उद्या पुन्हा थिरकतील ती भेगाळलेली, काळवंडलेली शुभ पाऊले पंढरीच्या वाळवंटात. नाचतील तल्लीन होऊन. अशीच नाही येत ही तल्लीनता. त्यासाठी लीनता यावी लागते. कटीवर हात, विटेवरी उभा असा तो पांडुरंग भेटला की तोच देतो लीनता आणि तल्लीनता. पण कसा भेटावा तो?
हा काही साधासुधा देव नाही. वेदांनाही ज्याचा थांग लागला नाही असा ईश्वरी भावच सावयव झाला आहे तिथे. साकार पण निर्गुण !! हो, साकार पण निर्गुण. म्हणून तर हात कमरेवर ठेवले आहेत त्याने. त्याच्या हाती शस्त्र नाहीत, शास्त्र नाहीत, शाप नाहीत, आशीर्वाद सुद्धा नाहीत. विराग नाही, अनुराग नाही. त्याचा भाव ओळखूनच वामांगीही नाही. कारण त्याच्या ठायी पुरुष नाही आणि प्रकृती पण नाही. त्या अखंड चिन्मयाचा कोणताही विकार नाही आणि विलासही नाही. सारीच विलसीते विराम पावलेली. विश्वाच्या विभवाचा मागमूस नाही. तो फक्त आहे. नाकारता येत नाही अन आकारता येत नाही असा.
नाही करता येत त्याच्याशी वाटाघाटी. नाही साधता येत कुठली देवाणघेवाण. फक्त पोहोचायचं त्याच्या जवळ. त्याच्या सारखंच नि:संग होऊन. धनाचा, मानाचा, दानाचा, ज्ञानाचा, कर्त्याचा, अकर्त्याचा, विनयाचा, ताठरतेचा, माणसांचा, पशूंचा, सुखाचा, दु:खाचा, भक्ताचा, भक्तीचा... कसला कसलाही संग न धरता जायचं त्याच्याजवळ. मग तोच घालतो मिठी. देतो लीनता अन तल्लीनता. सारं सारं लोपून जातं आणि थुई थुई नाचू लागतो एकच सत चित आनंद... आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे !!
- श्रीपाद कोठे
१४ नोव्हेंबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा