विज्ञानाने माणसाच्या विचारप्रक्रियेवर मोठा परिणाम केलेला आहे. (मी मुळीच विज्ञानविरोधी नाही.) विज्ञान म्हणजे काय? पुष्कळ पद्धतीने सांगता येईल. त्यातील एक म्हणजे कार्यकारण संबंध. म्हणजे अमुक गोष्टीने अमुक होते/ होईल वगैरे. किंवा अमुक घडले/ झाले म्हणजे त्याचे अमुक कारण आहे वगैरे. पण खरेच हा सगळा कार्यकारण गुंता इतका सहज आणि सोपा असतो का? आपल्याला प्रत्ययाला येणाऱ्या प्रत्यक्ष, स्थूल भौतिक विश्वाला सुद्धा हा कार्यकारण संबंध १०० टक्के लावता येत नाही. याच आपल्या पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मोडीत काढणाऱ्या जागाही आहेतच. किंवा अगदी ताजे उदाहरण अल निनोचे. त्याचा प्रभाव आहे की नाही, असेल तर किती, कधी, कुठे, कुठवर; काहीच धड सांगता येत नाही. Uncertainty आता विज्ञान सुद्धा मान्य करते. हे जे भौतिक विश्वाच्या बाबतीत आहे, ते कितीतरी पटीने मन आणि बुद्धीच्या स्तरावर आहे. मन आणि बुद्धीचे व्यवहार कार्यकारण संबंधात बसवणे म्हणजे गुलबकावलीचे फुल गवसणेच. तरीही माणूस रोज, सतत तेच करत राहतो. अर्थात कार्यकारण संबंध टाकता वा टाळता येत नाहीतच. पण ते किती ताणायचे, त्यांना किती महत्व द्यायचे, त्यावरून निष्कर्ष का- कसे- किती- काढायचे, याचा विचार तारतम्य आणि परिपक्वतेनेच करावा लागतो. म्हणूनच म्हणतात ना - सुमार माणूस व्यक्तींची चर्चा करतो, सामान्य माणूस घटितांची चर्चा करतो आणि असामान्य माणूस तत्त्वांची चर्चा करतो. ही कसोटी लावून आज माणूस समूह म्हणून सुमार आहे, सामान्य आहे की असामान्य आहे; हे समजून घेता येईल. त्यातल्या त्यात इतिहास आणि राजकारण या इंग्रजांनी आंदण दिलेल्या बाबतीत तर याचा पदोपदी प्रत्यय येतो. त्यात अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा, आवेश, या गोष्टी आल्या की पाहायलाच नको. हे सारे आमची विचारशक्ती घडवीत आहेत की बिघडवीत आहेत? भारतीय कर्मसिद्धांत सुद्धा कार्यकारण संबंध आग्रहाने मांडतो. परंतु विज्ञान आणि कर्मसिद्धांत यात एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत फरक आहे. कर्मसिद्धांत प्रत्येक कर्माचा परिणाम असतोच असतो हे सांगतो. शिवाय परिणाम आहे म्हणजे त्याचे कर्म असलेच पाहिजे हेही सांगतो. फरक फक्त हा आहे की, कर्म आणि परिणाम कुठे, केव्हा, कसे, कोणाला प्रत्ययाला येतील याची शाश्वती देत नाही. त्याबाबत तो दावे करत नाही. कर्म आणि त्याचे परिणाम यांचे मूल्यांकन करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. ते अशक्य असल्याची त्याची कबुली आहे. म्हणूनच तो कर्म करण्याचा सल्ला देतो. परंतु फळाचा विचार करू नको हेही सांगतो. अर्थात माणसाची गंमत ही आहे की त्याला फलश्रुती सांगितल्याशिवाय एखादे स्तोत्रही त्याच्या गळी उतरवता येत नाही. कर्मसिद्धांत पेलणे दूरची गोष्ट. परंतु तो जेवढा अधिक रुजेल तेवढी माणसाची विचारशक्ती अधिक नीटस होईल आणि तसे झाले तर; अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा, आग्रहीपणा, आक्रोश (हे सगळे चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठीचे) कमी होऊ शकेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १५ जुलै २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा