सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

समाजसेवा

महिलांच्या आयसीसी २०-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात मिताली राज या माजी कर्णधाराला स्थान न मिळाल्यावरून वाद सुरु आहे. आज तिचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यात बाकी गोष्टींसोबत तिने म्हटलं आहे की, मी देशासाठी जे काही केलं त्याची जाणीव सध्याचे प्रशिक्षक, कर्णधार ठेवत नाहीत. गंमत वाटली. एक जुना प्रसंगही आठवला. शेतकरी आत्महत्या संदर्भात विदर्भाचा प्रवास सुरु होता. मी आणि आमचा छायाचित्रकार शेखर सोनी होतो. बहुतेक अमरावतीच्या विश्रामगृहातील प्रसंग असावा. सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी नाश्ता करताना गप्पा सुरु होत्या. शेखर म्हणाला- आपण पत्रकार देखील समाजसेवाच करतो ना? मी त्याला विचारले- आपला पगार बंद झाला तर आपण ही सेवा करू का? त्याला विषय समजला. आपल्या कृतीने side effect स्वरुपात काही चांगल्या गोष्टी होणे, समाजाचा फायदा होणे, समाजसेवा होणे, देशाचे नाव उंचावणे हे ठीक आहे. पण खरंच आपण ते करत असतो का? समाजासाठी, देशासाठी काही करणे ही वेगळी गोष्ट असते. पण कधी कधी आपल्या कृतीच्या side effect चे भांडवल करण्याचीही इच्छा होते माणसाला. अन celebrity असे भांडवल करतात तेव्हा त्याचा प्रवाह होतो. हे फारसं चांगलं नाही म्हणता येत.

- श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा