रविवार, ११ जून, २०२३

साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...

१९७० च्या दशकात हृषिकेश मुखर्जी आणि गुलजार या जोडीचा 'गुड्डी' नावाचा चित्रपट आला होता. त्या गाजलेल्या चित्रपटाची सुरुवातच एका गोड प्रार्थनागीताने होते. ते लोकप्रिय गीत आहे - हम को मन की शक्ती देना... या गाण्यात एक अर्थपूर्ण ओळ आहे - साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर... धर्माच्या नावाने झालेला लुटालूट, बलात्कार, हत्या, स्थलांतर यांचा अंगावर शहारे आणणारा अधर्म ज्या व्यक्तीने स्वतः पाहिला आणि अनुभवला त्या संपूर्णसिंह कालरा उर्फ गुलजार यांनी या ओळी लिहिल्या आहेत. मानवी संवेदनांचा तळस्पर्शी ठाव घेणारे गुलजार यांची उठबस धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या वर्तुळातच आहे. अशा गुलजार यांनी लिहिले आहे - साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर...

हे आठवण्याचं कारण आहे सध्या सुरू असलेला धर्मदंडाचा वाद. एकीकडे धर्म शब्दाची कावीळ झालेले कोल्हेकुई करीत आहेत तर दुसरीकडे बहुसंख्य असे आहेत ज्यांना आपण लढाई जिंकली यातच आनंद आणि रस आहे. ज्या दंडाची काल संसद भवनात स्थापना करण्यात आली त्याला धर्मदंड म्हणावे की राजदंड हेही अशा लोकांना अजून नक्की ठरवता आलेले नाही. या गदारोळात एक बारीक स्वर पुरातन भारतीय परंपरेचा आठव करून देतो आहे. तो महत्त्वाचा आहे. राजा, राज्यव्यवस्था यांच्यावर धर्मदंडाचा अंकुश असायला हवा ही ती भारतीय परंपरा. त्यात असलेल्या विधिनुसार राजा म्हणत असे - मला कोणीही दंड करू शकत नाही. त्यावर धर्मदंड धारण केलेले ऋषी त्याला सांगत - तुला धर्म दंड करू शकतो. तू अदंडनीय नाहीस. हे फार महत्त्वाचे आहे. राजा अदंडनीय नाही. राजा अनिर्बंध नाही. हे अतिशय धैर्याने आणि धाडसाने भारतीय राज्यशास्त्राने फार पूर्वी सांगितले आणि प्रचलित केले होते. यावर कदाचित कोणीही वाद घालणार नाही. उलट याचे स्वागतच केले जाईल. स्वागत केले जायला हवे. प्रश्न फक्त हाच उरतो की, राजाला दंड करणारा धर्म असावा की आणखीन काही. अन् याच ठिकाणी धर्माच्या विरोधकांनी गुलजारजींच्या ओळी लक्षात घ्यायला हव्या. धर्म या शब्दाचा भारताला अभिप्रेत असलेला अर्थ आणि भारतीय जनमानसात रुजलेला अर्थ गुलजार यांनी व्यक्त केलेला आहे. हा अर्थ लक्षात घेतला तर धर्मविरोधकांना देखील धर्माला विरोध करण्याची गरज उरणार नाही.

समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंचा उत्साह थोडा ओसरला असेल तर याही बाबीकडे लक्ष द्यायला हवे की, जुन्या संसद भवनात सुद्धा धर्माचे उच्च स्थान मान्य करण्यात आलेले होतेच. त्या ठिकाणी धर्मदंड नव्हता पण लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या वर धर्मचक्र प्रवर्तनाय अशी अक्षरे होती. नवीन संसदेत धर्म दंड करू शकतो असे आहे तर जुन्या संसदेत धर्मचक्र सुरळीत फिरत ठेवावे असे होते. यात शब्दातील फरक आणि भावनांच्या अभिव्यक्तीचा थोडा फरक सोडला तर एकूण आशय सारखाच आहे. त्यामुळे नवीन संसदेत काही खूपच वेगळे आहे असे समजण्याचे कारण नाही.

हां... एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी की, नवीन संसदेने धर्मासोबत धर्मसंघांना ही स्थान दिले. याने गडबडून जाण्याचे कारण नाही. जसे आत्मा शरीरातून व्यक्त होतो तसेच धर्म हा धर्मसंघातून व्यक्त होतो. त्या बरोबरच हेही खरे की, शरीर म्हणजे आत्मा नाही त्याप्रमाणे धर्मसंघ म्हणजे धर्म नाही. हे नीट समजून घेण्याची गरज आहे. धर्म ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्मसंघातून धर्म अभिव्यक्त व्हायला हवा आणि त्या धर्माने राजदंडावर अंकुश ठेवायला हवा. असे न होता धर्मसंघालाच धर्म समजले गेले आणि धर्मसंघ जर राज्याच्या वळचणीला गेले तर ते हिताचे नसते. त्यांच्यात योग्य अंतर असलेच पाहिजे. धर्मसंघ राज्याच्या वळचणीला गेल्यास धर्म, धर्मसंघ आणि राज्य तिन्हीची हानी आणि स्खलन होते. भारताने असे दोन अनुभव घेतले आहेत. पहिला बौद्ध धर्माचा आणि दुसरा सर्वोदयाचा. राज्याच्या वळचणीला गेल्याने त्यांची वाढ झपाट्याने झाली आणि खूप झाली पण ती स्थायी ठरली नाही आणि त्यांचे मूळ हेतू आणि आवाहनही ते गमावून बसले. राज्याच्या वळचणीला न गेलेले धर्मसंघ शतकानुशतके आपली शक्ती आणि आवाहन कायम राखून आहेत.

दुसरीकडे धर्मसंघ आणि राज्य यांचे ऐक्य तर अधिकच घातक असते. ख्रिश्चन आणि मुस्लिम ही दोन जागतिक तर शीख ही भारतीय उदाहरणे आहेत.

धर्म ही आवश्यक आणि योग्य अशी बाब आहे. धर्म हा धर्मसंघातून व्यक्त होतो पण धर्म म्हणजे धर्मसंघ नाही. धर्माचे राज्यावर नियंत्रण असले पाहिजे. हा धर्म काय आहे ते गुलजारजींनी व्यक्त केले आहे. ते सगळ्यांनीच समजून घेणे हिताचे होईल.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २९ मे २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा