गुरुवार, ३० जून, २०२२

मूर्ख शिरोमणी

अनेकांना हे जग त्यांना हवं तसं पाहिजे असतं. त्यासाठी खूप आटापिटाही चालतो त्यांचा. फक्त एक गोष्ट त्यांना लक्षात येत नाही की, हे जग आपण बनवलेलं नाही. ज्या कोणी हे बनवलं असेल (जर बनवलं असेल तर) तो काही त्यांचा बांधील नाही. या जगाचं सोफ्टवेअर, हार्डवेअर, प्रोग्रामिंग त्यानं त्याला हवं तसं केलं. ते मान्य नाही असं हे लोक म्हणू शकतील. पण त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मग अशा लोकांची चिडचिड सुरु होते. आक्रस्ताळेपणा सुरु होतो. शिवराळपणा सुरु होतो. याच्यात्याच्यावर खापर फोडणे सुरु होते. सगळ्यात गंमत केव्हा येते? अनेक जण असतात जे म्हणतात, हे जग काही माझं नाही. ते जसं आहे त्यात जुळवून घेवून चालावं. जग आपल्यानुसार चाललं पाहिजे असं म्हणणारे यांच्यावर जाम भडकतात. तुमच्यामुळेच जग असं आहे असा आरोप करतात. सगळ्यांनी आपल्यासारखंच वागलं, बोललं पाहिजे, तशीच स्वप्न पाहिली पाहिजेत, तसाच विचार केला पाहिजे; असा यांचा आग्रह. आमच्यासारखे नसतील ते चूक, अयोग्य, भरकटलेले, जगातील सगळ्या शिव्या वाहाव्या असे; असेच त्यांना वाटते. मुख्य म्हणजे यांना सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण हवे असते. म्हणजे, नियम, गृहितकं, चूक- बरोबर हेच ठरवणार (ते जगाशी मेळ खाणारे नसले तरीही) आणि स्पष्टीकरण बाकीच्यांनी द्यायचे.

काय म्हणावे अशांना?

मूर्ख शिरोमणी गडे

मूर्ख शिरोमणी...

बाकीच्यांनी काय म्हणायचे, ते त्यांचे त्यांनी ठरवायचे.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१४

काही लाडके भ्रम-

१) या जगातलं सगळं वाईट संपून सगळं चांगलं तेवढंच उरणार आहे.

२) ते माझ्यामुळेच होणार आहे.

३) सगळे समान आहेत. (प्रमोशन किंवा तत्सम वेळेला हा भ्रम दूर ठेवायचा असतो.)

४) मला सत्य वाटतं तेच सत्य. मला समजतं तेवढंच जग.

५) मला पटत नाही/ समजत नाही/ आवडत नाही... ते सारं असत्य/ निरर्थक.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१४

आपला मार्ग

एक ज्येष्ठ, अनुभवी, विचारी व्यक्ती एका रुग्णाला भेटायला दवाखान्यात गेली. रुग्णाला भेटून, विचारपूस करून ती बाहेर पडली. बाहेर रुग्णाची पत्नी होती. तिच्याशी ती व्यक्ती दोन मिनिटे बोलली. अन रुग्णाच्या पत्नीला ते गृहस्थ म्हणाले- `तुमचे पती ठीक होतील असे काही मला वाटत नाही.' पत्नीला वाईट वाटलं अन धक्काही बसला. तिने विचारलं, का? ते गृहस्थ म्हणाले- `अहो, मी त्यांच्याशी अर्धा तास बोललो. सगळ्या बाबतीत त्यांचं एकच पालुपद होतं. डॉक्टर असं म्हणतात, डॉक्टर तसं म्हणतात, डॉक्टरांनी हे खायला सांगितलं, डॉक्टरांनी ते पथ्य सांगितलं, डॉक्टरांनी अमुक व्यायाम सांगितला... इत्यादी. मला माझ्या प्रकृतीसाठी अमुक करायचं आहे, असं वाक्य काही त्यांच्या तोंडून आलं नाही. डॉक्टरांना, तुम्हाला, मला वा अन्य कोणाला काही वाटून, आपण काही म्हणून सांगून काय होईल? ज्याची प्रकृती बरी नाही त्याला जेव्हा मनापासून वाटेल अन तो स्वत: ठरवले म्हणून प्रयत्न करेल; तेव्हाच तब्येत बरी होईल.' एवढं ऐकल्यावर पत्नीचा चेहरा जरा सामान्य झाला.

आज आपलीही समस्या हीच आहे. स्वच्छतेचा आग्रह, वेळेचा आग्रह, नीटनेटकेपणा, सौजन्य, विचारशीलता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार न करणे, शिकणे किंवा शिकवणे, कामे हातावेगळी करणे, कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे, वाहतुकीचे नियम पाळणे, फुकट काही मिळण्याची वृत्ती टाकून देणे, जात- पंथ- भाषा- प्रांत- लिंग- किंवा अन्य बाबींवरून कोणाचाही तिरस्कार वा द्वेष न करणे, परस्परात हा अमक्या पक्षाचा- तमक्या पक्षाचा असे न करणे, खुल्या मनाने- खुल्या बुद्धीने सगळ्या गोष्टींकडे पाहणे, एखादी गोष्ट पटत नसेल तरी तिचा आदर करणे, होता होईल तेवढा मदतीचा हात पुढे करणे, आपला कचरा वा सांडपाणी दुसऱ्याच्या हद्दीत जाऊ न देणे, दुसऱ्याला त्रास होईल एवढ्या आवाजात गाणी न ऐकणे, चौकस राहणे, अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे- आल्यागेल्याकडे आस्थेने लक्ष देणे... अशासारख्या असंख्य गोष्टी तुम्हाला- मला, सगळ्यांना, प्रत्येकाला वाटत नाही तोवर नुसती बोटे दाखवून, चर्चा करून, आरोप प्रत्यारोप करून काय होणार? रुग्णाला बरे व्हायचे असेल तर त्याचे त्यालाच वाटले पाहिजे अन कोण काय म्हणतो, सांगतो याकडे वाजवी लक्ष देऊन त्याने आपला मार्ग चालला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१८

आक्रोश

आक्रोश, आक्रस्ताळेपणा, कर्कशपणा केव्हा येतो?

लहान मूल आकांत का मांडतं?

खूप अधिक दुर्लक्ष, लक्ष देण्यास नकार, जाणीवपूर्वक टाळणे, स्वतःत मश्गुल राहणे, बेफिकिरी... यांच्यामुळे हे सारे घडते. कर्कश होणाऱ्याकडून संयमाची अपेक्षा करणे हे क्रौर्य असते अनेकदा. जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, सामाजिक प्रवाहात, परंपरांमध्ये; सर्वत्र हे लागू होते. साधं ऐकून घेण्यास नकार ही देखील क्रूरताच. खूप गोड, नाजूक, कोमल वाटणारी माणसेही अत्यंत क्रूर असू शकतात.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०१८

आषाढी

आषाढी एकादशीचे महत्व आणि उल्हास महाराष्ट्रासाठी विशेष असतातच. पण देशभरातच देवशयनी एकादशी म्हणून आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. यावर्षी कोरोनामुळे त्या सगळ्यालाच अडथळा आला आहे. अडथळा हे वळणही असू शकते या तर्काने, कोरोनाने आणलेला अडथळा सुद्धा वळण ठरू शकतो. तो तसा ठरावा आणि दैवतांचे मानुषीकरण अन माणसांचे दैवतीकरण यातून भक्तीमार्गाने पुढे सरकावे. अर्थात भारतीय परंपरेप्रमाणे प्रतिमाभंजन न करता. विश्वशक्तीचीही कदाचित तशीच योजना असावी.

- श्रीपाद कोठे

१ जुलै २०२१

मंगळवार, २८ जून, २०२२

पंचाईत राजकारण्यांची

योग्य, खरं, श्रेयस्कर बोलू न शकणे; ही सगळ्याच राजकारण्यांची आणि राज्यकर्त्यांची पंचाईत असते. अन वर्तमानात विचार आणि शहाणपण राजकारणाच्या दावणीला बांधल्यामुळे; योग्य, खरं आणि श्रेयस्कर यांची समाजातून उचलबांगडी झाली आहे. (संदर्भ - मुंबईत तीन दिवसात लोकलमधून पडून १७ जणांनी प्राण गमावले. जबाबदारीचा आणि उपायांचा अमाप उहापोह होईल, पण शहरांचा अन जीवनाचा 'मुंबई' pattern चूक आहे अन तो बदललाच पाहिजे हे कोणी चुकूनही म्हणणार नाही.)

जय हो.

- श्रीपाद कोठे

२९ जून २०१९

गोरी गोरी पान

फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीवरून खूप भवती न भवती सुरू आहे. वास्तविक गंमत म्हणून पाहावं असाच सगळा प्रकार. पण याचे दीर्घकालीन परिणाम होतात त्यामुळे त्याबद्दल लिहावे बोलावे लागते. सध्याचे लिखाण पाहून असे वाटते की, आता गोऱ्या रंगाबद्दल नकारात्मकता निर्माण केल्याशिवाय काही आम्ही स्वस्थ बसणार नाही. हो, हे खरे आहे की काळ्या रंगावरून बऱ्याच जणांना त्रासही सोसावा लागला आणि लागतो. पण म्हणून गोरा रंग आवडणे आणि 'गोरी गोरी पान...' सारखं गाणं लिहिणे; हे दोषार्ह कसे काय होऊ शकते? काळ्या मुला मुलींना स्वीकारणारे, काळा गोरा असा विचार न करणारे असेही लोक असतातच. शिवाय काळ्या रंगाबद्दल बोलताना, मस्करी करताना; ते सगळेच दुष्टपणाचे असते का? छळ या सदरात मोडणारे प्रकार असूच शकतात पण अशी दहा वीस उदाहरणे म्हणजे समाज का? आजकाल अशी उदाहरणे समोर ठेवून समाजाचं विश्लेषण करणं फारच बोकाळलं आहे. सगळ्यात मुख्य मुद्दा असा की, कोणाला आवड निवड नसावी असं कसं म्हणता येईल आणि या गोष्टींचा genuine त्रास दूर कसा होईल? यातील आवडनिवड असू नये असं कदाचित कोणी म्हणणार नाही. उरला त्रास दूर करण्याचा विषय. त्यावर उपाय माणसाच्या मनातली दुष्टता कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि माणसाच्या मनाला कणखर बनवणे, हाच असू शकतो. या ऐवजी अमुक शब्द वापरावा किंवा वापरू नये, अमुक असं लिहू नये; इत्यादी जरा गमतीशीरच वाटतं.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २९ जून २०२०

सोमवार, २७ जून, २०२२

व्रत

क्ष व्यक्तीने य व्यक्तीच्या कल्याणासाठी व्रतवैकल्य, उपासतापास करणे चुकीचे वा गुलामीचे कसे ठरू शकते? स्व बाजूला सारून विचार व्यवहार करण्याची उत्कटता, उदात्तता कोणात नसतेच किंवा कोणातच असू शकत नाही; असे म्हणणे तर्कसंगत होऊ शकत नाही. जगातील सगळेच लोक (स्त्रीया वा पुरुष) आपल्यासारखेच स्वार्थी, एकांगी, संवेदनशून्य असतात असे ठरवण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला? अन उत्कट जगणे नेहमीच लादलेले असते असे तरी कसे म्हणता येईल? तुमच्यात चांगुलपणा नसेल तर नसू देत; पण बाकीच्यांमध्ये तो नसतो; किंवा चांगुलपणा हा दबावातूनच जन्माला येतो; किंवा चांगुलपणा म्हणजे दुबळेपणा; किंवा चांगुलपणा म्हणजे मूर्खता; असे ठरवणाऱ्या लोकांनी थोडे तपासून घेतले तर बरे. माझ्यासाठी प्रार्थना करणारे जगात कोणीही नाही; तरीही माझे हे मत आहे. उलट त्यामुळे माझ्या मताची किंमत आणि तटस्थता वाढते असे मला वाटते. (संदर्भ- कालची वटपौर्णिमा)

- श्रीपाद कोठे

२८ जून २०१८

रविवार, २६ जून, २०२२

दोन डोळे

दोन डोळे. कधी भेट नाही, ओळख नाही. एकमेकांना पाहतात; तेही फक्त प्रतिबिंब रूपातच. तरीही- एक डावीकडे वळला की दुसराही, डावीकडे वळणार. एक उजवीकडे वळला की दुसराही उजवीकडे वळणार. एकासोबतच दुसराही मिटणार. हां, यात कधीकधी बदल होऊ शकतो; पण तो आपण ठरवलं तरच. डोळे स्वत: असे नाही वागत. एक ओलावला की दुसराही ओलावणार. बिना ओळखदेख इतकं coordination. हीच असते का अंतरीची ओळख? नाही तर आपल्याला किती कम्युनिकेट करावं लागतं... तरीही दरी राहते ती राहतेच.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१३

पंतप्रधानांना

कल मा. प्रधानमंत्री जी को मेरे कुछ विचार भेजे. वही सभी को प्रेषित कर रहा हूँ.

मा. प्रधानमंत्री जी,

सादर प्रणाम...

अपने देश और समाज के संबंध में मेरे कुछ सुझाव और सूचनाएं आपको प्रस्तुत कर रहा हूँ. आशा करता हूँ की, आप उसका उचित संज्ञान लेंगे.

१) भारत को बहुत अच्छा भारत बनाइयें. लेकिन कृपया, अपने भारत को अमरिका, जापान, चीन, जर्मनी, यूके, रशिया या ऑस्ट्रेलिया ना बनायें.

२) हमारी हजारो समस्याएं है. (आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, प्रशासनिक, शैक्षिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, आंतरिक और बाह्य सुरक्षा से सम्बंधित) केवल एक उपाय कर के इन्हें कमसे कम ५०% तक कम किया जा सकता है. वह है हमारे गावों और शहरों की पुनर्रचना. एक लाख जनसंख्या के १५ हजार शहर विकसित किये जाएँ. आनेवाले २५ वर्ष की जनसंख्या भी उसमे समा सकेगी.

३) इससे, बड़े विशाल शहरों की समस्याओं और छोटे कसबों की समस्याओं से मुक्त होने के साथ ही आधुनिकता के मधुर फल सबको प्राप्त होंगे.

४) मानसिकता में आमूलचूल अच्छा परिवर्तन होगा. आवागमन की पद्धती बदल जाएगी और कच्चे तेल (जिसके लिए हमे दूसरों पर निर्भर रहना ही है) की समस्या प्रचुर मात्रा में कम होगी. जैसे दैनंदिन जीवन में सायकल का उपयोग हो सकता है. वह व्यावहारिक भी होगा और उसे प्रतिष्ठा भी मिल सकेगी. साथ ही सृष्टि माँ का पर्यावरण भी सुरक्षित रहेगा.

५) उर्जा के संबंध में मनुष्य और पशु उर्जा का भी उपयोग होना चाहिए. ५-१० किमी अंतर में बैल, गधे, घोड़े आदि का उपयोग हो सकता है. उसमे अमानवीयता ना हो इसका ध्यान रखना होगा.

६) सारे १५ हजार शहर जितनी मात्रा में आत्मनिर्भर हो सकते है, होने चाहिए.

७) पर्यटन विकास में धर्म, इतिहास और निसर्ग के साथ ही, कला- साहित्य आदि का भी विचार हो.

८) शिक्षा और स्वास्थ्य की सारी सुविधाएं और संस्थान तहसील स्थान पर विकसित हो और स्थानांतरित हो.

९) सांसदों, विधायकों के क्षेत्र विकास निधि बंद कर के, उनका एकीकृत और सार्थक उपयोग हो. साथ ही एक ही टाकी पर बहुत सारे नल लगे हो और उनमे से बड़ी मात्रा में पानी बह रहा हो ऐसी आज स्थिति है. इसलिए बहुत सारी योजनाओं के नल बंद करके उनका निधि भी एकीकृत रीती से और सार्थक रूप में कामों में लगे.

१०) अच्छा जीवन जीने के साथ साथ- अच्छी संकल्पनाएँ, अच्छे विचार, अच्छा चिंतन, अध्यात्म समाज में बोया जाएँ, ये चीजे फले-फुले और संपन्नता के साथ ही सुसंस्कृत समाज का निर्माण हो.

११) हमारी विदेश निति में भी वस्तुएं और सेवाओं के साथ ही संकल्पनाएँ, विचार, चिंतन, अध्यात्म विदेशों में कैसे पहुँचाया जाएँ इसका ध्यान रखा जाय.

आप को विनम्र नमस्कार और धन्यवाद.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१४

दिसतं तसं...

दिसणाऱ्या गोष्टीवरून त्यामागील कारण निश्चित करणे फसवे असू शकते, नाही का? हेच पाहा ना, कोणी म्हटले रात्री झोप झाली नाही; तर किती गोष्टी त्याच्या मुळाशी असू शकतात- तब्येत बरी नसणे, मन:स्थिती बरी नसणे, खूप दु:ख झाले असणे, खूप आनंद झाला असणे, प्रवासात असणे, दवाखान्यात एखाद्या रुग्णाजवळ असणे, डासांनी त्रास देणे, वीज गेली असणे, प्रवासात असणे, एखाद्या अडचणीत असणे. किंवा आणखीनही काही.

किंवा- कोणी म्हटले की आमचे भांडण झाले, तर त्याची दिसणारी कृती काय असू शकेल? वादावादी, शिवीगाळ, मारामारी, मारहाण, फोडाफोड, फेकाफेक, आदळआपट, लोकांना गोळा करणे, पोलिसात जाणे, कुटुंबातल्या कर्त्या माणसाकडे तक्रार करणे, न्यायालयात केस दाखल करणे, शेरेबाजी, दुखावणारी गोष्ट करणे, अबोला, आयुष्यातून काढून टाकणे.

म्हणजे- एकाच कृतीच्या मागे खूप वेगवेगळी कारणे असू शकतात किंवा एकाच कारणाच्या बाहेरील कृती वेगवेगळ्या असू शकतात.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१५

शनिवार, २५ जून, २०२२

स्वसंवेद्य

`चांगलं नि वाईट दोन्ही निरर्थकच. मग चांगलं, चांगलं म्हणत उर का फोडून घ्यायचा? कशाला काही अर्थ नसतो.' रेल्वेच्या डब्यातील चर्चासत्रात एकाने खडा सवाल टाकला. वादात सहभागी दुसरा चूप बसला. खिडकीबाहेर पाहत मी मलाच हाच प्रश्न घातला. म्हटलं - काय उत्तर? `मी'ने मला उत्तर दिले- `चांगलं नि वाईट आरसा आहेत. चांगलं हा स्वच्छ आरसा, वाईट हा धूळभरला आरसा. एकात तुझं प्रतिबिंब दिसेल. दुसऱ्यात नाही दिसणार. तू त्यात कुठेच नाही. पण तुला तुझी ओळख व्हायला आरसा स्वच्छ हवा एवढेच. ओळख झाली, ठीकठाक आहोत हे तुझंच तुला पटलं की झालं. आरसा टाकून उंडारायला तू मोकळा. चांगल्याचा आटापिटा तेवढ्यासाठी. बास.'

`हं... स्वसंवेद्य' आकाशवाणी झाली.

- श्रीपाद कोठे

२६ जून २०१६

चांगली माणसे

चांगली माणसं दोन प्रकारची असतात. चांगल्यासाठी चांगली असणारी. अन स्वार्थासाठी चांगली असणारी. स्वार्थासाठी चांगली असणाऱ्या माणसांना चांगल्यासाठी चांगली असणारी माणसं चालत नाहीत, आवडत नाहीत, पटत नाहीत, सहन होत नाहीत. स्वार्थासाठी चांगली असणारी माणसं, चांगल्यासाठी चांगले असणाऱ्यांचा द्वेष करतात, त्यांना पाण्यात पाहतात, त्यांचा दुस्वास करतात, त्यांचा पाणउतारा करतात, त्यांना कमी लेखतात, त्यांना हसतात, त्यांची वाईट मस्करी करतात, त्यांना टोमणे मारतात. जगात स्वार्थासाठी चांगली असणारी माणसं जास्त आहेत.

- श्रीपाद कोठे

२६ जून २०२१

श्रीपादजी, जगात चांगल्यासाठी चांगल्या असणार्या माणसांपेक्षाही श्रेष्ठ असणारी माणसांची वर्गवारी राहू शकते. ज्ञानदेवांनी पाप पुण्याची पुढील प्रमाणे वर्गवारी केली आहे. १.पुण्यात्मक पाप २. पापात्मक पाप व ३. शुध्द पुण्य . आपण जी चांगली माणसे म्हणता,ती पुण्यात्मक पाप करणारी आहेत,जी स्वर्गात जाण्यास पात्र ठरतील, पण जी शुध्द पुण्य करणारी आहेत ती मोक्ष मिळवितील .म्हणून ती सर्वश्रेष्ठ ठरतील. तेथे कर्माच्या कर्तृत्वाचा विवेकाने (ज्ञानयोग ) व भोक्तृत्वाचा(कर्मयोग) त्याग करावयाचा आहे.दुसरे असे की चांगल्या माणसांच्या चांगल्या कामातही एक सूक्ष्म स्वार्थ असतोच की. म्हणूनच बृह. उपनिषदात म्हटले आहे,’आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति’.    सर, थोडं जास्तच लिहून गेलो त्याबद्दल क्षमस्व!

- माधव देशपांडे

शुक्रवार, २४ जून, २०२२

सभ्यता

२५ मार्च १८९६ रोजी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या `ग्रॅज्युएट फिलोसोफिकल सोसायटी’त स्वामी विवेकानंदांचे `वेदांत दर्शन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानानंतर त्यांना जवळपास ३३ विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न होता- `सभ्यतेसंबंधी वेदांताची काय कल्पना आहे?’ त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले- `तुम्ही सगळे तत्वज्ञानी लोक आहात. माणसामाणसामध्ये केवळ पैशामुळे फरक पडत नाही हे तुम्ही जाणता. या सगळ्या यंत्रांचे आणि भौतिक विज्ञानाचे काय मूल्य आहे? त्या सर्वांपासून लाभ हाच की, त्यांच्यामुळे ज्ञानाचा प्रसार होतो. मनुष्याच्या गरजा पुरविण्याची समस्या तर तुम्ही सोडवलीच नाही, पण उलट तुम्ही त्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत. दारिद्र्याचा प्रश्न यंत्रे सोडवीत नाहीत. यंत्रांमुळे माणसे अधिक संघर्ष करू लागतात. स्पर्धा उग्र रूप धारण करते. निसर्गाचे स्वत:चे असे मूल्य काय आहे? तारेतून वीज प्रवाहित करणाऱ्या माणसाचे तुम्ही का बरे स्मारक उभारता? निसर्ग ते कार्य लक्षलक्ष वेळा करीत नाही काय? या सर्व गोष्टी निसर्गात आधीच विद्यमान नाहीत का? मानवाने त्या प्राप्त करण्यापासून काय लाभ? त्या तर आधीपासून आहेतच. त्यांच्यापासून आपला विकास होतो हेच त्यांचे मूल्य आहे. हे विश्व म्हणजे केवळ एक व्यायामशाळा आहे. येथे जीवात्मा व्यायाम घेतो. या व्यायामाने आपल्याला देवत्व प्राप्त होते. म्हणून कोणत्याही गोष्टीत ईश्वरत्वाचा कितपत आविष्कार झाला आहे यावरून तिचे मूल्य ठरविले गेले पाहिजे. मानवातील देवत्वाचे प्रकटीकरण म्हणजेच सभ्यता होय.’

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१४

आठवण

एखादा अवांछनीय प्रसंग सुद्धा कायम लक्षात राहू शकतो आणि आनंद देऊ शकतो. श्रद्धेय सत्यमित्रानंद जी गिरी यांनी या जगाचा निरोप घेतल्याची बातमी पाहिली आणि असा एक प्रसंग आठवला. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त आजी माजी प्रचारकांचे शिबिर झाले होते. त्याची सुरुवात एका मोठ्या जाहीर कार्यक्रमाने झाली होती. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीचा अखिल भारतीय उदघाटन कार्यक्रम. प्रमुख अतिथी होते श्रद्धेय सत्यमित्रानंद जी गिरी. संध्याकाळी कार्यक्रमाची वेळ होत आलेली. ओम भवनाचा मंच तयार होता. सगळे मैदान गच्च भरले होते. काही तरी आणायला की ठेवायला पांडुरंग भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर गेलो होतो. पाच मिनिटे उरली होती. धावत जिना उतरत होतो. पहिल्या मजल्यावर पोहोचलो. समोर स्व. विनायकराव फाटक. 'पू. बाळासाहेब आणि श्रद्धेय सत्यमित्रानंद जी कोणत्याही क्षणी पोहोचतील. आता कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिन्याने जाणेयेणे बंद.' विनायकरावांनी एखादी गोष्ट म्हटल्यावर ती अंतिम असणे स्वाभाविकच. बरं, कार्यक्रम संपेपर्यंत दुसरे काही कामही नव्हते. पण आता जाऊ कुठे? मी काही मंचावर थांबू शकणार नव्हतो. मग पांडुरंग भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन व्हरांड्यात उभा राहिलो. मान्यवर आले, सगळा कार्यक्रम पार पडला, अगदी काही फुटांवरून श्रद्धेय सत्यमित्रानंदजींना पाहता आले, पूर्ण कार्यक्रम अतिशय जवळून स्पष्ट पाहता/ ऐकता/ अनुभवता आला. कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना birds eyeview ने पाहता आले. खाली असतो तर हे शक्य झाले नसते. कारण १९८८ मध्ये cctv वगैरे काही नव्हते. त्या कार्यक्रमात श्रद्धेय सत्यमित्रानंदजींनी स्व. बाळासाहेब देवरस यांना 'यतीसम्राट' संबोधले होते.

श्रद्धेय सत्यमित्रानंदजींना विनम्र नमस्कार.

- श्रीपाद कोठे

२५ जून २०१९

बुधवार, २२ जून, २०२२

गाड्या : प्रेमाच्या, द्वेषाच्या

प्रेम, सहकार्य आदींना एक स्वाभाविक मर्यादा असते. त्यांची गाडी ब्रेक न लावताही आपोआप थांबते.  स्वार्थ आणि द्वेष मात्र अमर्याद असतात. त्यांना ब्रेक नसतातच अन त्यांच्या गाड्या जबरदस्त अपघाताशिवाय थांबतच नाहीत. अशा अपघातांची व्यवस्था नियतीच करते अन ते अपघातच योग्य वळण देणारे ठरतात. मानवी प्रयत्नांनी स्वार्थ आणि द्वेषाच्या गाड्या थांबवता येत नाहीत.

- श्रीपाद कोठे

२३ जून २०२१

मंगळवार, २१ जून, २०२२

पाळत

अमेरिका सगळ्यांवर पाळत ठेवून आहे. इंटरनेटवरील आपली कोणतीही माहिती सुरक्षित नाही. त्यावर नजर असते, अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी विकीलीक्सने उघड केली होती. त्यातील खरे खोटे माहित नाही. पण एक गंमत आज लक्षात आली. गुगलवर माझे ब्लॉग्स आहेत. त्यावर पोस्ट केल्यानंतर फारसे लक्ष देत नाही. आज त्याकडे थोडे लक्ष दिले. अनेक प्रकारचा feedback त्यात असतो हे लक्षात आले. त्यातून दिसले की, माझे तीनही ब्लॉग्स वेगवेगळ्या देशात पाहिले जातात. तिन्ही ब्लॉग्स मराठीत आहेत. अमेरिकेत मोठ्या संख्येत मराठी लोक आहेत. त्यामुळे तिथे ब्लॉग्स पाहिले गेले तर नवल नाही. पण असे दिसले की, भारत व अमेरिका वगळता; मलेशिया, जर्मनी, पोलंड, बेलारूस, युक्रेन, इस्रायल, लात्विया, रशिया, दक्षिण कोरिया येथेही ब्लॉग्स पाहिले गेले आहेत. ब्लॉग्स वाचण्यासाठी कोणती operating system वापरली गेली, कोणते ब्राउझर वापरले याचीही माहिती मिळाली.

ज्युलियन असांजेचा दावा किती खरा, किती खोटा नाही सांगता येणार; पण तो खरा नसेलच असेही कसे म्हणावे?

- श्रीपाद कोठे

२२ जून २०१३

का??

एक पोस्ट वाचली. त्यात `योगदिना'चे कौतुक तर आहे. योग सगळ्यांची जीवन पद्धती व्हावी असे मत मांडले आहे. पण त्याला हिंदुत्वाशी जोडू नका अशी सूचनाही केली आहे. महाराष्ट्रातील एका चळवळीतील व्यक्तीची ती पोस्ट आहे. त्यावर दिलेली प्रतिक्रिया, सगळ्यांसाठी-

बाकी सगळे योग्यच. पण `हिंदुत्वा'शी जोडू नका हे चूक. जी गोष्ट ज्याची आहे त्याला श्रेय देण्यासाठी खळखळ का होते कळत नाही? हा आत्मनकार की आत्मग्लानी की आणखीन काही. `तत्व' याचा अर्थ मालकी होत नाही. मुळात हिंदूंनी गेल्या हजारो वर्षात ती कधीही अन कशावरही सांगितली नाही. `मालकी' `हक्क' `स्वामित्व' यासारख्या गोष्टी मुळातच या देशाला अन हिंदूंना परक्या आहेत. आपल्या कल्पना लादून मूल्यमापन करणे अयोग्य आहे. आपल्यासारखे लोकसुद्धा असे करतात तेव्हा गंमत वाटते. ज्या गोष्टी हिंदूंनी दिल्या त्याचे श्रेय त्यांना द्या. ते मागतात म्हणून नाही, मनाची स्वाभाविक प्रांजळता म्हणून. बाकी `योग' ही हिंदुत्वाची देणगी आहे म्हणजे बाकीच्यांसाठी नाही असे नाही. तसा अर्थ कोणी घेत असेल तर ती त्याची बालिश बुद्धी किंवा विकृत बुद्धी म्हटली पाहिजे. `आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:' ही हिंदू संस्कृती आहे. तीच विश्व संस्कृती व्हायला हवी. `मी' माझ्या आई वडिलांचा पुत्र आहे, याचा अर्थ जर `मी' माझ्या बायकोचा नवरा, बहीणभावांचा भाऊ, मुलांचा पिता किंवा मित्रांचा मित्र नाही; असा कोणी काढत असेल तर त्याला काय म्हणायचे?

- श्रीपाद कोठे

२२ जून २०१५

मागे लागणे

सगळ्याच महाविद्यालयांप्रमाणे एक महाविद्यालय. इतर ठिकाणांप्रमाणे तिथेही एक `कॉलेज क्वीन'. तिच्यावर प्रेम करणारा आणि तिने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा म्हणून प्रयत्न करणारा एक `प्रेमवीर'. तिला तो आवडत नाही. तिच्या मनात दुसरा एक जण. जो तिच्या मनात तो तिला काहीच भाव देत नाही. एकदा तो प्रेमवीर काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायला गेला तेव्हा ती म्हणाली, `कसा रे तू निगरगट्ट. मला तुझ्यात इंटरेस्ट नाही असं सांगूनही माझ्या मागेमागे करतोस.' अगदी कुत्रा वगैरेही म्हटलं, असं जवळचे मित्रमैत्रिणी सांगतात. एकदा ती तिच्या मनातील मुलाकडे पुस्तक मागायला गेली. तेव्हा ती येते आहे असे पाहूनच तो पळून गेला. ती दुखावली. मग मैत्रिणींशी बोलताना म्हणाली- `पहा ना, किती शिष्ट आहे. वागण्याचे साधे मॅनर्स नाहीत. असं वागतात का कधी? काय समजतो काय स्वत:ला?' आपल्या मागे कुणी लागलं तर वाईट वाटतं, आपण कोणामागे लागलो तर चालतं; ही जगाची रीत आहे का?

- श्रीपाद कोठे

२२ जून २०१५

छान अनुभव

कालपासून सांगावं की नाही समजत नव्हतं कारण किंचीत का होईना स्वतःबद्दल बोलावं लागणार. पण आलेला अनुभव इतका छान की सांगितला पाहिजे असा. तर... दोन दिवस रुग्णालयात होतो. (काही विशेष नाही. आता एकदम बरा आहे.) रुग्णालय सोडताना चाकाची गाडी एक सेविका ढकलत होती. लिफ्टजवळ पोहोचल्यावर म्हणाली - 'औषधं घ्या, काळजी घ्या; पुन्हा दवाखान्यात येऊ नका.' खरं तर चमकलो क्षणभर. ती सेविका सगळ्यांनाच तसं म्हणत असावी कदाचित; कदाचित रुग्णालयाची तशी सूचना असावी; कदाचित आजकालच्या hospitality चा तो ट्रेंड असावा. मला ठाऊक नाही. पण मानवी मनाचं, वर्तनाचं एक छान दर्शन मात्र झालं. तेही 'साधारण' समजल्या जाणाऱ्या सेविकेकडून.

- श्रीपाद कोठे

२० जून २०२०

सोमवार, २० जून, २०२२

अकारण

आज एक पोस्ट वाचली - 'मी योग केला नाही, मी योग करणार नाही.' कोणी न विचारताच सांगितले बिचाऱ्याने. त्यामुळे हास्यास्पद झालाच. काय कारण असावे? योग तर हजारो वर्षांपासून चालत आला आहे. तिरसटपणाने तो करत नाही हे सांगण्याचे काय कारण असेल? योग या विषयाला मोदींनी हात लावला, हेच कारण असावे. जनदरबारातील योगाला त्यांनी राजदरबारी आणि विश्वदरबारी प्रतिष्ठा बहाल केली. त्यामुळे योग मोठा वगैरे झाला नाही, पण प्रसार व्हायला मदत झाली हे खरे. परंतु त्यांनी हात लावल्याने योगालाच अस्पृश्य ठरवणाऱ्यांना काय म्हणावे?

एक विचार मनात आला - पर्यावरणावर मोदी बोलले आणि 'श्वासोच्छ्वासातून आपण प्राणवायू घेतो. तो झाडांमुळे मिळतो. म्हणून झाडे लावा' असं काही त्यांनी सांगितलं तर??? न जाणो कोणी प्राणवायूलाच विरोध करायला लागले तर?? मोदींजींना कळवले पाहिजे - हा विषय टाळा म्हणून.

- श्रीपाद कोठे

२१ जून २०१८

रविवार, १९ जून, २०२२

इष्ट, अनिष्ट

चांगलेपणा, वाईटपणा, भलेपणा, बुरेपणा, गोड वागणं/ बोलणं/ असणं, कडू वागणं/ बोलणं/ असणं, जोडण्याची वृत्ती, तोडण्याची वृत्ती; अशा असंख्य गोष्टींचे कप्पे आपण करतो. पण केवळ बाह्य कृती किंवा शब्द, एवढ्यावरूनच असे ठरवता येत नाही हे नीट समजून घ्यायला हवे. एखाद्याला पाणी देणे यासारखी मोठी गोष्ट नाही. कोणाच्याही तोंडचे पाणी हिसकू नये, हे खरेच. मात्र, जलोदर झालेला रोगी, उन्हातून आलेला व्यक्ती, फळे खाल्ल्यावर पाण्याला तोंड लावणारा, अशुद्ध पाणी तोंडाला लावणारा; यांच्या तोंडचे पाणी काढून घेणे हेच योग्य, पुण्याचे आणि धर्माचे काम असते. जहाज बांधणीच्या व्यवसायाप्रमाणे जहाज तोडणीचा व्यवसाय सुद्धा आवश्यक असतो. जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधताना जुन्याला नेस्तनाबूत करावेच लागते. लहान मूल वीजेशी, स्वयंपाकाच्या गॅसशी, अन्य विस्तवाशी, किंवा अशा प्रकारांशी चाळे करीत असेल तेव्हा त्याचे कान उपटावेच लागतात, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ताडन आवश्यकच असते. परंतु हे सगळे वेळ, परिस्थिती, प्रमाण, अन्य प्रयत्न यानुसार केले पाहिजे आणि त्याच संदर्भाने तपासले पाहिजे. नवीन घर वा जहाज तोडून टाकणे किंवा काहीही कारण नसताना तोंडचे पाणी हिसकून घेणे योग्य नसतेच आणि कारण असूनही तसे न करणेही योग्य अन इष्ट नसतेच.

- श्रीपाद कोठे

१९ जून २०१५

शुक्रवार, १७ जून, २०२२

हे नादब्रम्हा,

संध्याकाळच्या एकाग्र सखीवेळेला फक्त संगीताचा आधार असतो. त्यामुळे गुगल शोधलं- संवादिनीवादन, वीणावादन अशी चित्र. पार निराशा झाली. मग शोधलं- musical ecstasy. तिथे तर त्याहून घोर निराशा. डिस्कोमध्ये धिंगाणा करणारी तरुणाई. त्याला musical ecstasy म्हणताना जीभही रेटत नाही, अन लोक सर्रास छापे मारून मोकळे. बरे एवीतेवी त्या आंग्ल लोकांना संगीतातील ecstasy नाही कळणार. पण संवादिनी, वीणा यांचे वादन करतानाची चांगली चित्रं नसावीत. त्यातील एकाग्रता, सौंदर्य, विलीन होणं, पूर्णत्वाचा प्रवास, त्याचं अंतर्बाह्य नेटकेपण काहीही कोणाही छायाचित्रकाराला जाणवलं नसावं, त्याने ते टिपलं नसावं; कोणत्याही चित्रकाराला त्यातील भाव, भावसौंदर्य कधी दिसलं नसेल? कलेच्या क्षेत्रातील आपली अतिप्रचंड श्रीमंती खरंच किती अलक्षित असावी? अक्षरश: एक संगीत हा विषय घेतला तरीही त्याची लक्षावधी भावचित्रे, लक्षावधी सौंदर्यचित्रे होऊ शकतील. अर्थात त्यासाठी बोटात चित्रकौशल्य, संगीताचा कान- व्यासंग- समज- दोन्ही हवे. भावसौंदर्य उलगडणारे गायक-गायिका हव्यात अन ते समजणारे चित्रकार हवेत. असा आस्वाद घेणे अन असा व्यासंग आजच्या युगात शक्य आहे का हाही एक प्रश्नच. संगीत असो, चित्रकला असो किंवा अन्य कोणतीही कला त्याकडे खरंच गांभीर्याने पाहिलं जातं का? तबल्याचे शिक्षक असावेत की नसावेत हे आम्ही ठरवू शकत नाही अशी स्थिती आहे. विविध कलाशाखांचे एकीकरण वगैरे दूरच. संगीत व चित्र ही केवळ चर्चेसाठीची उदाहरणे. बाकी साहित्य काय किंवा शिल्प काय तीच स्थिती. किती लेखक, लेखिका संगीत, चित्र, नृत्य, नाट्य यांची जुजबी तरी माहिती असावी असा विचार करतात. कला ही बुडवून घेण्याची, साधनेची चीज आहे. त्यातून सौदर्य, आनंद, शिवत्व गवसतं. सायंकालीन धुपासारखं वितळून जावं लागतं. पण हे होतं कसं? याचे शिकवणीवर्ग नसतात, याच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे नसतात; अन जी विद्यापीठे असतात ती तुमच्या आमच्या विद्यापीठाच्या व्याख्येत न बसणारी. प्रभा अत्रेंचा यमन ऐकताना, एखादी स्त्री एकाग्रतेने क्रोशाचे टाके घालते तशी होणारी सुरांची गुंफण दिसायला काय करायचं असतं, हे शिकवता येईल? हे सगळं व्हायला हवं, पण कसं होईल?

करेल ते नादब्रम्ह काहीतरी... निश्चित करेल...

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, १८ जून २०१६

साहित्यिक

अनेक साहित्यिक संस्था आहेत. काही सक्रिय, काही निष्क्रिय. सक्रिय संस्था वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. या कार्यक्रमांचेही अनेक प्रकार आहेत. परंतु एक गोष्ट पुष्कळदा मनात येते. साहित्याच्या माध्यमातून समाजाचं आणि साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचं भावपोषण, विचारपोषण करणारे कार्यक्रम, उपक्रम कमी असतात का? असे भावपोषण, विचारपोषण करण्याचे प्रयत्न का नसावेत? मनात उठणारे बरेवाईट तरंग शब्दात बांधणे म्हणजेच का साहित्य? भावनांचे आवेग वा कढ म्हणजेच का साहित्य? शिक्षण, संस्कार, वृत्ती, वातावरण यांच्या परिघात कदमताल करत राहणे म्हणजेच का साहित्य? शब्दप्रभूंनी आपले विचार, भाव, भावना यांचे सतत परिशीलन आणि परिष्करण करत राहायला नको का? आपल्याच मर्यादेत रडण्याचे कढ आणि हसण्याच्या उर्मी जोजवत राहण्यात धन्यता मानायची का? विचारसमृद्धी आणि भावसमृद्धी एकसुरी, एकदिशी, एकरेषीय असावी का? या समृद्धीसाठी आवश्यक अशी जीवनाची विविधांगी माहिती, जीवनाची ओळख, अनेक असाहित्यिक विषयांचा परिचय, घडामोडी, प्रवाह, चिंतन; हे सारे साहित्याचे आणि साहित्यिकांचे विषय का असू नयेत? त्यासाठीची आयोजने का नसावीत? उदाहरणार्थ, साहित्यिकांची अर्थविषयक जाण फक्त गरिबी आणि दारिद्र्य यांची करुण वर्णने करण्यापुरती किंवा त्यासाठी कोणाला तरी जाब विचारण्यापुरती का राहावीत? साहित्यिकांची वैज्ञानिक समज फक्त तांत्रिक विकासाने दिपून जाण्यापुरतीच का राहावी? शब्दप्रभूंना जीवनाच्या अधीकाधिक मितींनी आणि कक्षांनी खुणावायला हवे अन त्यासाठी प्रयत्नही हवेत, असं नम्रपणे वाटतं.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०२१

गुरुवार, १६ जून, २०२२

लाजाळू अन बाभळी

लाजाळू आणि बाभळी यांच्यात काय साम्य आहे? विचित्र आहे ना प्रश्न? कुठे लाजाळू अन कुठे बाभळी !! खरे आहे. पण त्यांच्यात एक साम्यही आहे. दोघांनाही दुसऱ्या कुणाचं अस्तित्व सहन होत नाही. कोणी जवळून गेलं तरीही लाजाळू स्वत:ला मिटून घेते तर बाभळी कपडे फाडते किंवा ओरखडा उठवते. कदाचित एकीसाठी कोमल अन एकीसाठी क्रूर असले भारदस्त शब्द वापरता येतीलही, पण मतितार्थ एकच- दुसऱ्याचं अस्तित्व सहन न होणे. जणू काही हे जग त्यांची जहागीर आहे.

- श्रीपाद कोठे

१७ जून २०१८

शुक्रवार, १० जून, २०२२

माणसा तू दिव्य हो...

दिल्लीच्या तीन महानगरपालिकांच्या प्रतिनिधींनी आज एक पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, दिल्लीत कोरोनाने आतापर्यंत दोन हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे दिल्लीच्या सरकारचे म्हणणे मात्र असे की, कोरोनाबळींची संख्या ९८० आहे. दोन्ही अधिकृत दावे. कोणता खरा मानायचा? दोन्ही बाजूचे समर्थक बाह्या सरसावून उभे राहतील आणि आरोप प्रत्यारोप करतील. तरीही मूळ प्रश्न उरतोच - खरं काय? दुसरा मुद्दा येतो की - कोणीतरी खोटा दावा करीत आहे. तो का? त्याचे तथ्य काय? तक्रारी होतील, गुन्हे होतील, खटले होतील आणि जगरहाटी चालू राहील. बळी जाणारे जातील, आपापले हिशेब करणारे करून घेतील, सामान्य माणसे वादावादी करत आपल्या कॅलरीज जाळतील. पुन्हा पुन्हा असं घडत राहील.

प्रश्न आहे असंच घडत राहावं का? ज्यांना वाटतं असंच घडत राहू नये, त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी एकच मंत्र जपत राहावा - 'माणसा तू मोठा हो. माणसा तू माणूस हो. माणसा तू ईश्वर हो. माणसा तू सच्चा हो. माणसा तू व्यापक हो. माणसा तू शुद्ध हो. माणसा तू अंतर्बाह्य स्वच्छ हो. माणसा तू दिव्य हो.' अरे तिकडे माणसे मरताहेत, व्यवस्था अपयशी होत आहेत; अन तुम्ही काय आदर्शवाद सांगता आहात; हा प्रश्न विचारणाऱ्यांनाही एकच उत्तर - 'हो, मी आदर्शवाद सांगतो. व्यवस्था वाहून गेल्या तरी चालतील, जबाबदारीची भांडणं वाट्टेल तेवढी होऊ द्यात; पण माणसाच्या दिव्यत्वाचा मंत्र घुमवत राहणे हाच एकमात्र पर्याय आहे. व्यवस्थांच्या अन जबाबदाऱ्यांच्या चर्चा अन भांडणे करून काहीही होणार नाही. झालेले नाही. एक मात्र निश्चित की, आमच्याच बेजबाबदारपणातून होणाऱ्या राखरांगोळीतून पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याची शक्ती 'माणसा दिव्य हो' या मंत्रातूनच मिळू शकते. अन्य कोणत्याही मार्गाने नाही.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ११ जून २०२०

शुक्रवार, ३ जून, २०२२

सत्यमार्गी

सत्याच्या मार्गावर जपून ठेवावं लागतं पाऊल. पहिल्याच पावलाला नियती उज्वल कोरडेपणा ओटीत घालते. हे अम्लान कोरडेपण वागवावं लागतं अखेरपर्यंत. एखाद्या सम्राज्ञीच्या उन्मत्त डौलाने. समर्थनाच्या चिता पेटवून समर्पणाची धुनी जागवावी लागते प्रत्येक पावलावर. नेत्रांची प्रखर दीप्तीची सवय मोडून काढावी लागते अन करावा लागतो सराव अंधुक प्रकाशातही पाऊल योग्य त्याच ठिकाणी ठेवण्याचा. असमर्थ खांद्यांनी पेलावे लागते सत्याचे जडशीळ ओझे. स्वतःच्या अस्तित्वभारासकट. मेघांची अल्लडता नाही बांधता येत पदरात. मृगजळानेच भागवावी लागते तहान अगणित काळ पिच्छा पुरवणारी. आपल्याच सावलीलाही व्हावे लागते पारखे. विश्रांतीला द्यावी लागते तिलांजली आत्मरक्तात भिजवून. गाडून टाकावी लागते समजूत, आपल्याला कंठ असण्याची. प्रश्नांचे उमाळे दाबून टाकावे लागतात स्वीकाराच्या मृण्मय मृत्तिकेने. त्यातूनच फुटतात कोंब इवलाले सत्याच्या बिजाला. अन पोळलेल्या पावलांना शीतलता देण्यासाठी वाढू लागतो त्याचा वृक्ष. तोवर धरावा लागतो दम. म्हणूनच जपून ठेवावं लागतं पाऊल सत्याच्या मार्गावर.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, ३ जून २०२२

Arrogant arnav

who is arnab goswami to decide what's right & what's wrong. the way he decried hon. mr. dinanath batra today during his newshour is shameful. he should be booked for that. bjp sympathisers have liittle more sympaty and love for him. they must correct themselves. arnab is very poor in wisdom & intellect.

- june 4, 2014

Owaisi

those muslim leaders who met PM Modi were rss men.- asaduddin owaisi (MP)

has time turned up or what? staunch hindu organisation have muslim leaders as it's followers or sympathisers or at least well wishers. and Indian Ittehadul Musalmin supremo chooses to and has to complain about it.

huhhh.

- june 4, 2015

बुधवार, १ जून, २०२२

आशावाद

`लळा जिव्हाळा शब्दच खोटे...' बाबुजींचं गाणं गुणगुणत होतो. तेवढ्यात मागून तो आला. म्हणाला- एवढा नकारात्मक विचार का करतो तू? मी प्रतिप्रश्न केला- `का? तुला असा अनुभव नाही? किंवा असा अनुभव असलेल्या कुणाला तू ओळखत नाही?' तो म्हणाला- `नाही रे. तसं नाही. पण नेहमी सकारात्मक बाजूकडे पहावं. पेला अर्धा भरला आहे असा विचार करावा. नकारात्मक बाजूकडे लक्षच देऊ नये. नेहमी आशावादी राहावं.'

संवाद संपला, पण प्रश्न मनात राहिला- आशावाद म्हणजे काय? तर आपल्याला जे हवंय, जे वाटतंय तसं होईल, किंबहुना होईलच असं स्वत:ला बजावत राहणे म्हणजे आशावाद. याकडे अनेक अंगांनी बघता येईल. एक म्हणजे, हा आशावाद मुळातच भ्रामक असतो. त्याला भक्कम असा काहीही आधार नसतो. दुसरे म्हणजे- असा आशावाद बाळगताना मनात एक सुप्त वा उघड भीती असते, भय असतं. आपल्याला हवं ते नाही घडलं, हवं ते नाही मिळालं तर काय होईल याची. नकार, अभाव स्वीकारण्याची मनाची तयारी नसते. परिणामी आपण नकारात्मक बाजू टाळतो. त्याकडे दुर्लक्ष करायला मनाला शिकवतो. याने एक प्रकारचं मानसिक दुबळेपण येतं. घाबरटपणा येतो. जेव्हा विपरीत गोष्ट घडते तेव्हा येणारी निराशा अधिक असते. त्यातून सावरायला अधिक कष्ट पडतात अन वेळ लागतो. विपरीत गोष्टींचा विचार  टाळायला लावणारा आशावाद माणसाला दुबळं बनवतो.

त्यापेक्षा सत्याला निर्भिडपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न चांगला. अपेक्षित गोष्टींची इच्छा धरावी, प्रयत्न करावे; पण मनाला बजावत राहावे की- परिणाम काहीही होऊ शकतो. फळ अनुकूलच मिळेल असे नाही, तर प्रतिकूलसुद्धा मिळू शकेल. अन जगाचा, हजारो पिढ्यांचा माणसाचा; हाच अनुभव आहे. भगवद्गीता तर सिद्धांतच सांगते- `कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'. कारण फळावर कोणाचं नियंत्रण नसतं. हे प्रयत्नांच्या बाबतीत झालं. बाकी प्रत्येकाच्या वाट्याला सहजपणे- स्वभाव, नियती, भोग इत्यादींच्या रूपाने जे चांगले वा वाईट येते; त्याबद्दल तर वेगळं बोलण्याची गरजच नाही.

एखाद्याच्या वाट्याला नकार, अभाव, निराशा, अपयश, विपरीत परिस्थिती अशा नकारात्मक गोष्टींची अगदी रेलचेल असते. नव्हे तोच त्याच्या आयुष्याचा नियम असतो. चांगले, शुभ हा अपघात म्हणावा असे आयुष्य असते. तर अन्य एखाद्याच्या बाबतीत नेमके याच्या उलट. अशा दोन्ही बाबतीत प्रयत्न, सकारात्मक विचार वगैरे वगैरे सगळं गुंडाळून ठेवावं लागतं. बाहेरून पाहणारा माणूस सरळ एखादा निष्कर्ष काढून त्याला उपदेशाचे घोट पाजू शकतो. पण आयुष्याची चांगली ओळख असलेली व्यक्ती हे समजू शकते. अशा वेळी फसवा आशावाद उराशी बाळगून स्वप्नात रमण्यापेक्षा, या जगातील आशा-निराशा, अंधार-उजेड यांचा निर्भिड विचार करणारा सत्यमार्गच अधिक मोलाचा असतो.

- श्रीपाद कोठे

२ जून २०१७

मनोगत

मृत्यू ! जीवनाचं एकमेव शाश्वत सत्य !! जीवनाची शाश्वती देता येत नाही, मृत्यूची शाश्वती देण्याचीही गरज पडत नाही. जीवनाला मृत्यू अवश्य आहे... आहेच. मृत्युनंतरच्या जीवनाबद्दल मात्र असं ठामपणे म्हणता येत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर पहिला मृत्यू कधी झाला असेल कोणीच सांगू शकत नाही. परंतु एक नक्की की, तेव्हापासूनच मृत्यूबद्दलचे कुतूहल; त्याबद्दल जाणून घेण्याची धडपड; त्याबद्दलचा विचार; माणसाचा स्थायी भाव झाला आहे. अपवादाने सुद्धा असा माणूस नसेल ज्याच्या जीवनात कधी ना कधी मृत्यूचा विचार येत नाही. माणूस तो विचार टाळण्याचा प्रयत्न करतो, त्याची चर्चा सुद्धा अमंगळ मानली जाते. मृत्यूचे दु:ख, वेदना हा तर अवघ्या मनुष्यजातीचा दैनंदिन अनुभवाचा भाग. मृत्यूच्या गुढाने, मृत्यूच्या अपरिहार्यतेने सामान्यापासून असामान्यापर्यंत सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडले आहे. धर्म, समाजव्यवस्था, साहित्य, कला या साऱ्यांनी वारंवार मृत्यूचे चिंतन केले आहे. भारताचा विचार करायचा तर वेद, उपनिषदांपासून, रामायण, महाभारत, जैन व बौद्ध वाङ्ग्मय, भगवद्गीता, दासबोध सगळ्यांनी मानवी जीवनाचा विचार करताना अपरिहार्य अशा मृत्यूचा विचार केलेला आहे. मृत्यू संबंधीची मानवी मनातील स्पंदने, तरंग, जाणीवा, धारणा; त्याच्या एकूण जीवनाला आणि जीवनदृष्टीला प्रभावित करीत असतात. घडवीत असतात. इतिहासापासून अर्थकारणापर्यंत; मानसिकतेपासून तर न्यायादी कल्पनांपर्यंत; मृत्यूचा हा विचार जीवनाला प्रभावित करीत असतो. आज जगभर जीवनाचे जे जे संघर्ष आणि समस्या आहेत त्यांच्या मुळाशी जायचे असेल तर मृत्यूचा निर्भीड विचार आवश्यक ठरतो. मानवी जीवनाच्या संघर्षांना आणि समस्यांना उत्तरे देण्याचे जे प्रयत्न होतात ते साधारणपणे पौर्वात्य (मुख्यत: भारतीय) आणि पाश्चात्य या दोन वर्गात मोडतात. या दोहोतील भेद, फरक, भिन्नता समजून घ्यायचे असेल तर त्यातील मृत्यूविषयक चिंतन आधी समजून घ्यावे लागते. त्याशिवाय त्यातील भिन्नता लक्षातच येणे अशक्य. मानवापुढे आज उभा असलेला रिक्ततेचा मोठा प्रश्नसुद्धा मृत्यू चिंतनापाशी येऊन थांबतो. रोजच्या जीवन व्यवहारातील मृत्यूचे दर्शन, मृत्यूचे रंग, मृत्यूची अपरिहार्यता हे तर आहेतच. शिवाय मृत्यूचे मानवी देहाच्या मृत्यूव्यतिरिक्त जे अन्य पैलू आहेत तेही लक्षणीय आहेत. मानवी भावविश्वाला, विचारविश्वाला, जीवनाला व्यापून राहणाऱ्या या मृत्यूचे दर्शन घडवण्याचा हा अल्पसा प्रयत्न. तो जसा दिसला, जसा समजला, जसा पोहोचला, जसा कळला; तसा या मृत्यू संवादातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू हाच मध्यवर्ती विषय असणाऱ्या माझ्या एकूण ६७ कविता यात आहेत. यातील एकही यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही. अगदी समाज माध्यमात सुद्धा. मृत्यू या विषयावरील माझ्या आणखीनही काही कविता आहेत. त्या या संग्रहात समाविष्ट नाहीत. शिवाय या संग्रहाचे संपादन केल्यानंतर वाटू लागले की, खूप काही राहून गेले आहे. खूप काही अजून आहे जे खुणावते आहे. मुळात या विषयाची व्याप्तीच फार मोठी आहे. राहिलेले सारे पुढे जे आणि जसे होईल ते होईल. तूर्तास मानवी जीवनप्रवासातील या सहप्रवाशाशी साधलेला संवाद आपणाला सादर करतो आहे.

आपण त्याचे स्वागत कराल या विश्वासासह.

- श्रीपाद कोठे

नागपूर

(महाराष्ट्र, भारत)

shripad.kothe@gmail.com

२ जून २०१९