मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

वरवरचे

खोटे, दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या celebrity लोकांना जबर दंड आणि कारावास अशी तरतूद असणारा एक कायदा येऊ घातला आहे. ढोबळ मानाने हे चांगलेच आहे. त्याचा नेमका तपशील आणि अंमलबजावणी, त्यातील अडचणी इत्यादी हळूहळू स्पष्ट होईलच. पण प्रथमदर्शनी जाणवणाऱ्या काही गोष्टी-

१) चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या इत्यादीसारख्या कारणांसाठीही celebrity ना सजा होईल का? ते चुकीचे ठरेल.

२) जाहिराती असा दावा कंपनीसाठी, कंपनीच्या वतीने करतात. मग कंपनीला सजा होईल की नाही? दिशाभूल करणाऱ्या कंपनीला कारभार, व्यवसाय करण्याचा अधिकार राहावा का?

३) खोटे दावे करणाऱ्या फक्त celebrity नाच सजा का? अन्य मॉडेल्सना का नको?

४) आश्वासने आणि दावे या वेगळ्या गोष्टी मानायच्या का? देशाच्या, समाजाच्या कल्याणाचे दावे करणारे राजकीय पक्ष, राजकीय नेते, सरकारे यांना सजा का नको?

या अनुषंगाने सहज परवा टेलिफोनचं बिल भरायला आलेले एक काका आठवले. बिल भरायला थोडी रांग होती. बोलताना हेल्मेट विषय आला. काका संतापलेच. म्हणाले- `हेल्मेट घातल्यावर मरणार नाही असं आश्वासन कोणी देतं का? मंत्र्याने, आरटीओने, पोलिसांनी stamp paper वर लिहून द्यावं तसं. उगाच आपले तमाशे करतात. मी ३०-४० वर्ष गाडी चालवतो. काहीही झालं नाही. आता या वयात त्याची सवय व्हायलाही अवघड आहे हो. एकदा घालून पाहिलं- चार चार वेळा मान वळवून पहावी लागत होतं. कदाचित हेल्मेट घातल्यावरच अपघात होऊ शकेल. दीड शहाणे आहेत सगळे. हे म्हणजे कसं आहे माहीत आहे का? काशी बिशीला गेलं की पंडे सांगतात- अमुक ग्रहाची शांती करा, नाहीतर अरिष्ट येईल वगैरे. मग शे पाचशे, हजार रुपये उकळतात. तसंच आहे. तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर मराल असा धाक घालायचा अन खिसा कापायचा. अमुक काही तरी होईल वगैरे करून घाबरवणे अन डल्ला मारणे म्हणजे अगदी `सभ्य डाकूगिरी' आहे हो.'

आश्वासने अन दावे असेही असतात. त्यांचं काय? प्रश्नांच्या मुळाशी जाऊन प्रश्न सोडवण्यापेक्षा काहीही थातूरमातुर, निरर्थक गोष्टी करण्यातच आम्ही व्यक्ती म्हणून अन समाज म्हणूनही धन्यता मानू लागलो आहोत. नाही का?

- श्रीपाद कोठे

31 ऑगस्ट  2016

ऐक्य, प्रेम इत्यादी...

सकाळी बातम्यांसाठी टीव्ही लावला त्यावर बातमी होती- मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांचा आज संप. युनियन वगैरे असल्याने संप यशस्वी झालाच असेल. बाकी त्रास वगैरे आनुषंगिक बाबी राहतीलच.

पंतप्रधानांनी काश्मीरबाबत दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानावरील एक लेख वृत्तपत्रात पाहिला. एकतेची गरज असा त्याचा आशय होता.

त्यानंतर मित्राने what's app वर पाठवलेला `दस कहानियां' चित्रपटाचा सुमारे दहा मिनिटांचा एक तुकडा पाहिला. २००७ सालच्या या चित्रपटात रोहित राय, नाना पाटेकर, अनिता हस्सानंदानी यांच्या भूमिका आहेत. पती-पत्नी प्रेम, काळजी करणे हा विषय आहे. एक जण नाराज झाल्यावर दुसऱ्याने समजूत काढण्यासाठी काय करायचं याचे ठरलेले संकेत. नाराज होण्याची कारणं- कमोडचा रंग कोणता असावा इत्यादीही.

`तारक मेहता का उल्टा चष्मा' यात सध्या सुरु असलेलं प्रकरण पाहिलं. गोकुलधाम सोसायटीतल्या महिला हिऱ्यांचं प्रदर्शन पाहायला जातात आणि तेथील १० कोटी रुपयांच्या साडीच्या प्रेमात पडतात. संबंधित हिरा व्यापारी जेठालालचा मित्र असल्याने दया त्याला गळ घालते की, एक दिवसासाठी तरी ती साडी घेऊन या. आम्ही ती घालून त्याचा अनुभव घेऊ, आनंद घेऊ अन जशीच्या तशी परत करू. वरून `ही साडी आणणे ही तुमच्या प्रेमाची कसोटी' असेही दया जेठालालला सुनावते. आता जेठालालची धावपळ सुरु आहे.

नवीनच सुरु झालेल्या `झी युवा' वाहिनीची तीन चार दिवसांपूर्वी पाहिलेली जाहिरात आठवून गेली- बाईकवर मागे बसलेली मुलगी आपल्या प्रियकराला दोनचा पाढा म्हणायला लावते. तो म्हणतो आणि विचारतो, कशाला म्हणायला सांगितला? ती उत्तर देते- मी पाहत होते, लग्नानंतर तू माझ्या तालावर किती नाचशील ते.

@@@@@@@@@@@@@

हे सगळे तुकडे मनात घोळत होते. त्यांची एक गोधडी तयार झाली. अन रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी प्रख्यात विचारवंत कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी यांना विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली. गुरुजींनी विचारले होते- what is the difference between collective bargaining and highway robbery? (सामूहिक सौदेबाजी आणि महामार्गावरील वाटमारी यात काय फरक आहे?) स्व. दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केल्याचा संदर्भ त्या प्रश्नाला होता. त्याच चर्चेत गुरुजी दत्तोपंतांना म्हणाले होते- तुझ्या भारतीय मजदूर संघातील प्रत्येक सदस्यासाठी तुझं आतडं आईसारखं तुटतं का, हे महत्वाचं.

@@@@@@@@@@@@@

मनातल्या घटना- प्रसंगांच्या गोधडीला विचारांचा हा तुकडाही जोडला गेला. या गोधडीच्या उबेत वाटलं, ऐक्य म्हणजे काय? स्वार्थासाठी एकत्र येणं? स्वार्थासाठी संघटीत होणं? गरजा पूर्ण करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, संरक्षणासाठी एकत्र येणं, संघटीत होणं म्हणजे ऐक्य? एक होण्यासाठी एकमेकांच्या गरजा पूर्ण करायच्या, एकमेकांना सांभाळून घ्यायचं की, एक आहोत म्हणून गरजा पूर्ण करायच्या, सांभाळून घ्यायचं? हृदय पायांना रक्तपुरवठा करतं आणि पायही हृदयाला वाहून नेतात. का? एक होण्यासाठी की, एक आहेत म्हणून? एक होण्यासाठी काश्मिरी लोकांच्या मागण्या मान्य करत करत गेलं तर, अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक पैसा ओतूनही समाधान होत नाही. मागण्याही संपत नाहीत. पाय आणि हृदय मात्र मागण्याही करत नाही अन रुसवे फुगवेही होत नाहीत. एक आहोत म्हणून वंचितांची काळजी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांची काळजी करणं यात फरक आहे ना? एक आहोत म्हणून वंचितांनी मागणी करणं आणि एक होण्यासाठी वंचितांनी मागणी करणं यात फरक आहे ना?


ऐक्यासाठी प्रेमही हवं. पण प्रेम म्हणजे काय? एकमेकांना न दुखावणे? एकमेकांच्या सगळ्या गोष्टी मान्य करणे, चालवून घेणे? मनाच्या लहरी सांभाळत राहणे? अवास्तव, अयोग्य गोष्टीही मान्य करवून घेणे? अवास्तव, अयोग्य, निरर्थक गोष्टी स्पष्टपणे समजून न घेणे? तालावर नाचवणे? प्रेम असलं की, मांजरीचे दात तिच्या पिलांना बोचत नाहीत. सौदा असला की मात्र १० कोटींच्या साडीची गरज पडते. पदार्थ बिघडला तरीही न सांगणे म्हणजे प्रेम? अमुक वस्तू तुझ्या उपयोगाची नाही, आपल्या बजेटमध्ये नाही किंवा अमुक विषय समजायला तू अजून लहान आहेस इत्यादी न सांगणे म्हणजे प्रेम? प्रेमाच्या कसोट्या असतात?


प्रेम असणं आणि प्रेम उत्पन्न करणं, ऐक्य असणं आणि ऐक्य निर्माण करणं... प्रेमापोटी काही करणं अन प्रेमासाठी काही करणं, ऐक्यापोटी काही करणं आणि ऐक्यासाठी काही करणं... खूप फरक आहे. अगदी जमीन आस्मानाचा. `साठी' कसं सोडून देता येतं? अन `पोटी' कसं येतं? माणसाला सगळंच कळलं आहे असा निदान माझा तरी भ्रम नाही...

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ३१ ऑगस्ट २०१६

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

हिंदुत्व- भारतातले अन अमेरिकेतले

सध्या अण्णा हजारे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे एका `हिंदू विश्वकोशा'च्या प्रकाशन कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून उपस्थित होते. नशीब त्यावरून गदारोळ झाला नाही. पण सहज एक आठवून गेले. दिल्लीतील त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी मंचावर स्वामी विवेकानंद, भारतमाता यांची छायाचित्रे होती. त्यावरून केवढा गदारोळ झाला होता. त्यामुळे नंतरच्या उपोषणामध्ये त्या चित्रांची सुट्टी झाली होती. आपल्या देशातील सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्वशक्तीमान प्रसार माध्यमे, अण्णांचे विरोधक आणि पाठीराखे या सगळ्यांनाच अमेरिकेतील हिंदुत्व चालते, पण भारतातील नको असे म्हणायचे का? बाकी असो काहीही, जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणतात.

- श्रीपाद कोठे

२९ ऑगस्ट २०१३

कशातच काही अर्थ नसतो...

`कशातच काही अर्थ नसतो मित्रा. मस्त बिनधास्त जगायचं. मटणमच्छी खायची. दारूबिरू प्यायची. बाई, बाटली सगळं करायचं. मनसोक्त शिव्याबिव्या द्यायच्या. कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही. आपल्याला वाटेल ते, आपल्याला वाटेल तसं, आपल्याला वाटेल तेव्हा वागायचं बोलायचं. मस्त रहने का... क्या??'

एक मित्र दुसऱ्या शामळू मित्राला शहाणं करत होता. शामळूच तो. त्याने सहज विचारलं- `कशातच काही अर्थ नसतो म्हणतो. मग मित्रा, तू आत्ता म्हणालास त्या सगळ्या गोष्टीत अर्थ असतो का? म्हणजे असेलच म्हणा. त्याशिवाय का तू करणार?'

`शहाणे करून सोडावे सकळ जन' असं व्रत घेतलेला, सल्ला देणारा मित्र, हातातला वेफर्सचा पुडा फेकून देऊन, गाडीला किक मारून हातवारे करत निघून गेला.

- श्रीपाद कोठे

२९ ऑगस्ट २०१६

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

रामरहीम बाबा

रामरहीम बाबाचा निकाल लागला एकदाचा. बरे झाले. खऱ्या भक्तांना, धार्मिक व आध्यात्मिक लोकांना यात काहीही वावगेही वाटणार नाही अन दु:खही होणार नाही. समर्थांनी म्हटलेच आहे ना- असे गुरु पायलीचे पन्नास मिळतात. रामकृष्ण परमहंस देखील म्हणत- गुरु दिवसा पहावा, रात्री पहावा, नीट पारखून गुरु करावा. त्यामुळे जे झाले त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. तरीही...

अन हा तरीही महत्वाचा आहे अन त्यावर वारंवार बोलायलाही हवे. एका वाहिनीवर या विषयावरच्या चर्चेत दोन मुद्दे आले- १) अन्य धार्मिक लोक अशा लोकांचा आधीच विरोध का करीत नाहीत? २) बाबा कोण याचे निकष असावेत.

या दोन्ही गोष्टींचा समाचार घेतला गेला पाहिजे. मुळात आधीपासून विरोध कसा करायचा? का करायचा? दोषी सिद्ध होईपर्यंत जर गुन्हेगार हा गुन्हेगार नसतो तर त्याला विरोध कसा करणार? असा युक्तिवाद करणाऱ्या वृत्त वाहिनीने तरी अशा लोकांचा आधीच विरोध केला का? किंवा करतील का? आणखीन एक मुद्दा- समाजात कोणी कशा पद्धतीने काम करायचे हे कोण सांगणार? वृत्तवाहिन्या? वाईट गोष्टींवर प्रहार ही जशी एक गोष्ट, तशीच चांगल्या सकारात्मक गोष्टींची सवय लावणे, सकारात्मक जाणीवा तयार करणे ही दुसरी गोष्ट. असंख्य धार्मिक व्यक्ती, संस्था अशी सकारात्मक कार्ये करीत आहेतच. मात्र, नाही नाही... त्यांनीही आमच्यासारखेच आकांडतांडव केले पाहिजे, ही भूमिका निखालस चुकीची ठरेल. हा साधा पोच नसलेल्या वृत्तवाहिन्यांचीच खरे तर झाडाझडती घेतली जायला हवी. हा देश आता बाबा बुवा चालवणार का, असा कंठशोष करणाऱ्या वाहिन्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे- हा देश कोण चालवणार यावर जरूर चर्चा करू, पण हा देश वृत्तवाहिन्या चालवणार का? या प्रश्नाचे अगोदर उत्तर द्या.

दुसरा मुद्दा- बाबा कोण याचे निकष ठरवण्याचा. हा खूप मोठा विषय आहे. तूर्त एवढीच नोंद पुरेशी ठरेल की, असे निकष ठरवणे ही भारतीय परंपरा तर नाहीच शिवाय धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही ते चुकीचे ठरेल. भारतेतर विचार पद्धतीच्या परिणामी असे युक्तिवाद होतात. त्यावर विस्तृत मंथन गरजेचे आहे. ज्यांना धर्म आध्यात्म यांच्याशी काहीही देणेघेणे नसते असे लोकच यात आघाडीवर असतात. शिवाय यातून सत्ता विरुद्ध संत असा भारताला आजवर अपरिचित असा वर्गसंघर्ष लादला जाऊ शकतो. वास्तविक असे संघर्ष लादणे हाच अजेंडा घेऊन काम करणाऱ्या लोकांची ही कारस्थाने आहेत का, अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. समाजाच्या सगळ्या क्षेत्रात आज सुरु असलेला discourse बारकाईने अभ्यासला तर या संशयाला पुष्टी मिळते. रामरहीम सारख्या घटना घेऊन, बुद्धीचा फारसा वापर न करणाऱ्या समाजाच्या मोठ्या भागाला, चुकीच्या विचारांकडे घेऊन जाणे आणि या देशाचे, समाजाचे सशक्त आधार मोडून काढण्याचा प्रयत्न करणे हे या निमित्तांनी घडते; हे लक्षात घेतले पाहिजे. रामरहीमच्या निमित्ताने झालेला हिंसाचार highlight केला जातो आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पूज्य शंकरचार्यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्यावरही हा समाज त्याचा धैर्याने सामना करतो हे हेतूपुरस्सर विसरले जाते. अन एकूणच धर्म इत्यादींना ठोकून काढले जाते. सुविद्य लोकांनी विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ ऑगस्ट २०१७

कठोर व्हायला हवे

काल नागपुरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलाव दुथडी भरून वाहू लागला. तरुणाई आनंद साजरा करायला गेली. (कॉलेज या तलावाला लागूनच असल्याने ३७-३८ वर्षांपूर्वी आम्हीही जात असू.) त्याचे फोटो छापून आले. अन त्यासोबत छोटीशी बातमी होती. त्यात म्हटले होते की, तिथे सुरक्षेचा कोणताही बंदोबस्त नव्हता. वृत्तपत्राला बातम्या कराव्याच लागतात. पण सवाल हा की, कशाला हवी सुरक्षा व्यवस्था? त्याचे उत्तर आहे- दुर्घटना होऊ नये म्हणून. overflow पाहायला गेले असताना दुर्घटना का होईल? झालीच तर पोरांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच होईल. `बेजबाबदारपणे वागणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आम्ही वापरणारच.' अशा थाटात वागायचे अन त्या बेजबाबदारपणाच्या परिणामांची जबाबदारी समाजाची, सरकारची, प्रशासनाची असे म्हणायचे; हा तमाशा खूप झाला. अशा overflow, धबधबे, समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी अशी पोलीस यंत्रणा किंवा सुरक्षेची व्यवस्था वगैरे मुळीच असू नये. स्वत:च्या बेजबाबदार वागण्याने मेले १०-२० जण तर मेले. सरकार किंवा प्रशासन अशी रोखठोक भूमिका घेऊ शकत नाही. पण समाजाचे असे मानस तयार होणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांनीही असे मानस घडवण्यात भूमिका पार पाडावी. excuses मागण्याची हाडीमासी खिळलेली सवय मोडून काढलीच पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१७

कर आणि वर्गणी

एक खूप छान नाही, पण मार्मिक विडंबन काल परवा छोट्या पडद्यावर पाहिलं. विषय गणेशोत्सव. स्थानीय गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता एका काकांकडून वर्गणी आणि जाहिरात मिळून सहा हजार रुपये उकळतो. संबंधित काकूंना हे कळल्यानंतर त्या हुशार काकू त्या कार्यकर्त्याकडे जातात आणि घरच्या गणपतीसाठी म्हणून वर्गणी काढतात. सहा हजार रुपये परत मिळवतात. नंतर १५१ रुपये वर्गणी देतात आणि एक वाक्य बोलतात-

`अरे बाळा, लोक स्वखुशीने देतील ना तेवढी वर्गणी घ्यावी. त्या पैशात जेवढा आणि जसा जमेल तसा; जास्तीत जास्त चांगला आणि भक्तिभावाने गणेशोत्सव करावा. त्यालाच गणपती पावेल.'

आजच्या जमान्यात बहुतेक जण कानाआड करतील असे हे मार्मिक वाक्य. `उपदेश' या शब्दाने सारं काही मोडीत काढण्याची सध्याची रीत. मला उगीचच चाणक्य आठवून गेले. कर किती असावा यावर चाणक्याचं प्रसिद्ध उत्तर आहे- `मधमाशी फुलातून मध गोळा करते तेवढा. फुलाला जाणवणार सुद्धा नाही असा.' या कररुपी मधातूनच राज्य चालवायचं. विडंबनातल्या काकू आणि चाणक्य यांच्यात एक विलक्षण साम्य जाणवून गेलं. अन मनात आलं- सहा हजार रुपये उकळणाऱ्या कार्यकर्त्याला आपण बदमाश म्हणतो. ते बरोबरच आहे. कर, सेस आणि अन्य वसुली करणाऱ्या मंडळींना...

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१६

कुणाला सांगू?

दोन प्रेमी जीवांचे शाप आता पृथ्वीला सहन होणार नाहीत...

कोणी त्यांना दगड वगैरे मारणार नाही असे पाहा...

सखी एकदा म्हणाली होती, जेंव्हा...

अंगणातल्या झाडावर सकाळपासून भारद्वाज पक्ष्यांची जोडी आल्याचं

एक दिवस सांगितलं होतं...

आज तर गंमत झाली,

भारद्वाज पक्ष्यांच्या चक्क दोन जोड्या अंगणात उतरलेल्या...

आज हे कुणाला सांगू?

आज सखी काय म्हणाली असती?

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१६

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

स्त्रीवादाला काही प्रश्न

१) आई इंद्राणीने मुलगी शीलाच्या खुनाची सुपारी दिली. अन शीलाला संपवण्यात आलं. आई असे कसे करू शकते? इंद्राणीच्या मुलाचा सवाल.

जी बाई स्वत: जन्म दिलेल्या मुलीला वर्षानुवर्षे (तिच्या मृत्यूपर्यंत) आपली मुलगी म्हणत नाही. आपले `हाय स्टेटस' हे कारण त्यासाठी सांगते; ती महिला आई असू शकते का? अपत्याला जन्म देणे म्हणजे आई होणे का?

२) बायकोच्या मुलीचे नवऱ्याच्या मुलाशी प्रेमसंबंध; याला बहीण भावाचे प्रेमसंबंध म्हणता येईल का? वर्तमान समाजाने व्यवस्थेला विचारलेला हा प्रश्न आहे.

३) दिल्ली विद्यापीठातील एका मुलीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका मुलाविरुद्ध पोलीस तक्रार केली. पबमधल्या मुलींनी मध्यरात्री मद्यधुंद होऊन नोएडा मध्ये गोंधळ माजवला. आईने मुलीच्या खुनाची सुपारी दिली.

महिला चळवळी आणि महीला विषयांचा विचार करणारे पुरुषांचे अत्याचार, व्यवस्थेचा जाच, स्त्री समानता, स्त्री स्वातंत्र्य इत्यादींच्या पलीकडे जाणार का?

४) समाजात वाढणाऱ्या अन स्थैर्य, शांतता, सहअस्तित्व यांना धोका निर्माण करणाऱ्या `अर्थ प्रभावाच्या' गुन्हेगारीवर समाज, विचारवंत, कार्यकर्ते, लेखक, साहित्यिक, कलाकार विचार करणार का?

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०१५

शक्तीत्रिवेणी

एकल किंवा सामूहिक मानवी व्यवहाराच्या मुळाशी तीन शक्ती काम करतात. एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे. प्रेरक शक्ती, सहायक शक्ती आणि नियंत्रक शक्ती. याव्यतिरिक्त संहारक आणि अगम्य अशा दोन शक्तीही कार्य करत असतात. त्यातील संहारक शक्ती सरळसरळ गुन्हेगारी स्वरुपाची म्हणता येईल. अगम्य शक्ती वेडेपणा, संतत्व, योगी अशा गटात मोडेल. परंतु सामान्य मानवी व्यवहाराच्या मुळाशी मात्र प्रेरक शक्ती, सहायक शक्ती आणि नियंत्रक शक्ती; या तीन कार्य करीत असतात. माणूस साधारणपणे व्यवस्थांच्या माध्यमातून कार्य/ काम/ कृती करतो. त्या त्या व्यवस्थांचा कारभार या तिन्ही शक्तींचा कमीजास्त उपयोग करून होतो. तरीही प्रत्येक व्यवस्थेचं स्वत:चं असं स्वरूप असतं. जसे धार्मिक वा शैक्षणिक व्यवस्था या मुख्यत: प्रेरक शक्तीने काम करतात. कुटुंबव्यवस्था सहायक शक्तीने काम करते. राज्यव्यवस्था नियंत्रक शक्तीने काम करते. मात्र हे स्वरूप म्हणजे त्यातील प्रधान अंग होय. अन्य दोन शक्तीही कमी अधिक स्वरुपात कार्य करीत असतातच. प्रत्येक व्यवस्थेची प्रधान शक्ती सुद्धा एका मर्यादेतच असावी लागते. तिचे प्रमाण वाढले तर ती भरकटते. जसे कुटुंब व्यवस्थेत सहायक शक्ती फार जास्त झाली तर ती संतुलन गमावून बसते. किंवा राज्यव्यवस्था नियंत्रक शक्ती मर्यादेबाहेर वापरू लागली तर ती हुकूमशाही, एकाधिकारशाही याकडे वाटचाल करते. त्यामुळेच प्रधान वा गौण शक्तींचा वापर तारतम्याने, विवेकाने करावा लागतो. त्यांचे डोळे मिटून समर्थन करता येत नाही. जीवनाविषयीची योग्य धारणा, जीवनाविषयीचे साधकबाधक चिंतन; हे व्यक्तिगत स्तरावर आणि सामूहिक स्तरावर जेवढे अधिक राहील तेवढा विवेक आणि तारतम्य अधिक राहील आणि वाटचाल अधिक सुकर राहील.

आज मात्र हे संतुलन सगळ्याच व्यवस्थांचे बिघडले असल्याचा अनुभव सगळेच घेत आहेत. याची दोन कारणे आहेत. भारतीय समाज हजारो वर्षांचा परिपक्व समाज असला तरीही त्याचे विचार करणे आणि तिन्ही शक्तींचा वेळोवेळी आढावा घेणे दीर्घ काळापासून बंद झाल्यासारखे आहे. तो चांगली वा वाईट कृती ठोकळेबाजपणे करतो आहे. दुसरे कारण म्हणजे आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व्यवस्था अभारतीय आहेत. गुलामीत रूढ झालेल्या व्यवस्था चालत आहेत. भारतावर सत्ता गाजवणाऱ्या समाजांना नियंत्रक आणि सहायक या दोनच शक्ती ठाऊक होत्या आणि आहेत. त्यातही सहायक शक्ती बरीच अलीकडची. त्यांची मूळ वृत्ती नियंत्रक शक्तीने व्यवहार करण्याची. त्यामुळे आजच्या घडीला कुटुंबापासून तर राज्यव्यवस्थेपर्यंत नियंत्रक व सहायक शक्तींचाच प्रभाव आहे. त्यातही नियंत्रक शक्तींचा फार जास्त.

सगळीकडेच या तीन शक्तींचे संतुलन कसे निर्माण करता येईल, आज असलेली स्थिती कशी बदलता येईल; हा चिंतनाचा विषय होणे गरजेचे आहे. अर्थात हे आपोआप होणार नाही. मात्र कोणाला ना कोणाला ते काम करावेच लागेल. ते नाही झाले तर व्यवस्था स्वत:च स्वत:च्या नाशाला जन्म देतात. तो नाश दीर्घ आणि कमी गोंधळाचा राहतो किंवा अल्पावधीत अधिक गोंधळाचा असा बंडखोरीचा राहतो. नाश अटळ. एवढेच नाही तर त्यांची जागा घेणाऱ्या व्यवस्था सुद्धा त्याच दोषांनी बाधित राहतात. भारताची विशेषता ही राहिली आहे की, त्याने प्रेरक शक्तीचा खूप व्यापक आणि सखोल विचार केलेला आहे. अर्थात भूतकाळात. त्याची आजची उपयोगिता अत्यल्प आहे. भारताला पुन्हा त्या प्रेरक शक्तीचा खूप अधिक ध्यास घ्यावा लागेल. तिची निर्मिती, तिची जोपासना, ती रुजवणे हे सगळे करावे लागेल. हे करताना मोठी किंमत देखील मोजावी लागेल. वेगवेगळ्या प्रकाराने ही किंमत मोजावी लागेल. परंतु त्याला इलाज नाही. आज तरी या दृष्टीने सारे काही शांत शांत आहे. याची जाणीवही फारशी नाही. मोठ्या प्रमाणावर नियंत्रक आणि थोडेफार सहायक शक्तींचा वापर आणि त्यांचीच घटपटांची खटपट सुरु आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २७ ऑगस्ट २०१८

समाध्या, स्मारके इत्यादी

समाध्या, स्मारके, संग्रहालये या भारतीय भावविश्वाशी विपरीत गोष्टी आहेत. निरपवादपणे कोणतीही व्यक्ती भूत आणि भविष्यापासून वेगळी नसते. तिचा आविर्भाव भूतकाळाचा परिणाम असतो आणि त्याचा प्रवास मृत्यूशी संपत नाही. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करून पुढे जाणे ही भारतीय पद्धत आहे. त्यामुळे सगळ्या समाध्या, स्मारके, संग्रहालये मोडीत काढण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवा. अन यापुढे हे सारे होणार नाही असा विचार पसरायला हवा. याला कोणीही अपवाद नसावा. तत्त्व थोडे बाजूला ठेवले तरी एक गमतीचा पण गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे - असेच चालू राहिले तर, कोणाच्याही अनुयायांना राहायला देखील जागा उरणार नाही.

आजकाल राहुल गांधी सुद्धा भारतीयत्वाची चर्चा करतात. त्यांनी पुढाकार घेऊन तीन मूर्ती भवनापासून याबाबतीत पुढाकार घ्यावा.

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०१८

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

भावनातिरेक म्हणजे सत्य?????

होय, कालपासून देशाच्या काही भागात जे घडते आहे त्यावरील प्रतिक्रियांसाठी मी हा प्रश्न विचारतो आहे? मला भावनाशून्य ठरवले तरी हरकत नाही. पण हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. हरयाणात जे झाले ते वाईटच. त्याच्या समर्थनाचा प्रश्नच नाही. पण त्यावरच्या प्रतिक्रियांचे स्वरूप काय आहे? देश, धर्म, समाज यांच्यावर नुसते प्रहार करीत सुटणे. ठीक आहे. तसेच करायचे असेल तर ही यादी देश, धर्म, समाज एवढीच मर्यादित का? त्या यादीत माणूस का नाही? धर्म संपवून टाका किंवा देश बुडणार किंवा हाच का समाज; असा आक्रोश करताना, हे करणारी माणसे आहेत आणि हा माणसाचा पराभव असल्याने सगळ्या माणसांनी समुद्रात जीव देणे; हे एकच प्रायश्चित्त त्यासाठी असू शकते; असा आवाज का ऐकू येत नाही? कारण एकच की, आम्हाला आमची जबाबदारी नको असते. आम्ही याच समाजात, याच देशात राहतो. घर, गाडी, पैसा अडका, संसार, चंगळ, रोज रात्रीची सुखाची झोप याच समाजात घेतो. अन तरीही एखादी घटना घडली की लाजाबिजा विकून समाजाला वेठीस धरायला तयार !!! धर्माच्या नावाने तर केवढा शिमगा? केवढे उसासे? याच धर्माचे पालन नाना पाटेकर करीत होता. तेही ही घटना घडली त्याच दिवशी. अन तो शेतकऱ्यांसाठी काम करतो हेही ठाऊक असते. पण धर्माची ही अभिव्यक्ती आम्ही विसरून जातो. शेगावच्या गजानन महाराज संस्थानला आम्ही विसरून जातो. ज्या हरयाणा, पंजाबमध्ये हे घडले; त्या हरयाणा, पंजाबमध्ये शीख धर्माने समाजाची जी धारणा केली, जी घडण केली ती आम्ही विसरून जातो. ज्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले लपून बसला होता त्याच सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा मानवतेची आणि आध्यात्माची पूजा होते आहे, हे आम्ही विसरून जातो. रामाचा वेश घालून वावरणारा नट राम नसतो, याचं भान सोडून रामाला शिव्या घालणे आम्हाला भूषणावह का वाटते, याचीही चर्चा व्हायला हवी की नाही?

कारण एकच आहे- आम्हाला आमची जबाबदारी नको असते. मुळात जबाबदारी म्हणजे काय हे तरी आपल्याला किती समजते? तथाकथित संवेदनशील लोक लगेच विचारतील- आम्हाला काय जबाबदारी सांगताय? आम्ही जबाबदार आहोत का यासाठी? की तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची आमची जबाबदारी होती? अशांसाठीच म्हणतोय- आपल्याला जबाबदारी म्हणजे काय ते तरी समजते का? बावळटसारखे काहीतरी बोलायचे टाळणे, अशा घटना घडतात तेव्हा त्यांचे तात्कालिक संदर्भ आणि त्यातील जीवनाला स्पर्श करणारे घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणे, व्यक्ती आणि समाज यांची वैचारिक आणि भावनिक प्रगल्भता वाढेल असे लिखाण- भाषण- करणे, इत्यादी गोष्टीही `जबाबदारी' या सदरात मोडतात. पण आम्ही मात्र जबाबदार म्हणजे- हा, तो, ते, सत्ता, समाज, धर्म वगैरे वगैरे वगैरे करून मोकळे. कारण आम्हाला आमची जबाबदारी झटकायची असते. समाजाचा स्तर ही प्रत्येक individual व्यक्तीचीही जबाबदारी असते. आपण प्रत्येक जण त्यात कमीअधिक contribute करतो. अगदी आमची भीती आणि आनंद, ते व्यक्त करण्याची पद्धत इत्यादी सुद्धा यात contribute करतात; पण आम्हाला त्याकडे जायचेच नाही कारण; आपली जबाबदारी कोणावर तरी ढकलून देण्याच्या टोळी मानसिकतेतून आम्हीच बाहेर पडलेलो नाही. माझा थेट प्रश्न आहे- दोन वेळच्या जेवणाची, अन जीवन कसं जाईल याची भ्रांत नसणाऱ्या ४०-५० कोटी भारतीयांपैकी किती भारतीय खऱ्या अर्थाने विचारी आहेत? कोणाला अपमान वगैरे वाटत असेल त्यांना वाटो. कोणाला खुश वा नाखूष करणे यासाठी मी लिहित नाही. मुळात विचार म्हणजे काय याचा विचार यातील किती लोक करतात? धर्म म्हणजे काय, समाज म्हणजे काय, देश म्हणजे काय, सभ्यता कशी घडते, माणूस म्हणजे काय; इत्यादी गोष्टी नंतर. कारण मुळात विचार म्हणजे काय हेच ठाऊक नसेल, त्यातच शिरण्याची तयारी नसेल तर या गोष्टींवर कसली चर्चा करायची? या ४०-५० कोटीमधील ४ कोटी जरी विचारी होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील होतील, त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी ठेवतील तर आपोआपच सगळं चित्र बदलून जाईल. कारण त्यांच्या त्या प्रयत्नातूनच एकूण समाजाची मानसिकता, वैचारिकता, प्रगल्भता, स्तर घडत जाईल. असे होत नाही तोवर उथळपणाचा भावनिक खळखळाट सुरूच राहील. निरर्थकपणे.

आमच्या बाबाला दोषी ठरवल्याने तोडफोड करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असा समज असणारे; आणि आमच्या ओबी van जाळल्याने आम्ही आज कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही असे म्हणणारे; किंवा तिकडे ३० लोक हकनाक मेल्याने तुमचे विचारांवरील प्रवचन ऐकण्याची आमची इच्छा नाही असे म्हणणारे; यातील फरक काय? शारीरिक हिंसाचार, बौद्धिक हिंसाचार किंवा भावनिक हिंसाचार; यात फरक काय? वेळ आली तर बौद्धिक वा भावनिक हिंसाचार हा शारीरिक हिंसाचारात बदलणार नाही कशावरून? एकदा विचारांशी फारकत घेतली की तारतम्य राहत नाही. ते रामरहीमच्या भक्तांमध्ये राहिलेले नाही हे तर सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. पण आमच्यात ते शिल्लक आहे का? तसे नसते तर एक `तरुण तेजपाल' नावाचा माणूसही अशाच प्रकरणात जेलची हवा खातो आहे, अन तरीही पत्रकारिता, आधुनिकता, ऐहिकता, मानवता; इत्यादी कुचकामाचे असल्याचे गळे आम्ही काढत नाही आणि हे सगळे भस्मसात करावे असेही म्हणत नाही; याचा आम्हाला विसर पडला नसता आणि आमची पंगु वैचारिकता चव्हाट्यावर मांडण्याची आम्हाला घाई झाली नसती.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शनिवार, २६ ऑगस्ट २०१७

कोरोना व महालक्ष्मी

आज बातम्यांमध्ये पाहिलं की, कोणा तरी भक्ताने महालक्ष्मी मांडताना त्यांना मास्क बांधले आणि कोरोना विषयक फलक त्यांच्या हातात दिले. हे काही योग्य वाटले नाही. ज्यांनी हे केले त्यांची भावना नक्कीच चांगली असणार. किंबहुना अशी कृती खूप चांगल्या भावनेतूनच होते. पण याला भावनातिरेक म्हणावे लागेल. दैवतांचे पावित्र्य, त्या प्रतिमेचे गांभीर्य, वातावरण सांभाळले पाहिजे. ते मोडू नये. एखादा देखावा, दैवत प्रतिमेच्या बाजूला संदेश फलक इत्यादी करायला हरकत नाही. पण देवप्रतिमा जशी असते तशीच ठेवणे रास्त वाटते.

- श्रीपाद कोठे

२६ ऑगस्ट २०२०

मुखवटा भंगणे

महालक्ष्मी व्रत कसे करावे, काय करावे; याचा एक मेसेज आला. अनेकांना तो आला असेल. त्यात बऱ्याच गोष्टींची चर्चा केलेली आहे. त्यातला एक मुद्दा आहे - समजा ऐन वेळेवर मुखवटे भंगले तर काय करावे? त्यावर उपाय सांगितला आहे की, नवीन मुखवटे आणून महालक्ष्मी स्थापना करावी आणि अनिष्ट वगैरेचे विचार मनात आणू नये.

सहजच श्री रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रातील एक प्रसंग आठवला. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर येथे राणी रासमणीच्या काली मंदिरात ते पुजारी म्हणून काम करत होते. अन त्यांची साधना सुरू होती. एक दिवस परिसरातील राधाकृष्ण मंदिरातल्या कृष्णाच्या मूर्तीचा पाय भंगला.  सगळीकडे चर्चा सुरू झाली. स्वाभाविकच श्री रामकृष्णांचे मत घेण्यावर एकमत झाले. जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांनी विचारले - 'समजा राणीच्या जावयाचा पाय मोडला तर काय कराल?' अन पुढे समजावणीच्या भाषेत म्हणाले - 'पाय पुन्हा जोडून घ्याल ना. जावयाला टाकून तर देणार नाही ना?' झाले. उत्तर मिळाले. कृष्णमूर्तीचा पाय पुन्हा जोडून ती गाभाऱ्यात ठेवली गेली.

संत, महापुरुष, अवतार यांचे हेच वैशिष्ट्य असते. ते कोणत्याही सुधारणेच्या घोषणा देत नाहीत, अंधश्रद्धा निर्मूलनाचे फलक लावत नाहीत. ते फक्त जीवनाचं सत्य, जीवनाची व्यापकता, जीवनाची खोली आणि जीवनाची उत्तुंगता दाखवतात, समजावतात. बाकी साऱ्या गोष्टी आपोआप होत राहतात. दुसरीकडे - अतिशय चांगल्या भावनेने, मनापासून; पण जीवनाचे सत्य, व्यापकता, खोली, उत्तुंगता याकडे दुर्लक्ष करून आपण प्रयत्न करत राहतो. अन अपेक्षित फळ मात्र मिळत नाही.

समाज सुधारणा आणि मूलभूत सुधारणा यात हाच फरक आहे.

- श्रीपाद कोठे

२६ ऑगस्ट २०२०

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

आरक्षणाचे वास्तव

काही कठोर गोष्टी आपण कधी बोलणार, ऐकणार अन समजून घेणार?

आरक्षण ही भूषण मानावे अशी गोष्ट नाही.

आरक्षण हा अधिकार नाही.

आरक्षण हा पुरुषार्थ नाही.

आरक्षण मागण्यासाठी चढाओढ करण्याऐवजी, आरक्षण सोडण्याची चढाओढ लागणे गौरवाचे.

आरक्षण नसावे म्हणताना apologetic असण्याचे कारण नाही.

आरक्षण नसावे म्हणणे याचा अर्थ विशिष्ट समाजगटाला विरोध समजणे बालीशपणा आहे.

भूतकाळाची अवास्तव अन अनावश्यक ओझी वागवणे चुकीचे.

आज या विषयावर कोणीही राजकारण बाजूला ठेवून बोलायला तयार नाही. विरोध करणारे आकस, आम्ही-तुम्ही यातच अडकतात. निखळ विचार करून लिहिणारे, बोलणारे संपले का? मग असे पटेल उठतात अन गोंधळ माजवतात.

- श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०१५

असमाधानी

महात्मा गांधींच्या हत्येत रा. स्व. संघ सहभागी असल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांनी माफी मागितली होती. काल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तांत्रिक पद्धतीने पण एक प्रकारे माफीच मागितली. किमान गांधीजींच्या हत्येत संघ सहभागी नाही हे मान्य केले. तरीही कुत्र्याच्या शेपटासारखी वृत्ती असलेले लोक आहेतच. त्यातीलच एक म्हणजे गांधीजींचे पणतू तुषार गांधी. त्यांनी तर काल आयबीएन-७ (हिंदी) वर स्पष्ट आरोपच केला की गांधीजींच्या हत्येला संघ जबाबदार आहे. एकदा त्यांनाही न्यायालयात खेचावे कोणीतरी. किंवा सध्या सुरु असलेल्या खटल्यातच सहआरोपी करावे. वाटल्यास सुमार केतकर अन त्यांच्यासारख्या बाकीच्यांनाही विचारून घ्यावं- तुमचं समाधान झालंय का म्हणून. नाही तर त्यांनाही एकदाचं घोळात घेऊनच टाकावं.

- श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०१६

दुर्दैव

मराठी कौटुंबिक मालिका भांडणे, द्वेष, अनीती, अश्लिलता, असामाजिकता; वगैरे वगैरे दुर्गुणांमुळेच निरर्थक आहेत असं नाही; तर सद्गुण, चांगुलपणा, समजुतदारी यांच्या नावाने दाखवणाऱ्या मूर्खपणामुळेही निरर्थक आहेत. या मालिकांचे लेखक, निर्माते यांच्या अकलेवरच खरं तर प्रश्नचिन्ह लावायला हवं. अन तरीही या मालिका चालतात, लोकप्रिय होतात, त्यांच्या चर्चा होतात, अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते; हे सगळंच अनाकलनीय आहे. अन्य सगळ्याच सराईत, सफेदपोश गुन्ह्यांप्रमाणेच. अन समाजाची चिंता वगैरे करणाऱ्यांना भगव्या, लाल, निळ्या, हिरव्या, पांढऱ्या, तिरंग्या राजकारणाशिवाय दुसरं काहीही दिसत, जाणवत नाही. अन ते राजकारण सुद्धा राष्ट्राला क्षीण आणि दुर्बळ करणारं. याला दुर्दैव म्हणायचं की दैवदुर्विलास? जाणीव न होणे, संवेदना नसणे हे विकृतीचं लक्षण असतं ना?

- श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०२१

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

भ्रम

सेन्सेक्स, निफ्टी सहा-सहा टक्के कोसळले. उद्याच्या वृत्तपत्रांची मुख्य बातमी तयार झाली. कारणे- चीनने चलनाचं अवमूल्यन केलं, कच्च्या तेलाचे भाव आपटले. तेलाचे भाव वाढले तरी समस्या, तेलाचे भाव खाली आले तरी समस्या. चलन महाग झालं तरी समस्या, चलन स्वस्त झालं तरी समस्या. एखादी अर्थव्यवस्था पुढे धावली तरी समस्या, एखादी अर्थव्यवस्था ठप्प झाली (मागे पडली) तरी समस्या. अन समस्या फक्त त्या देशापुरती नाही तर सगळ्या जगासाठी. २००८ मध्ये अमेरिकेने जगाला वेठीला धरलं. आता कदाचित चीन. नंतर कदाचित आपणही.

तरीही सगळे आरडाओरड करत असतात- आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत.

शिवाय प्रचलित अर्थशास्त्रच जगाचं भलं करेल हा भ्रम सोडायलाही तयार नाहीत कोणी.

- श्रीपाद कोठे

२४ ऑगस्ट २०१५

विवेकानंदांच्या ग्रंथाची प्रस्तावना

स्वामी विवेकानंदांनी एक ग्रंथ लिहिण्याची तयारी केली होती. त्यासाठी ४२ मुद्देही त्यांनी काढले होते. ग्रंथाच्या प्रारंभीची एक छोटीशी प्रस्तावनाही त्यांनी लिहिली होती. त्या प्रस्तावनेत राजकारण आणि भारताचे जीवितकार्य याबद्दल आवेशपूर्ण शब्दात ते लिहितात- `हे पवित्र आर्यभूमी ! तुझे कधीच अध:पतन झाले नाही. राजदंडांचे तुकडे तुकडे झाले, ते इतस्तत: फेकले गेले, सत्तेचा कंदुक अनेकवार या हातातून त्या हातात असा फिरत स्थानांतर करीत राहिला. परंतु भारतात राजे व त्यांचे दरबार यांचा नेहमी फार थोड्या लोकांवर प्रभाव पडला. उच्चतम श्रेणीपासून तो सर्वात खालच्या श्रेणीपर्यंतचे बहुसंख्य लोक आपापले अनिवार्य मार्ग स्वतंत्रपणे चोखाळीत आले आहेत. राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह कधी मंदपणे व अर्ध्यामुर्ध्या जाणीवेनिशी, तर कधी प्रबलपणे व संपूर्ण जागृतीनिशी वाहत आला आहे. शेकडो शतकांच्या अखंड उज्ज्वल मालिकेपुढे मी विस्मयचकित आणि स्तंभित होऊन उभा आहे. या मालिकेचा एखादा दुवा अधूनमधून अंधुक दिसतो, तर त्याच्याच पुढचा दुवा दुप्पट तेजाने उजळलेला दिसतो; आणि या सगळ्यांमध्ये माझी मातृभूमी धीरगंभीरपणे पावले टाकीत, पशुमानवाला देवमानवात परिवर्तीत करण्याचे आपले गौरवशाली भवितव्य पूर्ण करण्यासाठी चाललेली मला दिसत आहे. पृथ्वीवरील वा स्वर्गातील कोणतीही शक्ती तिला या कार्यात रोधू शकत नाही.'

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

अर्णवची झुंड

आपण एखादी गोष्ट नीट वाचत सुद्धा नाही. अलीकडेच मी अर्णव गोस्वामी मला पत्रकार वाटत नाही, अशी पोस्ट टाकली. कोणाला तो सर्वोत्तम पत्रकार वाटू शकतो. मला हरकत नाही. पण मला वाटत नाही. यावर का वाटत नाही, असं कोणी विचारलं तर ते योग्यच ठरेल. पण माझ्या पोस्टबाबत तसं झालं नाही. (हा अनुभवही नवीन नाही.) अर्णव ने लावून धरलेल्या सुशांत प्रकरणात काय चूक आहे? अन त्यात काहीही चूक नसल्यामुळे तो पत्रकार वाटत नाही हे तुमचं (म्हणजे माझं) म्हणणं अयोग्य आणि पक्षपाती आहे; असा माझ्या पोस्टवर आक्षेप घेणाऱ्यांचा मुद्दा. वास्तविक मी सुशांत प्रकरणी काहीही म्हटलेलं नाही. अर्णवने ते लावून धरणे चूक आहे असंही म्हटलेलं नाही. परंतु आम्हाला जो पक्ष प्रिय आहे, त्या पक्षाला महत्वाचा वाटणारा विषय अर्णव लावून धरतो आहे, त्यामुळे अर्णवला काही बोलणे, म्हणजे आमच्या पक्षाला अन त्याच्या भूमिकेला विरोध. अन आम्हाला विरोध म्हणजे तुम्ही समाजद्रोही. म्हणजे तुमची देशभक्ती प्रश्नांकित.

आपली विचारांची ही पद्धती आणि स्थिती आहे. वरून माझं पत्रकारितेचं ज्ञान आणि आकलन तपासण्याची खुमखुमी आहे. अन अशांच्या भरवशावर भारत महान होणार आहे. लाखो वेळा सांगून झालं आहे की; पक्ष, नेते, राजकारण, सत्ता; यांना माझ्या विचार विश्वात काहीही स्थान नाही. त्यांचे उल्लेख वा संदर्भ केवळ माझ्या व्यापक विषयाकडे घेऊन जाण्यासाठी असतात. पण हे समजेल तर शपथ. अनेकांना हे समजतच नाही आणि पुष्कळांना हे पटत नाही. कृपया अशा लोकांना हात जोडून प्रार्थना, तुम्ही मला तुमच्यासारखं समजू नका.

आता अर्णव पत्रकार का वाटत नाही ते. एखादा विषय कोणी किती लावून धरायचा, त्यात किती सहभागी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु...

- ऐकणाऱ्याला काही कळणार नाही असा आरडाओरडा करणे म्हणजे पत्रकारिता असू शकत नाही.

- एकच बिट सांभाळणाऱ्या एकाच शहरातील दोन पत्रकारांकडे सुद्धा सारखी माहिती असेलच असे नसते. माहिती कशी येते इत्यादी बाबी पत्रकार जाणतात. ही वास्तविकता असतानाही; आपल्या जवळच्या माहितीवर चर्चेतल्या पाहुण्यांनी बोलावे किंवा उत्तर द्यावे; हा दुराग्रह म्हणजे पत्रकारिता असू शकत नाही.

- समोरच्याला उघडं पाडायचं म्हणजे केवळ त्याची बोलती बंद करायची हे नसतं. तर त्याला जे बोलायचं ते, अगदी nonsense सुद्धा बोलू देऊन उघडं पाडता येतं. अन लोकांना सगळं व्यवस्थित समजतं. हे लक्षात न घेता दोन दोन तास तमाशा करणं म्हणजे पत्रकारिता नसते.

- काही गोष्टी कोणाला politically correct वा incorrect राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मर्यादा असू शकतात वा ते दुसरं काही बोलू शकतात. मात्र आपणच बोलावलेल्या लोकांचा अतिशय वाईट पद्धतीने पाणउतारा करणं, म्हणजे पत्रकारिता नाही.

शिवाय ज्यांना तो फार वैचारिक वगैरे वाटतो, त्यांनी काही वर्षांपूर्वीची २२ ऑगस्टची माझी एक पोस्ट पाहावी. (ती पोस्ट द्या असे मलाच सांगू नये. मी नोकर नाही कोणाचा. खाज असेल तर स्वतः शोधावी. माझ्या सगळ्या पोस्ट public असतात.) ज्यावेळी तो times now ला होता त्यावेळी हिंदूंचे प्रतिनिधी कोण याबद्दल किंवा विश्व हिंदू परिषदेबद्दल वगैरे तो कसा बोलत असे ते कळेल.

अन मला शहाणपण शिकवणाऱ्यांनी हे कायम लक्षात ठेवावे की, स्वतःचे हिंदुत्व जोपासण्यासाठी मी फार मोठी किंमत चुकवलेली आहे. माझ्याजवळ सुद्धा उभं राहण्याएवढी किंमत कदाचित आक्षेप घेणाऱ्यांनी कधीही चुकवलेली नसेल.

- श्रीपाद कोठे

रविवार, २३ ऑगस्ट २०२०

धर्म म्हणजे काय?

चित आणि पट यांना धरून ठेवणारं अप्रमेय तत्त्व म्हणजे धर्म. त्या दोनच्या मध्ये काय असतं? नाही सांगता येत. पण काहीतरी असतं हे नक्की. ते कळतं, आकळतं. आकलन, समज, अनुभूती, अनुभव; हे शब्दसुद्धा समजावून सांगता येत नाहीत. मग ज्या गोष्टी आकलन, अनुभूती, समज यांच्या कक्षेतील आहेत; त्या शब्दबद्ध कशा करणार? समजावून कशा देणार किंवा घेणार? धर्म ही अशीच बाब आहे.

दोन श्वासांच्या मधल्या मोकळ्या वेळात `मी'ला धरून ठेवतो तो धर्म.

लौकिक आणि अलौकिक यांना धरून ठेवतो तो धर्म.

दिवस आणि रात्र यांना धरून ठेवतो तो धर्म.

समजणे आणि न समजणे यांना एकत्र ठेवतो तो धर्म.

चित आणि पट हे एकच आहेत आणि त्यांना धर्माने धरून ठेवले आहे हे आपल्याला कळतं कारण आपण त्या नाण्याचा भाग नसतो. त्या नाण्याच्या बाहेर असतो. त्यामुळे पूर्णांशाने त्याचं आकलन होऊ शकतं.

या संपूर्ण अस्तित्वाची धारणा करणारा धर्म जाणून घ्यायचा असेल तर या अस्तित्वाचं एक असणं समजायला हवं. अन ते समजायचं असेल तर या अस्तित्वाच्या बाहेर, अस्तित्वाच्या अतीत जायला हवं. या अस्तित्वापासून वेगळं व्हायला हवं. तोच साक्षात्कार, तीच समाधी अवस्था, तीच आत्मतत्त्वाची उपलब्धी, तेच धर्माचे आकलन.

धर्म ही बौद्धिक चर्चेची नव्हे सायासाची बाब आहे. भक्ती, उपासना इत्यादी त्यासाठीचे प्रयत्न.

धर्माचं हे आकलन होईपर्यंत चित किंवा पट यातील काहीतरी एकच कळू शकतं, समजू शकतं. त्याला धरूनच आपले व्यवहार चालतात. धर्माचं आकलन झालं की व्यवहाराचं स्वरूप बदलून जातं. या सनातन धर्मातूनच व्यक्तीधर्म, समाजधर्म, राजधर्म, युगधर्म, आपद्धर्म, स्थितीधर्म प्रसूत होतात.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१८

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

चंद्रावर पोहोचवणारी मासोळी

रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची एक पत्रपरिषद सुरु होती. अनेक विषयांवर पत्रकार प्रश्न विचारीत होते. गुरुजी त्यांची उत्तरे देत होते. अखेरीस पत्रकार थकले. घायकुतीला येऊन एका पत्रकाराने प्रश्न केला- आपण म्हणता ते सगळे ठीक आहे, पण हे होणार कधी? त्यावर गुरुजींनी मार्क ट्वेन या प्रसिद्ध इंग्लिश विनोदी लेखकाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले- एकदा सगळे साहित्यिक गच्चीवर जमले होते. बोलता बोलता एकाने विचारले, आकाशातील चंद्रावर पोहोचायला किती मासे लागतील? सगळे विचारात पडले. त्या साहित्यिकात मार्क ट्वेन पण होता. त्याने क्षणभर विचार केला आणि तो म्हणाला- एक मासा पुरेसा आहे; provided it is long enough. (फक्त तो पुरेसा मोठा असावा.) आणि हा किस्सा सांगून गुरुजी म्हणाले- तुम्हा सगळ्या लोकांनी मनावर घेतले तर संघाचे काम काय, एका दिवसात पूर्ण होईल.

अन हे अक्षरश: खरे आहे. संघाचे काम काय आहे? सगळ्यांना एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, या चिरंतन राष्ट्राचा घटक म्हणून जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वागण्याचे वळण लावण्याचा प्रयत्न करणे. कोणाला तरी सतत काही तरी उपदेश देत राहणे आणि आम्ही म्हणतो त्याप्रमाणे वागा असे सांगणे, त्यासाठी सगळं काही मुठीत ठेवणे हे संघाचं काम नाहीच. हे शिक्षणासारखं आहे. शिक्षकाने शिकवणं आणि विद्यार्थ्याने शिकणं दोन्ही आवश्यक अन हो पेपर सोडवणंही. १०० टक्के विद्यार्थी शिकले आणि त्यांनी नीट पेपर सोडवले तर शाळेचा निकाल १०० टक्के, नाही तर नाही. जबाबदारी प्रत्येकाची. माझी आणि समाजाचीही सगळी जबाबदारी माझी आहे, असं मनाच्या तळातून वाटतं का? आणि आभाळाच्या चंद्रापर्यंत पोहोचणारी मासोळी तयार होईपर्यंत धीर धरण्याची हिंमत आहे का? संघाचे पाच सरसंघचालक खपले तरीही संघाचा धीर आणि दम टिकून आहे. अधीर आणि कच्च्या दमाच्या खेळाडूंचे हे काम नोहे.

- श्रीपाद कोठे

२२ ऑगस्ट २०१४

आनंदाची ढेकर

कोणतीही गोष्ट पचली की, ढेकर येते. अन पचली नाही की उलटी होते. खाण्यापिण्याच्या पदार्थांचा हा नियम भावभावना, विचार, व्यवहार यांनाही लागू होतो. यश, स्तुती पचली की व्यक्ती उगाच ताठ होत नाही; नाही पचली की काय होते ते आपण रोजच पाहतो. कोणी एखादा शब्द म्हटला की राग येणे, गाल फुगणे, अबोला अशा गोष्टी झाल्या की समजावं बोलणं पचलेलं नाही. तेच विद्वत्ता, पैसा, रूप, दु:ख, आनंद अशा बहुतेक सगळ्या गोष्टींचं. हे फक्त स्वत:च्या संदर्भात होतं असंही नाही. दुसऱ्याला मिळालेलं यश, मोठेपण, सुख हे सुद्धा अनेकदा पचत नाही. मग कधी मुद्दाम दुर्लक्ष करणे, टिंगलटवाळी करणे, हिणकस शेरेबाजी किंवा छिद्रान्वेषीपणा अशा गोष्टी घडतात. असे प्रकार पाहताना कधी कधी वाटतं, टीकाटिप्पणीपेक्षा टिंगलटवाळी घातक असू शकते. अन्नाचे अपचन शरीराची निर्मळता घालवते, तर मनाचे अपचन मनाची निर्मळता घालवते.

हे सगळे सुचण्याचे कारण, ऑलिम्पिकमध्ये रजतपदक पटकावणाऱ्या पी.व्ही. सिंधूचा हैदराबादेत झालेला सत्कारसोहळा. मोठे यश मिळवून सिंधू आज हैदराबादला परतली. विमानतळावर तिचे आगमन, तिचा सत्कार, तिचे वाहनावर चढणे, वाहनावरील वावर, अभिवादनाच्या स्वीकाराची पद्धत, चेहऱ्यावरील हास्य, लोकांचा उत्साह, लोकांचे अभिवादन करणे, मिरवणूक, स्टेडियममधील कार्यक्रम, सादरीकरण, सादप्रतिसाद अशा सगळ्याच गोष्टी वारंवार सांगत होत्या; सिंधूला अन तिच्या चाहत्यांनाही तिचे ऑलिम्पिकमधील यश आणि त्याचा आनंद पचलेला आहे. कुठेही यशाच्या अन आनंदाच्या उलट्या नव्हत्या. होती ती तृप्तीची ढेकर.

आनंदाचा कुठेही उन्माद नव्हता. कानठळ्या बसवणारा आवाज, डोळे मिटून घ्यावेसे वाटावेत असे अंगविक्षेप, ही माणसे आहेत का असा प्रश्न पडावा असा चालण्या- बोलण्या- वागण्या- चा आविर्भाव, उर्मट उंडारणे, शाम्पेनच्या बाटल्या, चाहत्यांचे अंगाला खेटणे, महाप्रचंड सुरक्षा रक्षकांची गरज, सगळं जग टाचेखाली चिरडून टाकण्याचा अन टाकल्याचा आविर्भाव; असे काहीही नव्हते. होती फक्त आत्मविश्वासाच्या कोंदणात हसणारी एक निर्मळ शालीनता. या शालीनतेला साधेपणा, मर्यादा, भारतीयता टाकून देण्याची गरज वाटली नाही. ज्या सिंधू संस्कृतीवरून हिंदू नाव धारण करणाऱ्या समाजाने, सगळ्याच गोष्टी पचवण्याची ही शिकवण हजारो वर्षे रुजवली; तेच सिंधू नाव धारण करणाऱ्या एका विजयी, यशस्वी कन्येने आनंद आणि यश कसे पचवायचे असते हे दाखवले.

क्रिकेट, राजकारण, चित्रपट या क्षेत्रात साजरे होणारे आजचे आनंदोत्सव आणि यशोत्सव आपण प्रत्यही पाहतो. किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने होणारी ज्ञानाची, कलेची, प्रतिभेची अन प्रज्ञेची उधळण पाहतो. या सगळ्याच उलट्यांच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि यश पचवून सिंधूने आणि तिच्या चाहत्यांनी दिलेली तृप्तीची ढेकर दखल घेण्यासारखी ठरते हे निर्विवाद.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार २२ ऑगस्ट २०१६

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

आशावाद, निराशावाद

`यानंतर मी एका थोड्या नाजूक विषयाकडे वळतो. माझ्या म्हणण्याकडे तुम्ही थोडे नीट लक्ष द्या. त्यावरून घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. आपण जगाचे फारसे भले करू शकत नाही. जगाचे भले करणे हे फारच चांगले आहे. पण जगाचे विशेष भले आपण करू शकतो काय? गेली शेकडो वर्षे प्रयत्न करूनही आपण जगाचे काही विशेष भले केले आहे काय? जगाच्या एकूण सुखात आपण भर घातली आहे का? जगाला अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपण दररोज हजारो नवी नवी साधने निर्माण करीत आहोत व हे गेली शेकडो वर्षे चालू आहे. मी तुम्हाला असे विचारतो की, आजची जगातल्या सुखांची गोळाबेरीज एका शतकापूर्वीच्या गोळाबेरजेहून जास्त आहे काय? नाही. तसे असणे शक्य नाही. समुद्रात उसळणारी प्रत्येक लाट समुद्रात कुठे ना कुठे खळगा निर्माण झाल्याशिवाय उत्पन्न होत नाही. एखादे राष्ट्र श्रीमंत व शक्तिशाली झाले की दुसरे कोणते तरी राष्ट्र नाडले जाणे अपरिहार्य आहे. प्रत्येक यंत्राच्या आविष्काराबरोबर वीस माणसे गबर होतात, तर वीस हजार माणसे दारिद्र्यात लोटली जातात. स्पर्धेचा हा नियम विश्वव्यापी आहे. जगात दिसून पडणाऱ्या शक्तीची एकूण गोळाबेरीज नेहमी सारखीच असते. तिच्यात भर घालण्याचा प्रयत्न करणे हा मुर्खपणा आहे. दु:खाशिवाय सुख मिळू शकते असे म्हणणे तर्कसंगत नाही. सुखसाधनांची वाढ करीत असताना जगातील गरजांचीही वाढ तुम्ही करीत असता. वाढलेल्या गरजांमुळे कधी न शमणारी तृष्णाही वाढीस लागते. या गरजा कशाने पूर्ण होणार व ही तृष्णा कशाने शमणार? आणि जोपर्यंत ही तृष्णा कायम आहे तोपर्यंत दु:ख हे अटळ आहे. आलटूनपालटून सुखी व दु:खी होणे हे मुळी जीवनाचे स्वरूपच आहे. तसेच, भले करण्यासाठी म्हणून हे जग तुमच्याकडे सोपविण्यात आले आहे काय? जगात दुसरी कोणतीही शक्ती कार्य करीत नाही का? तुमच्या माझ्याकडे हे विश्व सोपवून ईश्वर काय मरून गेला आहे? जो ईश्वर शाश्वत, सर्वशक्तिमान, दयासागर व नित्य जागृत आहे आणि सर्व विश्व झोपी गेले असतानाही जो नेहमी जागा असतो, ज्याचे डोळे कधीही मिटत नाहीत, तो ईश्वर काय मरून गेला आहे? हे अनंत आकाश म्हणजे जणूकाही सतत उघडा असलेला त्याचा डोळाच आहे. तो ईश्वर काय नाहीसा होऊन गेला आहे? तो काय या जगात कार्य करीत नाही? जग हे चालूच आहे. तुम्ही त्यासाठी घाई करण्याचे कारण नाही. तुम्ही स्वत:ला वाईट वाटू देण्याची गरज नाही. आपण गेली हजारो वर्षे कुत्र्याचे वाकडे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जगातील दु:ख हे संधीवातासारखे आहे. पायातून हे दु:ख नाहीसे केले की ते डोक्यात जाऊन बसते. डोक्यातून ते घालवून दिले की ते शरीरात दुसरीकडे कुठे तरी जाऊन बसते.'

`हा विचार आपणापैकी बऱ्याच जणांना भयंकर निराशावादी वाटेल. पण तो तसा नाही. निराशावाद व आशावाद दोन्ही चूक आहेत. दोन्ही अतिरेकी विचार आहेत. हे जग चांगले नाही की वाईटही नाही. हे शुभाशुभातीत व स्वयंपूर्ण असे आहे. हे जग म्हणजे मोठी व्यायामशाळा असून तिच्यात तुम्ही, मी व इतर कोट्यवधी जीव येत असतात व तऱ्हेतऱ्हेचे व्यायाम करून सामर्थ्यवान व पूर्ण बनत असतात. हे विश्व यासाठीच आहे. आपण ज्या पातळीवर असतो त्याच पातळीनुसार जग आपल्याला दिसत असते. स्वैपाकघरातला अग्नी चांगला नाही किंवा वाईटही नाही. त्या अग्नीवर तुमचे अन्न शिजले की तुम्ही त्याची स्तुती करता व म्हणता, अग्नी किती चांगला आहे. त्यानेच तुमचे बोट भाजले की तुम्ही म्हणता, हा अग्नी किती त्रासदायक आहे. तसेच हे जग चांगले नाही की वाईट नाही असे म्हणणे तर्कसंगत व बरोबर आहे. जग हे जगच आहे आणि ते सर्वदा तसेच राहणार. आपल्यावरील प्रतिक्रिया अनुकूल घडली तर आपण जगाला चांगले म्हणतो, आपल्यावरील प्रतिक्रिया दु:खकारक घडली तर आपण जगाला वाईट म्हणतो. तुम्हाला आढळून येईल की निष्पाप, आनंदी व कुणालाही दु:ख न देणारी मुले नेहमी अत्यंत आशावादी असतात, तर जगात पुष्कळ टक्केटोणपे खाल्लेले लोक निराशावादी असतात. धर्माला सत्य जाणून घ्यायचे असते. धर्माने शोधून काढलेली पहिली गोष्ट ही आहे की, या सत्याच्या ज्ञानाशिवाय जीवन व्यर्थ होय.'

- स्वामी विवेकानंद

(रविवार ५ जानेवारी १८९६ रोजी धर्माच्या अपेक्षा यावर बोलताना)

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

भगवा

शिवाजी महाराजांचा, वारकऱ्यांचा, शीख पंथाचा, बौद्ध भिक्खुंच्या वस्त्राचा रंग मुळात भगवा नव्हताच हे कसे सिद्ध करता येईल यासाठी नाशिकला असलेल्या एका विद्यापीठातील इतिहास संशोधक खल करीत असून, लवकरच त्या दिशेने पावले टाकली जातील; असे खात्रीलायक वृत्त आहे. हा भगवा रंग संपूर्ण त्यागाची, अन मृत्यूवर सुद्धा प्रेम करण्याची शिकवण देतो. त्यामुळे तो जगातूनच हद्दपार व्हायला हवा, हा यामागील महान विचार असल्याचेही सांगितले जात आहे.

- श्रीपाद कोठे

१९ ऑगस्ट २०१५

महाराष्ट्र भूषण

आजच्या महाराष्ट्र भूषण सोहोळ्यात मला सगळ्यात महत्वाचं अन लक्षणीय काय वाटलं? २५ लाख रुपयांचं दान? नाही. बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संशोधन वगैरे? नाही. त्यांनी सांगितलेली `रौनकपूर'च्या मशिदीची माहिती? नाही. पंडिती लेखन आणि ललित लेखनाचे विवेचन? नाही. मुख्यमंत्र्यांचा खणखणीतपणा? नाही. हे सगळेच महत्वाचे होतेच. पण मला महत्वाचे अन लक्षणीय वाटले- पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी दाखवण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीतील एक प्रांजळ निवेदन. बाबासाहेबांना अर्पण करण्यात आलेले मानपत्र ध्वनीचित्रफितीच्या रुपात दाखवण्यात आले. त्यात तीन-चार निवेदने होती. एक होते प्रख्यात दलित साहित्यिक प्रा.डॉ. हरी नरके यांचे. त्यांनी सांगितले- `बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. मी शाळेत शिकत होतो. मी त्यांना माझ्या मनातील प्रश्न, शंका विचारल्या. त्यांनीही माझी माहिती विचारली. त्यांनी माझ्या शंकांचे निरसन तर केलेच, पण माझी परिस्थिती जाणून घेऊन मला वह्या पुस्तकांची मदत केली. त्यानंतर सुद्धा ते नियमितपणे मला वह्या पुस्तकांची मदत करीत असत.' `गोब्राम्हण प्रतिपालक' म्हणजे काय हे समजण्यासाठी असे प्रसंग उपयुक्त ठरतात. नुसते शब्द वाचून अर्थ कळतो, असे ज्यांना वाटते; ते `गोब्राम्हण प्रतिपालक' नको म्हणून आकाशपाताळ एक करतात. परमेश्वराच्या नमुन्यांबाबत किती बोलावे?

- श्रीपाद कोठे

१९ ऑगस्ट २०१५

मा. देवेंद्रजी आणि मा. नितीनजी,


सप्रेम नमस्कार...

आज मुद्दामच तुम्हाला जाहीरपणे पत्र लिहितो आहे. आजपासून माझा एक सत्याग्रह सुरु झाला आहे. त्या सत्याग्रहाची माहिती आपल्याला देणे, संबंधित विषयासाठी आपणाला आवाहन करणे आणि समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीपुढे हा विषय ठेवणे; असे तीन उद्देश आहेत.

गाडी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल आज माझी गाडी अडवण्यात आली आणि मी नियमानुसारचा ५०० रुपये दंडही भरला. इथूनच माझ्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. हा दंड काहीच दिवसांपूर्वी १०० रुपये होता अशी माझी माहिती आहे. मात्र लोकांना वठणीवर आणण्यासाठी हा दंड पाच पट करण्यात आलेला आहे असे कळते. आज ही घटना झाली तरीही मी हेल्मेट परिधान करणार नाही. माझी पावती फाडणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यालाही मी तसे नम्रपणे सांगितले. कारण ही सक्ती चुकीची आहे असे माझे ठाम मत आहे.

शासन, प्रशासन, कायदे या गोष्टी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आहेत. प्रश्न निर्माण होतो- गुन्हा वा गुन्हेगार कशाला वा कोणाला म्हणायचे? दुसऱ्या व्यक्तीला वा व्यक्तीसमूहाला त्रास होईल किंवा इजा होईल किंवा त्यांचे नुकसान होईल अशा व्यवहाराला गुन्हा अन तो गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार म्हटले पाहिजे. पण आता ती धारणा बदलू लागली आहे की काय? शासन, प्रशासन, कायदे म्हणतात म्हणून एखादी गोष्ट केलीच पाहिजे. त्यांच्या मर्जीने वागले नाही तर तो गुन्हा अशी काही नवीन व्याख्या करायची की काय? सरकार नावाच्या पोलादी चौकटीची मर्जी वा लहर सांभाळणे हे लोकांचे कर्तव्य म्हणायचे की काय? उत्तर कोरियाचा हुकुमशाह आणि कायद्यांची कठोर अंमलबजावणी यातील तात्विक फरक काय? अशा प्रकारच्या अंमलबजावणीला soft terrorism नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणायचे?

हेल्मेट सक्तीच्या संदर्भात खूप सारे तर्क अन युक्तिवाद आजवर झालेले आहेत. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करीत नाही. अगदी ग्राहक संघटना, डॉक्टर्स आदींनीही हेल्मेट सक्तीला विरोध केलेला आहे. परंतु आम्ही कोणाचेही काहीही ऐकणार नाही, अशीच भूमिका राहणार असेल तर कठीण होईल. ही सक्ती सरकार करीत नसून सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत, असा युक्तिवाद आपणाला करता येईल. पण नकोसे, जुने, अन अन्याय्य कायदे रद्द करण्याचा विडा उचललेल्या माननीय पंतप्रधानांच्या अनुयायांना हे शोभून दिसेल का? सरकार म्हणते- सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणणार- आम्ही कायद्यानुसार चालणार. कायदे तयार करणे वा मोडीत काढणे तर सरकारच्या हाती आहे. सरकार संबंधित कायद्यातील ही अन्याय्य तरतूद रद्द का करीत नाही? मग लोक बोलतात की, सरकार अन हेल्मेट कंपन्यांचे साटेलोटे आहे. मी तसे म्हणत नाही. आणखीनही एक तर्क ऐकू येतो- सरकार याद्वारे मोठा महसूल गोळा करते. हा महसूल लोकांसाठीच उपयोगात येतो. लोकांवरच अन्याय्य कायदा लादून लोकांच्या भल्यासाठी महसूल गोळा करणे योग्य आहे का? जुन्या सरकारांनी तिजोऱ्या रिकाम्या केल्या. त्यामुळे असा महसूल गोळा करावा लागतो असेही आपले समर्थक म्हणतात. पेट्रोलच्या दरांबाबतसुद्धा हा तर्क ऐकायला मिळतो. पण हे तर्क नसून तर्कदुष्टता आहे.

रस्त्यावरील अपघात, त्याची कारणे, त्यावरील उपाय, त्यात जाणारे बळी याला अनेक पैलू आहेत. रस्त्यांची अवस्था, सोयीसुविधा, वाहनांची गर्दी, बेसुमार शहरीकरण, लोकांची मानसिकता, लोकांच्या सवयी, विचारशून्यता, समजूतदारीचा अभाव अशा अनेक गोष्टी. यातील एक छोटासा (तोही पूर्णतः सत्य नसलेला) घटक आहे हेल्मेट. पण तोच एक मुद्दा उचलायचा अन लोकांना दहशतीत ठेवायचे ही संवेदनहीनता आहे. खरे तर चारचाकी वाहनांच्या अपघातांची अन बळींची संख्या मोठी आहे. त्यांच्या बाबतीत हेल्मेट निरर्थक आहे. कोणाच्या भल्याची काळजी, चिंता योग्यच आहे. मात्र त्याचीही एक मर्यादा असते, असायला हवी. प्रत्येकच जण स्वत:च्या जीवाची काळजी घेतो. अन्य गोष्टीत कितीही बेफिकीर असला तरीही तो जीवाची काळजी घेतोच. समस्या दुसऱ्यांच्या जीवाची काळजी न करणाऱ्या मुठभर लोकांची आहे. त्यांचा बंदोबस्त करायला कायदे अन सरकार सक्षम आहे. त्यासाठी हेल्मेट सक्ती अन हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड; हे कशासाठी? लोक आपले वा सरकारचे वा कायद्याचेही गुलाम नाहीत. हे थोडे कठोर वाटले तरीही सांगितले पाहिजे. आपण दोघेही अतिशय संवेदनशील आहात, विचारी आहात हे मला माहीत आहे. मा. नितीनजींनी जीवघेणा अपघात स्वत: अनुभवला आहे आणि त्यामुळे त्यांना या विषयाची खूप आस्था आहे हेही खरे. पण याचा अर्थ हेल्मेटसक्ती समर्थनीय ठरते असे नाही. आपण हे समजून घ्याल आणि ही सक्ती रद्द कराल, अशी अपेक्षा आहे.

कायदे ही काही अंतिम रेषा नसते. तसेच सरकार, कायदे, न्यायालये हे सगळेच सगळ्यांच्या भल्याचा विचार करीत असले तरीही; काय भले वा बुरे; काय चांगले वा वाईट हे ठरवण्याचा मक्ता काही त्यांना मिळालेला नसतो. म्हणूनच प्रत्येक वेळी सारासार विचार करावा लागतो. मोठ्या प्रमाणावर लोकांना जर एखाद्या गोष्टीचा त्रास होतो, तर ती गोष्ट बदलण्याचाच विचार झाला पाहिजे. खरे तर चांगली वा वाईट गोष्ट, योग्य वा अयोग्य गोष्ट, ज्ञान वा शहाणपणा, समजूतदारी वा विचारीपणा हा व्यवस्थेवर वा संख्येवर अवलंबून नसतोच. अगदी १२५ कोटीतील हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोक म्हणत असतील तरीही एखादा मुद्दा योग्य ठरू शकतो. बहुमत किंवा सगळ्यांनी मिळून केलेला विचार सुद्धा चुकीचा असू शकतो. एका धोब्याच्या शंकेला सुद्धा महत्व देणे हा राजधर्म आहे. गांधींच्या अन दीनदयाळजींच्या या देशात अन त्यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्यासारख्यांच्या हाती सूत्रे असताना बहुसंख्या, अल्पसंख्या, कायदे, न्यायालये इत्यादी कारणे बालिश वाटतात. कोणी म्हणू शकतात की, हे फारच तात्विक आहे. व्यवहार पहावा लागतो; वगैरे. पण व्यवहार पहावा लागतो याचा अर्थ तत्व वा विचार खुंटीला टांगून ठेवणे नसते ना? त्याने तर विचारशून्य व्यवहार सुरु होईल आणि ते अनर्थकारी आहे. सध्या तेच सुरु आहे. यासाठी आपण जबाबदार नाही हे अगदी खरे. पण जबाबदार कोण आहे यापेक्षा यातून मार्ग काढणे महत्वाचे नाही का? चालत आलेले तसेच पुढे चालवायचे की सगळ्या बाबींचा मुळातून विचार करायचा? भाजपा सत्तारूढ झाल्यानंतर हीच वास्तविक अपेक्षा आहे. चालत आलो आहोत म्हणून चुकीच्याच मार्गाने चालत राहणे अपेक्षित नाही.

या सगळ्याच तात्विक, व्यावहारिक बाबींचा आपण विचार कराल आणि अन्याय्य हेल्मेट सक्ती रद्द कराल अशी आशा करतो. माझा सत्याग्रह तर सुरूच राहील. हजार रुपये मी बाजूला काढून ठेवले आहेतच. आणखीन दोन वेळा पकडल्या गेलो तर असावेत म्हणून. त्यानंतर कदाचित माझा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करतील. त्यानंतर गाडी जप्त करतील. त्यानंतर कदाचित जेल. मी सत्याग्रह करणार असल्याने मी सगळे असेच होऊ देईन. पण बहुसंख्य लोकांना गैर वाटणारी गोष्ट (जी मलाही गैर वाटते) न पाळल्याबद्दल, काहीही गुन्हा न करता एखाद्या सामान्य व्यक्तीने त्रास सोसणे राज्यकर्ते म्हणून आपल्याला शोभेल का? जनतेला ही तरतूद मनापासून नको आहे. त्यामुळे आम्ही ती रद्द करीत आहोत असे आपण न्यायालयाला का सांगत नाही? का सांगू शकत नाही? न्यायालयांनीही अशा प्रकारे प्रश्न आणि मुद्दे प्रतिष्ठेचे करू नयेत. जरा बोचरं लिहिलं असेल. पण आवश्यक वाटलं म्हणून लिहिलं. कोणाचीही अप्रतिष्ठा करण्याचा हेतू नाही.

कळावे. धन्यवाद. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला

श्रीपाद कोठे

नागपूर

१९ ऑगस्ट २०१६

ताकद

काल मोक्षधामवर वं. उषाकाकूंचा अंत्यसंस्कार सुरु होता. सहज लक्ष गेलं छात्रावासातील मुलींकडे. सुदूर ईशान्य भारतातून इथे आलेल्या या मुलींचे आपल्या आजीला निरोप देतानाचे चेहरे आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून, गेल्या वर्षीच्या एका वादळाची आठवण झाली. समितीतर्फे या मुलींना भारताच्या विविध भागात आणून त्यांची तस्करी केली जाते, अशा आशयाचा एक घाणेरडा, दळभद्री अहवाल एका पत्रकार महिलेने तयार केला होता त्याची. अन काल या मुलींच्या डोळ्यातील पाणी पाहून मनात आलं- अरे असा एकच अहवाल काय, असे लाखो कारस्थानी अहवाल पाल्यापाचोळ्यासारखे उडवून लावायचं सामर्थ्य या एकेका अश्रूत आहे. कारण ते सच्चे आहेत, सत्वयुक्त आहेत. शुद्ध सात्विक प्रेमाचं हे सत्व जोवर आहे तोवर कोणाची काय बिशाद?? `क्रिया सिद्धी: सत्वे, भवती महतां नोपकरणे'

- श्रीपाद कोठे

१९ ऑगस्ट २०१७

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

विचारांचा प्रतिवाद

`महाराष्ट्र भूषण' गाजतंय. एक फार चांगलं झालं, चेहरे आणि वृत्ती उघड झाल्या. भाषा, भावना, भूमिका यातील काहीही ज्यांच्याकडे नाही त्यांनी नीचपणा करावा यात नवल काहीच नाही. दुर्दैवाने आजवर हेच राज्याचं, देशाचं, समाजाचं, शेतकऱ्यांचं वगैरे भलं करीत होते. यानिमित्ताने त्यांचा फार आदर करणारे, त्यांना गुरु मानणारे, त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेणारे यांनीही आपल्या भूमिका थोड्या तपासून आणि दुरुस्त करून घ्याव्या.

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा म्हणजे काय असतं, हे स्पष्ट होण्यासाठी फक्त एक उदाहरण. ४-५ वर्षांपूर्वी श्री. शेषराव मोरे यांनी एक ग्रंथ लिहिला. तब्बल ७५० पानांचा. शीर्षक होते- `कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' त्यावर खूप वादळ उठले, चर्चा झाल्या. म्हणून राजहंस प्रकाशनाने आक्षेप घेणाऱ्या १२ जणांचे प्रदीर्घ लेख आणि मूळ पुस्तकातील भूमिका अन आक्षेपांवर मत व्यक्त करणारे, लेखक शेषराव मोरे यांचे दोन लेख, असा ३६० पानांचा भरगच्च दुसरा ग्रंथ काढला. त्या विषयाची बरीच चिरफाड झाली.

आज श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी गेल्या ६० वर्षात असा काही उद्योग का केला नाही? त्यासाठी क्षमता आणि लायकी लागते, एवढेच. विद्वत चर्चेला सामाजिक विद्वेषाचे रूप द्यायला चार आण्याचीही अक्कल लागत नाही, फक्त मनाची काठोकाठ भरलेली दुष्टता अन क्षुद्रता लागते.

- श्रीपाद कोठे

१८ ऑगस्ट २०१५

पुत्रकर्तव्य

दोन दिवस सुरू असलेल्या राजधर्म चर्चा ऐकताना महात्म्याने सांगितलेल्या पुत्रकर्तव्याची आठवण येत होती.

महात्मा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांच्या विरोधात वातावरण पेटले होते. पोलीस त्यांना लपवून सुरक्षित घेऊन जात असताना लोकांना कळले आणि लोकांनी त्यांच्यावर अंडे टमाट्यांनी लाठ्यांनी हल्ला केला. अर्थात पोलिसी मदतीने फार काही झाले नाही.

महात्म्याच्या मुलाला वेगळ्या मार्गाने नेण्यात आले होते. पिता पुत्राची भेट झाल्यावर मुलाने विचारले होते - मी तुमच्यासोबत असतो तर माझे कर्तव्य काय राहिले असते? क्षणाचाही वेळ न लावता महात्मा म्हणाले - पुत्राने पुत्रकर्तव्य करायला हवे.

वडिलांना त्रास देणाऱ्या लोकांशी मुलाने कसे वागायचे असते? जगात सगळ्यांना ते ठाऊक आहे.

अटल बापा तुझ्याशी वाईट वागलेल्यांची तर यादीही अजून व्हायची आहे.

- श्रीपाद कोठे

१८ ऑगस्ट २०१८

नेताजींच्या घरी

लाला लजपतराय सारिणी असं अधिकृत नाव असलेल्या, पण एल्गिन रोड याच नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्यावरील `नेताजी भवन’ला भेट देणे हा एक अनुभव आहे. अर्थात असा अनुभव घेण्याची गरज वाटणारे थोडे आहेत हे दिलेल्या भेटीच्या वेळी अनुभवास आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या या पैतृक घरी जाण्यासाठी नजीकचे मेट्रो स्थानक आहे त्याचे नावही `नेताजी भवन’ असेच. नव्हे नेताजींच्या घरामुळेच ते नाव मिळाले. अर्थात मेट्रो स्थानकावर उतरल्यावर १०-१२ मिनिटे चालावं लागतं. अतिशय गजबजलेल्या एल्गिन रस्त्यावर `नेताजी भवन’ मात्र शांतपणे अविचल उभे आहे. लाल हिरव्या रंगातील या तीन मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पदपथावर नेताजींचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला एका खोलीत साहित्य विक्री आणि त्यासोबतच घर पाहण्यासाठीच्या तिकीट विक्रीची व्यवस्था आहे. तिकीट घेऊन पुढे जाताच नजरेस पडते ती नेताजींची ऐतिहासिक मोटार. जर्मन बनावटीच्या Wanderer W24 या BLA 7169 क्रमांकाच्या मोटारने नेताजींनी आपल्या निवासाचा अखेरचा निरोप घेतला होता. १९३७ पासून ही मोटार त्यांच्याजवळ होती आणि १९४१ साली भारतातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा सुभाषबाबू निघाले तेव्हा त्यांचा पुतण्या शिशिर बोस याने याच मोटारीतून त्यांना कोलकात्यावरून तेव्हाच्या बिहारमधल्या आणि आताच्या झारखंडमधल्या गोमोह पर्यंत पोहोचवले होते. तेथून रेल्वेगाडीने सुभाषबाबू पुढे गेले होते. ही गाडी आता आहे तेथे पूर्वी नव्हती. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ती येथे समारंभपूर्वक एका काचेच्या घरात ठेवण्यात आली आहे.

मोटार पाहून चार पावले पुढे गेल्यावर उजव्या हाताला वर जाण्यासाठी जिना आहे. पूर्वीच्या घरांचे छप्पर उंच राहत असे. त्यामुळेच जिने पण उंच राहत असत. नेताजी भवनातील जिनेही असेच उंच. साधारण २०-२२ पायऱ्यांचे. जिना चढून वर गेल्यावर प्रथम आपण पोहोचतो नेताजींच्या शयन कक्षात. १९४६ साली गांधीजींनी या घराला भेट दिली तेव्हा ते या शयनकक्षात आले होते. त्याचे छायाचित्र येथे आहे. या दालनात दारातून आत पाऊल टाकताच डाव्या हाताला मां कालीची तसबीर असून त्याखाली तंत्रोक्त कालिका श्लोक लिहिलेला आहे. नेताजींचे मूळ कुठे होते ते येथे स्पष्ट होते. या साधारण १५ बाय १५ फुटाच्या खोलीत त्यांचे वडील जानकीनाथ यांचा मोठा पलंग, नेताजींचा लहान पलंग, धोतर, छत्री, खडावा, घड्याळ, आरसा, खुर्ची, बूट असे सगळे सामान आहे. १६-१७ जानेवारी १९४१ च्या रात्री याच खोलीतून ते बाहेर पडले होते. ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग पावलांनी दाखवला आहे. शेजारीच त्यांचे भाऊ सरत बोस यांची खोली आहे. या खोलीत त्यांची आई प्रभावती यांचे छायाचित्र पाहायला मिळते. या खोलीत एक महत्वाची तसबीर पाहायला मिळते. सरत बोस हे THE NATION या वृत्तपत्राचे संपादक होते. २० फेब्रुवारी १९५० रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी तासभर आधी म्हणजे रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्यांनी आपल्या वृत्तपत्रासाठी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगला देशातील स्थितीचा आढावा घेऊन सूचना केली होती की, पूर्व बंगालचे वेगळे राज्य करण्यात यावे. त्यावेळची पूर्व बंगालची एकूण स्थिती आणि भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालमधील विचारप्रवाह, दोन्हीमधील भावनिक बंध हे त्या अग्रलेखातून स्पष्ट होतात. त्यांची सूचना नंतर २१ वर्षांनी, १९७१ साली प्रत्यक्षात आली.

ही दालने पाहून जिन्याने वरच्या मजल्यावर जाताना जिन्याच्या बाजूला एक दालन आहे. ते आहे सुभाषबाबूंचे कार्यालय. याच दालनातून त्यांनी कॉंग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून काम केले. आजच्या एखाद्या आमदाराचे कार्यालय सुद्धा त्यांच्या कार्यालयापेक्षा मोठे आणि भपकेदार ठरेल. तो काळ आणि आताचा काळ यातील अंतर हे दालन पाहताना ठळकपणे मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी दालन लहान व साधे, पण कर्तृत्व अफाट. अन आज दालने मोठी, भपकेबाज; अन कर्तृत्व खुरटे, खुजे. एक टेबल, चार खुर्च्या, एक सोफासेट, टेबलवर तिरंगा झेंडा, कपाटे... संपले.

जिन्याने वर आल्यावर डाव्या हाताच्या मोठ्या आणि उजव्या हाताच्या लहान दालनात संग्रहालय आहे. डाव्या हाताच्या मोठ्या दालनात प्रवेश केल्यावर पहिलीच तसबीर आहे स्वामी विवेकानंद यांची. त्याखाली लिहिले आहे- AN INSPIRATION. या दालनात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. नेताजींच्या वस्तू, त्यांनी परिधान केलेला आझाद हिंद सेनेचा गणवेश, त्यांचे हस्ताक्षर, त्यांची कौटुंबिक छायाचित्रे, त्यांची देश विदेशातील छायाचित्रे, कोलकाता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोलकाता महापालिकेचे महापौर, कॉंग्रेसचे नेते, कॉंग्रेसचे अध्यक्ष, विविध देशी विदेशी असामींसह छायाचित्रे इथे पाहायला मिळतात. सतत त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित सुरु राहते. हिटलर सोबतचे त्यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. क्रूरकर्मा हिटलरला भगवान बुद्धाची मूर्ती भेट देणारे नेताजी आगळेवेगळे ठरतात. शांतिनिकेतनात आंब्याच्या झाडाखाली रवींद्रनाथांसह झोपाळ्यावर बसलेले नेताजी एक वेगळे दर्शन देतात, तर कोलकात्यातील महाजाती सदनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांच्यासह बसलेले रवींद्रनाथ टोपी घातलेले पाहायला मिळतात. कोलकाता काँग्रेसच्या वेळी घोड्यावर बसलेले आणि एमिलीसोबतचे नेताजीही इथे आहेत. १६ जानेवारी १९४१ रोजी रात्री त्यांनी या घरात अखेरचे जेवण घेतले. ते ज्या मार्बलच्या ताटवाटीत जेवले ती ताटवाटी आणि त्यावेळी त्यांनी परिधान केलेले रेशमी धोतर इथे पाहायला मिळते. नेताजींचे रसिकत्वही या दालनात अनुभवता येते. त्यांचे notebook of favourite songs 1924-1927 या दालनात फिरताना लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाही. या संग्रहात त्यांनी स्वहस्ताक्षरात रवींद्रनाथांची `आमार शोनार बांगला’ ही कविता लिहिलेली आहे. जपानमधील NIPPON TIMES चे अंक, त्यांनी विदेशी रेडीओवरून केलेली संबोधने इत्यादीही पाहायला मिळते. या दालनातील एक तसबीर मात्र सुभाषबाबूंच्या ज्ञात प्रतिमेपेक्षा एकदम वेगळी आहे. ती आहे, सुभाषबाबू आपल्या वडिलांचे श्राद्ध करतानाची. १९३७ सालच्या या छायाचित्रात कौटुंबिक आणि धार्मिक, पारंपरिक सुभाषचंद्रांचे हृद्य दर्शन होते.

सुभाषबाबूंचे घर पाहून, अनुभवून खाली उतरलो. पुस्तकविक्रीच्या दालनात गेलो. आल्यासारखी दोन पुस्तके घेतली. एक, सुगत बोस यांचं – the nation as mother and other visions of nationhood आणि दुसरं, कृष्णा बोसचं – a true love story : emilie and subhash. विक्रेता बोलका होता. त्याला म्हटलं- पुस्तके महाग वाटतात. तो म्हणाला- हो. महाग आहेत. पण आम्हाला कोणतीही सरकारी मदत नाही. शिवाय समाजाचे हवे तसे आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे नाईलाज आहे. त्याने थंड पाणी पाजले. तिथून जायचे होते, `अरविंद भवन’ला. तेथून ते जवळ आहे. त्याला सहज विचारले `अरविंद भवन’ला कसे जाता येईल? त्याने प्रतिप्रश्न केला- ऋषी अरविंद? त्याच्या त्या प्रश्नाने सामान्य बंगाली माणसाच्या मनातही श्री अरविंद यांच्याबद्दल काय भावना आहेत ते स्पष्ट झाले. तेही सुभाषबाबूंच्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात. सर्वसाधारण समाजात असणारे समज अशा छोट्या छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या घटनातून निर्मूल होतात. मी म्हटले- हो, ऋषी अरविंद. त्याने पत्ता अन रस्ता सांगितला अन म्हणाला- पण तुम्ही ओला किंवा उबेर करूनच जा. ते सोयीचे. १० मिनिटे प्रयत्न केला पण दोन्ही कंपन्यांना भर वाहत्या लाला लजपतराय सारिणीवर उभ्या असलेल्या माझे लोकेशन काही सापडले नाही.

असो म्हणत रस्त्यावरील taxi ला विचारले. तो तयार झाला. आमची स्वारी शेक्सपिअर सारिणीवरील `श्री अरविंद भवन’कडे निघाली. 

- श्रीपाद कोठे

नागपूर

बाबांच्या आठवणी

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी बाबांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. आज त्यांच्या नातीने, म्हणजे माझ्या लहान बहिणीच्या मुलीने त्यांच्याबद्दल लिहिले आहे. पण या दोन्हीमध्ये न आलेल्या दोन आठवणी आपणा सगळ्यांसोबत वाटून घेत आहे.

बाबांचे दिवस वगैरे आटोपून मी नागपूरला परतलो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी शेजारचे पांडे काका भेटायला आले. पांडे काका हे आमचे शेजारी जसे होते तसेच बँकेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते बाबांच्या सोबत होते. त्यांनी सांगितलेल्या या दोन आठवणी. एक बँकेतील आणि एक खाजगी वैयक्तिक आयुष्यातील.

आणीबाणीचा काळ होता. काही महिने झाले होते आणीबाणी लागून. एक दिवस महालच्या टिळक पुतळा चौकातील बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात, काका आणि बाबा दोघेही जिन्यावरून उतरत होते आणि खालून महाव्यवस्थापक मराठे आणि बँकेचे अध्यक्ष सांगलीचे राजारामबापू पाटील हे वर चढत होते.

काका आणि बाबा सरकून बाजूला उभे राहिले आणि महाव्यवस्थापक आणि अध्यक्ष यांना त्यांनी रस्ता मोकळा करून दिला. महाव्यवस्थापक या दोघांच्या जवळ आल्यानंतर मुद्दाम बाबांकडे वळून म्हणाले, 'काय आता जिरली की नाही तुमची?' त्यांचा अर्थ स्पष्ट होता की, आणीबाणी लागल्याने आता तुमचे संघवाले थंड झाले की नाही? त्यांना अद्दल घडली की नाही? महाव्यवस्थापकांचा प्रश्न आटोपला आणि दुसर्‍याच क्षणी बाबांनी त्यांना उत्तर दिलं - 'जिरली वगैरे काही नाही. आतापर्यंत तुम्ही फक्त घर गृहस्थीवाले, ज्यांच्यावर कर्ज आहे असे लोकच पकडले आहेत. आमच्या एकाही प्रचारकाला तुम्ही हातही लावू शकलेले नाही.'

महाव्यवस्थापक आणि अध्यक्ष चेहरा वळवून पुढे निघून गेले. ज्यावेळी मी मी म्हणणाऱ्यांची बोलती बंद झाली होती त्यावेळी असे बाणेदार उत्तर कोण सहन करू शकणार?

दुसरी आठवण कौटुंबिक स्वरूपाची आहे. एक दिवस दुपारची गोष्ट. काका बँकेत गेले होते आणि बाबा काही कारणाने सुट्टीवर होते. दुपारी चहा वगैरे झाल्यानंतर सहज अंगणात फेऱ्या मारत असताना त्यांनी पाहिले की, शेजारच्या पांडे काकांकडे कोणीतरी आलेलं आहे. जवळ जाऊन पाहिलं तर; विदर्भातील एक जिल्हा संघचालक आणि नागपूरच्या संघ कार्यालयातील काही मंडळी तिथे आलेली होती. का आणि कशासाठी आले हे कळलं आणि बाबांची धावपळ सुरू झाली. त्यांनी लगेच घरची सतरंजी नेऊन टाकली. त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली. जे काही चहा, साखर, दूध, कपबशा वगैरे लागत असतील; ते घरून घेऊन गेले. पांडे काकांकडे त्यावेळी त्यांचे आई-वडील होते. ते आजी-आजोबा हे जुने खेड्यातले होते. त्यांना फार शहराची सवय नव्हती आणि सोबत कोणी नव्हतं. हाताशी कोणी नव्हतं आणि चार पाहुणे घरात आलेले. त्यामुळे बाबांनी धावपळ करून हे सगळं सामान त्यांच्याजवळ नेऊन दिलं आणि आजीने चहा वगैरे केला. सगळ्यांनी चहा घेतला. गप्पा झाल्या. विषय होता त्या जिल्हा संघचालकांच्या मुलीचं स्थळ काकांसाठी आलं होतं. सगळं बोलणं झालं. लग्न ठरलं आणि काका संध्याकाळी बँकेतून आल्यानंतर त्यांना कळलं की असं असं झालेलं आहे आणि आपलं लग्न ठरलेलं आहे. दोन्ही आठवणी सांगताना काका भावूक झाले होते.

आपल्याच माणसांच्याही पुष्कळ गोष्टी आपल्याला माहीत नसतात हेच खरं.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १८ ऑगस्ट २०२०

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

अभिव्यक्तीची कथा

सकाळी सकाळी गावात गाडी शिरली. त्यातून काही पोलीस, काही सामाजिक कार्यकर्ते उतरले. अचानक त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका व्यक्तीकडे गेले. त्यांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याला हुसकवायचा प्रयत्नही करून पाहिला. तो माणूस मात्र जागचा हलला नाही. एकाने हिय्या करून त्याच्याशी समजावणीची बोलणी सुरु केली- तू करतो आहे ते बरोबर नाही, इत्यादी. तो मात्र दाद देत नव्हता. अखेरीस पोलिसांना पोलिसगिरी करण्याची हुक्की आलीच. ते सांगू लागले, आम्ही तुझ्यावर केस करू वगैरे. तो माणूस कशाचा ऐकायला? अखेरीस आलेले लोक कंटाळले. त्याला म्हणाले- काय करायचं बाबा तुझं? तो म्हणाला- मी इथून उठणार नाही. तुम्हाला हवं असेल तर या माझ्याजवळ अन उठवा मला. आता त्याच्या तशा अवस्थेत कोण त्याच्या जवळ जाणार अन कोण त्याला बखोट धरून उठवणार... अखेरीस आलेले लोक कंटाळून निघून गेले. सगळं आटोपून तो माणूस घरी परतला. सगळी गंमत दुरून पाहणारं एक टोळकं रस्त्यात उभं होतंच. त्यांनी त्याला टोकलं- काय भाऊ तुम्ही तर पार वाट लावली त्या हागणदारीमुक्तवाल्यांची. कसं काय जमलं बुवा तुमाला?

आदल्या दिवशी रात्री टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेतून प्रेरणा घेतलेला तो माणूस उत्तरात एकच शब्द बोलला- `अभिव्यक्ती स्वातंत्र्य.'

- श्रीपाद कोठे

१७ ऑगस्ट २०१६

तिरंगा... भगवा...

सत्ता आल्यानंतर रा.स्व. संघाला तिरंग्याचं प्रेम आलं. तोवर त्याला तिरंग्याशी अन देशाशी देणंघेणं नव्हतं.

- परम आदरणीय राहुल गांधी आज कुठेतरी बोलले असं टीव्हीने दाखवलं.

यावर काय म्हणायचं, नाही म्हणायचं संघ ठरवेल. पण मला मात्र राहुल गांधींना एक म्हणायचं आहे-

१) `देर आए दुरुस्त आए' अशी एक हिंदी म्हण आहे ती शिकून घ्या.

२) संघाला सत्तेनंतर तरी देशाचं प्रेम आलं. तुम्हाला (म्हणजे राहुल ला आणि कॉंग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, अन त्याच माळेतले सगळे) मात्र भगवा ध्वज, शिवाजी महाराज, शीख पंथ, एवढेच काय गेल्या पाचदहा हजार वर्षातील भारत, भारतीयता, आध्यात्म, धर्म या सगळ्याचा द्वेष, द्वेष आणि द्वेषच वाटत आला आहे आणि अजूनही वाटतो. अन त्याचं कारण साधं सरळ आहे. तुम्ही कधीही भगवा फडकवलेला नाही. भगव्याला वंदन केलेले नाही.

- श्रीपाद कोठे

१७ ऑगस्ट २०१७

भीष्म पितामह

माझ्या काही पोस्ट वाचून एकाचा फोन आला. म्हणाला- तुम्ही राजकारणाला, सत्तेला एवढा विरोध का करता? भीष्म पितामहांनी देखील म्हटलंच आहे ना- `राजा कालस्य कारणम'. मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. कारण त्याला माझी भूमिका समजून घेण्यापेक्षा वाद घालण्यात रस होता. पण त्याला उत्तर दिले नाही तरी त्याच्या युक्तिवादावर माझी भूमिका नाही असे नाही. काय आहे माझे म्हणणे-

भीष्म पितामहांनी `राजा कालस्य कारणम' म्हटले हे खरे आहे. परंतु त्यात बदल होणारच नाही किंवा त्यात बदल करूच नये किंवा तेच योग्य आहे; असे तर नाही ना म्हटले. उलट श्रीकृष्णांपासून तर असंख्य संत, महंत, विचारक, त्यागी, बैरागी, कार्यकर्ते, चिंतक यांनी सत्तानिरपेक्ष समाज उभा करण्याचे प्रयत्न केलेत. दुर्दैवाने त्याला योग्य प्रतिसाद देण्याला आम्ही समाज म्हणून कमी पडलो. मानवाच्या मुलभूत दुर्बलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणे आम्हाला व्यक्ती आणि समाज या दोन्ही नात्यांनी नको वाटते. आमच्या या वाटण्यात बदल करणे योग्य वा आवश्यक आहे की नाही, याचा विचार सगळ्यांनी करावा.

- श्रीपाद कोठे

१७ ऑगस्ट २०१७

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

पाण्याचे तलाव

बदाबदा पाऊस पडतो अन सगळीकडे पाणी साचतं. कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी नागपूर. फोटो, व्हिडीओ, चर्चा, आरोप प्रत्यारोप, गोंधळ गदारोळ, आरोप प्रत्यारोप यांची धांदल. सरकार, प्रशासन यावर प्रश्नचिन्ह. पण रस्ते व घरांच्या मधल्या मोकळ्या जागेत केलेले कॉंक्रिटीकरण, टाइल्सीकरण, गाड्या झुपकन आत नेता याव्या यासाठी फाटकांबाहेर तयार केलेले डोंगर, झाकून टाकलेले फुटपाथ इत्यादी काढून टाकण्याची, तोडून टाकण्याची, मोकळे करण्याची इच्छा/ तयारी/ हिम्मत/ आहे का? माणसाची, समाजाची, प्रशासनाची अन सरकारचीही? मुळात अवाढव्य शहरांचा मूर्खपणा टाकून देण्याची तयारी किती आहे?

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०१५

लाज वाटते मला...

लाज वाटते मला. खरंच लाज वाटते. कोणाची? कशाची? तुमची-माझी, या समाजाची !!! नाही, गोरखपूरच्या दवाखान्यात ६३ बालके मरण पावल्याची नाही वाटत लाज. त्याचं दु:ख होतं. वाईट वाटतं. अन- लाल, निळ्या, हिरव्या, दुरंगी, तिरंगी, भगव्या राजकारणाचीही लाज नाही वाटत. राजकारणच ते. ते तसेच असायचे. तुमच्या माझ्या वाटण्याने त्यात कालत्रयी बदल होऊ शकत नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडंच राहणार. त्यात लाज काय वाटायची? म्हणूनच लाज वाटते त्यांची- जे अक्कल बाजारात विकून कुत्र्याचं शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करतात किंवा तशी इच्छा धरतात त्यांची. कुत्र्याला अक्कल नाही दिली त्या विश्व निर्मात्याने किंवा अक्कल दिली असेल तरीही नाईलाज आहे बिचाऱ्याचा. पण ते शेपूट सरळ करण्याचा उपद्व्याप करणाऱ्या `माणूस' नावाच्या दोन पायांच्या प्राण्यांची लाज वाटते मला. कोणीही कधीही मरू नये. वाटतं आपल्याला. तरीही मृत्यू आपण टाळू शकत नाही. अन दुर्दैवी, अकाली, अपघाती मृत्यूही असतातच. ते टाळता येऊ शकतात. हो. नक्की टाळता येऊ शकतात. १०० टक्के नाही टाळता आले तरीही मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. पण जेव्हा ते पुढ्यात येतात तेव्हा त्यांचा संबंध काय सत्तेशी असतो? राजकारणाशी असतो? अगदी मूर्खातला मूर्ख राजकारणी देखील अशी घटना नक्कीच होऊ देणार नाही. कारण यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे राजकारणाशी संबंधच जोडायचा असेल तर अशा घटनांसाठी सत्ता भोगणाऱ्यापेक्षा सत्तावंचितच जबाबदार असू शकतो. कारण हा असो की तो; राजकारणी व्यक्तीला, पक्षाला सत्तेवर पोहोचायचे असते. त्यासाठी आपली प्रतिमा उजळ आणि दुसऱ्याची मलीन करायची असते. पण राजकारण घाला चुलीत. मुळात अशा घटनांचा या वा त्या राजकारणी, पक्ष वा सत्तेशी संबंध असतो का? आम्हाला हा प्रश्नच पडत नाही. किंवा पडूनही आम्हाला तो टाळायचा असतो अथवा दुसरीकडे वळवायचा असतो. सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण तर सत्ता. आमच्या रक्तातून वाहणारा हा विकृत विचार आम्ही कधी काढून टाकणार? ६३ बालकांचा हकनाक जीव जातो तेव्हा त्यांच्याकडे लक्ष ठेवणाऱ्या ड्युटीवरच्या नर्सपासून तर एक पूर्ण साखळी जबाबदार असते. ती साखळी तुमची माझी असते. बेजबाबदार, बेमुर्वत, लाचार, भित्र्या, आळशी, उथळ, स्वार्थी, राक्षसी, पाशवी, विचारशून्य, संवेदनाहीन अशा तुमची माझी असते ती साखळी. हजारो वर्षे झाली. लक्षावधी सत्ता आल्या आणि गेल्या. ही साखळी अशीच आहे. कालपर्यंत ठीक होते. माहितीचे युग नव्हते. क्षणातील communication नव्हते. आज सगळे तुमच्या माझ्या दारी उभे आहे. पण तुम्हाला मला समजून घ्यायचेच नाही. तुम्हाला मला पोटातील पाणी हलू द्यायचे नाही. आपले gadgets अन आपली नाचगाणी क्षणभर बाजूला ठेवायची नाही. `हवा येऊ द्या' चुकवायचे नाही. `कपिल शो' हुकवायचे नाही. किलोभर मांस वाढू द्यायचे नाही अन एक रुपया balance कमी होऊ द्यायचा नाही. याच्या त्याच्या नावे दात विचकणे बंद करायचे नाही. तरीही संवेदना जाग्या असल्याचे नाटक मात्र करायचे आहेच. कसे करणार? द्या शिव्या. वाहा लाखोळी. कोणाला? सत्तेला. त्याच्याएवढं निरुपद्रवी काहीच नसतं. सत्ता कोणाचीही असो- काळी, पिवळी, लाल, निळी, भगवी, दुरंगी, तिरंगी. जन्माला येताना सत्तेला विचारून येत नाही, पण नंतर मरेपर्यंत साऱ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण? सत्ता. दोन शिव्या हासडा की आम्ही मोकळे पुन्हा उंडारायला. सत्ता किंवा सत्तेविना; मी `मी' राहीन; आम्ही `आम्ही' राहू; हे समजायची, म्हणण्याची अन त्यासाठी सोसण्याची धमक नसलेल्या तुमच्या माझ्या बुझदिल षंढ स्त्री पुरुषांच्या समाज नावाच्या झुंडीची लाज वाटते मला. एकीकडे जात- धर्म- पंथ- पैसा- लिंग- भाषा- भूषा- देश- यांचे भेद गाडून टाकण्याची भाषा करीत करीत राजकीय पक्षांच्या नावाने मनात असंख्य भेद जपणाऱ्या ढोंगी, खोटारड्या समाजाची लाज वाटते मला.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १४ ऑगस्ट २०१७

एक चांगला अनुभव

थोड्या वेळापूर्वी eastern religions and western thoughts हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं पुस्तक शोधत होतो. त्या शोधात गुगलने पहिलाच पर्याय दाखवला तो bjp e-library चा. तिथे हे संपूर्ण पुस्तक उपलब्ध आहे आणि ते डाऊनलोड पण करता आले. एकूणच राजकारण, राजकीय पक्ष, राजकीय व्यवस्था यांच्याबाबत मी जरा अंतर राखूनच असतो. शिवाय आपपर भावही नसतो. पण आजच्या अनुभवाने छान वाटलं. त्याने मी भाजप समर्थक वगैरे होणार नाही. पण भारतीय जनता पार्टीने अशी e-library जोपासणे हा समाधानाचा विषय आहे. त्याचा उपयोग करणारे वाढोत. बऱ्याच गोष्टी तिथे दिसल्या. वेळ काढून एखादे वेळी शोधमोहीम राबवावी लागेल.

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०१८

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

शायराला श्रद्धांजली

दोन दिवसांपूर्वी राहत इंदोरी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर शोकसंवेदना आणि टीका दोन्ही पाहायला मिळते आहे. ते मोठे शायर होते म्हणून शोकसंवेदना तर ते हिंदुविरोधी होते यासाठी टीका होते आहे. हा देश कोणाच्या .... नाही, सगळ्यांचा आहे. सगळ्यांनी यासाठी रक्त सांडलेले आहे, अशा आशयाचा त्यांचा शेरही प्रसिद्ध आहे. मुळात अभिनिवेश आणि एकांगीपणा आला की काय होतं, त्याचं हे उदाहरण म्हणता येईल. हा देश सगळ्यांचा आहे म्हणताना कोणावर अकारण टीका करण्याचे कारण नाही. तशी टीका असेल तर ते चूकच म्हटले पाहिजे. त्याला उत्तर म्हणून मग ज्यांच्यावर टीका होते ते बाह्या सरसावून उभे होतात. देशावर सगळ्यांचा अधिकार इत्यादी भाषा वापरली की, तो विचार व्यापक समजला जातो. प्रत्युत्तरात, टीका करणाऱ्याचे बेगडीपण दाखवून देश आपला असल्याचे दावे होऊ लागतात. जगभरात आतापर्यंत काय वेगळे झाले आहे आणि काय वेगळे आजही सुरू आहे. ही या वा त्या बाजूची मजबुरी असू शकते. सत्ताधारी, राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते यांची मजबुरी असू शकते. क्रियेची प्रतिक्रिया समजून घेता येऊ शकते. पण शहाणपणाचे काय? माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारवंतांची, दार्शनिकांची, द्रष्ट्यांची काय मजबुरी असू शकेल? जगभरातले संघर्ष 'जमीन कोणाची' यावरूनच झाले आहेत. होत आहेत. ही पृथ्वी, ही जमीन, ही भूमी कोणा एकाची तर नाहीच; पण सगळ्यांची सुद्धा नाही. कोणी वा कोणाच्या आद्य पुरुषानी वा आद्य स्त्रीने जमीन निर्माण केलेली नाही. म्हणूनच ती ईश्वराची आहे. ज्यांना ईश्वर मान्य नाही त्यांनीही हे समजून घेतले पाहिजे. आपली बुद्धी केवळ वादविवादात वाया घालवण्यापेक्षा आशय समजून घेण्याची थोडी तसदी घेतली पाहिजे. ही जमीन जर कोणाची नाही तर डाकुगिरी करून ती ताब्यात ठेवणे राक्षसी आहे. ही जमीन ईश्वराची आहे अन आम्हा सगळ्यांसाठी मातृरुप आहे. हा विचार नवीन नाही. 'ईशावास्यम इदं सर्वम' किंवा 'माता भूमी:' हा या देशाने सगळ्या जगासाठी दिलेला पुरातन विचार आहे. हा विचार आणि त्यातील भाव जगभर रुजवू न शकल्याने आजची समस्या आहे. आजच्या समस्या सोडवण्यासाठी हाच विचार रुजवण्याची (केवळ सांगण्याची नव्हे) गरज आहे. त्या ऐवजी राक्षसी विचार अंगिकारून तू तू मी मी करण्यात हशील नाही. योग्य विचारांची रुजवणूक करण्याचा मार्ग सध्याच्या गोंधळातून काढणे हे आव्हान असले तरीही तो काढावा लागेल. हे आव्हान पेलण्याऐवजी योग्य विचारच नाकारण्याची, बासनात गुंडाळून ठेवण्याची, मिटवून टाकण्याची वृत्ती घातकीच असेल. विचारवंत, दार्शनिक, द्रष्टे आज जिवंत आहेत का; हा प्रश्नही यानिमित्ताने चर्चिला जाणे अपरिहार्य ठरते.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२०

ज्ञानेश्वर आणि लोकशाही

बरं झालं ज्ञानेश्वरांच्या काळात ही लोकशाही व्यवस्था नव्हती; नाही तर त्यांनाही लोकांनी विचारलं असत - तुम्ही कोणत्या पक्षाचे? आमच्या की त्यांच्या? काहींनी धमकी सुद्धा दिली असती कदाचित आम्ही म्हणतो ते आणि तसेच बोला. अनेकांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असता, हे सुल्तान वगैरे कसे वाईट आहेत. अन वर विश्वात्मक वगैरे लिहिण्या/ बोलण्यासाठी, आळंदीपासून तिंबकटु पर्यंतच्या माणसांसाठी लिहिण्याबद्दल, सगळ्यांवर प्रेम करण्याबद्दल; त्यांना जाबही विचारला असता.

बरं झालं वेद काळी आजची लोकशाही नव्हती. नाही तर सर्वेपि सुखीन: संतू लिहिणाऱ्याला जगूही दिलं नसतं लोकांनी.

कोण कुठले दीड शहाणे आले इथे शे दोनशे वर्षांपूर्वी अन सांगून गेले की, राजकारणाला पर्याय नाही. तुम्ही राजकारण करत नाही म्हणजे मूर्ख आहात. अन आम्ही इतके महान की, सगळं गुंडाळून एक राजकारण करणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानू लागलो. नो राजकारण म्हणणाऱ्यांसाठी कठीण काळ आहे.

- श्रीपाद कोठे

१३ ऑगस्ट २०२०

वृत्तवाहिन्या

बहुतेक २००६ साल असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात होतो. पत्रकारिता अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू होते. फावल्या वेळात गप्पाही होत. वृत्तवाहिन्या ही त्यावेळी नवीन गोष्ट होती. बहुतेक सगळ्याचं मत होतं की, आपल्या वृत्तवाहिन्या या अमेरिकन वृत्तवाहिन्यांची copy आहेत किंवा copy करतात. इत्यादी.  मात्र पुढेही हेच सुरू राहील का यावर दोन मते होती. एक मत होतं, असंच सुरू राहील. यावर आतापासून अंकुश हवा.  दुसरं मत होतं, हे कमी होत जाईल. आजच्या वृत्तवाहिन्या पाहताना, विशेषतः त्यावरचे debate नावाचे तमाशे पाहताना, पहिलं मत बरोबर ठरल्याचं वाटतं. समाज आणि माणसाचं मानस नासवण्यात या वृत्तवाहिन्यांचा मोठा वाटा आहे.

- श्रीपाद कोठे

१३ ऑगस्ट २०२०

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

सुरेल अनुभव

काही दिवसांपूर्वी `गणेशोत्सवाबाबत हितगुज' लिहिले. त्यात धांगडधिंगा संगीतापेक्षा भारतीय शास्त्रीय संगीत गणेशोत्सवात वाजवावे, असे आवाहन केले होते. त्यावर काही जणांनी शंका उपस्थित केली होती. ही अपेक्षा थोडी जास्त होत असल्याचेही काही जणांचे मत होते. पण काल अचानक एक सुखद अनुभव पदरी पडला. झाले असे की, भाजीपाला आणण्यासाठी मी नेहमीप्रमाणे नागपूरच्या सक्करदरा बाजारात गेलो. बाजाराच्या शेजारी तेली समाज संघटनेने एक सभागृह बांधले आहे. त्याचे होते उद्घाटन. त्याला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वगैरे सगळा लवाजमा होता. मी बाजारात पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होते. पाचेक मिनिटात ते आटोपले अन पाहुणे परत गेले. माझे भाजी घेणे सुरूच होते. सभागृहातील सगळे काही ऐकू येतच होते. अन सभागृहातून चक्क सनई ऐकू येऊ लागली. साधारणपणे कोणत्याही समाजाच्या अशा एखाद्या कार्यक्रमात हौशी लोक मोठ्याने गाणीबिणी वाजवतात. पण त्या कार्यक्रमात पाहुणे गेल्यानंतर गोंधळा ऐवजी सनईचे सूर ऐकायला मिळाले. माझा लेख वगैरे त्यांनी वाचला असण्याची शक्यता नाही. अन जे वाचतील त्यातीलही किती प्रतिसाद देतील हाही प्रश्नच आहे. पण समाजात माझ्यासारखा विचार करणारेही आहेत हे जाणवून बरे वाटले.

- श्रीपाद कोठे

१० ऑगस्ट २०१५

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

समाजवादी

१) ज्यांना काहीही करायचं नसतं, ते समाजवादी असतात.

२) ज्यांना काहीही करायचं नसतं, ते समाजवादी होतात.

३) जेव्हा दोष दिसत नाहीत, तेव्हा चांगल्या गोष्टीत दोष उत्पन्न करतात; ते समाजवादी असतात.

४) विरोधी लोकांचा समन्वय सहन न होऊन, त्यांच्यात संघर्षच असायला हवा, असा ज्यांचा हेका असतो; ते समाजवादी असतात.

५) समस्या सुटण्यासाठी वा सोडवण्यासाठी नसतातच; आपल्याला भांडाभांडीचा खेळ खेळता यावा यासाठी असतात, अशी श्रद्धा असणारे समाजवादी असतात.

- श्रीपाद कोठे

९ ऑगस्ट २०१५

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

बेलपाने

ॐ नम: शिवाय.

वर्तमान जनरीतीनुसार श्रावण सोमवारनिमित्त प्रबोधनात्मक संदेश प्राप्त झाला-

शंकराला १०८ बिल्वपत्रे वाहून पर्यावरणाचे नुकसान करू नये. झाडे ओरबाडू नये. वगैरे.

असा संदेश पाठवण्यापेक्षा एक बेलाचे झाड लावले तरी ते किमान पाचपन्नास लोकांना श्रावण सोमवारी बेलपत्र पुरवेल आणि बाकीचे ११ महिने शुद्ध हवा, प्राणवायू, सावली इत्यादी आहेच.

आपापला दृष्टीकोन असे कोणी म्हणेल. पण झाड लावून पाने वाहणे हा नक्कीच सकारात्मक अन चांगला दृष्टीकोन आहे.

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०१६

पेढे

पेढे छानशा सुबक, सुंदर डब्यात आहेत; की साध्या कागदात बांधलेले... मला फारसा फरक नाही पडत. माझं लक्ष असतं पेढ्यावर. ते छान हवेत. चविष्ट, ताजे (अन भरपूर असले तर उत्तमच) इत्यादी. ते कोणत्या दुकानातले आहेत हे किंवा इतर तपशील गौण वाटतात मला. आवरण आणि तपशील छान असावं, आकर्षक असावं, नेमकं अन नेटकं असावं याला माझा विरोध मुळीच नाही. पण त्यासाठी अति आग्रह अन पेढ्यांकडे थोडं दुर्लक्ष, हे काही पटत नाही. घरचे प्रसंग, घटना, मित्र, संस्था किंवा अन्यत्र सुद्धा असंच. एवढं कशाला लेखनात, भाषणात वगैरेही गाभा महत्वाचा, आशय महत्वाचा वाटतो. तपशील दुय्यम असा त्याचा अर्थ नाही, पण तपशील उन्नीस-बीस झाला तरी आभाळ कोसळत नाही ही भूमिका. एकूण विवेचनातून काय सांगायचे आहे त्याला प्राधान्य, त्याला महत्व. तपशील बदलला तरीही आशय बदलण्याचे काम पडणार नाही इतकं तलस्पर्शी असावं. बाकी तपशील वा आवरण महत्वाचे असले तरीही दुसऱ्या स्थानावर.

कोणास ठावूक हे चांगले आहे की नाही ते...

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०१६

कहाण्या

उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे. नजीकच्या भूतकाळापर्यंत 'कहाण्या' ही श्रावणाची विशेषता होती. कहाण्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठा आशय मनामनात रुजवला जात असे. समाजाचं, जीवनाचं चित्रही त्यातून उभं राहतं. त्या सगळ्या गोष्टींशी आज आपल्याला स्वतःला जोडता येत नसेल तरीही त्यात काही कालातीत विचार, तत्त्व आहेत; त्यांच्याशी मात्र नाळ जोडता येऊ शकते. भारतीय प्रयत्नवादाचं एक रमणीय रूप या कहाण्यांमध्ये पाहायला मिळतं. मानवी प्रयत्न (धार्मिक व्रते इत्यादी मानवी प्रयत्नच होत) आणि त्याच्या फलप्राप्तीसाठी त्याला दिलेली दैवी कृपेची जोड, मानवी मनाला जगाच्या प्रखर वास्तवाची जाणीव करून देण्यासोबतच त्याचा धीर बांधून ठेवण्याचं काम करीत असत. भारतबाह्य प्रयत्नवाद वास्तवाचं भान देतो आणि प्रयत्नांना उचलून धरतो. परंतु प्रयत्नांच्या विफलतेची शक्यता फेटाळून लावतो.  याच ठिकाणी तो प्रयत्नवाद अवास्तव होतो. एवढेच नाही तर मानवी प्रयत्न हीच यशाची गॅरंटी असल्याचे सांगून, येणाऱ्या अपयशाची जबाबदारी मानवावर ढकलून त्याला अस्वस्थ आणि दांभिक मन बहाल करतो. भारतीय प्रयत्नवाद प्रयत्नांना उचलून धरतो आणि यश अपयश या गोष्टी अनेक गोष्टींचा परिपाक असतो हे मनावर ठसवतो. त्यामुळे अपयश स्वीकारण्याचीही मनाची तयारी होते. या कहाण्यांमधून यश अपयश यातील अगम्य घटकांचे महत्व अधोरेखित होते.

जीवनाच्या उदात्त कल्पनाही या कहाण्यातून मनांवर ठसवल्या जातात. राजा कसा असावा हेही यातून मांडले आहे. राज्यात कोणी उपाशी आहे का असे राजा स्वतःच्या भोजनापूर्वी विचारतो. मगच स्वतः जेवतो. राजाची (राज्य प्रमुखाची) ही कालातीत आदर्श कल्पना आहे. आजही ती का अंगिकारु नये? राजा याचा अर्थ पालन करणारा. अगदी घरच्या कर्त्या व्यक्तीपासून सर्वोच्च राजपदापर्यंत सगळ्या राजांनी ही संवेदनशीलता आणि हा पुढाकार यांचा स्वीकार का करू नये? ग्राम पंचायत सदस्य असोत, सरपंच असोत, नगरसेवक असोत, नगराध्यक्ष असोत, महापौर असोत, राज्य वा केंद्रातील प्रतिनिधी मंत्री असोत, शासनाप्रमाणेच प्रशासनातील सगळे लोक असोत; आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात कोणाला काही त्रास आहे का, कोणाला कशाची गरज आहे का; हे स्वतःहून जाणून घेण्याची सवय आणि त्रास वा गरज दूर करण्याचे स्वतःहून प्रयत्न करण्याची सवय; या बाबी स्पृहणीय नाहीत का? हा चर्वणाचा आणि थट्टेचा विषय होऊ शकेल. तसे कोणत्या विषयाचे होत नाही? पण आदर्श बोलत राहायला काय हरकत आहे? समोर दिसणाऱ्या समस्येसाठीही, 'आधी तुम्ही अमुक ठिकाणी अर्ज करा मग पाहू', इत्यादी अनुभवांचा काथ्याकूट करण्यापेक्षा 'असे व्हावे/ होऊ शकते' हे सुचवत राहणे चांगले. नाही का?

- श्रीपाद कोठे

रविवार, ८ ऑगस्ट २०२१

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

विकासासह विचार

पंडित दीनदयाळ उपाध्याय भारतीय जनसंघाचे महामंत्री होते. त्यांना एकदा एकाने विचारले- जनसंघ सत्तेवर आल्यानंतर जर सत्ताधारी चुकीचे वागले तर? क्षणाचाही विलंब न लावता पंडितजी म्हणाले- जनता आम्हाला पदच्युत करेल. तसे होऊ नये याची जबाबदारी आमची आहे.

आज कोणत्या राजकीय पक्षाच्या महामंत्र्याची एवढा खणखणीत विचार करण्याची ताकद आहे?

विकासासोबत विचार असेल तरच समाजाचं, देशाचं, जगाचं भलं होईल. विचारहीनता नेहमीच अधोगतीला नेते.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०१६

नियंत्रक नव्हे प्रेरक

रा. स्व. संघ तसाही नेहमीच चर्चेत असतो. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे तिघेही स्वयंसेवक असल्याने त्या अंगानेही चर्चा सुरु आहे. उत्साहाच्या भरात संघाचे स्वप्न साकार झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारे आहेत, तर अशी प्रतिक्रिया संघाला उणेपणा आणणारी आहे अशी भूमिकाही संतुलितपणे मांडली जात आहे. या निमित्ताने किंवा अन्य वेळी होणाऱ्या चर्चेच्या वेळीही एका बाबीचा थोडा विसर पडतो किंवा पुष्कळांना त्याची जाणीवही नसते की; संघाचे कार्य नियंत्रकाचे अथवा नियंत्रणाचे नसून प्रेरक स्वरूपाचे आहे. माझ्या आकलनाप्रमाणे संघाला सरकार, परिस्थिती, समाज, व्यवस्था इत्यादींचे नियंत्रण करावयाचे नाही; तर हे सगळे सुरळीत चालावे यासाठी सशक्त प्रेरणा जागवण्याचे, पेरण्याचे काम करायचे आहे. तेच तो आजवर करत आला आहे. ही मुलभूत गोष्ट लक्षात घेतली तर बराच गोंधळ कमी होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०१७

उपनिषदे

पोलंडची राजधानी वॉर्सा येथील ग्रंथालयात उपनिषदांचे वेचे भिंतींवर लावले आहेत, असं एक ट्विट तेथील भारतीय राजदूतांनी केले आहे. समाज माध्यमातून ते सगळीकडे प्रसारितही होत आहे. हा भारताच्या, हिंदूंच्या स्वाभिमानाचा आणि आनंदाचा विषय असल्याचीही सार्वत्रिक भावना आहे. हा सगळा समाधानाचाच भाग आहे. मात्र त्याचवेळी हेही जाणवते की, समाधान म्हणजे जीवन नाही. स्वाभिमान, आनंद अन त्यातून मिळणारं समाधान ही एक लहान, अन स्पष्ट बोलायचं तर वरवरची गोष्ट आहे. वरवरची याचा अर्थ अनावश्यक, दुय्यम, टाकाऊ असा नाही. तर याच्या पलीकडे, गाभ्यात जायला हवे हाच त्याचा अर्थ. तसे तर संसदेत आणि राज्यघटनेत वगैरेही प्राचीन भारतीय शास्त्रांची चित्रे, वेचे आहेतच. त्याचा अभिमान, आनंदही आहेच. पण... म्हणूनच गाभ्याशी भिडणे हवे अन गाभ्याशी भिडण्याची वारंवार आठवण हवी.

एक गोष्ट अगदी खूणगाठ म्हणून पक्की बांधून घ्यायला हवी की, भारतीय दृष्टी आणि भारतेतर दृष्टी यात खूप फरक आहे. समर्थकांची संख्या, पाठीराख्यांचे बळ, प्रचाराचा झंझावात, मान्यतेची प्रमाणपत्रे, कौतुकाची प्रशंसापत्रे, संपत्तीचा लखलखाट, सत्तेच्या गर्जना; यांच्याशी सत्य जोडलेले नसते; ही भारतीय दृष्टी आहे. 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' हा भारताचा सत्यान्वेषी शंखनाद आहे. अन जीवनाने सत्यानुसरण करावे हाच भारताचा ध्यास आहे. हा ध्यास समग्र मानवी समाजाच्या गळी उतरविणे हाच भारताचा जीवनाशय आहे. हा ध्यास आणि हा जीवनाशय बाजूस सारणे आणि तो बाजूस सारताना पण परंतुची सारवासारव करणे म्हणजे भारत नाकारणे. इतिहास, शास्त्रे, पुस्तके, तत्त्वज्ञान यांचा उदोउदो म्हणजे उपनिषदे नाहीत. मर्यादित जगाला मर्यादितच ठेवून, अमर्याद व्यक्तित्वाची उपलब्धी करण्याचा पुरुषार्थ म्हणजे उपनिषदे. या सत्वामुळेच जगाला उपनिषदे हा शब्दही ठाऊक नसतानाही ती टिकून राहिलीत. ती सिद्ध करण्याचा खटाटोप करून ती चिरस्थायी होतीलच असे नाही. किंबहुना होणार नाहीत. तर - सत्ता, संपत्ती, स्पर्धा यावर आधारित कथित जीवनमूल्ये झुगारून देऊन; त्यांचा आपल्या मन बुद्धीवरील प्रभाव आणि पगडा निर्मूल करून; सत्यानुसरण करणारे जीवन जगण्याच्या प्रयत्नातून सत्व प्रकट होईल अन तीच उपनिषदांची सार्थकता ठरेल. निर्भीडपणा हे उपनिषदांचे सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. आपण किमान स्वतःला निर्भीडपणे काही सांगू शकलो पाहिजे. वर्तमान तकलादू जीवनमूल्यांच्या जागी उपनिषदांची जीवनमूल्ये स्थापित करण्याची प्रेरणा जागी होवो एवढेच.

- श्रीपाद कोठे

७ ऑगस्ट २०२१

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

संघटन : भारतीय, अभारतीय

संघटन आणि संघटीत अवस्था वेगळे.

संघटन- मुंग्या. बाह्य आघात झाला की सैरावैरा. बाह्य नियंत्रित.

संघटीत अवस्था- बिछान्याला खिळलेला रुग्ण मुंगी अंगावर चढली की चिरडून टाकतो किंवा धडधाकट असूनही अंगावर मुंग्यांचे वारूळ होऊ देतो. आंतरनियंत्रित/ आत्मनियंत्रित.

organisation and organised state.

भारतबाह्य समाजरचना विचार, व्यक्तीविचार - संघटन.

भारतीय समाजरचना विचार, व्यक्तीविचार - संघटीत अवस्था.

- श्रीपाद कोठे

६ ऑगस्ट २०१८

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

मानवी दांभिकता

एखाद्या गोष्टीचं (व्यक्ती, कण, बिंदू, विचार, भावना, घटना... काहीही) स्थान कसं निश्चित होतं? परिमाणांनी. जसे- एखाद्या वस्तूचा बोध आपल्याला होतो, तो लांबी, रुंदी, खोली यांच्या आधारे. ही झालीत परिमाणे. घटनांचा बोध या परिमाणांनी होऊ शकत नाही. त्याचा बोध होतो `काळ' (time) या परिमाणाने. विज्ञानाने या साऱ्याचा अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. पण तरीही हे सारे वरवरचे म्हटले पाहिजे. प्रज्ञावान शास्त्रज्ञांचे याने समाधान होणे नव्हते. त्यामुळे ते या बाह्य वस्तूंच्या अंतरंगात शिरले आणि त्यातून nuclear physics चा विस्तार झाला. यातूनच सगळ्या वस्तुमात्रांचा, सगळ्या जडद्रव्याचा आधार असलेल्या अणूचा शोध लागून त्याचा अभ्यास सुरु झाला. हा अभ्यास सुरु झाला तेव्हा शास्त्रज्ञांना लक्षात आले की, हे सारे विलक्षण आहे. अणुगर्भातील कण हे अद्यापही शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरले आहेत. त्या बारक्याशा अणूतील हे कण स्वनातीत (supersonic) विमानांपेक्षाही अधिक वेगाने अणूमध्ये फिरत असतात. तो अणु फोडल्यावर जी सुरु होते तीच chain reaction. ही chain reaction च अणुउर्जा आणि अणुबॉम्ब यांचा गाभा होय. असे असले तरीही या अणूची रहस्ये मात्र अजूनही उलगडायची आहेत. ही रहस्ये उलगडण्याच्या प्रयत्नातूनच विकसित झाली स्ट्रिंग थिअरि. या स्ट्रिंग थिअरिने लांबी, रुंदी, खोली आणि काळ या चार परिमाणांनी काम भागत नाही असे पाहून नवीन सहा परिमाणांची कल्पना केली. हो, कल्पना केली. कारण ही सहा परिमाणे अजूनही काल्पनिकच आहेत. त्यांना प्रत्यक्ष अस्तित्व नाही. त्यामुळेच त्यांना अजून नावेही देण्यात आलेली नाहीत. पाचवे, सहावे, सातवे... याक्रमाने दहावे पर्यंत त्यांचा क्रम अभ्यासकांनी लावला आहे. आता तर अभ्यासक असे म्हणू लागले आहेत की, चौथ्या परिमाणाच्या पुढे, म्हणजे पाचव्या परिमाणापासून पुढे आपल्याला समजून घ्यायचे असेल तर ते मानवाच्या आजच्या क्षमतांना शक्य नाही. ही परिमाणे समजून घ्यायची असतील तर नवीन मानव जन्माला घालावा लागेल. हा नवीन माणूस जन्माला घालता येईल का याचाही विचार सुरु झाला आहे. पण गंमत अशी की, जी परिमाणेच माहिती नाहीत ती शोधण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी माणूस तरी कसा निर्माण करायचा. ही काल्पनिक परिमाणे समजून घेण्यासाठी मानवाच्या कोणत्या ज्ञानेंद्रियात वा कोणत्या कर्मेंद्रियात वा मनात वा मेंदूत कोणता बदल करण्याची गरज आहे हे कसे समजायचे? जे माहीतच नाही ते शोधण्याची तयारी कशी करायची? विज्ञान आज अशा प्रकारच्या dead end ला आले आहे. एक प्रकारच्या संभ्रमात सापडलेले आहे. किमान एक कबुली तर आजच्या विज्ञानाने दिलेलीच आहे की, आजच्या परिस्थितीत आपल्याला या जड विश्वाचा बोध पूर्णत: होऊ शकत नाही.

आजचे जडवादी, भौतिकवादी, वास्तववादी, प्रत्ययवादी ज्या प्रकारे वागतात, बोलतात, विचार करतात आणि तरीही स्वत:ला विज्ञानवादी अन आधुनिक म्हणवतात; तेव्हा मती कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही. मानवी दांभिकतेचं याहून चांगलं उदाहरण शोधूनही कदाचित सापडणार नाही.

- श्रीपाद कोठे

५ ऑगस्ट २०१५

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

आय-भन घ्यावी कुठे?

या व्यवस्थेतील सगळ्यात मोठी त्रुटी कुठली असेल? एखाद्याची आई-बहिण घेण्याची जागा नसणे. रक्तदाबाचं मीटर फुटून जाईल इतका रक्तदाब वाढवणाऱ्या गोष्टी इतक्या घडतात की विचारता सोय नाही. आणि पुन्हा `समजून घ्यायचं' हा निर्लज्ज उपदेश किंवा `समजून घ्यावं' ही बेशरम अपेक्षा. मुख्य म्हणजे हा उपदेश वा ही अपेक्षा ज्याला त्रास होतो त्याच्याकडूनच. मुळात तिखट प्रतिक्रिया त्रास झाल्यावरच येते. त्यामुळे नेहमीच तिखट प्रतिक्रिया समजून घेण्याची भूमिका असायला हवी. पण असते उलटेच. मूळ क्रीयेबद्दल बोलण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा. त्यात सुधारणा करण्यापेक्षा प्रतिक्रिया कशी चुकीची यावरच सारा रोख. आणि म्हणे आम्ही सुधारलो, सभ्य झालो, आधुनिक झालो वगैरे.

या सगळ्याचं आजचं कारण. महानगरपालिकेचा घराचा कर. घराच्या कराचं जे देयक पाठवलं त्यावर कोणतीही तारीख नाही आणि नियम मात्र हा की देयकाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत कर भरणा व्हायला हवा. तसे न केल्यास दरमहा २ टक्के दंड आकारणी. आता तारीख न टाकण्यापासून तर बिलाच्या भाषेपर्यंत किमान दहा गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी महापालिकेची आय-भन घ्यावी. त्यात कोणतंही पाप नाही आणि गुन्हाही नाही. पण तसं करायला जागा मात्र कुठेही नाही. अन अस्थानी एखादी कृती केली तर तो गुन्हा होतो ना?

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१४

आवाहन

केंद्र सरकारने ८०० अश्लील वेबसाईटवर बंदी घालण्यात काहीही गैर नाही. हा अतिशय योग्य निर्णय आहे.

ज्याला ज्याला माझे हे मत मान्य आहे. त्याने कृपया लाईक करावे. प्रतिक्रियाही देऊ शकता. पण किमान लाईक करा. हा विषय आपला नाही, या व्यक्तीशी माझे मतभेद आहेत, याचे विचार माझ्यापेक्षा वेगळे आहेत, हा आगावू आहे, जास्त शहाणा आहे, याच्याशी माझी मैत्री नाही, हा माझे पोस्ट लाईक करीत नाही, हा माझ्यापेक्षा लहान आहे, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, हा नागपूर- विदर्भाचा आहे, हा संघवाला आहे, मी स्त्री आहे, नाही लाईक केले तर काय होते, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, कोणी काहीही केले तरी आपण शांत राहावे हाच शहाणपणा असतो- हेच आध्यात्म असतं... इत्यादी इत्यादी... या किंवा अशा कोणत्याही पण-परंतुचा विचार न करता, ज्यांना सरकारचा निर्णय योग्य असल्याचे माझे मत पटत असेल त्यांनी लाईक केल्याशिवाय राहू नका.

याचे कारण हे आहे की, सरकारचा निर्णय चुकीचा असून या साईटस खुल्याच असल्या पाहिजेत, असे म्हणणारा आवाज इतका मोठा होतो आहे की, दुसरी बाजू आहे वा असू शकते याचा जणू विसरच पडला आहे. चांगल्या आणि योग्य गोष्टींचा आवाजही तेवढाच किंबहुना त्याहून अधिक मोठा असायला हवा. त्यासाठी सगळ्यांना लाईक करण्याची विनंती.

ज्यांना माझे मत मान्य नाही त्यांनी यावर कृपया काहीही प्रतिक्रिया देऊ नये. काही उलटसुलट प्रतिक्रिया दिली वा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताला त्याची जागा दाखवून देण्यात येईल.

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१५ 

कुविचारांना विचार सिद्ध करणारे दिवटे

चॅनेल फिरवता फिरवता `मी मराठी' लागलं. त्यावर चर्चा सुरु होती म्हणून ऐकली अन खरंच हसावं की रडावं कळत नव्हतं. ती चर्चा घेणाऱ्या प्रतिनिधीचा युक्तिवाद होता- `लाखो लोक या साईटस पाहतात. त्यांच्या भावनांचा विचार करायचा की नाही?' म्हणजे विचार- अविचार- कुविचार यातला भेद त्याच्या गावीही नाही. कुविचारसुद्धा खपवून घ्यायचा? अन असे लोक समाजाची वकिली करणार? समाजाला बुद्धी अन अक्कल शिकवणार?

खरे तर हे एकच उदाहरण पुरेसे आहे बंदीचे समर्थन करायला. कसे? त्यासाठी थोडे विश्लेषण आवश्यक आहे. या प्रतिनिधीने हा असा प्रश्न का विचारला? कारण त्याची एकूण बौद्धिक क्षमता कमी आहे. अन जी आहे तीसुद्धा नीट पोसली गेलेली नाही. का झाले असे? कारण त्याच्या घरी, त्याच्या शिक्षणात, त्याच्या अवतीभवती तसे वातावरण नाही, विचार-विवेक यांची जोपासना, त्यांचा आग्रह नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे, हीच त्याच्या अवतीभवतीची मान्यता. अन प्रत्येक जण परिपूर्ण आहे किंवा योग्य अयोग्य त्याचं तो ठरवेल असे वातावरण. त्यामुळे दुसरी बाजू, दुसरा विचार, आपल्या मताचे विविध पैलू, आपल्या विचारांचे परिणाम याचा विचार करायचा असतो, विचार हे घडवायचे असतात, सुधारून घ्यायचे असतात, अन ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे याचा पडलेला विसर.

मग निर्भयावर बलात्कार करणाऱ्याच्या भावनांचे, स्वातंत्र्याचे काय? का नाही समजून घ्यायचे त्यांना? एखाद्याच्या मनात येणारे विचार वा भावना, मनावर उठणारे तरंग हेच अंतिम मानायचे असेल; तर मानवी मनात येणारे खुनाचे, बलात्काराचे, भ्रष्टाचाराचे, फसवणुकीचे असे कित्येक मनोभाव का मान्य करायचे नाहीत? असे होत नाही, होऊ शकत नाही, होऊ नये. मनोभावांचे समर्थन वा त्याज्यता अन्य पुष्कळ घटक विचारात घेऊनच ठरवावी लागते. विचारी म्हणवणाऱ्यान्ना हे ध्यानी येऊ नये?

गेली अनेक दशके स्वातंत्र्य, समता आदींचे निर्बुद्ध विवेकशून्य नारे देत जी एक विधीनिषेधशून्य जीवनशैली विकसित झाली त्याचाच परिणाम आहे, त्या प्रतिनिधीचा हास्यास्पद प्रश्न. आज त्याच विधीनिषेधशून्य जीवनशैलीला पुढे घेऊन जाणारी, या वेबसाईटसना मुक्त करण्याची जी मागणी होत आहे, ती मान्य झाल्यास पुढील काळ कसा राहील? किती निर्बुद्धांचा राहील? कारण आपले वागणे, विचार करणे केवळ त्या त्या क्षणापुरते नसते. ते आपल्या व्यक्तित्वाला अंतर्बाह्य प्रभावित करीत असते. अन हा प्रभाव जाणता वा अजाणता समाजाला प्रभावित करीत असतो. त्यामुळेच व्यक्तीला अमर्यादित स्वातंत्र्य असूच शकत नाही. ते त्याच्यासाठी अन समाजासाठी, दोघांसाठीही घातकच असते. माणसाचे मन पाण्यासारखे आहे. त्याला खाली जायला काहीही लागत नाही. पण वर खेचून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. ते आपोआप वर येत नाही. हे मनाला वर आणण्याचे प्रयत्न म्हणजेच संस्कार.

संस्कार या गोष्टीत विधी (काय करायचे) अन निषेध (काय करायचे नाही) या दोन्हीचा समावेश असतो. आजचे जीवन, त्यापाठी असणारे तत्वज्ञान संस्कारशून्य आहे याचा अर्थ हाच आहे की त्यात विधी आहेत पण निषेध नाहीत. भारताने हजारो वर्षे संस्कारांची, विधिनिषेधपूर्ण जीवनशैली अंगिकारल्यामुळेच हा समाज अन येथील राष्ट्र सगळ्या वादळवाऱ्यात टिकून राहिले. अन आज जगभरातील मानवता टिकायची असेल तर हीच विधिनिषेधपूर्ण जीवनशैली योग्य आहे यावर सुजन लोक येऊ लागले आहेत. चुकीची दिशा बदलायलाच हवी. त्या दिशेने जाणाऱ्याला कळेल तेव्हा कळेल हे म्हणणे अज्ञानाचे लक्षण आहे.

गेल्या दोन-अडीच हजार वर्षातील भारतेतर विचारपद्धती मनाला एक दगड मानते. त्यामुळे त्यावर कशाचा काही परिणाम होतो वगैरे त्यांच्या गावीही नसते. हा दगड अश्लील चित्रपटासमोर ठेवला काय, हिंसक चित्रपटासमोर ठेवला काय, त्याग बलिदानाची शिकवण देणाऱ्या चित्रपटासमोर ठेवला काय त्यांच्या दृष्टीला, बुद्धीला त्यात काहीच फरक वाटत नाही. व्यवहारात प्रत्ययाला येणाऱ्या विसंगतीही मग ते दृष्टीआड करू लागतात. त्याच आधारे ते भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये यांनाही प्रश्न करतात? तुमची संस्कृती काय एवढी तकलादू आहे काय? वगैरे. मुळात संस्कृती, मन, संस्कार हे काही दगड नाहीत. हे सारे प्रवहमान घटक आहेत, असतात. त्यांचे संगोपन, संरक्षण, संवर्धन सतत करत राहावे लागते. तरच त्यांचे अपेक्षित परिणाम प्रत्ययाला येतात. सुग्रास अन्न ज्याप्रमाणे देखभाल केली नाही तर नासते, तसेच हे आहे. जीवमान अशा या बाबी आहेत. मुळात माणसाला तरी ही भारतेतर संस्कृती जीवमान मानते का? अन मानत असेल त्याचा योग्य तो अर्थबोध तिला होतो का?

हे सगळे ठीक आहे हो, पण बंदी हा काही त्यावरचा उपाय आहे का? असा खूप मानभावी प्रश्न विचारणारे आहेतच. त्यांना केव्हातरी उत्तर देईन. तूर्त फक्त त्यांच्यासाठी एक प्रश्न- तुमच्याकडे काय उपाय आहे? अन प्रबोधन वगैरे जे उपाय तुम्ही सांगता त्याने तरी उपाय होतो का? त्यांचा विस्ताराने परामर्श पुन्हा केव्हा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ४ ऑगस्ट २०१५

set of things

`पण बंदीने काय होईल?' सरकारच्या वेबसाईट बंदीचं स्वागत करणाऱ्या काही जणांनी मेसेज करून विचारलं? हे लोक भाजप किंवा मोदींचे किंवा हिंदुत्व वगैरेचे विरोधक नाहीत, `आधुनिक' असं बिरूद मिरवायला आवडणारे ढोंगी नाहीत, अन समाजाच्या भल्याची इच्छा असणारे आहेत. त्यामुळे थोडं विश्लेषण त्यांच्यासाठी.

माणसाची मुळातच ही सवय आहे की, त्याला काहीतरी एक हवं. एक उपाय हवा. एखाद्या आजारावर, व्याधीवर त्याची मागणी असते एक काही तरी सांगा. औषधे, पथ्य, व्यायाम, वातावरण, शिस्त अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर तो कंटाळतो, नाराज होतो, वैतागतो. पण त्याला लक्षात येत नाही की, आजार वा व्याधी हा केवळ एकाच गोष्टीचा परिणाम नाही अन एकाच उपायाने जादूच्या कांडीसारखा तो बराही होऊ शकत नाही. खरं तर या विश्वातली कोणतीही गोष्ट कोणत्याही एकाच गोष्टीने निर्माण होत नाही, नियंत्रित होत नाही. अगदी साधा श्वासोच्छवास. त्यासाठी पुष्कळ गोष्टी लागतात. भाजी करायची म्हणजे फक्त भाजी असून चालत नाही. पुष्कळ गोष्टी लागतात. अगदी कोणतीही क्षुल्लक वा महान गोष्ट असो, त्यासाठी set of things लागतात. अगदी तेच याही बाबतीत आहे. केवळ साईट्स बंदीने सारं काही सुरळीत होईल का? मुळीच नाही. त्यासाठी पुष्कळ गोष्टी कराव्या लागतील. पण त्यासाठी जो काही set of things आहे, त्यात साईट्स वरील बंदी हीदेखील महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ बाकी गोष्टी नकोत असा नाही. कोणतीही गोष्ट समजून घेताना हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे.

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१५

दंभकाळाची वेळ

कोट्यवधी फोन्समध्ये uidai चा नंबर आपोआप सेव्ह झाला. याचाच अर्थ आपल्या कक्षेबाहेरील घटक सदासर्वदा असतातच असतात. आम्ही ते कधी मान्य करणार? मुद्दा फक्त तंत्रज्ञानाचा नाही. इतिहास, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, आरोग्य, शिक्षण; अगदी समग्र जीवनाचा आहे. प्रयत्नांपुढे दैव आणि दैवापुढे प्रयत्न वारंवार आपटी खातात. एका तर्काला खोडून काढायला दुसरा तर्क हाती तलवार घेऊन उभाच असतो. एका शहाण्याला आरसा दाखवायला दुसरा शहाणा तयारच असतो. तरीही आम्हाला, आमच्या यच्चयावत सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत. या जगात काहीही सिद्ध करता येत नाही. या जगातील काहीही वा कोणीही अंतिम नाही, absolute नाही. पण माणसाला हे नीटच समजावं आणि त्याने तसं जगावं, हे तरी कुठे त्याच्या हातात आहे? तीही त्याची मर्यादाच. त्यामुळे चालतच राहणार. सध्या `दंभकाळाची' वेळ आहे.

(ही पोस्ट वाचून कॉंग्रेस, भाजप वगैरे ज्यांच्या मनात येईल त्यांनी ते आपल्यापुरतच ठेवावं.)

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०१८

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

गणेशोत्सवाबाबत हितगुज

गुरुपौर्णिमा आटोपली. अजून दीड महिन्याने गणेशोत्सवाची धूम राहील. त्याची तयारी मात्र एव्हाना सुरूही झाली असेल. जोश, उत्साह, आनंद वगैरे राहीलच. ते राहायला हवेही. गेल्या काही दिवसात `मराठी' आणि `हिंदू' अशा दोन मितीही गणेशोत्सवाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातून `आमचा' अशी एक भावनाही तयार झाली आहे. यात वावगे काहीही नाही. पण या दोन मिती आणि ही भावना, यात अडकून पडणे वा त्याचे वर्तुळ तयार होणे; याऐवजी त्यांचा विस्तार कसा होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे. त्यादृष्टीने काही सूचना कराव्याशा वाटतात.

१) पैशाचे प्रदर्शन टाळणे.

२) पर्यावरण रक्षण.

३) वाहतूक, स्वच्छता यासारख्या सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये.

४) `आपल्या' कलेचे प्रदर्शन, प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न.

५) कुठल्याही प्रकारे सिनेगीते किंवा गणपतीसाठी म्हणून तयार केलेली आधुनिक गीते न वाजवता; सनई, बासरी, सतार यासारखे वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय कंठसंगीतच वाजवले जाईल याचा आग्रह धरणे.

६) आरत्या, भक्तिगीते मर्यादित प्रमाणात वाजवणे.

७) संगीताचा वा भक्तिगीतांचा आवाज कानठळ्या बसवणारा राहणार नाही यावर कटाक्षाने लक्ष देणे. दूरवर आवाज पोहोचावा हे आवश्यक मानू नये. गणपती बाप्पांजवळ येणाऱ्यांना आल्हादक, प्रसन्न वाटावे असा आवाज ठेवावा.

८) आवाज दूरवर पोहोचवायचाच असेल तर जास्त स्पीकर लावावे. पण आवाज मात्र हळूच असावा. (थोडे कठोर वाटेल, पण बहुसंख्य लोक बहिरे नसतात. आपल्या आवाजाच्या माऱ्यामुळे मात्र तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकते.)

९) कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा पूर्णपणे बंद कराव्या. त्याऐवजी सादरीकरण करावे. सादरीकरणात सुद्धा `आपले, शालीन, मर्यादशील, सहज करण्याजोगे, कोणत्याही प्रकारच्या (केवळ वैषयिक नव्हे) भावना भडकवणारे काहीही असू नये. त्याऐवजी भावनांचे विरेचन करणारे, भावनांचे उन्नयन करणारे असे सादरीकरण असावे. विनोदी कार्यक्रम सुद्धा उखाळ्यापाखाळ्या, टर उडवणे, पांचटपणा टाळून असावे.

१०) गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे पुस्तके, कविता, विचार, सगळ्या प्रकारचे ज्ञान यांना प्रोत्साहन देणारे, उचलून धरणारे, त्यांचा प्रचार प्रसार करणारे, कार्यक्रम, उपक्रम यांना प्राधान्य द्यावे.

११) आपली वेशभूषा, केशभूषा, भाषा, वावरणे; सभ्य, धार्मिक, शालीन असावे. भडक, उत्तान असू नये. महिला वर्गालाही याबाबत विशेष विनंती.

१२) गणेशाच्या आगमनाच्या वा विसर्जनाच्या मिरवणुका शक्ती प्रदर्शन वा गोंधळ वा ओंगळवाण्या होऊ नयेत.

१३) ढोल, ताशांच्या पथकांचे दहा दिवसात विविध ठिकाणी प्रदर्शनीय कार्यक्रम करावेत. त्यासाठी लोकांना निमंत्रण द्यावे. मिरवणुकांमधील त्याचे प्रस्थ कमी करावे. त्यापेक्षा विसर्जन स्थळी एकेक, दोनदोन तास विविध पथकांना वाजवण्याची संधी द्यावी.

१४) केवळ मोठी संख्या, मोठा आवाज, दिसायला मोठ्या गोष्टी म्हणजे सारे काही हा समज दूर करण्याचा प्रयत्न व्हावा.

१५) कला, साहित्य, ज्ञानविज्ञान, धार्मिकता, आध्यात्मिकता; यांची वाढ होईल, रसिकता वाढेल, समज वाढेल, बाह्य एकतेला आंतरिक एकतेचे बळ लाभेल, अशा विचारांनी, अशा भावनांनी लहानमोठ्या सगळ्या गोष्टींचे आयोजन, नियोजन करावे.

१६) वीज, पाणी, खाद्यपदार्थ, अन्न कणभर सुद्धा वाया जाणार नाही याकडे लक्ष पुरवावे.

१७) निमंत्रण पत्रिकांवर नावे छापून जाहिरात करण्याच्या वृत्तीला आळा घालता येईल का याचा प्रयत्न करावा. दानदात्यांशी त्यासाठी हिमतीने, पण योग्य शब्दात कसे बोलता येईल; त्यांचेही मन जाहिरातबाजी पासून वळवून खऱ्या धार्मिकतेकडे कसे वळवता येईल याचा विचार करावा.

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०१५

मन आणि नियंत्रण

मनाचं नियंत्रण आणि मनावर नियंत्रण... दोन वेगळ्या गोष्टी. दोन्हींचा परिणामही वेगवेगळा. त्यात जमीन अस्मानाचे म्हणता येईल एवढे अंतर. मनाचं नियंत्रण हा अभारतीय विचार, मनावर नियंत्रण हा भारतीय विचार. मनाचं नियंत्रण म्हणजे भोग, मनावर नियंत्रण म्हणजे योग. मनाचं नियंत्रण म्हणजे गुलामी, मनावर नियंत्रण म्हणजे स्वातंत्र्य. मनाच्या नियंत्रणात राहून त्याच्या तालावर नाचायचं की, मनावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या तालावर नाचायला लावायचं? आज स्वातंत्र्याच्या नावाने गुलाम झालो आहोत का आपण? मनाचं नियंत्रण चिकित्सा करू देत नाही. मनावर नियंत्रण चिकित्सा करतं. मी मनाचा की मन माझं? श्रेष्ठ कोण मी की मन?

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०१६