गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

सुख आणि रिस्क

उत्तराखंड येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ही मोठीच आनंदवार्ता आहे. हे सगळे मजूर फिट होऊन पुन्हा आपापल्या कामाला लागोत. पण दोन गोष्टी मनात येतात.

१) प्रत्येक मजुराला एक लाख रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मजुरांच्या दृष्टीने एक लाख ही मोठी रक्कम आहे पण पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई देताना असा विचार करावा का? खेळाडूंना सरकारे, उद्योग कोट्यवधी रुपये देतात. चित्रपट, मनोरंजन, क्रीडा, राजकारण, समाजसेवा या क्षेत्राकडे जो पैशाचा पूर वाहतो तो संतुलित व्हायला हवा. या क्षेत्रांमधील पैशाचा पूर कमी होऊन अन्य क्षेत्राकडे तो वळावा. मजुरांनी जे सहन केलं आणि ज्या धैर्य व साहासाचे दर्शन घडवले त्यांची एक लाखात बोळवण व्हायला नको.

२) सगळ्या गोष्टी सोप्या, सुविधाजनक, सुखद करताना त्याची काही मर्यादा असावी की नसावी? कुठेतरी थांबण्याचा विचार त्याज्य, मागासलेला किंवा वाईट ठरवू नये. केवळ २६ किमी अंतर कमी करण्यासाठी असली धाडसे करावीत का? आपल्या धावण्याची समीक्षाही हवी.

#श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०२२

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

मोठेपणा आणि मनमानी

मोठेपणा आणि मनमानी असं एक समीकरणच तयार झालं आहे. मनमानी करणाऱ्याला वाटतं आपण फार मोठे आणि विशेष आहोत अन् बाकीच्यांनाही वाटतं की, मनमानी करणारा माणूस मोठा. मी पैशाने मोठा आहे कर मनमानी. मी  मोठ्या पदावर आहे कर मनमानी. मी अमुक कोणी आहे कर मनमानी. काहीच नसेल तर माझे अमक्यातमक्याशी संबंध आहेत कर मनमानी. अन् कोणतीही जात, कोणतीही भाषा, कोणताही व्यवसाय, कोणतीही नोकरी, कोणतीही सेवा, कोणत्याही क्षेत्रात काम करणारा याला अपवाद नाही. अन् आपण विश्वगुरू होणार? कोणीही आपल्याला विश्वगुरू करू शकणार नाही. विश्वगुरू काय अभिमान आणि गौरव वाटावा असा समाज म्हणूनही आपली नोंद होऊ शकणार नाही. ना भाजप, ना संघ, ना काँग्रेस, ना कम्युनिस्ट, ना रिपब्लिकन, ना समाजवादी, ना हिंदुत्ववादी, ना विज्ञानवादी, ना बुद्धिवादी, ना पुरोगामी, ना स्त्रीवादी, ना आणखीन कोणी. अन् खरं तर असा समाज जगला काय किंवा संपला काय? असंख्य माणसे, असंख्य प्राणी येतात अन् जातात. तसंच समाजाचं. आला अन् गेला. कशासाठी धडपड करायची अन् कशासाठी मनाला लावून घ्यायचं?

#श्रीपाद कोठे

२८ नोव्हेंबर २०२३

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

पर्यावरण आणि हिंदुत्व

पर्यावरणवाद्यांनी फटाक्यांना विरोध केला, न्यायालयीन आदेश मिळवले. परंपरावाद्यांनी आदेशाकडे पाठ फिरवून फटाके फोडले. विरोधक, समर्थक, तटस्थ सगळ्यांवरच व्हायचे ते परिणाम होतील. पण या साऱ्यात भाजप प्रवक्त्यांनी टीव्ही चर्चेत अधिकृतपणे फटाक्यांची पाठराखण करणे योग्य वाटत नाही. हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यांना राजकारणाच्या दावणीला बांधून केविलवाणे आणि दुबळे करू नका. योग्य अयोग्य विवेक हे हिंदूंचे सर्वोच्च बलस्थान आहे. त्याला पोरकट पातळीला आणू नका. तुमचं राजकारण नाही साधलं तरी हरकत नाही.

@ श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२३

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

सार्वजनिक आणि खाजगी

१) देव- कोणीही केव्हाही दर्शन घेऊ शकतो. कोणीही केव्हाही त्याच्याशी बोलू शकतो.

२) धर्म- कोणीही केव्हाही करू शकतो. भुकेल्याला खाऊ घालणे, तहानलेल्याला पाणी पाजणे, रुग्णाची सेवा करणे, अशिक्षिताला शिक्षण देणे; कोणीही केव्हाही करू शकतो.

३) चुंबन- कोणीही, केव्हाही, कोणाचंही घेऊ शकत नाही. कोणाला वाटलं कोणाचं चुंबन घ्यावं आणि त्याने ते घेतलं तर मार खायचीच वेळ.

४) तात्पर्य- देव, धर्म सार्वजनिक आहेत/ असू शकतात. चुंबन ही खाजगी गोष्ट आहे.

५) तरीही- सार्वजनिक गोष्टी घरापुरत्या असाव्यात आणि खाजगी गोष्टी जगजाहीर असाव्यात.

६) निष्कर्ष- वरील क्र. (५) म्हणजे आधुनिकता/ म्हणजे धर्मनिरपेक्षता/ म्हणजे पुरोगामित्व.

#श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०१४

संपत्तीचे तत्त्वज्ञान

१ डिसेंबर पासून भारत g-20 गटाचा अध्यक्ष होणार आहे. याचा उपयोग करून भारताने philosophy of wealth (संपत्तीचे तत्वज्ञान) हा विषय जगभरात चर्चा आणि विचार प्रक्रियेत आणावा. अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर सुद्धा तो सुरू राहील अशी व्यवस्था करावी. पुस्तिका, माहिती पत्रके, व्याख्याने, परिसंवाद, लेख; अशा विविध माध्यमातून हा विषय लावून धरावा. बाकी सगळं चऱ्हाट सुरू राहीलच. त्याचा फार उपयोग होत नसतो. पण जगाच्या विचारात एखादी गोष्ट रुजली की त्यातून स्थायी बदल होतो. त्यासाठी philosophy of wealth (संपत्तीचे तत्वज्ञान) हा विषय भारताने पुढे आणावा.

#श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०२२

जाती व्यवस्था आणि प्रवाहीपण

आर्थिक आरक्षणा वरील चर्चेनंतर एक मुद्दा आला आहे - caste system was dynamic or static? जाती व्यवस्था स्थिर होती की प्रवाही? म्हणजे जात, वर्ण बदलले जात असत की नाही? ही व्यवस्था प्रवाही होती. बदल होत असत असं अनेकांनी म्हटलं आहे. त्याचे काही पुरावे वगैरेही आहेत. याच संदर्भात एक माहिती कानावर आली की, इंग्रजांनी जातीवर आधारित जनगणना सुरू केली होती आणि १९४१ साली ती बंद केली. त्याचे कारणही जाती व्यवस्थेचे हे प्रवाहीपण होते. गंभीरपणे विचार करण्यासारखा विषय आहे.

- श्रीपाद कोठे

९ नोव्हेंबर २०२२

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

अल्पसंख्य हिंदू?

हिंदूंना अल्पसंख्य ठरवण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. सरकारने त्यात मत मांडण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. पुढे काय होईल ते कळेलच. परंतु हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्याचे हे प्रयत्न अत्यंत चुकीचे आहेत. मागे यावर लिहिलं होतं. ते सापडलं तर पुन्हा पोस्ट करीन. तूर्त एक मुद्दा.

हिंदूंना अल्पसंख्य घोषित करायचं म्हणजे हिंदू या शब्दाची चौकटबद्ध व्याख्या करावी लागेल. एकदा का चौकट तयार झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या व्याख्येला मान्यता दिली आणि मोहोर उमटवली की, हिंदू शब्दाची आणि हिंदू या संकल्पनेची प्रसरणशीलता संपून जाणार. व्याख्येपेक्षा थोडाही फरक पडला की, ती व्यक्ती अहिंदू होईल. लाभहानीची गणिते मांडून त्यासाठी दावेही केले जातील. कुरघोडी किंवा काही लाभहानी एवढा संकुचित विचार करून हिंदूंना अल्पसंख्य घोषित करण्यासाठी प्रयत्न ही फार घातक गोष्ट ठरेल. एवढेच नाही तर it will open a pandoras box. सगळ्या गोष्टी व्याख्येत बसवण्याचा इंग्रजांनी आपल्या बुद्धीला दिलेला संस्कार लवकरात लवकर टाकून द्यायला हवा.

#श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०२२

आंधळे आणि हत्ती

लिळा चरित्रातील हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. बहुतेकांच्या कानावरून ती गेलेली असतेच. पण आता वाटतं की, विचारांच्या क्षेत्रात तो प्राथमिक शाळेतला धडा आहे. कारण डोळस माणसाला हत्ती कसा दिसतो हे सत्याचं प्रमाण निश्चित करून ती गोष्ट रचली आहे. डोळस माणसाला हत्ती जसा दिसतो ते त्याने कितीही समजावून सांगितलं तरीही अंध व्यक्तींसाठी ते निरर्थक राहील आणि त्यांना जे जाणवतं वा लक्षात येतं तेच त्यांच्यासाठी सत्य राहील. त्या सात आंधळ्यांचं सत्य वेगळंच राहणार. दुसरं म्हणजे - आंधळ्यांना हत्ती कसा समजतो किंवा डोळस माणसाला हत्ती कसा समजतो; याचं प्रत्यक्ष हत्तीच्या दृष्टीत काहीच महत्त्व नाही. हत्तीच्या दृष्टीने हत्ती काय असेल हे हत्ती सोडून कोणालाही कळणार नाही अन् हत्ती कोणाला सांगू शकणार नाही. अन् त्याने सांगितलं तरीही त्याचा काही उपयोग नसणार.

सत्य ही अशीच गंमत आहे.

#श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०२२

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

पक्ष आणि निवडणुका

ग्रापंचायतींच्या निवडणुका पक्षीय आधारावर नसतात तरीही सगळेच पक्ष आपापले दावे करतात. मग पक्षीय आधारावरच निवडणूक का घेऊ नये? एक तर सरळ सरळ पक्ष आधारित निवडणूक घ्यावी किंवा त्यापासून पक्षीय राजकारण पूर्णपणे वेगळे ठेवावे. पण आत्यंतिक ढोंगी असलेला आपला समाज असे करेल का? शक्यता कमीच वाटते. समाज म्हणून आपण दुतोंडी आणि ढोंगी आहोत. मुळात आपण एक चांगला समाज असायला हवं असं ७०-८० टक्के लोकांना वाटतच नाही. त्यामुळे अनेक चर्चा फक्त वांझ चर्चा असतात. त्यांना फारसा अर्थ नसतोच.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२३

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

अ वेड्यांसाठी

बरं झालं भिडे गुरुजी बोलले. मरगळलेल्या समाज माध्यमात जान आली. अन् समाज माध्यमातील नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणेच लगेच दोन पाटांनी धारा वाहू लागल्या. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही का? नक्कीच करता येईल. पण म्हातारी मेल्याचं दुःख नसलं तरी काळ सोकावतो. मुख्य म्हणजे भिडेंची असलेली हिंदुत्ववादी प्रतिमा आणि महिला विषयक चर्चा या दोन मुद्यांमुळे काळाला सोकावू देणे इष्ट ठरत नाही. त्यासाठीच हे लिखाण.

एक प्रवाह हिरीरीने कुंकू लावण्याच्या बाजूने खिंड लढवत आहे तर कुंकू लावणे म्हणजे स्त्रीला गुलाम करणे यासारख्या पुरोगामी म्हणवणाऱ्या कविताही प्रसवल्या जात आहेत. दोन्हीही वेडपटपणा. कारण कुंकू न लावल्याने जसे आभाळ कोसळत नाही तसेच कुंकू लावल्याने आभाळ फाटतही नाही. महिलांनी कुंकू लावावं की लावू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना कुंकू लावणे खूप महत्त्वाचे वाटते आणि त्यामागे काही विज्ञान आणि तत्वज्ञान आहे असे वाटते त्यांनी त्याचा प्रचार करणे यातही गैर काहीच नाही. त्याचवेळी कोणी कुंकू लावत नसेल वा कोणाला कुंकू लावायचे नसेल वा कधी लावायचे असेल आणि कधी लावायचे नसेल तर तेही करता यायला हवे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आम्ही स्व पलीकडे जाऊन किती अन् काय सामावून घेऊ शकतो. दुष्टता, आततायीपणा, अश्लीलता, असभ्यता सोडून अन्य गोष्टींसाठी दुराग्रही असणे अयोग्यच ठरते. भिडे गुरुजी सामाजिक व्यक्तिमत्व आहे, पत्रकारिता सामाजिक व्यवसाय आहे, घडलेली घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आहे; त्यामुळेच भिडे गुरुजींचा आग्रह अनाठायी ठरतो. रोज सोवळे नेसून पूजा अर्चा करणाऱ्यांच्या घरातही कुंकू न लावता मुली, बाया राहतात. ते न आवडणे समजू शकते पण त्यासाठी किती, कुठे अन् कसे ताणायचे याचे तारतम्य हवे.

भिडे गुरुजींची प्रतिमा हिंदुत्ववादी असल्याने त्यांच्या मताचा संबंध जाणता अजाणता हिंदुत्वाशी जोडला जातो. ते स्वाभाविक आहे. अन् म्हणूनच ते व्यापक हिंदुत्वासाठी घातक आहे. व्यक्तिगत मत हे हिंदुत्वाचे मत ठरत असेल तर त्याची काळजी हिंदुत्वाची चिंता वाहणाऱ्या लोकांनी करायची की नाही करायची? देशभरातल्या अनेक जाती, उपजाती, जनजाती, आदिवासी, वनवासी कुंकू लावत नाहीत. त्यांना अहिंदू ठरवणार का? विधवा वगैरे उल्लेखही त्यांच्या बोलण्यात आहे. त्यांच्या बोलण्यामुळे हिंदुत्वाचा विचार विधवांबद्दल अनुदार आहे असे चित्र निर्माण होते. जे हिंदुत्वाच्या मूळ गाभ्याला अगदीच छेद देणारे आहे. ज्या शिवरायांचे ते भक्त आहेत त्या शिवरायांच्या मातोश्री प्रणम्य आणि प्रात:स्मरणीय जिजाऊ मा साहेब विधवा होत्याच ना? श्री रामकृष्ण यांच्या पत्नी सारदा माता विधवा असूनही लाखो लोकांकडून जगन्माता म्हणून पूजल्या जातातच ना? भिडे गुरुजींना हे चालणार की नाही? वेश्येच्याही मुलाला ऋषीचा दर्जा देणारे हिंदुत्व किती चिल्लर पातळीवर आणायचे याचा गंभीर विचार हिंदुत्वाच्या धारकऱ्यांनी करायला हवा. प्रतिकांना अवास्तव महत्त्व देण्यातून काहीही साध्य होत नाही याचे भान सुटायला नकोच. मनाला, बुद्धीला व्यापक करणे हेच ईश्र्वरी प्रतिमेसह सगळ्या प्रतिमा आणि प्रतिकांचे उद्दीष्ट. तसे होत नसेल तर त्यांना अर्थ उरत नाही.

एखाद्या शाळेने बिंदी लावायला विरोध करणे आणि बिंदी लावल्याशिवाय भिडे गुरुजींनी बोलायला नकार देणे दोन्ही सारखेच. लोकसंख्या असंतुलन, दहशतवाद, हिंदूंवर आघात; अशी कारणे पुढे करून चुकीच्या गोष्टी करणे आणि त्याच्या समर्थनात हिरीरीने उतरणे; अखेरीस आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरते. इतिहासात भय आणि प्रलोभन यामुळे अनेकांनी हिंदुत्व सोडले; आज वेगळ्या संदर्भात पुन्हा भय आणि प्रलोभन यांच्यासाठी हिंदुत्व सोडणे सुरू आहे. दुर्दैवाने हिंदुत्वाच्या नावानेच हिंदुत्वाचा त्याग केला जातो आहे. जगातील सातशे कोटी लोकांनी हिंदू नाव लावले तरीही हिंदुत्व जिवंत राहिले असे म्हणता येणार नाही. कारण त्यातील तत्व इस्लामी वा अन्य असेल. वर्तमान आव्हानांचा मुकाबला करतानाही हिंदुत्वाचा मूळ गाभा लुप्त होणार नाही ही तारेवरची कसरत केल्याविना हिंदूंना पर्याय नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

एकाच वेळी अनेक उपासना पद्धती, एकाच वेळी विविध स्मृती, एकाच कुटुंबात निरनिराळे आचार; हे सगळे हिंदुत्वात आधीही होते, आजही आहेत. अन् असे राहिले तरच भविष्यात हिंदुत्व राहील. अन्यथा नाही. हा वाद महाराष्ट्रापुरता आहे. कशाला वाढवता? या प्रश्नाचे साधे उत्तर आहे - तुम्हाला महाराष्ट्रातील हिंदू व्यापक हवा की संकुचित? ज्यांना डबक्यात राहायचे त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीच हशील नाही.

भिडे गुरुजींचे कार्य वगैरे मुद्देही पुढे केले जातात. एक आठवण ठेवली पाहिजे की, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र सुद्धा आपल्या स्थानापासून ढळू शकतात हे न लपवणे आणि स्वीकार करणे हेच हिंदुत्वाचे लखलखीतपण आहे. बाकी राजकीय बाह्या सरसावणारे आणि त्यातही मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि असेपर्यंत हिंदुत्वाचा आवेश असणारे यांचे भले होवो.

भक्तीने ज्ञानाचा हात सोडला किंवा भावनांनी विचारांना तिलांजली दिली की बोलण्यासारखं फार काही उरत नाहीच. ज्यांनी हे केलेलं नाही; हे लिखाण त्यांच्यासाठीच आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

कामाचे तास

तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावं, हे नारायण मूर्ती यांचं मत न पटणारं आहे. हा भांडवलशाही विचार आहे. उलट आठवड्यात सहा दिवस रोज पाच तास काम आणि एक दिवस सुटी असं हवं. पाच पाच तासांच्या तीन पाळ्या असाव्या. याने अधिक लोकांना काम मिळेल. जास्त efficiently काम होईल. अन् माणसाचा बैल किंवा गाढव न होता (खरं तर बैल आणि गाढव यांच्याकडून पण मर्यादितच काम करून घ्यायला हवं.) तो माणूस म्हणून जगू शकेल, विकसित होऊ शकेल. काम कशासाठी करायचं याचाही मुळातून विचार करायला पाहिजे. केवळ उत्पादन वाढवा (पक्षी पैसा वाढवा) हा तर्क निरर्थक आहे.

#श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०२३

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

नवीन रस्ते हवेत

- अमेरिकेत गेल्या दहा महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये १५ हजार लोक मरण पावले.

- प्रदूषणामुळे दरवर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या अंदाजे ९० लाख.

- इस्रायल हमास युद्धात गेल्या १५ दिवसात चार ते पाच हजार लोक मरण पावले.

हकनाक मरण पावणाऱ्या या हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? कोणासाठी आणि कशाची किंमत चुकवली या लोकांनी?

अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी जुने रस्ते मोडीत काढून आपण चांगले रस्ते बांधतो. अकारण मरावे लागणाऱ्या अशा लोकांसाठी, जगण्याचा जुना रस्ता सोडून नवीन रस्ता बांधायला नको का? जीवनाच्या जुन्या रस्त्यावरील हे महाप्रचंड अपघात आपली वेदना, संवेदना कधी जागी करणार??

#श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२३

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

ऋषी सुनक आणि हिंदू अर्थशास्त्र

ॠषी सुनक हिंदू आहेत?

- हो.

ॠषी सुनक अर्थतज्ज्ञ आहेत?

- हो.

ॠषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान आहेत?

- हो.

म्हणूनच एक अपेक्षा. ईशावास्य उपनिषदापासून डॉ. म. गो. बोकरे यांच्यापर्यंत हिंदू अर्थविचारांचा जो प्रवाह वाहत आलेला आहे, त्याला जागतिक आर्थिक विचारांचा व्यवस्थांचा आधार बनवण्याचा प्रयत्न करावा. ब्रिटनसह जगाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यात त्याची मदतच होईल.

#श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२३

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

मनमानी

मनमानी करणे हा स्वभाव असतो. खरं तर त्याला राक्षसी वृत्तीच म्हटलं पाहिजे. कारण 'कोण माझं काय करून घेणार?' ही मानसिकता त्यामागे असते. असंख्य गोष्टीत ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. सिग्नलला न थांबणे असो, रांगेत न लागणे असो, गाडीचा वेग नियंत्रणात न ठेवणे असो, गाणी मोठ्याने वाजवणे असो, कचरा शेजाऱ्याकडे ढकलणे असो, बील वेळेवर न भरणे असो, पाण्याची नासाडी असो, सार्वजनिक जागी मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे असो, पाळीव प्राण्यांना कुठेही घाण करू देणे असो; अक्षरशः असंख्य ठिकाणी, असंख्य घटनांत, असंख्य प्रसंगात ही मनमानी वृत्ती पाहायला मिळते. बरं, या वृत्तीच्या लोकांना सांगून, समजावून, धमकावून, बळजबरी करून, प्रेमाने, द्वेषाने, कायद्याने; कशानेही काही फरक पडत नाही. एक वेळ दगड चालायला लागतील पण यांना काही म्हणजे काही फरक पडत नाही. लाजलज्जा तर यांच्याकडे नसतेच. सदसद्विवेबुद्धीशी त्यांचं काहीही नातं नसतं. कधी अडचणीत सापडलेच तर लाचारी करून सुटका करून घेतील पण पुन्हा कुत्र्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या संख्येतील या राक्षसांना सहन करणे यापलीकडे काय करता येणे शक्य आहे?

# श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०२३

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

approach

सध्या कुस्तीस्पर्धांची एक जाहिरात सुरु आहे. एक तरुण मांडीवर थाप मारून एका तरुणीला आव्हान देतो आणि ती तरुणी न घाबरता तशीच मांडीवर थाप देते आणि न बोलता पुढे जाते. तरुण खजील होऊन खाली मान घालतो. जाहिरातीतून जो संदेश दिला तो स्पृहणीय आहेच.

कालच राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनावर एक बोलपट लोकसभा टीव्हीवर पाहिला. काही गोष्टींची उजळणी झाली. सध्या सुरु असणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात येत आहे तोच संदेश घेऊन मावशी १९३६ साली उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर आणि नऊवारी पातळ नेसून. सगळ्या भारतभर तो संदेश पोहोचवला आणि त्यानुसार वागणाऱ्या, दंड खांद्यावर घेऊन थाटात संचलन करणाऱ्या हजारो सेविका देशाच्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या.

आमच्या घरासमोरच काही मोकळे प्लॉट होते. त्या मैदानावर समितीची शाखा लागत असे. माझ्या बहिणी इतर सेविकांसह ती शाखा सांभाळत. त्यावेळच्या नागपूरच्या काँग्रेस खासदाराच्या ताफ्यातील एक `दादा' आमच्या पलीकडील वस्तीत राहत असे. तो अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन उभा राहत असे. सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वीची ही कहाणी. त्यावेळी नागपूर सुद्धा आजच्या सारखे नव्हते. आमची वस्ती नवीनच होती. रिक्षावाले अंधार पडला की यायला घाबरत. वस्तीच्या मुख्य चौकात रात्री एकटेदुकटे जाणे कठीण होते. तलवारी वगैरे केव्हा निघतील नेम नसे. रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा राहणारा `दादा' तर मोठंच प्रस्थ होतं. पण समितीची शाखा. त्या सगळ्या मुलींची हिंमत, संघाची तगडी शाखा (आमची शाखा शंभरी शाखा होती), संघाची म्हणून जी खास कुटुंब होती त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्यामुळे निर्माण झालेले वस्तीतील वातावरण यामुळे, कोपऱ्यावर उभे राहण्यापलीकडे त्या `दादाने'` काहीही केले नाही. तो करू शकला नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे मावशी केळकर यांनी सांगितलेला approach.

जाहिरातीतील संदेश आणि मावशी केळकर यांनी दिलेला संदेश एकच आहे. पण दोन्हीचा approach मात्र फार वेगळा आहे. तो फार समजावून सांगण्याची गरज नाही. दोन्ही approach चे परिणाम गुणवत्ता म्हणूनही खूप वेगळे. दोन्हीची उदाहरणे आज मोठ्या प्रमाणात आजूबाजूला सहज दिसणारी. शेवटी कोणाचाही कोणताही approach हा प्रेरणा आणि प्रयोजन यांनी आकार घेतो. मावशी केळकर यांचा approach आणि जाहिरातीचा approach यात हा फरक आहे. संदेश एक असला तरीही. समाजासमोर दोन्ही आहे. काय स्वीकारायचं हा समाजाचा प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

गांधी

 - गांधीजींचं दुर्दैव कोणतं?

- गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी, हा काँग्रेसचा दावा आणि हा दावा मान्य करणारे असंख्य समर्थक व विरोधक; हे गांधीजींचं दुर्दैव.

- गांधीजींचं सुदैव कोणतं?

- हाताशी एक - दोन अणुबॉम्ब असताना, कोणताही विचार न करता त्याचा उपयोग करणारे जग; हाताशी हजारो अधिक शक्तीशाली अणुबॉम्ब असताना आणि परिस्थिती खूप चिघळते तरीही; अणुबॉम्ब वापरायला टाळाटाळ करतं; हे गांधीजींचं सुदैव.

#####

द्वेष सहन करण्याची अपार शक्ती असणाऱ्या महात्मा गांधीजींना...

आणि...

गांधीजींच्या पायी जीवननिष्ठा वाहणाऱ्या लालबहादूर शास्त्रीजींना...

जयंतीचे अभिवादन. 🙏

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

Communism म्हणजे काय?

गरीब, वंचित वगैरेंबद्दल बोललं की; कम्युनिझमच्या नावाने खडे फोडणारे खूप वाढले आहेत. त्यांनी फक्त दोन गोष्टी माहिती करून घ्याव्या - कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधीचा आहे आणि मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलेले - 'मी संपूर्ण भारत पालथा घातला पण मला कुठेही भिकारी दिसला नाही, घरांना कुलुपे दिसली नाहीत' - हे विधान कधीचे आहे ते माहिती करून घ्यावे. भारताने हे कसे साध्य केले होते आणि कसे साध्य केले असावे याचा विचार करावा. अन् त्यानंतर ऊर्जा आणि उत्साह उरलाच तर - 'ईशावास्यमिदं सर्वं' हा आर्थिक विचार सांगणारा मंत्र कशातला आणि कधीचा आहे हे माहिती करून घ्यावे. उथळपणे कम्युनिस्ट कम्युनिझम करत राहणारे लोक स्वार्थी, हावरट, विचारशून्य आणि संवेदनाहीन भांडवलशाही समर्थक असतात.

- श्रीपाद कोठे 

३० सप्टेंबर २०२३

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

तो

कुठे तरी जाणारी कुणाची तरी पालखी. त्यातल्या एका भक्ताने फाटक वाजवले. समोर जाऊन पाहिले. आत आलो. परत समोर जाऊन दक्षिणा त्याच्या हातावर ठेवली. त्याने माझ्याबद्दल सांगणे सुरू केले. पण या प्रकाराचा अनुभव असल्याने आणि आपल्याबद्दल काही जाणून वगैरे घेण्यात रस नसल्याने हात जोडून आत येऊ लागलो. त्याने पेलाभर पाणी मागितले. पक्का चिकटू दिसतो असं मनात म्हणत त्याला पाणी दिलं. पाणी पिल्यावर पुन्हा तो सुरू झाला. मीही एकेक पाऊल मागे येऊ लागलो. शेवटी म्हणाला - 'चिंता करू नका. सगळं व्यवस्थित होईल. कोणालाही तुमचं काही करावं लागणार नाही. प्रकृती सदा उत्तम राहील.' मी आत आलो. तो पुढे गेला. बस्. या प्रसंगातील त्याची शेवटची दोन वाक्ये मात्र आवडून गेली. बाकी कर्ता करविता जाणे.

अमर्याद

फेसबुक पेज वरखाली करताना एक व्हिडिओ दिसला. एक महिला आलिशान गाडी चालवत येते आणि एका ठिकाणी थांबते. खिडकीची काच खाली करते आणि भीक मागणारी काही मुलं खिडकीजवळ येतात. ती आपल्याजवळच्या पोलिथिनमधून दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब काढते अन् एकाच्या हातावर ठेवते. तोवर छोट्या छोट्या मुलामुलींची रांग तयार झाली असते. गाडीतील महिला प्रत्येकाला दोन केळी, एक सफरचंद, एक डाळिंब देते. हे काम आटोपल्यावर खाली उतरते आणि त्या मुलामुलींना जवळ घेते. कोणाला मिठी मारते, कोणाचा मुका घेते. कोणाच्या डोक्यावरून हात फिरवते.

ती मुलेही खुश होतात. हसतात. फळे खातात. नव्वदेक किलोची पंचतारांकित पोशाख केलेली ती महिला आलिशान मोटारीत बसून निघून जाते. त्या महिलेची गाडी, पोशाख, व्यवहार सगळं पाहून; ती उच्चभ्रू वर्गातील असल्याचं स्पष्टच होतं. अन् तिची कृती पाहून तिच्या मनात करुणा होती हेही स्पष्ट होतं. नेमकी याच ठिकाणी सामान्यत: गल्लत होते. करूणेचं पारडं जड होतं. गरीबांना मदत ही नीती मनावर ठसते. अन् हळूच माणूस भरकटतो. त्याची विचारशक्ती खुंटते.

करुणा ही चांगली गोष्ट आहे. गरीबांना मदत ही आदर्श बाब आहे. पण मूळ प्रश्न हा आहे की, गरीबांना मदत करण्याची वेळ का येते? भुकेल्या मुलांना फळे देऊन आपल्या मनातील करुणा शांत करण्याची आणि मिळालेली फळे खाऊन आनंदी होण्याची स्थिती का उत्पन्न व्हावी?

ती महिला अमर्याद जीवनशैलीची प्रतिनिधी होती. ही अमर्याद जीवनशैलीच विषमता आणि करुणा व आनंदाचे कृतक समाधान यासाठी कारण आहे, हे लक्षात घेतले जात नाही किंवा लक्षात येत नाही किंवा दुर्लक्षित केले जाते. अमर्याद पैसा, अमर्याद स्वातंत्र्य, अमर्याद भोग, अमर्याद सुख, अमर्याद काम, अमर्याद संग्रह, अमर्याद सत्ता, अमर्याद घरे, अमर्याद फार्म हाऊसेस, अमर्याद गाड्या, अमर्याद वेग, अमर्याद तंत्रज्ञान, अमर्याद स्वप्ने, अमर्याद इच्छा... जे जे काही असेल ते अमर्याद. ही मर्यादाशून्यता विषमतेला जन्म देते. कारण अमर्यादपणाची लालसा आपली space मर्यादित करण्याला नकार देते आणि त्याच वेळी दुसऱ्यांना त्यांची space देण्यालाही नकार देते. यातून संघर्ष निर्माण होतो. ज्याला या अमर्याद संस्कृतीने स्पर्धा असं फसवं नाव दिलेलं आहे. त्या स्पर्धेत टिकला तो टिकला. पुढे गेला तो पुढे गेला. त्याचं अनावश्यक समर्थन केलं जातं. स्पर्धेतील हा विजय आपल्या अमर्यादपणाचे pampering आहे याकडे डोळेझाक केली जाते. पण कधीकधी मूळ मानवी वृत्ती उसळी मारते आणि करुणेचे शमन करण्यासाठी सेवेचा आसरा घ्यावा लागतो. हे सगळंच फार उथळ आणि दिखाऊ असतं. अमर्यादपणाचा सोस कमी करणं हाच उपाय आहे. हा उपाय कोण आणि कसा करणार? ते शक्य होईल?

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३

सर्वांजवळ सर्वच असेल, हे होऊ शकणार नाही.

याचा केवळ समतेच्या दृष्टीने विचार केला तर तो फार वरवरचा होईल.

प्रत्येकाला त्याच्या क्षमते नुसार काम व गरजे येवढा पैसा मिळायला हवा, हे आदर्श तत्त्वज्ञान.

आपण जरा विद्वानांच्या भाषेत बोलू....

उच्च कोटीचाया विद्वानाच्या प्रवचनाला फारच तोकडे लोक असतात व इंदूरीकरांचे समोर जागाच उरत नाही.

यात न उच्चकोटीचे चुकीचे आहेत ना इंदूरीकर. यात इंदूरीकरांनी जाहिरात केली होती वगैरे पळवाटा आहेत.

प्रश्न समरसतेचा वा जिव्हाळ्याचा आहे. जे माझ्याकडे भरभरून आहे, व इतरांकडे नाही, ते मी त्यांच्यासोबत वाटून घेणे (sharing) हा भाव महत्त्वाचा.

हाच भाव कमी होत चालल्याने कम्युनिस्ट व कम्युनलांचे फावते.

आपल्याकडे म्हणूनच लहानपणापासून वाटण्याची सवय लावतात.

मला आजही आपल्या उत्पन्नाच्या १०% समाजावर खर्च करणारे काहीजण माहित आहेत.

Kishor Paunikar मला वाटतं थोडा अधिक खोल, शब्द आणि त्यांचे अभिनिवेशी समर्थन किंवा विरोध यांच्या बाहेर पडून विचार करायला हवा. समता वगैरे मी म्हटलेले नाहीच. दुसरे म्हणजे आपण म्हणता त्या प्रमाणे प्रत्येकाला गरजे एवढे कसे मिळेल? आज जो अनिर्बंध आणि अमर्यादपणा विचार, योजना, धोरण, सिद्धांत या सगळ्यात आलेला आहे त्याने प्रत्येकाला गरजे एवढं मिळेल का? अंबानी आणि मोटारीच्या खिडकीतून फळं घेणारे यात काही वावगे वाटत नसेल तर गोष्ट वेगळी. सगळ्यांना सगळे मिळणार नाही वगैरे तत्वज्ञान, माणसाच्या लालसा आणि हाव झाकण्यासाठी वापरले जाऊ नये. मानवी प्रयत्न सगळ्यांना सगळे मिळावे हाच असायला हवा. त्यात निसर्गत: जे कमी अधिक राहील ते राहील. पण प्रयत्न करतानाच सगळ्यांना सगळं मिळू शकत नाही याला मान्यता दिली तर तो ढोंगीपणा, स्वार्थ आणि लालसा यांचेच पोषण करेल. सर्वेपी सुखिन: संतु म्हणजे कमुनिझम वगैरे होत नाही.

Shripad Kothe रस्त्यावरचा मजूरही श्रम करतो व अंबानी पण करतो. पण अंबानी लाखो लोकांना पोसतो व मजूर मोठ्या मुष्किलीने आपले पोट भरतो.

आता अंबानीची क्षमता जास्त असल्याने तो जास्त कमावतो, हा रोष साम्यवादाकडेच झुकतो.

मजुराची क्षमता वाढणे शक्य नसल्याने अंबानीला लुटून गरीब करणे, हाच पर्याय बाकी राहतो.

त्यामुळे सर्वैपी सुखिनः म्हणजे ज्याला जितकी मुलभुत गरज आहे तितके किमान मिळणे. यासाठी जास्त साधन संपत्ती असलेला माणूस खिडकी उघडतो ही सांस्कृतिक समृद्धीच आहे.

Kishor Paunikar मोठा विषय आहे. वाद घालायला मला वेळ नाही. पण तुमची चूक होते आहे हे निर्विवाद. राग आला तरी - अधिक अभ्यास आणि चिंतन करण्याचा आणि निरपेक्ष चिंतन करण्याचा सल्ला देईन. 🙏

अन् हो, अंबानींची क्षमता जास्त वगैरे तद्दन फालतू तर्क सोडता आले तर बरं. 🙏

Shripad Kothe आपले मार्गदर्शन नक्कीच शिरोधार्य!

निरपेक्ष चिंतन वगैरे कळत नसल्यानेच मी याविषयी कुठे मार्गदर्शन मिळेल का हे शोधत असतो.

आपला रामशास्त्री बाणा मला नेहमीच आवडतो. 🙏

Kishor Paunikar गरीब, वंचित वगैरेंबद्दल बोललं की; कम्युनिझमच्या नावाने खडे फोडणारे खूप वाढले आहेत. त्यांनी फक्त दोन गोष्टी माहिती करून घ्याव्या - कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कधीचा आहे आणि मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलेले - 'मी संपूर्ण भारत पालथा घातला पण मला कुठेही भिकारी दिसला नाही, घरांना कुलुपे दिसली नाहीत' - हे विधान कधीचे आहे ते माहिती करून घ्यावे. भारताने हे कसे साध्य केले होते आणि कसे साध्य केले असावे याचा विचार करावा. अन् त्यानंतर ऊर्जा आणि उत्साह उरलाच तर - 'ईशावास्यमिदं सर्वं' हा आर्थिक विचार सांगणारा मंत्र कशातला आणि कधीचा आहे हे माहिती करून घ्यावे. उथळपणे कम्युनिस्ट कम्युनिझम करत राहणारे लोक स्वार्थी, हावरट, विचारशून्य आणि संवेदनाहीन भांडवलशाही समर्थक असतात.

#श्रीपादचीलेखणी

Shripad Kothe अरेऽव्वा! आज आपण मुक्त विद्यापीठात फिरवून आणत आहात.

हे सारे मी टिपून ठेवतो. कधीतरी तर या साऱ्यांवरून नजर फिरवण्याचा योग येईलच! 🙏

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

भूक

आजकाल अलक असा एक प्रकार असतो. हे अलकमध्ये बसेल का?

###########

देवळात विठोबा करून बाहेर पडलेला महेश, पोटोबा करायला शेजारच्या उपहारगृहात जात होता. उपहारगृहातून एक जण पोटोबा करून बाहेर येत होता. त्याच वेळी केस पिंजारलेल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलीने त्या व्यक्तीपुढे हात पसरला. त्याने पैसे वा खाद्यपदार्थ न देता तिला सल्ला दिला - भिक नको मागत जाऊ. महेशने खिशात हात घातला आणि तिच्या हातावर एक नोट ठेवली. ती निघून गेली. बाहेर पडणारी व्यक्ती महेशला म्हणाली - 'तुम्ही लोक असे करता. हे बरोबर नाही. त्यांनी सन्मानाने जगले पाहिजे.' महेश त्या गृहस्थाला म्हणाला - 'तुमच्याशी सहमत. त्यांनी सन्मानाने जगलेच पाहिजे. पण मला त्या सन्मानाच्या आधी रांगेत उभी असलेली तिची भूक दिसली आणि महत्त्वाची पण वाटली.' तो बाहेर पडला. महेश आत गेला.

- श्रीपाद कोठे

बुधवार, २७ सप्टेंबर २०२३

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

विज्ञान आणि वैज्ञानिक वृत्ती

आजच्या मंगळ मोहिमेने आनंदाची अन अभिमानाची लाट आलेली आहे. ती अतिशय योग्य अशीच आहे. ज्याला आनंद आणि अभिमान वाटणार नाही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण उत्साहभरल्या प्रतिक्रियांमधल्या वेगवेगळ्या शब्दातील काही प्रतिक्रिया अशा होत्या ज्यांचा आशय होता- मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाबाबत. आपण आता तरी त्यातून बाहेर पडणार का असा त्या प्रतिक्रियांचा आशय. गंमत वाटली. ज्योतिष्यशास्त्र मानायचं वा नाही, मंगळाचा प्रभाव मानायचा वा नाही; हे मुद्देच वेगळे आहेत. पण आपण मंगळावर पोहोचलो म्हणजे मंगळ त्याचा प्रभाव पाडणे बंद करेल का? माणसाने मिर्चीचे गुणधर्म शोधून काढले किंवा न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोधून काढलं म्हणजे मिर्ची वा गुरुत्वाकर्षणाने परिणाम करणे सोडले का? आपण मंगळावर पोहोचून विज्ञानात किती प्रगती गाठली ते दाखवून दिले. पण वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला किती शिकलो आहे? वैज्ञानिक वृत्तीसाठी अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे.

- श्रीपाद कोठे

२४ सप्टेंबर २०१४

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

चार 'स'कार

आज ऋषी पंचमी आणि श्री गजानन महाराज यांचा समाधी दिवस आहे. सहज विचार आला दोहोंच्याही नैवेद्याचा. देवधानाच्या तांदळाचा भात आणि घरी उगवलेल्या आणि शिजवलेल्या भाज्यांची बिना मसाल्यांची भाजी हा ऋषी पंचमीचा, तर साधी भाजी भाकरी हा गजानन महाराजांचा नैवेद्य. यात काही तरी आज दिसलं. साधेपणा, सद्भाव, सात्विकता आणि सत्य. ऋषी म्हणजे, संत म्हणजे या चार गोष्टी. जीवनात समाधान देण्याची आणि समाजाची धारणा करण्याची मूलभूत आणि अंगभूत शक्ती असलेले हे चार स - कार. आणखीन एक गोष्ट जाणवली - unattached attachment आणि non involved involvement. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी, त्यांचा राग, त्यांचे कष्ट, त्यांची साधना हे सगळं unattached आणि non involved असतं. सामान्य माणूस attachment आणि involvement याशिवाय काहीच करू शकत नाही. त्याचे विचार, व्यवहार, भावना त्याशिवाय होतच नाहीत. ऋषी आणि संत मात्र कोणतंही नातं, कोणतंही बंधन यात न राहूनही सदैव सद्भावाचा कल्याणमंत्र जपत असतात.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०२३

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

प्रतिसाद

माणूस जगतो, वागतो म्हणजे काय? खूपदा वर्णन केलं जातं- जन्म आणि मृत्यू यांच्या मधील काळ म्हणजे जगणं. तरीही जगणं म्हणजे काय याचा उलगडा होत नाहीच. जो जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? त्यामुळे हे वर्णन फार काही पदरात टाकत नाही. मग जगतो, वागतो म्हणजे काय? तर जगणे, वागणे म्हणजे respond करणे. अगदी आईच्या पोटातून निघालेल्या बाळापासून तिरडीवर ठेवण्याच्या अवस्थेपर्यंतचा माणसाचा प्रवास म्हणजे रिस्पॉन्स देणे. प्रत्येक क्षण म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिसाद !! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजांना प्रतिसाद. अगदी कोणतीही कृती घ्या किंवा कोणताही विचार घ्या; कशा ना कशाला दिलेला तो प्रतिसाद असतो. आपण प्रत्येक जण जिला प्रतिसाद देतो, ती साद येते कोठून? ती आपल्याच आतून येते. भूक लागली की आतून साद येते. प्रश्न पडतो तो आतून येतो. कोणतीही गरज जाणवते ती आतून जाणवते आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण कृती वा विचार करतो. ही प्रत्येकाला येणारी साद वेगळी असते. म्हणूनच एकाच वातावरणात राहणारे वेगवेगळा प्रतिसाद देतात. एखादं निसर्गदृश्य किंवा चित्र किंवा अपघात किंवा घटना किंवा काहीही; त्याला किती प्रकारांनी प्रतिसाद मिळतो. का? कारण त्या बाह्य सादाला दिलेला आतला प्रतिसाद वेगळा असतो. हा आतला प्रतिसाद पुन्हा आपल्याला साद घालतो आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देतो. ही आतल्या - बाहेरच्या साद आणि प्रतिसादाची एक अखंड मालिका म्हणजे जीवन. हे प्रतिसाद आपल्या गरजा भागवण्यासाठी असतात. गरज भागली की प्रतिसाद थांबतो वा बदलतो. यातूनच सुखदु:ख, हर्षविषाद, आकर्षण अपकर्षण, उत्साह निराशा; एवढंच काय सगळं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक, शिक्षण, कला, साहित्य सगळं सगळं आकाराला येतं. सांगण्याची गरजसुद्धा साद घालते आणि त्यातून साहित्य, ग्रंथ आकाराला येतात. कला जन्म घेतात. अनेकानेक व्यवस्था याच गरजांना दिलेल्या प्रतिसादातून विकसित होतात. आपल्या गरजांचे प्रकार आणि प्रमाण यानुसार आपण विविध व्यवस्था, संघटना, गट इत्यादीत सामील होत असतो. अन गरज पूर्ण झाली की त्यातून बाहेर पडतो. एवढेच काय त्या त्या व्यवस्थेत, गटात वा संघटनेत, संस्थेत सुद्धा गरजेप्रमाणे बदल घडवून आणतो. अन आपल्याला suit होईल त्याप्रमाणेच त्यांचे आचारविचार पाळतो. याला कोणीही अपवाद नाही. कोणता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आपापल्या धार्मिक आज्ञा वा नियम आदी काटेकोरपणे पाळतो? कोणता कम्युनिस्ट कम्युनिझमच्या तत्वांचे तंतोतंत पालन करतो? किती कम्युनिस्टांनी व्यक्तिगत संपत्तीचा त्याग केलेला आहे? किती जण आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यघटना वाचली आहे? अन पूर्ण राज्यघटना वाचणाऱ्यांपैकी किती जण रोज ती वाचत वाचत आपले दैनंदिन व्यवहार करतात? जेव्हा कुठेही कधीही व्यवहाराचा संघर्ष होतो तेव्हा, घटना म्हणा, कायदा म्हणा, धर्मग्रंथ म्हणा वा कोणताही प्रमाणग्रंथ काढून त्यानुसार चर्चा सुरु होते. पण तेव्हाही फक्त चर्चाच. वरचढ ठरतात गरज आणि तिला द्यावयाचा प्रतिसाद हेच. मग काय, हे सगळे ग्रंथ, शास्त्र, घटना, व्यवस्था, संस्था, संघटना, रचना निरर्थक म्हणायच्या? नाही. त्या निरर्थक नक्कीच नाहीत. नसतात. ते वरवर चढतानासाठी आधाराचे कठडे असतात. आपल्यापूर्वी जे चढले त्यांनी तयार केलेले. तोल जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग. तसेच त्याला टेकून अंमळ दम खाता येतो. अन त्याच्या आधारे थोडे थांबून किती चढलो याचा अंदाज घेता येतो. मात्र कठडा म्हणजे शिखर नाही. जगणे म्हणजे कठडा धरून ठेवणे नाही. जगणे म्हणजे शिखर सर करणे. शिखर गाठणे. अन प्रत्येकाला हे शिखर गाठावे लागते. इतके लोक चढले, असं म्हणून भागत नाही. आपल्या पूर्वी अनेकांनी शिखर गाठले म्हणून थांबता येत नाही. आपल्या पूर्वीचेही चढले, आपल्यालाही चढायचे आहे आणि आपल्यानंतरचेही चढणारच आहेत. नव्हे शिखर चढणे हीच होऊन गेलेल्या, असलेल्या वा येणाऱ्या सगळ्यांची नियती आहे. अन प्रत्येकाला चढाईची ही सुरुवात पहिल्या पावलानेच करावी लागणार आहे. ही relay race नाही. हे शिखर सतत साद घालत असते आणि आपण त्याला प्रतिसाद देत पुढे पुढे चालत असतो. ग्रंथ, गट इत्यादी आधाराला घेऊन. शिखर चढताना असंख्य वाटावळणे. कधी वाटतं आलं शिखर अन पोहोचावं तर लक्षात येतं किती फसगत झाली ते. मग कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून बोटे मोडणे, नावे ठेवणे, आणखीन किती चालायचे आहे? असे प्रश्न उपस्थित करणे; असे सगळे सुरु असते. पण थांबता येत नाही. कारण शिखराची साद थांबू देणार नसते. शिखर गाठेपर्यंत. हो- अज्ञात शिखर गाठेपर्यंत. शिखर गाठले की मग सगळं निवांत...!!! ना प्रतिसाद देणे, ना कठडे धरणे.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१७

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

आरक्षण

मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा उचल घेतली आहे. आरक्षण या विषयाचा आता चोथाच झाला आहे. मुख्य म्हणजे सगळ्या प्रकारचं आरक्षण हळूहळू संपलं पाहिजे आणि आम्ही आरक्षणविहीन समाज निर्माण करू; असं म्हणण्याची ताकद आणि हिंमत कोणातही नाही. आर्थिक आणि सामाजिक असे आरक्षणाचे दोन पैलू आहेत. त्यातील आर्थिक पैलू हा समन्यायी आर्थिक विकासाशी संबंधित आहे. असा समन्यायी आर्थिक विकास, समन्यायी आर्थिक वितरण करण्याची दृष्टी आणि क्षमताही कोणाकडे नाही. सामाजिक पैलू हा अत्यंत सापेक्ष विषय आहे आणि त्यासाठी एक सुदृढ सामाजिक विचार देण्याचीही कोणाची इच्छा नाही. कुरघोड्या आणि शक्तिसंतुलन या गोष्टी वाईटच आहेत.

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२३

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

लोक प्रतिनिधी

निवडणुका जिंकण्यासाठी सवलती, योजना वगैरे सगळे पक्ष करतात, करतील. परंतु : निवडून आलेल्या आमच्या प्रतिनिधीची संपत्ती त्याच्या कार्यकाळात एक पैसाही वाढणार नाही; असं मात्र कोणीही सांगू शकत नाही. असं आश्वासन देऊ शकत नाही. असे आश्वासन देऊन बहुमताने निवडून येण्याची खात्री असली तरीही.

(टीप - असं केल्याने कोणीही लोक प्रतिनिधी रस्त्यावर वगैरे येणार नाहीत.)

अर्थात व्यक्तिगत अधिकार, मूलभूत अधिकार वगैरे विद्वत्ता सगळे शिकवू शकतातच.

अंतराळ वीर

अमेरिकेने चंद्रावर खरंच यान पाठवलं होतं का? या चर्चेच्या संदर्भात एक तर्क (तसे बरेच पण हा विशेष) वाचनात आला की, त्या यानासोबत गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर परत कसे आले? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती बाहेर त्यांना पाठवायला रॉकेट वगैरे सोडावे लागले. चंद्रावरून परत पृथ्वीच्या कक्षेत त्यांना ढकलायला कोणी, कुठून आणि कसे रॉकेट सोडले असेल? किंवा काय प्रक्रिया असावी?

जिब्रान

'निष्क्रिय असणे म्हणजे; अनंताच्या प्रवासाला निघालेल्या जीवनाच्या देखण्या शोभायात्रेतून बाहेर पडणे होय. तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही; तासांच्या कुजबुजीला संगीतात परिवर्तित करणाऱ्या हृदयाची बासरी असता. काम करावे लागणे म्हणजे शाप व दुर्दैव नसून; तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही; पृथ्वीच्या स्वप्नाचा जन्म झाला त्याच क्षणी, तुम्हाला सोपवण्यात आलेली त्या स्वप्नपूर्तीतील जबाबदारी पार पाडत असता.'

- खलील जिब्रान

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

दर्जा आणि प्रमाणीकरण

डॉक्टरांनी generic औषधेच लिहून द्यावीत हा आदेश national medical commission ने मागे घेतला. यामागे औषध कंपन्यांची लॉबी नसेल का? या आदेशात केवळ जेनरिक औषधे लिहावी एवढेच नव्हते तर डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या कॉन्फरन्स आदींना जाऊ नये असेही आदेश होते. वैद्यकीय व्यवसायातील सध्याची व्यापारी वृत्ती लोकांना दिवसेंदिवस त्रासदायक होत असताना हा आदेश मागे घ्यावा लागणे हे दुर्दैवी आहे.

हा आदेश मागे घ्यावा यासाठी Indian Medical association आणि औषध निर्माण कंपन्या यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या चर्चेत औषधांचा दर्जा हा मुद्दा मांडण्यात आला आणि आदेश मागे घेण्यात आला. मी या विषयातला तज्ञ नाही. अभ्यासक देखील नाही. परंतु नेहमीच सतावणारा एक सामान्य प्रश्न याही निमित्ताने मनात आला की, दर्जा (quality), प्रमाणीकरण (standardization) या गोष्टी आपापली पोतडी भरण्यासाठी वापरल्या जातात का? हे केवळ औषधी या विषयापुरतेच नाही. अन्न, औषधी, शिक्षण, विभिन्न उद्योग, वस्तू, सेवा अशा अनेक बाबतीत दर्जा आणि प्रमाणीकरण हे लोकांना लुबाडण्याचे साधन झालेले नाही का? कालच बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी देशभरातून जी प्रचंड गर्दी उसळली आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाची जी चर्चा सुरू आहे; त्यालाही हा मुद्दा लागू होतो.

शिवाय प्रमाण वा दर्जा नेमका ठरवायचा कसा आणि कोणी? आणि हा दर्जा निश्चित केल्यावर सुद्धा अपेक्षित परिणामांची शंभर टक्के खात्री देता येईल का? अत्यंत चोख दर्जेदार औषधे घेतल्यावर माणूस मरण पावणार नाही किंवा नेमके डोज घेतल्यावर perfectly fit होईल याची खात्री देता येईल का? खाद्य पदार्थात मीठ, साखर, तिखट इत्यादी गोष्टी एकदम दर्जेदार आणि प्रमाणात असतील तर त्याची चव उत्कृष्टच राहील आणि सगळ्यांना आवडेल; तसेच त्याने काडीचाही अपाय होणार नाही याची खात्री देता येईल का? शिक्षक सगळ्या मापदंडावर तंतोतंत बसत असेल तर विद्यार्थी अगदी बृहस्पतिचा अवतार होतील असे सांगता येईल का? अचूक कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी याने समाजातील दुष्ट वृत्ती नाहीशा होतील अशी खात्री देता येईल का?

मूळ प्रश्न हा की, दर्जेदार (म्हणजे काय ते सोडून देऊ) input आणि तेवढाच दर्जेदार output यांचा संबंध किती आणि कसा असतो? याचा अर्थ दर्जा, प्रमाण नकोत असे नाही. परंतु त्याचाही विचार तारतम्याने करावा लागतो. Over stretching ही चांगली गोष्ट तर नाहीच पण तिचा वापर स्वार्थ, अनैतिकता, शोषण यासाठी केला जातो. परिणाम हा केवळ input वर अवलंबून नसतो. क्रिया सिद्धी: सत्वे भवती महतां नोपकरणे. एखाद्या क्रियेची सिद्धी उपकरणांवर नाही तर सत्वावर अवलंबून असते.

टीप : औषधांच्या पाकिटावर त्याचा net उत्पादन खर्च लिहिणे बंधनकारक करून नफा किती घ्यावा याला कायदेशीर बंधन घालावे. परिषदा आणि अभ्यास इत्यादींना उत्पादन खर्च आणि फायदा यात जागा देऊ नये. फक्त एवढं केलं तरी सगळा तमाशा बंद होईल.

#श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०२३

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

उर्मट भुजबळ

मा सरस्वतीने किती शाळा काढल्या असा उर्मट सवाल करणाऱ्याला खडे बोल ऐकवायलाच हवेत. विशेषत: अशी वटवट करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तेव्हा. अहो भुजबळ साहेब, तुम्ही समाजाचं दुर्दैव आहात. सावित्रीबाई महान आहेतच कारण त्यांच्या ठायी संघर्ष करण्यासोबतच कृतज्ञ बुद्धी होती. आपल्याला शाळा काढण्याची बुद्धी माता सरस्वतीनेच दिल्याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या ठायी होती. तुम्हाला मात्र सरस्वतीने कृतज्ञ बुद्धी दिली नाही. खूप मोठं होऊन सुद्धा कृतज्ञ असणं हेच मोठेपणाचं लक्षण असतं. तुमच्या ठायी कृतज्ञते ऐवजी कृतघ्नताच ठासून भरली आहे. माता सरस्वतीची उपासना केल्याशिवाय कृतज्ञता प्राप्त होत नाही. अन् ती नसल्यामुळे तुम्ही खूप लहानच नाही क्षुद्र झाला आहात. बाकी तुमच्या मनातलं जातीयवादाचं डबकं इतकं घाण आणि कुजलेलं आहे की त्याच्या जवळून सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची गरजच नाही.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०२४

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

अखंड भारत

अखंड भारत ही भौगोलिक आणि प्रशासकीय कल्पना नाही. भौगोलिक आणि प्रशासकीय एकत्व (अखंडता) हा अखंड भारत या कल्पनेच्या परिणाम असेल. शिवाय अखंड भारत म्हणजे हिंदू मुसलमान समस्या नाही. श्रीलंका, ब्रम्हदेश आदी मुस्लिमांमुळे भारताबाहेर गेले नाहीत. तसेच सातव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हिंदू मुसलमान संघर्ष या देशात सुरू होता. तरीही भारत खंडित झाला नाही. याचा खोलवर विचार करावा लागतो. अखंड भारत ही एक मानसिक अवस्था आहे. भौगोलिक व प्रशासकीय एकत्व हा त्याचा परिणाम असेल.

#श्रीपाद कोठे

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

मनोबौद्धिक उत्क्रांती

ज्यांना राजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समाजकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अर्थकारण करायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना अध्यात्मिक जीवन जगायचं आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना फक्त विज्ञान मान्य आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना संघर्ष टाळायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

ज्यांना समन्वय करायचा आहे किंवा त्यातच रुची आहे...

अशा प्रत्येकाची विचार आणि व्यवहाराची पद्धत वेगवेगळी असते. त्यांचे त्यांचे विचार आणि व्यवहार वेगवेगळे असतात. दुर्दैवाने बहुसंख्य माणसे हे समजून न घेता; बाकीच्यांना नावे ठेवण्यात, बाकीच्यांची टवाळी करण्यात, बाकीच्यांना निरर्थक ठरवण्यात, बाकीच्यांना चुकीचे ठरवण्यात, बाकीच्यांना शत्रू ठरवण्यात, बाकीच्यांना जबाबदार ठरवण्यात; धन्यता मानतात. पूर्वी यासाठी प्रत्यक्ष शारीरिक संघर्ष माणसे करत असत. त्यानंतर शस्त्रांचा वापर करत असत. आता बुद्धीचा वापर करू लागली आहेत. या संघर्षात (शारीरिक, शस्त्रांचा, बौद्धिक) जो जिंकला त्याचे म्हणणे योग्य, स्वीकार्य असेही माणूस समजत होता, अजूनही समजतो.

परंतु संघर्षातला हा विजय हे योग्य अयोग्य ठरवण्याचे मोजमाप नाही असं वाटणारा एक क्षीण प्रवाह सुद्धा प्राचीन काळापासूनच चालत आलेला आहे. तो आजही आहे. या क्षीण प्रवाहानेच आपले अस्तित्वही न जाणवू देता माणसात मनोबौद्धिक उत्क्रांती घडवली आहे. माणसाला त्याचे मानव्य बहाल केले आहे.

- श्रीपाद कोठे

११ ऑगस्ट २०२३

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

नरेंद्र दत्त आणि विवेकानंद

लोकसभेत आज झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत द्रमुक पक्षाचे टी. आर. बालू बोलले. ते जे काही बोलले त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. परंतु त्यांनी केलेला एक उल्लेख मात्र खटकला आणि योग्य वाटला नाही. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र दत्त यांची विधाने उद्धृत केली. श्री. बालू आणि त्यांचा पक्ष यांचा धर्म, अध्यात्म इत्यादी गोष्टींना विरोध असू शकतो पण जग ज्या नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतं त्यांचा विवेकानंद म्हणून उल्लेख न करणे अनुचित तर आहेच पण अवमान करणारेही आहे. याचे कारण म्हणजे स्वामीजी संन्यासी होते. संन्यासी परंपरेत आधीचे नाव विसर्जित झालेले असते. तसेच स्वामीजींचे नरेंद्र दत्त हे नाव विसर्जित झाले होते. ती फक्त एक मृत माहिती आहे. द्रमुक पक्ष आणि श्री. बालू यांना या संन्यासी परंपरेबद्दल श्रद्धा नसू शकते. त्यांना श्रद्धा असायलाच हवी असेही नाही पण त्याबद्दल आदर नसावा आणि सौजन्य नसावे हे त्यांचे खुजेपण दाखवणारे आहे. एवढाच तिरस्कार मनात असेल तर त्यांची विधाने आधाराला तरी का घ्यावीत?

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०२३

शनिवार, २७ जुलै, २०२४

आनंद

कधी कधी आनंद कसा अवचित भेटायला येतो. दुकानात जाऊन परत येत होतो. एका गल्लीत एक १०-१२ वर्षाचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत त्याच्या फाटकासमोर उभा होता. सहज नजर जातेच. नजरानजर होताच तो हसला. मीही हसलो. पण मनात म्हटलं आपण याला ओळखत तर नाही. मग विचार केला की असं होतं कधी कधी. पण चार पावलं पुढे गेल्यावर लक्षात आलं तो मुलगा माझ्या सोबत चालत होता. मी पुन्हा मान वळवून पाहिलं. पुन्हा दोघे हसलो. आता लक्षात आलं होतं की, तो आपली नक्कल करतो आहे. आपल्यासारखं सरळ रेषेत झपझप चालतो आहे. चार पावलांनंतर पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाहतच होता. आता दोघांनाही माहिती होतं काय प्रकरण आहे ते. दोघेही 'माहिती आहे' या अर्थाचं हसलो. आणखीन चार पावलं चाललो आणि दोघांचीही वळणं आली. दोघांनीही हसत हसत हात हलवले. ते काही क्षण दोघांवरही आनंदाची सत्ता होती. निरपेक्ष, निर्भेळ, निखळ.

- श्रीपाद कोठे

२८ जुलै २०२३

मंगळवार, २३ जुलै, २०२४

आक्रमकता

हिंदुत्ववादी सध्या आक्रमक झाले आहेत का? हो. ते स्वाभाविक आहे आणि काही प्रमाणात समर्थनीय. त्यामुळे एखाद्या घटनेवर मूग गिळून न बसता प्रतिक्रिया देणे, पोलीस तक्रार, प्रती उत्तर इत्यादी बाबींना काही हरकत नाही. पण शिवराळपणा, असभ्यता, अश्लीलता, मानहानी, खोडसाळपणा इत्यादी मात्र टाळलेच पाहिजे. एक लक्षात ठेवायला हवे की, शून्यापासून आजवरचा प्रवास हा समजूतदारपणा, समन्वय, स्नेह यांचा परिणाम आहे. हा प्रवास संपलेला नाही आणि संपायलाही नको. कारण त्याचं लक्ष्य संपूर्ण मानवजात आहे. निवडणूक जिंकण्याएवढी डोकी हे त्याचे लक्ष्य नाही.

- श्रीपाद कोठे 

२२ जुलै २०२३

रविवार, २१ जुलै, २०२४

शांत मनासाठी

आपलं मन खरंच शांत आहे का? हे पाहायचं असेल तर एक छोटासा उपाय करायचा. थोडा वेळ नामस्मरण करायचं. हे नामस्मरण ओठ न उघडता किंवा आतल्या आत जिभेची, स्नायूंची काहीही हालचाल न करता; शब्दश: मनातल्या मनात जर होऊ शकलं तर आपलं मन शांत आहे हे निश्चित. पण नामस्मरण करताना ओठ उघडावे लागले किंवा थोडीफार हालचाल करावी लागली तरी समजायचं आपलं मन शांत नाही. मनात काही तरी हालचाल सुरू आहे. हे नामस्मरण ईश्वराचेच असले पाहिजे असे नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचे सुद्धा असू शकते. अर्थात त्यामुळे फक्त मनाची शांती level कळू शकेल. ईश्वराचे असेल तर शांतीसोबत मनाची उन्नती पण होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे 

२२ जुलै २०२३

शनिवार, २० जुलै, २०२४

विचारयान

हे जरा तात्विक वाटेल. हो, हे तात्विकच आहे आणि प्रत्येकाने थोडं अधिक तात्विक व्हावं या इच्छेनेच आहे...

मानवी समाजासाठी राज्य/ सत्ता/ शासन/ सरकार या बाबी आवश्यकच असतात. पण, मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक हे राज्याच्या कार्यकक्षेत येत नाहीत. राज्य श्रीरामांचे असो, श्रीकृष्णाचे असो, शिवाजीचे असो, काँग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो, भाजपचे असो, रिपब्लिकन पक्षाचे असो, हिटलरचे असो, अब्राहम लिंकनचे असो, एलिझाबेथचे असो, लोकशाही असो, राजेशाही असो, हुकूमशाही असो; हेच सत्य आहे. मानवी समस्या सोडवणे, मानवी मनांचे उन्नयन, मानवी संवेदना आणि जाणिवा व्यापक करणे; थोडक्यात मानवी सुखासाठी आवश्यक घटक यांच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. ती एक मनोबौद्धिक उत्क्रांतीची प्रक्रिया असते. त्यासाठी सत्ता/ राज्य/ राजकारण यांच्याशी बांधून न घेतलेला समाज हवा. कारण राज्याशी बांधलेले मानवी मन मनोबौद्धिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेला प्रतिसाद देण्यापासून दूर जाते. परिणामी मानवी जीवन सुख शांतीपासून दूर जाते. गेल्या काही शतकातल्या मानवी समाजाच्या राजकीयीकरणाने आणि त्यासाठी आधारभूत विचारांनी मानवाची सत्ताकांक्षा खूप जागवली परंतु त्याची मनोबौद्धिक उत्क्रांती खुडून टाकली. आता होणारे मानवी सुखशांतीचे प्रामाणिक प्रयत्नदेखील याच विषवर्तुळात घोटाळत असून फक्त क्रिया प्रतिक्रिया एवढाच खेळ सुरू असतो. मानवाचे अराजकीयीकरण ही खूप आवश्यक बाब आहे. विचारांचे सध्याचे orbit तोडून मानवी विचारांना पुढील कक्षेत घेऊन जाण्याएवढ्या शक्तीच्या विचारयानाची मानवाला गरज आहे.

#श्रीपाद कोठे

२१ जुलै २०२३

मंगळवार, ९ जुलै, २०२४

रोबोटची पत्रकार परिषद

जिनिव्हा येथे नुकतीच रोबोटची एक पत्रकार परिषद झाल्याची बातमी आहे. या पत्रकार परिषदेत रोबोटनी विश्वास व्यक्त केला की, आम्ही हे जग माणसांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकू. कारण आम्हाला भावना नसल्याने आम्ही फक्त सत्याच्या आधारे जग चालवू. स्वाभाविकच काही प्रश्न मनात आले. कदाचित प्राथमिक स्वरूपाचे. (प्राथमिक शिक्षण हेच सगळ्यात महत्त्वाचं आणि पायाभूत असतं. नाही का?)

- माणसांपेक्षा चांगलं जग चालवू म्हणताना, हे जग माणसं चालवतात असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. ते कितपत बरोबर आहे? पर्यावरण, अन्नधान्याचे कमी उत्पादन किंवा टीव्ही पाहू दिला नाही म्हणून आत्महत्या; यासारख्या असंख्य गोष्टींमध्ये असलेला मानवेतर घटक रोबोटना आकलन झालेला आहे का?

- रोबोटना जे सत्य वाटते किंवा वाटेल ते कोणते वा कोणाचे सत्य असेल? त्यांना जेवू घातलेल्या (feed केलेल्या) पेक्षा अधिक काही त्यांच्या सत्य कल्पनेत आहे का? असेल का? म्हणजेच त्यांचे सत्य हे सापेक्ष सत्यच राहणार.

- रोबोटना जेवू घालणाऱ्याने त्यांना काय जेवू घालावे हे कोण ठरवणार? हे जर त्यांना जन्माला घालणारा माणूसच ठरवणार असेल तर; आम्ही जग चालवू आणि ते चांगले चालवू; या म्हणण्याला किती अर्थ राहतो?

- याच पत्रकार परिषदेत रोबोटना कृत्रिम बुद्धिमत्ता (ai : artificial intelligence) बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर एका रोबोटने सावध राहण्याचे व पुढे धोके असल्याचे मत व्यक्त केले; तर अन्य एका रोबोटने भविष्यातील संभाव्य धोक्यांची शक्यता फेटाळून लावली.

- माणसांप्रमाणेच एकाच मुद्यावर वेगळी मते असणारे रोबोट जग चालवताना असंख्य गोष्टींवर एक कसे होणार आणि हे जग अधिक चांगल्या प्रकारे कसे चालवणार? मतांतरावरून त्यांच्यात संघर्ष होईल का? किंवा मतांतर असताना ते नेमका निर्णय कसा घेणार?

- माणसांचे काय होणार? रोबोटना माणसांची गरज राहील वा नाही? आज माणसे आज्ञा देऊन रोबोटकडून कामे करवून घेतात. भविष्यात रोबोट माणसांना असेच आपल्या आज्ञांवर कामे करायला लावेल का? इत्यादी इत्यादी इत्यादी.

- पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ५१ रोबोटकडे याची उत्तरे होती की नाही? माहिती नाही.

- श्रीपाद कोठे 

१० जुलै २०२३

मंगळवार, २ जुलै, २०२४

चांगल्या समाजासाठी

कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी gst. आता gst घोटाळा करणाऱ्या साडेबारा हजार कंपन्या आढळल्या.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते मोठे, उड्डाण पूल, मेट्रो इत्यादी. दिल्ली, मुंबई, पुणे सर्वत्र वाहतूक कोंडीने लोक त्रस्त.

पेट्रोल साठी परकीय चलन द्यावं लागतं म्हणून वीजेवर चालणारी वाहने. वाहनांना वीज लागते म्हणून अधिक वीजेचे उत्पादन. विजेचे अधिक उत्पादन करण्यासाठी कोळशाची आयात. कोळसा आयातीसाठी परकीय चलन.

पक्षांतर बंदी कायदा असून पक्ष फुटणे थांबत नाही.

यादी पुष्कळ होईल. भाजप काळातली होईल अन् बाकीच्यांच्या काळातील पण होईल. कायदे, व्यवस्था, सत्ता यासाठी अहमहमिकेने भांडणाऱ्यांना हे लक्षात येतं नसेल का?

टीप : ही पोस्ट टाईमपास करणाऱ्या विद्वान, अभ्यासक, कार्यकर्ते, पाठीराखे यांच्यासाठी नाही. चांगल्या समाजासाठी ज्यांची झोप एक दिवस तरी उडाली, ज्यांच्या डोळ्यातून एकदा तरी पाणी आले; त्यांच्यासाठी आहे. अन् पुन्हा सांगतो; चांगल्या समाजासाठी. एखादी घटना किंवा एखादा प्रसंग किंवा आपले या शब्दात येणाऱ्या गोष्टींसाठी नाही. चांगल्या समाजासाठी.

- श्रीपाद कोठे 

३ जुलै २०२३

रविवार, ३० जून, २०२४

बुद्धी

समजणे म्हणजे काय?

मला एखादी गोष्ट समजते म्हणजे काय?

मला समजणारी गोष्ट अन्य कोणाला समजत नाही. असे का?

अन्य कोणाला समजणारी एखादी गोष्ट मला समजत नाही. असे का?

एखाद्या गोष्टीचं आकलन चुकीचं वा पुरेसं नाही हे कसं आणि कोणी ठरवायचं?

कळतं पण वळत नाही, असं का होतं?

बुद्धी भ्रमित होते. विपरीत होते. कली शिरतो. म्हणजे काय?

आईनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडला तेव्हा फक्त सात जणांना समजला होता म्हणतात. बाकी विद्वान, शास्त्रज्ञ, संशोधक यांना बुद्धी नव्हती का?

सगळ्यांना सारखी बुद्धी असेल, बुद्धीचा वापर करण्याची सारखी क्षमता असेल तर असे का होते?

बुद्धीला चालवणारं, बुद्धीच्या ताब्यात नसलेलं नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.

- श्रीपाद कोठे

शनिवार, १ जुलै २०२३

शनिवार, २९ जून, २०२४

क्षणजीवीने चिरंजीवीची आस धरावी

वारी आटोपली. वीस पंचवीस वर्षांपूर्वी सुद्धा वारी आटोपत असे. शेकडो वर्षांपासून वारी आटोपतेच. पूर्वी ते फारसे कळत नसे. आता कळते. प्रसार माध्यमे, समाज माध्यमे यातून वारीचा भरपूर जागर होतो. छायाचित्रे, अभंग गायन, दिंड्या, सजावटी, मान्यवरांचा सहभाग, वेशभूषा; अशा अनेक गोष्टीतून वारी भेटते आणि वारी आटोपली हे कळतं. छान आहे. सगळ्यातच आनंद आहे. आनंदं ब्रम्हेती ! आनंद आहे तिथे ब्रम्ह आहे. पण हा वारीचा भाव नाही. उत्सव, उत्साह, लय, ताल, गर्दी, प्रवाह, कौतुक, हौस, नावीन्य, जपणूक; हे सारं आणि यातील आनंद हे क्षणजीवी आहे. चिरंजीवी नाही. हा अनुभव आहे. अनुभूती नाही. वारीचा भाव चिरंजीवीत्वाचा भाव आहे. वारीचा भाव अनुभूतीचा भाव आहे. क्षणजीवीत्वाचा आणि अनुभवाचा तो भाव नाही. म्हणून वारी अखंड चालू आहे. शेकडो वर्ष झाली; प उच्चारला की पांडुरंग आणि आ उच्चारला की आषाढी आठवते; लाखो अनाम जीवांना. अन् क्षणजीवी सारं टाकून देऊन ते ओढले जातात चिरंजीवीकडे. आपोआप. नकळत. अन् परततात तेव्हाही मन रेंगाळत असतं चिरंजीवीमध्येच. क्षणजीवीचा विसर पडणे आणि चिरंजीवीची ओढ लागणे ही सुरुवात असते वारीची. चिरंजीवी होऊन जाणे ही तिची समाप्ती असते. क्षणजीवी जोवर मनातून गळत नाही तोवर वारी खरी नाही. टाळ, मृदंग, टिळे, माळा, फुगड्या, गजर सगळं असेल तरीही वारी खरी नाही. क्षणजीवीने चिरंजीवीची आस धरावी. खरी वारी करावी.

- श्रीपाद कोठे

३० जून २०२३

शुक्रवार, २१ जून, २०२४

धर्म - अधर्म

 #आजचासंवाद

- योग हा काही धर्म नाही. तो व्यायाम प्रकार आणि जगण्याची कला आहे.

- हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, मंदिर, मशीद, चर्च, प्रार्थना, इबादात, प्रेयर, हात जोडणे, दोन्ही हात कोपरात मोडून वर करणे, कपाळ हृदय खांदे यावर क्रॉस काढणे; या अर्थाने धर्म नाही. अगदी खरं. पण खऱ्या अर्थाने तो धर्मच आहे. खरं तर जगातली प्रत्येक गोष्ट धर्म असते आणि धर्म असणारी प्रत्येक गोष्ट अधर्म असते. ती गोष्ट धर्म कधी असते आणि अधर्म कधी असते हे ठरवणारा तो सनातन धर्म. ज्याला आज सनातन धर्म म्हणतात तो सनातन धर्म नाही.

- प्रत्येक गोष्ट धर्म?

- हो. प्रत्येक गोष्ट.

- उदाहरण?

- एक का अनेक देता येतील. पण त्यावर विचार तू करायचा. मी विवरण करणार नाही.

- ठीक.

- मुद्दाम थोडं टोकाचं उदाहरण देतो. विचारांना जरा चालना मिळेल.

- चालेल.

- नग्नता. कधी धर्म, कधी अधर्म. कर विचार.

- ?????

- श्रीपाद कोठे 

२२ जून २०२३

शनिवार, २५ मे, २०२४

खासदार आणि वृक्ष

परवा नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. तिथली वैशिष्ट्ये काय वगैरे चर्चा सुरू आहे. त्यात तिथल्या हिरवळीचा उल्लेख आहे. सोबत एक सुचवावेसे वाटते - दोन्ही सभागृह मिळून जेवढे खासदार आहेत तेवढे वृक्ष (वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर असे) या परिसरात लावावे. चकचकीतपणा ही पाश्चात्य विकासाची कल्पना आहे. वनातील आश्रम इत्यादी भारतीय कल्पना आहे. (उदा. शांतिनिकेतन) बदललेल्या काळातील संसद सुद्धा वनात असायला (भरपूर दाट झाडीत असायला) काय हरकत आहे? अन् सध्यातरी भारताला शहाणपण शिकवण्याची कोणाची शक्ती, इच्छा अन् तयारी नाही. भारत म्हणेल, करेल त्याला जग बऱ्यापैकी मान डोलावतं. पंतप्रधानांना वाकून नमस्कार पण करायला लागलं आहे जग. तेव्हा खासदारांच्या संख्येएवढे वृक्ष सेंट्रल व्हिस्टा परिसरात लावावे.

- श्रीपाद कोठे

२६ मे २०२३

बुधवार, १५ मे, २०२४

माझे उत्तर माझ्याकडे हवे

- केरला स्टोरीवर अजून चर्चा सुरू आहेच पण सुरुवातीचा धुरळा थोडा खाली बसला आहे. त्यामुळे काही मुद्दे.

- अशा प्रकरणांची संख्या किती? ३२ हजार, ३२ शे, ३२, ३, २??

- हे एकच प्रकरण असेल तरीही ते गंभीरच आहे. अन् एखाद्याच प्रकरणावर चित्रपट निघाले आहेत आणि त्यावर समाज ढवळून टाकणारी चर्चाही झाली आहे.

- या समस्येचे स्वरूप हिंदू मुस्लिम असले तरीही ते त्याचे एकमेव रूप नाही. त्याला अन्यही कोन आहेत. सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार हवा.

- माणसांची ओळख पुसून टाकणारी अवाढव्य शहरांची संस्कृती. यात कोणी कोणाचं नसतं हे तर खरंच पण कोण येतं, कोण जातं, कोण नाहीसं होतं इत्यादी गोष्टी माहिती सुद्धा होत नाहीत. त्याबद्दल संवेदना असणं दूरच. शहरांच्या या बेगुमान वाढीवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा या निमित्ताने पुढे यायला हवा.

- आजच्या असंख्य समस्या या व्यक्तीवादाच्या समस्या आहेत. यात व्यक्तीचं स्वातंत्र्यदेखील अध्याहृत आहे. त्यावर आगपाखड केल्याने काही होणार नाही. ओरडणारे ओरडत राहतील आणि काळाचा प्रवाह वाहत राहील. बाह्य नियंत्रणाची सगळीच व्यवस्था हळूहळू खिळखिळी होत आहे. यात कुटुंब हा घटक सुद्धा येतो.


- याला उत्तर देण्यासाठी आत्मनियंत्रण महत्त्वाचे ठरते. परंतु ते साध्य कसे होणार? त्यासाठी माझे उत्तर माझ्याकडे हवे. माझे उत्तर दुसऱ्या कोणाकडे किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीत/ पुस्तकात/ शास्त्रात असून चालणार नाही. माझे मला मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो तर आत्मनियंत्रण शक्य होईल.

- त्यासाठी भारतीय आध्यात्मची तात्विक बाजू अधिक जोरकसपणे पुढे यायला हवी. त्यावर सतत चर्चा होत राहायला हवी. ते माणसांच्या मनात रुजत जायला हवे.

- दुर्दैवाने आज हिंदू समाज अधिक कर्मकांडी होऊ लागला आहे. त्याचे जोरकस समर्थनही केले जाते. कर्मकांड हे अधिक अमूर्त गोष्टी जीवनात रुजवण्यासाठी आहे याचा विसर पडतो आहे. त्यामुळे हे कर्मकांड काय किंवा दुसरं कोणतं कर्मकांड काय, असा विचार कोणी केला तर त्याला काहीही उत्तर नाही.

- जीवनातील श्रेयस रुजवण्याची किंवा समजावण्याची शक्ती तात्विक विचारात असते. कर्मकांडात नसते.

- जीवनाचे भय, अरे ला कारे करणे; या गोष्टींची मर्यादा असते. त्याहून अधिक ठोस आधार कसा देता येईल यावरही मंथन हवे. सारासार विचार करण्याची सर्वत्रिक शक्ती वाढायला हवी.

- याच केरळात सगळ्यात श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. त्याची तिजोरी उघडायची की नाही इथपासून सुरुवात होते. बहुसंख्य हिंदू समाज अनिष्ट अशीच भूमिका घेतो. देशभरातील मंदिरांच्या या संपत्तीचा उपयोग; हिंदू समाज अंतर्बाह्य, लौकिक, वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक दृष्टीने बलवान करण्यासाठीचे प्रयत्न तोकडे का असावेत?

- शेगावच्या गजानन महाराज मंदिरात वाढणाऱ्या गर्दीने कसे प्रश्न निर्माण होत आहेत यावर तीन लेख नुकतेच वाचले. हिंदू समाजासाठी हे चिंतनाचे विषय व्हायला हवे.

- सद्भावांची शक्ती वाढायला हवी. सद्भावनांच्या पताका खांद्यावर घेणाऱ्या झुंडीची नव्हे.

- स्वामी विवेकानंद म्हणत असत : ज्याला जग हिंदूंचा दुबळेपणा म्हणतं तीच हिंदूंची शक्ती आहे. हिंदू भाव/ विचार हा दवबिंदूप्रमाणे परिवर्तन घडवून आणतो.

- हिंदूंच्या या पद्धतीच्या विरुद्ध वागणारे जगातून संपून गेले. हिंदूंनी नुकसान सहन केले असले तरीही ते संपले नाहीत.

- सर्वंकष विचार होत राहायला हवा.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०२३

शुक्रवार, १० मे, २०२४

संवाद

- तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आहे नं.

- हो.

- ते विकायचंही असेल.

- अर्थात.

- पण तुमचा तो व्यवसाय नाही नं.

- नाही हो. कुठला व्यवसाय? मी साधा लिहिणारा माणूस आहे. व्यवसाय वगैरे काही कळत नाही.

- तेच म्हणतोय. तुम्ही विक्रेते नाही पण तुम्हाला विकायचं आहे. त्यासाठी माझ्याकडे उपाय आहेत बरेच. मी मार्केटिंगचे वर्कशॉप्स घेतो. तीन तासांचा वर्कशॉप आहे. अमुक फी आहे.

- अहो पण मी काय करू त्याचं? मी लिहिणारा आहे. माझं पुढच्या पुस्तकाचं, आगामी दिवाळी अंकांचं, अन्य प्रासंगिक लिखाण सुरू आहे. लिहिणे या विषयात मला काही शिकायचं नाही. शिकण्यासारखं असू शकेल पण आता नाही. आहे ते पुरेसं आहे.

- लिखाणाचं नाही हो. पुस्तकं विकण्याचे म्हणतोय. त्यासाठी वर्कशॉप्स करा.

- नको. विकली जातील तशी जातील. माझ्या डोक्यात फक्त लिखाण असतं. अन् वर्कशॉप करून मला कुठे नेहमी काही विकत बसायचं आहे? अन् सांगू का विक्री करायला वर्कशॉप कशाला हवं हो? आजकाल तर लोक ओ का ठो माहीत नसताना ऑनलाईन विक्री करून हजारो रुपये कमावतात.

- वेगळेच आहात तुम्ही.

- कदाचित...

- श्रीपाद कोठे 

११ मे २०२३

गुरुवार, ९ मे, २०२४

सोबत असणे आणि जोडलेलं असणे

सोबत असणे आणि जोडलेलं असणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अनेक जण आपल्या सोबत असतात पण ते आपल्याशी जोडलेले असतात असं नाही. अनेक जण आपल्या सोबत नसतात पण ते जोडलेले मात्र असतात. अगदी आपल्या शरीराचं उदाहरण घेतलं तरीही, हात आणि पाय सोबत नसतात पण जोडलेले असतात. मेंदू आणि हृदय सोबत नसतात पण जोडलेले असतात. नाती, भावना, विचार, समूह, संघटना, मानव समाज, सृष्टी, अस्तित्व अशा सगळ्या गोष्टींना हे लागू होतं. ते लावून पाहता येतं. सोबत असणे आणि जोडलेले असणे यातला फरक अधिकाधिक कळणे म्हणजे अधिकाधिक प्रगल्भता. हा फरक समजून न घेणे म्हणजे अधिकाधिक संकुचितता.

- श्रीपाद कोठे

१० मे २०२३

बुधवार, ८ मे, २०२४

ऋणानुबंध

ऋणानुबंध हा शब्द आपण पुष्कळदा वापरतो. मनाच्या आतून वापरतो. चांगल्या भावनेने वापरतो. पण त्या शब्दाचा अर्थ काय होतो? ऋणाचा अनुबंध म्हणजेच कर्जाचा संबंध. कर्जाचा काही हिशेब राहिला आहे तो पूर्ण करणे. त्यासाठी आलेला संबंध. एक जण देणं लागतो आणि एक जण घेणं लागतो. वास्तविक अशी कर्जाची थकबाकी ही काही चांगली गोष्ट मानली जात नाही. मुळात कर्ज घेणे ही काही भूषणावह गोष्ट समजली जात नाही. (नसे म्हणायला हवे. कारण सध्याच्या युगात कर्ज घेणे आणि न फेडणे हाच युगधर्म समजला जातो. असो.) ते न फेडले जाणे हे तर अयोग्यच. अन् कर्ज देणे आणि त्यावरील व्याज खाणे म्हणजे सावकारी तीही चूकच. तर दोन्ही बाजूने फारसा सुखावह नसलेला हा अर्थ. पण का कुणास ठाऊक तो शब्द छान वाटतो आपल्याला आणि आपला काहीतरी ऋणानुबंध असेल असं कोणी म्हटलं की मन सुखावतं. असो. कोणाचंही ऋण घ्यायचं किंवा द्यायचं ठेवू नको रे बाबा भगवंता.

किंवा ऋणानुबंध शब्दा ऐवजी स्नेहानुबंध, प्रेमानुबंध असा काहीतरी नवीन शब्द प्रयोगात आणायला हवा.

- श्रीपाद कोठे 

९ मे २०२३

मंगळवार, ७ मे, २०२४

No comments

 - लंडनच्या एका सर्वेक्षणाची बातमी आहे की, ज्या जोडप्यांचे संयुक्त बँक खाते असते ती जोडपी आनंदित असतात. ज्यांचे वेगळे खाते असते ती आनंदित नसतात. आपल्या एका उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी पती व पत्नीने atm पासवर्ड एकमेकांना सांगू नये असा आदेश दिला होता.

: अतिरेकी आणि विकृत व्यक्तीवाद ही चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे.

@@@@@@@@@

- ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या राज्याभिषेकावर एक हजार कोटीहून अधिक खर्च झाला. त्याला तिथल्या लोकांनी विरोध केला. एवढेच नाही तर लोक not our king असे फलक घेऊन रस्त्यावर उभे राहिले.

: राजेशाही आणि भांडवलशाही यांच्या शवपेटीवरचा पहिला खिळा म्हणायला काय हरकत आहे?

@@@@@@@@@

नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक फिरते कॅमेरे, cctv शेकडोंच्या संख्येने असूनही; वर्षभरात साडेसहा कोटींच्या चोऱ्या झाल्या.

: तंत्रज्ञान म्हणजे सगळ्या गोष्टींवरील रामबाण उपाय हा समज अजूनही बाळगावा का?

@@@@@@@@@

गुजरात राज्यात पाच वर्षात चाळीस हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत.

: चांगले सरकार असणे, आपल्या हाती सरकार असणे; सुखी व सुव्यवस्थित समाजासाठी पुरेसे असते का? आज भाजप सरकार असल्याने हा प्रश्न भाजपसाठी नाही. त्यापूर्वी अनेक पक्षांची सरकारे देशभर अनेक वर्षे होतीच. समस्या सुटल्या का? मुद्दा फक्त महिला बेपत्ता होण्याचा नसून असंख्य समस्यांचा आहे. अन् मूळ मुद्दा आहे सरकार ही चांगल्या आणि सुखी समाजाची गॅरंटी असते का?

@@@@@@@@@

- अमेरिकेत २०२१ मध्ये ४९ हजार लोकांनी गोळीबाराच्या घटनात जीव गमावला.

: No comments.

#श्रीपादचीलेखणी

(८ मे २०२३)

कृतज्ञता

आपण एखादा लेख लिहितो. मग पूर्णपणे विसरून जातो. इतकं की, कोणी विचारलं तरी आपल्याला सांगता येत नाही की अमुक विषयावर अमुक काही अमुक ठिकाणी लिहिलं आहे. पण कोणीतरी तो जपून ठेवतो किंवा शोधून काढतो. त्या लेखाचा त्याला त्याच्या संशोधन कार्यात काहीतरी थोडाबहुत उपयोग होतो. आपला संशोधन अभ्यास तो प्रकाशित करतो आणि आठवण ठेवून त्या अभ्यासाचा प्रकाशित ग्रंथ आपल्याला धन्यवादासह पाठवतो. हा सगळाच आनंदाचा भाग असतो. रामटेकचे डॉ. मिलिंद चोपकर यांनी आज हा आनंद माझ्या झोळीत टाकला. 'मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे' असं त्यांच्या ग्रंथाचं भारदस्त नाव आहे. मराठीतील पाच मान्यवर लेखकांच्या वनविषयक ललितबंधांचा अभ्यास त्यांनी या ग्रंथात मांडला आहे. नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुमारे ४५० पृष्ठांच्या या ग्रंथात काय आहे हे वाचल्यावरच कळेल, पण ग्रंथाच्या शेवटी दिलेली संदर्भसूची आणि आधार ग्रंथांची सूची चार पानांची आहे यात काय ते समजावे. डॉ. मिलिंद चोपकार यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

(८ मे २०२३)

शनिवार, ४ मे, २०२४

सामाजिक पाप

स्थानिक प्रशासनाचे लोक अनेकदा वेगवेगळी माहिती विचारायला घरोघरी जातात. पाणी साचलं आहे का? कुलर लागले आहेत का? घरात कोणी आजारी आहेत का? अशी वेगवेगळी माहिती. एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना योग्य ती माहिती देणं आपलं कर्तव्य असतं. पण बहुसंख्य लोक त्यांना फुटवण्यात धन्यता मानतात. हा फक्त व्यक्तिगत अवगुण नाही म्हणता येणार. हे एक प्रकारे सामाजिक पाप म्हटलं पाहिजे.

- श्रीपाद कोठे 

५ मे २०२३

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

पुस्तक दिनाच्या निमित्ताने

काल पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत एका अनोख्या उपक्रमात सुमारे ५० हजार पुस्तके रस्त्यावर मांडून ठेवली होती. कोणीही ती पुस्तके पाहू शकत होते आणि त्यातील एक पुस्तक काहीही पैसे न देता घेऊन जाण्याची प्रत्येकाला मुभा होती. ज्यांनी हा उपक्रम केला त्यांचे अभिवादन आणि अभिनंदन. एवढी पुस्तके जमा करणे, मांडून ठेवणे आणि पुन्हा आवरणे ही कामे सुद्धा अचाटच. त्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच. या उपक्रमाला हजारो लोकांनी भेटही दिली. त्यामुळे उपक्रम यशस्वी झाला असेच म्हटले पाहिजे. हेही छानच.

... पण, एक प्रश्न मनात येतोच की; पुस्तक फुकट मिळणार म्हटल्यावर हजारोंनी गर्दी करणारे आपण; पुस्तकं विक्रीच्या जागी त्याच्या किमान अर्धी गर्दी करतो का? करू का? व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही मला हे प्रश्न मोलाचे आणि महत्त्वाचे वाटतात. समाजाची गुणवत्ता फक्त वाचून वाढत नाही, वाचन आणि पुस्तके यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि attitude हेही तितकेच महत्त्वाचे असतात. असतातच.

- श्रीपाद कोठे

२४ एप्रिल २०२३

शनिवार, २० एप्रिल, २०२४

भांडवलशाही

आत्ताच एक बातमी वाचली की, क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या led stumps चा एक सेट २५ ते ३० लाख रुपयांचा असतो. गंमत वाटली. स्वच्छतेच्या संदर्भात तांत्रिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचा वापर कासव गतीने होतो आणि खेळाडू बाद आहे वा नाही हे ठरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास, वापर आणि त्याची किंमत ससा गतीने वाढतात. आपल्या प्राथमिकता आणि प्राधान्यक्रम यातून लक्षात येतात. यालाच म्हणतात भांडवलशाही.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२३

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

वैचारिक गोंधळ

सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहाच्या मुद्यावर सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीच्या वेळी मा. मुख्य न्यायाधीशांनी केलेली एक टिप्पणी मात्र गोंधळात टाकणारी आहे. याबाबतच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे - स्त्री आणि पुरुष या संकल्पना निरपेक्ष नाहीत. तुमची जननेंद्रिये कोणती आहेत त्यावरून ती व्याख्या ठरू शकत नाही. मा. मुख्य न्यायाधीशांनी असे मत मांडले याचा अर्थ त्यांना नक्कीच काही तरी अभिप्रेत असणार. पण सामान्य माणूस म्हणून किंवा अभ्यासक म्हणून किंवा विचारी व्यक्तींना सुद्धा हा प्रश्न पडू शकतो की मग, स्त्री आणि पुरुष हे नेमके ठरवायचे कसे? अगदी जन्म झाल्यानंतर घरच्यांना आनंदाची बातमी सांगणाऱ्या डॉक्टर वा परिचारिका यांच्यापासून, तर स्मशानात मृताचे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या कारकुनापर्यंत सगळ्यांना हा प्रश्न पडू शकेल. भाषातज्ञ तर नक्कीच गोंधळणार. माणूस ही लिंगनिरपेक्ष संकल्पना ठीक आहे, पण स्त्री आणि पुरुष या लिंगनिरपेक्ष संकल्पना कशा असू शकतील? स्त्री आणि पुरुष यांच्यात मग नेमका भेद कोणता? येणाऱ्या काळात ही एक मोठी चर्चा होऊ शकेल.

BTW विवाह म्हणजे काय यावरही खल होणे निश्चित आहे. दोन व्यक्तींनी एकत्र राहणे म्हणजे विवाह का? एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध म्हणजे विवाह का? की विवाह म्हणजे आणखीन काही? सरकारने तर विवाह हा स्त्री आणि पुरुष यांच्यातच होतो असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. पण विवाह म्हणजे नेमके काय? मानवी वाटचाल आणखीन कोणती स्थित्यंतरे दाखवील कोणास ठाऊक.

- श्रीपाद कोठे

१९ एप्रिल २०२३

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

नास्तिकता

काय योगायोग असतात. कालपासून देव, आध्यात्म वगैरे खूप चर्चा सुरू आहेत. सध्या टीव्हीवर 'देऊळबंद' सुरू आहे. त्यात कट्टर नास्तिक शास्त्रज्ञ राघव शास्त्रीला देवभक्त हॅकर प्रश्न विचारतो : काय शास्त्री, तुम्ही इतकी सुंदर फ्रिकवेंसी शोधून काढली पण आठ कॅरेक्टरचा एक पासवर्ड तुम्हाला लक्षात नाही ठेवता आला? अन् यानंतर स्वामी त्या नास्तिक राघवला सांगतात - 'तुझ्यासारखे देऊळ बंद करणारे, देवळं फोडणारे, देवळं लुटणारे अनेक अल्लाउद्दिन खिलजी या देशात आले आणि गेले. देव होते, देव आहेत, देव राहतील.'

योगायोग.

- श्रीपाद कोठे 

१८ एप्रिल २०२३

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

गांभीर्य हवे

आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का? काल महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात जी दुर्दैवी घटना घडली ती दुर्दैवी आणि वाईटच आहे. तुम्ही आध्यात्म मानता की मानत नाही हा भागच वेगळा. अगदी मृत्यूची अपरिहार्यता आणि त्याचा अभावितपणा शंभर टक्के मान्य करूनही, मानवी मर्यादेत त्याचे वाईट वाटणे आणि त्यावर गंभीर मंथन करणे हेच सयुक्तिक ठरते. त्यामुळे कार्यक्रम कसे आयोजित करावेत, कार्यक्रमांना वेळ - आकार - यासह कोणकोणत्या मर्यादा असाव्या, इत्यादी बाबींची गंभीर चर्चा होऊन यानंतर काळजी घेणे कर्तव्य ठरते. ते करायलाच हवे.

मात्र, त्याच वेळी मृत्यूसारख्या संवेदनशील मुद्याचा उपयोग आपल्या मनातील राग, द्वेष बाहेर काढण्यासाठी करणे तेवढेच निंदनीय म्हटले पाहिजे. आपल्याला सारे समजते आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे वागल्यास, विचार केल्यास जगाचे नंदनवन होईल; हा मानवी बुद्धीचा प्रचंड दर्पयुक्त दांभिकपणा; कशा ना कशावर दोषारोपण करण्यासाठी वळवळत असतो. मग कोणत्याही थराला जाऊन विश्लेषण आणि टीकाटिप्पणी होते. टवाळकी सुरू होते. बुद्धीच्या दांभिकतेची ही वळवळ सुद्धा आटोक्यात ठेवली पाहिजे. संवेदनशीलता म्हणजे कावकाव नाही. स्पष्ट भूमिका म्हणजे मूर्खपणा, असंबद्ध वटवट किंवा वाचाळपणा नाही ही जाण म्हणजेच सुजाणपणा म्हणजेच परिपक्वता म्हणजेच जीवनाचं गांभीर्य.

आपल्याला थोडं अधिक गंभीर होण्याची गरज आहे का?

- श्रीपाद कोठे 

१७ एप्रिल २०२३

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

गोंधळी समाज

- आपण खरंच गोंधळी समाजच आहोत का?

- समाजाच्या सवयी, चालीरीती overnight बदलत नसतात आणि घट्ट धरून ठेवल्या तरी कायम राहत नसतात; हे समजायला खूपच अवघड आहे का?

- जुने शब्द, प्रचलित शब्द, संकेत, रीती इत्यादी गोष्टीत मान अपमान करणे हा शहाणपणा म्हणावा का?

- बदल समाजाच्या वेगाने आणि समजूतदारपणाने का होऊ नयेत? प्रत्येक गोष्टीत वाद कशाला?

- इंग्रजीतील widow शब्द वगळला आहे का?

- रामायण, महाभारतात, भागवतात - कौसल्या, सुमित्रा, कैकयी, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, द्रौपदी, कुंती, गांधारी, रुक्मिणी - या नावांमागे काहीही लावलेले नाही.

- गार्गी, मैत्रेयी, भारती आदी नावेही कोणत्याही prefix शिवाय आहेत.

- समाजाची प्रवाहितता लक्षात न घेता संस्कृती, धर्म आदी गोष्टींवर तोंडसुख हे कशाचे लक्षण मानावे?

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०२३

भारतीयता वि. आधुनिकता

- सगळी बोटं सारखी नसतात.

- पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पय:, जातौ जातौ नवाचार:, नवावाणी मुखे मुखे (संस्कृत : चुकभूल देणेघेणे)

- तरीही त्यांच्यात भांडणं, वाद, योग्य, अयोग्य, श्रेष्ठ, कनिष्ठ, महान, लहान; असं काही नसतं.

- कोणत्याही गोष्टीला अनेक बाजू असू शकतात.

- फक्त मीच सत्य असे नाही.

ही भारतीयता... हे हिंदुत्व...

@@@@@@@@@@@@

- सगळी बोटं सारखी का नाहीत? उत्तर द्या. बोटं सारखीच असायला हवीत. बोटं सारखी नाहीत यात तुम्हाला काहीच चूक वाटतं नाही म्हणजे तुम्ही निरर्थक आहात.

- सगळी माणसं, त्यांचे विचार, व्यवहार, भाषा... सगळं सगळं साच्यातून काढलेलं हवं. तसं नसेल तर लढाई करावी आणि आपल्यापेक्षा वेगळा असणाऱ्याला संपवून टाकावं. कारण तो चूक आणि अयोग्य असतो.

- कोणत्याही गोष्टीला एकच बाजू असते. एकच बाजू असायला हवी.

- फक्त मीच सत्य. सत्याचे माझेच निकष सत्य.

ही आधुनिकता... हे पुरोगामित्त्व...

@@@@@@@@@@@@

Thank god I am not पुरोगामी and आधुनिक.

- श्रीपाद कोठे 

१३ एप्रिल २०२३

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

कायदा आणि मानवता

मानवतेला कायद्याच्या चौकटीत बसवू नये. कायद्याने मानवीयतेचे अनुगामी व्हावे.

संदर्भ : तामिळनाडू सरकारने ऑनलाईन रमीवर घातलेली बंदी. या बंदीला विरोध करणारे सरसावले आहेत हे दुर्दैव आहे. द्युतापायी महाभारत अनुभवलेल्या भारतात या विषयावर सहमती असू नये हेही दुसरे दुर्दैव. We are welfare state not capitalist state असं काल द्रमुकच्या प्रवक्त्याने ठामपणे आणि स्पष्टपणे सांगितलं. अशी भूमिका घेणारा पक्ष द्रमुक आहे म्हणून भूमिकेला विरोध करण्याचे कारण नाही. भाजप आणि भाजप सरकारे यांनीही अशी ठाम भूमिका घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०२३

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

मतप्रदर्शन

आपलं मत स्पष्टपणे आणि स्वच्छपणे मांडता यायला हवं. आडून आडून, फिरवत फिरवत, खूपच सूचक वगैरे पद्धतीने जेव्हा मत मांडलं जातं तेव्हा त्याला हेतू चिकटतातच. आपल्याला आवडो वा न आवडो. दुसरं म्हणजे स्पष्टपणे बोलण्याची, सांगण्याची आपली हिंमत नाही आणि ठाम मत मांडण्याएवढं चिंतन नाही हेही त्यातून आपोआप स्पष्ट होतं. स्पष्ट मत न मांडणारे एक तर राजकारणी असतात (यात बनेल सुद्धा आले) किंवा सुमार.

- श्रीपाद कोठे

१० एप्रिल २०२३

ज्ञानासाठी दान

काल मुख्यमंत्री अयोध्येत गेले होते. कालच मुंबईत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री. अशोक चौगुले यांचा अमृत महोत्सवी सत्कारदेखील झाला. मुख्यमंत्री अयोध्येला गेल्याची बातमी पाहणारे, दाखवणारे आणि चर्चा करणारे खूप मोठ्या संख्येत आहेत. श्री. चौगुले यांच्या सत्काराची बातमी (किंवा तो सोहोळा) पाहणारे, दाखवणारे आणि त्याबद्दल बोलणारे अत्यल्प आहेत. हे प्रमाण उलट होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र वगैरे चर्चा म्हणून बरं राहील. बाकी काही नाही. ते असो...

त्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री. चौगुले यांचा परिचय करून देताना साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी एक महत्त्वाचा आणि लक्षणीय मुद्दा मांडला. प्रास्ताविकात उल्लेख केलेल्या संस्कृत सुभाषिताचा दाखला देऊन ते म्हणाले की, दाता व्यक्ती फारच दुर्मिळ असले तरी श्री. चौगुले त्याला अपवाद आहेत. पुढे त्यांच्या दातृत्वाची विशेषता सांगताना करंबेळकर म्हणाले - सेवेसाठी दान देणारे पुष्कळ असतात पण ज्ञानासाठी, विचारांसाठी दान देणारे नसतात. श्री. चौगुले मात्र ज्ञान आणि विचार यासाठी दान देणारे व्यक्ती आहेत.

श्री. करंबेळकर यांनी मांडलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून समाजाने तो पुढे नेण्याची गरज आहे. सेवेसाठी आज भरपूर मदत मिळते. कधी कधी तर वाटतं की, जरा अधिकच मदत मिळते. एखादी मानवी वा नैसर्गिक आपत्ती आल्यावर जो मदतीचा ओघ असतो त्याचा थोडा नीट अभ्यास केला तर हे लक्षात येईल. CSR च्या माध्यमातून तर सेवेसाठी फार मोठ्या निधीची सोय झालेली आहे. शिवाय दाखवण्यासाठी, अकाऊंट सेट करण्यासाठी किंवा मानवी करूणेतून सेवाकार्यांना पैसा मिळतो, मिळत राहतो. तरीही सेवाकार्यांची आर्थिक स्थिती बरेचदा समाधानकारक नसते. याची दोन कारणे आहेत. १) मिळणाऱ्या पैशाचा विनियोग, त्याचे व्यवस्थापन, पैसा पोहोचण्यातल्या त्रुटी आणि अडचणी. २) सेवाकार्याचे कल्पनाचित्र. विशिष्ट कार्य हे सेवाकार्य म्हणून करायचे आहे की ताजमहाल तयार करायचा आहे किंवा सेवा करणारे आणि त्याचा लाभ घेणारे यांचे जीवनमान पंचतारांकित करावयाचे आहे? या दोन बाबी सोडल्या तर सेवेसाठी पैशाची अजिबात कमतरता नाही.

ज्ञान आणि विचार यासाठी मात्र पैसा ही मोठी अडचण आहे. समाजाने आणि दात्यांनीही यावर गांभीर्याने मंथन करणे गरजेचे आहे. या विषयाला सुरुवात केल्याबद्दल श्री. करंबेळकर यांचे अभिनंदन.

- श्रीपाद कोठे

सोमवार, १० एप्रिल २०२३

रविवार, ७ एप्रिल, २०२४

अभ्यास म्हणजे काय?

पत्रकारितेत एक संकेत असतो की, संवेदनशील घटना असेल तर, गरजेपेक्षा अधिक तपशील (उदा. जात, पंथ इत्यादी) द्यायचा नाही. हे आठवण्याचं कारण म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातून गोडसेच्या संबंधात 'पुण्याचा ब्राम्हण' हा उल्लेख वगळण्यावरून सुरू झालेला वाद. यासंबंधात दोन प्रश्न निर्माण होतात - १) तसा उल्लेख असण्याचे प्रयोजन काय होते? २) तसा उल्लेख नसेल तर काय बिघडणार आहे? उत्तरे देण्याची गरज नाही. सामान्य माणसाला सुद्धा हे समजते. एक तर्क दिला जाऊ शकतो की, या विषयाकडे अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे. अन् हा तर्क पुढे आला की एक प्रकारची स्मशानशांतता पसरते किंवा चर्चा भटकवली जाते. वास्तविक या तर्काची छाननी करण्याची गरज आहे. अभ्यास म्हणजे काय? बुद्धीचा न संपणारा चौकसपणा म्हणजे अभ्यास का? गुण, दोष, बुद्धी, कर्तृत्व, कौशल्य, सद्भाव, दुर्भाव, क्षमता इत्यादी गोष्टी कोणत्याही प्रकारच्या समूहाचे लक्षण असतात का? भाषा, प्रांत, जात, धर्म, देश, लिंग अशी गुणदोषांची वर्गवारी करता येते का? अशी वर्गवारी करता येत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असूनही अशी वर्गवारी का केली जाते? कारण अशी वर्गवारी केल्याने संघर्ष करता येतात. भांडणे करता येतात. संघर्ष का करायचा असतो? कारण आम्ही योग्य आणि आम्ही ज्यांना आपले मानत नाही ते अयोग्य अशी धारणा असते. ही धारणा ख्रिश्चन मतातील ईश्वर आणि सैतान या कल्पनातून निघाली आहे. याच कल्पनेचा पगडा मार्क्स, हेगेल, डार्विन यांच्यावर असल्याने त्यात संघर्ष अपरिहार्य आणि आवश्यक मानला गेला. एवढेच नाही तर लोकशाही म्हणून जो काही विशिष्ट व्यवस्थेचा विकास झाला त्यातही संघर्ष मूलभूत मानला आहे. अन् संघर्ष करायचा असेल तर दुसरी बाजू हवी. हा सगळाच मूलभूत झुंडशाहीचा विचार आहे. सगळे विषय आणि अध्ययनपद्धती यात ही मूलभूत त्रुटी आहे. भारताचा विचार हा संघर्षाऐवजी समन्वयाचा आहे. त्याचे कारण आहे भारताचा worldview. हे संपूर्ण विश्व एकाच मूळ शक्तीचा (त्याला चैतन्य शक्ती म्हणा की जड शक्ती म्हणा. ती आहे एकच.) विकास आणि विलास आहे. हा आहे भारताचा worldview. त्यामुळे प्रत्येक कणाची धडपड ही दुसऱ्याशी संघर्ष करून स्वतःला सिद्ध करण्याची नसून, प्रत्येक गोष्ट सामावून घेत पूर्णत्व पावण्याची आहे. या worldview चा विकास आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रात कसा असेल (किंवा भारतीय भूतकाळाच्या संदर्भात कसा होता) याची मांडणी केल्याशिवाय वर्तमान वाद आणि समस्या यातून मार्ग निघणार नाही. हिंदू वा भारतीय विचारप्रवाहापुढील हे आव्हान आहे. हे आव्हान पेलल्याशिवाय तू तू मी मी मधून सुटका नाही. प्रचंड fundamental काम हवं आहे.

(भगवद्गीतेत सुद्धा दैवी आणि आसुरी संपद सांगितले आहे हे पामराला ठाऊक आहे. तरीही ईश्वर आणि सैतान हे योग्य नाही असेच माझे मत आहे. दैवी, आसुरी हा स्वतंत्र विषय आहे. तूर्त एवढेच.)

- श्रीपाद कोठे

शनिवार, ८ एप्रिल २०२३

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

लेखाची चोरी

कालचा माझा स्मृती मंदिरावरील लेख एका आघाडीच्या, स्वनामधान्य दैनिकाने आठ कॉलम बातमी करून छापला आहे. मला न सांगता, न विचारता. त्यावर माझी प्रतिक्रिया -

😀😀😀

माझी तक्रार नाही. अन श्रेय वगैरेसाठी धडपडणाराही मी नाही. समाज माध्यमावर लेख असल्याने परस्पर वापरला त्यासही हरकत नाही. आजकाल हे सर्रास चालतं. असं करणाऱ्याची व्यक्तिगत विकृती वा दोष म्हणून आता सगळे त्याकडे पाहू लागले आहेत. मात्र एका जबाबदार वृत्तपत्राने असे करावे? या वृत्तपत्राकडे किमान कृतज्ञता नसावी याची गंमत वाटते. संपूर्ण लेखही नावासह घेता आला असता. किंवा बातमीत एक बाईट टाकता आला असता. असो. मी जर लेख म्हणून पाठवला असता किंवा त्याबाबत विचारलं असतं तर घेतला नसता किंवा मोठाच आहे वगैरे केलं असतं. (अनुभवावरून म्हणतो आहे.) तरीही असो. अशाच गोष्टींना दरोडा म्हणतात ना? इंग्रजांनी भारतात केलं ते काय वेगळं होतं?🙏

(या पोस्टमुळे काय होईल? फार तर माझ्यावरील बहिष्कार आणखीन वाढेल. Who cares? नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी... जिणे गंगौघाचे पाणी...)

- श्रीपाद कोठे

६ एप्रिल २०२२

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

अवमान

अवमान या मुद्यावर तीन वाद सध्या गाजतायत. एक राहुल गांधी आणि मोदी. दुसरा काँग्रेस आणि सावरकर. तिसरा धीरेंद्र शास्त्री आणि साईबाबा. हे तीन आत्ता या क्षणी चर्चेत असलेले. जुने वा याहून कमी चर्चेत असणारे, छोट्या परिघातले अनेक असतील. व्यक्तिगत जीवनात तर असंख्य असतात. एका वाहिनीवर ताज्या वादांच्या संदर्भात चर्चा सुरू होती. अॅंकरने प्रश्न उपस्थित केला - is defamation a legal issue or political or judicial? अवमान हा नेमका कोणता प्रॉब्लेम आहे? ती चर्चा नेमक्या प्रश्नापर्यंत पोहोचली पण पुढे सरकली नाही. वास्तविक या चर्चेची गरज आहे की, अवमानाचं बीज कुठे असतं? ते माणसाच्या मनात, माणसाच्या कोतेपणात, माणसाच्या द्वेषबुद्धीत, माणसाच्या स्वार्थादी भावनांमध्ये असतं, माणसांच्या अविश्वासात असतं. त्यावर राजकीय वा वैधानिक वा न्यायालयीन तोडगा कसा काढता येईल? तात्पुरता वाद शमवणे, दंड वा शिक्षा करून passive समाधान मिळवणे हे होईल. एखाद्याच्या मनातील अवमान भावना जाहीर व्यक्त होण्याला थोडा आळा कदाचित बसू शकेल. पण त्याच्या मनात ती भावना खदखदत राहीलच. उलट अधिक तीव्र होईल. अन् त्याच्या त्याच्या वर्तुळात तर खाजगीपणे व्यक्तही होत राहील. त्यामुळे अवमान या विषयाचा एकूणच वेगळा, स्वतंत्र, मूलभूत विचार करणे गरजेचे आहे. अर्थात... असो...

भ्रष्टाचार हाही विषय असाच म्हणता येईल.

दंगल कोण करतं?

दंगल कशी टाळायची?

दंगलीवर नियंत्रण कसे मिळवायचे?

जबाबदारी कोणाची?

जबाबदार व्यक्ती, संस्था, प्रशासन यांना शिक्षा काय द्यावी?

या सगळ्याची चर्चा करतो आपण, पण...

दंगल का होते?

यावर का बोलले जात नाही?

- श्रीपाद कोठे

५ एप्रिल २०२३

बुधवार, २७ मार्च, २०२४

सुमन कल्याणपूर

DD News वर आत्ता एक छान कार्यक्रम पाहिला. सुमन कल्याणपूर यांची मुलाखत. मुलाखत दूरदर्शन स्टुडिओत झालेली होती. म्हणजे प्रकृती उत्तम आहे. इतका वेळ सुमनजींना बोलताना पहिल्यांदाच ऐकलं. छान बोलतात. आवाजाचे चढउतार बहुधा नाहीच. एका संथ लयीत उत्तरं देत होत्या. दोन तीन गाण्यांचे मुखडे पण म्हटले प्रश्नोत्तराच्या दरम्यान. त्यात त्यांचं आवडतं एक मराठी गाणं पण होतं. केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर... बोलताना न चढणारा स्वर गाताना मात्र सहज टिपेला भिडला. या वयातही. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर... हे उडत्या लयीतल गाणंही लीलया म्हटलं. लताजींच्या संदर्भात स्वाभाविकच प्रश्न होते. एक होता - तुमचे संबंध कसे होते? त्यावर त्यांचं उत्तर होतं - आम्ही भेटत होतो. आमच्यात व्यवस्थित रॅपो होता. दुसरा प्रश्न होता - दोघींचे आवाज खूप मिळतेजुळते आहेत. तुम्हाला काय वाटतं? उत्तर होतं - आम्ही दोघी कदाचित एकाच वेळी देवाकडे आवाज मागायला गेलो असू. अन् त्याने आम्हाला तो विभागून दिला असेल.

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०२३

(पद्मभूषण मिळाल्यानंतरची)

बुधवार, १३ मार्च, २०२४

काय म्हणावे?

सध्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग सुरू आहे. त्याबद्दल आज वाचण्यात आलेले...

काही खेळाडूंना काही कोटी रुपयात काही संघांनी विकत घेतले. परंतु या खेळाडूंचा खेळ अतिशय पडेल होतो आहे. एका संघाने तर अजून एकही सामना जिंकलेला नाही.

......

माझी टिप्पणी :

खेळासाठी एवढा पैसा द्यावा का हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही, किमान ज्यासाठी पैसा मिळाला आहे त्याचे रिटर्न्स द्यायला नकोत का? त्यासाठी काहीही नियम नाहीत. खेळ ही बेभरवशाची गोष्ट असते असं म्हणून दुर्लक्ष करायचं का?

- शेती ही पण बेभरवशाची गोष्ट नाही का? त्यांना खेळासारखी वागणूक का नको?

- कोणतीही जबाबदारी नसलेल्या गोष्टींवर अमाप पैसा ओतण्याचे कौतुक वाटणारे तुम्ही आम्हीच नंतर; देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक विषमता, दारिद्र्य इत्यादी गोष्टींवर कथ्याकुट करतो. यापेक्षा हास्यास्पद आणि लाजिरवाणे काय असू शकते?

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

अद्भूत अनुभव

संध्याकाळी सातेक वाजताच्या दरम्यान अचानक संथ, शांत स्वरात; हळू पण स्पष्ट आवाजात रामरक्षा ऐकू यायला लागली. मी म्हणत नव्हतो पण ते खूप आकर्षून घेणारं होतं. आजूबाजूला पाहिलं पण कुठेच कोणी म्हणत नव्हतं. आवाज ओळखीचा नव्हता. पूर्ण नाही ऐकू आली. मधूनच सुरू झाली होती अन् मधेच थांबली. पण माझ्या बाहेरून आणि जवळून ते स्वर येत होते एवढं नक्की. असो. प्रभूच जाणोत. 🙏

- श्रीपाद कोठे

१४ मार्च २०२३

रविवार, १० मार्च, २०२४

ते दिवस

सारदा मठाच्या पहिल्या अध्यक्ष प्रव्राजिका भारतीप्राणा यांच्याबद्दल वाचत होतो. १९१२ मध्ये त्या वृंदावनला होत्या. त्याबद्दल त्यांनी सांगितलेली माहिती आज अविश्वसनीय आणि गमतीशीर वाटेल. त्या तिघी जणी होत्या. त्या स्वयंपाक करीत नसत तर तिथल्या गोविंदजी मंदिरात विकत मिळणारा प्रसाद घेऊन येत आणि जेवत असत. प्रत्येकीचा जेवणाचा महिन्याचा खर्च तीन रुपये होता. जो प्रसाद विकत मिळत असे त्यात भात, भाज्या, दही, खीर आणि सोळा पोळ्या असत. याशिवाय नाश्ता म्हणून एक पैशाचा चना मसाला विकत घेत. तो तिघींना दोन दिवस पुरत असे. दूध सहा पैशात एक शेर मिळत असे.

- श्रीपाद कोठे

११ मार्च २०२३

शनिवार, ९ मार्च, २०२४

कृष्ण हवा

साधारण गेल्या वर्षभरापासून भारत रशियाकडून कच्चे तेल कमी किमतीत आयात करतो आहे आणि शुद्ध करून अमेरिका आणि अन्य देशांना निर्यात करून फायदा कमावतो आहे; अशा आशयाचा एक युक्तिवाद सध्या फिरतो आहे. चांगलंच आहे. पण -

: निर्यातीतून पैसा कमावणे महत्त्वाचे आहेच पण आपल्याच नागरिकांचा बोजा कमी करणे; किमानपक्षी नागरिकांवर बोजा न वाढवणे महत्त्वाचे नाही का? स्वयंपाकाचा गॅस वा अन्य पेट्रोलियम पदार्थांची वाढ का थांबू नये? गोकुळातील दूध, दही बाहेर जाणे थांबवणारा एखादा कृष्ण हवा आहे का?

- श्रीपाद कोठे

१० मार्च २०२३

गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

शेतीमालाचे भाव

सध्या कांद्यावरून वाद सुरू आहे. शेतकऱ्यांना क्विंटलसाठी एक रुपयाही मिळत नसताना, ग्राहकांना मात्र २५-३०-४० रुपये किलोने कांदे घ्यावे लागतात. असे का होते? दुसरे - ज्यावेळी ग्राहक याहून दुप्पट भावात कांदे खरेदी करतात तेव्हा शेतकऱ्याला त्यातील किती पैसा मिळतो? दोन्हीची सरासरी काढली तर शेतकऱ्याने समाधानी का असू नये? ग्राहक अधिक भावाने कांदा विकत घेतात तेव्हा जर शेतकऱ्याला योग्य पैसा मिळत नसेल तर तो जातो कुठे? म्हणजेच कांदा चढ्या भावाने विकला गेला तरीही आणि मातीमोल भावाने विकला गेला तरीही शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही वर्गांना फटका बसतो. मग पैसा जातो कुठे? यावर सरकार नावाची यंत्रणा आजवर काहीही का करू शकलेली नाही. अन् एकूणच कांद्यासह सगळ्याच गोष्टींच्या किमतीच्या स्थिरतेचा विचार करावा हे १९४७ पासून २०२३ पर्यंत कोणत्याही सरकारला, कोणत्याही पक्षाला का वाटत नाही? औद्योगिक उत्पादने, सेवा अथवा अन्य निसर्गनिर्मित गोष्टी यांचे भाव अधेमधे एकदम वाढतात. नंतर ओरड झाली की किंचित कमी होतात. उदा. भाव एकदम दहा टक्के वाढतात. मग ओरड होते. मग दोन टक्के कमी होतात. किमतीवर नियंत्रण मिळवलं म्हणून सरकारे पाठ थोपटून घेतात. उरलेल्या आठ टक्के महागाईची लोकांना सवय होते. पुन्हा काही काळाने भाव वाढतात. पुन्हा सगळे तसेच. शेतीमालाच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. खूप पाऊस पडला तरी पाण्याच्या किमती कमी होत नाहीत पण खूप उत्पादन झाले म्हणून शेतमालाच्या किमती गडगडतात. बरे आता शेतकऱ्याला कुठेही आपला माल घेऊन जाण्याची आणि विकण्याची मुभा आहे. तरीही स्थिती सुधारत नाही. देशभर रस्ते, वाहतूक आणि दळणवळण सुधारत असूनही त्याचा शेती आणि शेतकऱ्यांना फायदा नाही. कुठेतरी काहीतरी मूलभूत गडबड आहे. कोणाकडे त्यावर विचार करायला फुरसत आहे का?

- श्रीपाद कोठे

१ मार्च २०२३

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

मराठीसाठी संकल्प

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करता येणारे संकल्प -

- लहान मुलांना शिकवताना हा dog, ही cat; याऐवजी कुत्रा, मांजर किंवा अगदी भू भू म्यांव हे सांगीन.

- फ्लॉवर कसा दिलाऐवजी फुलकोबी कशी दिली/ काय भाव; असे बोलीन.

- मला bore होण्याऐवजी कंटाळा येईल.

- लंच, डिनर वा ब्रेकफास्ट याऐवजी जेवण आणि नाश्ता करीन.

- माझं बुक स्टोर ऐवजी पुस्तकालय असेल.

- मला नेबर नसतील शेजारी असतील.

- मी व्यवस्थित कमवीत असल्यास वर्षाला हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घेईन.

- शुभेच्छा आणि धन्यवाद या शब्दांचा वापर करीन.

- जन्मदिवस वा सणवार वा अन्य प्रसंगी मराठीतून शुभेच्छा देईन.

- मराठी बोलताना, मराठीचा वापर करताना मला ओशाळल्यासारखं वाटणार नाही. त्यात कमीपणा वाटणार नाही.

- चारचौघात असताना मराठीबद्दल बाकीच्यांना काय वाटतं याचं दडपण मी घेणार नाही.

- रोजच्या वापरातल्या वस्तू, रोजचे घरातले वा बाहेरचे संवाद आग्रहाने मराठीत करीन. शब्द अडल्यास तो शोधेन आणि त्याचा वापर करत जाईन.

- मराठीचा वापर ही टिंगलटवाळी करण्याची, हसण्यावारी नेण्याची किंवा दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही हे स्वतःला कठोरपणे समजावेन.

- मराठीचा आग्रह धरताना टेबलला काय शब्द वापरायचा किंवा रेल्वे हेच वापरणं कसं योग्य इत्यादी प्रकारचे फाटे फोडून आशय भरकटवणार नाही.

- शक्य नसेल त्याचा नंतर विचार करेन आणि शक्य आहे त्याचा व्यवहार लगेच सुरू करेन.

- श्रीपाद कोठे

२७ फेब्रुवारी २०२३

राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रमाण भाषा व बोलीभाषा यांचा वादही होतो आहे. त्यावरील एका धाग्यावर व्यक्त केलेले माझे मत -

बोली भाषेतील अनेक शब्द प्रमाण भाषेत आहेत असे म्हणता आणि त्याचवेळी पुणेरी भाषा प्रमाण भाषा ठरवण्यात आली असा निष्कर्षही काढता. असे कसे? शिवाय सगळ्यांचा समावेश करायचा म्हणजे प्रत्येकातील काही स्वीकारले जाणार आणि काही वगळले जाणार. त्यामुळे न वा ण असा वाद करण्यात अर्थ नाही. शब्द जसा लिहिला जातो तसा उच्चार करावा हे तत्त्व स्वीकारलं जावं. बाकी वादावादी आणि वर्चस्व वगैरेत फारसा अर्थ नाही. आम्ही श्रेष्ठ किंवा आम्ही अन्यायग्रस्त हे दोन्ही टाकून दिलेलेच बरे.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

अक्षयाचे प्रकटणे

सकाळी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो तर घरकाम करणाऱ्या बाईने वरून आवाज दिला, `हे पाहा इथे काय आहे ते.’ गच्चीवर गेलो आणि पाहिलं तर एक पक्षी निष्प्राण पडला होता. गच्चीत आलेल्या आंब्याच्या फांदीच्या खाली तो छोटासा पक्षी रात्री केव्हा तरी पडला असावा. त्या मोठ्ठ्या आंब्यावर अनेक पाखरं रोजंच रात्री वस्तीला असतात. दिवसभर बागडणारेही अनेक असतात. दिवसा कोण असतात, रात्री कोण असतात वगैरे काही मी पाहिलेलं आणि नोंदवलेलं वगैरे नाही. मी फक्त त्यांचं बागडणं पाहत असतो, त्यांचे खेळ पाहत असतो, त्यांची गाणी- आरडाओरडा ऐकत असतो आणि त्यांचं असणं भोगत असतो. त्यामुळे निष्प्राण पडलेला तो पक्षी कोणता होता हे काही मला सांगता नाही येणार. अंगणातले पेरू, आंबे माझ्यासोबतच खाल्लेला, माझ्यासोबतच श्वास घेणारा तो एक मध्यमवयीन पक्षी रात्री केव्हातरी मरून पडला होता. आपण पक्षी असे पडलेले कधी पाहत नाही. सदा उड्या मारत किंवा पंखात हवा भरून हवेत भरारी मारत असलेले पक्षी पाहण्याची आपल्याला सवय. त्यामुळे तर त्याचं ते दर्शन फारच केविलवाणं वाटत होतं. चैतन्याने रसरसलेले त्याचे दाट पंख चैतन्य गमावून बसले होते. तो पक्षी आधी हे जग सोडून गेला आणि त्यामुळे फांदीवरून पडला की, फांदीवरून पडल्याने त्याने जगाचा निरोप घेतला माहीत नाही. जिवंत पक्षी फांदीवरून असा पडून जाईल असं नाही वाटत. शिवाय पडला असता तर एकदम गतप्राण नसता झाला. कारण फांदी आणि गच्ची यात काही फार अंतर नाही. अंतर फार असतं तर कदाचित तो पडता पडता उडून वर गेला असता. पडून जखमी झाला असता तर जखमांच्या खुणा दिसल्या असत्या. त्याने काही धडपड केली असती. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचा प्रयत्न केला असता. वेदना झाल्या असत्या तर त्यांचं दर्शन त्याच्या कायेवर झालं असतं. पण तसं काहीही नव्हतं. झोपल्यासारखा वाटत होता असंही म्हणता येत नाही कारण पक्षी झोपलेले कधी पाहिलेले नाहीत. अर्थात पाहिले नसले तरी ते बसल्याबसल्याच झोपत असावेत, आडवे होत नसावेत. हा आडवा होता आणि प्राणहीन. म्हणजे नक्कीच प्रथम त्याने प्राण सोडला आणि मग तो खाली पडला. कसा गेला असेल त्या पक्ष्याचा प्राण? हृदयविकाराने? पक्ष्यांनाही हृदय असतं, त्यामुळे हृदयविकार असू शकतो. पण पक्ष्यांना तर ताणतणाव वगैरे नसतात, मग हृदयविकारही असायला नको. कोणास ठाऊक. रात्रीची वेळ असल्याने पक्ष्यांचं आपसात काही भांडण वगैरे होण्याचीही शक्यता नाही. एक मात्र खरं की काल रात्रीपर्यंत त्या आंब्याच्या फांदीखाली काहीही नव्हतं आणि आज सकाळी तेथे एक पक्षी मरून पडला होता.

त्याला खाली घेऊन गेलो. झाडाखाली थोडंसं खोदलं. त्याची निर्जीव कुडी त्यात ठेवली. वरून माती सारखी केली आणि हात जोडले. तो माणूस नव्हता म्हणून काय झाले? त्याच्यातील आणि माणसातील चैतन्य तर एकच आहे. ज्या शक्तीने माणूस जन्माला घातला त्याच शक्तीने त्या पाखरालाही जन्मास घातले होते. अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते पाखरू माणूस नसले तरीही मी माणूस होतो. माझ्यासोबत फळे खाणारं, माझ्यासोबत श्वास घेणारं ते पाखरू हे जग सोडून जात असताना त्याला सद्गती लाभावी अशी प्रार्थना करणं; माझं माणुसपण जिवंत ठेवणारं होतं. सहज विचार आला, याच्या अंत्ययात्रेला आपण दोघेच- मी आणि काम करणाऱ्या बाई. त्यांच्यापैकी कोणी नाही. खरंच कसं असेल पक्षी जातीचं मरण? काय असेल पक्ष्यांसाठी मरणाचा अर्थ आणि आशय? काय प्रतिक्रिया राहत असेल त्यांची? ज्या पंचमहाभूतातून कुडी साकारली त्या पंचमहाभूतात जमेल तसे विरून जाणे... बास... एवढेच आणि इतकेच. अंत्ययात्रा, अंत्यसंस्कार, वृत्तपत्रात बातमी, सुतक, श्राद्ध-पक्ष, जन्ममृत्यूची नोंदणी, दाखला वगैरे काही नाही. नावगाव, मालमत्ता, हिस्सेवाटे, मृत्युपत्र; अगदी काहीही नाही. माणूस करतो त्यातलं काहीही नाही. जन्म आणि मृत्यू मात्र सारखेच. अवयवांची हालचाल म्हणजे जन्म आणि अवयवांची हालचाल थांबणे म्हणजे मृत्यू. कोण होता? कुठून आला होता? कुठे गेला? का आला होता? उत्तरे नसलेले सनातन प्रश्न. जन्मक्षणापासून हाती घेतलेला हात कधीही न सोडणारा अखंड सखा म्हणजे मृत्यू. सदा सोबत करूनही तो फक्त एकदाच साक्षात होतो आणि तेही न सांगता सवरता, अनपेक्षितपणे. कोणी त्याला मृत्यू म्हणतं, कोणी काळ, कोणी यम तर अन्य कोणी यमदूत. प्रत्येकाचा हा काळ वेगळा असतो की एकच? माझ्याही सोबत तो असावा, असतोच, नव्हे आहेच. कधी प्रकट होईल ते मात्र कोणालाच ठाऊक नाही. काल रात्री मात्र मी झोपलो असताना माझ्या डोक्यावर तो साक्षात प्रकट झाला होता. विज्ञान म्हणतं हे सगळं विश्व काळ, अवकाश आणि निमित्त इतकंच आहे. त्यातील अवकाश आणि निमित्त कमीजास्त होताना आपण अनुभवतो. काळ मात्र अक्षय आणि अविनाशी आहे. काल तो माझ्या जवळ येऊन गेला. त्याला पाहायचं मात्र राहूनच गेलं.

- श्रीपाद कोठे

- नागपूर

- बुधवार, २६ फेब्रुवारी २०१४

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

अहो कुमार विश्वास...

अहो डॉ. कुमार विश्वास, जरा भानावर या. तुम्ही उज्जैन नगरीत रामकथा करताहात. तिथे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे काही बरळलात त्याबद्दल म्हणतोय मी. तुमच्यासोबत काम करणाऱ्या कोणा एका कार्यकर्त्याने तुम्हाला विचारलं की, अर्थसंकल्प कसा हवा? अन् त्यावरून महाभारत झालं. आपण किती महान आहोत आणि तू किती तुच्छ आहेस हे दाखवण्याची प्रबळ उर्मी तुमच्यात उसळली. अन् तुम्ही त्याला शहाणपण सांगितलं की, तुम्ही रामराज्य आणलं आहे तेव्हा रामराज्यासारखा अर्थसंकल्प हवा. तुम्ही विद्वान आणि तो कस्पटासमान हे तर आहेच. त्याच न्यायाने त्या सामान्य कार्यकर्त्याने सामान्य प्रतिप्रश्न केला की, रामराज्यात अर्थसंकल्प होता का? आपल्या संस्कृतमध्ये म्हणतात - बालादपी सुभाषितं ग्राह्यम. त्या बिचाऱ्या बालबुद्धी कार्यकर्त्याच्या तोंडून सत्य तेच बाहेर पडलं. परंतु आपल्या राजकीय बुद्धिमत्तेचा आणि चतुराईचा फुगा असा अनपेक्षित फुटल्यावर आपला तिळपापड झाला आणि आपण चक्क संपूर्ण रा. स्व. संघावर घसरलात. अन् अर्थसंकल्प आणि रामायणाची गाडी चक्क वेदांवर नेऊन ठेवली. बरं, गाडी वेदांवर वळवली तर वळवली, पण आपला अपमान झाला ही तुमच्या डोक्यातील तिडीक इतकी मोठी की, तुम्ही संघाच्या लोकांसाठी अडाणी, निरक्षर वगैरे शब्द वापरले. महोदय; तुम्हाला राग येईल पण मला तुम्हाला सांगू द्या; तुमच्या या एका कृतीमुळे तुम्ही; अर्थकारण, रा. स्व. संघ आणि एकूण मानवी जीवन या तिन्ही बाबतीत अडाणी आणि निरक्षर आहात हे दाखवून दिलं.

त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाला सरळ सरळ उत्तर न देता बगल देण्याचा आणि बगल देताना बौद्धिक चमत्कृती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न केविलवाणा आहे. तुम्हाला अर्थकारण समजत नाही आणि अनपेक्षित प्रसंग उद्भवला तर तो कसा हाताळावा हेही समजत नाही हे या निमित्ताने जगाने पाहिलं. राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिक क्षमतेचा. तर डॉ. विश्वास, तुमच्यासारखे अनेक विद्वान निष्प्रभ ठरतील अशी विद्वत्ता संघाकडे भरपूर आहे. तुम्हाला त्याची माहिती नसणे हे तुमचे अज्ञान आहे. वेद वगैरे क्षणभर बाजूला ठेवा पण तुम्हाला वर्तमानाची माहितीही नाही हे खेदजनक आहे. कोणतीही संघटना, संस्था, चळवळ, कार्य; ही एक गुंतागुंतीची आणि व्यामिश्र बाब असते. नेते आणि कार्यकर्ते यांचेही अनेक स्तर असतात. असंख्य कमीअधिक विविधांगी क्षमता असतात. त्यामुळे सरधोपट निष्कर्ष काढणे चूक असते. तुमच्यासारख्या स्वनामधन्य विद्वानाला हे कळत नाही हे या समाजाचं दुर्दैव आहे.

परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा आणि त्या बुद्धीचा वापर करण्याच्या कौशल्याचा उपयोग लाखो आणि करोडो रुपये कमावण्यासाठी करण्याशिवाय अन्य काय केला आहे आपण? तुमच्या गॉगल किंवा बुट किंवा घड्याळाच्या किमतीपेक्षा कमी खर्च आपल्या महिन्याभराच्या जेवणावर करूनही समाजासाठी झिजणारे, समाजासाठी भरीव काही करणारे, समाजाचा विचार करणारे आणि त्या बदल्यात कपर्दिकेची अपेक्षा न बाळगणारे लाखो लोक संघाकडे आहेत. त्यांनी वेद वाचले की नाही हे महत्त्वाचे नाहीच, ते वेद जगतात हे आज जग पाहत आहे. आमच्या निरक्षर तुकोबाने त्यावेळच्या डॉ. विश्वासांना खडसावून सांगितले होते - वेदांचा तो अर्थ, आम्हासीच ठावा. आज तुम्हाला तेच सांगण्याची गरज आहे आणि मी ते सांगतो आहे.

अन् तुम्ही आहात तरी कोण हो? एक कांचनलोभी अभिनेता. दुसरे काय? कधी अत्याधुनिक पोशाख करून सामान्य वकुबाच्या लोकांच्या टाळ्या मिळवणारे कवी किंवा वक्ते, तर कधी धोतर टिळा परिधान करून रामकथा सांगणारे (ढोंगी) कथाकार. कविता किंवा विचार काय अथवा रामकथा काय; तुमच्यासाठी फक्त पैसा मिळवण्याचे साधन. एक लक्षात ठेवा, तुमच्यासाठी रामकथा हे पैसा मिळवण्याचे साधन आहे; तर संघाच्या लाखो लोकांसाठी रामकथा ही जीवननिष्ठा आहे. ते समजण्यालाही तुम्हाला अजून काही जन्म घ्यावे लागतील. तुम्ही आज जो भगव्याचा आव आणता आहात ना, तो तुम्हाला निर्वेधपणे आणता येतो तो तुमच्या मते अडाणी असलेल्या संघाच्या असंख्य लोकांमुळेच हे विसरू नका. आज सकाळीच एका दुकानदाराशी बोलणं झालं. एक काळ होता की, भगवे ध्वज घ्या म्हणून हेच अडाणी कार्यकर्ते घरोघरी जात असत. त्यांनाही फार प्रतिसाद मिळत नसे. कधी कधी तर तो भगवा ध्वज घेऊन सुद्धा घरावर लावत नसत. जनसंघ किंवा विश्व हिंदू परिषदेच्या भगव्या टोप्या कार्यकर्ते सुद्धा खिशात ठेवत असत. मग कोणीतरी हिम्मत करून ती टोपी डोक्यावर चढवी आणि मग दोनचार लोक ती घालत. ज्या भगव्याच्या जीवावर आज तुम्ही नाटके करीत आहात, त्याचं नेपथ्य असंख्य अनाम अडाणी लोकांनी तयार केलं आहे हे, कांचनलोभी डॉ. विश्वास विसरू नका. इतकेही कृतघ्न होऊ नका.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, २३ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

चिल्लरपणा नको

काय चाललंय हे? बागेश्वर धाम काय अन् रुद्राक्ष महोत्सव काय... प्रभूसाठी असं नका करू कृपया. अशा गोष्टींचं अकटोविकट समर्थन करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. आपण सामान्य माणसे ते करूच शकतो. आपण ते करायला हवे. धर्म म्हणा, हिंदू धर्म म्हणा, सनातन धर्म म्हणा, ईश्वर म्हणा, अध्यात्म म्हणा... हे खूप सखोल, खूप गंभीर, खूप व्यापक, खूप अर्थपूर्ण आहे. त्याला कृपया कोणी चिल्लर करू नये. अन् धर्म अध्यात्म ही अतिशय महान गोष्ट चिल्लर होऊ नये यासाठी अशा गोष्टी वाढू न देणे, अशा गोष्टींना बळ मिळू न देणे याची मोठी जबाबदारी सामान्य माणसांनी घेतली पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१७ फेब्रुवारी २०२३

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

कागदपत्रांचे जंजाळ

आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी बातमी वाचली. मनात एकच आलं - जगणं नको, पण कागद आवरा. हा कागद, तो कागद, हे कार्ड, ते कार्ड... इतकं सतत सुरू असतं की विचारू नका. विकास किंवा आधुनिकता किंवा सुव्यवस्थित समाज म्हणजे गुंतागुंत, किचकटपणा, कटकट; असाच अर्थ काढावा लागेल. फार नाही, अगदी पन्नासेक वर्षांपूर्वीचा विचार केला तरी; माणसाच्या आयुष्यात कागदपत्रे इतकी वाढली आहेत की विचारता सोय नाही. भूखंड, घर किंवा सदनिका यांचा विचार केला तरी पन्नास वर्षांपूर्वीचे कागदपत्रांचे जंजाळ आणि आताचे जंजाळ यात किती बदल झाला ते लक्षात येईल. आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबा यांची जन्म वा मृत्यू प्रमाणपत्रे सुद्धा नव्हती. त्यापैकी अनेकांना नंतरच्या काळात affidavit इत्यादी करून दाखले तयार करून घ्यावे लागले. हा विषय इतका मोठा आहे की, पंतप्रधान मोदी यांनी थोडासा दिलासा देण्यासाठी self attestation सुरू केले. नियम आणि कायदे कमी करण्याचीही घोषणा त्यांनी केली होती. परंतु हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर येते. इतके करूनही सगळ्या व्यवहारातील अनाकलनीयता, फसवणूक, गोंधळ नुसता कायम नसून वाढतो आहे. असे का होते? आणि यावर उपाय काय? यांचा सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. दोन गोष्टी मुख्य आहेत. १) सगळ्या गोष्टी मुठीत घेण्याचा सरकार/ शासन/ प्रशासन/ व्यवस्था यांचा प्रयत्न. या प्रयत्नांच्या मागे लोकांच्या भल्याचा प्रामाणिक हेतूही असू शकतो. परंतु तो हेतू साध्य होणे दूर त्याने सगळ्यांचा त्रासच वाढतो हे समजून घेतले पाहिजे. २) दुसरे कारण म्हणजे - प्रामाणिकपणा, सचोटी, चांगुलपणा, परस्पर विश्वास इत्यादी मानवीय soft power बाजूला सारून समाज उभा करण्याचे, समाज घडवण्याचे प्रयत्न. शिक्षण, वातावरण, विमर्श, संस्कार, साहित्य, मूल्य या सगळ्यातून मानवी soft power ची हकालपट्टी करून त्याजागी; चतुराई, जुगाड, शक्ती, संबंध, diplomacy या गोष्टींची स्थापना करून; यश आणि achievement यांना देण्यात आलेले अवास्तव महत्त्व. काळाने कुस बदलल्याशिवाय यात काही बदल होईल असे वाटत नाही. अन् काळ जेव्हा कुस बदलेल तेव्हा अशी काही किंमत वसूल करेल की, दीर्घ काळ ते पोळत राहील. बाकी मानव शहाणा आहे वगैरे बकवास आहे.

- श्रीपाद कोठे

१५ फेब्रुवारी २०२३

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

चार 'स' मार्ग

माणसाच्या जगण्याचे चार 'स' मार्ग असतात. १) संसाराचा मार्ग, २) सामाजिकतेचा मार्ग, ३) संन्यास मार्ग, ४) सत्य मार्ग. पैकी संसाराचा मार्ग हा बहुसंख्य लोकांचा मार्ग असतो. सामाजिकतेचा मार्ग त्याहून बऱ्याच कमी लोकांचा असतो. संन्यास मार्ग त्याहूनही कमी लोकांचा असतो. तर सत्य मार्ग हा तुरळक लोकांचा मार्ग असतो. या चारही मार्गांवरून चालणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला वाटतं की, आपण हा मार्ग निवडला आहे. त्यानंतर वाटचाल करताना बहुतेक प्रत्येकाला प्रश्न पडतो की, मी हा मार्ग का धरला? अन् कधीतरी कळतं की, मुळात आपला मार्ग आपण निवडतच नाही. मार्ग आपोआप आपल्यासमोर येतो आणि आपण त्यावर चालत राहतो.

प्रत्येक मार्गाची आपापली भाषा असते. प्रत्येक मार्गाच्या आपापल्या खुणा असतात. प्रत्येक मार्गाचे रुप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा अस सगळं वेगवेगळं असतं. यातील पहिले तीन मार्ग एकमेकांशी कुठे कुठे जोडलेले असतात. त्या जोडमार्गांनी या तिन्ही वाटांच्या वाटसरुंना अन्य मार्गाबाबत थोडीबहुत माहिती होत असते. एकमेकांचा आणि एकमेकांच्या मार्गांचा थोडाबहुत परिचय होत असतो. त्यामुळे त्यांच्यात कमीअधिक संवाद होतो, होऊ शकतो. हे तिन्ही मार्ग कुठेतरी जाऊन थांबतात. तो dead end असतो. त्यामुळे वाटसरू पुन्हा पुन्हा मागे पुढे फिरत राहतात. पुन्हा पुन्हा आपला आणि अन्य मार्ग; तसेच आपल्या आणि अन्य मार्गावरील वाटसरू यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतात. कधी त्यांना त्यात रस वाटतो तर कधी ते कंटाळवाणे होते. त्यांचे चालणे मात्र सुरूच राहते. अखंडपणे.

चौथा सत्य मार्ग मात्र पुष्कळच वेगळा असतो. तो या तीन मार्गांना समांतर असतो पण कुठेही जोडलेला नसतो. त्याचे रूप रंग, पद्धती, संकेत, जाणिवा, कल्पना, सुख दुःख, आनंद, विषाद, अपेक्षा, गरजा, भाषा, खुणा सगळं अन्य मार्गांपेक्षा तर वेगळं असतंच पण त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाच्या या गोष्टीही वेगवेगळ्या असतात. कधी कधी एकमेकींशी या बाबी थोड्याबहुत जुळल्या तर त्यांच्यात देवाणघेवाण होते. पण अनोळखीपण हेच या मार्गाचे वैशिष्ट्य असते. या मार्गाचे वाटसरू एकमेकांना अनोळखी असतात. अन्य तीन मार्गांना हा मार्ग समांतर असल्याने आणि मुळात या मार्गावर तुरळक वाटसरू असल्याने; या मार्गाचे वाटसरू अन्य मार्गांचे आणि त्यावरील वाटसरुंचे निरीक्षण आणि अध्ययन करू शकतात. शिवाय या मार्गाचे बहुतेक वाटसरू पहिल्या तीन मार्गांवरूनच कुठून तरी तिथे उडून आलेले वा फेकले गेलेले असतात. अनोळखी आणि रिकामा असल्याने या मार्गावर मौज अधिक असली तरी, अनामिक अस्वस्थता मात्र भरपूर असते. अनुकरणाला काहीही वाव नसतो. प्रत्येक वाटसरू आपला राजा असतो. हा मार्ग आणि त्यावरचे वाटसरू हे अन्य मार्गांना आणि त्यावरील वाटसरूंना नेहमीच एक कोडे वाटत असते. अन्य मार्गांचे dead end जिथे असतात त्याच्या जवळच या मार्गाचीही समाप्ती असते. परंतु अन्य मार्ग अनुल्लंघ्य भिंतींनी जसे बंद झालेले असतात तसा हा मार्ग बंद झालेला नसतो. त्याच्या समाप्तीला तो एका आनंद सरोवरात पोहोचतो. या मार्गावरील वाटसरू मग त्या आनंद सरोवरात कायम विहार करत राहतात.

- श्रीपाद कोठे

शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

व्याख्या हिंदुत्वाची

लोकमतच्या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे कवित्व बराच काळ सुरू राहणार आहेच. ते चांगलेही आहे. नाही तरी 'हिंदू विचार का हो, सम्यक समूह मंथन' हीच संघाची भूमिका आहे. त्यामुळे तसे होणे वावगे नाहीच. अन मंथन म्हटल्यावर वेगवेगळी मते आलीच. प्रश्न उत्तरे आलीच. असेच काही प्रश्न लोकमतचे मालक श्री. विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित केले होते. त्यातला एक प्रश्न होता - 'हिंदुत्वाची कोणती व्याख्या योग्य? सावरकरांची? संघाची? बाळासाहेब ठाकरे यांची? की राहुल गांधी यांची?'

याबाबत दोन गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे, संघाने हिंदुत्वाची व्याख्याच केलेली नाही. अन दुसरे म्हणजे, व्याख्येचं काही एक महत्व असलं तरीही व्याख्या म्हणजे काही फार मोठी किंवा अत्यावश्यक गोष्ट नाही. 'कविता' या गोष्टीच्या अनेक व्याख्या आहेत. त्याने कवितेला काहीही फरक पडत नाही. एकाच 'कविता' या सत्याचं प्रत्येक जण आपापलं वर्णन करतो. अन कविता करणारे तर त्या व्याख्या वगैरेंच्या फंदात पण पडत नाहीत. 'जीवन' या सत्याचंही असंच आहे. व्याख्या ही गोष्ट त्यासाठी irrelevant आहे. निरर्थक आहे. सध्या वातावरणात प्रेमाचा माहोल आहे. त्याचंही तसंच. अनेक गोष्टी एक तर व्याख्येपलीकडच्या असतात किंवा व्याख्या या गोष्टीला काही महत्व नसतं. हिंदुत्व तसं आहे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२

अनुभव

काही कामानिमित्त आज एका पोलिस ठाण्यात गेलो होतो. मी बसलो होतो त्याच्या शेजारच्या टेबलवर एक शिपाई कोणत्या तरी केसमध्ये एक बयाण नोंदवून घेत होता. पंचविशीतला एक तरुण बयाण देत होता. शिपायाने त्याला विचारले - जात कोणती? तरुण म्हणाला - बुद्ध. शिपाई - ते ठीक आहे पण जात कोणती? तरुण - जात नाही माहीत. समोरच्या अधिकाऱ्याला म्हटलं - थोडं डिस्टर्ब करू का? अधिकारी - बोला. मी - हा मुलगा आत्ता जे म्हणाला की, मला जात माहीत नाही. हे ऐकून मला खूप छान वाटलं. अन् बरंही वाटलं. अधिकारी मनमोकळं हसले. निघताना त्यांना विचारलं - खाली एक पाटी आहे. त्याचा फोटो काढू का? नाही म्हणाले. त्यावर लिहिलं होतं - आपण लोकांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यायला पाहिजे. चुकांची नाही. (महाराष्ट्र पोलीस)

- श्रीपाद कोठे

९ फेब्रुवारी २०२३

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

केविलवाणे, किळसवाणे

तुझं माझं करण्याच्या वृत्तीने आपण समाज म्हणून अतिशय गचाळ स्तरावर आलो आहोत. अशी वृत्ती नसणारे नाहीत असं अजिबातच नाही. पण - एक तर त्यांची संख्या कमी आहे; दुसरे म्हणजे त्यांना फार गांभीर्याने कोणी घेत नाही; अन तिसरे म्हणजे सारासार विचार करणाऱ्यातील अनेक जण selective असतात आणि प्रतिक्रियावादी असतात. त्यांचा सारासार विचार विशिष्ट लोक, विशिष्ट घटना असाच असतो आणि पुष्कळदा प्रतिक्रियेची उबळ इतकी जास्त असते की, सारासार विचारांचा आब राखण्याची त्यांना गरज वाटत नाही.

काल लता दीदींनी या जगाचा निरोप घेतल्यावर याच गचाळ वृत्तीचे बटबटीत दर्शन झाले. त्यांच्यावर गरळ ओकणारे आणि त्यांच्याबद्दल आदर असणारे दोन्ही बाजूंनी हे घडले. कथित दलित वर्गातील काहींचा आक्षेप त्यांनी डॉ. आंबेडकर यांची गाणी म्हटली नाहीत याला होता. तर हिंदुत्व विरोधकांचा आक्षेप त्यांचे सावरकर प्रेम याला होता. अन तेवढ्यावरून लता दीदींवर टीका करण्याची किंवा त्यांचे थोरपण डागाळण्याची संधी संबंधितांनी साधून घेतली. अन या चर्चांची प्रतिक्रिया म्हणून अंत्यसंस्कारानंतर शाहरुख खान थुंकल्याची चर्चा सुरू झाली. हे सगळेच विलक्षण केविलवाणे आणि किळसवाणे आहे.

महापुरुषांचा नीट विचार करण्याची सवयच आपल्याला नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कोणताही महापुरुष हा त्याच्या विशिष्ट कार्याच्या संदर्भात मोठा आणि आदरणीय असतो. त्याची ती थोरवी मान्य असणे वेगळे आणि त्याचे देव्हारे माजवणे वेगळे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महापुरुषाच्या तसबिरी घरात लावणार नाही किंवा त्या तसबिरी लावून मिरवणार नाही. त्या त्या महापुरुषाबद्दलचा आदर व्यक्त करायला त्याचे गुणगान सगळ्यांनी केलेच पाहिजे असेही नाही. असा विचार करणे हाच कोतेपणा आणि अपरिपक्वता आहे.

महापुरुषांच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्या विचार आणि व्यवहारातील काही बाबी तात्कालिक असतात, काही धोरणात्मक असतात, काही सहेतुक असतात, काही सत्यान्वेषी असतात, काही कालसापेक्ष असतात, तर काही कालनिरपेक्ष असतात. विशेषतः कालनिरपेक्ष असतो तो त्यांचा भाव. याला कोणताही महापुरुष अपवाद नसतो. प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, चाणक्य, अशोक, शिवाजी महाराज, टिळक, गांधी, सावरकर, हेडगेवार, आंबेडकर, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर... अगदी कोणीही अपवाद नसतात. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या लिखाणाचा, त्यांच्या वक्तव्यांचा, त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या भूमिकांचा, त्यांच्या कृतींचा नीट, साक्षेपाने विचार करणे; तशी मांडणी करणे; त्यातील टिकाऊ आणि टाकाऊ समजून घेणे; ही समाजाच्या परिपक्वतेची कसोटी असते. आपण समाज म्हणून यात खूपच कमी पडतो हे मान्य करण्याला पर्याय नाही.

तसेच प्रतिक्रियावादी लोकांचेही असते. शाहरुख खानने अंत्यदर्शन घेताना त्यांच्या पद्धतीने फुंक मारली. पण ती थुंक होती असा जावईशोध लावून राळ उडवून देणे हे, दीदींवर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा कंडू शमवून घेण्यापेक्षा वेगळे काहीही नाही. सगळ्यांना ती पद्धत माहिती असण्याची गरज नाही, पण एक लोकप्रिय अभिनेता किमान आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न नक्कीच करेल एवढीही समज असू नये. बरे असे केल्याने, दीदींबद्दल आक्षेपार्ह लिहिणारे, बोलणारे जे आहेत त्यांच्या त्या कृतीला आक्षेप घेण्याचा स्वाभाविक अधिकारही आपण गमावून बसतो हेही प्रतिक्रियावाद्यांना ध्यानात येऊ नये? तुझं माझं या वृत्तीने आम्ही समाज म्हणून गचाळ स्तराला येऊन पोहोचलो आहे हेच खरे.

- श्रीपाद कोठे

सोमवार, ७ फेब्रुवारी २०२२

काळ बदलतो

'लोकमत'च्या कार्यक्रमात काल रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांचे भाषण झाले. काळ कसा बदलतो हे पाहून मौज वाटली. साधारण ४० वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कॉलनीत संघाचे वातावरण होते, पण आजूबाजूला सगळीकडे संघद्वेषच. आमच्या वस्तीत दुकाने नव्हती. थोडे बाजूला झोपडपट्टी सारख्या वस्तीत एक बऱ्यापैकी किराणा दुकान होते. 'झोपडीचे दुकान', 'मामाजीचे दुकान', 'वाघमारेचे दुकान' म्हणून त्याला ओळखत. महिन्याचा किराणा महाल वा बर्डी वरून येत असला तरी, एखाद्या वेळी या दुकानातही लोक जात असत. आमची वस्ती साधारण 'तरुण भारत'वाली, तर या दुकानात लोकमत येत असे. दुकानात गेलं की समोर ठेवलेला लोकमत सहज चाळला जाई. एकदा असाच या दुकानात गेलो होतो. दसऱ्याच्या दोन तीन दिवस आधीचा दिवस असेल. समोरचा लोकमत चाळला अन उडालोच. पहिल्याच पानावर लीड स्टोरी होती - 'संघ मुख्यालयात सरसंघचालक पदासाठी हाणामारी'. त्यात बाळासाहेब देवरस, आबाजी थत्ते, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, यादवराव जोशी, भाऊराव देवरस; अशी त्या काळातील संघातील दिग्गज नावे होती. या सगळ्यांची आणि त्यांच्या समर्थकांची कशी हाणामारी झाली याचं रसभरीत वर्णनही बातमीत होतं. मला प्रश्न पडला होता, कालच मी माझ्या गणातील स्वयंसेवकांचे गणवेशाचे सामान आणायला कार्यालयात गेलो होतो. तिथे काहीच गडबड, गोंधळ नव्हता. बातमीत नाव असलेले अनेक जण नागपुरात सुद्धा नव्हते. भांडार वेळेवर उघडले होते. भांडार प्रमुख रंगनाथजी व्यवस्थित सामान देत होते, हिशेब ठिशेब करत होते. पुष्कळ जण येत जात होते. गप्पागोष्टी होत होत्या. अन आता ही बातमी? असो. काळ बदलत असतो. हो काळ।बदलत असतो. काल होता तो आज नाही. अन आजचा उद्या नसेल.

- श्रीपाद कोठे

७ फेब्रुवारी २०२२

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

साहित्य संमेलन व राजकारणी

साहित्य संमेलनात अध्यक्षांचे भाषण पाचच मिनिटे झाले आणि मुख्यमंत्र्यांचे अर्धा तास. असे व्हायला नको होते अशी पोस्ट मी काल टाकली. त्यावर प्रतिक्रिया आल्या. त्यावर तिथेच उत्तर देता आले असते पण ते अधिक लोकांपर्यंत पोहोचले नसते. म्हणून प्रतिक्रियांमध्ये आलेल्या दोन मुद्यांवर ही स्वतंत्र पोस्ट.


दोन महत्वाचे मुद्दे पुढे आले ते असे : १) सरकारने साहित्य संमेलनाला पैसे देऊ नयेत. २) साहित्यिकांनी आपल्या भरवशावर संमेलने करावीत. या दोन्ही प्रतिक्रिया अपरिपक्व आणि उथळ आहेत. समाजाला भाषिक, भावनिक, बौद्धिक, वैचारिक, माहितीपर, तात्विक, राजकीय, आध्यात्मिक संपन्नता प्रदान करीत असूनही; साहित्य ही टाकावू आणि निरर्थक किंवा किमान पक्षी फारशी महत्त्वाची नसलेली बाब आहे; असे अनेकांचे मत असते. असे मत बाळगणाऱ्या लोकांना गंभीरपणे घेण्याची अजिबातच गरज नाही. मात्र, साहित्याचे महत्व आहे हे मान्य करूनही संमेलनासाठी सरकारी मदत घेऊ नये असे जे म्हणतात त्यांना प्रश्न करावासा वाटतो की, साहित्यासाठी ते काय करतात? सरकारी मदत घेऊ नये किंवा सरकारने मदत देऊ नये, असे म्हणणाऱ्या किती जणांच्या घरी स्वतःचे किमान शंभर पुस्तकांचे ग्रंथालय आहे? साहित्याचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन समाजातील किती लोक साहित्य संमेलनासाठी फूल ना फुलाची पाकळी देतील? छोट्यामोठ्या धार्मिक आयोजनासाठी शेकडो लोकांच्या जेवणाची नि:शुल्क व्यवस्था करणारे किती दाते, साहित्यविषयक आयोजनासाठी आपला हात मोकळा सोडतील?


आणखीन एक मुद्दा : साहित्यिकांना आदर्शवादी व्हायला सांगणारे लोक, राजकीय नेत्यांनी आदर्शवादी व्हावे असे का म्हणू शकत नाहीत? राजकीय नेत्यांनी आदर्शवादी नसणे समजून घेणे अवघड नाही. दिलेल्या पैशाच्या बदल्यात (तो स्वतःच्या खिशातून दिला नसला तरीही) सौदेबाजी करणे समजू शकते. परंतु समाज म्हणून, सामान्य नागरिक म्हणून; राजकारण्यांनी सौदेबाजी बंद करावी हे परखडपणे का बोलू नये? समाजाने शेपूट का घालावे? मुळात आपण समाज म्हणून विचारशून्य आणि सुमार झालो आहोत. आपले विचार, आपले सत्व आपण गुंडाळून ठेवले आहे. सरकारी मदतीशिवाय साहित्य संमेलन घडवून आणण्यासाठी जी मदत लागेल ती द्यायला समाज किती तयार आहे? आणि सरकारने साहित्य संमेलनाला मदत का करू नये? या दोन्ही प्रश्नांवर सल्ले देणाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नाहीत.


वास्तविक राजकारणी लोकांनी अधिक विचारी व्हायला हवे. आम्ही मदत देऊ पण मंचावर बसणार सुद्धा नाही, अशी भूमिका घ्यायला कोणी मना केले आहे का? ज्या ठिकाणी विषय आणि आयोजन यांचा थेट संबंध नसेल तिथे तिथे सार्वजनिक कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये बसू; हा आदर्शवाद राजकीय नेत्यांनी विकसित करायला हवा. अन् समाजानेही त्यासाठी आग्रही राहावे. त्याऐवजी राजकारणापुढे लोटांगण घालणारा समाज हा समाजच म्हणता येणार नाही. सध्या सुसंस्कृत, सभ्य समजल्या जाणाऱ्या पक्षाचे सरकार आहे. आर्थिक विकासाबरोबरच आदर्श राजकीय सामाजिक संस्कृतीचा विकास करण्याकडेही त्या पक्षाने आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्ष द्यावे. राजकारणी नेत्यांना डोक्यावर बसवणाऱ्या समाजाला योग्य ते वळण लावण्यात स्वतःच पुढाकार घ्यावा. त्या पक्षाला हे करता येईल का?

- श्रीपाद कोठे

५ फेब्रुवारी २०२३

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

ठेकेदार

'गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून' या साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आहेत. यावरून अनेकांचा पोटशूळ उठला आहे. सगळी गंमतच म्हणायची. गांधी विनोबा यांच्यावरचा एकाधिकार संपण्याची भीती हे कारण तर आहेच. पण या हताशेत आपलीच वैचारिक विसंगती कळू नये एवढ्या तळाशी लोक गेले आहेत हे दुर्दैव आहे. विचारांची मांडणी, चिकित्सा वगैरे तर खूपच दूर; पण साधी सोबत, समन्वय, एकत्र येण्याची इच्छा; या प्राथमिक मानवीय गोष्टी सुद्धा आंधळ्या द्वेषापायी आपण सोडून देत आहोत हेही अशा लोकांना लक्षात येऊ नये? अन् तरीही गांधी विनोबांचे आपणच ठेकेदार आहोत हा दंभही सुटू नये? खरंच हे जग मोठं गमतीशीरच आहे.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३

जीवन प्रवाह

सध्या आर्थिक विषयांची चर्चा खूप सुरू आहे. सहज मनात विचार आला की, या सगळ्या अर्थकारणाचं वय किती आहे? रिझर्व्ह बँकेला अजून ९० वर्षेसुद्धा झालेली नाहीत. रिझर्व्ह बँक ही अर्थकारण नियंत्रित करणारी व्यवस्था आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापूर्वी देश, समाज, माणसे, लोक, त्यांचे व्यवहार, उद्योग, व्यापार, उत्पादन, सेवा, कृषी, शिक्षण, आरोग्य... इत्यादी इत्यादी इत्यादी अस्तित्वातच नव्हतं का? तर सगळंच होतं. समाज, माणसे आणि त्यांचे व्यवहार हे सगळंच होतं. उदाहरण म्हणून काही नावेच घ्यायची तर - काँग्रेसची स्थापना; संघाची स्थापना; टिळक, विवेकानंद आदींचे अवतारकार्य; वंगभंग; वृत्तपत्रे; अशा अनेक गोष्टी त्यापूर्वीच्या आहेत. मुद्दा एवढाच की, व्यवस्था येत जात राहतात. उभ्या राहतात वा मोडून पडतात. त्यांचे महत्त्व आणि परिणाम तात्पुरते असतात. समाज जीवनाचा प्रवाह वाहतच राहतो. दुसरा मुद्दा हा की, संघटित सूत्रबद्ध आर्थिक रचना नसतानाही समाज व्यवस्थित राहू शकतो. गुण दोष, फायदे तोटे प्रत्येकच अवस्थेत असतात. त्याने आनंदून वा गडबडून जाण्यात अर्थ नसतो. माणूस, जीवन, जीवनप्रवास आणि जीवनप्रवाह; याकडे लक्ष देत राहिलं की बास.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३