सोमवार, ११ जुलै, २०२२

लोकशाही देवी

शिकल्या सवरल्या, जाणत्या लोकांचं एक शहर होतं. सगळे लोक कसे आदर्श. एकमेकांचा विचार करणारे, सांभाळून घेणारे वगैरे. सगळ्यांच्या मतांचा आदर करावा, सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यावेत, प्रत्येकाचं स्वातंत्र्य जपावं वगैरे. पक्के लोकशाहीवादी. तिथे एक शाळा होती. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कर्मचारी; अन अगदी विद्यार्थी सुद्धा, असेच आदर्श. सगळ्या शाळांप्रमाणे त्या शाळेतही परीक्षा होत असे. दरवर्षी. निकालही अगदी १०० टक्के. हां, कधी कधी ९७-९८ टक्के होत असे. मात्र ९५ टक्केच्या खाली तर कधीच गेला नाही निकाल. एकदा शिक्षकांच्या खोलीत शिक्षकांची यावरच चर्चा झाली. आनंद तर सगळ्यांनाच होता. पण कसा कोणास ठाऊक, एकाच्या मनात प्रश्न आला- `हे कसे होत असेल?' त्यावर अन्य एका शिक्षकाने माहिती पुरवली- `अहो, आपली मुले पक्की लोकशाहीवादी आहेत. अन त्यांच्या मनात सगळ्यांच्या भल्याची तळमळ पण आहे. त्यामुळे ते पेपरच्या वेळी सगळ्यांना मुक्तपणे मदत करीत असतात.' या खुलाशाने एकच खळबळ उडाली. सगळ्यांच्या आनंदात, समाधानात नैतिकतेच्या एका य:कश्चित प्रश्नाने मिठाचा खडा टाकला. मग मुख्याध्यापकांच्या सल्ल्याने सगळ्यांनी ठरवले, हा प्रश्न सोडवायचा. मात्र आपण तत्व म्हणून स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीनेच. झाले. सगळ्यांची डोकी लागली कामाला. अन एकमताने ठरले की, सार्वमत घ्यायचे. कोणाचे? तर या प्रश्नाशी संबंधित मुख्य घटक असलेल्या विद्यार्थ्यांचे. कशावर? अर्थात, परीक्षेत नक्कल अधिकृत करावी की नाही? सगळे व्यवस्थित ठरले. दिवस, वार, तारीख, वेळ. सगळे. सार्वमत झाले, मतमोजणी झाली, अन निकाल जाहीर झाला. ८० टक्के विद्यार्थ्यांनी, परीक्षेत नक्कल अधिकृत करावी या बाजूने मत दिले होते आणि २० टक्के विद्यार्थी तटस्थ राहिले होते. मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष निमंत्रित पालकवर्ग; सगळ्यांनी मिळून लोकशाही देवीची; संगीत शिक्षिकांनी लिहिलेली, चाल दिलेली अन म्हटलेली; आरती केली- `जयदेवी, जयदेवी, जय लोकशाही देवी...' अन मोठ्ठा जल्लोष करण्यात शाळेचा तो दिवस पार पडला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १२ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा