गुरुवार, २९ जून, २०२३

१४० रुपयात वारी

चित्रवाणीवर कार्यक्रम गळत होता. अभिनेता संदीप पाठक त्याचा वारीतील अनुभव सांगत होता. एका वारकऱ्याजवळ फक्त १४० रुपये होते. त्याने आश्चर्याने विचारले, 'एवढ्यात भागेल?' वारकरी म्हणाला, 'जेवण्या, राहण्याची सोय होते. पैसे लागतातच कशाला?' संदीप पाठक सांगत असताना ऐकणारे आश्चर्यमुद्रा करत होते. वारकऱ्यांच्या या मनोभावाचं मूळ काय याचा विचार मात्र त्यापैकी फार कुणी केला नसेल. मग तो मनोभाव बाळगणं आणि आपापल्या मनाचे धनाकर्षण मर्यादित करणं दूरच. भारतीय विचाराने वित्तेषणा, पुत्रेषणा, लोकेषणा हा जीवनाचा भाग आहे हे मान्य केले; अन सोबतच ती मर्यादित, नियंत्रित असावी हेही आग्रहाने सांगितले. वारकरी हे या भारतीय विचारांनी जगणारे लोक आहेत; अन त्यांची चर्चा करणारे नेमके त्याविरुद्ध, सगळ्या एषणा अधिकाधिक अमर्याद, अनियंत्रित असाव्यात असं सांगणाऱ्या अभारतीय विचारांनी जगणारे आहेत. दोन्हीचे परिणाम वेगवेगळे आहेत. जगासमोर आहेत.

- श्रीपाद कोठे

३० जून २०२२

मंगळवार, २७ जून, २०२३

स्वामी विवेकानंद राजकारणावर...

आज आपले सगळे जीवन राजकारणाने व्यापलेले आहे. नको एवढा राजकारणाचा वावर आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात होतो आहे. crony capitalism वगैरे शब्द आज खूप वापरले जातात. स्वामीजींनी ११५ हून अधिक वर्षांपूर्वी राजकारणाबद्दल काय म्हटले होते, हे म्हणूनच लक्षणीय ठरते. महात्मा गांधी यांनीही स्वामीजींनंतर दहाएक वर्षांनंतर साधारण हेच विचार त्यांच्या `हिंद स्वराज'मध्ये व्यक्त केले होते.

पूर्व आणि पश्चिम' या प्रदीर्घ निबंधात राजकारणाबाबत निरीक्षण नोंदवताना स्वामीजी लिहितात- `मूठभर शक्तिशाली माणसे करतील ते धोरण नि बांधतील ते तोरण, अशीच सर्वत्र स्थिती असते. बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. चालले त्यांच्यामागे. आणखीन काय? ते तुमचं पार्लमेंट बघितलं, व्होट बॅलट, मेजॉरिटी सारं काही बघितलं, पंत ! सगळ्या देशात ही एकच कथा. शक्तिमान पुरुष इच्छा होईल तिकडे समाजाला नेत असतात आणि बाकीचे म्हणजे मेंढ्यांचा कळप. भारतवर्षात हे शक्तिमान पुरुष कोण? तर, धर्मवीर. ते आमच्या समाजाला चालवतात. तेच समाजाची रीतीनीती बदलण्याची गरज पडल्यास बदलून देतात. आम्ही चुपचाप ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. फक्त यात तो तुमचा हैदोसहुल्ला, ती मेजॉरिटी, व्होट वगैरे नाही; इतकेच काय ते.

आता हे मात्र खरे की व्होट, बॅलट वगैरेंमधून बहुजन समाजाला पाश्चात्य देशांमध्ये जे एक प्रकारचे शिक्षणवळण लाभते ते आम्हाला लाभत नाही. पण त्याचबरोबर हेही खरे की, राजनीतीच्या नावाखाली जे चोरांचे गट युरोपीय देशांमधील बहुजन समाजाचे रक्त शोषून पुष्ट होत असतात ते पण आमच्या देशात नाही. राजनीतीच्या गोंडस नावाखाली पाश्चात्य देशांमध्ये चालणारा तो लाचलुचपतीचा धुमाकूळ, ती दिवसाढवळ्या डाकेखोरी ! त्या राजनीतीची अंदरकी बात बघितली असती तर माणसाविषयी अगदी निराश, हताश होऊन गेला असता, पंत ! `गली गली गोरस फिरे, मदिरा बैठी बिकाय... सतीको धोती ना मिले, कसबिन पहिने खासा' (दूध विकण्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागते, पण दारू एके जागी बसूनच विकली जाते. सती स्त्रीला नेसायला वस्त्र मिळण्याची मारामारी, पण बाजारबसविला मात्र लयलूट.) धन्य कलियुगाचा महिमा. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या मुठीत ठेवली आहेत. प्रजेला, बहुजन समाजाला ते लुटतात, लुबाडतात, शोषतात, सैन्यात भरती करून मरण्यासाठी देशदेशांतरी पाठवतात. जय झाला तर यांचेच उखळ पांढरे होणार. सैनिकांच्या रक्ताच्या मोबदल्यात. अन प्रजा? ती तर तिथेच गारद झाली, मेली. तिचं फक्त रक्त सांडायचं काम ! याचं नाव राजनीती, पंत ! समजलं? तिने दीपून जाऊ नका, तिच्या भूलावणीला भुलू नका.

एक गोष्ट समजून घेण्याचा यत्न करा. सांगा, माणूस कायदे तयार करीत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करीत असतो की पैशाने माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक मिळवीत असतो की नावलौकिकाने माणूस निर्माण होत असतो? माणूस व्हा, पंत, आधी माणूस व्हा ! मग दिसेल की, बाकीचे सारे कसे आपोआप तुम्हाला येउन मिळत आहे. ते कुत्र्यासारखे आपसात एकमेकांवर गुरगुरणे, भुंकणे सोडून देऊन सदुद्देश्यासाठी सदुपाय, सत्साहस नि सद्वीर्य यांचे अवलंबन करा. जन्मला आहात तसे एक डाग ठेवून जा मागे. तुलसी आयो जगत मे, जगत हंसे तुम रोय... ऐसी करनी कर चलो, आप हंसे जग रोय' (जेव्हा तू जन्मला होतास तेव्हा सगळे हसत होते, तू रडत होतास. तुलसीदासा, आता अशी करणी करीत चल की, तू हसत हसत मरशील आणि सगळे तुझ्यासाठी रडतील.) हे करू शकला तर तुम्ही माणूस, पंत. एरवी कसचे मनुष्य तुम्ही !'

- श्रीपाद कोठे

- २८ जून २०१५

मसाल्याचा डब्बा

घराघरात शांतता, एकोपा हवा आहे? मग प्रत्येक घरात मसाल्यांचा डबा आहे याची खात्री करा.

- एका वाहिनीवरील आजचे ताजे ज्ञान. विविध प्रकारचे आणि गुणांचे मसाले जसे एकाच डब्यात गुण्यागोविंदाने राहतात तसे घरातील लोक राहतील. एकच शर्त - स्वयंपाकघरात मसाल्याचा गोल डब्बा हवा.

- माझ्याकडे तर आहे बुवा. सगळे जण खात्री करून घ्या. नसेल तर आणा. 😀😀

- श्रीपाद कोठे

२८ जून २०२२


आरण्यक

बिना झाडांच्या, वनांच्या भागात जन्मल्या अन वाढल्यामुळे, एक समाज क्रूर आणि हिंसक झाला. त्याने जिहादला जन्म दिला.

झाडे, वने, जंगले यांच्या सहवासात वाढल्यामुळे एक समाज सगळ्यांचा विचार करणारा झाला. या समाजाने जगावर अमृतसिंचन करणारी आरण्यके जन्माला घातली.

निसर्ग आपोआप, नुसत्या सहवासाने माणसाला शिकवतो, घडवतो.

झाडे, वने, जंगले यांच्याबद्दलचा दुरावा अन द्वेष माणसाला कुठे घेऊन जातो, याची ही दोन उदाहरणे. या उदाहरणांपासून शिकता आलं तर शिकावं. नाही तर राहिलं.

- श्रीपाद कोठे

२८ जून २०२२

शुक्रवार, २३ जून, २०२३

सावधान, गाढवे बिथरली आहेत...

मोदींच्या योगाची हिटलरशी तुलना करणारे पोस्ट पाहायला मिळत आहेत. काही पोस्ट तर असभ्य म्हणाव्या अशा आहेत. द्वेष लोकांना किती आंधळं करू शकतो याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. यात अगदी पानटपरीवरील विद्वानांपासून समाजात प्रतिष्ठाप्राप्त खऱ्या अभ्यासक, लेखक, चिंतक, विद्वान यांचाही समावेश आहे. हिटलरची आयोजने आणि योगाचे आयोजन, यात संख्या, शिस्त, सामूहिकता या बाबी समान असल्या तरी त्यामागील भावनाच नव्हे तर, त्या आयोजनाचा प्रकार सुद्धा वेगळा आहे. मोदींनी योगाच्या आयोजनासाठी पद्धतशीरपणे सगळ्या जगाला सहभागी करून घेतले. शत्रू समजले जाणारे सुद्धा यात सहभागी झाले. युनोसारख्या मान्यता असलेल्या जागतिक संस्थेच्या माध्यमातून हे घडवून आणले. भारतात जरी या आयोजनाचे श्रेय स्वाभाविक पूर्णत: मोदी यांना जात असले, तरी जगभरात हा युनोचा कार्यक्रम म्हणून साजरा झाला. शिवाय जागतिक योग दिन नसता जाहीर करण्यात आला, तरीही योगाला जगात पूर्वीपासून मोठी मान्यता आहे. कोट्यवधी देशी विदेशी लोकांच्या जीवनाचा तो भाग आहे. युनोने जागतिक योग दिवस जाहीर करणे आणि त्याचे जगभरात सामुहिक कार्यक्रम यामुळे फक्त त्याला आणखीन बळ मिळाले आणि मानवी जीवनाच्या संदर्भात ज्या चित्रविचित्र प्रतिमांचा मारा आज मानवावर होत आहे त्यात एका चांगल्या प्रतिमेची भर पडली. अयोग्य, असभ्य, अनावश्यक प्रतिमांच्या गोंधळात एक सकारात्मक, सभ्य, योग्य, आवश्यक प्रतिमा स्थापन झाली. कोणत्याही रीतीने योगाचे सार्वजनिक आयोजन आणि हिटलर यांची तुलना होऊच शकत नाही. अशी तुलना करणाऱ्यांनाही हे ठावूक आहे. पण...

हा पणच महत्वाचा आहे. गाढवे बिथरली आहेत, हे मात्र नक्की. अनेक सज्जन म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करावे. मात्र त्यांच्याबद्दल आदर ठेवूनही सांगावेसे वाटते की नाही, दुर्लक्ष नको. बिथरलेली गाढवे काय करतील सांगता येत नाही. अशाच वेळी जास्त सावधानता हवी आणि त्यांना नरम करण्यासाठी, त्यांचे उधळणे आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपायही हवेत.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१५

त्यापेक्षा जांभळे खावीत

मी शंभर पुस्तके वाचली.

मला ती समजली का?

मला ती पूर्ण समजली.

बाकीच्या वाचकांनाही तशीच समजली का?

त्या पुस्तकांचा मला लागलेला अर्थच खरा का?

त्या पुस्तकांचा अन्य वाचकांचा अर्थ खरा का नाही?

सगळ्या वाचकांना एकच अर्थ का प्रतीत होत नाही?

मग संदर्भ, त्याचे अन्वयार्थ वगैरेची काय मातब्बरी?

एकूणच हे सगळं गमतीशीर आहे का?

ज्ञान, माहिती, अर्थ, अन्वयार्थ, विश्लेषणे, निष्कर्ष म्हणजे काय?

त्यापेक्षा जांभळे खावी.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१५

महातत्वांचा महाभिमान

१) माझ्यासारखा वाईट कोणी नाही,

२) एकदा मी एखाद्याला तोडलं की त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही,

३) मी कधी चुकतबिकत नाही,

४) दुसऱ्याचा विचार करण्याच्या भानगडीत मी पडत नाही,

५) बाकीच्यांचा विचार करण्याची मला गरज नाही,

६) माझ्यापाशी दयामाया नाही,

७) मी खूप कठोर आहे,

८) आपण कधी जमवून वगैरे घेत नाही,

९) समजून बिमजून घेण्याची भानगड आपल्याकडे नसते,

१०) मूर्ख लोक नमतं घेतात,

इत्यादी इत्यादी इत्यादी महातत्वांचा महाभिमान बाळगणाऱ्या लोकांचं खरंच कौतुकच केलं पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१७

Ultra nationalist

रा.स्व. संघाबद्दल विचार करून बोलणाऱ्यांपेक्षा विचार न करून बोलणारेच जास्त आहेत. संघाचा उल्लेख ultra nationalist असा करतात तेव्हा हसायला येतं अन कीव येते. अनेक देशांमध्ये संघाचे काम चालते. त्याच्या शाखाही चालतात. त्यातील एकाही ठिकाणी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने काम चालत नाही. एक तर 'हिंदू स्वयंसेवक संघ' किंवा 'भारतीय स्वयंसेवक संघ' अशी नावे आहेत. त्या त्या देशातील राष्ट्रीय समाज वेगळे आहेत आणि त्यांच्याशी समन्वय राखून आपण राहिले पाहिजे आणि काम केले पाहिजे ही संघाची भूमिका आहे. तेथील प्रार्थनाही वेगळी आहे. एवढेच नाही तर प्रार्थनेच्या शेवटी भारतातल्याप्रमाणे 'भारत माता की जय' असे न म्हणता 'विश्वधर्म की जय' असे म्हटले जाते. असे असूनही, इतक्या स्पष्ट भूमिका असणारा, इतका स्वच्छ विचार करणारा संघ ज्यांना ultra nationalist वाटतो त्यांचा काही इलाज नाही.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१८

महत्त्व शब्दांचे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे भाषण ऐकण्याचा काल योग आला. पुष्कळ छान विषय त्यांनी मांडले. एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे- योग्य शब्दांच्या उपयोगाचा. योग्य शब्दांच्या अभावी योग्य अर्थ, नेमका भाव प्रकट होत नाही, पोहोचत नाही, गोंधळ उडतो असा एक विचार त्यांनी मांडला. याबद्दल बोलताना ते म्हणाले- सांप्रदायिकता म्हणजे communalism नाही, धर्म आणि religion एक नाही, व्यावसायिक म्हणजे commercial नाही. मला हे फार महत्वाचे वाटले. मुख्य म्हणजे श्रीपाद जोशी डाव्या विचारांचे आहेत. परंतु डाव्या, उजव्या, मधल्या असे करण्यापेक्षा; समन्वयाचे, सहकार्याचे, सहयोगाचे, सहविचारांचे बिंदू वेचणे केव्हाही चांगले. नाही का? स्व. दीनदयाळ उपाध्याय यांचा `सही शब्द, सही अर्थ' या शीर्षकाचा एक लेखच होता, ही माहिती निघताना त्यांना दिली. त्यांनीही ऐकून घेतली.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१८

कौटिल्याच्या दंड

शासन हे क्षीणदंड आणि उग्रदंड दोन्हीही नको हे सांगताना आर्य चाणक्य म्हणतात-

`दंडशक्तीचा अजिबात उपयोग न केल्यास मात्स्यन्याय सुरु होतो. उलट नेहमी दंडशक्तीचाच वापर केल्यास प्रजा त्रस्त होते. दंडाचा यथोचित वापर केला तर प्रजा धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थाची उपासना करू शकते. उलट कोठलाही विवेक न ठेवता, अज्ञानामुळे अथवा कामक्रोधाला बळी पडून दंडशक्तीचा वापर केल्यास वानप्रस्थी व संन्यासी देखील खवळतील. मग गृहस्थाश्रमी खवळतील यात नवल ते काय?' (कौटिलीय अर्थशास्त्र - अधिकरण पहिले, भाग चौथा)

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१८

जप्त संपत्ती बँकांना

माल्या, मोदी आदींची जप्त केलेली संपत्ती बँकांना देण्याचा सरकारचा निर्णय अतिशय योग्य असाच आहे. ही रक्कम फार नसली तरी ही कृती समर्थनीय आहेच. यानंतरही या कर्जबुडव्या लोकांची संपत्ती जप्त करून ती बँकांना देऊन बँका सशक्त कराव्या. अन या बड्या कर्जबुडव्या धेंडांप्रमाणे देशातल्या मोठ्या आणि छोट्या लोकांचीही संपत्ती जप्त करून बँका आणि सरकार यांचे खजिने भरावे. छोटे कर्जबुडवे याचा अर्थ ज्यांनी बुडवलेली वा थकवलेली कर्जे काही कोटी रुपयात आहेत ती. लाख आणि हजारातील कर्ज फेडू न शकणारे वा न फेडलेले यांना वेगळा न्याय लावलाच पाहिजे. त्यांचे व्यवहार विसरून जावे किंवा कानाडोळा करावा असे नाही. पण त्यातील प्रत्येकाचा स्वतंत्र विचार करून गरज, परिस्थिती, कायदा, मानवीयता; असे सगळे पैलू विचारात घ्यावे एवढेच. मात्र पैशाच्या माजात असणाऱ्यांना दयामाया न दाखवता जप्तीचा वेग वाढवून खजिने भरावे. तसेही; आधी कोणीतरी काही चुका, गडबडी केल्या असतील त्याची भरपाई बाकीच्या निरपराध लोकांनी का करायची? ज्यांनी केलं त्यांनाच भरायला लावलं पाहिजे. अन ही सरकारची जबाबदारी असायला हवी.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०२१

अंतर्विरोध

जगातले सध्याचे बहुतेक सगळे संघर्ष कमीअधिक एकाच प्रकारचे आहेत. 'सर्वेपि सुखीन: सन्तु' विरुद्ध 'career, achievement, goals, target, power'. अगदी व्यक्तिगत संघर्षापासून जागतिक आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, सांप्रदायिक; सगळे. भारतीय परिस्थिती, इतिहास, परंपरा, वीण; यामुळे आपल्याला अजून ते तेवढे स्पष्टपणे आणि तीव्रतेने लक्षात येत नाहीत. पण त्यांचे विकराळ स्वरूप भविष्यात अनुभवावे लागू शकेलच. गंमत म्हणजे 'सर्वेपि सुखीन: सन्तु' हे मान्य असणारे, त्याचा उच्चार करणारे, त्याचा उल्लेख करणारे, ते उचलून धरायला हवं असं वाटणारे; अशा वर्गातील बहुसंख्यांनाही या संघर्षाचं आकलन नीट होत नाही. स्वतःच्या विचार, व्यवहाराचा अंतर्विरोध त्यांना लक्षात येत नाही. मुख्य म्हणजे माहिती आणि तांत्रिकता (तांत्रिकता केवळ तंत्रज्ञान, विज्ञान, material science यातच असते असं नाही. विचार, विचारपद्धती इत्यादीतही असते.) यांच्या जंजाळात आणि गुंत्यात भांबावत आणि वाहत जाणेही अपरिहार्यपणे होत जाते. सगळ्या पसाऱ्यातून नेमक्या गोष्टीवर दृष्टी ठेवणारे फार कमी असतात. असे लोक वाढायला हवेत एवढं मात्र खरं.

- श्रीपाद कोठे

२४ जून २०२१

समाज की झुंड?

 - राजकीय तमाशाचा मनसोक्त आनंद घेणारे भरपूर आहेत.

- राजकीय तमाशाची चिरफाड करणारे भरपूर आहेत.

पण...

- राजकीय तमाशामुळे होणाऱ्या पैशाच्या, वेळेच्या, ऊर्जेच्या, प्रशासन ठप्प झाल्याच्या नुकसानाची चीड येणारे फार कोणी दिसत नाहीत.

- ज्यांना चीड येते, संताप येतो त्यांना cool राहण्याचा सल्ला दिला जातो, त्यांची मस्करी होते किंवा संत होण्याची अपेक्षा केली जाते.

- मात्र ज्यांना या तमाशाचा राग येत नाही ते संवेदनाहीन आहेत हे कोणी म्हणत नाही.

- ही समाज माध्यमे आहेत की असामाजिक माध्यमे?

- आपण समाज आहोत की जनावरांची झुंड?

- आपल्याला स्वार्थ आणि बदमाशा चालतात. पण त्याचा राग वा संताप येणं आपण चुकीचं समजतो. कोणत्या तराजूत तोलायची आपली महानता?

- श्रीपाद कोठे

२४ जून २०२२

गुरुवार, २२ जून, २०२३

पैशाचे आवाहन

Wikipedia पाहत होतो. लक्षात आले की, काही दिवसांपासून ते पैसे देण्याचं आवाहन करतात. पैसे दिल्याशिवाय वापरता येणार नाही, असं नाही. आधीसारखंच नि:शुल्क आहे. पण पैसे द्यावे असं आवाहन करतात. मनात आलं - आपणंही करावं का बुवा असं आवाहन? Wikipedia चा अनुभव कसा आहे माहिती नाही. आपला कसा राहील? कोणास ठाऊक. 😀😀

- श्रीपाद कोठे

२३ जून २०२२

बुधवार, २१ जून, २०२३

नालायक

अनेकदा या सत्याचा बोध होतो की, आपण किती नालायक आहोत. 'एखाद्या गोष्टीसाठी लायक नसणे' अशा, या शब्दाच्या अगदी प्राथमिक साध्या अर्थानेच म्हणतो आहे. जेव्हा लोक लोकांबद्दल बोलतात, पैशावरून बोलतात, चप्पल- जोडे- घड्याळ- मोबाईल- कपडे- गाड्या- अशा गोष्टींबद्दल बोलतात, या वस्तूंच्या ब्रँड आणि किमतींवरून जोखतात वा मूल्यमापन करतात, हॉटेल्स इत्यादींवर तासंतास बोलतात, दिसणे- सवयी- परिस्थिती- यांचा काथ्याकूट करतात; तेव्हा बोध होतो आपल्या नालायकपणाचा. या गोष्टींमध्ये सहभागी होणे दूर, आपल्या मनात अन विचारातही या गोष्टी डोकावत नाहीत म्हणजे काय? नालायकपणाच की नाही. यातलं काहीही न समजणे याला दुसरा कोणता शब्द वापरणार? तेच राजकारणाचंही. आपल्याला त्यात रस वाटत नाही, आपली त्याकडे ओढ नाही; हा तर नालायकपणाचा कळसच. तर एकूणच या जगासाठी आवश्यक ती लायकी नसूनही 'त्याने' कसं काय नाव नोंदवून घेतलं कुणास ठाऊक.

- श्रीपाद कोठे

२२ जून २०२२

सोमवार, १९ जून, २०२३

पाकीट आणि पक्षी

काही मित्र जंगलात फिरायला गेले. त्यांचा आनंदविहार सुरु असताना त्यांना एक नैसर्गिक असा जलाशय दिसला. त्यांच्यापैकी एकाला त्यात हातपाय धुण्याची इच्छा झाली. त्याने मोबाईल, कॅमेरा, पाकीट, कंबरेचा पट्टा काढून काठावर ठेवले आणि तो पाण्यात उतरला. ५-१० मिनिटं गेली. छान सगळे मजा करत होते. अन गवतातले किडे हुडकत तिथे एक पक्षी आला. त्याने पाकीट चोचीत उचलले. मित्रांनी हाड हाड केलं तर तो उडाला. अन उडाला तो पाकीट घेऊनच. अन बरोब्बर त्या मोठ्ठ्या जलाशयाच्या मध्यावर त्याने ते चोचीतून टाकून दिले. बिच्चारा. डोक्याला हात लावून बसण्याशिवाय काय करू शकत होता? पैसे, लायसन्स, वेगवेगळे कार्ड वगैरे गेलं. गंगार्पण. कोणाकडे मागायचा न्याय? काय शिक्षा द्यायची पक्ष्याला?

आता बोला.

- श्रीपाद कोठे

२० जून २०१५

शनिवार, १७ जून, २०२३

पाण्यापासून इंधन

एक जण सांगत होता, आता पाण्यातून हायड्रोजन काढून त्याचा इंधन म्हणून वापर करणार. चांगलं आहे. पण पाण्यातून हायड्रोजन वेगळा केल्यावर पाणी हे पाणी राहील का? नाही राहणार. जगासमोर आजच पाण्याची समस्या असताना पाणी आणखीनच कमी उपलब्ध होणार. हे योग्य होईल का? हायड्रोजन वेगळा करण्यासाठी फक्त सांडपाणी वा वापरलेले पाणीच उपयोगात आणले जाईल असं ठरवलं तरीही जमिनीत मुरणारे वा बाष्पीभवन होणारे पाणी तर कमी होईलच. पडणाऱ्या पाण्याची साठवणूक वाढवून त्याचा वापर केला जाईल असं समजलं तरी, या मानवाची राक्षसी इंधनभूक आणि मिळणारे पाणी यांचा मेळ जमेल का? शिवाय निसर्गाच्या अंगभूत चक्रात काय बदल होतील ते कसे सांगता येतील. तेव्हा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही. पण सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. एखादी गोष्ट सुरू करायची आणि मग फरपटत राहायचं हे काही बरोबर नाही. मानवाची राक्षसी भूक कमी करण्याबद्दलही बोलत राहायला हवं असं वाटतं.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०२२

शुक्रवार, १६ जून, २०२३

राजकीय संस्कृती

समाजाने जबाबदारीने वागले पाहिजे हे खरेच आहे, अन सोबतच समाजात काय सुरू आहे हे शासन प्रशासनालाही ठाऊक असायला हवे. सगळ्या समाज घटकांशी, सगळ्या राजकीय पक्षांशी; event or no event, incident or no incident; सातत्याने संवादाची प्रक्रिया का होत राहू नये? शिवाय - कालपर्यंत झाले असेल वा नसेल; पण प्रस्ताव, कल्पना, योजना, निर्णय; याबद्दल व्यापक पूर्वचर्चा करण्याची नवीन राजकीय कार्यशैली विकसित करायला काय हरकत आहे? शासनाने काही करायचे, त्यावर कोणी काही प्रतिक्रिया द्यायच्या, त्यावर चर्चा करायच्या, जबाबदाऱ्यांचा काथ्याकूट करायचा, उपदेशांचे रतीब घालायचे; अन वेळ, पैसा, बुद्धी, ऊर्जा, व्यवस्था, infra structure यांचा अपव्यय पाहात उसासे टाकायचे; एवढंच चालेल का? यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं यावर प्राधान्याने विचार का करण्यात येऊ नये? विरोधकांना चुकायला भाग पाडण्याचे राजकारण यशस्वी असते की नाही हा वेगळा मुद्दा, पण ते चांगले नसते हे मात्र नक्की. साम्राज्यवादाच्या प्रशासकीय मानसिकतेतून बाहेर येणे must आहे.

- श्रीपाद कोठे

१७ जून २०२२

सोमवार, १२ जून, २०२३

विवेकानंद आणि भारत

वृंदावनाला जाताना तीनेक किमी आधी - चिलीम पिणारा भंगी - मीही भंगी आहे.

: अलवार नरेश मंगळसिंह यांच्या दिवणांच्या घरी - भिक का मागता - शिकारीत वेळ का घालवता; मूर्तीपूजा मानत नाही - चित्रावर थुंका.

: राजस्थानात अबूच्या पहाडावर एका गुहेत राहत असताना मुस्लिम वकीलाशी ओळख झाली. त्याच्या घरी राहिले. तिथेच खेत्री संस्थानचे दिवाण जगमोहनलाल यांची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून राजे अजितसिंग यांच्या घरी गेले.

: घोड्यावर बसणे, खेळणे इत्यादी.

: खेत्रीचे महाराज अजितसिंग यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. एक प्रकारे राजगुरू पद त्यांना बहाल केले. पाय चेपून देत.

: एक दिवस नर्तिकेचे गायन ठेवले होते. संन्यासी असल्याने आपण येऊ शकणार नाही असे स्वामीजींनी सांगितले. गायिका दुखावली गेली. पण काही न बोलता तिने सूरदास यांचे भजन - प्रभू मोरे अवगुण चित ना धरो, सम दर्सी है नाम तीहारो, चाहे तो पार करो - म्हंटले. माफी मागितली. अनेकदा ही घटना सांगत. नंतरच्या काळात या भजनाचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला होता. त्यांचे विदेशी शिष्य हे भजन म्हणत असत.

: निरीक्षण आणि आत्मपरीक्षण.

: लिमदी संस्थानात. राजे ठाकूर जसवंतसिंग इंग्लंड, अमेरिकेला जाऊन आले होते.

: जुनागड संस्थानात. द्वारकेला गेले. पोरबंदर संस्थानात. तेथील शंकर पांडुरंग हे कारभारी विद्वान होते. त्यांना फ्रेंच व जर्मन भाषा येत होत्या. त्यांचे मोठे ग्रंथालय होते. इथे वेदांचे अध्ययन आणि भाषांतर केले

: महाबळेश्वर, इंदोर, उज्जैन, खंडवा, मुंबई, पुणे (टिळकांच्या घरी आठ दहा दिवस. एका क्लबमध्ये भाषणही केले. लोक येऊ लागले तेव्हा एका पहाटे निघून गेले. कोल्हापूरला.)

: बेळगाव. म्हैसूर. म्हैसूरचे महाराज. धारवाड. केरळातील एर्नाकुलम, कोचीन. त्रिवेंद्रम. कन्याकुमारी ला समुद्रातील शिळखंडावर तीन दिवस, तीन रात्र चिंतनात घालवले.

कन्याकुमारी हून रामेश्वरम्, मद्रास, हैद्राबाद. खेत्रीचे महाराज अजितसिंग यांना पुत्ररत्न झाल्याने पुन्हा खेत्रीला गेले. तिथून मुंबईला येऊन जहाजाने अमेरिकेकडे.

शिकागो परिषदेच्या उद्घाटन सोहोळ्याच्या रात्री श्री. लायन यांच्या घरी झोपू शकले नाहीत. उशी आसवांनी भिजून गेली.

: भारतात परतताना लघुलेखक जोशुया गुडविन यांचा प्रश्न आणि त्याला उत्तर. भारतावर माझे प्रेम होते आता ती माझ्यासाठी तीर्थ भूमी झाली आहे. धुळीचा प्रत्येक कण पवित्र आहे.

: त्यांच्या मागोमाग श्रीमती बुळ, जोसफैन आणि मार्गारेट नोबल भारतात आल्या. बेलुरला राहिल्या. हिमालयात तीर्थयात्रेला गेल्या. सोबत अमेरिकन राजदुताच्या पत्नी ही होत्या. कोलकात्याला शाळा सुरू केली. या सगळ्या संबंधात भारत हा विषय प्रामुख्याने राहत असे. याच विषयावरून मार्गारेट शी खटकाही उडत असे.

: निवेदिता यांचा अभिप्राय.

कोलंबो ते अलमोडा. कराचीलाही गेले होते. या भाषणांचा नंतरच्या कार्यावर व व्यक्तींवर प्रभाव.

: आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, धार्मिक दृष्टीने भारताला घडवण्याचा प्रयत्न कसा केला ही वेगळी गाथा आहे.

: भारत काय आहे? मद्रासच्या भक्तांना पत्र - हिंदू धर्माचे पुनरुत्थान. काय या भारताचा नाश होईल? छ... तसे झाल्यास काय होईल?

पुस्तकाची १७ पानं एवढं ते दीर्घ पत्र आहे.

भारतासाठी मी काय करू, या निवेदिता यांच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं - भारतावर प्रेम कर.

हे प्रेमच काय करायचं हे सांगत राहील. स्वामी विवेकानंद यांचा हा संदेश आहे आणि तेच त्यांच्या जीवनाचं सारही आहे.

काय भारताच्या अस्तित्वाचा लोप होईल? उदात्ततेचे, नीतिमत्तेचे, आध्यात्मिकतेचे प्राचीन आदिपीठ अशा भारताचा लोप होईल? ते शक्य नाही. तसे झाल्यास - जगातील सगळी आध्यात्मिकता लयास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्माविषयीचा सहानुभूतीचा मधुर भाव नाहीसा होईल आणि त्या जागी स्थापना होईल - कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोडमूर्तीची. पैसा होईल त्यांचा पुरोहित. फसवेगिरी, पाशवी बल आणि स्पर्धा या होतील त्यांच्या पूजेच्या पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बळी. छे छे... असे होणे कदापि शक्य नाही.

गुरुदेवांच्या स्वभावात खोलवर रुजलेल्या देशप्रेम व बांधवांच्या दुःखाविषयीची चीड या परस्परविरोधी भावनांचा मेळ कसा घालावा हे त्यांचे त्यांनाच समजत नसे. त्या काळात मी त्यांना बहुधा रोज भेटत असे. भारताखेरीज इतर कोणताच विचार त्यांच्या मनात येत नाही हे मी पाहत होते. ते पायाचा एक दगड म्हणून कार्य करीत होते. राष्ट्रीयता असा शब्द ते कधी वापरीत नसत किंबहुना राष्ट्रीय घडणीचा तो काळ होता असा त्यांनी कधी दावाही केला नाही. त्यांना मानवता जागृत करायची होती पण ते वृत्तीने एक उत्कट प्रेमिक होते. त्यांची मातृभूमी हा त्यांच्या प्रेमाचा एकमेव विषय होता. एखाद्या नाजूक घंटिकेतून जसा सूक्ष्म आंदोलनाने सुद्धा ध्वनी निघावा त्याप्रमाणे मातृभूमी विषयीची बारीक-सारीक वेदनाही त्यांच्या हृदयाच्या तारा छेडी. दुःखाचा एखादा आवाज कानी पडला तरी त्यांच्या मनात त्याचा प्रतिध्वनी उमटे. देशबांधवांनी भीतीने फोडलेली एखादी किंकाळी किंवा कमकुवतपणामुळे त्यांचा उडालेला थरकाप स्वामींना कळला नाही; अगर त्यांनी तो समजावून घेतला नाही, असे कधी होत नसे. अपमानित होऊन मागे घेतलेल्या भारतीयांच्या प्रत्येक पावलाची त्यांना लगेच चाहूल लागे. आपल्या लोकांच्या पापांविरुद्ध किंवा व्यवहारशून्यते विरुद्ध त्यांच्या न्यायाचा आसूड निष्ठुरपणे उठे. कारण त्या उणिवा स्वतःच्याच आहेत असे ते मानित. उलट भारतीयांच्या थोरवीचे व उज्वल भवितव्याचे चित्र त्यांच्याइतके स्पष्ट पाहू शकणारा आणि त्या स्वप्नाने भारून गेलेला दुसरा एकही द्रष्टा सापडेल असे मला वाटत नाही.

चार 'स' मार्ग

माणसाच्या जगण्याचे चार 'स' मार्ग असतात. १) संसाराचा मार्ग, २) सामाजिकतेचा मार्ग, ३) संन्यास मार्ग, ४) सत्य मार्ग. पैकी संसाराचा मार्ग हा बहुसंख्य लोकांचा मार्ग असतो. सामाजिकतेचा मार्ग त्याहून बऱ्याच कमी लोकांचा असतो. संन्यास मार्ग त्याहूनही कमी लोकांचा असतो. तर सत्य मार्ग हा तुरळक लोकांचा मार्ग असतो. या चारही मार्गांवरून चालणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला वाटतं की, आपण हा मार्ग निवडला आहे. त्यानंतर वाटचाल करताना बहुतेक प्रत्येकाला प्रश्न पडतो की, मी हा मार्ग का धरला? अन् कधीतरी कळतं की, मुळात आपला मार्ग आपण निवडतच नाही. मार्ग आपोआप आपल्यासमोर येतो आणि आपण त्यावर चालत राहतो.


प्रत्येक मार्गाची आपापली भाषा असते. प्रत्येक मार्गाच्या आपापल्या खुणा असतात. प्रत्येक मार्गाचे रुप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा अस सगळं वेगवेगळं असतं. यातील पहिले तीन मार्ग एकमेकांशी कुठे कुठे जोडलेले असतात. त्या जोडमार्गांनी या तिन्ही वाटांच्या वाटसरुंना अन्य मार्गाबाबत थोडीबहुत माहिती होत असते. एकमेकांचा आणि एकमेकांच्या मार्गांचा थोडाबहुत परिचय होत असतो. त्यामुळे त्यांच्यात कमीअधिक संवाद होतो, होऊ शकतो. हे तिन्ही मार्ग कुठेतरी जाऊन थांबतात. तो dead end असतो. त्यामुळे वाटसरू पुन्हा पुन्हा मागे पुढे फिरत राहतात. पुन्हा पुन्हा आपला आणि अन्य मार्ग; तसेच आपल्या आणि अन्य मार्गावरील वाटसरू यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. कधी त्यांना त्यात रस वाटतो तर कधी ते कंटाळवाणे होते. त्यांचे चालणे मात्र सुरूच राहते. अखंडपणे.


चौथा सत्य मार्ग मात्र पुष्कळच वेगळा असतो. तो या तीन मार्गांना समांतर असतो पण कुठेही जोडलेला नसतो. त्याचे रूप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा, गरजा, भाषा, खुणा सगळं अन्य मार्गांपेक्षा तर वेगळं असतंच पण त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या या गोष्टीही वेगवेगळ्या असतात. कधी कधी एकमेकींशी या बाबी थोड्याबहुत जुळल्या तर त्यांच्यात देवाणघेवाण होते. पण अनोळखीपण हेच या मार्गाचे वैशिष्ट्य असते. या मार्गाचे वाटसरू एकमेकांना अनोळखी असतात. अन्य तीन मार्गांना हा मार्ग समांतर असल्याने आणि मुळात या मार्गावर तुरळक वाटसरू असल्याने; या मार्गाचे वाटसरू अन्य मार्गांचे आणि त्यावरील वाटसरुंचे निरीक्षण आणि अध्ययन करू शकतात. शिवाय या मार्गाचे बहुतेक वाटसरू पहिल्या तीन मार्गांवरूनच कुठून तरी तिथे उडून आलेले वा फेकले गेलेले असतात. अनोळखी आणि रिकामा असल्याने या मार्गावर मौज अधिक असली तरी, अनामिक अस्वस्थता मात्र भरपूर असते. अनुकरणाला काहीही वाव नसतो. प्रत्येक वाटसरू आपला राजा असतो. हा मार्ग आणि त्यावरचे वाटसरू हे अन्य मार्गांना आणि त्यावरील वाटसरूंना नेहमीच एक कोडे वाटत असते. अन्य मार्गांचे dead end जिथे असतात त्याच्या जवळच या मार्गाचीही समाप्ती असते. परंतु अन्य मार्ग अनुल्लंघ्य भिंतींनी जसे बंद झालेले असतात तसा हा मार्ग बंद झालेला नसतो. त्याच्या समाप्तीला तो एका आनंद सरोवरात पोहोचतो. या मार्गावरील वाटसरू मग त्या आनंद सरोवरात कायम विहार करत राहतात.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३

मराठी भाषेसाठी करता येणारे संकल्प

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करता येणारे संकल्प -

- लहान मुलांना शिकवताना हा dog, ही cat; याऐवजी कुत्रा, मांजर किंवा अगदी भू भू म्यांव हे सांगीन.

- फ्लॉवर कसा दिलाऐवजी फुलकोबी कशी दिली/ काय भाव; असे बोलीन.

- मला bore होण्याऐवजी कंटाळा येईल.

- लंच, डिनर वा ब्रेकफास्ट याऐवजी जेवण आणि नाश्ता करीन.

- माझं बुक स्टोर ऐवजी पुस्तकालय असेल.

- मला नेबर नसतील शेजारी असतील.

- मी व्यवस्थित कमवीत असल्यास वर्षाला हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घेईन.

- शुभेच्छा आणि धन्यवाद या शब्दांचा वापर करीन.

- जन्मदिवस वा सणवार वा अन्य प्रसंगी मराठीतून शुभेच्छा देईन.

- मराठी बोलताना, मराठीचा वापर करताना मला ओशाळल्यासारखं वाटणार नाही. त्यात कमीपणा वाटणार नाही.

- चारचौघात असताना मराठीबद्दल बाकीच्यांना काय वाटतं याचं दडपण मी घेणार नाही.

- रोजच्या वापरातल्या वस्तू, रोजचे घरातले वा बाहेरचे संवाद आग्रहाने मराठीत करीन. शब्द अडल्यास तो शोधेन आणि त्याचा वापर करत जाईन.

- मराठीचा वापर ही टिंगलटवाळी करण्याची, हसण्यावारी नेण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही हे स्वतःला कठोरपणे समजावेन.

- मराठीचा आग्रह धरताना टेबलला काय शब्द वापरायचा किंवा रेल्वे हेच वापरणं कसं योग्य इत्यादी प्रकारचे फाटे फोडून आशय भरकटवणार नाही.

- शक्य नसेल त्याचा नंतर विचार करेन आणि शक्य आहे त्याचा व्यवहार लगेच सुरू करेन.

शिवचिंतन

काल थोडं शिवचिंतन करण्याची संधी मिळाली. त्यातील काही बिंदू -

१) हिंदू म्हणून काही अस्तित्वात आहे की नाही अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मशाल पेटवली. अन जिथे हिंदू म्हणून बोट ठेवायला जागा नव्हती त्या नकाशावर एक चिंचोळी पट्टी का होईना, हिंदू म्हणून मिळवली.

२) आता फक्त अंतिम संस्कार बाकी आहे अशा अवस्थेतील हिंदूंचं सिंहासन निर्माण केलं. पण हे करताना हिंदूपणाची दोन लक्षणे : सर्वेपि सुखीन: संतु आणि एकं सत विप्रा: बहुधा वदंती, यांचा त्याग केला नाही.

३) त्यांच्या शत्रूनेच केलेल्या नोंदीप्रमाणे, लूट वा युद्ध करताना हाती लागलेले कुराण; महाराज पवित्र भावनेने आपल्या मुस्लिम शिपायाकडे देत असत.

४) केळशीच्या याकूब बाबांचे आशीर्वाद महाराजांनी घेतले होते.

५) महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने उद्गार काढले होते - 'शत्रूची स्त्री हाती लागल्यावर तिची बेअब्रू न करता तिला परत पाठवणारा महामानव देवाघरी गेला.'

६) लढाई वा लुटीच्या वेळी कोणत्याही प्रार्थना मंदिराला धक्का लावू नये, असे महाराजांचे आदेश असत. त्यांनी सैन्यात हजारो पठाण व मुस्लिम घेतले होते. त्यांचा पायदळाचा पहिला सरसेनापती नूरखान होता. कोणीही दगाफटका केला नाही. मदारी मेहतरला सिंहासनाच्या पूजेचे काम दिले.

७) तिरुनेलवल्ली येथील महादेवाचे मंदिर पाडून बांधलेली मशीद हटवून महाराजांनी तिथे पुन्हा मंदिर बांधले.

८) धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांनी वरचा रस्ता दाखवला.

९) अन्याय व अधर्माचा प्रतिकार करताना कोणाचाही द्वेष केला नाही, सूड घेतला नाही, स्वतः अन्याय व अधर्म केला नाही.

१०) द्वेष, सूड, अन्याय, अधर्म न करताही हिंदूपद पातशाही उभी केली. तीही इतकी ऊर्जावान की, त्या चिंचोळ्या पट्टीचा विस्तार होत आज हिंदू म्हणून, काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते मणिपूर अस्तित्वात आहे.

११) आम्ही अमुक गमावले, तमुक गमावले यापेक्षा; सगळंच गेल्यानंतर आम्ही काय काय कमावले असाही विचार करता येऊ शकतो. उरलेले कमावू शकतोच आणि विस्तारही करू शकतो.

११) हाती शून्य असताना आणि आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी विपरीत परिस्थिती असताना; आपले हिंदुपण, त्या हिंदुपणातील सद्गुण सोडून देण्याची गरज महाराजांना वाटली नाही; हिंदू म्हणून असलेला सद्गुण समुच्चय न सोडता त्यांनी त्याला पुनः जीवन मिळवून दिले. मग हाती खूप काही असताना आपल्याला आपल्या सद्गुणांचं ओझं का वाटतं?

१२) यश प्रयत्नांचं असतं तसंच ज्यासाठी प्रयत्न करायचे त्या तत्त्वांच्या, त्या भावांच्या; सत्यतेचं, शुद्धतेचं अन सात्विकतेचंही असतं. कदाचित बौद्धिक तर्कविचारांनी हे पटवून देता येणं कठीण असेल; पण म्हणून ते असत्य ठरत नाही. बौद्धिक तर्कटे बाजूला सारून सत्य समजून घेण्याची आमची शक्ती आणि क्षमता आपल्याला वाढवावी लागेल.

१३) द्वेषरहित, चिंतारहित होऊन सदधर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा महाराज आणि भवानी साऱ्यांना देवो.

(सगळे संदर्भ : शककर्ते शिवराय, श्री. विजय देशमुख)

- श्रीपाद कोठे

१३ जून २०२२

रविवार, ११ जून, २०२३

साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...

१९७० च्या दशकात हृषिकेश मुखर्जी आणि गुलजार या जोडीचा 'गुड्डी' नावाचा चित्रपट आला होता. त्या गाजलेल्या चित्रपटाची सुरुवातच एका गोड प्रार्थनागीताने होते. ते लोकप्रिय गीत आहे - हम को मन की शक्ती देना... या गाण्यात एक अर्थपूर्ण ओळ आहे - साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर... धर्माच्या नावाने झालेला लुटालूट, बलात्कार, हत्या, स्थलांतर यांचा अंगावर शहारे आणणारा अधर्म ज्या व्यक्तीने स्वतः पाहिला आणि अनुभवला त्या संपूर्णसिंह कालरा उर्फ गुलजार यांनी या ओळी लिहिल्या आहेत. मानवी संवेदनांचा तळस्पर्शी ठाव घेणारे गुलजार यांची उठबस धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या वर्तुळातच आहे. अशा गुलजार यांनी लिहिले आहे - साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...

हे आठवण्याचं कारण आहे सध्या सुरू असलेला धर्मदंडाचा वाद. एकीकडे धर्म शब्दाची कावीळ झालेले कोल्हेकुई करीत आहेत तर दुसरीकडे बहुसंख्य असे आहेत ज्यांना आपण लढाई जिंकली यातच आनंद आणि रस आहे. ज्या दंडाची काल संसद भवनात स्थापना करण्यात आली त्याला धर्मदंड म्हणावे की राजदंड हेही अशा लोकांना अजून नक्की ठरवता आलेले नाही. या गदारोळात एक बारीक स्वर पुरातन भारतीय परंपरेचा आठव करून देतो आहे. तो महत्त्वाचा आहे. राजा, राज्यव्यवस्था यांच्यावर धर्मदंडाचा अंकुश असायला हवा ही ती भारतीय परंपरा. त्यात असलेल्या विधिनुसार राजा म्हणत असे - मला कोणीही दंड करू शकत नाही. त्यावर धर्मदंड धारण केलेले ऋषी त्याला सांगत - तुला धर्म दंड करू शकतो. तू अदंडनीय नाहीस. हे फार महत्त्वाचे आहे. राजा अदंडनीय नाही. राजा अनिर्बंध नाही. हे अतिशय धैर्याने आणि धाडसाने भारतीय राज्यशास्त्राने फार पूर्वी सांगितले आणि प्रचलित केले होते. यावर कदाचित कोणीही वाद घालणार नाही. उलट याचे स्वागतच केले जाईल. स्वागत केले जायला हवे. प्रश्न फक्त हाच उरतो की, राजाला दंड करणारा धर्म असावा की आणखीन काही. अन् याच ठिकाणी धर्माच्या विरोधकांनी गुलजारजींच्या ओळी लक्षात घ्यायला हव्या. धर्म या शब्दाचा भारताला अभिप्रेत असलेला अर्थ आणि भारतीय जनमानसात रुजलेला अर्थ गुलजार यांनी व्यक्त केलेला आहे. हा अर्थ लक्षात घेतला तर धर्मविरोधकांना देखील धर्माला विरोध करण्याची गरज उरणार नाही.

समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंचा उत्साह थोडा ओसरला असेल तर याही बाबीकडे लक्ष द्यायला हवे की, जुन्या संसद भवनात सुद्धा धर्माचे उच्च स्थान मान्य करण्यात आलेले होतेच. त्या ठिकाणी धर्मदंड नव्हता पण लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या वर धर्मचक्र प्रवर्तनाय अशी अक्षरे होती. नवीन संसदेत धर्म दंड करू शकतो असे आहे तर जुन्या संसदेत धर्मचक्र सुरळीत फिरत ठेवावे असे होते. यात शब्दातील फरक आणि भावनांच्या अभिव्यक्तीचा थोडा फरक सोडला तर एकूण आशय सारखाच आहे. त्यामुळे नवीन संसदेत काही खूपच वेगळे आहे असे समजण्याचे कारण नाही.

हां... एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी की, नवीन संसदेने धर्मासोबत धर्मसंघांना ही स्थान दिले. याने गडबडून जाण्याचे कारण नाही. जसे आत्मा शरीरातून व्यक्त होतो तसेच धर्म हा धर्मसंघातून व्यक्त होतो. त्या बरोबरच हेही खरे की, शरीर म्हणजे आत्मा नाही त्याप्रमाणे धर्मसंघ म्हणजे धर्म नाही. हे नीट समजून घेण्याची गरज आहे. धर्म ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्मसंघातून धर्म अभिव्यक्त व्हायला हवा आणि त्या धर्माने राजदंडावर अंकुश ठेवायला हवा. असे न होता धर्मसंघालाच धर्म समजले गेले आणि धर्मसंघ जर राज्याच्या वळचणीला गेले तर ते हिताचे नसते. त्यांच्यात योग्य अंतर असलेच पाहिजे. धर्मसंघ राज्याच्या वळचणीला गेल्यास धर्म, धर्मसंघ आणि राज्य तिन्हीची हानी आणि स्खलन होते. भारताने असे दोन अनुभव घेतले आहेत. पहिला बौद्ध धर्माचा आणि दुसरा सर्वोदयाचा. राज्याच्या वळचणीला गेल्याने त्यांची वाढ झपाट्याने झाली आणि खूप झाली पण ती स्थायी ठरली नाही आणि त्यांचे मूळ हेतू आणि आवाहनही ते गमावून बसले. राज्याच्या वळचणीला न गेलेले धर्मसंघ शतकानुशतके आपली शक्ती आणि आवाहन कायम राखून आहेत.

दुसरीकडे धर्मसंघ आणि राज्य यांचे ऐक्य तर अधिकच घातक असते. ख्रिश्चन आणि मुस्लिम ही दोन जागतिक तर शीख ही भारतीय उदाहरणे आहेत.

धर्म ही आवश्यक आणि योग्य अशी बाब आहे. धर्म हा धर्मसंघातून व्यक्त होतो पण धर्म म्हणजे धर्मसंघ नाही. धर्माचे राज्यावर नियंत्रण असले पाहिजे. हा धर्म काय आहे ते गुलजारजींनी व्यक्त केले आहे. ते सगळ्यांनीच समजून घेणे हिताचे होईल.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २९ मे २०२३

जुन्या सवयी, जुने संकेत

आपल्या सवयी आणि रोजचं जगणं परिस्थितीनुसार बदलतं, पण मन त्याप्रमाणे बदलत नाही. अनेकदा मनाच्या बदलाला माणूस कळत वा नकळत नकार देतो. त्यामुळे पुष्कळ समस्या, गुंते, त्रास, वाद निर्माण होतात. उदाहरण म्हणून तीन विषय घेता येतील. पूर्वीच्या काळी एकमेकांकडे जाणे, गप्पा मारणे या स्वाभाविक आणि अनौपचारिक गोष्टी होत्या. न सांगता, न कळवता लोक एकमेकांकडे जात. कारण त्यावेळी पुरेसा वेळ होता. प्रत्येकाची कामं, छंद, आवडी इत्यादी मर्यादित होते. व्यवधानं कमी होती. स्वतःसाठी वेळ इत्यादी कल्पना नव्हत्या. एकमेकांबद्दल माहिती होण्याला ते एकच साधन होते. आज या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. माणसाचं मन मात्र; वेळ ठरवून जाणे, कळवून जाणे, भेटणे; हे कृत्रिम आहे असंच म्हणत असतं.

फोनवर बोलणं हेदेखील एक उदाहरण. पूर्वी फोनवर बोलणं हा विषय नव्हताच. पत्र हेच माध्यम होतं. मध्यंतरीच्या काळात फोन वाढले. मग व्यक्तिगत फोन वाढले. त्यावर बोलणं सुरू झालं. मग ती सवय लागली. मग स्मार्टफोन आले. त्यांनी तर व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग सुरू केलं. त्याची एक झिंग तयार झाली. पण प्रत्येक वेळी बोलणं आणि त्यात वेळ घालवणं खरंच गरजेचं असतं का? त्यावरून रागलोभ इत्यादी योग्य असतं का? अनेक गोष्टी पत्रसदृश्य मेसेजने होऊ शकतात. परंतु विस्मृतीत गेलेल्या पत्रामागोमाग पत्रासारख्या मेसेजेसची प्रतिष्ठाही कमी झाली. समोरच्याची अडचण न करता माहितीची देवाणघेवाण करता येत असली तरी मेसेजपेक्षा बोलण्याला लोक प्राधान्य देतात.

तिसरे उदाहरण : आपले प्रेम, आत्मियता व्यक्त करण्याचे एक साधन होते खाऊपिऊ घालणे. त्यातही आज परिस्थिती बदलली आहे. मुळात लोक आधीसारखे थकूनभागुन येतात असे नाही. खाण्यापिण्याच्या सोयी, क्षमता वाढल्या आहेत. लोक त्याबाबत पूर्वीसारखे संकोची राहिलेले नाहीत. तब्येत, आवडी, गरजा, सवयी याही गोष्टी बदलल्या आहेत. तरीही खाण्यापिण्याचे आग्रह, त्याला दिला जाणारा प्रतिसाद यावरून प्रेम, आपुलकी इत्यादी मोजण्याची मानसिकता मात्र कायम आहे. कधीकधी तर हे आग्रह त्रासदायक असतात तरीही माणसे त्यात घुटमळत असतात.

जुन्या सवयी, जुने संकेत बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्यात काहीही वावगे नसते.

- श्रीपाद कोठे

८ जून २०२३

बुधवार, ७ जून, २०२३

Conviction of life

सध्या चर्चाच चर्चा सुरू आहेत. गंमत येते आहे. रंजन पण होतं आहे. क्वचित प्रबोधन पण. चर्चांमधील एक विषय आहे सरसंघचालकांचे ताजे भाषण. त्या भाषणाचे अर्थ, अन्वय, गर्भितार्थ वगैरे समजावले, मांडले जात आहेत. त्यातील राजकारण आणि धोरण (diplomacy) यांचीही चर्चा आहे. पण खरंच ते भाषण धोरणात्मक आहे का? माझे मत नकारात्मक आहे. सगळ्यांना फक्त राजकारण आणि diplomacy एवढंच करायचं असतं असं समजण्याचं कारण नाही. अनेक जण व्यक्ती म्हणून वा समूह म्हणून conviction of life ने चालत असतात. And it pays. एकूणच संघाच्या भूमिका conviction of life मधून येतात. त्या प्रकट करताना वेळ, परिस्थिती यांचा विचार होत नसेल असे नाही. पण sangh means it when it says something. बोलायचे एक, मनात वेगळे असे नसते. अन यासाठी सरसंघचालकांच्या तीस मिनिटांच्या त्या भाषणातील पहिल्या दहा मिनिटांचे भाषण पण महत्त्वाचे आहे. ते जरा तात्त्विक वगैरे असल्याने कोणाला त्याकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यातून विविध अर्थ काढता येत नाहीत. त्यामुळे त्यावर अकटोविकट चर्चा करता येत नाहीत. पण विचारांच्या त्या उंचीपर्यंत गेल्याशिवाय फारसा अर्थबोध होणेही कठीणच असते. एक मात्र खरे की, conviction of life मधून ज्यावेळी काही प्रकट होते तेव्हाच ते परिणामी असते. आपल्याला पटो न पटो. आवडो न आवडो. धोरणात्मक गोष्टी फारच ठिसूळ असतात. स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेत बोलले तेव्हा ते conviction of life होते. धोरण नव्हते. अन त्यामुळेच संबोधनाच्या अवघ्या पाच शब्दांनी सगळा समूह उभा राहून अभिवादन करता झाला. स्वामीजींच्या पाठीशी ना सत्ता होती, ना संपत्ती, ना संघटना. होते ते केवळ सत्यदर्शनातून प्रकट झालेले conviction of life. त्यापुढे कोट्यवधी धोरणेही धराशायी होत असतात.

- श्रीपाद कोठे

८ जून २०२२

मंगळवार, ६ जून, २०२३

न होऊ शकणारे

माझ्यात काहीतरी manufacturing fault च असला पाहिजे. न होऊ शकणारंच काहीबाही सुचत राहतं. आजही असंच...

* राजकीय पक्षांना फक्त निवडणुकीपूर्वी सहा महिने देणग्या स्वीकारता येतील अशी कायदेशीर तरतूद हवी. जेणेकरून पक्षाला दिलेल्या देणग्यांच्या बदल्यात होणारे व्यवहार कमी होतील. कारण निवडणुकीत कोण जिंकणार हा फक्त अंदाज राहील.

* निवडून येणाऱ्या व्यक्तीची संपत्ती कार्यकाळात वाढायला नको. (त्याच्या कार्यकाळातील संपत्तीवाढीवर बंदी.) 'त्याच्या' याचा अर्थ अर्जात ज्यांच्या संपत्तीचा उल्लेख असतो त्या सगळ्यांच्या.

- श्रीपाद कोठे

७ जून २०२२

जबाबदारी मुस्लिम समुदायाची

नुपूर शर्मा यांची टिप्पणी अनावश्यकच नाही तर अयोग्य होती. स्वस्वीकृत सभ्यतेला सोडून होती. पण आता oic चे देश काय किंवा देशातील काही नेते काय; नुपूरला देण्याच्या शिक्षेबद्दल वगैरे जे बोलू लागले आहेत, मागणी करू लागले आहेत ते मर्यादा सोडणारे व आचरटपणाचे आहे. मोहम्मद साहेबांबद्दल अनुद्गार योग्य नाहीतच पण भारतात शरियतचा कायदा नाही व नसेल हे कोणीही विसरू नये. शिवाय यानिमित्ताने 'काफिर' कल्पनेला सोडचिठ्ठी देऊन, आपल्याला जी उदारता आणि आदर हवे आहेत, ती उदारता व तो आदर आपल्या वागण्यात असल्याचे मुस्लिम समुदायानेही दाखवून द्यावे.

- श्रीपाद कोठे

७ जून २०२२

सोमवार, ५ जून, २०२३

विरोध कशाला?

एका प्रामाणिक सज्जनाने विचारलं - तुला काय म्हणायचं तेच कळत नाही. तुझा विरोध कशाला असतो तेच समजत नाही. अर्थकारण असो, समाजकारण असो, राजकारण असो, चालू घडामोडी असो, निसर्ग असो, पर्यावरण असो, मनोरंजन असो... कोणताही विषय असो. लिहितो चांगला वगैरे ठीक पण कशाला विरोध? कशाला समर्थन? काहीच समजत नाही.

त्याला म्हटलं - माझा कशालाच विरोध नसतो. अन कशालाच समर्थन. माझा फक्त अविचार आणि अविवेक यांना विरोध असतो. अर्थात मला जो अविचार आणि अविवेक वाटतो त्याला.

त्याला हे समजलं का माहिती नाही. कारण यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

- श्रीपाद कोठे

६ जून २०२२

परिवर्तन

व्यक्तिगत वा सामाजिक परिवर्तन कसं होतं? आजकाल असं समजलं जातं की, खूप टीका केली, दोष दाखवले, चिकित्सा केली, चूक किंवा बरोबर हे सिद्ध केलं, प्रतिपक्षाला निरुत्तर केलं, विखारी बोललं; की परिवर्तन होऊन जातं. किमान या गोष्टींनी परिवर्तन व्हावं ही अपेक्षा असते. परंतु परिवर्तन असं होत नाही. अन सगळ्याच गोष्टींच्या टपरीछाप चर्चा करूनही परिवर्तन होत नाही. होऊ शकत नाही. अनेक गोष्टींची चर्चा पुरेशा गांभीर्याने करायची असते. टवाळकीच्या सुरात किंवा शेरेबाजी करून नाही. आजच एक सूचना फेसबुकवर वाचली की, टीव्ही चर्चा बंद कराव्या. हे कसे होईल माहिती नाही पण अतिशय सार्थ अशी ही सूचना आहे. टीव्ही चर्चांनी नुकसानच जास्त झाले आहे आणि होते. मुख्य म्हणजे विचार ही एक गंभीर बाब आहे याचा विसरच या चर्चांनी पाडलेला आहे. त्या बंद कशा होतील यावर विचार व्हायला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

६ जून २०२२

रविवार, ४ जून, २०२३

अंतरीचा उमाळा हवा

आज पर्यावरण दिवस. वृत्तपत्रे त्याबाबतच्या बातम्या, लेख यांनी भरून जातील. त्यात वावगे काही नाहीच. किमान निसर्गाची, पर्यावरणाची आठवण जागी ठेवण्याचं काम होतं. हेही नसे थोडके हे खरंच आहे, पण हेही नसे पुरेसे हे त्याहून खरं आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, उपभोग मर्यादित करणे; हेही आवश्यक आणि योग्यच. परंतु हे होत नाही असा आपला अनुभव असतो. कोणत्याही स्थानिक वा जागतिक परिषदांनी ठेवलेले एकही लक्ष्य पूर्ण होत नाही. कारण? कारण या सगळ्याच्या मुळाशी भय आणि कोरडा बुद्धिवाद असतो. जीविचा उमाळा त्यात नसतो. पर्यावरण, निसर्ग याबद्दल हा जीविचा उमाळा उत्पन्न झाला पाहिजे. पंचमहाभूते, झाडे, माती, जीवजंतू, पशुपक्षी, माणसे या सगळ्यांबद्दल आतून प्रेम वाटले पाहिजे. आतून प्रेम वाटणे याचा अर्थ विवेकाला तिलांजली नाही. जीवन जगताना अनेक पण परंतु येतीलच. मात्र प्रेमाचा उमाळा असेल तर -

: स्वतःबद्दल थोडे कठोर होणे, permissible limits ला प्राधान्य न देता आणि त्यांची ढाल न करता त्याकडे अपरिहार्य म्हणून पाहणे, सहनशीलता वाढवणे; इत्यादी करता येईल. नाही तर बहाणेबाजी करून निसर्गाशी शत्रुत्व करणे सुरूच राहील.

: थोडासा पालापाचोळा, अंगाला लागणारी माती यांचा बाऊ न करता आणि सौंदर्याच्या अन आरोग्याच्या चकचकीत कल्पना बाजूस सारून योग्य अयोग्य असा विवेक करता येईल.

: शरीराच्या सुखलोलुपतेला मर्यादित करून शारीरिक श्रमांबद्दलची अनास्था आणि तिटकारा बाजूला सारता येईल.

: जाहिराती, प्रचार, बौद्धिक दहशत मोडीत काढून आपले स्वतःचे मापदंड आणि जीवनशैली विकसित करता येतील.

: सौंदर्यासोबतच प्रतिष्ठा, मानसन्मान, उच्च जीवन, high class यांच्या तकलादू आणि दिखाऊ कल्पना बासनात गुंडाळता येतील.

हे सारे केल्याशिवाय पर्यावरण आणि पर्यायाने आपण संतुष्ट होऊ शकणार नाही. त्यासाठी निसर्ग, पर्यावरण याविषयी आंतरिक उमाळा दाटो हीच प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

५ जून २०२२

शनिवार, ३ जून, २०२३

गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग

आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी आणि उद्या ५ जून. म्हणजे आज तिथीने व उद्या तारखेने, गोळवलकर गुरुजींचा स्मृतिदिन. 'फुल होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक' असं त्यांचं वर्णन करण्यात येतं. त्याचं प्रत्यंतर त्यांच्या जीवनात पाहायलाही मिळतं. बॅ. मुंजे यांच्या स्मारक समितीवर सदस्य म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि बाबू जगजीवनराम यांची संमती मिळवणं काय; किंवा मृत्यूशय्येवर असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, नंतर मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यासारख्या लोकांनी त्यांना भेटायला डॉ. हेडगेवार भवनात येणे काय; 'मित्र होंगे सब विरोधक' याचंच प्रत्यंतर. त्यांच्या तिरोधानाला आज ४९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गुरुजींच्या जीवनातील दोन प्रसंग. दोन वेगळ्या गुणांचं दर्शन घडवणारे.

१) विभाजनानंतर साधारण तीनेक आठवड्यांनी म्हणजे ९ सप्टेंबर १९४७ रोजी कराची शहरातल्या शिकारपूर कॉलोनीतील संघ कार्यालयात बॉम्बस्फोट झाला. त्यासाठी पाकिस्तान सरकारने १९ स्वयंसेवकांना अटक केली. खटला चालला आणि बॅ. खानचंदजी यांना आजीवन कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड, तर बाकीच्यांना प्रत्येकी दहा वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड, अशा शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचा अर्थ होता, या १९ जणांना पाकिस्तानच्या कारागृहातच राम म्हणावे लागणार. संघाचे नेतृत्व यासाठी पुढे सरसावले. भारत आणि पाकिस्तानातील कैद्यांचे हस्तांतरण हाच एक उपाय होता. सरदार पटेल व केंद्रीय प्रशासनाचेही सहकार्य मिळाले आणि कैद्यांच्या हस्तांतरणावर सहमती झाली. पाकिस्तानला भारताच्या कैदेतील जिना यांचे मित्र डॉ. कुरेशी हवे होते. एका कैद्याच्या बदल्यात एक अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. याचा अर्थ कुरेशीच्या बदल्यात बॅ. खानचंद परत मिळणार. पण बाकी १८ स्वयंसेवकांचे काय? श्री. गुरुजी लगेच कामाला लागले. त्यावेळचे पंजाब सरकारचे सचिव भिडे यांच्या सहकार्याने गुरुजी केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्याशी बोलले आणि कैद्यांचे हस्तांतरण व्यक्तीच्या आधारावर न होता केसच्या आधारावर व्हावे अशी भूमिका त्यांना समजावून सांगितली. काकासाहेबांनी देखील त्याला मान्यता दिली आणि फिरोजपूर येथे होणारे कैद्यांचे हस्तांतरण थांबवले. पाकिस्तानला डॉ. कुरेशी कोणत्याही स्थितीत हवा होता. त्यामुळे महिनाभरानंतर पाकिस्तानने केसच्या आधारावर हस्तांतरणास मान्यता दिली आणि सगळे १९ स्वयंसेवक भारतात परत आले. या १९ स्वयंसेवकांपैकी एक नंद बदलाणी यांना ते पाकिस्तानच्या कारागृहात असताना गुरुजींनी पाठवलेले एक गुप्त पत्रही आता उपलब्ध आहे. भारताच्या आणि संघाच्या इतिहासातील हा एक सुवर्णअध्याय आहे. कृष्णघनाची एक रुपेरी कडा आहे.

२) इ. स. १९७२ च्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रवासाअंतर्गत २५ मे रोजी ते ग्वाल्हेरच्या संघ शिक्षा वर्गात पोहोचले. वर्गाचे सर्वाधिकारी रामरतन तिवारी यांनी त्यांना 'राष्ट्र रक्षा के मोर्चे पर' हे नवीनच प्रकाशित झालेले पुस्तक दिले. भारत-पाक युद्धाच्या वेळी संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचे सचित्र वर्णन त्या पुस्तकात होते. पुस्तक पाहून गुरुजी म्हणाले, या प्रकारचे पुस्तक मी स्वीकारू शकत नाही. त्यांनी पुस्तक परत केले. सर्वाधिकाऱ्यांनी तर्क मांडला की, 'या पुस्तकातील सामुग्री भविष्यात इतिहासाचा महत्त्वाचा भाग होईल. याने संघकार्याचा प्रचारही होईल.' गुरुजींचे उत्तर होते - 'कोणी आपल्या आईची सेवा करून त्याची बातमी प्रसिद्ध करेल तर ते उचित होईल का? ते तर स्वाभाविक कर्तव्य आहे. त्यात प्रचार कसला?'

- श्रीपाद कोठे

४ जून २०२२

शुक्रवार, २ जून, २०२३

आपणच आपला जोडीदार

आपण खरंच खूप पुढे आलो आहोत. आता नवीन भगवद्गीता सांगायची वेळ आली आहे. गीता म्हणते - आपणच आपले शत्रू असतो, आपणच आपले मित्र. पण आता या इ.स. २०२२ मध्ये आपण दाखवून दिलं की, आपणच आपला नवरा (किंवा बायको) असू शकतो.

संदर्भ - एक बातमी की, एका गुजराथी मुलीने स्वतःच स्वतःशीच लग्न केले. समारंभपूर्वक. (आता अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला कोण असेल वगैरे शंका नकोत बुवा.) 😀😀

- श्रीपाद कोठे

३ जून २०२२

सत्याच्या मार्गावर

सत्याच्या मार्गावर जपून ठेवावं लागतं पाऊल. पहिल्याच पावलाला नियती उज्वल कोरडेपणा ओटीत घालते. हे अम्लान कोरडेपण वागवावं लागतं अखेरपर्यंत. एखाद्या सम्राज्ञीच्या उन्मत्त डौलाने. समर्थनाच्या चिता पेटवून समर्पणाची धुनी जागवावी लागते प्रत्येक पावलावर. नेत्रांची प्रखर दीप्तीची सवय मोडून काढावी लागते अन करावा लागतो सराव अंधुक प्रकाशातही पाऊल योग्य त्याच ठिकाणी ठेवण्याचा. असमर्थ खांद्यांनी पेलावे लागते सत्याचे जडशीळ ओझे. स्वतःच्या अस्तित्वभारासकट. मेघांची अल्लडता नाही बांधता येत पदरात. मृगजळानेच भागवावी लागते तहान अगणित काळ पिच्छा पुरवणारी. आपल्याच सावलीलाही व्हावे लागते पारखे. विश्रांतीला द्यावी लागते तिलांजली आत्मरक्तात भिजवून. गाडून टाकावी लागते समजूत, आपल्याला कंठ असण्याची. प्रश्नांचे उमाळे दाबून टाकावे लागतात स्वीकाराच्या मृण्मय मृत्तिकेने. त्यातूनच फुटतात कोंब इवलाले सत्याच्या बिजाला. अन पोळलेल्या पावलांना शीतलता देण्यासाठी वाढू लागतो त्याचा वृक्ष. तोवर धरावा लागतो दम. म्हणूनच जपून ठेवावं लागतं पाऊल सत्याच्या मार्गावर.

- श्रीपाद कोठे

३ जून २०२२