social media असो की, mainstream media; सध्या `धर्म' हा चर्चेचा मोठा विषय आहे. यातील चर्चांचा रोख पाहता, हिंदूंच्या धर्मकल्पनेला `इस्लाम' व `ख्रिश्चन' या ऐहिक जडवादी संप्रदायांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न कळत वा नकळत होताना दिसून येतो. हे फार घातक आहे. अगदी हिंदू समाजावरील विविध आक्रमणापेक्षा घातक. कारण यात हिंदूंची धर्मकल्पनाच बदलून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. `धर्म' हीच हिंदूंची आणि पर्यायाने जगाची आध्यात्मिक शक्ती आहे. त्यावर आघात हिंदूंसह सगळ्यांसाठी घातक आहेत. या सगळ्या प्रयत्नात प्रामाणिक सत्प्रवृत्त देवभोळे हिंदूदेखील हातभार लावताना दिसून येतात. छोट्या पडद्यावर येणारे धर्माचे ठेकेदारदेखील हातभार लावतात. कारण ते `धर्म' कल्पना नीट समजून घेत नाहीत.
@ आम्हाला आता देव आणि माणूस यांच्यामध्ये कोणाही मध्यस्थाची गरज नाही.
@ धार्मिक संस्था वा व्यक्तींना पैसा देणे बंद करा.
@ धर्माला राजकारणापासून दूर ठेवा.
@ धर्म व धार्मिक संस्था यांचे नियंत्रण व नियमन आवश्यक आहे.
इत्यादी मते जोरकसपणे मांडली जात आहेत. बाबा रामरहीमच्या घटनेचा या साऱ्याला संदर्भ आहे. त्या घटनेचा राग वा क्षुब्धता या प्रतिक्रियांमधून व्यक्त होते, हेही खरे. परंतु या मतप्रवाहाचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करण्याची फुर्सत मात्र कोणाकडे नसते. एखादी कृती रागाच्या भरात केली म्हणून तिचे परिणाम काही टळत नाहीत. व्यवहारातील हीच बाब विचार आणि मानसिकतेच्या बाबतही खरी आहे. भरीसभर ज्यांना जेवणाची, झोपेची फुर्सत नसते, सतत धावावे लागते; असे media वाले महान विचारवंत. तत्वज्ञ, धर्मज्ञ असल्याच्या थाटात टाहो फोडत असतात. याने साध्य काय होईल सांगता येणार नाही, पण विचारांची-भावनांची जी काही सुव्यवस्था, सुसूत्रता, शहाणपण आज शिल्लक राहिले आहे तेही लयाला जाऊ शकेल. यातून `विचारकोष्ठता' वा `विचारषंढता' निर्माण होऊ शकेल. अगदी रोज मंदिरात जाणारे किंवा घरी गणपती, महालक्ष्मी, सत्यनारायण करणारे अशांनाही अनेकदा यातील बारकावे कळत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे खालील गोष्टी मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे असे वाटते.
१) धर्म कल्पनेची सखोल, व्यापक, विस्तृत चर्चा घडवून आणणे.
२) हिंदूंचे धर्म (रूढ अर्थाने) आणि इस्लाम व ख्रिश्चन यांची तुलनात्मक मांडणी मोठ्या प्रमाणात करणे.
३) देव कल्पनेची सखोल चर्चा व मांडणी होणे.
४) देव आणि धर्म यांच्या संबंधांवर सखोल चर्चा.
५) भारतीय भक्तीकल्पना, तिचा विस्तार, तिची विकासावस्था आणि भारतेतर भक्तीकल्पना यांची तुलनात्मक मांडणी.
६) भारतीय देवकल्पना आणि भारतेतर देवकल्पना.
७) `धर्माच्या' सार्वकालिक, सार्वत्रिक, सर्वव्यापी स्वरुपाची चर्चा.
८) भारताचा `धर्मइतिहास' आणि भारतेतर `धर्मइतिहास' यांची तुलनात्मक चर्चा.
९) धर्मशून्यतेचे परिणाम.
१०) अध्यात्मातील ऐहिकता आणि ऐहिकतेतील आध्यात्म.
हे सगळे विषय समाजापुढे समर्थपणे येणे गरजेचे आहे. भक्तीपंथी व्यक्ती आणि संस्थांनी सुद्धा अधिक सखोल, व्यापक, चिरंतन तत्वांची चर्चा आणि रुजवणूक करण्यात पुढे आले पाहिजे. भक्तीचा पारमार्थिक आशय रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चैतन्यशक्तीला जडाच्या पातळीवर आणण्याचे भक्तीमार्गी प्रयत्न किंवा कला, साहित्य आदी क्षेत्रातील प्रयत्न नेहमीच अनिष्ट गोष्टी जन्माला घालतात. जडाच्या साहाय्याने चैतन्याचा वेध इष्ट परिणाम देतात. गांभीर्याने विचार करणाऱ्या साऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक वाटते.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २ सप्टेंबर २०१७