असंख्य लोकांना आवडणार नाही, तरीही...
मित्र मैत्रिणींनो- मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला एक महत्वाचा निर्णय घेतला. तो योग्य आणि आवश्यक होताच. सगळ्यांनी त्याचं अभिनंदनही केलं. त्याला आज सहा दिवस झालेत. अजूनही आपण त्यातच का अडकून आहोत? जो निर्णय निर्विवाद योग्य आहे त्याची पाठराखण करण्यासाठी आपण वेळ, बुद्धी, पैसा का खर्च करीत आहोत? आपल्याला विश्वास नाही का? किती प्रचारी आणि प्रतिक्रियावादी असावं? मोदी किंवा ३०० खासदारांचा पाठींबा असलेल्या सरकारला याची गरज आहे का? हा पटवून देण्याचा विषय आहे का? आक्षेपकांशी तू-तू, मी-मी करण्याचा विषय आहे का? `हाथी चले बजार, कुत्ते भोंके हजार' ही पारंपरिक शहाणपणाची उक्ती आपण विसरलो आहोत का? रोज वेगवेगळी आवाहने काय? नवनवीन कथा कहाण्या आणि अनुभव काय... कशासाठी हे सारे? कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा, गुरुनानक जयंती हे सगळं संचित विसरून जावं इतका कैफ येण्याचं काय कारण? आपण अनावश्यक, अवास्तव, अयोग्य राजकीय प्राणी झालो आहोत की काय? कशासाठी हे सारे? या सगळ्या प्रकारात देशभक्तीसारखी गंभीर आणि पवित्र गोष्ट आपण आठवडी बाजारात विकायला काढल्यासारखी मांडली याचंही भान सुटावं? कशाला घाबरतो आपण? की या राष्ट्राची प्रकृती नसलेली धुंदी आपल्याला चढली आहे? काहीच काम नसेल तर ध्यान लावून बसावे. त्याने अधिक फायदा होईल जगाचा.
`निर्माणो के पावन युग मे, हम चरित्र निर्माण न भूले' चरित्र म्हणजे केवळ पैशाचे स्वच्छ व्यवहार किंवा स्त्रीविषयीची निर्मळ दृष्टी एवढेच नाही. ते तर आहेच, पण त्यासोबत आणखीनही खूप काही आहे. तूर्त एवढेच. नमस्कार.
- श्रीपाद कोठे
१४ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा