सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

५०० ची नोट

१५ दिवसांपूर्वी व्यवस्थित शोधल्यानंतरही चार दिवसांपूर्वी सुटकेसमध्ये लपून बसलेली एक ५०० ची नोट सापडली. पैसा हा तसाही आकर्षणाचा विषय नसल्याने त्यात आश्चर्यही काहीच नाही. मग ती जमा करण्याचे काम आले. मधल्या काळात काल पेट्रोल भरायला गेलो. तेव्हा तिथला मुलगा थोडी का-कु करीत होता. चिल्लर नाही वगैरे. बाजूच्या पोराने आवाज दिला- सर इकडे या. त्याला विचारलं, चिल्लर आहे ना? तो म्हणाला. कितीचं भरू? मी उत्तर दिलं- १००. त्यानं पेट्रोल भरलं. चिल्लर पैसे परत दिले. मग म्हणाला- सर खूप दिवसांनी आले. बाहेर गेले होते का? म्हटलं, नाही रे. त्यावर म्हणाला- नाही. दसऱ्याला आले होते. पेट्रोल भरल्यावर मला सोनं पण दिलं होतं. त्यानंतर आजच दिसले. म्हणून विचारलं. मी हसलो आणि निघालो. मी विसरून गेलेली गोष्ट त्याने लक्षात ठेवली होती. मी त्याचा चेहरा विसरून गेलो होतो. त्याने मात्र मला लक्षात ठेवले होते. कदाचित त्या क्रेडीटवरच स्वत: आवाज देऊन ५०० ची नोट स्वीकारली होती त्याने. स्वामी विवेकानंद म्हणत- तुमची दुष्ट कर्मे तुमची पाठ सोडणार नाहीत अन तुमची सत्कर्मे देवदूत बनून सदैव तुमचे रक्षण करतील. कोणास ठाऊक? या सगळ्या मोठाल्या गोष्टी. आपण आपलं करत राहावं काहीतरी...

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा