आज सकाळी बच्चूजी गेले. चैत्र सुरू झाल्या झाल्या एक मोठा अपघात झाला आणि सुमारे साडेतीन महिने झुंज देऊन आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बच्चूजी हेच त्यांचं जनपरिचित नाव. ते गणिताचे प्राध्यापक आहेत वा होते, हे सगळ्यांना माहिती होतं, पण प्रा. अनंत वासुदेव व्यवहारे म्हटलं तर थोड्याच लोकांना बोध होत असे. बच्चूजी म्हटलं की मात्र काही सांगण्याची गरज नसे.
नागपूरच्या मोहता विज्ञान महाविद्यालयात त्यांनी बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना अनेक दशके गणित शिकवलं. त्यावेळी त्या महाविद्यालयात गणित शिकवणाऱ्या तज्ज्ञांची नक्षत्रमालिका होती. सगळेच विलक्षण बुद्धिमान, हुशार आणि शिकवण्याची हातोटी असणारे होते. परंतु बच्चूजी वगळता बाकीचे फक्त गणित या विषयापुरते राहिले. बच्चूजींचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी गणित तर धरून ठेवलंच पण ते त्याहून खूप मोठे झाले. प्रचलित गणित हा तर त्यांचा विषयच पण स्वतःच्या व्यासंगातून त्यांनी वैदिक गणितात मिळवलेली तज्ञता विलक्षण होती. वैदिक गणित हा स्वतंत्र विषय आकारास येण्यात ज्या लोकांचे योगदान आहे त्यात बच्चूजी वरच्या स्थानावर आहेत. यानिमित्त त्यांनी भारतभर आणि विदेशातदेखील भ्रमंती केली होती.
गणितज्ञ हे त्यांचे एक रूप होते. ते संघाचे ज्येष्ठ कार्यकर्तेही होते. नागपूर प्रांत कार्यवाह पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. संघाच्या संघ शिक्षा वर्गांचे तिन्ही वर्षांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. संघ शिक्षा वर्गात शारीरिक आणि बौद्धिक दोन्हीचे शिक्षक म्हणून अनेक वर्षे ते असत. संघ शिक्षा वर्गाचे मुख्य शिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. वेत्रचर्म हा त्यांचा विषय होता. खड्ग आणि छुरिका हे जुन्या आखड्यांचे विषय जाऊन त्या जागी वेत्रचर्म आले होते. पुढे वेत्रचर्मची जागा नियुद्धाने घेतली.
मी संघ शिक्षा वर्गाचे प्रथम वर्ष केले तेव्हा ते वर्गाचे मुख्य शिक्षक होते. एक दिवस सकाळच्या संघस्थानाच्या वेळी वेत्रचर्मच्या कालांशात ते गण घ्यायला आले. प्रत्येकाशी ते वेत्रचर्म द्वंद्व खेळले. त्या विषयात ते निष्णात होतेच. त्या विषयाचा अभ्यास होता. आम्ही नुकतीच सुरुवात केली होती. पण खेळताना त्यांनी हा भेद बाजूला ठेवला होता. त्यामुळे आम्ही जरा घाबरून घाबरून खेळत होते. ते मात्र बरोबरीचा प्रतिस्पर्धी असल्याच्या थाटात खेळत होते. पण कालांश संपल्यावर त्यांनी त्याचे कारण सांगितले. ते म्हणाले - 'तुमच्या मनातली भीती जावी म्हणूनच मी आक्रमक खेळलो. मीच जपून खेळलो तर तुम्ही तयार कसे होणार?' वेत्रचर्म हे तसे भलतेच प्रकरण होते. त्यात चामड्याची ढाल वेत्राचा आघात रोखण्यासाठी असली तरी, वेत्र खूप लवचिक असल्याने हलत असे, त्या ढालीवरून घसरतही असे किंवा ढाल भलतीकडे राही आणि वेत्र सपकन लागत असे. बरं एक वेळ दंड लागला तर फार काही होत नसे पण वेत्र लागले तर दिवसभर हुळहुळत राही. कधी वार जोरदार असेल तर सालटं निघत असे. त्या दिवशी त्यांच्याशी खेळताना हातावर सपकन वार बसला होताच. अर्थात मग मिठी मारून, 'काही होत नाही रे' म्हणून सांत्वनपण होतेच.
घोष विभागातही ते होते. सत्तरीच्या घरात असूनही अगदी गेल्या वर्षीच्या विजयादशमी उत्सवात ते शंखवादक म्हणून उपस्थित होते. ते नागपूर प्रांताचे कार्यवाह असताना एके वर्षी दसऱ्याला पहाटेपर्यंत धोधो पाऊस झाला. उत्सवाच्या थोडा वेळ आधी पाऊस थांबला त्यामुळे उत्सव ठरल्याप्रमाणे कस्तुरचंद पार्कवर पार पडला. अर्थात पूर्ण वेळ उभं राहून. प्रथेप्रमाणे मुख्य उत्सवापूर्वी पथसंचलन झाले. त्यावेळी बच्चूजी अन्य काही स्वयंसेवकांसोबत बादल्यांनी मैदानात साचलेले पाणी काढत होते.
आधी वडिलांशी परिचय आणि नंतर माझ्याशी. ते भाग कार्यवाह होते. त्यावेळी मी मंडल कार्यवाह होतो. त्याआधी शाखेचीही जबाबदारी. त्यामुळे घरी येणेजाणे होतेच. मोठी बहीण त्यावेळी मोहता महाविद्यालयात शिकत होती. तिला गणित शिकवणारे प्राध्यापक आपल्या घरी येतात. तेही हाफपॅन्ट घालून. थट्टा विनोद करतात. हसतात, हसवतात याची मौज वाटत असे. थोडं वेगळंही वाटत असे. मग ते सारं रुळत गेलं. त्या येण्याजाण्यातच हे लक्षात आलं की, बच्चूजी अफाट वाचतात. नंतर लक्षात येत गेलं की हे अफाटपण काय आहे. गणित आणि वैदिक गणितच नव्हे तर; कथा, कादंबऱ्या, कविता, युद्ध, विज्ञान, धर्म, पुराणे, चरित्र, इतिहास, भूगोल; अक्षरशः असंख्य प्रकार आणि असंख्य प्रकारची पुस्तके. त्यांचा पुस्तकांचा संग्रह देखील मोठा होता. एकदा पुस्तकांनी भरलेल्या मोठाल्या लाकडी पेट्या त्यांनी दाखवल्या होत्या. त्यावेळी संघ कार्यकर्त्यांच्या संदर्भात वाचनाचा, ज्ञानाचा हा व्यासंग निराळा होता.
विनोदी स्वभावाच्या बच्चूजींचा विनोद मिश्कीली या सदरात बसणारा होता. निर्विश होता. गुदगुल्या करणारा होता. मुख्य म्हणजे स्वतःवर सुद्धा विनोद करण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. सभ्यता आणि संतपणाचा अतिरेकी मुखवटा घालून फिरण्याच्या आजच्या काळात तर त्यांचे हे स्वभाव वैशिष्ट्य फारच लक्षणीय वाटत असे. बोलण्यात ही मार्मिकता होती. 'गाण्यासाठी आवाज कसा नसावा आणि तरीही भावपूर्ण गाणे कसे असावे याची दोन उदाहरणे आहेत. एक सुरेश भट आणि दुसरे तुकडोजी महाराज' हे त्यांचे निरीक्षण होते. गणित आणि संघ यासोबतच सुरेश भटांच्या 'रंग माझा वेगळा'ला सुद्धा त्यांची उपस्थिती राहत असे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सुद्धा ते दिसत. अंगी एवढ्या कळा असतानाही दर्शन मात्र अगदी साधेसुधे. थोडी हिंमत करायची तर कधीकधी थोडे गबाळेच. सुरुवातीला बजाज स्कुटर आणि नंतर लुनावर फिरताना त्यांना पाहणाऱ्याला हा मोठा माणूस असेल असे वाटणार सुद्धा नाही असे व्यक्तिमत्व. स्वतःहून पुढे पुढे करणे नाही. संघाच्या कामातून निवृत्त झाल्यावरही विना निमंत्रण अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना आपणहून जात. मधल्या वा मागच्या खुर्चीवर बसत. कार्यक्रम संपला की, शांतपणे बाहेर पडत. कोणी ओळखीचं भेटलं तर मस्त गप्पा मारत पण याला त्याला भेटून 'मी अमुक अमुक' वगैरे काही नाही. कधी भेट झाली की म्हणत, 'आता तू मोठा पत्रकार, विचारवंत वगैरे झाला आहे. तुझ्याशी सांभाळून बोलावे लागेल.' पण यात टोमणा वा तिरकसपणा कणभरही नव्हता. ज्येष्ठतेचे कौतुक होते. अनेक विषयांचा अभ्यास, वाचन असलेल्या बच्चूजींचा उपयोग समाजाने करून घ्यावा तसा करून घेतला नाही असे कधीकधी वाटते. गणित सोडून अन्य विषयांसाठी त्यांना कधी कोणी बोलावले नाही. हे व्हायला हवे होते. लेखन हा त्यांचा पिंड नव्हता. मी त्यांना म्हणतही असे, 'बच्चूजी तुम्ही लिहा.' ते फक्त हसून पाठीवर थाप मारीत.
साध्या, निगर्वी, ज्ञानसाधक, हसमुख, तपस्वी अशा बच्चूजींना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १९ जुलै २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा