सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

परिवर्तन

दोन दिवसांपूर्वी लहान भावाच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याला एक मुलगा. त्या दिवशी मग आईने आणि मुलाने त्यांना ओवाळले. मुलगा, मुलगी, मुली हे करतात मुलांनी का करू नये, बदल, परिवर्तन इत्यादी इत्यादी खूप चालत असतं. हे त्यातील काहीही नाही. आज आपण ज्या भाषेत बोलतो, जी शब्दावली वापरतो तीच खरं तर तोकडी अन भ्रमित करणारी आहे. ११ वीत शिकणाऱ्या पुतण्याने आईवडिलांना ओवाळणे हा स्वाभाविक विकासाचा आविष्कार आहे. अमुक केलं म्हणजे अमुक, अमुक केलं नाही म्हणजे तमुक, अमकी गोष्ट सिद्ध करायला अमुक करायचं वगैरे वगैरेच्या पलीकडचा हा आविष्कार. झाडाला कोंब फुटतात तसा सहज उगवलेला. चांगलं, वाईट, श्रेष्ठ, कनिष्ठ, न्याय, अन्याय या परिभाषात न अडकणारा. थोडं वेगळं आहे म्हणून सगळ्यांना सांगण्याचा मोह झाला.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१६

undefinable

धार्मिक वृत्तीने दैव हे undefinable तत्व जन्माला घातलं, तर इहवादी वृत्तीने मानवी प्रयत्न हे undefinable तत्व जन्माला घातलं.

दोन्हीत नेमकेपणा नाही.

दोन्हीत uncertainty आहे.

दैवाने निष्क्रीयतेसोबत मानवीयता पण जोपासली.

मानवी प्रयत्नांनी सक्रियतेसोबत अमानवीयता, शोषण, स्पर्धा जोपासले.

पर्याय - निष्काम कर्म.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१८

अनाकलनीय

पूर्व दिशा पश्चिम दिशेची विरोधक आहे का?

रात्र ही दिवसाची विरोधक आहे का?

उत्तर हे प्रश्नाचं विरोधक आहे का?

चुंबकाची दोन टोके एकमेकांची विरोधक आहेत का?

जमिनीत जाणारी मुळं आकाशाकडे जाणाऱ्या फांद्यांची विरोधक आहेत का?

एकाच गोष्टीची दोन स्थानं, दोन अवस्था; हे आकलन खरंच खूप कठीण असतं का?

की प्रत्येक गोष्ट 'विरोध' या स्वरूपात पाहण्याचा अमीट असा संस्कार आहे आपल्यावर?

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१९

५०० ची नोट

१५ दिवसांपूर्वी व्यवस्थित शोधल्यानंतरही चार दिवसांपूर्वी सुटकेसमध्ये लपून बसलेली एक ५०० ची नोट सापडली. पैसा हा तसाही आकर्षणाचा विषय नसल्याने त्यात आश्चर्यही काहीच नाही. मग ती जमा करण्याचे काम आले. मधल्या काळात काल पेट्रोल भरायला गेलो. तेव्हा तिथला मुलगा थोडी का-कु करीत होता. चिल्लर नाही वगैरे. बाजूच्या पोराने आवाज दिला- सर इकडे या. त्याला विचारलं, चिल्लर आहे ना? तो म्हणाला. कितीचं भरू? मी उत्तर दिलं- १००. त्यानं पेट्रोल भरलं. चिल्लर पैसे परत दिले. मग म्हणाला- सर खूप दिवसांनी आले. बाहेर गेले होते का? म्हटलं, नाही रे. त्यावर म्हणाला- नाही. दसऱ्याला आले होते. पेट्रोल भरल्यावर मला सोनं पण दिलं होतं. त्यानंतर आजच दिसले. म्हणून विचारलं. मी हसलो आणि निघालो. मी विसरून गेलेली गोष्ट त्याने लक्षात ठेवली होती. मी त्याचा चेहरा विसरून गेलो होतो. त्याने मात्र मला लक्षात ठेवले होते. कदाचित त्या क्रेडीटवरच स्वत: आवाज देऊन ५०० ची नोट स्वीकारली होती त्याने. स्वामी विवेकानंद म्हणत- तुमची दुष्ट कर्मे तुमची पाठ सोडणार नाहीत अन तुमची सत्कर्मे देवदूत बनून सदैव तुमचे रक्षण करतील. कोणास ठाऊक? या सगळ्या मोठाल्या गोष्टी. आपण आपलं करत राहावं काहीतरी...

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१६

समाजसेवा

महिलांच्या आयसीसी २०-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात मिताली राज या माजी कर्णधाराला स्थान न मिळाल्यावरून वाद सुरु आहे. आज तिचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यात बाकी गोष्टींसोबत तिने म्हटलं आहे की, मी देशासाठी जे काही केलं त्याची जाणीव सध्याचे प्रशिक्षक, कर्णधार ठेवत नाहीत. गंमत वाटली. एक जुना प्रसंगही आठवला. शेतकरी आत्महत्या संदर्भात विदर्भाचा प्रवास सुरु होता. मी आणि आमचा छायाचित्रकार शेखर सोनी होतो. बहुतेक अमरावतीच्या विश्रामगृहातील प्रसंग असावा. सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नाश्ता करताना गप्पा सुरु होत्या. शेखर म्हणाला- आपण पत्रकार देखील समाजसेवाच करतो ना? मी त्याला विचारले- आपला पगार बंद झाला तर आपण ही सेवा करू का? त्याला विषय समजला. आपल्या कृतीने side effect स्वरुपात काही चांगल्या गोष्टी होणे, समाजाचा फायदा होणे, समाजसेवा होणे, देशाचे नाव उंचावणे हे ठीक आहे. पण खरंच आपण ते करत असतो का? समाजासाठी, देशासाठी काही करणे ही वेगळी गोष्ट असते. पण कधी कधी आपल्या कृतीच्या side effect चे भांडवल करण्याचीही इच्छा होते माणसाला. अन celebrity असे भांडवल करतात तेव्हा त्याचा प्रवाह होतो. हे फारसं चांगलं नाही म्हणता येत.

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१८

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

संविधान

दोन दिवस संसदेत चाललेल्या `संविधान दिनावरील' चर्चेत मला सगळ्यात आवडलेले भाषण होते बिजदचे (बीजेपीचे नव्हे) कटकचे खासदार भर्तृहरी मेहताब यांचे. अर्थात पंतप्रधानांचा अपवाद. मोदीजींचे भाषण master piece होते. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी काल `गंभीर परिणामांची' धमकी दिली. ज्या मुद्यावरून त्यांनी ही धमकी दिली त्याला श्री. भर्तृहरी मेहताब यांनी आज नेमके उत्तर दिले. अन खडगे यांचे नाव घेऊन, त्यांचा उल्लेख करून त्यांनी हे उत्तर दिले. श्री. मेहताब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्धृत केले. जे भाषण मेहताब यांनी उद्धृत केले त्यात, आंबेडकरांनी अमेरिकेची घटना तयार करणारे thomas jefferson यांना उद्धृत केले होते. त्याचा आशय असा की, `राज्यघटना वर्तमान समाजाच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब असते. भावी पिढ्यांना आम्ही त्याने जखडून ठेवू इच्छित नाही.' जेफरसनला उद्धृत करून बाबासाहेबांनी आपले मतच व्यक्त केले. तेही नि:संदिग्धपणे.

खरे तर हेच तर्कपुर्ण आहे. भारतीय परंपराही हेच सांगते- `नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणं...' कोणाही एकाचं वचन कायम प्रमाण नसतं. या विषयाकडे तटस्थपणे पाहण्याची अन विचार करण्याची गरज आहे. राजकीय भूमिका वेगळी असू शकेल. मोदीजींनी तर ती स्पष्टपणे मांडलीच आहे. देशाचा नेता म्हणून ती अतिशय योग्यही आहे. पण वैचारिक स्तरावर याची तटस्थ चर्चा व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१५

(राज्यकर्ते काय करतात याकडे फार लक्ष देणे थांबवले पाहिजे. ते तटस्थपणे विचार करतील तेव्हा करतील. तुम्ही-आम्ही तटस्थ विचार करणे सुरु केले पाहिजे. समाजाची उंची जेवढी वाढेल तेवढं राजकारणही ठीक होईल. पण समाजच राजकारणाकडे डोळे लावून बसला तर काहीच नीट राहणार नाही.)

मुस्लिम renaissance

मुस्लिम दहशतवाद हा आता anti hindu, anti christian राहिलेला नाही. इजिप्तमध्ये शुक्रवारी मशिदीत झालेला बॉम्बस्फोट याचे ताजे उदाहरण आहे. त्यात थोडेथोडके नव्हे, तीनशेहून अधिक लोक मारले गेलेत. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम देशांमधील अनेक घटना आणि घडामोडी हेच दाखवतात. एक मुस्लिम renaissance आकारास येते आहे. भारतातदेखील त्रिवार तलाक असो किंवा रामजन्मभूमीचा मुद्दा असो; हे दिसून येते आहे. परंतु १३००-१४०० वर्षांचा इतिहास सहजासहजी विस्मरणात ढकलणेही चुकीचेच आणि तोच धरून ठेवणेही अयोग्य. विभिन्न विचारांचा, आचारांचा, व्यवहारांचा, धारणांचा, भावनांचा समन्वय घडवणे आणि त्यांना व्यापक मानवी जीवनाचे एकात्म अंग बनवणे ही भारताची विशेषता आहे आणि नियतीही. त्यामुळे मुस्लिम दहशतवादाच्या संदर्भात cautious and prudent असाच approach हवा. काळानुसार हाही बदल आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१७

वैचारिक आव्हान

काल संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण झाले. त्यांनी अधिकार आणि कर्तव्याचा महत्वाचा मुद्दा मांडला. पण तोही आता जुना झाला आहे. सहज एक लेखमाला आठवली. स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर साप्ताहिक विवेकमध्ये लिहिलेली. दर आठवड्याला लेख येत असत. बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता. त्या लेखमालेचा समारोप करताना एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत बिंदू त्यांनी मांडला होता. 'मी एखाद्याचे शोषण का करायचे नाही' या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय जगातील शोषण थांबणार नाही. या basic, fundamental, philosophical बिंदूपर्यंत विचारप्रक्रिया पोहोचत नाही तोवर सगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अपुरेच ठरणार. सगळ्या षडविकारांचा नाच सुरूच ठेवून, त्याला खतपाणी घालत, त्यांचे चोचले पुरवत; चांगल्या मानवाची अपेक्षा करणे हे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ज्या 'न्याय' या तत्वाची चर्चा होते तो 'न्याय' सुद्धा, अशा स्थितीत संदर्भहीन होतो. 'न्याय' या तत्त्वाने आजवर अन्याय, क्षोभ, अस्वस्थता, अशांती, सूड, प्रतिशोध यांनाच मोठ्या प्रमाणावर जन्म दिला आहे. यात भारतीय, अभारतीय असे काही नाही. विचारांची आव्हाने खूप मोठी आहेत.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१९

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

संविधान दिवस आणि आर्य चर्चा

लोकसभेत आज सुरु असलेल्या `संविधान दिनावरील' चर्चेच्या वेळी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरळण्यावरून काँग्रेसची सहिष्णूता किती पोकळ आहे हे स्पष्ट झालं. गृहमंत्री बोलत असताना काहीही संदर्भ नसताना उठून उभं राहायचं अन `तुम्ही आर्य परके आहात. आम्हीच पाच हजार वर्षांपासून राहतो. हा देश तुमचा नाही', वगैरे बेंबीच्या देठापासून ओरडायचं हीच यांची सहिष्णूता. बरं जो मुद्दा आपण मांडतो आहे त्याचा किंचित तरी विचार करायला हवा की नको. खुद्द ज्यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संविधान दिवस साजरा होत आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `आर्य या देशात बाहेरून आले' हा सिद्धांत खोडून काढलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी तो सिद्धांत फेटाळला आहे. गांधीजींना तो सिद्धांत मान्य नव्हता. विदर्भातील प्रज्ञावंत जन्मांध (वयाच्या ११ व्या महिन्यातील अंधत्व) संत गुलाबराव महाराज यांनीही तो सिद्धांत खोडून काढला आहे. (गुलाबराव महाराजांचा उल्लेख मुद्दाम केला. त्यांची दखल घेणं का आवश्यक आहे हे समजण्यासाठी जिज्ञासूंनी ते अन त्यांचे साहित्य जाणून घ्यावे.) असे अनेक आहेत. `आर्य बाहेरून आलेत' हा सिद्धांत आता कोणीही ग्राह्य धरत नाही. वादासाठी तो ग्राह्य धरला तरीही, खरगे यांनी हे स्पष्ट करावे की, ते ज्यांच्या पायी नतमस्तक होतात ते गांधी घराणे अन त्याचे मूळ पुरुष असलेले समस्त नेहरू, यांनाही ते भारतात उपरेच मानतात का?

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

सेक्युलर : पंथ निरपेक्ष

लोकसभेतील आजच्या चर्चेतला एक अतिशय महत्वाचा मुद्दा- secular या शब्दाचा राज्यघटनेत वापरण्यात आलेला पर्याय आहे `पंथनिरपेक्षता.' त्यामुळेच `धर्मनिरपेक्षता' हा शब्द केवळ चूक नव्हे तर घटनाविरोधी ठरतो. गृहमंत्र्यांनी `पंथनिरपेक्षता' शब्द वापरण्याचे, प्रचलित करण्याचे आवाहन केले आहे. एका अर्थी `धर्मनिरपेक्षता' शब्द वापरणारे घटनाद्रोही ठरतात. सगळ्यांनी घटनेला अभिप्रेत शब्द वापरावा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

असहिष्णुता आणि सर्कस

नागपुरात अमर सर्कस लागली आहे. हे काही मला सांगायचं नाही.

आज आम्ही ती पाहायला गेलो. मला हेही सांगायचं नाही.

सर्कस चांगली आहे. गर्दीही होती. पण सांगायचं हेही नाही.

सांगायचं हे आहे की, तिथे अनेक मुस्लीम महिलाही आल्या होत्या. त्या महिला आहेत, हे त्यांच्या बुर्ख्यांवरून कळत होते. त्या छान हसत खेळत सर्कसचा आनंद घेत होत्या. त्यांचे खाणेपिणे सुरु होते. अन निघताना लक्षात आले की, त्या ऑटोरिक्षाने चालल्या होत्या. म्हणजे आल्याही ऑटोरिक्षानेच असतील. मुद्दा एवढाच की, असहिष्णूता त्यांना जाणवलेली दिसली नाही.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

जनधन खाती

आम्ही वेडे आहोत का? कालपासून जनधन बँक खात्यांची चर्चा सुरु झाली आहे. एकूण जनधन खाती २६ कोटी. (२५ कोटी ८० लाख). त्यात जमा झालेत ६६ हजार कोटी रुपये. त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजे ६-७ कोटी खात्यात काहीच नाही. म्हणजे २० कोटी जनधन खात्यात ६६ हजार कोटी रुपये. म्हणजेच सरासरी २० कोटी खात्यात ३ ते ४ हजार रुपये. ही जनधन खाती बहुतेक ग्रामीण अथवा कामगार (labour) वर्गाची आहेत. त्यांच्याजवळ असलेले ३-४ हजार रुपयेही जमा झालेले असू शकतात. ती रक्कम काही फार मोठी नाही. हां, काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झालेली असू शकते. सगळ्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊच शकत नाही. समजा मोठी रक्कम जमा झाली तर जनधन खात्यातील जमा लाखो कोटीत होईल. पण ती केवळ ६६ हजार कोटी रुपये एवढी आहे. काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाली असेल तर ते सहज लक्षात येईल आणि त्याची चौकशी करता येईल. मग सध्याचा गोंधळ का आणि कशासाठी चालू आहे? कोण हा गोंधळ करीत आहे? जणू काही जनधन खात्यांमध्ये सगळा काळा पैसा जमा होत असल्याचे चित्र का आणि कोण निर्माण करीत आहे? अतिउत्साही मोदी वा भाजपा समर्थक? की, मोदींच्या वा केंद्र सरकारच्या विरोधातील कोणी जाणूनबुजून हे करीत आहे? विरोधक करीत असतील तर समर्थक त्याला बळी पडून स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेत आहेत? एकदा समर्थन करायचे म्हटले की, डोकं गहाण ठेवून ते करायचे का? सरकारचे वा भाजपचे यावर काय मत आहे? भारतीय जनता पार्टी अधिकृतपणे पत्र परिषद घेऊन अशा प्रकारांशी, त्यावर चालणाऱ्या उटपटांग समर्थन लाटेशी आपला संबंध का तोडीत नाही? केवळ अर्थमंत्री वा अन्य काही मोजक्या जबाबदार लोकांचेच म्हणणे हे आमचे म्हणणे आहे, असे जाहीर का करीत नाही? भाजपा अथवा सरकारच्या प्रचार यंत्रणेशी याचा संबंध नाही हे जाहीर का करीत नाही. की, भाजपला हे हवेच आहे?

खरेच आम्ही वेडे होत आहोत. बहुधा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१६

संविधान

Mirror Now वर संविधान दिना निमित्त चर्चा पाहिली, ऐकली. राज्यघटनेचे पाच जाणकार होते. राजकीय व्यक्ती एकही नव्हती. सोली सोराबजी, ऍड. सुंदरम, ऍड. हेगडे असे लोक होते. या वाहिनीचे एकूण स्वरूप लक्षात घेता एकूण चर्चेचा रोख थोडा भाजप विरोधी होता. त्यात नवीन काही नाही अन आक्षेप घेण्यासारखेही काही नाही. पण एकूण चर्चा अतिशय उच्च दर्जाची होती. परंतु ही गंभीर चर्चा ऐकताना हे जाणवले की अजूनही आपली बौध्दिकता स्वप्नाळू गुलाबीपणात वावरते आहे. वेदांनी म्हटले आहे की, वेद वाचून सत्यलाभ होणार नाही. कुठेतरी आपली बौध्दिकता या धाडसापासून दूर राहते. फक्त ऍड. सुंदरम यांनी एक मूलभूत मुद्दा उपस्थित केला की, आज घटनेला धोका आहे असे वाटत असेल तर तो कोणाकडून? ज्यांच्यासाठी ही घटना आहे त्या समाजाकडून. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, ज्या समाजासाठी ही घटना आहे तिला ती आपली का वाटत नाही? अन तिच्यासाठी असलेल्या घटनेनुसार वागताना ती का दिसत नाही?

मला वाटते, यापुढील या विषयाच्या चर्चा या प्रश्नांपासून सुरू व्हायला हव्यात. खूप मोठा विषय आहे. पण तो दृष्टीआड करून चालणार नाही. नाही तर सगळं बरंच बरं आहेच.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१८

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

शाकाहाराचा वाद

`शेलारमामा पुरस्काराचा वाद' किंचित वाचण्यात आला. त्यासाठी असलेली शाकाहाराची अट रद्द करण्यात आल्याचे त्यात होते. तपशील अलाहिदा, पण असे झाले असेल तर ते निषेधार्ह आणि धोकादायक आहे. हा पुरस्कार एका `कीर्तनकार शेलार' यांच्या नावाने म्हणजे कदाचित त्यांच्या देणगीतून असावा. कीर्तनकार असल्याने स्वाभाविक शाकाहाराचा आग्रह असेल. त्यात झुंडशाही करण्याची गरज काय? प्रत्येकच पुरस्कार आमच्यासाठी खुला असलाच पाहिजे ही दादागिरी झाली. आम्ही शाकाहारी नाही त्यामुळे त्या पुरस्कारासाठी पात्र नाही हे स्वीकारण्यात अडचण काय आहे? योगशास्त्रात यम आणि नियम सांगितले आहेत, नीतिशास्त्र करणीय आणि अकरणीय असा भेद करते, इंग्रजीतही do's and dont's असे असतेच. शरीरशास्त्र असो वा मानसशास्त्र `हे करावे, हे करू नये' असे असतेच. तो मानवी जीवनाचा भागच आहे. मग समाजाची नैतिक मशागत करण्याचा वसा घेतलेल्या कीर्तनकारांनी वा त्यांच्या वारसांनी त्यांच्या नावाच्या पुरस्कारासाठी आहाराची अट ठेवली असेल तर त्यात वावगे काय? आम्हाला नको पुरस्कार म्हणून बाजूला व्हावे. झुंडशाही कशाला? गेल्या शंभरेक वर्षात माणसाची आणि समाजाची विचारांशी असलेली नाळ तोडण्याचे जे उपद्व्याप सुरु आहेत त्याचाच हा परिणाम आहे. `ज्याला त्याला त्याच्या विचार व्यवहाराचे स्वातंत्र्य असावे' असा शहाजोगपणा करत, व्यवहारात मात्र आधुनिक- पुरोगामी- बुद्धिवादी- इहवादी- इत्यादी प्रकारची झुंडशाही यांचेच थैमान सुरु आहे. विवेकशून्यतेचा वसाच त्यांनी घेतलेला आहे. आजवरच्या सरकारांनी देखील `राजकीय हिशेब' जमवण्यासाठी या झुंडशाहीची तळी उचलून धरली. विद्यमान सरकारे आणि त्यांचे पक्ष, तसेच समर्थक यांनी या झुंडशाहीच्या मानसिक व व्यावहारिक गुलामीच्या साखळ्या भिरकावून दिल्या पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१७

डॉ. आंबेडकर यांचा वेचा

मनाचे स्थैर्य आणि नीरक्षीरविवेक म्हणजे काय याचा उत्तम नमूना-

`मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

या छोट्याशा वेच्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. ते पुन्हा केव्हा तरी.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१७

गुणांची वर्गवारी

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू प्रत्येक जीवाच्या ठायी असतात. अठरापगड जातीतील कोणतीही जात असो- वरची, खालची, मधली वगैरे; कोणत्याही धर्माचा अनुयायी असो; कोणत्याही देशाचा नागरिक असो; कोणतीही राज्यघटना असो; स्त्री असो की पुरुष असो; वृद्ध असो की बालके असो; सगळ्यांमध्ये हे सहा रिपू inbuilt असतात. याचा अर्थ सगळे सारखे दोषी किंवा निर्दोष, सारखे गुणसंपन्न किंवा अवगुणी असतात असे नाही. या सहा रिपूंचं नियंत्रण, नियमन करत करत जीव जगतो. यांच्या कमीअधिक प्रमाणानुसार, यांच्या त्या त्या वेळच्या प्रयोजनानुसार व्यवहार पाहायला मिळतो. म्हणूनच एखादा शूरवीर सुद्धा प्रसंगी भेकडासारखा वागू शकतो, अन एखादा शेळपट शूरवीरासारखा. सगळ्या परस्परविरोधी गोष्टींना हे लागू होऊ शकते. म्हणूनच कोणतेही watertight classification चुकीचे असते. दुर्दैवाने वैज्ञानिक विचारपद्धती किंवा वास्तववादी विचारपद्धती या नावांनी अशा watertight classification ची सवय लावण्यात आली आहे. जी मुळात अवैज्ञानिक, अवास्तव अन अशास्त्रीय आहे.

सहिष्णूता- असहिष्णूता यावर सध्या जे वादविवाद सुरु आहेत त्या संदर्भात ही मूळ बाब दृष्टीआड झालेली पाहायला मिळते. तशी ती बहुतेक वेळाच दृष्टीआड होते, हा भाग अलाहिदा.

- श्रीपाद कोठे

२४ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

रज्जुभैय्या चरित्र

खूप दिवसांचं एक काम राहिलं होतं. संघाचे चवथे सरसंघचालक स्व. रज्जुभैय्या यांच्या चरित्राचं वाचन. आज झालं वाचून. या दिवाळीला घेतलं आणि मागच्या ४-५ दिवसात वाचलं. प्रसिद्ध लेखक आणि टीव्ही चर्चांमध्ये येत असल्याने अनेकांना माहिती असलेले श्री. रतन शारदा यांनी लिहिलेलं आणि संपादित केलेलं आहे.

एकच म्हणेन- सगळ्यांनी आवर्जून वाचावं.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१८

संघ व मुस्लिम

 प्रेस विज्ञप्ति

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की एक 

बैठक हुई,जिसमें डॉ फिरोज खान के

संस्कृत विद्या एवं धर्म विज्ञान 

संकाय के साहित्य विभाग में नियुक्ति के संदर्भ में चल रहे विवाद से सम्बंधित सभी पहलुओं पर विस्तृत विचार विमर्श किया गया।संघ का मत है कि डॉ.फिरोज ख़ान का विरोध करना गलत है।संघ उससे सहमत नहीं हैं और संघ का स्पष्ट और दृढ़ मत है कि संस्कृत साहित्य को समर्पित व श्रद्धा भाव से पढ़ाने वाले,वैधानिक चयन प्रक्रिया से नियुक्त किसी भी व्यक्ति का साम्प्रदायिक आधार पर विरोध विधि विरूद्ध व सामाजिक सौहार्द बिगाड़ने वाला है।संघ इस वृत्ति, प्रवृत्ति का विरोध करता है।यह संस्कृत भाषा व साहित्य का प्रसार व प्रभाव है जिसका लाभ संपूर्ण विश्व के सभी को मिलना चाहिए ।

डा.जयप्रकाश लाल

विभाग संघचालक 

काशी

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१९

स्वातंत्र्य आणि व्यवस्था

स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो म्हणून स्वातंत्र्य नको असं म्हणता येत नाही. व्यवस्थेचा दुरुपयोग होतो म्हणून व्यवस्था नको असे म्हणता येत नाही. असे म्हणणे फारच बालीश असते. मग दुरुपयोग थांबवायचा कसा? दुरुपयोग थांबवायचा की नाही? उत्तर स्पष्ट आहे की, दुरुपयोग थांबवायलाच हवा. स्वाभाविकच दुरुपयोग थांबवायला एखादी व्यवस्था उभी केली जाते. त्याचा पुन्हा दुरुपयोग सुरू होतो. मेख आहे ती इथे. व्यवस्था हा व्यवस्थेचा वा स्वातंत्र्याचा दुरुपयोग थांबवण्याचा उपाय नसतो हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था किंवा स्वातंत्र्य यांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी माणूस विचारी, समजूतदार, बहुश्रुत, सुसंस्कृत असायला हवा. त्याच्या वागण्याबोलण्याचा, विचारांचा, समजूतदारीचा विशिष्ट स्तर हवा. करुणा, कौशल्य, माहिती, शिक्षण यापेक्षा हा स्तर भिन्न असतो याचं आकलन वाढायला हवं. या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असला तरी त्यात आणखीन एक घटक असतो सुजाणता. ही सुजाणता निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धत वा प्रक्रिया नाही. अनेक गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. हे सगळे संथपणे, जवळपास अदृश्यपणे होणारे काम आहे. व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून याकडे माणूस फारसे लक्ष देत नाही. स्वातंत्र्याचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग त्यामुळेच थांबत नाही अन गोंधळ वाढत राहतो.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०२०

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

व्यवस्था

व्यवस्था आपोआप निर्माण होतात. वाढत जातात. गुंतागुंतीच्या होतात. आक्रसत जातात. आकार, वजन आणि काच वाढत जातात. अन व्यवस्था कोसळतात. उदाहरण म्हणून - जुन्या चातुर्वर्ण्य व्यवस्था, जाती व्यवस्था, कुटुंब व्यवस्था अशाच निकालात निघाल्या. वर्तमान व्यवस्था सुद्धा याच मार्गाने जातील. जगाचाही इतिहास हेच सांगतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच व्यवस्थांना हे लागू होऊ शकतं.

- श्रीपाद कोठे

२१ नोव्हेंबर २०१९

भारताचा प्रतिनिधी

विस्ताराने लिहीन पण तूर्त एक मुद्दा विचारांसाठी. चाणक्य हा भारताचा एकमेव प्रतिनिधी नाही. ज्ञानेश्वर हा सुद्धा भारताचा प्रतिनिधी आहे. चाणक्य नीतीने पसायदानाचा गळा घोटू नये. आमचे वर्तमान चिंतन अभारतीय विचारांवर सुरू आहे. योग्य विचार आणि मूल्यांचे चिंतन, जे तात्विक स्तरावर व्हायला हवे ते संपले आहे. खूप गंभीरपणे या विषयाकडे पाहिले जायला हवे. विचारांच्या स्तरावर भयावह स्थिती आहे.

- श्रीपाद कोठे

२२ नोव्हेंबर २०१९

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

स्थैर्याचा अभाव

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

कशासाठी? पैशासाठी !

१) शिक्षण कशासाठी? - पैशासाठी.

२) धान्य, भाजीपाला, फळे कशासाठी? - पैशासाठी.

३) दुधदुभते कशासाठी? - पैशासाठी.

४) पाणी कशासाठी? - पैशासाठी.

५) कारखाने कशासाठी? - पैशासाठी.

६) उत्पादन कशासाठी? - पैशासाठी.

७) जमीन कशासाठी? - पैशासाठी.

८) सत्ता कशासाठी? - पैशासाठी.

९) नाती कशासाठी? - पैशासाठी.

१०) कला कशासाठी? - पैशासाठी.

११) ज्ञान कशासाठी? - पैशासाठी.

१२) विज्ञान, तंत्रज्ञान कशासाठी? - पैशासाठी.

१३) लेखन कशासाठी? - पैशासाठी.

१४) प्रेम कशासाठी? - पैशासाठी.

१५) द्वेष कशासाठी? - पैशासाठी.

१६) सेवा कशासाठी? - पैशासाठी.

१७) आनंद कशासाठी? - पैशासाठी.

१८) दु:ख कशासाठी? - पैशासाठी.

१९) व्यवसाय कशासाठी? - पैशासाठी.

२०) सहकार्य कशासाठी? - पैशासाठी.

२१) पैसा कशासाठी? - पैशासाठी.

यादी वाढवायला प्रत्येक जण मोकळा आहे.

गेली सुमारे तीनेकशे वर्षे जगात हीच तत्व मानली जात आहेत. भांडवलशाही असो की समाजवाद की साम्यवाद; सगळ्यांना हे मान्य आहे. त्यांच्यात मतभेद आहेत ते फक्त मालकी आणि प्रमाण यावरून. जे या विचारधारा मानत नाहीत त्यांच्याही मनात हीच उत्तरे विविध मार्गांनी ठसवण्यात आली आहेत. पण हा रस्ता आता एका dead end ला येऊन पोहोचला आहे. गेली ८-१० वर्ष ही जाणीव होऊ लागली आहे. मात्र उपाय सापडत नाही वा दुसरा रस्ता सापडत नाही. `पैशासाठी' या उत्तराऐवजी `जीवनासाठी' हे उत्तर जर मन-बुद्धीवर बिंबवल्या गेलं तर कदाचित उत्तर सापडू शकेल. अन नाही सापडलं तर नाही सापडलं. आज तरी कुठे काही हाती लागलंय?

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

भारत तोडण्याचे कारस्थान

Twitter सीइओने 'smash bramhanical patriarchy' असं पोस्टर me too शी जोडून टाकलं आहे.

भारतीय समाज तोडण्याचे आणि नासवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत याचं ताजं उदाहरण आहे हे.

हिंदू, भारत, ब्राम्हण, परंपरा, संस्कृती, वेद, उपनिषदे, पुराणे, धर्म, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, लज्जा, शालीनता, मर्यादा, आदर, समन्वय, वेळप्रसंगी माघार घेणे, नम्रता, अध्यात्म, आत्मसंयम, व्रते, व्रतस्थता, उपासना, मंदिरे, प्रतिके... या सगळ्यात काहीही कमीपणा नाही. लाज वाटण्यासारखं काहीही नाही. बचावात्मक पवित्रा घेण्यासारखं काहीही नाही. या संबंधात होणारा सगळा गोंधळ हा निर्लज्ज, स्वार्थी, वखवखलेल्या, निर्बुद्ध लोकांचा नीच राक्षसी प्रयत्न आहे. हा प्रयत्न निर्ममतेने हाणून पाडायला हवा. सध्याचा रोख महिला वर्ग आहे. खूप सावधपणे हे हाताळायला हवे. महिलांनी सुद्धा भावनिक न होता या सगळ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१८

वेड्यांच्या जगात

आपण वेड्यांच्या जगात राहतो आहोत का? एकीकडे पेट्रोलियम पदार्थांवर सगळं खापर फोडत असतानाच, 'तुम्ही पुष्कळ दिवसात सिलेंडर बुकिंग केलेलं नाही. लवकर बुकिंग करा नाही तर तुमचं कनेक्शन रद्द होईल' म्हणून गॅस कंपनी फोन करत राहते. काय म्हणायचं याला? कुठे चाललो आहे आपण? उद्या, 'तुम्ही खूप दिवसात गहू तांदूळ घेतले नाही' म्हणून किंवा त्याहीनंतर 'तुम्ही खूप दिवसात चड्ड्या घेतल्या नाही' म्हणून मागे लागणार का? लाखो रुपये घेणारे/ कमावणारे तज्ज्ञ आणि अधिकारी इतके सुमार बालबुद्धीचे आहेत अन आपण भलभलती स्वप्नं पाहतो.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०२१

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

ईश्वर आणि पत्नी भाव

सध्याच्या चर्चायुगात चर्चेला/ विचाराला (गोंधळाला !!) थोडं खाद्य. एक निरीक्षण असं आहे की; हिंदूंचे म्हणून जे उपासना पंथ आहेत, प्रार्थना पद्धती आहे, त्यात ईश्वराची `पती भावाने' उपासना, पूजा तर आहे. तशी पदे, भजने वगैरेही आहेत. परंतु ईश्वराची `पत्नी भावाने' पूजा, उपासना मात्र नाही. माधानचे प्रसिद्ध संत गुलाबराव महाराज यांनी `श्रीकृष्ण पत्नी' म्हणून उपासना केली आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनीही `सखी भावाने' उपासना केली आहे. मीराबाई तर प्रसिद्ध आहेच. क्वचित एखादी सामान्य स्त्रीसुद्धा ईश्वरालाच पती मानून प्रत्यक्ष विवाह आदी करते, अशाही बातम्या वाचण्यात आहेत. (मी देवाला वाहिल्या जाणाऱ्या आणि जबरीने, दबावाने जे प्रकार होतात त्याबद्दल बोलत नाहीय.) मात्र, ईश्वराला पत्नी वा सखी मानून मात्र उपासना नाही. पदे इत्यादी नाहीत. किमान मला ठाऊक नाहीत. (कोणाला ठाऊक असल्यास सांगावे.)

माझी कमेंट??

बऱ्याच कमेंट आहेत. पण सध्या फक्त निरीक्षण with no comments.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०१८

स्वाभिमान आणि अहंकार

आत्मसन्मान आणि अहंकार

स्वाभिमान आणि अहंकार

यांची सीमारेषा कोणती?

संवेदनांचा अंत ही सीमारेषा.

ज्यावेळी संवेदना गाडली जात असेल, जाळली जात असेल, ठार होत असेल; त्यावेळी आत्मसन्मान किंवा स्वाभिमान अहंकारात बदलतो.

हे प्रभू, माझ्यातील संवेदना मरू देऊ नको.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०२१

एस. टी. स्थानकांचा वापर

एस.टी. संपाचा प्रश्न चिघळतो आहे. एक साधी गोष्ट का कोणाच्या मनात येऊ नये हा प्रश्न पडतो. एस.टी.ची शेकडो स्थानके आहेत. त्या जागांचा वापर स्थानकासह व्यावसायिक पद्धतीने केला तर उत्पन्न वाढू शकणार नाही का? व्यवसाय, यात्राजत्रा, लग्नकार्य, कौटुंबिक कामे, शेतीवाडी, नोकरी, सहल; अशा विविध कारणांनी लोक सतत फिरत असतात. मुंबई महानगरापासून तर एखाद्या पाचशे हजार लोकवस्तीच्या गावापर्यंत. या लोकांच्या राहण्या जेवण्याची दर्जेदार सोय माफक दरात करण्यासाठी स्थानकांच्या जागा विकसित करता येऊ शकतात. अशा लोकांना पंचतारांकित सोयींची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते. फक्त स्वच्छता, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, सुरक्षा, चांगले वातावरण एवढेच हवे असते. याशिवाय सौर ऊर्जा तयार करून विकता येऊ शकेल. मर्यादित प्रमाणात साठवणुकीची सोय उपलब्ध करून देता येईल. पण कोणाला काहीच करायचे नाही असेच दिसते. यात राजकीय वादावादी नसावी पण सगळ्यांना त्याची खुमखुमी असते म्हणून फक्त एक नोंद - मध्यंतरी पाच वर्षे भाजपचं राज्य होतं. त्यावेळीही असं काही ऐकू आलं नाही, दिसलं नाही.

- श्रीपाद कोठे

१८ नोव्हेंबर २०२१

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

दशक्रिया

`दशक्रिया'ची चर्चा सुरु झाली आहे. हे पोटभरू ब्राम्हणांचे उपद्व्याप आहेत असा एक युक्तिवाद असून त्यावरच मुख्य आक्षेपही आहे. प्रश्न असा की- जगातला कोणता व्यवसाय पोट भरण्यासाठी नाही? पोट भरणे हीच कोणत्याही व्यवसायाची मूळ प्रेरणा नसते का? अन व्यवसाय म्हणजे तरी काय? माणसाच्या किंवा पशूच्याही गरजांची पूर्ती करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याबदल्यात चरितार्थ कमावणे. या गरजा भौतिक, दैनंदिन जीवनातील असतात तशाच मानसिक, बौद्धिक, भावनिक आदीही असतात. समजा दशक्रिया हा असाच व्यवसाय आहे हे क्षणभर चर्चेसाठी मान्य केले तरीही त्यात आकाशपाताळ एक करण्यासारखे काय आहे? अन फसवणूक या मुद्द्याचा विचार करायचा तर- ज्या गोष्टी ढळढळीत दिसतात, समजतात; अगदी शेंबड्या मुलालाही लक्षात येऊ शकतात अशा कितीतरी गोष्टीत फसवणूक होतच असते. कोणतीही फसवणूक चूकच. पण त्याचे भांडवल करून उगाच आक्रस्ताळेपणा करण्याचे काय कारण? आधुनिकतेला आक्रस्ताळेपणा करण्याचा देवदत्त परवाना आहे की काय?

- श्रीपाद कोठे

१५ नोव्हेंबर २०१७

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

कार्तिकी

उद्या पुन्हा थिरकतील ती भेगाळलेली, काळवंडलेली शुभ पाऊले पंढरीच्या वाळवंटात. नाचतील तल्लीन होऊन. अशीच नाही येत ही तल्लीनता. त्यासाठी लीनता यावी लागते. कटीवर हात, विटेवरी उभा असा तो पांडुरंग भेटला की तोच देतो लीनता आणि तल्लीनता. पण कसा भेटावा तो?

हा काही साधासुधा देव नाही. वेदांनाही ज्याचा थांग लागला नाही असा ईश्वरी भावच सावयव झाला आहे तिथे. साकार पण निर्गुण !! हो, साकार पण निर्गुण. म्हणून तर हात कमरेवर ठेवले आहेत त्याने. त्याच्या हाती शस्त्र नाहीत, शास्त्र नाहीत, शाप नाहीत, आशीर्वाद सुद्धा नाहीत. विराग नाही, अनुराग नाही. त्याचा भाव ओळखूनच वामांगीही नाही. कारण त्याच्या ठायी पुरुष नाही आणि प्रकृती पण नाही. त्या अखंड चिन्मयाचा कोणताही विकार नाही आणि विलासही नाही. सारीच विलसीते विराम पावलेली. विश्वाच्या विभवाचा मागमूस नाही. तो फक्त आहे. नाकारता येत नाही अन आकारता येत नाही असा.

नाही करता येत त्याच्याशी वाटाघाटी. नाही साधता येत कुठली देवाणघेवाण. फक्त पोहोचायचं त्याच्या जवळ. त्याच्या सारखंच नि:संग होऊन. धनाचा, मानाचा, दानाचा, ज्ञानाचा, कर्त्याचा, अकर्त्याचा, विनयाचा, ताठरतेचा, माणसांचा, पशूंचा, सुखाचा, दु:खाचा, भक्ताचा, भक्तीचा... कसला कसलाही संग न धरता जायचं त्याच्याजवळ. मग तोच घालतो मिठी. देतो लीनता अन तल्लीनता. सारं सारं लोपून जातं आणि थुई थुई नाचू लागतो एकच सत चित आनंद... आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे !!

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२१

कशासाठी?

असंख्य लोकांना आवडणार नाही, तरीही...

मित्र मैत्रिणींनो- मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला एक महत्वाचा निर्णय घेतला. तो योग्य आणि आवश्यक होताच. सगळ्यांनी त्याचं अभिनंदनही केलं. त्याला आज सहा दिवस झालेत. अजूनही आपण त्यातच का अडकून आहोत? जो निर्णय निर्विवाद योग्य आहे त्याची पाठराखण करण्यासाठी आपण वेळ, बुद्धी, पैसा का खर्च करीत आहोत? आपल्याला विश्वास नाही का? किती प्रचारी आणि प्रतिक्रियावादी असावं? मोदी किंवा ३०० खासदारांचा पाठींबा असलेल्या सरकारला याची गरज आहे का? हा पटवून देण्याचा विषय आहे का? आक्षेपकांशी तू-तू, मी-मी करण्याचा विषय आहे का? `हाथी चले बजार, कुत्ते भोंके हजार' ही पारंपरिक शहाणपणाची उक्ती आपण विसरलो आहोत का? रोज वेगवेगळी आवाहने काय? नवनवीन कथा कहाण्या आणि अनुभव काय... कशासाठी हे सारे? कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा, गुरुनानक जयंती हे सगळं संचित विसरून जावं इतका कैफ येण्याचं काय कारण? आपण अनावश्यक, अवास्तव, अयोग्य राजकीय प्राणी झालो आहोत की काय? कशासाठी हे सारे? या सगळ्या प्रकारात देशभक्तीसारखी गंभीर आणि पवित्र गोष्ट आपण आठवडी बाजारात विकायला काढल्यासारखी मांडली याचंही भान सुटावं? कशाला घाबरतो आपण? की या राष्ट्राची प्रकृती नसलेली धुंदी आपल्याला चढली आहे? काहीच काम नसेल तर ध्यान लावून बसावे. त्याने अधिक फायदा होईल जगाचा.

`निर्माणो के पावन युग मे, हम चरित्र निर्माण न भूले' चरित्र म्हणजे केवळ पैशाचे स्वच्छ व्यवहार किंवा स्त्रीविषयीची निर्मळ दृष्टी एवढेच नाही. ते तर आहेच, पण त्यासोबत आणखीनही खूप काही आहे. तूर्त एवढेच. नमस्कार.

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०१६

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

cashless economy

cashless economy ची मोठी चर्चा देशात सुरु झाली आहे. त्याचे स्वरूप, गरज, शक्यता, फायदे, तोटे याकडे मात्र ती चर्चा अजून वळलेली नाही. विचारासाठी काही बिंदू-

१) जगात किती देश पूर्णांशाने cashless झालेले आहेत?

२) cashless याचा अर्थ चलन नाही असा होईल का?

३) रुपया ही गोष्ट अस्तित्वातच राहणार नाही का?

४) रुपया नसला तर विनिमय कसा होईल?

५) याचाच अर्थ रुपया राहणार फक्त तो हातात राहणार नाही.

६) पगार, वस्तू वा सेवांच्या किमती चलनातच राहणार.

७) ही barter system राहणार नाही.

८) प्रत्येकाला तंत्रज्ञान अवगत असणे, त्याचा वापर करणे बंधनकारक होईल.

९) तंत्रज्ञानाचा वेग वाढत जाईल आणि त्याच्याशी जुळवून घेणे आवश्यक ठरेल. हे किती शक्य आणि योग्य ठरेल?

१०) बिना रोखीचे अधिकाधिक व्यवहार असणाऱ्या देशांमध्ये भ्रष्टाचार, dirty money आहे वा नाही?

११) अतिशय घट्ट आर्थिक रचना सामाजिक स्थैर्य आणि स्वास्थ्यासाठी खरंच लाभकारी असते का?

१२) अमेरिकेतील subprime crisis आणि युरोपची सद्यस्थिती (ग्रीसचे दिवाळे आणि इंग्लंडने युरोपीय युनियनमधून बाहेर पडणे यासह) यांचे उदाहरण.

१३) पैसा न कमावणारे पण पैशांचा व्यवहार करणारे यांचे निर्माण होऊ शकणारे प्रश्न.

१४) मानवी जीवनाचा फार मोठा इतिहास cashless economy चाच आहे. त्यातून ज्या गरजांपोटी cash आली त्या कारणांचा विचार.

१५) पूर्वीच्या व आताच्या cashless economy चे अनुभव.

१६) cashless आणि excess cash यांचा तोल.

१७) व्यवहाराच्या आणि जीवनाच्या पद्धती बदलायच्या म्हणजे काय?

१८) देवाणघेवाण, खरेदीविक्री, व्यवसाय पद्धती, सवयी, भावना, उत्पादन, वितरण, उपभोग यांच्या पद्धती स्वीकारणे किंवा नाकारणे याचा आधार काय असावा? उदा. - credit card वापराने झालेले दुष्परिणाम.

१९) जंगल, जमीन, पाणी, नद्या, सगळी साधनसंपत्ती आणि चलन संपत्ती खाजगी अथवा सरकार नावाच्या मालकीची करून cashless economy करण्याचे परिणाम.

२०) रशियातील १९२० पासून साधारण सात दशकांचा प्रवास थोडाफार cashless economy चा म्हणता येईल. त्याच्या अनेक अंगांचा विचार.

आणखीनही पुष्कळ गोष्टी. विचारमंथन व्हावे. केवळ frenzy नको यासाठी.

- श्रीपाद कोठे

१३ नोव्हेंबर २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

समाज

- समाज अथवा सरकार माणसाला सुख देऊ शकतात का? सुखाची जाणीव किंवा समाधान या अर्थाने नाहीच देऊ शकत. परंतु सुखसाधने, व्यवस्था, वातावरण या अंगानेही माणसाला किती सुखी करू शकतात, किती सुख पुरवू शकतात? स्वप्नाळूपणा बाजूला ठेवून शक्यतांचा विचार करायला हवा.

- समाज ही सुद्धा मानवी विकासाची अंतिम अवस्था राहू शकत नाही.

- मानवी शरीराच्या उत्क्रांतीप्रमाणे त्याच्या मानसिक, बौद्धिक, भावनिक, जाणीवयुक्त, सांस्कृतिक, आध्यात्मिक उत्क्रांतीचाही विचार महत्वाचा आहे.

- आदर्श समाज नव्हे मानवमुक्ती हा भारतीय जीवनाचा आदर्श आहे. त्यासाठी सुव्यवस्थित समाज हा एक टप्पा आहे.

- श्रीपाद कोठे

१२ नोव्हेंबर २०१८

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कागदपत्रे

एखादा महत्वाचा कागद/ कागदपत्र हाताशी असतं आणि पुस्तक वाचताना ते त्यात ठेवलं जातं. नंतर एखाद्या वेळी त्याची गरज पडते. आपण अतिशय व्यवस्थित असतोच. जिथे सगळी कागदपत्रे असतात तिथे शोधतो. पण हवा असलेला दस्तऐवज सापडत नाही. मात्र पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी शोध शोध शोधतो. खाली, वर, आत, बाहेर, उलट, सुलट... सगळं होतं. दस्तऐवजाचा मात्र ठाम नकार. जिथे आपण कधीच कागदपत्रे ठेवत नाही तिथेही थकेपर्यंत शोधतो. पण निरर्थक. मग प्रथम चिडचिड, नंतर वैताग, नंतर हताशा, नंतर नशिबाला दोष. मग सगळं शांत. मग पूर्ण विसर. त्या कागदपत्रामुळे अडलेलं काम कृष्णार्पण. महिने जातात. अन कधीतरी पुन्हा ते पुस्तक हाती घेतो. कामाने वा बिनकामाने हाताळत असतो. अन ज्याने आपला प्रचंड छळ केला तो कागद अचानक दृष्टीस पडतो. तेव्हा होणारा आनंद, आपल्याच बावळटपणाचं हसू, अन हुश्श करणारं समाधान; यांचं रसायन निव्वळ अद्भुत असतं.

- तर, सगळ्यांना त्यांची त्यांची कागदपत्रे वेळेवर सापडोत. 😊

- श्रीपाद कोठे

११ नोव्हेंबर २०२०

पाणीदेयक

नागपूर महापालिकेचे पाणीदेयक फक्त paytm ने भरता येते. अन्य कोणत्याही ऍपने भरता येत नाही. अगदी भीमने सुद्धा. ही आर्थिक लोकशाही तर नाहीच पण याला unfair trade practice का म्हणू नये? शासन, प्रशासनाने एकाच व्यवसायाला प्रमोट करावे का? का करावे?

- श्रीपाद कोठे

११ नोव्हेंबर २०२१


बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

पथसंचलन बंदी

तामिळनाडूत रा. स्व. संघाच्या पथसंचलनावर राज्य सरकारने बंदी घातली होती. त्याविरुद्ध संघाने न्यायालयात धाव घेतली आणि राज्याच्या उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द करून सात ठिकाणी पथसंचलन काढण्यासाठी परवानगी दिली. मात्र तामिळनाडू सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि पथसंचलन काढू दिले नाही. त्याविरुद्ध संघ स्वयंसेवक आणि समर्थक अशा सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी राज्य सरकारच्या या वृत्तीचा निषेध करीत अटक करवून घेतली. निर्माण होणारे प्रश्न-

१) मनमानी करणारे, आकस बाळगून काम करणारे राज्य सरकार त्वरित बरखास्त का करू नये?

२) अत्यंत उथळ, निरर्थक `चुंबन आंदोलना'वर तासंतास बातम्या आणि चर्चा घडवणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी `बातमीमूल्य' वगैरे गुंडाळून ठेवले आहे का?

३) मोदी सरकारने देशातील प्रसार माध्यमांची झाडाझडती घ्यायला हवी की नको?

४) वृत्तवाहिन्यांचे आपल्या जीवनावरील आक्रमण आपण किती सहन करायचे?

५) वृत्तवाहिन्यांवर किती आणि कुठवर विश्वास ठेवायचा?

६) वृत्तवाहिन्यांचे खरे पोशिंदे आणि सामाजिक, आर्थिक व्यवहारातील त्यांची भूमिका उघड कधी होणार? त्यासाठी त्यांना योग्य सजा मिळेल का?

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०१४

व्यवस्थांचा पसारा

मानवी सभ्यता आणि संस्कृती यांच्याविषयीची मूळ जीवनदृष्टी बदलली नाही तर, चांगल्या व प्रामाणिक प्रयत्नांचा विपरीत परिणाम होईल. अमेरिका व भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडी याकडे निर्देश करतात. त्यातील एकेका पैलूवर विस्ताराने विचार करता येईल, नव्हे करावा लागेल. परंतु सूत्ररुपात बोलायचे तर माणसाचे माणूसपण गमावून सामाजिक, आर्थिक, राजकीय यंत्राचा एक खिळा अशा रुपात नवीन माणूस ठेवायचा आहे का? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. व्यवस्था मोठ्या होणे आणि माणूस अधिकाधिक लहान होणे, व्यवस्थांचा पसारा वाढणे आणि माणसाची space कमी होणे अशी ही क्रिया आहे. या विश्वाची मूळ स्थिती गती आणि मूळ भारतीय चिंतन माणूस विशाल आणि व्यापक व्हावा, व्यवस्था त्याला साहाय्यभूत व्हाव्या; या बाजूचे आहे. व्यवस्थायंत्राचा एक खिळा होऊन माणूस मोठा, महान, विशाल, व्यापक होऊ शकत नाही. रामकृष्ण आश्रमाच्या व्यवस्थेतून दुसरे रामकृष्ण परमहंस निर्माण झाले नाहीत, बौद्ध विहारांच्या माध्यमातून भगवान बुद्ध निर्माण झाले नाहीत, चर्चेसमधून येशू ख्रिस्त निर्माण झाले नाहीत, संशोधन संस्थांमधून किंवा विद्यापीठांमधून आईनस्टाईन, सोक्रेतीस, आर्यभट्ट वा याज्ञवल्क्य निर्माण होत नाहीत. पसारा कमी करत जाणाऱ्या व्यवस्था हव्यात. सध्याच्या जागतिक घडामोडी व्यवस्थेचा पसारा वाढवत जाणाऱ्या आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. तात्कालिक धोरण म्हणून अनेक गोष्टी योग्य असल्या तरीही त्या करताना दीर्घकालीन दृष्टी गमावून बसता कामा नये.

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०१६

एस. टी.चे खाजगीकरण

- एस.टी. महामंडळाचं खाजगीकरण झालं तर ती केवळ गावखेड्यांची, गरिबांची, कर्मचाऱ्यांची समस्या नसेल; ती मानवी संवेदनांची हत्या असेल.

- कोण चूक, कोण बरोबर, नियम काय, फायदा तोटा; यापलीकडच्या काही गोष्टी असतात हे अजूनही आपल्याला समजत नाही हे दुःखद आहे.

- छोट्या मोठ्या गोष्टींवर अमाप शक्ती वाया घालवणाऱ्या सोशल मीडियावर एस.टी. संप बेदखल राहावा ही शोकांतिका आहे.

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०२१

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

खाजगी व सार्वजनिक

१) देव- कोणीही केव्हाही दर्शन घेऊ शकतो. कोणीही केव्हाही त्याच्याशी बोलू शकतो.

२) धर्म- कोणीही केव्हाही करू शकतो. भुकेल्याला खाऊ घालणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, रुग्णाची सेवा करणे, अशिक्षिताला शिक्षण देणे; कोणीही केव्हाही करू शकतो.

३) चुंबन- कोणीही, केव्हाही, कोणाचंही घेऊ शकत नाही. कोणाला वाटलं कोणाचं चुंबन घ्यावं आणि त्याने ते घेतलं तर मार खायचीच वेळ.

४) तात्पर्य- देव, धर्म सार्वजनिक आहेत/ असू शकतात. चुंबन ही खाजगी गोष्ट आहे.

५) तरीही- सार्वजनिक गोष्टी घरापुरत्या असाव्यात आणि खाजगी गोष्टी जगजाहीर असाव्यात.

६) निष्कर्ष- वरील क्र. (५) म्हणजे आधुनिकता/ म्हणजे धर्मनिरपेक्षता/ म्हणजे पुरोगामित्व.

- श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०१४

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

विकृत आवड

सकाळी गाणे ऐकले- `उठी श्रीरामा प्रभात झाली... उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माउली'. थोड्या वेळापूर्वी रोणू मुजुमदारची बासरी ऐकली. राग गोरख कल्याण. सकाळी गाणे ऐकताना जाणवले- तीन मिनिटांच्या त्या गाण्यात किती variations आहेत. किती सौंदर्यस्थळे आहेत. रोणुची बासरी ऐकताना जाणवलं- पहिला अर्धा तास बासरीशिवाय दुसरं काहीही नाही. तबला सुद्धा नाही. तरीही जग विसरायला लावण्याची ताकद त्यात आहे. अर्थात नंतरच्या अर्ध्या-पाउण तासातील तबल्यासह असलेली बासरीही गोडच आहे. अन आता कानावर पडते आहे कुठेतरी लग्नानिमित्त सुरु असलेले संगीत. मनात प्रश्न आला, तसा तो नेहमीच येतो- माणूस इतका विकृत का झाला असेल? ताल सूर कशाकशाचा काहीही संबंध नाही. ताल म्हणजे फक्त ढण ढण आणि ढण !!! अन संगीत म्हणजे त्या ढणढणचा वाढता आवाज. या विकृत वातावरणातून सुटका कधी होणार समाजाची कोणास ठाऊक. मोदीजी, नोटबंदीच्या दिवशी एक सूचना करावीशी वाटते. या तथाकथित वाद्यांवर आणि संगीतावर कठोर बंदी आणा. किमान भारतातून ते पूर्ण हद्दपार करा. तुमच्यावर रागावून, त्या संगीतापाठी कोणी देश सोडून जाणार असतील तर जाऊ द्या. अगदी देश रिकामा रिकामा झाला तरी चालेल. भारतभूवरचा भार अनेक अर्थांनी हलका होईल. मरोत या ढण ढण संगीताचे चाहते.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१७

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

वंचित आणि दिवाळी

कधी कधी आपण थोडे अधिकच भावनाशील होतो. अन नेमक्या चुका करतो. आजपासून दिवाळी आहे. यावर्षी पाऊसपाणी नीट न झाल्याने अनेक समाज घटकांवर परिणाम झाला आहे. शेतकरी तर त्याचा पहिला बळी ठरतो. ही परिस्थिती पाहून साहजीकच मनातील करुणा जागी होते. मग कोणीतरी विचार मांडतो की, यावर्षी दिवाळी साजरी करू नये. किंवा असेच काहीतरी. मित्रांनो, असे करू नका. हे खरे आहे की पुष्कळांच्या पुष्कळ समस्या आहेत अन असतात. पण आपण सणांचा सगळ्या अंगांनी विचार केला पाहिजे. त्यात आनंद, उत्साह हे जसे आहे तसेच; समाजात पैशाचे चलनवलन व्हावे, वितरण व्हावे हाही उद्देश असतो. आपण सण साजरा करतो तेव्हा तो अनेक गरजूंच्या, वंचितांच्या खिशात जातो. त्यांचीही दिवाळी अन आयुष्य सुरळीत व्हायला, सुखी व्हायला मदत होते. गरजू, गरीब, वंचित यांना प्रत्यक्ष मदत जशी करता येते, तशीच सहज समाजव्यवहार सांभाळून, सण उत्सव साजरे करून अप्रत्यक्ष मदतही करता येते. पुरुषार्थ, कलाकौशल्य यांनाही उठाव मिळतो. आणि दु:खाप्रमाणेच सुखही संसर्गजन्य असल्याने आनंदही पसरत जातो. हां, व्यक्तीच्या, परिस्थितीच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे १०० टक्के समाधान नाही राहू शकत. त्यासाठी प्रार्थना करावी, शुभचिंतन करावे. अन आपल्या बाजूने, आपल्या क्षमतेप्रमाणे सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जेवढा फैलाव करता येईल तेवढा करावा.

सगळ्यांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०१५

काँग्रेस आणि संस्थानिक

तत्कालीन स्थिती आपल्याला अनेकदा माहिती नसते आणि आपण आपल्या कल्पनेने भूतकाळ रंगवत असतो. इंग्रज भारतात असताना संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेश आणि संस्थानिकांच्या ताब्यात नसलेला प्रदेश असे देशाचे दोन भाग होते. इंग्रजांचा अंमल दोन्हीकडे होता. पण काँग्रेस पक्षाचे काम १९३८ पर्यंत संस्थानिकांच्या ताब्यात नसलेल्या प्रदेशातच होते. १९३९ च्या अधिवेशनात संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेशात काम करण्याचा ठराव करण्यात आला. संस्थानिकांची ही संख्या ६०० च्या जवळपास होती. (पटेलांनी सामील केलेली संख्या ५६५ होती. ती पाक वेगळा झाल्यानंतरची.) म्हणजेच १९३९ पर्यंत मोठ्या भूप्रदेशात काँग्रेसचे कामच नव्हते. किमान अधिकृतपणे. नंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १९४२ पर्यंत त्या प्रदेशात कितीसं काम झालं असेल? 'चले जाव' आंदोलनाचं मूल्यमापन करताना ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०१९

अर्णव आणि हिंदुत्व

अर्णव प्रकरणात एक सूर असाही ऐकू येतो आहे की, अर्णवला अटक हा हिंदुत्वावर हल्ला आहे. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की हा हिंदुत्वावर हल्ला नाही. आज अर्णव हिंदुत्ववाद्यांचा पत्रकारितेतील आयकॉन झाला आहे हे खरे. त्याला फॉलोइंग पण भरपूर आहे हेही खरे. अन्य माध्यमे जे विषय फारसे हाती घेत नाहीत, ते अनेक विषय तो हाती घेतो हेही खरे. परंतु एक प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा की, हे मुद्दे अर्णव का हाती घेतो? अन त्यामुळे त्याला मोठं फॉलोइंग का लाभलं? याचं कारण आहे - आयकॉन न होता कित्येक वर्षे सातत्याने, संयमाने हिंदुत्वाची पायाभरणी करणारे अनेक पत्रकार, लेखक, विचारक. हिंदुत्वाला अचानक पाच सात वर्षात आपोआप फॉलोइंग लाभलेलं नाही. तसं ते लाभलं असेल तर ते तसंच अल्पावधीत विरुनही जाईल. मात्र तसे होणार नाही. कारण आजही पाया सुस्थितीत राहावा यासाठी आणि त्यावर मजबूत, टिकाऊ इमारत उभी राहावी यासाठी झटणारे पत्रकार आहेत. ते संथ, संयत, low profile असल्याने पुष्कळदा त्याची कल्पना नसते. हे स्वाभाविक आहे. पण आहे ते असेच आहे. अन जोवर हे आहे तोवर हिंदुत्वावर हल्ला वगैरेत अर्थ नाही. किंबहुना असा हल्ला होऊच शकत नाही. हिंदुत्व हे आयकॉन आणि फॉलोइंग यावर अवलंबून नाही, यावर उभे नाही. तसा समज करून घेणे किंवा करून देणे, हे हिंदुत्वाचे एक प्रकारे नुकसान करणे होईल. कारण त्याने विपरीत बुद्धी तयार होत जाते. अर्णववर अन्याय होतो आहे की नाही, हा वेगळा विषय आहे. पण त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. अन अर्णवच कशाला... असो, यापुढे विचार करणाऱ्यांना काही सांगण्याची गरज नाही. त्यांना व्यवस्थित कळतं.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२०

दिवाळी अंक लिखाण (२०२१)

१) रवींद्रनाथ, राष्ट्रीयता आणि नॅशनॅलिझम (नागपूर तरुण भारत दिवाळी २०२१)

२) योगी अरविंद यांचे भारतीय साहित्यचिंतन (साप्ताहिक विवेक दिवाळी २०२१)

३) राष्ट्र सेविका समितीच्या 'अनसंग कथा' (अनलॉक दिवाळी २०२१)

४) जे. जे. गुडविन : विवेकानंदांचा उजवा हात (त्रैमासिक 'विमर्ष' दिवाळी २०२१)

५) भूदान यज्ञ : समरसतेचा महाप्रयोग (समरसता साहित्य परिषदेचा 'समरसता दिवाळी २०२१', ऑनलाइन)

हे माझे पाच लेख प्रसिद्ध झाले आहेत. शक्य होतील तसे वाचा आणि वाटलं तर प्रतिक्रिया द्या.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

दोन सूचना

केंद्रातील मोदी सरकार अनेक गोष्टी बदलत आहे. या आवश्यक कामात न्यायव्यवस्थेच्या संदर्भात दोन गोष्टी बदलाव्यात. १) आंधळी न्यायदेवता. डोळे उघडे ठेवल्याने जसे एखाद्याला favour केला जाऊ शकतो तसेच, डोळे बंद केल्यामुळे अन्याय होऊ शकतो आणि सारासार विचार बाजूला पडू शकतो हेही खरे. त्यामुळे तूर्त न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढावी आणि एखादा पर्याय देता येईल का; याचाही विचार व्हावा. २) कोणत्याही गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आज मुभा आहे. आम्ही किती न्यायप्रेमी आहोत असं म्हणून पाठ थोपटून घ्यायला हे ठीक आहे. मात्र व्यवहारात ते तितकंसं योग्य म्हणता येणार नाही. असंख्य फौजदारी वा मुलकी बाबी जिल्हा स्तरावरच सोडवल्या जाऊ शकतात. उलट त्यापुढे त्या बाबतीत न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जिल्हा पातळीवरच सोडवले जावेत असे विषय वेगळे करावेत आणि त्यापुढील विषय वेगळे करावेत. त्याने बोजा, गुंतागुंत, वेळ, खर्च सगळ्यांची बचत होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

६ नोव्हेंबर २०१६

शहाणे

- उपभोग चालू द्या, तेवढी कचऱ्याची समस्या सोडवा;

- वाहने वाढू द्या, तेवढं प्रदूषण मात्र कमी करा;

- शहरं अवाढव्य वाढू द्या, तेवढी कुटुंब व्यवस्था टिकवून धरा;

- अखंड धावपळ करा, शरीर स्वास्थ्य मात्र जपा;

- जीवनशैली उंचावत राहा, अभावातला साधेपणा, सहजता तेवढी टिकवा; (भाजप हा संदर्भ घ्यायला हरकत नाही);

- विद्यार्थ्यांना खूप शिकवा, त्यांच्यावर दडपण मात्र देऊ नका;

************************************

(यादी वाढवायला हरकत नाही.)

आम्ही इतके शहाणे की, ज्यामुळे समस्या तयार होते ती मूळ गोष्ट कमी न करता, समस्या सोडवण्याचा पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे !! ज्या फांदीवर बसला तीच फांदी तोडणाऱ्या लाकूडतोड्यानंतर, मानवी इतिहासात 'शहाणे' म्हणून आमचीच गणना होईल कदाचित.

- श्रीपाद कोठे

६ नोव्हेंबर २०१९

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

दिल्लीतील वायू प्रदूषण

दिल्लीच्या तीनही महानगरपालिकांच्या हद्दीतील शाळा वायू प्रदूषणामुळे काही दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता यावर खूप चर्चा होतील. समर्थक आणि विरोधक निर्माण होतील. त्यांचे राजकीय वर्गीकरण होईल. आरोप प्रत्यारोप होतील. मध्यममार्गी म्हणून मिरवीत काही जण पुढे येतील. मग हे प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर काथ्याकुट केला जाईल. काही दिवस काही उपाय होतील. थातुमातूर काहीतरी होईल. पुन्हा काही दिवसांनी (महिन्यांनी, वर्षांनी) पहिल्या वाक्यापासून सुरुवात होईल.

विचार आणि भावना स्पष्ट, व्यावहारिक, सशक्त नसणे हे एकमेव कारण.

१) आज अवाढव्य वाढणारी महानगरे मर्यादित करण्याचा विचार का होत नाही?

२) राज्यकर्ते म्हणतात लोकांची मागणी, लोक म्हणतात पर्याय नाही, उद्योजक-व्यापारी- गुन्हेगार- म्हणतात चाललंय तेच योग्य आहे; लुटालूट करायला बरं आहे.

३) विचारवंत अज्ञानी, मूर्ख, स्वार्थी किंवा लाचार आहेत.

माझ्या सूचना-

१) महानगरे मर्यादित असावीत. किमान १ लाख आणि कमाल १० लाख लोकसंख्या असावी.

२) समाजाने rat race चा मुर्खपणा सोडावा.

३) व्यापारी, उद्योजक यांनी थोडी तरी लाजलज्जा बाळगून समाज, नीतीमत्ता, पर्यावरण, माणुसकी यांचा विचार करून आपापल्या कामधंद्याचा विचार करावा.

४) राजकारण्यांनी अहंकार जरा कमी करावा.

५) विचारवंतांनी भाटगिरी सोडून विचारवंत व्हावे.

६) प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न व्हावा.

७) आपणच प्रश्न निर्माण करणे, ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ या भावनेचा त्याग करणे, तीच ती घाण चिवडत राहण्याची सवय सोडून; मन, बुद्धी, भावना, विचार, संकल्पना या सगळ्यांनी अधिक सशक्त आणि सार्थक होण्याचा प्रयत्न करणे.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१६

कर्कश्श गाणी

छात्या पुढे काढत आपल्या पौरुषाचं नेहमी प्रदर्शन करत फिरणारे पोलीस कर्णकर्कश्श गाणी वाजतात तेव्हा शेपूट घालून काय करत असतात? की त्यांना काहीही ऐकू येत नाही. सगळं पोलीस दल बहीरं आहे का? प्रत्येक वेळी तक्रारी अन बिक्रारीची काय गरज. फिरत्या गाड्या काय झक मारतात? रात्री अमुक वाजेपर्यंत गाणी वाजवायला परवानगी याचा अर्थ लोकांचे कान आणि डोके फोडायला परवानगी असा होतो का? लोकांनी तेवढा वेळ काय करायचे? केवळ मुकाटपणे अत्याचार सहन करायचा?

सरकार, आमदार, मंत्री वा कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते करणार नाहीतच काही; तरीही विनंती करतो की, जनतेच्या भल्याचं काही करायचं असेल तर हे तमाशे कायमस्वरूपी थांबवा. तुम्ही करणार नाही कारण जनता गेली तेल लावत तुम्हाला फक्त एकेक मत मोलाचं असतं. तुम्ही फक्त चुलीत घालायच्या लायकीचे आहात असं किमान अशा वेळी वाटतं.

सोशल मिडीयावर अतिशय सक्रीय असलेला जनता जनार्दनदेखील याविरुद्ध बुलंद आवाज उठवणे, जनमत तयार करणे, सामाजिक दबाव वाढवणे, याऐवजी सेल्फ्या टाकण्यात धन्यता मानतो. आग लागो आपल्या सगळ्यांना.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१६

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

अंदमान

त्र्यं. र. देवगिरीकर यांनी लिहिलेले सरदार पटेलांचे चरित्र वाचतो आहे. त्यात १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसची माहिती आहे. त्यात असा उल्लेख आहे की - राजबंदी मुक्त करणे हे काँग्रेसने प्रांतिक निवडणुकीत दिलेले आश्वासन होते. हिंसेच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगणारे बरेच जण अंदमानात होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी गांधीजी, वल्लभभाई वगैरेंनी प्रयत्न केले.

बाकी थोडी या प्रकरणाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची त्रोटक चर्चा आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संदर्भात. सहजच सावरकरांच्या सुटकेची, माफीनाम्याची आठवण झाली. दोहोंचा संबंध नाही पण हा विषय आज ज्या पद्धतीने हाताळला जातो तो तसा नाही हे म्हणता येऊ शकते. कारण अंदमानातील कैद्यांची सुटका हा विषय काँग्रेसनेही हाती घेतला होता. यावर अधिक माहिती आणि विश्लेषण व्हायला हवे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकायला हवा.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०१९

मर्यादांची जाणिव

सध्या सगळंच काही वाईट होत आहे असं नाही. सध्याच्या घडामोडींमुळे राजकारण, लोकशाही, निवडणुका यांच्या मर्यादा; सामाजिक/ व्यक्तिगत जीवन आणि राजकारण; हे ठळकपणे अधोरेखित होतं आहे. एक प्रकारे माणसाच्या psycho-social उत्क्रांतीला/ घडणीला बळ आणि वळण मिळतं आहे. समाज आणि व्यक्तीच्या over politicising ला कमी करण्यात याची मदत होऊ शकेल. अर्थात असं होईल का आणि आम्हाला ते हवं आहे का; हे प्रश्नच आहेत.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०१९

कर्म आणि त्याचे फळ

कर्माची प्रेरणा आणि परिणाम दोन्ही ईश्वरी असतात. चांगल्याचा परिणाम चांगला, वाईटाचा वाईट वगैरे काही नसतं. किंवा ते तसं सिद्ध करता येत नाही. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि बांगला देशाची निर्मिती या चांगल्या गोष्टी करूनही इंदिराजींची हत्या झाली. आपल्याकडून होणाऱ्या कर्माची स्फूर्ती, प्रेरणा, इच्छा या अज्ञात शक्तीकडून येतात. अन त्या कृतीचे परिणाम कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित, कधी अनाकलनीय असतात. थोडेफार ठोकताळे आपण सांगतो, पण सूक्ष्मता, अचूकता, पूर्णता आपल्या हाताबाहेरचे असते. योग्य वाटते ते करणे आणि सोडून देणे. 'करम की गती न्यारी'.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०२०

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

अणुबॉम्ब आणि भय

आधुनिक सभ्यतेने इतका अविश्वास निर्माण केला आहे की, एका अणुबॉम्बने प्रचंड मोठी हानी करू शकतो हे माहीत असूनही विविध देश डझनावारीच नव्हे, तर शेकडो अणुबॉम्ब बाळगतात. एका अंदाजानुसार रशियाकडे ८०० अन अमेरिकेकडे ६५० अणुबॉम्ब आहेत. आपले अणुबॉम्ब फुटतील की नाही अशी तर या देशांना शंका नाही. प्रचंड भय आणि त्यातून जन्माला येणारा अक्राळविक्राळ अविश्वास म्हणजेच आधुनिकता. विज्ञान, वैज्ञानिकता, वास्तवता यासारख्या गोष्टी भय, संभ्रम आणि अविश्वास जन्माला घालत असतील तर त्यापेक्षा अवैज्ञानिक आणि अंधश्रध्द असणे फार चांगले.

- श्रीपाद कोठे

३ नोव्हेंबर २०१६

जयजयकार

झी टॉकीजवर तृतीयपंथीयांवरचा 'जयजयकार' सुरू आहे. बाकी तर ठीक आहे पण दिलीप प्रभावळकर यांचं ज्येष्ठ नागरिकाचं पात्र छान आहे. एका अंगठीवरून त्याचा तृतीयपंथीय टोळीशी संबंध येतो. ही अंगठी त्याच्यासाठी एवढी महत्वाची का? कारण ती देवाघरी गेलेल्या बायकोच्या हेअर पिनची बनवलेली असते. अन त्यात खडा म्हणून गेलेल्या मुलाचा दुधाचा दात बसवला असतो.

सहज अरुणा ढेरेंची कविता आठवली - 'पुरुष असाही असतो'

- श्रीपाद कोठे

३ नोव्हेंबर २०१९

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

सफाई

दिवाळी येते आहे. साफसफाई करवून घेणे, घरदार चक्क करणे होईलच. पण स्वत: हातात झाडणी, फडा, खराटा, फडकं घेऊन थोडी तरी सफाई करता येईल का? काही नाही तर किमान दारे खिडक्या पुसून घेणे, नाही तर जाळे जळमट काढणे, पंखा पुसणे, डब्बे पुसणे, पडदे काढणे आणि लावणे; असं काही ना काही. अगदी थोडं तरी करता येईल का? स्त्री वा पुरुष वा मुलं, हुद्दा, व्यवसाय, स्थान, पैसा सगळं बाजूला ठेवून; स्वहस्ते काही ना काही सफाई. मन सुदृढ, कसदार आणि रेखीव व्हायला मदत होऊ शकेल. कणभर आध्यात्मिक उन्नतीही. पाहा. विचार करा.

- श्रीपाद कोठे

२ नोव्हेंबर २०१८

मंदिरात नमाज, मशिदीत आरती

मंदिरातील नमाजला विरोध असणाऱ्या काही लोकांनी 'मंदिरात नमाज आणि मशिदीत आरती' अशी भूमिका घेतलेली दिसली. त्यावर माझे मत -

असहमत. कारण हिंदूंच्या मंदिरात नमाज पठण हे हिंदूंच्या ethos ला बाधा पोहोचवत नाही. मशिदीत आरती इत्यादी त्यांच्या ethos ला धरून नाही त्यामुळे ते योग्य नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा, ती श्रद्धा घातक होत नाही तोवर आदर आणि सन्मानच करायला हवा. मशिदीत आरती करणे हे हिंदू विचाराला न शोभणारे. स्वामीजींना जेव्हा विचारले होते - 'आम्ही हिंदू व्हावे असे तुम्हाला वाटते काय?' त्यावर त्यांचे उत्तर होते - 'नाही. तुम्ही चांगले मुस्लिम, चांगले ख्रिश्चन व्हावे.' अर्थात स्वामीजींना नाकारण्याचे स्वातंत्र्यही हिंदू म्हणून आपल्याला आहेच. देव, धर्म, आध्यात्म हे राजकारणाच्या कलाने चालावेत हा मुस्लिम व ख्रिश्चन विचार आहे. तो हिंदू विचार नाही. तसे होऊ नये हे माझे स्पष्ट मत आहे.

- श्रीपाद कोठे

२ नोव्हेंबर २०२०

(मथुरेच्या नंद बाबा मंदिरात नमाज अदा केली म्हणून कोणी तरी तक्रार केली आणि प्रथम सूचना अहवाल दाखल करण्यात आला आहे. या आशयाची बातमी आत्ता पाहिली. विचित्र वाटलं. हिंदू बंधूंनो, मंदिरात नमाज अदा केल्याने आपला देव आणि धर्म बाटत नाही. उलट तसे करणाऱ्यांचा देव आणि धर्म बुडतो असे म्हणतात. हिंदूंचं काहीच नुकसान होत नाही. हां, काही नुकसान, तोडफोड, अवमानकारक उक्ती वा कृती, विषपेरणी; या गोष्टी नसल्या म्हणजे झाले. तेवढं लक्ष असावं. नमाजला हरकत असू नये.)