाही. ज्ञानेश्वरीचा अर्थ हृदयंगम होणे हा मुद्दा नाहीच. भाषा सहज वाचणे शक्य आहे वा नाही हा आहे. बाकी हरिपाठ सुद्धा समजणं एकदम सोप्पं आहे वगैरे मी म्हणणार नाही. त्यासाठीही एक बैठक आणि तयारी हवीच. असो. एखाद्या भाषातज्ज्ञाकडून फुरसतीने समजून घ्यावे लागेल.

@@@@@@

अगदी हेच माझ्या मनात येतं ...नेहमीच येतं....

मला हरिपाठ पाठ आहे.. त्यामुळे नेहमीच हा फरक जाणवतो...🙏🙏

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥ 

मला माझ्या श्रीगुरु निवृत्तिनाथांनी दिलेले ज्ञान 'प्रमाण' आहे . ते ज्ञान मी हरिपाठामध्ये दिले आहे आणि त्यायोगेच मी संजीवन समाधी साधली आहे . 

हरिपाठरूपी ज्ञानप्रकाशात सतत रहाणे हीच संजीवन समाधी .

॥ सद्‌गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज की जय ॥

🙏🙏🙏

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

सरस्वती वंदना

'नाशिकच्या साहित्य संमेलनात माता सरस्वतीची वंदना केली नाही म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?'

'ज्यांनी सरस्वती वंदनेला नकार दिला ते असहिष्णू, कोत्या वृत्तीचे अन क्षुद्र मनाचे आहेत.'

'पण अपमानाचे....'

'मला नाही वाटत मा सरस्वतीचा अपमान वगैरे कोणी करू शकेल? कोणाचीही ती औकात नाही. सूर्यावर थुंकणारे सूर्याचा अपमान करू शकतील का? त्यामुळे अपमान वगैरे नाही. अन या घटनेमुळे यानंतर सरस्वती वंदन बादच होईल वगैरेत तथ्य नाही. माँ सरस्वतीचे भक्त तिची वंदना थांबवतील का कधी? शक्यच नाही. भागीरथीच्या विशाल प्रवाहात दगड फेकून तो प्रवाह थांबवू असं वाटणारे येडपट असतात. दुसरं काही नाही. हां; ते असहिष्णू, कोते, अन क्षुद्र मात्र आहेत.'

- श्रीपाद कोठे

५ डिसेंबर २०२१

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

फसवणूक

आदर म्हणजे काय? तो तयार कसा होतो? नष्ट कसा होतो?

आत्ता. १० मिनिटे झालीत. फाटक वाजलं म्हणून पाहायला गेलो. फाटकात एक बाई उभी होती. भाषा हिंदी. विचारलं- काय आहे? म्हणाली- हम मेहतर है. आज मातारानी का जुलूस है. दक्षिणा चाहिये. हातात खराटा होता. कटकट नको म्हणून अन गरीब बाईला चार पैसे दिल्याने काही बिघडत नाही म्हणून; आत गेलो २१ रुपये आणले अन दिले. त्यावर तिचा पट्टा सुरु झाला. ऐसा नही देना. आज बंदे कि पूजा होती है. तिने खराट्यात खोचलेली १०० रुपयांची नोट दाखवली. मी स्पष्ट सांगितले- मला द्यायचे तेवढे दिले. आता निघा. त्यावर पुन्हा तिचे सुरु- जितना आपको देना, उतनाही दो. लेकीन बंदा दो. हम आपको हमारे पास कि चिल्लर देते है. म्हटलं- काय ताप आहे. पण असेल त्यांचं काही. म्हणून आत गेलो अन १०० ची नोट घेऊन आलो. तिच्या हातात दिली. ती घेऊन तिने तिच्या हातातील खराट्याची काडी तोडली अन ८ तुकडे करून मला देऊ लागली. म्हटले चिल्लर कुठे आहे? त्यावर तिचे उत्तर हीच आमची चिल्लर. तुमची याने बरकत होईल. आता माझा पारा चढला. मी आवाज चढवून म्हटले- मला माझे आधीचे २१ रुपये अन ८० रुपये चिल्लर परत दे. बडबड बंद कर. तिने चक्क काढता पाय घेतला. तिने दिलेले खराट्याच्या काडीचे ८ तुकडे तिच्या अंगावर भिरकावून, तू चोर आहेस हे चार घरी ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने सांगून मी दार बंद केले. घरी बाईमाणूस नव्हते, अन माझ्याशी बदमाशी करणारी बाई होती म्हणून. अन्यथा रस्त्यावर पाडून चेहरा सुजवायला कमी केले नसते. nonsense किती असावा?

एक मात्र नक्की- यानंतर कोणीही बाई काही मागायला येईल तेव्हा तिला उभीही करणार नाही. समोरची व्यक्ती मेहतर आहे की नाही हे तर कळू शकणार नाही ना... पण मेहतर अन मागणाऱ्या बाया यांच्याबद्दल मनात पुन्हा काहीही वाटणार नाही.

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१५

चलनाचे काय?

भारतात काय किंवा जगात काय, सगळीकडे नोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र चलनाबद्दल कुठे बोलले जात नाही. चलन वाढतेच आहे अन त्यामुळेच चलनवाढही. व्यावहारिक भाषेत महागाई वाढतच राहते. अमेरिकेतील बँक्स कोसळल्या. त्यांच्या मदतीसाठी अब्जावधींचे packages दिले गेले. जपानच्या बँक्स अडचणीत आल्या, त्यांनीही अब्जावधींचे packages दिले. युरोपातही तेच आणि भारतातही तेच. बँकांचे npa manage करण्यासाठी भारत सरकारनेही बँकांना packages दिलेत. याचाच अर्थ जगातील पैसा वाढतोच आहे. त्याचे परिणामदेखील जगापुढे आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी अर्थक्रांती फारशी महत्वाची नाही. त्यासाठी अर्थदृष्टी बदलावी लागेल. काल नागपुरात सरसंघचालकांचे एक व्याख्यान झाले. त्यात त्यांनी उपभोगांवर नियंत्रणाचा मुद्दा मांडला. अर्थात हे नियंत्रण सरकारी वा अन्य बाह्य नियंत्रण नक्कीच नाही. हे मानवाने स्वत:वर विचार आणि विवेकाने घालून घ्यावयाचे नियंत्रण आहे. ज्या अर्थदृष्टीची जगाला गरज आहे त्याचा हा एक पैलू म्हणता येईल. पण अमक्याने म्हटले, तमक्याने म्हटले याला फारसे महत्व नाही. सर्वसामान्य माणूस, वरपासून खालपर्यंत सगळा समाज यादृष्टीने किती अन कसा विचार करतो ते महत्वाचे आहे. रोज नवीन तंत्रज्ञान, रोज विकासाची नवीन चित्रे आणि मग पूर्ण उपभोग घेण्यापूर्वीच वस्तू, सेवा इत्यादी मोडीत काढणे, use and throw असले प्रकार सुरु राहिले तर विश्वकल्याणी अर्थदृष्टी निर्माणच होणार नाही. भविष्याचा वेध घेऊन उड्डाणपूल बांधायचा आणि त्याची उपयोगिता पूर्ण व्हायच्या आतच केवळ २० वर्षात तो पाडून टाकायचा. ही दृष्टी असेल तर न बोललेलंच बरं.

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१६

संवाद

१ - तू ती गोष्ट ऐकली नाही का?

२ - कोणती?

१ - पुरात अडकलेल्या माकडीणीची. गळ्यापर्यंत पाणी आल्यावर डोक्यावरच्या पिलाला खाली घेऊन स्वतः त्याच्या डोक्यावर बसणाऱ्या.

२ - ऐकलीय नं. अन हेही माहिती आहे की, त्या स्तरावर जगणारी माणसेही तसंच वागतात.

(१ ला खूपच राग आला बा.)

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१९

विरक्ती

'हे जग नश्वर आहे', 'या जगात काही राम नाही', 'हे जग क्षणिक आहे'... हे कधी ना कधी कानी पडतं. कधी तरी जाणवतं. त्यामुळे ते माहीत असतं. अर्थात या विचारांचा वाराही न लागलेले सुद्धा असतातच. पण आपण बोलतोय ज्यांना हे कुठेतरी मनाला, बुद्धीला स्पर्श करून जातं त्यांच्याबद्दल. मात्र हे फक्त माहिती झाल्याने विरक्ती येत नाही. ही नश्वरता प्रत्यक्ष जीवनच असावं लागतं, ती क्षणिकता श्वास निश्वास असावा लागतो, हे निरर्थकत्व प्रत्यक्ष अनुभूत असावं लागतं; तेव्हा विरक्तीचा उदय होतो. ही विरक्ती हेच अवधूत अवस्थेचं पहिलं पाऊल ठरतं. यातील काहीही ठरवून होत नाही. ध्येय वगैरेला इथे वाव नसतो. असं होतं तेव्हा आपोआप होतं किंवा होतच नाही. मोठी मजेशीर असते ही विरक्ती.

(आठवडाभर भगवान दत्तात्रेयांचा जागर चालणार आहे. त्या अनुषंगाने सहज आलेलं काहीतरी.)

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१९

वेष्टणावर स्वभाषा

नवीन शैक्षणिक धोरण सध्या चर्चेचा विषय आहे. अनेक गोष्टींसोबत भाषा हाही त्यातील प्रमुख विषय आहे. त्याचे परिणाम काय असतील ते दिसेलच. पण शैक्षणिक धोरणातील सगळ्याच बाबी जीवनाशी अन जगण्याशी जोडल्या जायला हव्यात. केवळ अध्ययनापुरत्या नसाव्यात. त्या दृष्टीने सूचना करावीशी वाटते की, विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आवरणावर, वेष्टनावर स्थानिक भाषेत माहिती असावी. खाद्यपदार्थांच्या पाकिटावर विलायची, लवंग, मीठ, आंबा, लिंबू, कणिक; इत्यादी इत्यादी इत्यादी का असू नये? सगळ्यांना हे शब्द समजतात. त्यातून जे सांगायचे ते एका शब्दात लक्षात येते. आकलनक्षमता वगैरेचा प्रश्न नसतो. उलट इंग्रजी शब्दच पुष्कळांना समजत नाहीत. या पाकिटांवरील इंग्रजी भाषेचे समर्थन कोणत्याही तर्काने होऊ शकत नाही. परदेशात पाठवायची पाकिटे वेगळी असतात अन नसतील तर वेगळी करता येऊ शकतात. प्रत्येक राज्यानुसार ती ती भाषा असलेली पाकिटे तयार करणे ना कठीण आहे ना खर्चिक. त्यामुळे केंद्र स्तरावर याचे धोरण असले पाहिजे. स्वदेशी भाषांबद्दलची नकारात्मक भावना त्यामुळे आपोआप कमी होईल. स्वभाषा हा नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग असेल तर उद्योगांचे धोरणही त्याला पूरकच असले पाहिजे ना?

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०२०

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

अमिताभची संपत्ती

कालच अमिताभच्या संपत्तीविषयी एक बातमी वाचण्यात आली. त्यात म्हटले होते की, अमिताभ एका चित्रपटासाठी ७ कोटी रुपये आणि एका जाहिरातीसाठी ५ कोटी रुपये घेतात. मनात शेतकरी आंदोलन आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत हा विषय आला. फार विवेचन करणार नाही. तेवढी सवड नाही अन याआधी वेळोवेळी पुष्कळ लिहीत आलो आहे. फक्त माझा निष्कर्ष सांगतो. अमिताभने ७ वा ५ कोटी रुपये घेणे (अन यासारख्या अनेक disproportionate गोष्टी) बंद होत नाही आणि सामान्य माणसाला/ लोकांना याबद्दल उत्सुकता, आस्था आणि ओढ वाटणे थांबत नाही; तोवर आर्थिक समानता किंवा सर्वेपि सुखिन: सन्तु इत्यादींना काडीचाही अर्थ नाही.

- श्रीपाद कोठे

३ डिसेंबर २०२१