वैचारिक युद्ध असा शब्दप्रयोग पुष्कळदा वापरला जातो. पण असं वाटतं की, हा शब्दप्रयोग योग्य आहे का? योग्य ठरेल का? कारण विचार ही सतत विकसित होणारी आणि उलगडत जाणारी बाब आहे. ती एकदा बांधून टाकली की मग, विचारांचा गट तयार होतो आणि असे पुष्कळ गट तयार झाले की, त्यांच्यात वर्चस्वासाठी युद्ध/ संघर्ष होतो/ होतात. हा संघर्ष गटाचा असतो. वर्चस्वासाठी असतो. वर्चस्व प्रस्थापित करणे हा त्याचा हेतू आणि उद्देश असतो. यात विचारांचा बळी जातो. एखादा मुद्दा, एखादा विषय, एखादी व्यक्ती याभोवती व्यूह तयार होतात. या व्यूहाच्या समर्थनार्थ तर्क, युक्तिवाद सुरू होतात. मग बुद्धी ही विचारांऐवजी व्यूहासाठी वापरली जाऊ लागते. विचार गुदमरत जातात. लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, भगव्या; सगळ्या रंगांची ही स्थिती पाहायला मिळते. व्यूहात सापडलो की दृष्टी त्या व्यूहाच्या परिघाच्या बाहेर जात नाही, जाऊ शकत नाही, जाऊ दिली जात नाही. कारण न दिसणाऱ्या मनात त्याची बीजं असतात. ती बीजं वर्चस्वाची असतात शोधकाची नसतात. बाकी सगळ्याच शास्त्रांप्रमाणे विचारशास्त्रातही शोधाचा कंटाळाच असतो. त्यापेक्षा काही केल्याचे समाधान देणारा व्यूह बरा वाटतो. व्यूहाच्या परिघाबाहेरील व्यक्ती, घटना, कृती, शब्दावली, विषय, मुद्दे, प्रतिके नाकारली जातात. पुढे जाऊन हे नकार हेच वादविषय होतात. विचार गाडले जाऊ लागतात. मग आत्ममंथन वगैरे होते पण तेही त्या परिघात आणि परिघापुरते.
झाड जसे निसर्गातून हवे ते घेऊन झाडच राहते, वाढत जाते, विस्तार पावते. विचारही असाच वाढत, विस्तारत, विकसित होत जायला हवा. विचारांच्या वृक्षांऐवजी विचारांची डबकी होतात आणि विचार मरणपंथाला लागतात. विचारशील प्राणी म्हणून गौरव असणाऱ्या मानवाची आजची अवस्था कमीअधिक अशीच डबक्यासारखी आहे.
- श्रीपाद कोठे
गुरुवार, २३ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा