बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

व्यवस्थांचा पसारा

मानवी सभ्यता आणि संस्कृती यांच्याविषयीची मूळ जीवनदृष्टी बदलली नाही तर, चांगल्या व प्रामाणिक प्रयत्नांचा विपरीत परिणाम होईल. अमेरिका व भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडी याकडे निर्देश करतात. त्यातील एकेका पैलूवर विस्ताराने विचार करता येईल, नव्हे करावा लागेल. परंतु सूत्ररुपात बोलायचे तर माणसाचे माणूसपण गमावून सामाजिक, आर्थिक, राजकीय यंत्राचा एक खिळा अशा रुपात नवीन माणूस ठेवायचा आहे का? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. व्यवस्था मोठ्या होणे आणि माणूस अधिकाधिक लहान होणे, व्यवस्थांचा पसारा वाढणे आणि माणसाची space कमी होणे अशी ही क्रिया आहे. या विश्वाची मूळ स्थिती गती आणि मूळ भारतीय चिंतन माणूस विशाल आणि व्यापक व्हावा, व्यवस्था त्याला साहाय्यभूत व्हाव्या; या बाजूचे आहे. व्यवस्थायंत्राचा एक खिळा होऊन माणूस मोठा, महान, विशाल, व्यापक होऊ शकत नाही. रामकृष्ण आश्रमाच्या व्यवस्थेतून दुसरे रामकृष्ण परमहंस निर्माण झाले नाहीत, बौद्ध विहारांच्या माध्यमातून भगवान बुद्ध निर्माण झाले नाहीत, चर्चेसमधून येशू ख्रिस्त निर्माण झाले नाहीत, संशोधन संस्थांमधून किंवा विद्यापीठांमधून आईनस्टाईन, सोक्रेतीस, आर्यभट्ट वा याज्ञवल्क्य निर्माण होत नाहीत. पसारा कमी करत जाणाऱ्या व्यवस्था हव्यात. सध्याच्या जागतिक घडामोडी व्यवस्थेचा पसारा वाढवत जाणाऱ्या आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. तात्कालिक धोरण म्हणून अनेक गोष्टी योग्य असल्या तरीही त्या करताना दीर्घकालीन दृष्टी गमावून बसता कामा नये.

- श्रीपाद कोठे

१० नोव्हेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा