बुधवार, २७ जुलै, २०२२

चक्र

`चक्र’ या गोष्टीला भारतीय जीवनात महत्वाचं स्थान आहे. जीवनचक्र, निसर्गचक्र, ऋतुचक्र, स्वरचक्र, विचारचक्र, नियतीचक्र. हे सगळं जसं चक्रीय आहे तसंच अर्थचक्रही आहे, असतं, असायला हवं. भारतेतर जगाने जीवनाचा विचार असा चक्रीय केलेला नाही. त्यांचा जीवनविचार एकरेषीय आहे. अगदी संगीत पाहिलं तरी समेवर येणे हा भाग त्यात नाही. प्रारंभ आणि अंत यांना जोडण्याची कल्पनाच नाही. त्यामुळे खूप फरक पडलेला आहे. चक्राचं एक वैशिष्ट्य असतं. जसा आकाशपाळणा. त्याची वर जाण्याची सीमा असते आणि खाली येण्याचीही सीमा असते. त्या सीमेपेक्षा वर अथवा खाली चक्र जाऊ शकत नाही. ही चक्रीयता हा निसर्गनियम आहे. तो ध्यानात घेऊन जीवनाची आखणी हा भारताचा विशेष होता. अर्थचक्र हा त्याचाच भाग. या चक्राची जाणीवपूर्वक नीट व्यवस्था नाही केली तरीही ते आपोआप क्रियाशील असतं. असं आपोआप क्रियाशील असणं जरा त्रासदायक ठरतं. आधुनिक अर्थविचाराने चक्रीय अर्थविचाराऐवजी एकरेषीय अर्थविचार स्वीकारला. त्याचा परिणाम म्हणजेच २००८ चे अमेरिकेतील सबप्राईम संकट, ग्रीसची दिवाळखोरी, ब्राझीलची अन्नान्न दशा किंवा अगदी चीनची सद्यस्थिती. संपत्तीच्या असमान वाटपाची जी मोठी समस्या जगभरात निर्माण झाली आहे त्याचे कारणच चक्रीय विचाराचा अभाव हे आहे. भारताने जातीव्यवस्थेच्या प्रयत्नातून संपत्तीचा अतिरिक्त संचय आणि एकरेषीय वाढ यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला असेल का? व्यवसायांना मर्यादित करून संपत्ती निर्मितीचे विकेंद्रीकरण केले असेल का? या अंगानेही विचार करता येईल. अन हा विचार कल्पनेतला विचार नाही. कोकणसंदर्भातील खोत कायद्यावर मुंबई विधीमंडळात झालेल्या चर्चेच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केले ते याबाबत काही दिशा नक्की देऊ शकते. त्यावेळी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, इथल्या जाती व्यवस्थेने आमच्यावर कितीही अन्याय केले असले तरीही जगण्यासाठी संपत्तीचा काही ना काही वाटा आजही आमच्याजवळ आहे तो त्यामुळेच. (त्यांच्या भाषणाचा आशय दिला आहे.) विज्ञान, तंत्रज्ञान, साधने, जीवनपद्धती, जीवनदृष्टी, काळ; या सगळ्याच्या संबंधात जातीव्यवस्थेचा वेगवेगळ्या अंगाने विचार करता येऊ शकतो. अर्थात त्याला अभ्यास एवढेच महत्व असणार. परंतु संपत्तीची एकरेषीय वाढ आणि असमान वितरण या समस्यांना उत्तर देण्यासाठी अर्थ या विषयाचा चक्रीय विचार करणे गरजेचे आहे एवढे मात्र नक्की.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा