शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

संविधान

दोन दिवस संसदेत चाललेल्या `संविधान दिनावरील' चर्चेत मला सगळ्यात आवडलेले भाषण होते बिजदचे (बीजेपीचे नव्हे) कटकचे खासदार भर्तृहरी मेहताब यांचे. अर्थात पंतप्रधानांचा अपवाद. मोदीजींचे भाषण master piece होते. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी काल `गंभीर परिणामांची' धमकी दिली. ज्या मुद्यावरून त्यांनी ही धमकी दिली त्याला श्री. भर्तृहरी मेहताब यांनी आज नेमके उत्तर दिले. अन खडगे यांचे नाव घेऊन, त्यांचा उल्लेख करून त्यांनी हे उत्तर दिले. श्री. मेहताब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्धृत केले. जे भाषण मेहताब यांनी उद्धृत केले त्यात, आंबेडकरांनी अमेरिकेची घटना तयार करणारे thomas jefferson यांना उद्धृत केले होते. त्याचा आशय असा की, `राज्यघटना वर्तमान समाजाच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब असते. भावी पिढ्यांना आम्ही त्याने जखडून ठेवू इच्छित नाही.' जेफरसनला उद्धृत करून बाबासाहेबांनी आपले मतच व्यक्त केले. तेही नि:संदिग्धपणे.

खरे तर हेच तर्कपुर्ण आहे. भारतीय परंपराही हेच सांगते- `नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणं...' कोणाही एकाचं वचन कायम प्रमाण नसतं. या विषयाकडे तटस्थपणे पाहण्याची अन विचार करण्याची गरज आहे. राजकीय भूमिका वेगळी असू शकेल. मोदीजींनी तर ती स्पष्टपणे मांडलीच आहे. देशाचा नेता म्हणून ती अतिशय योग्यही आहे. पण वैचारिक स्तरावर याची तटस्थ चर्चा व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

२७ नोव्हेंबर २०१५

(राज्यकर्ते काय करतात याकडे फार लक्ष देणे थांबवले पाहिजे. ते तटस्थपणे विचार करतील तेव्हा करतील. तुम्ही-आम्ही तटस्थ विचार करणे सुरु केले पाहिजे. समाजाची उंची जेवढी वाढेल तेवढं राजकारणही ठीक होईल. पण समाजच राजकारणाकडे डोळे लावून बसला तर काहीच नीट राहणार नाही.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा