रविवार, ११ जून, २०२३

जुन्या सवयी, जुने संकेत

आपल्या सवयी आणि रोजचं जगणं परिस्थितीनुसार बदलतं, पण मन त्याप्रमाणे बदलत नाही. अनेकदा मनाच्या बदलाला माणूस कळत वा नकळत नकार देतो. त्यामुळे पुष्कळ समस्या, गुंते, त्रास, वाद निर्माण होतात. उदाहरण म्हणून तीन विषय घेता येतील. पूर्वीच्या काळी एकमेकांकडे जाणे, गप्पा मारणे या स्वाभाविक आणि अनौपचारिक गोष्टी होत्या. न सांगता, न कळवता लोक एकमेकांकडे जात. कारण त्यावेळी पुरेसा वेळ होता. प्रत्येकाची कामं, छंद, आवडी इत्यादी मर्यादित होते. व्यवधानं कमी होती. स्वतःसाठी वेळ इत्यादी कल्पना नव्हत्या. एकमेकांबद्दल माहिती होण्याला ते एकच साधन होते. आज या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. माणसाचं मन मात्र; वेळ ठरवून जाणे, कळवून जाणे, भेटणे; हे कृत्रिम आहे असंच म्हणत असतं.

फोनवर बोलणं हेदेखील एक उदाहरण. पूर्वी फोनवर बोलणं हा विषय नव्हताच. पत्र हेच माध्यम होतं. मध्यंतरीच्या काळात फोन वाढले. मग व्यक्तिगत फोन वाढले. त्यावर बोलणं सुरू झालं. मग ती सवय लागली. मग स्मार्टफोन आले. त्यांनी तर व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग सुरू केलं. त्याची एक झिंग तयार झाली. पण प्रत्येक वेळी बोलणं आणि त्यात वेळ घालवणं खरंच गरजेचं असतं का? त्यावरून रागलोभ इत्यादी योग्य असतं का? अनेक गोष्टी पत्रसदृश्य मेसेजने होऊ शकतात. परंतु विस्मृतीत गेलेल्या पत्रामागोमाग पत्रासारख्या मेसेजेसची प्रतिष्ठाही कमी झाली. समोरच्याची अडचण न करता माहितीची देवाणघेवाण करता येत असली तरी मेसेजपेक्षा बोलण्याला लोक प्राधान्य देतात.

तिसरे उदाहरण : आपले प्रेम, आत्मियता व्यक्त करण्याचे एक साधन होते खाऊपिऊ घालणे. त्यातही आज परिस्थिती बदलली आहे. मुळात लोक आधीसारखे थकूनभागुन येतात असे नाही. खाण्यापिण्याच्या सोयी, क्षमता वाढल्या आहेत. लोक त्याबाबत पूर्वीसारखे संकोची राहिलेले नाहीत. तब्येत, आवडी, गरजा, सवयी याही गोष्टी बदलल्या आहेत. तरीही खाण्यापिण्याचे आग्रह, त्याला दिला जाणारा प्रतिसाद यावरून प्रेम, आपुलकी इत्यादी मोजण्याची मानसिकता मात्र कायम आहे. कधीकधी तर हे आग्रह त्रासदायक असतात तरीही माणसे त्यात घुटमळत असतात.

जुन्या सवयी, जुने संकेत बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्यात काहीही वावगे नसते.

- श्रीपाद कोठे

८ जून २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा