श्रावणाला अजून अवकाश असला तरीही आज श्रावणासारखा उन पावसाचा खेळ अनुभवायला मिळतो आहे. त्यानिमित्त, येणाऱ्या श्रावणासाठी-
आकाशवाणीच्या मराठी रसिकांची श्रावणगाठ मंगेश पाडगावकरांच्या `श्रावणात घननीळा'शी पडली नाही, असं होणं अशक्य आहे. सांजधारा, गीतगंगा यासारख्या कार्यक्रमातून लतादीदींच्या स्वरातील हे गीत रसिकमनांसाठी अनेकवार सादर झालं आहे. मोहवून गेलं आहे. पाडगावकरांच्या ऐन उमेदीच्या दिवसातील हे काव्य आजही आपली टवटवी कायम राखून आहे. आजही श्रावण म्हटला की, `श्रावणात घननीळा' आठवलेच पाहिजे. `श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीमधारा... उलगडला झाडातून अवचित, हिरवा मोरपिसारा...' या धृवपदातून एक नाजूक निसर्गचित्रच डोळ्यापुढे उभे राहते. श्रावणातला निळा मेघ बरसतो. तो कोसळत नाही आणि पडतही नाही. या दोन्हीच्या मधली त्याची स्थिती आहे. त्यात कोसळण्याचा जोशही आहे आणि हळुवार पडण्याची कोमलताही. या पर्जन्यधाराही हव्याहव्याशा रेशमी ! अशा धारा बरसत असताना एखादा मोर एकेक पाऊल टाकत, डौलदार हिरवा पिसारा फुलवत सामोरा येतो... अचानक... आणि तो नुसताच दिसत नाही तर उलगडत जातो. एखाद्या भरजरी शालूची गर्भरेशमी पदरघडी उघडताना उलगडावा तसा... श्रावणातल्या रानाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य या गीतातील या चित्रमयी ओळींच्या ठायी निश्चितच आहे.
प्रत्येकी तीन ओळींच्या चार कडव्यांच्या या गीतात बाह्य निसर्गाचं रंगरूप चित्रण आणि मानवी मनोभावांची तरल, अलवार अभिव्यक्ती यांचं अनोखं मिश्रण अनुभवता येतं. आसुसून, जागून, डोळ्यात प्राण आणून ज्या गोष्टीची माणूस वाट पाहतो ती लाभल्यानंतरचा सौख्यसोहोळा दारी आलेल्या श्रावणातून कवी अनुभवतो आणि मग श्यामविरही राधेला श्याममिलनानंतर येणारा अनुभव त्याच्या वाट्यास येतो. जिकडेतिकडे एकच घनश्याम भरून राहिलेला... `तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम' अशी अवस्था होऊन जाते. या लडिवाळ श्यामरंगात बुडून जाताजाताच मग कवीच्या ओठावर, उदारहस्ते सारं सौंदर्य सृष्टीला बहाल करणाऱ्या त्या उदारधीचं नाव येऊ लागतं आणि पाडगावकरांचं हे काव्य नकळत एका अनाम उंचीवर जाऊन पोहोचतं.
श्रावणाच्या आगमनाने झालेल्या आनंदाचा पहिला भर ओसरल्यावर मग कवीच्या संवेदनशील मनाला रानावनाचा, निसर्गाचा, रंग, गंध आणि त्याचे विभ्रम खुणावू लागतात. घटकेत पावसाची सर, घटकेत उन्हाचा कवडसा, त्यात उमटणारे इंद्रधनुष्य हे सौंदर्य सगळ्यांच्या नित्याच्या परिचयाचे, पण कवीला हे सौंदर्य निराळेच जाणवते. रानावनात उतरणारे सोनेरी उन माहेरपणाला आल्यासारखे येते आणि त्याचे हिरवे माहेरही साधेसुधे नाही तर पाचूंचे !! उन स्त्रीवाचक नाही पुरुषवाचक आहे अन तरीही ते माहेरपणाला येते. या माहेरवाशी उन्हाशी गट्टीफू करतानाच कपाळावर जमलेले श्रावणबिंदू मग फुलपाखरू होऊन जातात आणि मातीच्या गंधाने भरून गेलेला सारा आसमंत गाभाऱ्याचा एकजीव अनुभव पदरात टाकून जातो. ज्यासाठी जागून वाट पहावी, अशा सौख्यअनुभवांचे हे तपशील वाचकाला वा श्रोत्याला हात धरून आपल्यासवे घेऊन जातात.
श्रावणसरींनी सुस्नात झालेले रान रंगांचे रान होऊन जाते. वृक्षलतांच्या विविध छटांची हिरवाई आणि फुलांचे, फुलपाखरांचे नानाविध रंग निसर्गाची रंगपंचमीच जणू खेळत असतात... आणि त्या रानात रंगीबेरंगी स्वप्नांचे पक्षी विहार करू लागतात. नुसते विहारच करतात असे नव्हे तर हरवून जातात स्वत:तच. घरदार विसरून, तहानभूक विसरून... निळ्या रेशमी पाण्यावर थेंबबावरी नक्षी उमटू लागते... रेशीमसरी बरसतात आणि तळ्यातल्या संथ पाण्यावर पडणारे पाऊसथेंब नवपरिणीतेच्या नवथरपणाने नक्षी काढू लागतात. त्यात चंचलता असते, भांबावलेपण असते, अल्लडपणा असतो. अशा हिरव्या, ओल्या वातावरणातच रानफुलांचा गंध लेऊन वारा येतो आणि गतजन्मीची ओळख सांगतो. म्हणतो, `आठव..., तू असाच रमून माझ्याशी गुज करीत होतास आणि अचानक निघून गेलास. मी अजूनही तसाच आहे, वाहतो आहे... गंध लेवून, परिसराला सुगंधी करीत. तू कसा आहेस? तसाच आहेस की बदललास? तुला ओळख आहे या साऱ्यांची?' गीताच्या या पंक्ती ऐकणाऱ्याला अशाच एका भावतंद्रीत घेऊन जातात.
झाडांची पाने जणूकाही निसर्गाचे हात होतात आणि शुभ शकून सांगणाऱ्या कोमल ओल्या रेषा; भविष्याचे चांदणगंध तुझेच आहेत असे आश्वासन देतात. निसर्गाशी अन नियंत्याशी असलेला हा संवाद खरे तर प्रेमालापच आहे... अशरीरी... अनाहत... अशब्द... बोलणारा आणि ऐकणारा दोघांच्याही हृदयाच्या तारा छेडणारा, पण कुणालाही ऐकू न येणारा असा हा संवाद. अंतरात एकाच सुराचं आवर्तन सुरु होतं... `आज किनारा नाही, जे आहे ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. या सौख्याला, या आनंदाला अंत नाही... मर्यादा नाही... किनारा नाही...'
श्रावणाचं साजणरूप, निसर्गाचं रंगबावरं भावरूप, त्याची नादमयता, त्याचा आकृतीबंध आणि या साऱ्याच्या माध्यमातून मिळणारा अपरूप, नि:स्तब्ध, अलवार आनंद अनुभवून देण्याचं मंगेश पाडगावकर यांच्या या गीताचं सामर्थ्य अनेक तपांनंतरही कायम आहे.
- श्रीपाद कोठे
(लोकसत्ता- रविवार, ७ ऑगस्ट २००५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा