स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो म्हणून स्वातंत्र्य नको असं म्हणता येत नाही. व्यवस्थेचा दुरुपयोग होतो म्हणून व्यवस्था नको असे म्हणता येत नाही. असे म्हणणे फारच बालीश असते. मग दुरुपयोग थांबवायचा कसा? दुरुपयोग थांबवायचा की नाही? उत्तर स्पष्ट आहे की, दुरुपयोग थांबवायलाच हवा. स्वाभाविकच दुरुपयोग थांबवायला एखादी व्यवस्था उभी केली जाते. त्याचा पुन्हा दुरुपयोग सुरू होतो. मेख आहे ती इथे. व्यवस्था हा व्यवस्थेचा वा स्वातंत्र्याचा दुरुपयोग थांबवण्याचा उपाय नसतो हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था किंवा स्वातंत्र्य यांचा दुरुपयोग होऊ नये यासाठी माणूस विचारी, समजूतदार, बहुश्रुत, सुसंस्कृत असायला हवा. त्याच्या वागण्याबोलण्याचा, विचारांचा, समजूतदारीचा विशिष्ट स्तर हवा. करुणा, कौशल्य, माहिती, शिक्षण यापेक्षा हा स्तर भिन्न असतो याचं आकलन वाढायला हवं. या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश असला तरी त्यात आणखीन एक घटक असतो सुजाणता. ही सुजाणता निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धत वा प्रक्रिया नाही. अनेक गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. हे सगळे संथपणे, जवळपास अदृश्यपणे होणारे काम आहे. व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून याकडे माणूस फारसे लक्ष देत नाही. स्वातंत्र्याचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग त्यामुळेच थांबत नाही अन गोंधळ वाढत राहतो.
- श्रीपाद कोठे
२२ नोव्हेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा