गेले चार महिने जग घरात डांबलं गेलं आहे. त्याने अस्वस्थही झालं आहे. बाकी जगाचं ठीक पण अध्यात्माचा वारसा सांगणाऱ्या, 'जेणे सुखे रुचे, एकांताचा वास; नाही गुणदोष अंगा येत' असं सांगणाऱ्या तुकारामांच्या आम्हा वारसांना एकांत असह्य का होतो? एकांताची भीती का वाटते? एकांत असह्य का होतो? कारण आम्ही आध्यात्माबद्दल बोलत असलो तरीही त्याला जगण्याचा भाग करू शकलेलो नाही. स्वामी विवेकानंद म्हणत असत - धर्म, आध्यात्म ही टेबलवर ठेवण्याच्या फुलदाणीसारखी शोभेची वस्तू नाही. तो जीवनाचा भाग व्हायला हवा. अर्थात आध्यात्म हा जीवनाचा भाग होण्यासाठी मन आत वळावं लागतं. 'आपुलाची वाद आपणासी' हे सुरू व्हावं लागतं. अन हा स्वतःचा स्वतःशी वाद सोपा नाही. जगातल्या कोणत्याही लौकिक संघर्षापेक्षा अधिक भीषण संघर्ष या आत्मसंवादात सुरुवातीला असतो. यालाच माणूस घाबरत असावा. त्यामुळे तो एकतर त्याकडे वळत नाही किंवा वळला तरी लगेचच माघारी येतो. बाहेर उड्या मारणाऱ्या मनाला, वृत्तींना, सवयींना, इंद्रियांना, विचारांना आत वळवून, आतील अनंत अवकाश कवेत घेण्यापेक्षा; बाहेर उड्या मारणं सोपं आणि बरं वाटतं. मग एकांत असह्य होतो. जिज्ञासा, चौकशा, कर्तेपण अशा विविध नावांनी या उड्या सुरू असतात. अर्थात हे सत्य आहे की, हे अस्तित्व दृश्य आणि अदृश्य अशा दोन धारांनी प्रवाहित होते. दोन्ही सत्य, योग्य आणि आवश्यक. परंतु दृश्य प्रवाह सतत परिवर्तनशील आणि क्षणांचा प्रवाह असतो. अदृश्य प्रवाह अपरिवर्तनीय आणि अखंड असतो. मात्र अदृश्य प्रवाह धरून ठेवणे मोठ्या कष्टाचे काम असते. त्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यांनाच साधना म्हणतात. परंतु बहुसंख्य मानव त्याऐवजी दृश्य प्रवाह जवळ करतो. मग त्याला एकांत त्रासदायक ठरतो. भेटणं, बोलणं, फिरणं, पाहणं अशा गोष्टी अपरिहार्य ठरतात. त्याशिवाय जगणं कठीण होतं. अगदी प्रचलित मानसशास्त्र सुद्धा (जे अभारतीय आहे) एकांतसेवन करणाऱ्याला मनोरुग्ण किंवा मनाने दुबळा इत्यादी ठरवतं. विचार, वृत्ती आणि व्यवस्था हे सगळेच एकांताला दुय्यम वा हीन ठरवतात. त्याचाच परिणाम आहे की जगभरात आता कोरोनामुळे आलेल्या बंधनांना झुगारून देणे वाढते आहे. एकांत असह्य होतो आहे. हेही तितकेच खरे आहे की, एकांत जबरदस्तीने करावयाची बाब नाही. तो आतून हवासा व्हावा लागतो, विकसित व्हावा लागतो. कोरोना असो वा नसो; एकांतात फुलणे, एकांताची गोडी, एकांताची गरज आणि आवश्यकता; मानवी जीवनाला अधिक परिपूर्ण करते. किमान आध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भारतात तरी हे पुरेसे स्पष्ट असायला हवे.
- श्रीपाद कोठे
३१ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा