आम्ही वेडे आहोत का? कालपासून जनधन बँक खात्यांची चर्चा सुरु झाली आहे. एकूण जनधन खाती २६ कोटी. (२५ कोटी ८० लाख). त्यात जमा झालेत ६६ हजार कोटी रुपये. त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजे ६-७ कोटी खात्यात काहीच नाही. म्हणजे २० कोटी जनधन खात्यात ६६ हजार कोटी रुपये. म्हणजेच सरासरी २० कोटी खात्यात ३ ते ४ हजार रुपये. ही जनधन खाती बहुतेक ग्रामीण अथवा कामगार (labour) वर्गाची आहेत. त्यांच्याजवळ असलेले ३-४ हजार रुपयेही जमा झालेले असू शकतात. ती रक्कम काही फार मोठी नाही. हां, काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झालेली असू शकते. सगळ्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊच शकत नाही. समजा मोठी रक्कम जमा झाली तर जनधन खात्यातील जमा लाखो कोटीत होईल. पण ती केवळ ६६ हजार कोटी रुपये एवढी आहे. काही खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाली असेल तर ते सहज लक्षात येईल आणि त्याची चौकशी करता येईल. मग सध्याचा गोंधळ का आणि कशासाठी चालू आहे? कोण हा गोंधळ करीत आहे? जणू काही जनधन खात्यांमध्ये सगळा काळा पैसा जमा होत असल्याचे चित्र का आणि कोण निर्माण करीत आहे? अतिउत्साही मोदी वा भाजपा समर्थक? की, मोदींच्या वा केंद्र सरकारच्या विरोधातील कोणी जाणूनबुजून हे करीत आहे? विरोधक करीत असतील तर समर्थक त्याला बळी पडून स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेत आहेत? एकदा समर्थन करायचे म्हटले की, डोकं गहाण ठेवून ते करायचे का? सरकारचे वा भाजपचे यावर काय मत आहे? भारतीय जनता पार्टी अधिकृतपणे पत्र परिषद घेऊन अशा प्रकारांशी, त्यावर चालणाऱ्या उटपटांग समर्थन लाटेशी आपला संबंध का तोडीत नाही? केवळ अर्थमंत्री वा अन्य काही मोजक्या जबाबदार लोकांचेच म्हणणे हे आमचे म्हणणे आहे, असे जाहीर का करीत नाही? भाजपा अथवा सरकारच्या प्रचार यंत्रणेशी याचा संबंध नाही हे जाहीर का करीत नाही. की, भाजपला हे हवेच आहे?
खरेच आम्ही वेडे होत आहोत. बहुधा.
- श्रीपाद कोठे
२६ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा