रविवार, ३१ जुलै, २०२२

अनाठायी अपेक्षा

समतेच्या तत्त्वाने केलेला एक घोळ म्हणजे- प्रत्येकाची प्रकृती लक्षात न घेता सगळ्यांमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे गुण असलेच पाहिजेत हा अट्टाहास. त्यातल्या त्यात क्षत्रिय आणि वैश्य वृत्ती फोफावल्याने ब्रम्ह गुणांची उपेक्षा, उपहास, हेटाळणी व्हायला लागली आहे. व्यवहारचातुर्य हा एकच मापदंड सगळ्यांनी ठेवावा ही भिकार अपेक्षा आहे.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१८

विचार

आजकाल अनेकदा अनेक जण चाणक्य तोंडावर फेकतात. पण गड्यांनो, चाणक्यनीती ही राजा आणि राज्यकारभार यांच्यासाठी होती/ आहे.

तुमच्या माझ्यासाठी नितीशतक होते/ आहे.

विचार नावाच्या विचारशून्य कालव्याने आपण वेढून गेलेले आहोत. बाहेर पडायला हवं रे गडयांनो. विचार म्हणजे भूमिका नाही. राजकीय भूमिका तर नाहीच नाही. विचार म्हणजे उत्तर देणे नाही, उत्तर शोधणे. विचार म्हणजे समजून घेणे. विचार म्हणजे निर्णयाचे समर्थन नव्हे. विचार म्हणजे समाधानाची जुळवाजुळव नव्हे. विचार ही गुदगुल्या करणारी, गोड गोड गोष्ट नव्हे.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१९

विनोदाचा स्तर

'टवाळा आवडे विनोद' हे समर्थांचं वचन त्रिकालाबाधित आहे. लोक काय कशावरही दात काढतात, काढू शकतात. पण विनोद करणाऱ्याला अक्कल असावी की नसावी? थट्टा कशाची करायची, कशी करायची, किती करायची, स्तर काय असावा? हे मनात येण्याचं कारण म्हणजे सोनी मराठीवर नुकतंच सादर झालेलं प्रहसन. फार लिहिणार नाही. स्वतः पाहून अधिक जाणून घ्यावं. पण त्यात शास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीताचे गायक यांची ज्या पद्धतीने थट्टा करण्यात आली आणि सगळे दात काढून हसत होते; ते लाजिरवाणे आणि नीच या पातळीचं होतं. त्यासाठी त्यांचा कितीही निषेध केला तरी तो थोडाच ठरेल. अत्यंत संतापजनक प्रकार होता. अन निर्लज्जपणे 'गंमत म्हणून पाहावं' वगैरे उपदेश नको किंवा सारवासारव नको. अत्यंत निंदनीय. Lowest of the lower level.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०२१

शनिवार, ३० जुलै, २०२२

एकांत

गेले चार महिने जग घरात डांबलं गेलं आहे. त्याने अस्वस्थही झालं आहे. बाकी जगाचं ठीक पण अध्यात्माचा वारसा सांगणाऱ्या, 'जेणे सुखे रुचे, एकांताचा वास; नाही गुणदोष अंगा येत' असं सांगणाऱ्या तुकारामांच्या आम्हा वारसांना एकांत असह्य का होतो? एकांताची भीती का वाटते? एकांत असह्य का होतो? कारण आम्ही आध्यात्माबद्दल बोलत असलो तरीही त्याला जगण्याचा भाग करू शकलेलो नाही. स्वामी विवेकानंद म्हणत असत - धर्म, आध्यात्म ही टेबलवर ठेवण्याच्या फुलदाणीसारखी शोभेची वस्तू नाही. तो जीवनाचा भाग व्हायला हवा. अर्थात आध्यात्म हा जीवनाचा भाग होण्यासाठी मन आत वळावं लागतं. 'आपुलाची वाद आपणासी' हे सुरू व्हावं लागतं. अन हा स्वतःचा स्वतःशी वाद सोपा नाही. जगातल्या कोणत्याही लौकिक संघर्षापेक्षा अधिक भीषण संघर्ष या आत्मसंवादात सुरुवातीला असतो. यालाच माणूस घाबरत असावा. त्यामुळे तो एकतर त्याकडे वळत नाही किंवा वळला तरी लगेचच माघारी येतो. बाहेर उड्या मारणाऱ्या मनाला, वृत्तींना, सवयींना, इंद्रियांना, विचारांना आत वळवून, आतील अनंत अवकाश कवेत घेण्यापेक्षा; बाहेर उड्या मारणं सोपं आणि बरं वाटतं. मग एकांत असह्य होतो. जिज्ञासा, चौकशा, कर्तेपण अशा विविध नावांनी या उड्या सुरू असतात. अर्थात हे सत्य आहे की, हे अस्तित्व दृश्य आणि अदृश्य अशा दोन धारांनी प्रवाहित होते. दोन्ही सत्य, योग्य आणि आवश्यक. परंतु दृश्य प्रवाह सतत परिवर्तनशील आणि क्षणांचा प्रवाह असतो. अदृश्य प्रवाह अपरिवर्तनीय आणि अखंड असतो. मात्र अदृश्य प्रवाह धरून ठेवणे मोठ्या कष्टाचे काम असते. त्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यांनाच साधना म्हणतात. परंतु बहुसंख्य मानव त्याऐवजी दृश्य प्रवाह जवळ करतो. मग त्याला एकांत त्रासदायक ठरतो. भेटणं, बोलणं, फिरणं, पाहणं अशा गोष्टी अपरिहार्य ठरतात. त्याशिवाय जगणं कठीण होतं. अगदी प्रचलित मानसशास्त्र सुद्धा (जे अभारतीय आहे) एकांतसेवन करणाऱ्याला मनोरुग्ण किंवा मनाने दुबळा इत्यादी ठरवतं. विचार, वृत्ती आणि व्यवस्था हे सगळेच एकांताला दुय्यम वा हीन ठरवतात. त्याचाच परिणाम आहे की जगभरात आता कोरोनामुळे आलेल्या बंधनांना झुगारून देणे वाढते आहे. एकांत असह्य होतो आहे. हेही तितकेच खरे आहे की, एकांत जबरदस्तीने करावयाची बाब नाही. तो आतून हवासा व्हावा लागतो, विकसित व्हावा लागतो. कोरोना असो वा नसो; एकांतात फुलणे, एकांताची गोडी, एकांताची गरज आणि आवश्यकता; मानवी जीवनाला अधिक परिपूर्ण करते. किमान आध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भारतात तरी हे पुरेसे स्पष्ट असायला हवे.

- श्रीपाद कोठे

३१ जुलै २०२०

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

जाहीर आव्हान

जाहीर आव्हान (आवाहन नव्हे, आव्हान)

आव्हानाची भाषा माझ्या प्रकृतीला साजेशी नाही. मी तशी भाषा करत नाही. तशी भाषा करू नये असं माझं मतही आहे. पण आज मी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक हे आव्हान देतो आहे. प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी, प्रत्येक गोष्टीची दुसरीही बाजू असते, त्यामुळे प्रतिक्रिया देऊ नये, रागावू नये, फाशी वगैरे सारख्या शिक्षा देऊ नये, कोणत्याही गोष्टीसाठी आग्रही असू नये, दुष्टतेला विरोध करतानाच दृढतेलाही विरोध करावा, दुष्टतेला विरोध करणेही चुकीचे, सगळ्यांना सगळ्या वेळी माफ करावे, वगैरे वगैरे सारखे तर्क आणि युक्तिवाद करणाऱ्या सगळ्या वयाच्या, सगळ्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तरातल्या, मान्यताप्राप्त किंवा हौशी- सगळ्या महिला पुरुषांना माझे आव्हान आहे-

त्यांनी एकाच पद्धतीने वागणारा, विचार करणारा, १०० टक्के विचारी, १०० टक्के सज्जन, १०० टक्के प्रामाणिक समाज तयार करून दाखवावा. तो काही काळ टिकवून दाखवावा आणि मग आपली मते मांडावीत. असे करू शकत नसल्यास तोंडाला कुलूप घालावे हे बरे.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०१५

प्रतिनिधी

अगदी आता आतापर्यंत, अन अजूनही अनेकदा प्रश्न विचारला जातो की, रा. स्व. संघ किंवा संघसृष्टीतील संस्था या काय हिंदू समाजाच्या प्रतिनिधी आहेत का? त्या आहेत की नाहीत तूर्त बाजूस ठेवू, पण गोमांस किंवा तशा इतर प्रकरणी हिंदू समाजातल्या सगळ्या दुर्दैवी, नकारात्मक गोष्टींसाठी मात्र एकमेव संघ कसा काय दोषी ठरतो? तेच चांगल्या गोष्टींसाठी मात्र त्याला श्रेय दिले जात नाही. एकदाचे ठरवा म्हणावे, तुम्ही संघाला हिंदू समाजाचा प्रतिनिधी मानता की नाही? एकीकडे म्हणायचे तुम्ही काही हिंदू, हिंदुत्व यांचे ठेकेदार नाही अन सोयीने दोषारोपण करायचे ही दुटप्पी भूमिका झाली.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०१७

जिल्ह्यांचा विकास

देशातील एकूण जिल्ह्यांपेक्षा खासदारांची संख्या अधिक आहे. आमदार वेगळे. आमदार, खासदार नसणारे जिल्हा व राज्यस्तरीय नेते वेगळे. त्या त्या जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि राज्य व जिल्हा स्तराचे नेते यांनी आपापल्या जिल्ह्यात प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या दहा सर्वांगपूर्ण शिक्षण संस्था, दहा सर्वांगपूर्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालये, दहा सर्वांगपूर्ण बाजारपेठा पुढच्या दहा वर्षात विकसित केल्या तर अर्धेअधिक प्रश्न सुटून जातील. आरक्षण वगैरेची गरजही उरणार नाही. जागा, पैसा, यंत्रणा, सामुग्री कशाचीही अडचण या कामी येऊ शकत नाही. फक्त पायाभूत काम झाल्यावर काम करण्यासाठी कुशल माणसांचा प्रश्न येऊ शकतो. पण पायाभूत कामे होईपर्यंत ते तयार होऊ शकतात. गरज आहे फक्त प्रामाणिक इच्छेची. अन राजकारणाची होळी करण्याची.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०१८

शैक्षणिक धोरण

नवीन शैक्षणिक धोरणावर गंभीर वा गमतीची प्रतिक्रिया एका दिवसात देणे तर अशक्य. पण वरवर पाहिल्यानंतर मनात आलेली एक गोष्ट. कलेचे विषय शाळेतील मुख्य शिक्षणाचा भाग होणार आहेत. फक्त कार्यानुभव नावाचा काहीतरी शिकवले हे दाखवणारा वेळ घालवण्याचा प्रकार नाही. हे चांगले आहे. मात्र कला - संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय... जे जे काही असेल; त्यात काय काय शिकवले जाणार? त्यात जर पाश्चात्य कलांचा भरणा, पाश्चात्य कलांचे तत्वज्ञान, कलेच्या नावाचा धांगडधिंगा, चित्रपटप्रसूत कला, चित्रपटांची गाणी अन त्यावरील ड्यान्स; असेच राहिले तर कठीण तर होईलच पण कलाविषय प्रमुख अभ्यासात समाविष्ट करण्याचा उद्देशही विफल होईल.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०२०

सुख

 दुसऱ्यांच्या सुखात सुखी होणे.

आपलं स्वतःचं सुख.

------

दोन्ही खरं असतं अन आवश्यकही. दुसऱ्यांच्या सुखात सुखी होण्याची भावना नसेल तर व्यवहारात तर अडचणी येतातच, पण आपलं माणुसपण ऱ्हास पावतं. अन आपलं स्वतःचं सुख (आपलं रमणं, आपलं विश्व) नसेल तर उभं राहायला आधारच उरत नाही. सोबतच दुसऱ्यांच्या सुखात सुखी होण्याची, सहभागी होण्याची शक्ती आणि शक्यताही उरत नाही. या दोन्हीच्या कक्षा व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असतात. साचेबद्ध नसतात. त्यातून मार्ग काढत जाताना माणूस प्रगल्भ होत जातो. कोणत्याही एकाचा अट्टाहास योग्य म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०२०

वेगळी माणसे

९०-९५ टक्के लोकांचं आयुष्य, त्यांचं जगणं साधारण सारखं असतं. सुख दु:खाचं कमीअधिक प्रमाण, संघर्षाचे टप्पे, संघर्षाचे विषय इत्यादीत थोडं इकडे तिकडे असू शकतं; पण जगण्याचा आशय आणि दिशा सारखी असते. काही थोड्या माणसांच्या बाबतीत मात्र जगण्याचा आशय आणि दिशा कधी थोडी तर कधी खूप वेगळे असतात. झोपणं, उठणं, जेवणखाण, तब्येत अशा पुष्कळशा बाह्य बाबी सारख्याच दिसतात. वरवर सारख्या असतातही. पण त्या गोष्टींचं स्थान, त्यावरचा भर, त्याबाबतचे आग्रह, प्राधान्य हे खूप वेगळे असतात. अन या व्यावहारिक बाबींशिवाय जे काही जगणं असतं ते तर अजिबातच वेगळं असतं. त्यांचे विचार, त्यांची दृष्टी, त्यांचं भावजीवन याची ९०-९५ टक्क्यातील माणसे कल्पनाही करू शकत नाहीत. या मूठभर निराळ्या लोकांची म्हणूनच फरपट होत असते. वेगळी प्रतिभा, वेगळी प्रज्ञा, वेगळ्या प्रेरणा यांनी आकार घेणारी अशी माणसे समजणं, समजून घेणं जवळपास दुरापास्त असतं. This is a creative minority. अनेकदा ९०-९५ टक्के सामान्य माणसांना त्यामुळे अपमानास्पद वाटतं. हे मूठभर लोक स्वतःला फार शहाणे समजतात असा ग्रह त्यातून निर्माण होतो. यातून उपहास, तिरस्कार, द्वेष, अढी या गोष्टी जन्म घेतात. यावर एकच उपाय असतो. तो म्हणजे, ९०-९५ टक्क्यांनी स्वतःला हे नीट समजावणे की, काही लोक वेगळे असतात. अमुक अमुक वेगळा आहे किंवा वेगळी आहे. बाकी समजून वगैरे घेणं जेवढं होईल तेवढं होईल. अन ते नाही झालं तरीही फरक पडत नाही. किंबहुना समजून घेण्याचा आग्रह वगैरे नसावाच. कारण कोण कोणाला समजून घेऊ शकतो? समजून घेणे ही मुळातच फार मर्यादित गोष्ट आहे. माणसांच्या वेगळेपणाची जाणीव आणि त्याचा स्वीकार हे मात्र सगळ्यांनाच करता येण्यासारखे आहे. तीच माणसाच्या परिपक्वतेची एक कसोटीही आहे.

- श्रीपाद कोठे

३० जुलै २०२१

बुधवार, २७ जुलै, २०२२

दखल

केरळ सरकारने फास्ट फुडवर साडेचौदा टक्के अतिरिक्त कर लावला आहे. त्यामुळे लोक लठ्ठ होत असल्याने, त्यांची काळजी घेण्यासाठी. आमची पापड, लोणची, भजी, समोसे, कचोरी हे सुद्धा फास्ट फुड आहे असाही तर्क ऐकला. म्हणजे सध्या पिझ्झा, बर्गर वर लावलेला अतिरिक्त साडेचौदा टक्के कर या पदार्थांवर देखील लावणार का? हे लोण महाराष्ट्रात आले तर (अन दीडशहाणे NGO इत्यादी लोकांचे भले करण्याच्या नावाने यासाठी प्रयत्न करू शकतात. चळवळी करू शकतात, जनहित याचिका करू शकतात.) वडापाववर देखील लावणार का कर? आज किमान अर्धी मुंबई वडापाव खाते. किती जण लठ्ठपणाने ग्रासले आहेत? शेकडो वर्षे पापड, लोणची खाऊन किती लोक लठ्ठ झाले आहेत? बालीशपणाला सीमाच नाही. हे सारे अभ्यास, निरीक्षणे अन सर्वेक्षणे करून वैज्ञानिक पद्धतीने चालले असल्याने बोलण्याची सोय नाही. जय वैज्ञानिकता !!! अन सरकारे काय... त्यांना तर जनहितासाठी तत्पर राहावेच लागते ना?

आज लठ्ठपणाने ग्रस्त असलेले तीन कोटी लोक समजा उद्या सकाळीच हे जग सोडून गेले तरी सरकारला वा जनहिताची काळजी वाहणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना काय करायचे आहे? त्यांचं काय जातं? मेले तर मेले. एखाद्याची कृती जोवर फक्त त्याच्यावरच परिणाम करते तोवर अन्य कोणी त्यात किती दखल द्यायची याचा विचार करायला हवा. प्रबोधन, एक-दोनदा समजुतीच्या गोष्टी सांगणे यापलीकडे त्याचे त्याच्यावर सोडून द्यावे. हां एखादी गोष्ट फारच महत्वाची वाटत असेल तर त्यासाठी सामाजिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न व्हावा. पण व्यक्तिगत जीवनात फार जास्त दखल योग्य ठरूच शकत नाही.

केरळात फास्ट फुड तर महाराष्ट्रात हेल्मेट... एकच तऱ्हा... `... का भाई ...' हे बरोबर नाही.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०१६

चक्र

`चक्र’ या गोष्टीला भारतीय जीवनात महत्वाचं स्थान आहे. जीवनचक्र, निसर्गचक्र, ऋतुचक्र, स्वरचक्र, विचारचक्र, नियतीचक्र. हे सगळं जसं चक्रीय आहे तसंच अर्थचक्रही आहे, असतं, असायला हवं. भारतेतर जगाने जीवनाचा विचार असा चक्रीय केलेला नाही. त्यांचा जीवनविचार एकरेषीय आहे. अगदी संगीत पाहिलं तरी समेवर येणे हा भाग त्यात नाही. प्रारंभ आणि अंत यांना जोडण्याची कल्पनाच नाही. त्यामुळे खूप फरक पडलेला आहे. चक्राचं एक वैशिष्ट्य असतं. जसा आकाशपाळणा. त्याची वर जाण्याची सीमा असते आणि खाली येण्याचीही सीमा असते. त्या सीमेपेक्षा वर अथवा खाली चक्र जाऊ शकत नाही. ही चक्रीयता हा निसर्गनियम आहे. तो ध्यानात घेऊन जीवनाची आखणी हा भारताचा विशेष होता. अर्थचक्र हा त्याचाच भाग. या चक्राची जाणीवपूर्वक नीट व्यवस्था नाही केली तरीही ते आपोआप क्रियाशील असतं. असं आपोआप क्रियाशील असणं जरा त्रासदायक ठरतं. आधुनिक अर्थविचाराने चक्रीय अर्थविचाराऐवजी एकरेषीय अर्थविचार स्वीकारला. त्याचा परिणाम म्हणजेच २००८ चे अमेरिकेतील सबप्राईम संकट, ग्रीसची दिवाळखोरी, ब्राझीलची अन्नान्न दशा किंवा अगदी चीनची सद्यस्थिती. संपत्तीच्या असमान वाटपाची जी मोठी समस्या जगभरात निर्माण झाली आहे त्याचे कारणच चक्रीय विचाराचा अभाव हे आहे. भारताने जातीव्यवस्थेच्या प्रयत्नातून संपत्तीचा अतिरिक्त संचय आणि एकरेषीय वाढ यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला असेल का? व्यवसायांना मर्यादित करून संपत्ती निर्मितीचे विकेंद्रीकरण केले असेल का? या अंगानेही विचार करता येईल. अन हा विचार कल्पनेतला विचार नाही. कोकणसंदर्भातील खोत कायद्यावर मुंबई विधीमंडळात झालेल्या चर्चेच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केले ते याबाबत काही दिशा नक्की देऊ शकते. त्यावेळी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, इथल्या जाती व्यवस्थेने आमच्यावर कितीही अन्याय केले असले तरीही जगण्यासाठी संपत्तीचा काही ना काही वाटा आजही आमच्याजवळ आहे तो त्यामुळेच. (त्यांच्या भाषणाचा आशय दिला आहे.) विज्ञान, तंत्रज्ञान, साधने, जीवनपद्धती, जीवनदृष्टी, काळ; या सगळ्याच्या संबंधात जातीव्यवस्थेचा वेगवेगळ्या अंगाने विचार करता येऊ शकतो. अर्थात त्याला अभ्यास एवढेच महत्व असणार. परंतु संपत्तीची एकरेषीय वाढ आणि असमान वितरण या समस्यांना उत्तर देण्यासाठी अर्थ या विषयाचा चक्रीय विचार करणे गरजेचे आहे एवढे मात्र नक्की.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०१९

मंगळवार, २६ जुलै, २०२२

ऊर्जा

हे विश्व म्हणजे फक्त ऊर्जेचं रूपांतरण तेवढं आहे; हे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, बोलतो, लिहितो. पण एक बारीकशी बाब ध्यानातून सुटून जाते. ती म्हणजे - ऊर्जा ही kinetic (व्यक्त, सक्रिय, गतिशील) आणि latent (अव्यक्त, निष्क्रिय, स्थिर) अशा दोन प्रकारची असते. प्रकार याचा अर्थ, दोन स्वतंत्र ऊर्जा अस्तित्वात असतात असे नाही. दोन प्रकार म्हणजे एकाच ऊर्जेची दोन लक्षणे. मात्र आपल्या विचारविश्वात, वेगळा विचार करीपर्यंत, ऊर्जा म्हणजे kinetic ऊर्जा एवढेच असते. बरेचदा आपल्या विचार करण्यावर आणि समजून घेण्यावर या गोष्टीची मर्यादा येते आणि गोंधळ, संभ्रम, संघर्ष, तटस्थता, निराशा इत्यादींचा सामना करावा लागतो. ऊर्जा याचा अर्थ kinetic आणि latent असा दोन्ही, हे सतत ध्यानात राहणं अधिक श्रेयस्कर.

- श्रीपाद कोठे

२७ जुलै २०१९

रविवार, २४ जुलै, २०२२

विकास - विनाश

वृक्ष जन्माला येतो तेव्हा बीज नष्ट होतं. त्याकडे दोन प्रकारे पाहता येतं. बीजाचा विकास म्हणून आणि बीजाचा विनाश म्हणून. विकास म्हणून पाहिलं तर सार्थकता आणि परिपूर्णता अनुभवास येते. विनाश म्हणून पाहिलं तर निरर्थकता आणि शून्यता अनुभवास येते. `बीज' म्हणून बीजाचा विनाश होतो खरा पण जीवमान चैतन्य म्हणून ते झाडाच्या रुपात कायम असतं. झाड लयाला जाऊन बीज उरतं तेव्हाही असंच घडतं.

गर्भाचं गर्भत्व नष्ट होतं आणि मूल जन्मास येतं. मुलाचं मूलपण नष्ट होऊन युवक जन्म घेतो. युवकाचं युवापण लयास जाऊन प्रौढत्व जन्म घेतं. `काल' नष्ट होऊन आज जन्माला येतो. दृश्य अशा आकाराप्रमाणेच मनही नवीन आकार धारण करतं. कालचं मन आज असणार नाही, आजचं उद्या नसेल.

दृश्य वा अदृश्य, आकार वा निराकार, सतत परिवर्तन म्हणजेच जीवन. या परिवर्तनाकडे विनाश म्हणून पाहिलं तर विफलता हाती येते. अन विकास म्हणून पाहिलं तर पूर्णता. फक्त एकच आहे- विकास म्हणून पाहण्यासाठी लयास न जाणाऱ्या- बीजात आणि वृक्षातही कायम असलेल्या- गर्भावस्थेपासून प्रौढत्वापर्यंत न बदललेल्या- आणि त्यानंतरही कायम राहणाऱ्या जीवमान चैतन्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

- श्रीपाद कोठे

२५ जुलै २०१४

शनिवार, २३ जुलै, २०२२

गुरू

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाज माध्यमांवर अनेक पोस्ट पाहण्यात आल्या. त्यात थोड्याशा पोस्ट निराळ्याही होत्या. जे. कृष्णमूर्ती, गाडगेबाबा यांना उद्धृत करून गुरू वगैरे नकोत/ नसावेत असं सांगत विरोधी सूर लावणाऱ्या. त्याला काहीच हरकत नाही. सगळ्यांनी गुरू ही गोष्ट मानलीच पाहिजे असं नाही. पण सहज मनात आलं - आपलं मत मांडताना कृष्णमूर्ती किंवा गाडगेबाबा किंवा आणखीन कोणाचे दाखले देणं हे एका अर्थी गुरूतत्त्वाला, गुरूभावाला मान्यताच देणं नाही का? आधुनिक विचारपद्धतीमुळे माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीच बिघडवल्या आहेत. त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल. कारण कळत वा नकळत 'गुरू' आयुष्यात असतातच आणि त्यांच्याबद्दल स्वाभाविक आदर आणि कृतज्ञता ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. १+१= २ इथपासून तर समग्र अस्तित्वाच्या कोड्यापर्यंत आपल्या असंख्य जीवनजाणिवा विकसित करतात ते गुरू. हे गुरू कोण टाळू शकणार? कोण नाकारू शकणार? बाकी फसवणूक, बुवाबाजी वगैरे वेगळे विषय. ते सगळीकडेच असतात अन ते चूकच आहे. पण त्यासाठी गुरू या विषयाबद्दल नकारात्मकता बरोबर वाटत नाही. अर्थात प्रत्येकाचा आपापला विचार.

आध्यात्मिक विकासाच्या (जाणीव विकासाच्या) एका टप्प्यावरही भक्त, भक्ती, भगवान; ध्येय, ध्याता, ध्यान हे सगळं एकच होतं. तिथे गुरू शिष्य वेगळे कुठे राहणार? व्यावहारिक शास्त्रातही विकासाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यावर मागचे गुरू सुटत जातातच. प्रसंगी irrelevant सुद्धा होतात. पण कच्चा माल अन finished product हा फरकही समजून घ्यायला हवाच नं. कच्च्या माणसाचा पिकलेला माणूस तयार होण्यातली गुरुची भूमिका डोळ्याआड करून कसे चालेल?

- श्रीपाद कोठे

२४ जुलै २०२१

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

विचार

वैचारिक युद्ध असा शब्दप्रयोग पुष्कळदा वापरला जातो. पण असं वाटतं की, हा शब्दप्रयोग योग्य आहे का? योग्य ठरेल का? कारण विचार ही सतत विकसित होणारी आणि उलगडत जाणारी बाब आहे. ती एकदा बांधून टाकली की मग, विचारांचा गट तयार होतो आणि असे पुष्कळ गट तयार झाले की, त्यांच्यात वर्चस्वासाठी युद्ध/ संघर्ष होतो/ होतात. हा संघर्ष गटाचा असतो. वर्चस्वासाठी असतो. वर्चस्व प्रस्थापित करणे हा त्याचा हेतू आणि उद्देश असतो. यात विचारांचा बळी जातो. एखादा मुद्दा, एखादा विषय, एखादी व्यक्ती याभोवती व्यूह तयार होतात. या व्यूहाच्या समर्थनार्थ तर्क, युक्तिवाद सुरू होतात. मग बुद्धी ही विचारांऐवजी व्यूहासाठी वापरली जाऊ लागते. विचार गुदमरत जातात. लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, भगव्या; सगळ्या रंगांची ही स्थिती पाहायला मिळते. व्यूहात सापडलो की दृष्टी त्या व्यूहाच्या परिघाच्या बाहेर जात नाही, जाऊ शकत नाही, जाऊ दिली जात नाही. कारण न दिसणाऱ्या मनात त्याची बीजं असतात. ती बीजं वर्चस्वाची असतात शोधकाची नसतात. बाकी सगळ्याच शास्त्रांप्रमाणे विचारशास्त्रातही शोधाचा कंटाळाच असतो. त्यापेक्षा काही केल्याचे समाधान देणारा व्यूह बरा वाटतो. व्यूहाच्या परिघाबाहेरील व्यक्ती, घटना, कृती, शब्दावली, विषय, मुद्दे, प्रतिके नाकारली जातात. पुढे जाऊन हे नकार हेच वादविषय होतात. विचार गाडले जाऊ लागतात. मग आत्ममंथन वगैरे होते पण तेही त्या परिघात आणि परिघापुरते.

झाड जसे निसर्गातून हवे ते घेऊन झाडच राहते, वाढत जाते, विस्तार पावते. विचारही असाच वाढत, विस्तारत, विकसित होत जायला हवा. विचारांच्या वृक्षांऐवजी विचारांची डबकी होतात आणि विचार मरणपंथाला लागतात. विचारशील प्राणी म्हणून गौरव असणाऱ्या मानवाची आजची अवस्था कमीअधिक अशीच डबक्यासारखी आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २३ जुलै २०२०

गुरुवार, २१ जुलै, २०२२

माणूस resource नाही

देशभक्ती, सामाजिकता इत्यादींच्या आजच्या अनेक कल्पना, धारणा या युरोपिय प्रबोधनकाळ आणि दोन जागतिक महायुद्धे यांचा परिणाम आहेत. इस्लाम, ख्रिश्चन आणि औद्योगिक साम्राज्यवाद यांचाही त्यात वाटा आहे. या कल्पना आणि धारणा दूर करण्याची गरज आहे.

माणूस हा समाजाचा एक घटक आहे हा विचार याच धारणेचा परिणाम आहे. यातूनच पुढे human resources हा प्रकार आला. माणूस हा कशाचाही resource नाही. तो मूलतः एक स्वयंपूर्णता आहे. अन त्याचे जीवन हे पुन्हा एकदा ती स्वयंपूर्णता प्राप्त करण्याचा प्रवास आहे. समाज आणि त्याच्या साऱ्या व्यवस्था त्याच्या या प्रवासाला साहाय्य करण्यासाठी असायला हव्यात. दुर्दैवाने आज त्या तशा नाहीत. याच्या मुळाशी गेल्या काही शतकातील, वर नमूद केलेल्या बाबी आहेत. माणूस हा आर्थिक व राजकीय प्राणी तर नाहीच, पण तो सामाजिक प्राणीही नाही. त्याचं स्वरूप आणि प्रयोजन (खरं तर सगळ्या चराचराचंच स्वरूप व प्रयोजन) निराळं आहे. मात्र त्याचं प्राणी स्वरूप हेच मध्यवर्ती मानल्याचा परिणाम विचारपद्धती, ध्येयधोरणे, नियोजन, कायदे, न्यायव्यवस्था, रचना, पद्धती अशा सगळ्याच बाबींवर झाला आहे.

माणसाचा जीव हीसुद्धा एक commodity मानली जाते यापेक्षा वेगळे दुर्दैव ते कोणते? कदाचित पटणार नाही, गंमत वाटेल; पण हेल्मेटसक्ती किंवा सेल्फीबंदी किंवा हरित लवादाचे निर्णय इत्यादी गोष्टी देखील याच चुकीच्या मार्गाचा परिणाम आहेत.

- श्रीपाद कोठे

२२ जुलै २०१६

माणूस

- माणूस सगळं काही करू शकतो.

- माणसाला अशक्य असं काहीही नाही.

- मनात आणलं तर कुठलीही गोष्ट शक्य असते.

- माणूस करू शकत नाही असं काहीच नाही.

- सगळं काही आपल्या करण्यावरच अवलंबून असतं.

इत्यादी इत्यादी इत्यादी...

याचं खूप गुणगान केलं गेलं आहे. त्यामुळे माणसाचं धैर्य, प्रयत्नवाद वगैरे किती साधलं हा वेगळा विषय आहे.

पण यामुळे अधीरता, निराशा, अस्वस्थता, आक्रमकता, अनीती, संवेदनशून्यता, अविचार, उन्माद, अशांती इत्यादी गोष्टी वाढवल्या आहेत.

- श्रीपाद कोठे

२२ जुलै २०२१

बुधवार, २० जुलै, २०२२

मनस्वीता

काल लिहिलेला `right to privacy' हा लेख वाचून एका परिचिताचा फोन आला. सर्वप्रथम तर लेख पूर्ण अन बारकाईने वाचल्याबद्दल त्याला धन्यवाद. त्याने एक मुद्दा मांडला- तुम्ही दिलेली उदाहरणे ठीक आहेत, पण दोन चार साधूसंत निर्माण व्हावेत यासाठी व्यवस्था असावी का? त्याचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि त्यावर स्वतंत्रपणे लिहावे एवढा मोठा अन मुलभूत आहे. त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया येथे देत नाही. त्याच्याशी जी चर्चा करायची ती केली. पण काल जे लिहिले त्यालाच पूरक असा जो भाग त्याच्याशी बोललो तो फक्त येथे नमूद करणार आहे. कारण त्याच्या मनात आलेला प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो.

अवास्तव आणि अत्यधिक नियंत्रण, देखरेख, नजर, लक्ष; या गोष्टी केवळ आध्यात्मिक विकासासाठी चुकीच्या आहेत असे नाही. गो. नी. उपाख्य आप्पासाहेब दांडेकर यांच्यासारखे उत्तुंग प्रतिभेचे लोक, चित्रपट सृष्टीतील घर सोडून पळून आलेले असामान्य प्रतिभावंत कलाकार यासारखे विविध क्षेत्रातील अनेकांना प्रशासनाने पकडून घरी पाठवले असते, तर समाजाचे केवढे मोठे नुकसान झाले असते? आपण अशी कल्पना करूनसुद्धा पाहत नाही. एवढेच नाही तर आपण घरात सुद्धा मुलांना किंवा कोणालाही चुकू देतो अन त्यातूनच त्या व्यक्तीचा विकास होतो. प्रत्येक वेळी नुकसान किंवा risk इत्यादीचे भय दाखवून त्याला बांधून टाकत नाही. किमान टाकू नये. जे असे बांधून टाकतात त्यांची वाढ खुंटून जाते. अगदी तेच मुलभूत तत्व व्यापक सामाजिक स्तरावर सुद्धा लागू होते. चूक, मर्यादा, मागे पडणे, खाली पडणे, आळस, त्रुटी; अशा सगळ्या गोष्टींचे व्यक्ती जीवनात आणि सामाजिक जीवनात सुद्धा महत्व असते. तीच खऱ्याखुऱ्या विकासाची पाऊलवाट आणि तोच राजमार्गही असतो. फार साचेबद्ध, केंद्रित व्यवस्था चुकीचेच असतात. आज `विमा' compulsary करण्याची चर्चा होत असते. गांधीजींनी त्यांचा असलेला विमा रद्द करून टाकला होता, जेव्हा त्यांना ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्राचे महत्व जाणवले. ही मनस्वीता आहे. अन मनस्वीपणाचे एक स्वतंत्र मूल्य आहे. मनस्वीपणाशिवाय प्रतिभा, प्रज्ञा, प्रेरणा उमलू शकत नाहीत. अन त्या उमलल्या नाहीत तर, व्यक्तीची अन समाजाचीही अधोगतीकडे वाटचाल होते. जी आज सुरु आहे. लगेच `आज सुरु आहे' म्हटल्याने भाजप वगैरे डोक्यात येऊ देऊ नये. कारण हा त्यापेक्षा खूप मोठा विषय आहे.

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

सोमवार, १८ जुलै, २०२२

हिंदू विश्व

२०२० साली भारत आणि २०३० साली जग हिंदू राष्ट्र होणार, या अशोकजी सिंघल यांच्या वाक्याने चर्चा सुरु झाली. त्यात चूक काय आहे? अन जणू काही अशोकजींनी म्हटले म्हणूनच असे काही होणार आहे. अशोकजींनी म्हटले काय वा न म्हटले काय; किंवा विहिंप, संघ वा अशाच अन्य संघटना यांनी म्हटले काय वा न म्हटले काय... सगळे जग हिंदू होणारच आहे. कोणी म्हटल्याने वा केल्याने नाही तर जगाची तीच नियती आहे म्हणून. कोणीच ती बदलू शकत नाही. हां त्यासाठी प्रयत्न केल्यास थोडे लवकर ते घडून येईल अन त्या लोकांना अन संघटनांना थोडेबहुत श्रेय मिळेल. पण कल्पना करा की उद्या या संघटना वा ही माणसे नसली किंवा त्यांनी काम करणे थांबवले तरीही जग हिंदू होणार हे विधिलिखितच आहे.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०१५

बच्चूजी

आज सकाळी बच्चूजी गेले. चैत्र सुरू झाल्या झाल्या एक मोठा अपघात झाला आणि सुमारे साडेतीन महिने झुंज देऊन आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बच्चूजी हेच त्यांचं जनपरिचित नाव. ते गणिताचे प्राध्यापक आहेत वा होते, हे सगळ्यांना माहिती होतं, पण प्रा. अनंत वासुदेव व्यवहारे म्हटलं तर थोड्याच लोकांना बोध होत असे. बच्चूजी म्हटलं की मात्र काही सांगण्याची गरज नसे.

नागपूरच्या मोहता विज्ञान महाविद्यालयात त्यांनी बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना अनेक दशके गणित शिकवलं. त्यावेळी त्या महाविद्यालयात गणित शिकवणाऱ्या तज्ज्ञांची नक्षत्रमालिका होती. सगळेच विलक्षण बुद्धिमान, हुशार आणि शिकवण्याची हातोटी असणारे होते. परंतु बच्चूजी वगळता बाकीचे फक्त गणित या विषयापुरते राहिले. बच्चूजींचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी गणित तर धरून ठेवलंच पण ते त्याहून खूप मोठे झाले. प्रचलित गणित हा तर त्यांचा विषयच पण स्वतःच्या व्यासंगातून त्यांनी वैदिक गणितात मिळवलेली तज्ञता विलक्षण होती. वैदिक गणित हा स्वतंत्र विषय आकारास येण्यात ज्या लोकांचे योगदान आहे त्यात बच्चूजी वरच्या स्थानावर आहेत. यानिमित्त त्यांनी भारतभर आणि विदेशातदेखील भ्रमंती केली होती.

गणितज्ञ हे त्यांचे एक रूप होते. ते संघाचे ज्येष्ठ कार्यकर्तेही होते. नागपूर प्रांत कार्यवाह पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. संघाच्या संघ शिक्षा वर्गांचे तिन्ही वर्षांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. संघ शिक्षा वर्गात शारीरिक आणि बौद्धिक दोन्हीचे शिक्षक म्हणून अनेक वर्षे ते असत. संघ शिक्षा वर्गाचे मुख्य शिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. वेत्रचर्म हा त्यांचा विषय होता. खड्ग आणि छुरिका हे जुन्या आखड्यांचे विषय जाऊन त्या जागी वेत्रचर्म आले होते. पुढे वेत्रचर्मची जागा नियुद्धाने घेतली.

मी संघ शिक्षा वर्गाचे प्रथम वर्ष केले तेव्हा ते वर्गाचे मुख्य शिक्षक होते. एक दिवस सकाळच्या संघस्थानाच्या वेळी वेत्रचर्मच्या कालांशात ते गण घ्यायला आले. प्रत्येकाशी ते वेत्रचर्म द्वंद्व खेळले. त्या विषयात ते निष्णात होतेच. त्या विषयाचा अभ्यास होता. आम्ही नुकतीच सुरुवात केली होती. पण खेळताना त्यांनी हा भेद बाजूला ठेवला होता. त्यामुळे आम्ही जरा घाबरून घाबरून खेळत होते. ते मात्र बरोबरीचा प्रतिस्पर्धी असल्याच्या थाटात खेळत होते. पण कालांश संपल्यावर त्यांनी त्याचे कारण सांगितले. ते म्हणाले - 'तुमच्या मनातली भीती जावी म्हणूनच मी आक्रमक खेळलो. मीच जपून खेळलो तर तुम्ही तयार कसे होणार?' वेत्रचर्म हे तसे भलतेच प्रकरण होते. त्यात चामड्याची ढाल वेत्राचा आघात रोखण्यासाठी असली तरी, वेत्र खूप लवचिक असल्याने हलत असे, त्या ढालीवरून घसरतही असे किंवा ढाल भलतीकडे राही आणि वेत्र सपकन लागत असे. बरं एक वेळ दंड लागला तर फार काही होत नसे पण वेत्र लागले तर दिवसभर हुळहुळत राही. कधी वार जोरदार असेल तर सालटं निघत असे. त्या दिवशी त्यांच्याशी खेळताना हातावर सपकन वार बसला होताच. अर्थात मग मिठी मारून, 'काही होत नाही रे' म्हणून सांत्वनपण होतेच.

घोष विभागातही ते होते. सत्तरीच्या घरात असूनही अगदी गेल्या वर्षीच्या विजयादशमी उत्सवात ते शंखवादक म्हणून उपस्थित होते. ते नागपूर प्रांताचे कार्यवाह असताना एके वर्षी दसऱ्याला पहाटेपर्यंत धोधो पाऊस झाला. उत्सवाच्या थोडा वेळ आधी पाऊस थांबला त्यामुळे उत्सव ठरल्याप्रमाणे कस्तुरचंद पार्कवर पार पडला. अर्थात पूर्ण वेळ उभं राहून. प्रथेप्रमाणे मुख्य उत्सवापूर्वी पथसंचलन झाले. त्यावेळी बच्चूजी अन्य काही स्वयंसेवकांसोबत बादल्यांनी मैदानात साचलेले पाणी काढत होते.

आधी वडिलांशी परिचय आणि नंतर माझ्याशी. ते भाग कार्यवाह होते. त्यावेळी मी मंडल कार्यवाह होतो. त्याआधी शाखेचीही जबाबदारी. त्यामुळे घरी येणेजाणे होतेच. मोठी बहीण त्यावेळी मोहता महाविद्यालयात शिकत होती. तिला गणित शिकवणारे प्राध्यापक आपल्या घरी येतात. तेही हाफपॅन्ट घालून. थट्टा विनोद करतात. हसतात, हसवतात याची मौज वाटत असे. थोडं वेगळंही वाटत असे. मग ते सारं रुळत गेलं. त्या येण्याजाण्यातच हे लक्षात आलं की, बच्चूजी अफाट वाचतात. नंतर लक्षात येत गेलं की हे अफाटपण काय आहे. गणित आणि वैदिक गणितच नव्हे तर; कथा, कादंबऱ्या, कविता, युद्ध, विज्ञान, धर्म, पुराणे, चरित्र, इतिहास, भूगोल; अक्षरशः असंख्य प्रकार आणि असंख्य प्रकारची पुस्तके. त्यांचा पुस्तकांचा संग्रह देखील मोठा होता. एकदा पुस्तकांनी भरलेल्या मोठाल्या लाकडी पेट्या त्यांनी दाखवल्या होत्या. त्यावेळी संघ कार्यकर्त्यांच्या संदर्भात वाचनाचा, ज्ञानाचा हा व्यासंग निराळा होता.

विनोदी स्वभावाच्या बच्चूजींचा विनोद मिश्कीली या सदरात बसणारा होता. निर्विश होता. गुदगुल्या करणारा होता. मुख्य म्हणजे स्वतःवर सुद्धा विनोद करण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. सभ्यता आणि संतपणाचा अतिरेकी मुखवटा घालून फिरण्याच्या आजच्या काळात तर त्यांचे हे स्वभाव वैशिष्ट्य फारच लक्षणीय वाटत असे. बोलण्यात ही मार्मिकता होती. 'गाण्यासाठी आवाज कसा नसावा आणि तरीही भावपूर्ण गाणे कसे असावे याची दोन उदाहरणे आहेत. एक सुरेश भट आणि दुसरे तुकडोजी महाराज' हे त्यांचे निरीक्षण होते. गणित आणि संघ यासोबतच सुरेश भटांच्या 'रंग माझा वेगळा'ला सुद्धा त्यांची उपस्थिती राहत असे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सुद्धा ते दिसत. अंगी एवढ्या कळा असतानाही दर्शन मात्र अगदी साधेसुधे. थोडी हिंमत करायची तर कधीकधी थोडे गबाळेच. सुरुवातीला बजाज स्कुटर आणि नंतर लुनावर फिरताना त्यांना पाहणाऱ्याला हा मोठा माणूस असेल असे वाटणार सुद्धा नाही असे व्यक्तिमत्व. स्वतःहून पुढे पुढे करणे नाही. संघाच्या कामातून निवृत्त झाल्यावरही विना निमंत्रण अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना आपणहून जात. मधल्या वा मागच्या खुर्चीवर बसत. कार्यक्रम संपला की, शांतपणे बाहेर पडत. कोणी ओळखीचं भेटलं तर मस्त गप्पा मारत पण याला त्याला भेटून 'मी अमुक अमुक' वगैरे काही नाही. कधी भेट झाली की म्हणत, 'आता तू मोठा पत्रकार, विचारवंत वगैरे झाला आहे. तुझ्याशी सांभाळून बोलावे लागेल.' पण यात टोमणा वा तिरकसपणा कणभरही नव्हता. ज्येष्ठतेचे कौतुक होते. अनेक विषयांचा अभ्यास, वाचन असलेल्या बच्चूजींचा उपयोग समाजाने करून घ्यावा तसा करून घेतला नाही असे कधीकधी वाटते. गणित सोडून अन्य विषयांसाठी त्यांना कधी कोणी बोलावले नाही. हे व्हायला हवे होते. लेखन हा त्यांचा पिंड नव्हता. मी त्यांना म्हणतही असे, 'बच्चूजी तुम्ही लिहा.' ते फक्त हसून पाठीवर थाप मारीत.

साध्या, निगर्वी, ज्ञानसाधक, हसमुख, तपस्वी अशा बच्चूजींना विनम्र श्रद्धांजली.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १९ जुलै २०१९

मस्कचा आग्रह

मास्कचा आग्रह असावा पण न लावणाऱ्यांवर कडक कारवाई वगैरे पटत नाही.

- अगदी शीर्ष व्यक्तींपासून अनेक जण भाषण, बैठक, उद्बोधन, वेबिनार आदी करताना मास्क खाली करतात. म्हणजेच बोलताना मास्क comfortable नसतो/ नसू शकतो. हे लोक बंद खोलीत असतात. एकटे वा थोडे असतात हेही खरे. पण बोलताना comfortable नसणे ही समस्या फक्त बंद खोलीत असू शकते का? दुकानात सुद्धा बोलताना आणि बोललेलं ऐकताना वा convey होताना अडचण असूच शकते. शिवाय फिरायला जाताना स्वाभाविकच श्वास जलद होतो. त्यावेळी मास्क सोयीचा नाही. उलट मास्कमुळेच श्वास घेणे कठीण होऊ शकते. छोटीशी ऋतूबदलाची सर्दी असेल तरीही त्यावेळी मास्क गैरसोयीचाच. पुष्कळ सायकलस्वारही बिचारे मास्क लावून पायडल दामटताना दिसतात. त्यामागे आजाराची भीती असतेच पण पोलिसांची भीतीही असते. हे अमानवीय आहे. कोरोनाची काळजी आता भीतीत बदलली आहे. हे योग्य वाटत नाही.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०१९

गटारी

चार मराठी वृत्त वाहिन्या पाहिल्या. त्यातील तीन वाहिन्यांनी 'गटारी अमावस्या' असा शब्दप्रयोग केला. एका वाहिनीने मात्र श्रावण सुरू होण्याचा आदला दिवस असे शब्द वापरले. मुद्दा मांसाहार, दारू हा नाही. पण पारंपरिक पवित्र दिवसाचं पावित्र्य, त्यातील भाव; यांचं जाणूनबुजून विडंबन; त्या भावाला जाणूनबुजून पायदळी तुडवण्याची वृत्ती; त्या गंभीर भावाची जाणूनबुजून मस्करी; हा मुद्दा आहे. त्यामुळेच हा शब्द वापरणारे आणि त्याला उचलून धरणाऱ्या वृत्तवाहिन्या यांचा त्रिवार निषेध. अन हीच भावना जर मनात असेल तर त्या लोकांनी तरी श्रावण पाळावाच का? खरं तर श्रावण पाळणाऱ्या आणि त्यासाठी अमावास्येला जिभेचे चोचले पुरवून घेणाऱ्या लोकांनीच 'गटारी' या शब्दाला विरोध करायला हवा. अन्यथा त्यांच्या श्रावण पाळण्याला काहीच अर्थ नाही.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०२०

रविवार, १७ जुलै, २०२२

`वाटण्या'च्या पलीकडे

`वाटणे', `वाटले' हे फार विचित्र, विक्षिप्त आणि भोंगळ शब्द आहेत. कधीकधी मी म्हणतोही की, हे शब्द प्रत्येकाने आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत. घोळ, गोंधळ, गैरसमज, अपसमज, फसवणूक या व अशा गोष्टी या `वाटणे'तून जन्माला येतात. रोजच्या जीवनातसुद्धा आपण हा अनुभव घेतो. `मला वाटलं तू येताना अमुक काम करून येशील' हे वाक्य कित्येकदा उच्चारले जाते. यात काम करून येशील याचा अर्थ- बिल भरून येशील, निरोप सांगून येशील, भेट घेऊन येशील, भाजी घेऊन येशील, कटिंग करून येशील, किराणा घेऊन येशील, बँकेत जाऊन येशील; किंवा अक्षरश: काहीही असू शकतो. या `वाटणे'मध्ये नेमकेपणा नसतो, निश्चितपणा नसतो, सांगून/ बोलून/ विचारून येणारी स्पष्टता नसते. सगळे काही अध्याहृत. मनातल्या मनात. मनातल्या मनात असलेली गोष्ट योग्यही असू शकते, अयोग्यही; चुकीची असून शकते, बरोबरही. वाटणे याला काहीही आधार नसतो. अन त्यातूनच गोंधळ होतो.

हीच वाटण्याची क्रिया सामूहिक स्तरावर सुद्धा पाहता येते. त्यातून एक आभास उत्पन्न होतो, दुसरे काहीही नाही. आता शुभेच्छांचीच गोष्ट घ्या. आज ईद आहे. सगळीकडे ईदच्या शुभेच्छांची भरमार आहे. या शुभेच्छा देणाऱ्यांच्या मनात खरंच ईद विषयी काही भावना आहेत का? फार थोड्या असतील. पण त्याचा मुख्य उद्देश असतो, मुस्लिम बांधवांना बरे वाटावे. आता या वाटण्याला काही अर्थ असतो का? असूच शकत नाही. केवळ आभास की, ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. देणाऱ्यालाही वाटते शुभेच्छा दिल्या अन ज्यांना दिल्या जातात त्यांनाही वाटते की, शुभेच्छा देणारे आमच्या सोबत आहेत, आमचे आहेत. खरंच असं शुभेच्छा देऊन एकमेकांचं होता येतं का? ईद निमित्त मुस्लिमांनी मुस्लिमांना शुभेच्छा देणं समजण्यासारखं आहे. देणारा आणि घेणारा दोघांच्याही विशिष्ट भावना असतात. हिंदूंनी हिंदूंना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात दोघेही एकाच पातळीवर असतात. असं सगळ्याच बाबतीत म्हणता येईल. त्यात देणारा वा घेणारा यांना केवळ `वाटणे' अभिप्रेत नसते. त्याहून अधिक ठोस अशी भावना असते. ही ठोस भावनाच खऱ्याखुऱ्या एकतेचा वा मानवतेचा आधार आहे. जसे वाटणे ही गोष्ट दोन व्यक्तींना जोडू शकत नाही. उलट गोंधळ, अपसमज निर्माण करते किंवा दुरावाही निर्माण करते तसेच, केवळ एकमेकांना वाटण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी ऐक्य उत्पन्न करू शकत नाहीत.

गमतीचा भाग म्हणजे, अशा शुभेच्छा वगैरेंची देवाणघेवाण केली नाही तर परस्परात दुरावा वा शत्रुत्व आहे असे आपण सहजपणे समजून चालतो. खरे तर गणेशोत्सवात अहिंदूंना किंवा ईदेच्या दिवशी गैर मुस्लिमांना खूप हर्ष वगैरे न होणे ही अगदी सामान्य बाब आहे. धर्म बाजूला ठेवून सामाजिक स्तरावर सुद्धा असेच म्हणता येईल. आंबेडकर वा फुले वा सावरकर वा नेहरू वा गांधीजी यांच्याबद्दल प्रत्येकाच्या भावना सारख्याच नाही राहू शकत. आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे यासाठी प्रत्येकाच्या प्रतिमा वा प्रतिकांना उरीपोटी कवटाळणे किंवा डोईवर घेणे आवश्यक नसते. पण आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे; या गोष्टी दाखवण्यासाठी तसे केले जाते आणि तसे केले तरच आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे; या गोष्टी खऱ्या आहेत असे मानले जाते. ईदच्या शुभेच्छा दिल्या तरच मुस्लिमांना वाटते की अन्य लोक आमचे आहेत. गणेशोत्सव साजरा केला की हिंदूंना वाटते हे लोक आमचे आहेत. डॉ. आंबेडकरांची किंवा महात्मा गांधींची प्रतिमा लावली की त्या त्या गटांना वाटते की हे आमचे आहेत किंवा आमचा सन्मान झाला. या सगळ्यातील कृत्रिमता, उथळपणा सूर्यप्रकाशाएवढा स्पष्ट आहे. प्रतिमा व प्रतिकांचा उपयोग करणाऱ्यांमध्ये ५-१० टक्के लोक असे असू शकतात जे विविध प्रामाणिक कारणांनी त्यांचा उपयोग करतात. पण या प्रतिमा, प्रतिकांच्या द्वारेच आपुलकी, जबाबदारी आदी निश्चित होते असे दोन्ही बाजूंना `वाटणे' हे मात्र फसवे असते. आपण व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून सुद्धा या आभासमय `वाटण्या'च्या पलीकडे जाण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, १८ जुलै २०१५

श्रावणात घननीळा

श्रावणाला अजून अवकाश असला तरीही आज श्रावणासारखा उन पावसाचा खेळ अनुभवायला मिळतो आहे. त्यानिमित्त, येणाऱ्या श्रावणासाठी-

आकाशवाणीच्या मराठी रसिकांची श्रावणगाठ मंगेश पाडगावकरांच्या `श्रावणात घननीळा'शी पडली नाही, असं होणं अशक्य आहे. सांजधारा, गीतगंगा यासारख्या कार्यक्रमातून लतादीदींच्या स्वरातील हे गीत रसिकमनांसाठी अनेकवार सादर झालं आहे. मोहवून गेलं आहे. पाडगावकरांच्या ऐन उमेदीच्या दिवसातील हे काव्य आजही आपली टवटवी कायम राखून आहे. आजही श्रावण म्हटला की, `श्रावणात घननीळा' आठवलेच पाहिजे. `श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीमधारा... उलगडला झाडातून अवचित, हिरवा मोरपिसारा...' या धृवपदातून एक नाजूक निसर्गचित्रच डोळ्यापुढे उभे राहते. श्रावणातला निळा मेघ बरसतो. तो कोसळत नाही आणि पडतही नाही. या दोन्हीच्या मधली त्याची स्थिती आहे. त्यात कोसळण्याचा जोशही आहे आणि हळुवार पडण्याची कोमलताही. या पर्जन्यधाराही हव्याहव्याशा रेशमी ! अशा धारा बरसत असताना एखादा मोर एकेक पाऊल टाकत, डौलदार हिरवा पिसारा फुलवत सामोरा येतो... अचानक... आणि तो नुसताच दिसत नाही तर उलगडत जातो. एखाद्या भरजरी शालूची गर्भरेशमी पदरघडी उघडताना उलगडावा तसा... श्रावणातल्या रानाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य या गीतातील या चित्रमयी ओळींच्या ठायी निश्चितच आहे.

प्रत्येकी तीन ओळींच्या चार कडव्यांच्या या गीतात बाह्य निसर्गाचं रंगरूप चित्रण आणि मानवी मनोभावांची तरल, अलवार अभिव्यक्ती यांचं अनोखं मिश्रण अनुभवता येतं. आसुसून, जागून, डोळ्यात प्राण आणून ज्या गोष्टीची माणूस वाट पाहतो ती लाभल्यानंतरचा सौख्यसोहोळा दारी आलेल्या श्रावणातून कवी अनुभवतो आणि मग श्यामविरही राधेला श्याममिलनानंतर येणारा अनुभव त्याच्या वाट्यास येतो. जिकडेतिकडे एकच घनश्याम भरून राहिलेला... `तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम' अशी अवस्था होऊन जाते. या लडिवाळ श्यामरंगात बुडून जाताजाताच मग कवीच्या ओठावर, उदारहस्ते सारं सौंदर्य सृष्टीला बहाल करणाऱ्या त्या उदारधीचं नाव येऊ लागतं आणि पाडगावकरांचं हे काव्य नकळत एका अनाम उंचीवर जाऊन पोहोचतं.

श्रावणाच्या आगमनाने झालेल्या आनंदाचा पहिला भर ओसरल्यावर मग कवीच्या संवेदनशील मनाला रानावनाचा, निसर्गाचा, रंग, गंध आणि त्याचे विभ्रम खुणावू लागतात. घटकेत पावसाची सर, घटकेत उन्हाचा कवडसा, त्यात उमटणारे इंद्रधनुष्य हे सौंदर्य सगळ्यांच्या नित्याच्या परिचयाचे, पण कवीला हे सौंदर्य निराळेच जाणवते. रानावनात उतरणारे सोनेरी उन माहेरपणाला आल्यासारखे येते आणि त्याचे हिरवे माहेरही साधेसुधे नाही तर पाचूंचे !! उन स्त्रीवाचक नाही पुरुषवाचक आहे अन तरीही ते माहेरपणाला येते. या माहेरवाशी उन्हाशी गट्टीफू करतानाच कपाळावर जमलेले श्रावणबिंदू मग फुलपाखरू होऊन जातात आणि मातीच्या गंधाने भरून गेलेला सारा आसमंत गाभाऱ्याचा एकजीव अनुभव पदरात टाकून जातो. ज्यासाठी जागून वाट पहावी, अशा सौख्यअनुभवांचे हे तपशील वाचकाला वा श्रोत्याला हात धरून आपल्यासवे घेऊन जातात.

श्रावणसरींनी सुस्नात झालेले रान रंगांचे रान होऊन जाते. वृक्षलतांच्या विविध छटांची हिरवाई आणि फुलांचे, फुलपाखरांचे नानाविध रंग निसर्गाची रंगपंचमीच जणू खेळत असतात... आणि त्या रानात रंगीबेरंगी स्वप्नांचे पक्षी विहार करू लागतात. नुसते विहारच करतात असे नव्हे तर हरवून जातात स्वत:तच. घरदार विसरून, तहानभूक विसरून... निळ्या रेशमी पाण्यावर थेंबबावरी नक्षी उमटू लागते... रेशीमसरी बरसतात आणि तळ्यातल्या संथ पाण्यावर पडणारे पाऊसथेंब नवपरिणीतेच्या नवथरपणाने नक्षी काढू लागतात. त्यात चंचलता असते, भांबावलेपण असते, अल्लडपणा असतो. अशा हिरव्या, ओल्या वातावरणातच रानफुलांचा गंध लेऊन वारा येतो आणि गतजन्मीची ओळख सांगतो. म्हणतो, `आठव..., तू असाच रमून माझ्याशी गुज करीत होतास आणि अचानक निघून गेलास. मी अजूनही तसाच आहे, वाहतो आहे... गंध लेवून, परिसराला सुगंधी करीत. तू कसा आहेस? तसाच आहेस की बदललास? तुला ओळख आहे या साऱ्यांची?' गीताच्या या पंक्ती ऐकणाऱ्याला अशाच एका भावतंद्रीत घेऊन जातात.

झाडांची पाने जणूकाही निसर्गाचे हात होतात आणि शुभ शकून सांगणाऱ्या कोमल ओल्या रेषा; भविष्याचे चांदणगंध तुझेच आहेत असे आश्वासन देतात. निसर्गाशी अन नियंत्याशी असलेला हा संवाद खरे तर प्रेमालापच आहे... अशरीरी... अनाहत... अशब्द... बोलणारा आणि ऐकणारा दोघांच्याही हृदयाच्या तारा छेडणारा, पण कुणालाही ऐकू न येणारा असा हा संवाद. अंतरात एकाच सुराचं आवर्तन सुरु होतं... `आज किनारा नाही, जे आहे ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. या सौख्याला, या आनंदाला अंत नाही... मर्यादा नाही... किनारा नाही...'

श्रावणाचं साजणरूप, निसर्गाचं रंगबावरं भावरूप, त्याची नादमयता, त्याचा आकृतीबंध आणि या साऱ्याच्या माध्यमातून मिळणारा अपरूप, नि:स्तब्ध, अलवार आनंद अनुभवून देण्याचं मंगेश पाडगावकर यांच्या या गीताचं सामर्थ्य अनेक तपांनंतरही कायम आहे.

- श्रीपाद कोठे

(लोकसत्ता- रविवार, ७ ऑगस्ट २००५)

शुक्रवार, १५ जुलै, २०२२

तो अन ती

एक तो अन एक ती. कसे भेटले, कुठे भेटले हे गौण. एकमेकांना ओळखणारे. विशीच्या आसपासचे. रोज भेटत. संध्याकाळी तळ्यावर जाऊन बसत. परत जात. दोघांच्याही घरच्यांची चलबिचल सुरु झाली. त्यांनी हेर ठेवले त्यांच्या मागावर. हेरांनी पाळत ठेवली. घरी येऊन सांगितले- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' तेथून हा रोजचा क्रम सुरु झाला. घरच्यांना प्रश्न पडला यांचं काय आहे? आहे का काही? सांगावं ना. पण काहीच नाही. एकदोनदा त्यांनाच विचारून झालं पण त्यावर ते फक्त हसले. होता होता दोघेही चाळीशी पन्नाशीत पोहोचले. नित्यक्रम सुरूच होता. आईवडील म्हातारे झाले, थकले, देवाघरी गेले. हेर यांच्याकडे पोहोचले. म्हणाले- `गेली तीसेक वर्ष हेच काम करतोय. यावरच आमचं घर, कुटुंब, आयुष्य. तुमच्या आईवडिलांच्या सांगण्याने तुमच्यावर पाळत ठेवली. ते पैसे देत. आता आम्ही रस्त्यावर आलो. काय करावे?' दोघांनीही हेरांना काम सुरु ठेवण्यास सांगितले. तेच त्यांना पैसे देऊ लागले, स्वत:वर पाळत ठेवण्याचे. पण अहवाल कोणाला द्यायचा? हेरांची समस्या शेजारपाजाऱ्यांनी सोडवली. अहवाल घ्यायला ते तयारच होते. पुन्हा नित्यक्रम सुरु झाला. शेजाऱ्यांच्या प्रवेशाने थोडे वेगळे वळण मिळाले. त्यांच्यात शंका उत्पन्न झाली- तेच पैसे देत आहेत. त्यामुळे ते कसे थांग लागू देतील त्यांच्यात काही आहे वा नाही? मग ठरले, हेरांनी नोकरीचा राजीनामा द्यायचा. हेर दोघांना भेटले. राजीनामा देतो असे सांगितले. दोघांनी माना डोलावल्या. त्या हेरांना शेजारपाजाऱ्यांनी नोकरीवर ठेवले. काम तेच. पैसे शेजारपाजारी देणार. सुरु झाला क्रम. आताही अहवाल पहिल्या दिवशीचाच- `ते तळ्यावर गेले. शेजारी शेजारी बसले. काहीही बोलले नाहीत. हात हाती घेतले नाहीत. काहीच हालचाल नाही. भटकले नाहीत. तास-दोन तास चुपचाप बसून राहिलेत आणि परतले.' पाहता पाहता दोघांनी साठीही पार केली. हेरांनीही राम म्हटले. शेजारपाजाऱ्यांनी दुसरे हेर ठेवले. क्रम सुरु राहिला. अहवाल तोच कायम राहिला. दहावीस वर्ष अशीच गेली. एक दिवस नेहमीप्रमाणे हेर आले. पण आविर्भाव रोजचा नव्हता अन अहवालही रोजचा नव्हता. अहवाल होता- `आज ते आलेच नाहीत. आम्ही पूर्ण वेळ थांबलो. पण ते आलेच नाहीत.' लोकांनी शोध घेतला. दोघेही आपापल्या घरात निष्प्राण पहुडले होते. पुढचे सगळे सोपस्कार पार पडलेत दुसऱ्या दिवशी. दहनघाट पलीकडेच होता, हे दोघे बसत त्या तळ्याच्या. सारे लोक विधी आटोपून परतत होते. गेली कित्येक वर्षे त्या रस्त्यावरील पिंपळपारावर धुनी लावून भजने गात बसणारा अवलिया तसाच भजन गात बसला होता. कोणीतरी म्हणालं- `हा तर त्यांना रोज पाहत असेल. याला विचारावं, त्यांचं काही होतं का?' सगळे गेले. नमस्कार करून त्यांना दोघांच्याही स्वर्गवासाची बातमी सांगितली. अवलिया हसला आणि पुटपुटला काही तरी. काही क्षण गेले. एकाने धीर करून सगळ्यांच्या मनातला मुरलेला प्रश्न विचारलाच. `महाराज त्यांचं काही होतं का?' अवलिया मोठ्ठ्याने हसला. सारं अवकाश गडगडून जावं असा. अन म्हणाला- `हो !!!' सगळे अवाक. प्रश्नार्थक. `ते खूप बोलत असत. त्यांच्यात खूप काही होतं. काय काय सांगायचं...' अवलिया बोलला. आणखी एकाला कंठ फुटला, `महाराज काही तर सांगा.' अवलिया उठून उभा राहिला. प्रथम आकाशाकडे आणि नंतर विचारणाऱ्याच्या डोळ्यात पाहून म्हणाला- `नाही सांगणार. कारण, सांगताच नाही येणार. कारण, ते त्यांच्या भाषेत बोलत असत. तुम्हाला ती भाषाच येत नाही.' अन पार उतरून भजन म्हणत अवलिया चालू लागला. दुसरा पिंपळपार जवळ करायला.

- श्रीपाद कोठे

१६ जुलै २०१५

गुरुवार, १४ जुलै, २०२२

कर्मसिद्धांत

विज्ञानाने माणसाच्या विचारप्रक्रियेवर मोठा परिणाम केलेला आहे. (मी मुळीच विज्ञानविरोधी नाही.) विज्ञान म्हणजे काय? पुष्कळ पद्धतीने सांगता येईल. त्यातील एक म्हणजे कार्यकारण संबंध. म्हणजे अमुक गोष्टीने अमुक होते/ होईल वगैरे. किंवा अमुक घडले/ झाले म्हणजे त्याचे अमुक कारण आहे वगैरे. पण खरेच हा सगळा कार्यकारण गुंता इतका सहज आणि सोपा असतो का? आपल्याला प्रत्ययाला येणाऱ्या प्रत्यक्ष, स्थूल भौतिक विश्वाला सुद्धा हा कार्यकारण संबंध १०० टक्के लावता येत नाही. याच आपल्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मोडीत काढणाऱ्या जागाही आहेतच. किंवा अगदी ताजे उदाहरण अल निनोचे. त्याचा प्रभाव आहे की नाही, असेल तर किती, कधी, कुठे, कुठवर; काहीच धड सांगता येत नाही. Uncertainty आता विज्ञान सुद्धा मान्य करते. हे जे भौतिक विश्वाच्या बाबतीत आहे, ते कितीतरी पटीने मन आणि बुद्धीच्या स्तरावर आहे. मन आणि बुद्धीचे व्यवहार कार्यकारण संबंधात बसवणे म्हणजे गुलबकावलीचे फुल गवसणेच. तरीही माणूस रोज, सतत तेच करत राहतो. अर्थात कार्यकारण संबंध टाकता वा टाळता येत नाहीतच. पण ते किती ताणायचे, त्यांना किती महत्व द्यायचे, त्यावरून निष्कर्ष का- कसे- किती- काढायचे, याचा विचार तारतम्य आणि परिपक्वतेनेच करावा लागतो. म्हणूनच म्हणतात ना - सुमार माणूस व्यक्तींची चर्चा करतो, सामान्य माणूस घटितांची चर्चा करतो आणि असामान्य माणूस तत्त्वांची चर्चा करतो. ही कसोटी लावून आज माणूस समूह म्हणून सुमार आहे, सामान्य आहे की असामान्य आहे; हे समजून घेता येईल. त्यातल्या त्यात इतिहास आणि राजकारण या इंग्रजांनी आंदण दिलेल्या बाबतीत तर याचा पदोपदी प्रत्यय येतो. त्यात अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा, आवेश, या गोष्टी आल्या की पाहायलाच नको. हे सारे आमची विचारशक्ती घडवीत आहेत की बिघडवीत आहेत? भारतीय कर्मसिद्धांत सुद्धा कार्यकारण संबंध आग्रहाने मांडतो. परंतु विज्ञान आणि कर्मसिद्धांत यात एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत फरक आहे. कर्मसिद्धांत प्रत्येक कर्माचा परिणाम असतोच असतो हे सांगतो. शिवाय परिणाम आहे म्हणजे त्याचे कर्म असलेच पाहिजे हेही सांगतो. फरक फक्त हा आहे की, कर्म आणि परिणाम कुठे, केव्हा, कसे, कोणाला प्रत्ययाला येतील याची शाश्वती देत नाही. त्याबाबत तो दावे करत नाही. कर्म आणि त्याचे परिणाम यांचे मूल्यांकन करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. ते अशक्य असल्याची त्याची कबुली आहे. म्हणूनच तो कर्म करण्याचा सल्ला देतो. परंतु फळाचा विचार करू नको हेही सांगतो. अर्थात माणसाची गंमत ही आहे की त्याला फलश्रुती सांगितल्याशिवाय एखादे स्तोत्रही त्याच्या गळी उतरवता येत नाही. कर्मसिद्धांत पेलणे दूरची गोष्ट. परंतु तो जेवढा अधिक रुजेल तेवढी माणसाची विचारशक्ती अधिक नीटस होईल आणि तसे झाले तर; अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा, आग्रहीपणा, आक्रोश (हे सगळे चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठीचे) कमी होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १५ जुलै २०१९

बुधवार, १३ जुलै, २०२२

अतर्क्य

१) गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत,

२) वीज आणि तिचे गुणधर्म,

३) प्रकाशसंश्लेषण क्रिया,

४) रक्ताचे घटक,

५) मानवी शरीर आणि त्याच्या क्रिया,

६) पोटातील गर्भ मुलीचा की मुलाचा हे निश्चित करणारे घटक,

७) खनिजांची उत्पत्ती,

८) वनस्पती वाढीची व्यवस्था,

९) सगळ्या भौतिक पदार्थांचे विघटीत होणे,

१०) पदार्थांचे आंबणे,

११) फुलांचे रंग, गंध, आकार

१२) अणूची रचना,

१३) मानवी मेंदूची रचना, क्षमता व शक्ती...

अशा असंख्य गोष्टी मानवाने वा विज्ञानाने तयार केलेल्या किंवा निर्माण केलेल्या नाहीत. विज्ञानाने फक्त `शोध' लावले. म्हणजे मुळात जे आहे ते शोधले. लपून बसलेले शोधले. एवढेच. मात्र शोधण्याचे कर्तृत्व माणसाला दिले तरीही; या शोधण्याची प्रेरणा कुठून आणि कशी येते; मुख्य म्हणजे काही विशिष्ट व्यक्तींनाच ती का होते, अन त्यातीलही काही विशिष्ट व्यक्तीच त्यात यशस्वी का होतात? विज्ञान यावर काहीही बोलू शकत नाही.

- श्रीपाद कोठे

१४ जुलै २०१५

Philosophy of science

उद्या इसरोची चांद्रयान २ मोहीम सुरू होते आहे. मानवी बुद्धी, प्रतिभा आणि कुशलता यांचा पुढील टप्पा म्हणून त्याचे सानंद स्वागत. मात्र या मोहिमेची जी चर्चा सुरू आहे ती भारताला/ माणसाला काय मिळेल याचीच सुरू आहे. माती, पाणी, खनिजे, वसाहत यांचीच चर्चा. आज आमच्या सगळ्या विचारांचाच नव्हे तर विज्ञानाचाही एकमेव संदर्भ - आमचे भोग, अधिकाधिक भोग; आमची साधने, अधिकाधिक साधने; आणि या भोग आणि साधनांवर आणि त्या माध्यमातून माणसांवर ताबा, हाच झालेला आहे. कदाचीत यातून एखादं नवीन विश्व आकारास येईल. पण पुढे काय? यातून साध्य काय होईल? आकारास येऊ शकणारं संभाव्य विश्व कोणत्या माणसांचं राहील? आजचा माणूस त्यात नक्कीच नसेल. माणूस हा अमुक तारखेला अस्तित्वात येऊन, अमुक तारखेला अंतर्धान पावणारा प्राणी असेल तर पुढच्या मानवाच्या संभाव्य विश्वाशी त्याचा काय संबंध? त्यासाठी आजच्या मानवाने का कष्ट घ्यावे किंवा त्या भावी विश्वाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा आनंद का मानावा किंवा आपला वेळ, पैसा, बुद्धी, कष्ट त्यासाठी खर्च का करावे? माणूस ही जर एक अनादी अनंत जीवमान प्रक्रिया असेल तर त्याचा हेतू काय? तो हेतू अशा चार दोन वैज्ञानिक पावलांनी किती आणि कसा साध्य होणार? मानवी बुद्धी आणि त्याचा विलास असणारे विज्ञान यांचा मानवी जीवनाशी संबंध काय? तो संबंध उपभोग आणि उपभोग साधने यांच्यातूनच पाहायचा का? तेच पूर्णत्व म्हणता येईल का? या चांद्रयान २ च्या चर्चेतच एक विषय आला अवकाश विज्ञानाचा. पर्यावरण, त्याच्या घडामोडी आम्हाला कळू शकतात. ग्लेशियर वितळत आहेत हे आम्हाला अवकाश विज्ञानामुळेच कळू शकले. खूप छान. पण हे ग्लेशियरचे वितळणे थांबवण्याची इच्छा आणि संकल्पशक्ती अवकाश विज्ञान आम्हाला देऊ शकले का? हा जो paradox आज आमच्यापुढे आहे तो दूर करण्यासाठी, philosophy of science चा विचार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. आज science of philosophy, technique of philosophy, science and technique of spirituality; यांचा विचार होतो. त्याच धर्तीवर philosophy of science हाही विचार गांभीर्याने होणे, होत राहणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

१४ जुलै २०१९

मंगळवार, १२ जुलै, २०२२

पावनखिंड

१३ जुलै १६६०, तिथीनुसार आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा), रोजी पावनखिंडीची अद्भुत आणि अद्वितीय लढाई झाली. शौर्य, त्याग, स्वामिनिष्ठा, शब्द देणे म्हणजे काय याचं मूर्तिमंत चित्र जगाला पाहायला मिळालं. अन याच त्याग आणि बलिदानाने घोडखिंडीची पावनखिंड झाली. पन्हाळ्याला गेलो तेव्हा साहजिकच घोडखिंडीला पावनखिंड करणाऱ्या बाजीप्रभूंना अभिवादन केले. माझ्यासोबत कोल्हापूरला अभियांत्रिकीला शिकणारा माझा भाचा होता. मी वर चढून बाजीप्रभूंना नमस्कार केला तेव्हा त्याला थोडी गंमत वाटली. बदललेल्या वातावरणाचा त्यालाही स्पर्श झालेलाच ना. अन तसेही पन्हाळा काय किंवा सिंहगड काय किंवा अन्यत्र काय इतिहास, धर्म, संस्कृती, भाव, विचार, भावना वगैरेपेक्षा `टुरीस्ट'च जास्त. प्रणाम करून खाली उतरलो. आजूबाजूचे लोकही पाहत होतेच. सहज बोलत भाच्याच्या खांद्यावर हात टाकला अन थोडे मोठ्याने, सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो, `अरे, त्यांच्याच बलिदानामुळे आम्ही आज ताठ आहोत.' या एकाच वाक्याचा परिणाम पुढच्या १५ मिनिटातच पाहायला मिळाला. पन्हाळा उतरताना पायथ्याच्या गावाला जंगलात `शिवा न्हाव्याचे' स्मारकही आहे. या शिवानेच शिवाजी महाराजांचे सोंग घेऊन शत्रूला हूल दिली होती. खाली उतरताना या स्मारकावरही गेलो. तेव्हा मी काही म्हणण्याच्या आधीच आमचा मावळा (भाचा) शिवाच्या समाधीजवळ गेला. त्याने ती साफ, स्वच्छ केली. शेजारी फुलांची खूप झाडे. त्याची फुले तोडली. समाधीवर वाहिली आणि नमस्कार केला. आणखी काय हवे?

- श्रीपाद कोठे

१३ जुलै २०१५

सोमवार, ११ जुलै, २०२२

लोकशाही देवी

शिकल्या सवरल्या, जाणत्या लोकांचं एक शहर होतं. सगळे लोक कसे आदर्श. एकमेकांचा विचार करणारे, सांभाळून घेणारे वगैरे. सगळ्यांच्या मतांचा आदर करावा, सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यावेत, प्रत्येकाचं स्वातंत्र्य जपावं वगैरे. पक्के लोकशाहीवादी. तिथे एक शाळा होती. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कर्मचारी; अन अगदी विद्यार्थी सुद्धा, असेच आदर्श. सगळ्या शाळांप्रमाणे त्या शाळेतही परीक्षा होत असे. दरवर्षी. निकालही अगदी १०० टक्के. हां, कधी कधी ९७-९८ टक्के होत असे. मात्र ९५ टक्केच्या खाली तर कधीच गेला नाही निकाल. एकदा शिक्षकांच्या खोलीत शिक्षकांची यावरच चर्चा झाली. आनंद तर सगळ्यांनाच होता. पण कसा कोणास ठाऊक, एकाच्या मनात प्रश्न आला- `हे कसे होत असेल?' त्यावर अन्य एका शिक्षकाने माहिती पुरवली- `अहो, आपली मुले पक्की लोकशाहीवादी आहेत. अन त्यांच्या मनात सगळ्यांच्या भल्याची तळमळ पण आहे. त्यामुळे ते पेपरच्या वेळी सगळ्यांना मुक्तपणे मदत करीत असतात.' या खुलाशाने एकच खळबळ उडाली. सगळ्यांच्या आनंदात, समाधानात नैतिकतेच्या एका य:कश्चित प्रश्नाने मिठाचा खडा टाकला. मग मुख्याध्यापकांच्या सल्ल्याने सगळ्यांनी ठरवले, हा प्रश्न सोडवायचा. मात्र आपण तत्व म्हणून स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीनेच. झाले. सगळ्यांची डोकी लागली कामाला. अन एकमताने ठरले की, सार्वमत घ्यायचे. कोणाचे? तर या प्रश्नाशी संबंधित मुख्य घटक असलेल्या विद्यार्थ्यांचे. कशावर? अर्थात, परीक्षेत नक्कल अधिकृत करावी की नाही? सगळे व्यवस्थित ठरले. दिवस, वार, तारीख, वेळ. सगळे. सार्वमत झाले, मतमोजणी झाली, अन निकाल जाहीर झाला. ८० टक्के विद्यार्थ्यांनी, परीक्षेत नक्कल अधिकृत करावी या बाजूने मत दिले होते आणि २० टक्के विद्यार्थी तटस्थ राहिले होते. मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष निमंत्रित पालकवर्ग; सगळ्यांनी मिळून लोकशाही देवीची; संगीत शिक्षिकांनी लिहिलेली, चाल दिलेली अन म्हटलेली; आरती केली- `जयदेवी, जयदेवी, जय लोकशाही देवी...' अन मोठ्ठा जल्लोष करण्यात शाळेचा तो दिवस पार पडला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १२ जुलै २०१५

रविवार, १० जुलै, २०२२

साहस

गुहेत अडकलेली १२ फुटबॉलपटू बालके आणि त्यांचे प्रशिक्षक यांची सुखरूप सुटका ही मानवी धैर्य, प्रयत्न, प्रार्थना; यांची यशोगाथा आहे. अडकलेले १३ जण आणि त्यांना वाचवण्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेले सगळे, अन त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे जगभरातील सगळे याने आनंदित झालेत. हे सारे अभिनंदनासाठी पात्र आहेतच. माणसाचाही कस लागला. तंत्रज्ञानाचा कस लागला. पोरांचे आणि त्यांचे धैर्य उंच ठेवणाऱ्या, जिवंत ठेवणाऱ्या प्रशिक्षकासाठी तर शब्द नाहीत. परंतु या पहिल्या प्रतिक्रियेनंतर, पहिल्या भावनावेगानंतर मनात विचार येतो - केवळ कुतुहलापोटी असे धाडस करावे का? अशा धाडसाचे निरपेक्षपणे कौतुक व्हावे का? त्याला उचलून धरावे का? अन का धरावे? एका गीताची एक ओळ आठवते- `किंतु डूबना मझधारो मे साहस को स्वीकार नही है'. ही मुले सुखरूप बाहेर आलीत हे समाधानाचेच आहे, पण साहस अमर्याद आणि अविचारी असूच नये.

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१८

सही है, लेकीन यत्न की पराकाष्ठा करनेसेही यश मिलता है।

Yaa... But had they been columbases it's ok. They were not researchers or adventurers having a target. It was just a fun of football playing keeds.

मी तू पणाची झाली बोळवण

'ऐनक मे छब देखन जाऊं, तू ही नजर आवै' आणि 'दर्पणी पाहता मुख, न दिसे वो आपुले' या दोन्हीतली तीव्र आर्तता एकच नाही का? 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' याच्या पुढची अवस्था. डोळे बंद असताना, स्वप्नातच नाही; तर जागेपणी आरशात स्वतःच्या छबीच्या जागी, मनात जे आहे त्याची छबी दिसणं. स्वतःचं नाव म्हणून मनातलं नाव सांगणं. मी आणि तू लोपुन जाणं. 'मी तू पणाची झाली बोळवण'. इतकी एकतानता... प्रेम आणि भक्ती, भक्ती आणि प्रेम... इतकं एकजीव की कळूच नये, आधी काय नंतर काय... बेभानपणा नव्हे भान विसर्जित होणे... एकजीव शब्दाचा अर्थ आकळणे... दोन अस्तित्वातच नुरणे... दुज्याचा लोप... स्वतःचा लोप... हे एकजीव होणं आध्यात्मिक असेल तर मुक्तता... नसेल तर, 'जनम जनम की पीडा तेरी, सब मुझ मे आ जाये' एवढंच मागणं'... आत्मोसर्ग... आत्मविलोप... पूर्णत्व... शांतत्व... समाधान... सगळ्या अशांतीचं, असमाधानाचं हेच मागणं नसतं का - मी तू पणाची व्हावी बोळवण !!

- श्रीपाद कोठे

११ जुलै २०१९

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

`ग्रेट' भेट

आयबीएन-लोकमतवर सुरेखा पुणेकरची ग्रेट भेट पाहिली. अज्ञान, अशिक्षा, निरक्षरता, दारिद्र्य, बकालपणा, भोग हे सारे त्यांनी सांगितले. ते खरे आहे, दाहक आहे, भेदक आहे. तो काळ त्या अर्थाने आता थोडाबहुत बदलला असला तरीही अजूनही जगण्याची धग सोसावी लागते असे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी प्रयत्नही होत आहेत. ते प्रामाणिकपणे आणि वेगाने व्हायला हवेत. आपणही आपापला वाटा उचलायला हवा.

हे सगळे असले तरीही सुरेखा पुणेकर यांनी सांगितलेली याशिवायची एक बाब मनात खोल पोहोचली. त्या काळात तमाशाला येणाऱ्या माणसांबद्दल त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, `ती माणसे स्त्रीच्या अंगाला touch देखील करीत नसत. असभ्यपणा मुळीच नव्हता. पैसे देत तेव्हा कोणी पदरात टाकत. कोणी हातात देत, पण सहेतुक स्पर्श नाही. मी १०-११ वर्षांची असेन. कधी कधी फडात एखाद्याच्या मांडीवर पण जाऊन बसत असे, पण वावगा स्पर्श नाही.'

आज आम्ही कुठे आहोत? इतके खाली आम्ही का आणि कसे घसरलो? तेही इतक्या कमी काळात?

आणखीन एक बारकावा जाणवला. बोलता बोलता त्या म्हणाल्या, `ज्येष्ठ- श्रावण' आम्ही रिकामे असतो. आज आपण भारतीय कालगणना वापरीत नाही. अनेकांना भारतीय महिनेही माहित नसतात. शिवाजी महाराजांची जयंती तिथीने साजरी करावी की तारखेने असा वाद आपण घालतो. मुळात भारतीय महिने, तिथ्या, वार, नक्षत्र हे सारे आमच्या समाजात रुजलेले आणि रुळलेले आहे. तमाशा कलावंत सुद्धा त्याचाच उपयोग करतात आणि त्यांना ते समजतेही. पण आमची कथित सेक्युलर सरकारे, विचारवंत आणि स्वनामधन्य समाज सुधारक `हिंदू, ब्राम्हणी, रुढीग्रस्त' असे किंचाळत सुटतात. या देशातील मीठही अळणी लागणाऱ्या या महाभागांचे काय करावे हा खरेच मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्याकडे काम करणारी कामवाली बाई, आभाळ गडगडू लागले की सहज बोलून जाते- आर्द्रा नक्षत्र लागले. अन आमचा माळी पावसाचे अंदाज सांगायला, नक्षत्रांचीच विचारपूस करतो.

यावर खरेच काही म्हणायलाच हवे का?

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१३

वाहिन्यांच्या चर्चा

मी एकाला सहज विचारलं, वृत्तवाहिन्यांचे लोक रोज इतक्या चर्चा वगैरे करतात. हे कसं काय शक्य होत असेल? अभ्यास, वाचन आणि बोलणे याशिवाय दुसरं काहीच हे करत नाहीत का? कारण तेवढा वेळ तर द्यावाच लागेल ना. इतक्या कमी वयात इतके ज्ञान म्हणजे कौतुकच करायला पाहिजे.

माझ्या बोलण्यातील खोच त्याला कळली अन झोंबली पण. माझ्या बोलण्यावर तो म्हणाला- ज्ञानेश्वर तरी फक्त २१ वर्षांचेच होते ना? अन शंकराचार्य फक्त ३२, तर स्वामी विवेकानंद फक्त ३९ वर्षच ना?

त्याला वाईट वाटेल म्हणून मनातल्या मनात म्हणालो- ज्ञानेश्वर फक्त २१ वर्षांचे असू शकतात, पण २१ वर्षांचे ज्ञानेश्वर असतात असे नाही.

मी मौन आहे असे पाहून त्याला आणखीन स्फुरण चढले. म्हणाला- अन पुष्कळ जण असतात ना. सगळे मिळून विचार करतात, तयारी करतात.

मला जणू अंतर्मुख करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. मी पुन्हा मनातल्या मनात तुकोबांची आठवण केली अन गुणगुणलो, `सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता...'

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१५

Common sense

एका राजकीय नेत्याला म्हटले - रस्ते वगैरे खूप छान होताहेत. पण लोकांना सेन्स नाही. घरातला कचरा, अन्न रस्त्यावर आणून टाकतात. शिवाय कुत्रे, गायी यांची घाण वगैरे. तुम्ही जरा व्यक्तिशः बोला लोकांशी, सांगा, आवाहन करा. नेत्याचे उत्तर होते - निवडणूक लढवावी लागते नं भाऊ !!

यात नवीन काहीही नाही. अक्षरशः काहीही नाही. फक्त आशावाद सांगणाऱ्या लोकांचं एकीकडे कौतुक वाटतं अन संताप पण येतो.

- आशा निराशा यांच्या पल्याड गेलेला

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१८

जीवन

जीवन ही मूळ गोष्ट आहे. सगळीच्या सगळी शास्त्रे, तत्त्वज्ञाने, विचार, आचार, व्यवस्था, धर्म- पंथ- संप्रदाय-, सिद्धांत, विज्ञान, रचना; हे सगळं नंतर. हे सारं जीवनातून येतं आणि जीवनासाठी असतं. ते नाकारताही येत नाही. नाकारून उपयोग नसतो. नाकारणं हा शहाणपणा नसतो. त्याचबरोबर- त्यात जीवन कोंबणं, त्यावर जीवन बेतणं, त्यानुसार जीवन घडवण्याचा प्रयत्न करणं, त्यानुसार जीवनाचा अर्थ आणि आशय लावणं; हाही शहाणपणा नसतो. म्हणूनच- मनुस्मृती वा राज्यघटना यावच्चंद्रदिवाकरौ चालत नसतात. मनुस्मृती जाळली जाते आणि राज्यघटना लिहिणाऱ्यांचा नातूच ती निरर्थक ठरवतो. आम्हाला हे कळतच नाही की मनुस्मृती तिच्या जागी योग्य होती, राज्यघटना तिच्या जागी योग्य आहे. अन दोन्हीही अपूर्ण, परिवर्तनीय, विश्लेषणीय आहेत. मूळ जीवनाला अनुलक्षून सगळ्या बाबी असायला हव्यात. आम्ही मूळ जीवनाचा विचार न करता मनुस्मृती, राज्यघटना, विज्ञान, धर्म, सत्ता, पक्ष, शिक्षण अन काय न काय; यांचाच विचार करतो. मनाला अनुकूल वाटेल त्याचा पक्ष घेऊन, त्यात जीवन कोंबण्याचा प्रयत्न करतो. मात्र आम्हाला प्रश्न पडत नाहीत की- मनुस्मृती वा विक्रमादित्य वा चाणक्य वा अशोक वा शिवाजी महाराज वा आणखीन कुणी अथवा काही; फार म्हणजे फार महान आणि पूर्ण होते तर; मानवी जीवनाचा मनोसामाजिक विकास पूर्णत्वाला का गेला नाही? किंवा आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत की; राज्यघटना महान म्हणजे अतिमहान असूनही अजून सगळ्यांना पोटभर जेवण का मिळत नाही किंवा बलात्कार का होत राहतात किंवा आणीबाणी का लावली गेली किंवा सगळ्यांचे समाधान होत का नाही किंवा पाकिस्तान वा चीनचा पुरता बंदोबस्त का होऊ शकत नाही किंवा सगळे लोक सज्जन, प्रामाणिक इत्यादी का होत नाहीत? सगळाच मुर्खपणा. बंद छत्री डोक्यावर नाचवून पावसापासून बचाव करता येत नाही. छत्री उघडावी लागते. विचार करण्यासाठी आधी विचार म्हणजे काय हे नीट समजून घ्यावे लागते. आम्ही अजून तिथवर सुद्धा पोहोचलेलो नाही आहोत.

by the way- मनू आणि ज्ञानोबा तुकोबा यांची तुलना म्हणजे effort of equating oranges with potatoes.

- श्रीपाद कोठे

९ जुलै २०१९

शुक्रवार, १ जुलै, २०२२

अशक्य आणि आवश्यक

प्रश्न- महागाई कमी होणं शक्य आहे का?

उत्तर- महागाई कमी होणं कुठल्याही स्थितीत शक्य नाही.

प्रश्न- महागाई कमी होणं आवश्यक आहे का?

उत्तर- कुठल्याही परिस्थितीत महागाई कमी होणं आवश्यक आहे.

*******************************

प्रश्न- बायको, मुलं, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, वाचन, व्यायाम, साधना, चिंतन या गोष्टींसाठी किती वेळ देता?

उत्तर- या गोष्टींसाठी पाच मिनिटं देणंही शक्य नाही.

प्रश्न- बायको, मुलं, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, वाचन, व्यायाम, साधना, चिंतन या गोष्टींसाठी वेळ देणं आवश्यक आहे का?

उत्तर- या गोष्टींसाठी पुरेसा वेळ देणं कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे.

******************************

अशक्य आणि आवश्यक या दोन गोष्टींचा समन्वय शक्यतेच्या चौकटीत आणायचा असेल तर तिसऱ्या मार्गाची गरज असते. हा तिसरा मार्ग नियमांच्या चौकटी, नियोजनाचे आराखडे, कायद्याचे बडगे यातून जात नाही. हा तिसरा मार्ग जातो तुमच्या-माझ्या व्यवहारातून, तुमच्या-माझ्या विचारातून, तुमच्या-माझ्या दृष्टीतून आणि दृष्टीकोनातून. सगळ्या जगालाच या तिसऱ्या मार्गाची गरज नाही का?

- श्रीपाद कोठे

२ जुलै २०१४