`वाटणे', `वाटले' हे फार विचित्र, विक्षिप्त आणि भोंगळ शब्द आहेत. कधीकधी मी म्हणतोही की, हे शब्द प्रत्येकाने आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत. घोळ, गोंधळ, गैरसमज, अपसमज, फसवणूक या व अशा गोष्टी या `वाटणे'तून जन्माला येतात. रोजच्या जीवनातसुद्धा आपण हा अनुभव घेतो. `मला वाटलं तू येताना अमुक काम करून येशील' हे वाक्य कित्येकदा उच्चारले जाते. यात काम करून येशील याचा अर्थ- बिल भरून येशील, निरोप सांगून येशील, भेट घेऊन येशील, भाजी घेऊन येशील, कटिंग करून येशील, किराणा घेऊन येशील, बँकेत जाऊन येशील; किंवा अक्षरश: काहीही असू शकतो. या `वाटणे'मध्ये नेमकेपणा नसतो, निश्चितपणा नसतो, सांगून/ बोलून/ विचारून येणारी स्पष्टता नसते. सगळे काही अध्याहृत. मनातल्या मनात. मनातल्या मनात असलेली गोष्ट योग्यही असू शकते, अयोग्यही; चुकीची असून शकते, बरोबरही. वाटणे याला काहीही आधार नसतो. अन त्यातूनच गोंधळ होतो.
हीच वाटण्याची क्रिया सामूहिक स्तरावर सुद्धा पाहता येते. त्यातून एक आभास उत्पन्न होतो, दुसरे काहीही नाही. आता शुभेच्छांचीच गोष्ट घ्या. आज ईद आहे. सगळीकडे ईदच्या शुभेच्छांची भरमार आहे. या शुभेच्छा देणाऱ्यांच्या मनात खरंच ईद विषयी काही भावना आहेत का? फार थोड्या असतील. पण त्याचा मुख्य उद्देश असतो, मुस्लिम बांधवांना बरे वाटावे. आता या वाटण्याला काही अर्थ असतो का? असूच शकत नाही. केवळ आभास की, ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. देणाऱ्यालाही वाटते शुभेच्छा दिल्या अन ज्यांना दिल्या जातात त्यांनाही वाटते की, शुभेच्छा देणारे आमच्या सोबत आहेत, आमचे आहेत. खरंच असं शुभेच्छा देऊन एकमेकांचं होता येतं का? ईद निमित्त मुस्लिमांनी मुस्लिमांना शुभेच्छा देणं समजण्यासारखं आहे. देणारा आणि घेणारा दोघांच्याही विशिष्ट भावना असतात. हिंदूंनी हिंदूंना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात दोघेही एकाच पातळीवर असतात. असं सगळ्याच बाबतीत म्हणता येईल. त्यात देणारा वा घेणारा यांना केवळ `वाटणे' अभिप्रेत नसते. त्याहून अधिक ठोस अशी भावना असते. ही ठोस भावनाच खऱ्याखुऱ्या एकतेचा वा मानवतेचा आधार आहे. जसे वाटणे ही गोष्ट दोन व्यक्तींना जोडू शकत नाही. उलट गोंधळ, अपसमज निर्माण करते किंवा दुरावाही निर्माण करते तसेच, केवळ एकमेकांना वाटण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी ऐक्य उत्पन्न करू शकत नाहीत.
गमतीचा भाग म्हणजे, अशा शुभेच्छा वगैरेंची देवाणघेवाण केली नाही तर परस्परात दुरावा वा शत्रुत्व आहे असे आपण सहजपणे समजून चालतो. खरे तर गणेशोत्सवात अहिंदूंना किंवा ईदेच्या दिवशी गैर मुस्लिमांना खूप हर्ष वगैरे न होणे ही अगदी सामान्य बाब आहे. धर्म बाजूला ठेवून सामाजिक स्तरावर सुद्धा असेच म्हणता येईल. आंबेडकर वा फुले वा सावरकर वा नेहरू वा गांधीजी यांच्याबद्दल प्रत्येकाच्या भावना सारख्याच नाही राहू शकत. आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे यासाठी प्रत्येकाच्या प्रतिमा वा प्रतिकांना उरीपोटी कवटाळणे किंवा डोईवर घेणे आवश्यक नसते. पण आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे; या गोष्टी दाखवण्यासाठी तसे केले जाते आणि तसे केले तरच आदर, सन्मान, प्रेम, स्नेह, शत्रुत्व नसणे; या गोष्टी खऱ्या आहेत असे मानले जाते. ईदच्या शुभेच्छा दिल्या तरच मुस्लिमांना वाटते की अन्य लोक आमचे आहेत. गणेशोत्सव साजरा केला की हिंदूंना वाटते हे लोक आमचे आहेत. डॉ. आंबेडकरांची किंवा महात्मा गांधींची प्रतिमा लावली की त्या त्या गटांना वाटते की हे आमचे आहेत किंवा आमचा सन्मान झाला. या सगळ्यातील कृत्रिमता, उथळपणा सूर्यप्रकाशाएवढा स्पष्ट आहे. प्रतिमा व प्रतिकांचा उपयोग करणाऱ्यांमध्ये ५-१० टक्के लोक असे असू शकतात जे विविध प्रामाणिक कारणांनी त्यांचा उपयोग करतात. पण या प्रतिमा, प्रतिकांच्या द्वारेच आपुलकी, जबाबदारी आदी निश्चित होते असे दोन्ही बाजूंना `वाटणे' हे मात्र फसवे असते. आपण व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून सुद्धा या आभासमय `वाटण्या'च्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ जुलै २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा