कधी कधी आपण थोडे अधिकच भावनाशील होतो. अन नेमक्या चुका करतो. आजपासून दिवाळी आहे. यावर्षी पाऊसपाणी नीट न झाल्याने अनेक समाज घटकांवर परिणाम झाला आहे. शेतकरी तर त्याचा पहिला बळी ठरतो. ही परिस्थिती पाहून साहजीकच मनातील करुणा जागी होते. मग कोणीतरी विचार मांडतो की, यावर्षी दिवाळी साजरी करू नये. किंवा असेच काहीतरी. मित्रांनो, असे करू नका. हे खरे आहे की पुष्कळांच्या पुष्कळ समस्या आहेत अन असतात. पण आपण सणांचा सगळ्या अंगांनी विचार केला पाहिजे. त्यात आनंद, उत्साह हे जसे आहे तसेच; समाजात पैशाचे चलनवलन व्हावे, वितरण व्हावे हाही उद्देश असतो. आपण सण साजरा करतो तेव्हा तो अनेक गरजूंच्या, वंचितांच्या खिशात जातो. त्यांचीही दिवाळी अन आयुष्य सुरळीत व्हायला, सुखी व्हायला मदत होते. गरजू, गरीब, वंचित यांना प्रत्यक्ष मदत जशी करता येते, तशीच सहज समाजव्यवहार सांभाळून, सण उत्सव साजरे करून अप्रत्यक्ष मदतही करता येते. पुरुषार्थ, कलाकौशल्य यांनाही उठाव मिळतो. आणि दु:खाप्रमाणेच सुखही संसर्गजन्य असल्याने आनंदही पसरत जातो. हां, व्यक्तीच्या, परिस्थितीच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे १०० टक्के समाधान नाही राहू शकत. त्यासाठी प्रार्थना करावी, शुभचिंतन करावे. अन आपल्या बाजूने, आपल्या क्षमतेप्रमाणे सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जेवढा फैलाव करता येईल तेवढा करावा.
सगळ्यांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
- श्रीपाद कोठे
७ नोव्हेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा