रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

अर्णव आणि हिंदुत्व

अर्णव प्रकरणात एक सूर असाही ऐकू येतो आहे की, अर्णवला अटक हा हिंदुत्वावर हल्ला आहे. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की हा हिंदुत्वावर हल्ला नाही. आज अर्णव हिंदुत्ववाद्यांचा पत्रकारितेतील आयकॉन झाला आहे हे खरे. त्याला फॉलोइंग पण भरपूर आहे हेही खरे. अन्य माध्यमे जे विषय फारसे हाती घेत नाहीत, ते अनेक विषय तो हाती घेतो हेही खरे. परंतु एक प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा की, हे मुद्दे अर्णव का हाती घेतो? अन त्यामुळे त्याला मोठं फॉलोइंग का लाभलं? याचं कारण आहे - आयकॉन न होता कित्येक वर्षे सातत्याने, संयमाने हिंदुत्वाची पायाभरणी करणारे अनेक पत्रकार, लेखक, विचारक. हिंदुत्वाला अचानक पाच सात वर्षात आपोआप फॉलोइंग लाभलेलं नाही. तसं ते लाभलं असेल तर ते तसंच अल्पावधीत विरुनही जाईल. मात्र तसे होणार नाही. कारण आजही पाया सुस्थितीत राहावा यासाठी आणि त्यावर मजबूत, टिकाऊ इमारत उभी राहावी यासाठी झटणारे पत्रकार आहेत. ते संथ, संयत, low profile असल्याने पुष्कळदा त्याची कल्पना नसते. हे स्वाभाविक आहे. पण आहे ते असेच आहे. अन जोवर हे आहे तोवर हिंदुत्वावर हल्ला वगैरेत अर्थ नाही. किंबहुना असा हल्ला होऊच शकत नाही. हिंदुत्व हे आयकॉन आणि फॉलोइंग यावर अवलंबून नाही, यावर उभे नाही. तसा समज करून घेणे किंवा करून देणे, हे हिंदुत्वाचे एक प्रकारे नुकसान करणे होईल. कारण त्याने विपरीत बुद्धी तयार होत जाते. अर्णववर अन्याय होतो आहे की नाही, हा वेगळा विषय आहे. पण त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. अन अर्णवच कशाला... असो, यापुढे विचार करणाऱ्यांना काही सांगण्याची गरज नाही. त्यांना व्यवस्थित कळतं.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा