मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

सुबुद्ध करणारे पक्ष हवेत

काही संतांनी अयोध्येत शाहरुख खानची तेरवी करणे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करणे; या दोन्ही गोष्टी अजिबात न पटणाऱ्या. समाजाला फक्त भांडखोर आणि निर्बुद्ध करणारे पक्ष, संस्था आणि लोक काय कामाचे? राजकारण, समाजकारण, धर्मकारण करतानाच समाज सुबुद्ध व्हावा; याची काळजी घेणारे पक्ष, संस्था, लोक हवेत.

**********

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सी ई ओ चंदा कोचर यांच्यानंतर व्हिडिओकॉन चे वेणुगोपाल धुत यांनाही अटक झाली आहे. शिवाय कॅग ने सादर केलेल्या ताज्या अहवालाची बातमीही आज आहे. विविध संस्थांनी अनधिकृतपणे २१ हजार कोटी रुपयांची करचोरी केल्याचा. त्यात गुजरात आणि उत्तरप्रदेश सह देशभरातील संस्थांचा समावेश आहे. आणखीनही बऱ्याच गोष्टी समोर येत असतात. ही बौद्धिक गुन्हेगारी म्हणता येईल. गुन्हेगारीचे वेगवेगळे विश्लेषण होते. त्यात बौद्धिक गुन्हेगारी असं विश्लेषण आणि अभ्यास माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण हा खूप मोठा विषय आहे. कोणाला अभ्यास करायचा असेल तर मी मार्गदर्शन आणि मदत करू शकेन. अर्थात मला गुरुदक्षिणा देणाऱ्यांना.

- श्रीपाद कोठे

२७ डिसेंबर २०२२

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

मोफत धान्य वाटप

चीन, अमेरिकेतील कोरोना उद्रेक पाहता; गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना सरकारने एक वर्ष वाढवली आहे. ८० कोटी लोकांना त्याचा लाभ होणार आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही आणि ते सरकारचे कर्तव्यही आहे. परंतु या निर्णयाचा अर्थ हा होतो की, १३५ कोटी देशवासीयांपैकी ८० कोटी लोक असे आहेत जे धान्य विकत घेऊ शकत नाहीत. हे वास्तव मात्र भूषणावह नाही. जागतिकीकरण, तेल, युद्ध इत्यादी चर्चा आणि तर्क पुष्कळ होऊन गेले आहेत. काँग्रेस आणि भाजपशिवायच्या पक्षांची सरकारे याचाही चोथा झालेला आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याला साडेआठ वर्षे झालेली आहेत. दीड वर्षाने पुन्हा अशीच एकहाती सत्ता मिळेल असे चित्र आहे. त्यामुळे ८० कोटी लोक स्वतः धान्य खरेदी करू शकत नाहीत ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारीही भाजपची आहे. भाजप समर्थकांनाही ही परिस्थिती कशी बदलेल याची चर्चा करण्याकडे लक्ष वळवले पाहिजे. 

८० कोटी हा धान्य खरेदी करू न शकणाऱ्या लोकांचा आकडा आहे. जे अस्सल, कम अस्सल धान्य खरेदी करतात पण बाकी आर्थिक परिस्थिती यथातथा आहे असे गरीब, निम्न मध्यवर्गीय, मध्यम मध्यावर्गीय असेही कोट्यवधी लोक आहेत. थोडक्यात : समाधानकारक आर्थिक स्थितीत नसलेले शंभर कोटीहून जास्त लोक आहेत. विकास, संपन्नता मोजक्या लोकांकडे आहे. देश व समाज म्हणून हा चिंतेचा विषय व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

२४ डिसेंबर २०२२

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

वानरे

सध्या अयोध्येत असलेल्या एका कार्यकर्त्यांशी आज गप्पा झाल्या. त्यांनी एक गंमत सांगितली. अयोध्येत माकडे खूप आहेत. ती लाल तोंडाची आहेत. एकदम इबलिस. केव्हा काय करतील भरवसा नाही. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले तेव्हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता. त्यांना कोणीतरी एक जालीम उपाय सांगितला आणि तो यशस्वी पण झाला. लाल तोंडाची ही माकडे काळ्या तोंडाच्या माकडांना घाबरतात. मग पोलिसांनी काळ्या तोंडाचे हुप्पे आणले अन् त्यांना अयोध्येत फिरवले. कार्यक्रमाच्या दोन चार दिवस आधी या काळ्या तोंडाच्या वानारांना पोलिसांनी फिरवले. अन् लाल तोंडाची ही इबलीस माकडे पंधरा दिवस अयोध्येतून गायब होती.

#अयोध्या

- श्रीपाद कोठे

२१ डिसेंबर २०२२

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

योग

तोंडावर (खाणे आणि बोलणे दोन्हीसाठी) नियंत्रण हे योगाचं केवळ लक्षण नाही तर तो योगाचा आधार आहे आणि सर्वस्व देखील. याचा विसर पडू नये. योग्यांना आणि योग मानणाऱ्या व्यक्तींना, समूहांना, समाजाला. भारतीय अथवा हिंदू विचार योगभ्रष्ट कल्पना अधिकृतपणे मान्य करते. धैर्य, कणखरपणा यासाठी भारतीय किंवा हिंदू विचारांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. हा लौकिक टिकून राहायला हवा. टिकवायला हवा.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०२२

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

आंबेडकर म्हणतात -

मनाचे स्थैर्य आणि नीरक्षीरविवेक म्हणजे काय याचा उत्तम नमूना-

`मै मानता हूँ की, इस मुद्दे पर कोई विवाद नहीं हो सकता है की, अचल संपत्ति के बंटवारे पर नियंत्रण अपनाया जाता है तो, हमारी कृषि पर आधारित जनसंख्या का बड़ा हिस्सा भूमिहीन हो जायेगा. यह देश के सर्वाधिक हित में नहीं है की, गरीब तबकों को इस ढंग से और गरीब कर दिया जाए. महोदय, मै यह बताना चाहता हूँ की, यद्यपि हिन्दू कानून कई तरह से बहुत त्रुटीपूर्ण है, तथापि उत्तराधिकार का हिन्दू कानून लोगों का बहुत बड़ा रक्षक रहा है. हिन्दू धर्म द्वारा स्थापित सामाजिक और धार्मिक एकछत्रवाद ने लोगों के एक बहुत बड़े वर्ग को निरंतर दासता में जकड़े रखा है. यदि इस दासता में भी उनकी दशा सहनीय है तो इस कारण से की, उत्तराधिकार के हिन्दू कानून ने कुबेरपतियों के निर्माण को रोका है. महोदय, हम सामाजिक दासता को आर्थिक गुलामी से नहीं जोड़ना चाहते. यदि आदमी सामाजिक रूप से स्वतंत्र नहीं है, तो उसे आर्थिक रूप से स्वतंत्र होने दीजिए. इसलिए मै उस न्यायपूर्ण और उत्तराधिकार की समतामूलक व्यवस्था को समाप्त करने के पूर्णतया खिलाफ हूँ.' (डॉ. आंबेडकर समग्र साहित्य, खंड ३, पृष्ठ १४८- मुंबई विधिमंडळात १० ऑक्टोबर १९२७ रोजी `छोटे किसान राहत विधेयक' यावर केलेले भाषण)

या छोट्याशा वेच्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. ते पुन्हा केव्हा तरी.

#श्रीपादचीलेखणी

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

स्थिरता

शहीद संतोष महाडिक याच्या अंत्य संस्काराचं प्रक्षेपण सुरु होतं. लोक घोषणा देत होते. संतोषची पत्नी, मुले यांचं धीरोदात्त वागणं दिसत होतं. अन मध्येच ब्रेक झाला. डोळ्यासमोर पायऱ्यांवरून उतरणारी हिरो सायकल, मराठी तारकेच्या अदा अन असंच काहीबाही दिसू लागलं. आपण सगळेच असे प्रकार रोज अनुभवतो. वर्तमान काळाची ती ओळखच झाली आहे. असंख्य प्रतिमांचा मारा अखंडपणे, अनावश्यकपणे अन अविचारीपणे चाललेला असतो. एखाद्या प्रतिमेचा मनावर परिणाम होण्याआधीच तो पुसला जातो. एखादी कृती वा आकृती, एखादी भावना वा विचार मनात, बुद्धीत स्थिर होण्यापूर्वीच पुसून टाकले जाते. विशिष्ट गोष्ट मनबुद्धीत रुजणे वगैरे तर दूरच. स्थिरता ही जणू खूप चुकीची गोष्ट आहे असेच वर्तन दिसून येते. यामुळे चटकदार, नावीन्यपूर्ण परंतु विरविरीत, भुसभुशीत, ठिसूळ जीवन आकाराला येते आहे.

काहीतरी धडा शिकवण्याचे काळाच्या मनात असेल.

- श्रीपाद कोठे

२० नोव्हेंबर २०१५

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

शिकार?

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर बरीच चर्चा सुरू आहे. त्यात एक प्रतिक्रिया आहे की, शिकार करण्यासाठी कधीकधी दोन पावलं मागे जावं लागतं. काय होतो या प्रतिक्रियेचा अर्थ? कृषी कायदे हा राजकीय धोबीपछाड देण्याचा विषय होता वा आहे का? कोणाची शिकार करायची आहे? शेतकऱ्यांची शिकार करायची आहे असा युक्तिवाद तर कोणीच करणार नाही. (कोणाच्या मनात असेल तरीही.) मग एकच पर्याय उरतो, तो म्हणजे विरोधकांची. कृषी कायद्यांचा हाच आशय असेल तर त्याची सगळी बैठकच मोडीत निघते. भाजपला सगळ्यात अडचणीचे ठरते आहे ते त्याचे प्रचार तंत्र. भाजपचा, त्याच्या नेत्यांचा, त्याच्या धोरणांचा, त्याच्या निर्णयांचा; जो अनावश्यक, आक्रस्ताळा, अप्रमाण, कधीकधी उन्मादी प्रचार असतो; तो अतिशय घातक आहे. हे लक्षात का येत नसावे हा प्रश्नच आहे. या प्रचारतंत्रात योजना किती आणि उत्स्फूर्तता किती यावर वाद घालत येईल. पण तो मर्यादेत, शालीन आणि आवश्यक तेवढाच असायला हवा हे मात्र निश्चित. पानटपरीवरच्या किंवा कॉलेज कट्ट्यावरच्या भांडणांसारखे वाद करून राजकारणही करता येत नाही आणि समाजही चालू शकत नाही; हे उमगेल तो सुदिन.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०२१

काय चुकलं?

चिडलेल्या, त्रासलेल्या, वैतागलेल्या, उबलेल्या माणसाला सबुरीच्या अन समजावणीच्या गोष्टी सांगू नयेत. ते क्रौर्य आणि अपरिपक्वता असते. बहुतेक माणसे तेच करतात अन मग विचारतात - 'मी काय चूक केली?' कारण संवादाचं एकच माध्यम आहे असा अजूनही बहुसंख्य माणसांचा समज आहे. बोलणे, सांगणे, विचारणे यापेक्षा वेगळ्या पध्दतीचे communication असू शकते याचा गंधच नसतो. अन असा वेगळा काही मार्ग असतो हे ऐकून/ वाचून माहिती असले तरीही, तो अवगत नसतो. खरं तर communication त्याच्या तंत्रात नाहीच, संवादाची मुळं, संवादाची सुरुवात मनात होत असते. स्वतःच्या आणि ज्याच्याशी संवाद करतो आहे त्याच्या, अशा दोन्ही मनांच्या मुळाशी पोहोचू शकणाराच प्रभावी आणि परिणामकारक संवाद करू शकतो. नुसतं मनानी चांगलं असणं, कळकळ बिळकळ असणं पुरेसं नसतं. या अंगाने पुष्कळदा जाणवतं की माणूस psycho- socio- cultural evolution च्या संदर्भात अजूनही पुष्कळ प्राथमिक स्तरावरच आहे.

- श्रीपाद कोठे

१९ नोव्हेंबर २०१७

पुरुष दिन

आज पुरुष दिवस असल्याची एक पोस्ट दिसली. थोडं आश्चर्यच वाटलं. कारण आजकाल कोणताही दिवस असला तर सकाळी हाती पडणाऱ्या वृत्तपत्रापासून त्याची माहिती मिळायला सुरुवात होते आणि मग फेसबुक, whats app, अन गेला बाजार वृत्तवाहिन्या त्याच्या कौतुकात बुडून गेलेले दिसतात. कविता, कथा, तक्रारी, कौतुके, प्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर - खरी किंवा खोटी- गाऱ्हाणी; असं एरव्ही दिसणारं चित्र काही दिसलं नाही. लिहिताना सगळेच `डेज' डोळ्यापुढे आहेत. खरं तर इच्छाही नाही, पण महिला हा विषय नाईलाजाने लिहावा लागेल. कारण पुरुष दिवस आहे. तर महिला दिनाला शुभेच्छा आदी; त्याही फुगे- फुले- इत्यादी इत्यादीची फोडणी देऊन; न चुकता देणारे पुरुष संख्येने महिलांपेक्षा अधिकच दिसतात. ते ओळखीची महिला, अनोळखी महिला असाही भेद फारसा करीत नाहीत. पण आजच्या पुरुष दिनाला शुभेच्छा आदी- कोरड्या का असेना- देणारा महिला वर्ग मात्र दिसला नाही. ओळखीच्यांनाच नाही तर अनोळखी पुरुषांचे काय घेऊन बसलात? अन कोरड्या शुभेच्छा नाहीत, तिथे कौतुक, कथा, कविता, गाऱ्हाणी, तक्रारी वगैरे वगैरेचे काय?? नाही म्हणायला अलिबागच्या जगप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर आणि नागपूरच्या फुटाळा चौपाटीवर कोण्या संस्थेने सर्व्हे केला म्हणे- आजचा पुरुष दिवस कोणाकोणाला माहीत आहे याचा. सर्व्हे करणाऱ्या लोकांची संख्या माहिती असणाऱ्या लोकांपेक्षा जास्तच होती म्हणतात. सर्व्हेची बातमी कानावर आलेली आहे. खातरजमा केलेली नाही. पण सूत्र विश्वसनीय आहेत. तर, या पुरुष दिनाच्या पाचा उत्तरी कहाणीतून काहीही सुचवायचे नाही. मात्र कोणी आपापले अर्थ काढले तर त्यालाही काहीच हरकत नाही. 🤣🤣

- श्रीपाद कोठे 

१९ नोव्हेंबर २०१७

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

कालच्या दुर्दैवी घटनेबद्दल...

- एखाद्या वाईट, हिणकस, बीभत्स गोष्टीचे किंवा घटनेचे साग्रसंगीत वर्णन चघळत बसू नये. त्याने झालं तर नुकसानच होतं.

- आजकाल तर अशा घटना लगेच व्हायरल होतात. त्यामुळे कालची घटना, चर्चित घटना, वादग्रस्त घटना - विधान; असे उल्लेख असावेत. ज्यांना कळणार नाही वा ठाऊक नसेल; त्या सगळ्यांना त्याबद्दल सांगण्याची गरज नसते. त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे. सगळ्या जगाला तपशीलवार सांगण्याची जबाबदारी स्वतःवर ओढून घेऊ नये.

- कालची घटना ऐहिकतेवर आधारित आत्यंतिक व्यक्तीवादाचा परिणाम आहे. ऐहिकता यात पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, राजकारण, आनंद पुरुषार्थ इत्यादी कल्पना, असंख्य मानसिक गोष्टी, बौद्धिक उन्मत्तता, चांगले आणि वाईट दोन्हींचा अहंकार; अशा सगळ्या गोष्टी येतात.

- गुण, अवगुण इत्यादींचे गटश: वर्गीकरण न करता; गुणपूजा, गुणग्राहकता यांची चर्चा समाजात सकारात्मक वातावरण तयार करते याचं भानही असायला हवं.

- कालची घटना विचारी माणसाला हतबुद्ध करणारी, दुःखद, संताप आणणारी, समाजाला लाजिरवाणी, त्रिवार निषेध करावा अशी आहे.

- श्रीपाद कोठे

१४ नोव्हेंबर २०२२

(प्रेयसीची हत्या)

श्रद्धा प्रकरणी खूप चर्चा सुरू आहे. लव्ह जिहादपासून; तर संस्कार, जीवनशैली, स्वातंत्र्य, जीवनमूल्ये, कायदे इत्यादी इत्यादी. मात्र हा सगळा विचार करताना आजची आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था आणि रचना यांच्या भूमिकांची चर्चा मात्र होत नाही. आजच्या व्यवस्थेत - विचारांचा अवकाश, संस्कार रुजण्यासाठीचा अवकाश, समज वाढेल असे वातावरण, गुन्हे आणि वाईट गोष्टी लक्षात येतील एवढा भौगोलिक आणि अन्य आवाका, ओळखी आणि ओळख होण्याच्या शक्यता, लपवाछपवीच्या किमान संधी; हे सगळं शक्य आहे का? अभिनिवेश, राग, दुःख, धुंदी बाजूला सारून यावर शांतपणे विचार करायला हवा. चांगल्या, सुरक्षित आणि संघर्षविहीन जगण्यासाठी विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनाच मुळातून बदलायला हवी आहे. त्याचा विचार कोण आणि केव्हा करणार?

- श्रीपाद कोठे

१७ नोव्हेंबर २०२२

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मंदिरांची संपत्ती

तिरुपती संस्थानने प्रथमच काल एक श्वेतपत्रिका जाहीर करून आपल्या संपत्तीची अधिकृत माहिती दिली. नेसले किंवा विप्रो सारख्या कंपन्यांपेक्षा तिरुपती संस्थानची संपत्ती अधिक आहे. आज ही बातमी वाचल्यानंतर फेसबुकवर एका मित्राने शेगाव संस्थानच्या व्यवस्थापनावर लिहिलेला लेख शेअर केलेला दिसला. या लेखात नवीन माहिती काही नाही. असंख्य लोकांना शेगाव संस्थानबद्दल माहिती आहेच. पण तो लेख पाहिल्यावर सहज मनात एक तुलना आली. संपत्तीबद्दलची दोन्ही संस्थानांची attitude किती वेगवेगळी आहे. आपल्याला येणारा राग थोडा बाजूला ठेवता आला तर असेही म्हणता येईल की, शेगाव संस्थानची attitude आध्यात्मिक आहे तर तिरुपती संस्थानची attitude भांडवलवादी आहे. दोन्ही हिंदू धार्मिक संस्थान आहेत. Attitude मात्र वेगवेगळी आहे.

मंदिरांच्या संपत्तीवर बोललं तर नाराज होणारे बरेच आहेत, पण मंदिरांनी शेगावसारखी आध्यात्मिक attitude का ठेवू नये? सामान्य हिंदू व्यक्तिपासून महाकाय हिंदू संस्थांपर्यंत सगळ्यांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा. मंदिरांनी संपत्तीच्या बाबतीत आध्यात्मिक attitude बाळगून काम केले तर हिंदू धर्म आणि समाज दोन्ही अधिक सशक्तच होतील. नुकसान काही होणार नाही. फक्त फायदाच फायदा होईल. हिंदूंच्या सध्याच्या जागृत अस्मितेने - आम्हाला का सांगता? आम्हाला का म्हणता? आमच्या संपत्तीवर का डोळा? बाकीच्यांना का सांगत नाही? बाकीच्यांना का म्हणत नाही? बाकीच्यांच्या संपत्तीवर लक्ष का नाही? हे जरा कमी करून आपल्याच हिंदू समाजाच्या हिताचा, सशक्तीकरणाचा विचार थोडा अधिक केला तर बरं होईल.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या उरलेल्या तहखान्यासह असलेल्या संपत्तीचाही विचार; कोणाला साप चावेल, कोणाचा निर्वंश होईल; वगैरे विचार न करता करावा. शाप वगैरे घ्यायचे असतील तर ते घ्यायला मी तयार आहे.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०२२

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

भारत, अध्यात्म, संघ

आजची प्रबोधिनी एकादशी वाया जाऊ नये म्हणून... (तशी आपली रोजच प्रबोधिनी एकादशी असते. कधीतरी देवशयनी एकादशी व्हावी अशी अनेकांची इच्छा असली तरी ती काही येत नाही. 😃 तर असो...) विषयाकडे वळतो.

भारत म्हणजे काय? हा एक देश आहे. या देशात हजारो वर्षांपासून अनेक लोक राहत आले आहेत. त्यात ईश्वरवादी, निरिश्वरवादी, इहवादी, जडवादी सगळेच आहेत. सगळ्याच देशात असं असतं. अगदी मुस्लिम देशातही हे असंच असतं. या विविध लोकांनी मिळूनमिसळून राहणे, त्यासाठी एकमेकांचा आदर करणे, परस्परांना स्पेस देणे; देश म्हणून आवश्यक असते.

******************

उपासना म्हणजे ढोबळ मानाने ईश्वराशी संबंध जोडणे. सगळ्या लोकांना याची गरज असेल असे नसते. सगळ्यांनी ईश्वराशी संबंध जोडायला हवा हेही आवश्यक नाही. ईश्वराशी संबंध जोडण्याची गरज कोणाला वाटावी आणि कोणाला नाही याची प्रेरणा सुद्धा तो ईश्वरच देतो. कोणीही त्याबाबत दुराग्रह करण्यात अर्थ नसतो. ईश्वराशी संबंध कसा जोडायचा याचीही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझीच पद्धत योग्य आणि अंतिम असं म्हणणं किंवा विशिष्ट मार्गाने आपल्याला बरं वाटतं किंवा चांगले अनुभव आले वगैरे म्हणून, बाकीच्यांनी त्याच मार्गाने यायला हवे, हे तर्क आणि शहाणपण दोन्हीला धरून नाही.

भारतात तर ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, राजयोग, तंत्र इत्यादी प्रमुख मार्ग आणि त्यांचे उपमार्ग विकसित झाले आहेत. सगळ्यांची गृहितके, सगळ्यांचे सिद्धांत, सगळ्यांच्या पद्धती सारख्या नाहीत. त्यामुळे त्या त्या मार्गाने जाणारे साचेबद्ध नसतात. त्यांच्या विचार, व्यवहारात साम्य नसते. याचा secularism वगैरेही काही संबंध नाही. Secularism हा शब्दही जन्माला येण्याच्या आधीपासून भारताची ही प्रकृती आहे. यात ईश्वराला मानायलाच हवे याचीही गरज नसते.

******************

कुंकू प्रकरणी शास्त्र इत्यादी फार आग्रहीपणे सांगून जे त्याबाबत आग्रही नाहीत ते कसे चुकीचे आहेत हे सांगितले जात आहे. या एकांगीपणासाठी दोन मुद्दे - 

१) प्रत्येकाने आपला मेंदू आपण म्हणतो तसाच पोसावा, हा नक्कीच हटवाद आहे. २) असंख्य अगदी असंख्य लोक (धार्मिक, संत महंत, सामाजिक कार्यकर्ते, सुधारक, जीवनाच्या असंख्य क्षेत्रातले cream; तेही भारतासह जगभरात) कपाळी कुंकू लावत नाहीत. ते निरर्थक झाले का? विज्ञान, शास्त्र वगैरे करताना विचारांना तिलांजली देऊ नये एवढंच.

प्रस्तुत विषयात आज गोळवलकर गुरुजी यांचंही नाव चर्चेत आलं आहे. पाश्चात्य पोशाख घालून होणाऱ्या विवाहाला गुरुजी जात नसत. मग त्यांचे अनुयायी प्रतीकांना महत्त्व का देत नाहीत? असा एकूण विषय. त्याबद्दल -

१) गुरुजी माझ्यासाठी पूजनीय आहेत. उद्या मी समजा - मला संघाशी देणेघेणे नाही या अवस्थेला पोहोचलो तरीही गुरुजी मला पूजनीयच असतील. तरीही मी म्हणेन की, गुरुजी स्थलकालाच्या अतीत नाहीत. एक पुण्यपुरुष, महान आत्मा म्हणून ते कालातीत आहेत पण विचार, आचार, अभिव्यक्ती या संदर्भात स्थळकाळाने बद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी अमुक केले वा म्हटले वा सांगितले ते नेहमीसाठी, सगळ्यांसाठी अनुकरणीय असे नाही. दुसरे म्हणजे गुरुजी अतिशय संतुलित असल्याने कुठे आग्रह धरायचा, कशाचा आग्रह धरायचा याचा उत्तम विवेक त्यांच्याकडे होता. विवाहात पाश्चात्य पोशाख नसावा याचा आग्रह धरताना, स्वतः नियमितपणे करत असलेल्या संध्येचा आग्रह मात्र त्यांनी कोणालाही कधी केला नाही. एवढेच नाही तर अप्रबुद्धांनी ज्यावेळी त्यांना म्हटले की, संघाने स्वयंसेवकांना संध्या शिकवायला हवी तेव्हा त्यांनी ती सूचना अयोग्य असल्याचे त्यांना सांगितले.

२) गुरुजींनी काही गोष्टींचा आग्रह धरला असेल तरीही त्या गोष्टींचा आग्रह नेहमीच धरायला हवा असे नाही. चालायला शिकताना जी बाबागाडी वापरतो ती धावू लागल्यावर टाकूनच द्यावी लागते. ज्या काळी गुरुजींनी पारंपरिक पोशाखाचा आग्रह धरला त्यावेळी हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा विरुद्ध टोकाला गेलेला लंबक खेचून आणायचा होता. आज तो दुसऱ्या टोकाला जाऊ नये याची काळजी घेण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मांडणी बदलणे स्वाभाविक ठरते.

३) प्रतीके योग्य असली तरीही प्रतिकात अडकून संकुचित राहण्याचा दुराग्रह हास्यास्पद ठरतो. जीवनाचे प्रवाहीपण नाकारणे हा शहाणपणा नसतोच.

- श्रीपाद कोठे

४ नोव्हेंबर २०२२

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

आंधळेपणा

स्पीड लिमिट आणि चलन अशी एक पोस्ट सध्या व्हायरल झालेली आहे. (त्यामुळे ती अनेकांनी वाचली असेल.) त्यावर माझी प्रतिक्रिया -

हे ठीक आहे पण मुळात समस्या याहून खोल आहे अन् ती आकलन होणंही कठीण. सामान्य माणसाने एखाद्या गोष्टीतील सगळी तांत्रिक व व्यवस्थात्मक माहिती अद्ययावत ठेवायला हवी; ही अपेक्षाच किती अवास्तव आणि चुकीची आहे. अन् दुसरे म्हणजे प्रगतीच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा अतिरेक. यंत्राला सगळं समजू शकतं हा भ्रम आहे. एखादी व्यक्ती एखाद्या इमर्जन्सीसाठी अधिक वेगाने जात असू शकते. ते कारण समर्थनीयही असू शकते. एवढंच नाही तर रस्त्यावरील वाहतूक त्याला जास्त वेगाने जाऊ देणारी असेल तरच त्याचा वेग वाढू शकतो. म्हणजे इमार्जन्सी आहे आणि जास्त वेगाने जाणे शक्य आहे त्यामुळे वेग अधिक राहू शकतो. पण यंत्राला हे कसे कळणार?

वास्तविक सामान्य माणूस आज विज्ञान, तंत्रज्ञान, प्रगती, पैसा, यंत्र या गोष्टींनी आंधळा झालेला आहे. अज्ञात सुखाच्या मागे धावत राहणे हेच जीवन असा समज करून घेऊन तो पळतो आहे. थांबून या साऱ्याचा फेरविचार करण्याची त्याची तयारी नाही आणि केलाच फेरविचार तर अनावश्यक गोष्टी नाकारण्याची आणि योग्य रस्ता धरण्याची तयारी नाही. पट्यांवर पट्या बांधणे सुरू आहे.

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर २०२२

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

आठवण

लेखिका मृणालिनी जोशी यांनी आज जगाचा निरोप घेतला. फार काहीच आठवत नाही पण एकदा त्यांना पाहिल्याचं स्मरणात आहे. गोळवलकर गुरुजी यांच्यावरील राष्ट्राय स्वाहा ही कादंबरी लिहीत असताना त्या नागपूरला आल्या होत्या. अन् संबंधितांना, संबंधित स्थानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्याच निमित्ताने वडिलांना भेटायला त्या घरी आल्या होत्या. जवळपास दोन तास वडील आणि त्यांच्यात गुरुजींविषयी बोलणं झालं होतं. गुरुजींच्या आठवणी, स्वभाव, वेगवेगळे पैलू असं ते बोलणं होतं. राष्ट्राय स्वाहा या कादंबरीच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात वडिलांचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. त्यावेळी मी अगदीच लहान शाळकरी मुलगा होतो. त्यामुळे बाकी काही स्मरणात नाही. मृणालिनी जोशी यांना अभिवादन. ॐ शांति: 🙏

- श्रीपाद कोठे

२७ ऑक्टोबर २०२२

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

व्यक्ती व देश

खूप दिवसांनी republic पाहिलं. National conclave. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा होते. फार छान चर्चा झाली. अर्णव अगदीच गरजेचं बोलताना दिसला याचा सुखद धक्का बसला. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकाही स्पष्ट आणि ठाम होत्या. फक्त एक मुद्दा मात्र नाही पटला. ते म्हणाले, you can criticise the individual but not the country. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं नावही घेतलं. त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले. मात्र एक मुद्दा ते स्पष्ट करू शकले नाहीत की, how to differentiate an individual and his decisions. One can criticise the individual. Ok. Nice. But if a decision of an individual is questioned, can it be a criticism of the country. Are decisions sans individual life can be blindly considered as or equated to country and interest of the country as a whole?

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०२२

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

Approach

काल फटाक्यांबद्दल एक पोस्ट केली त्यावर एका मित्राने प्रतिक्रिया दिली होती. नंतर उत्तर देऊ असं म्हटलं पण आज मित्राची प्रतिक्रिया दिसतच नाही आहे. फेसबुकने काढली की त्याने स्वतः की काही तांत्रिक प्रकार ठाऊक नाही. त्यामुळे ही पोस्ट.

प्रदूषण पसरविण्यात फटाक्यांची भूमिका असते त्यामुळे फटाक्यांची प्रथा बंद करायला हरकत नाही, या माझ्या मतावर मित्राने विचारले होते की : मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यावर चंदनाच्या लाकडावर अग्निसंस्कार करतात. त्याचे काय? कोणत्याही लाकडांच्या ज्वलनाने होणाऱ्या प्रदूषणापेक्षा चंदनाच्या लाकडाचे प्रदूषण अधिक असते का मला माहिती नाही. परंतु एक सिद्धांत म्हणून माझे मत आहे की, ज्या ज्या गोष्टी अहितकर असतात त्या कमी करत गेले पाहिजे. मात्र पर्यावरण, प्रदूषण इत्यादींचा विचार एकांगी पद्धतीने करू नये. विवेकाने करावा. तसेच त्यात तुमचे आमचे, वादविवाद टाळावे. विचारधारा वगैरे असू नये. जगताना पूर्णता असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा पूर्णतेचीच असावी लागते. जगताना आदर्श स्थिती असू शकत नाही पण आग्रह आणि दिशा आदर्शाचीच असावी लागते. प्रगती आणि सुव्यवस्था या गोष्टी त्यानेच साध्य होतात. अन्यथा सावळागोंधळ माजतो. बजबजपुरी निर्माण होते. तेच प्रदूषण आदी बाबतीत. काय काय करता येऊ शकते. काय सहज करता येऊ शकते. काय हळूहळू करता येऊ शकते. काय अशक्य असेल. जगण्याचा प्रवाह थांबणार नाही याची काळजी घेत काय करावे लागेल. कोणते उपाय व्यवहाराशी संबंधित आहेत. कोणते उपाय मानसिकतेची संबंधित आहेत. असा सगळा साधकबाधक विचार करत पुढे जावे लागते. केवळ प्रश्न, प्रतिप्रश्न यांनी साध्य काही होत नाही. तसे तर माणसाचे मरणे हेच प्रदूषण आहे. पण मरण थांबवता येईल का? त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावावीच लागेल. त्यात बदल, सुधार ही एक अखंड प्रक्रिया आहे. जे जे लक्षात येईल ते सांगत, समजावत बदल होत राहतील. पण फटाके एकदम बंद करता येऊ शकतात. त्याने जगण्यात अडथळा नाही येत. स्वयंचलित वाहने प्रदूषण करतात. पण ती एकदम टाकून देता येणार नाहीत. मात्र मोटारी, खाजगी वाहने यांची होणारी वाढ थांबवण्यात काही हानी नाही. खाजगी वाहने कमी करत न्यायला हवी. एकूणच एकांगी approach न ठेवता, विवेकी approach हवा.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०२२

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण

पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण या वेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन यात आधीचे जसेच्या तसे राखणे हे येते. पुनर्निर्माण यात जुन्याचा संबंध न सोडता नवीन निर्माण हे येते. जसे एखाद्या घराचे पुनरुज्जीवन म्हणजे अगदी ditto आधीसारखे. अन् पुनर्निर्माण म्हणजे परिस्थितीशी सुसंगत उभारणी. जुनं काही सामान वगैरे वापरता येऊ शकतं किंवा आठवण म्हणून काही जतन करता येऊ शकतं पण उभं होणारं नवीन घर जुन्या सारखं नसतं. पण जुन्याचा संबंधही तुटलेला नसतो.

घराप्रमाणेच राष्ट्राचेही असते. ती पुनर्निर्माण प्रक्रिया असते. जुनं हट्टाने धरून ठेवणे त्यात नसते. घराला जसे दारे खिडक्या नवीन पद्धतीच्या, वेगळ्या ठिकाणी वगैरे करतात; तसेच नवीन प्रथा, परंपरा तयार होतात. जुन्या धरून ठेवण्याचा अट्टाहास नसतो. नसावा. कारण पुनरुज्जीवन ही मृत साचलेली गोष्ट असते तर पुनर्निर्माण हा जिवंत प्रवाह असतो.

हे विवरण करण्याचं कारण म्हणजे येती दिवाळी. फटाके फोडण्याची परंपरा हट्टाने धरून ठेवणे किंवा फटाके न फोडणे म्हणजे अस्तित्वावर घाला वगैरे समजण्याचं कारण असू नये. प्रदूषण, पर्यावरण हे महत्त्वाचे विषय आहेतच. त्यात फटाक्यांचा वाटा असतो हेही खरे आहे. मग ती प्रथा सोडून देण्यात गैर काय? आक्षेपार्ह काय? त्यासाठी आक्रोश वा आक्रस्ताळेपणा का? अनेक गोष्टींना हे लागू होईल. सध्याचा विषय फटाके असल्याने त्याचा उल्लेख केला एवढंच.

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०२२

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

जागतिक अन्न दिवस

आज जागतिक अन्न दिवस आहे.

हजारो वर्षांपूर्वी भारताने 'अन्नं ब्रम्हेति' म्हणून अन्नाचा गौरव तर केलाच पण त्याचे मूलभूत महत्त्वही अधोरेखित केले. उपयुक्तता विचारातून एखाद्या गोष्टीचे महत्त्व असतेच. त्या गोष्टीबद्दल जबाबदारीची भावना आणि कर्तव्य भावनाही त्यातून काही प्रमाणात निर्माण होतेच. परंतु उपयुक्ततेसोबत त्याबद्दल पावित्र्याची भावना असेल तर त्या गोष्टींबाबत कृतज्ञता आणि सन्मान भावना देखील फार वरच्या दर्जाची उत्पन्न होते. अन्न दिनाच्या उपयुक्ततेला भारताने अन्नाला दिलेल्या पावित्र्याची जोड देऊन ती जगभरात रुजवू या.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२२

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

दुर्लक्ष करावे

हरी नरके यांनी डॉ. कलाम यांच्याबद्दल आज काही विधान केले. त्यावर नाराज झालेल्या अनेकांनी नरके यांच्यावर विचित्र टीका केली आहे. एक विचारावं वाटतं की, अशा प्रतिक्रिया डॉ. कलाम यांना आवडल्या असत्या का? डॉ. कलाम यांनी ज्या माणसाची, ज्या भारतीयाची अपेक्षा केली होती त्याला धरून ही टीकाटिप्पणी आहे का? संयम सोडणे, आक्रस्ताळेपणा, कर्कशपणा, काही म्हटलेलं अजिबात सहन न होणे; हे कशासाठी? डॉ. कलाम वा तत्सम अन्य कोणी आणि त्यांनी मांडलेले विचार, केलेल्या अपेक्षा यांचे आम्ही फक्त प्रचारक आहोत की अनुयायी? दुर्लक्ष करण्याची आणि विरोध सुद्धा सौम्य परंतु ठाम करण्याची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक वेळी अवास्तव आक्रमकता योग्य नसते. हातावर बसलेली माशी उडवायला तलवार काढणे हास्यास्पद असते.

- श्रीपाद कोठे

१५ ऑक्टोबर २०२२

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

प्रसार माध्यमांचा वकूब

सरसंघचालकांच्या विदर्भ संशोधन मंडळातल्या भाषणावरून घमासान चर्चा सुरू आहे. ते भाषण आत्ता ऐकलं. त्यावरच्या कमेंट्स आणि चर्चा यावर काही बोलणार नाही. तसंच त्यावर काही लिहावं की नाही यावरही अजून विचार केलेला नाही. पण एक मात्र नक्की नमूद करावं वाटतं की, ते भाषण समजण्याची कुवत आणि क्षमताही फार थोड्या लोकांची असेल. कार्यक्रम कव्हर करायला जाणारे जे बातमीदार असतात त्यांची तर ती क्षमता अजिबातच नसते. वाईट वाटेल पण अगदी थोडे सन्माननीय अपवाद वगळता संपादक मंडळीही त्यासाठी तोकडीच पडतील. पत्रकारितेच्या क्षेत्रात आज असलेली बहुतांश मंडळी अशा विषयांच्या अन् भाषणांच्या दृष्टीने अतिशय सुमार आहेत एवढे नक्की. बाकी एका वृत्तपत्राने त्यात केलेले खोडसाळ राजकारण खरे असले तरीही, पत्रकारांचा बौद्धिक वकूब चिंता करण्यासारखा आहे एवढं खरं. समाजाने प्रसार माध्यमांवरील आपले बौद्धिक अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०२२

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

Black money declaration

black money declaration च्या काल संपलेल्या योजनेत ६५ हजार कोटी रुपये एवढा काळा पैसा उघड झाला आहे. सुमारे ६५ हजार नागरिकांनी हा जाहीर केला आहे. हा आकडा वार्षिक अर्थसंकल्पाच्या ३-४ टक्के आहे. यातून सुमारे ३० हजार कोटी रुपये सरकारला करापोटी मिळणार आहेत. हा आकडा सुमारे १.५-२ टक्के एवढा आहे. हा आकडा फार मोठा नक्कीच नाही. पण तो लहानही नाही. चिदंबरम यांनी देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती, तो आकडा ६०-६५ हजार कोटी एवढाच होता. ठीक आहे. छोट्या प्रमाणात का होईना, काहीतरी सकारात्मक घडले.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

सर्जन- विसर्जन

आजपासून १० दिवसांचे शक्तीपर्व सुरु झाले. मां वैष्णोदेवी पासून मां कन्याकुमारी पर्यंत आणि मां कामाख्या पासून मां अंबादेवी पर्यंत संपूर्ण भारतभर, सगळ्या प्रांतात शक्तीचा हा जागर चालणार आहे. गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गापूजा आणि उत्तरेतील रामलीला यांची चर्चा होते. त्यांचे मार्केटिंग देखील चांगले झाले आहे. त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहेत. मराठी लोकांना घटस्थापना माहिती आहे. मात्र सगळ्या प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे शक्तीपर्व साजरे होते. अगदी दक्षिणेतील पाच प्रांतात सुद्धा.

या सगळ्या प्रकारच्या शक्तीपूजेत कुठे ना कुठे मातीचा संबंध आहे. घट या स्वरुपात, दुर्गा प्रतिमा या स्वरुपात किंवा तामिळनाडूतील कोलू बाहुल्या अथवा शेती अवजारांच्या पूजेच्या स्वरुपात. माती हे सर्जन आणि विसर्जन दोन्हीचं प्रतिक आहे. संपूर्ण जीव सृष्टीचं सर्जन मातीतून होतं आणि त्याचं विसर्जन सुद्धा मातीतच होतं. सिमेंटकॉंक्रीट किंवा टाईल्स किंवा फरशा यातून सर्जनही होत नाही, अन त्यात विसर्जनही होत नाही. शक्तीपूजा हे सर्जन-विसर्जन यांचं केवळ प्रतिक बनून राहू नये. शक्तीपूजा जीवनाचा, जगण्याचा भाग बनावी. आपल्या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये हे सर्जन-विसर्जन आहे. अगदी देवांचं सुद्धा. याचा आशय खूप मोठा अन जीवनव्यापी आहे. त्याचा जेवढा विचार माणूस करत जातो, तेवढं ते त्याच्या क्षणोक्षणीच्या जीवनात झिरपत जातं.

या सणांच्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने त्यांच्यामागील भावांचं कालसुसंगत प्रतिपादन सुद्धा सयुक्तिक असतं. सध्याच्या काळात सर्जन आणि विसर्जन यांचं प्रतिक असलेल्या मातीकडेच लक्ष वेधण्याची गरज आहे. अनेक प्राणी, पक्षी लुप्त होत आहेत. त्याविषयी जागृती आणि त्यांचं संगोपन यांचा प्रयत्नही सुरु झालेला आहे. हळूहळू मातीही लुप्त होईल का असा प्रश्न भेडसावू लागला आहे. शहरांमध्ये तर तशी वेळ आलेलीच आहे. सर्जन आणि विसर्जन यांचा आधार असलेली माती आता विकत घेतली जाऊ लागली आहेच. आपले अहंकार, आपले दंभ, आपले दर्प, आपली कथित सौंदर्यदृष्टी, आपला कथित आरोग्यविचार, आपले तथाकथित विकासधोरण यांनी आपण आणि माती यांची तोडलेली नाळ या शक्तीपूजेनिमित्त पुन्हा जोडून घेऊ या. विकास, आनंद, celebration इत्यादी ज्या आपल्यासाठी आहे; त्या आपलेच अस्तित्व उरणार नाही अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल तर; ज्या मातीतून आपण आलो आहोत आणि ज्या मातीत पुन्हा परतून जायचं आहे; त्या मातीशी जोडून घेऊ या.

जगदंबा आम्हाला तशी शक्ती, बुद्धी, युक्ती देवो.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

समता

समता !! काय आहे समता? समता ही मनाची एक उच्च अवस्था आहे. संपूर्ण समता हीच वास्तविक माणूस गाठू शकेल अशी सगळ्यात उन्नत अवस्था आहे. and it has to be attained. कोणतीही कारणे असोत, पण आम्ही मात्र तिला अवस्थेऐवजी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहोत. गेल्या कित्येक दशकांचा किंवा वैश्विक पातळीवर बोलायचे तर गेल्या काही शतकांचा या प्रयत्नांचा परिणाम मात्र अपेक्षेच्या नेमका विरुद्ध आहे. कारण जी बाब आंतरिक आहे, जिच्या साहाय्याने माणसाची आतली उंची वाढत जाऊन परिणामी बाह्य व्यवहार स्पृहणीय होऊन जाईल, त्या आंतरिक गुणसमृद्धीला आम्ही बाह्य व्यवहाराचा मापदंड ठरवला. आंतरिक गुण समुच्चयाच्या परिणामी बाह्य व्यवहार परिष्कृत व्हावा याऐवजी, धरून बांधून केलेल्या बाह्य व्यवहारावरून आंतरिकता जोखण्याने; खोटेपणा, फसगत, फसवणूक, लबाडी, उथळपणा हे सारे ओढवून घेतले आणि आंतरिक गुणसमृद्धीच्या ठिकाणी गुणात्मक अधोगती पदरात पाडून घेतली. समता ही बाह्य व्यवहाराचा मानदंड स्वीकारून आम्ही- १) भावना शांतवणारे भारतीय शास्त्रीय संगीत आणि भावना उत्तेजित करणारे संगीत यांना एका पातळीवर आणले, २) लहान मुले आणि वृद्ध यांना समान ठरवून त्यांच्या अधिकार आदींची भंपक मांडणी केली, ३) स्त्री आणि पुरुष समान ठरवून दोघांनाही स्वाभाविक विकासापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ४) साधने, अनुभव, वातावरण यातील फरक लक्षात न घेता ग्रामीण आणि शहरी लोकांना एकाच पारड्यात तोलू लागलो, ५) शेती आणि उद्योग यांना सारखेच मापदंड लावण्याचा वेडा अट्टाहास धरू लागलो, ६) ज्ञान आणि चावटपणा यांची गल्लत समाजाच्या माथी मारू लागलो, ७) शत्रू आणि मित्र ओळखण्याची दृष्टी गमावून बसलो, ८) जीवनातील उदात्त आणि शाश्वत गोष्टींसाठी बाजी लावणारे आणि बटबटीत हिंसक जीवनवादी यांना एकाच दृष्टीने पाहू लागलो. आंतरिक विकासाच्या असंख्य शक्यता, भावनांचा, जाणिवांचा विकास बाधित केला. परंतु मानवी विचार व्यवहाराच्या अन्य सगळ्याच बाबींप्रमाणे या बाबतीतही होते आहे. आम्हाला काय हवे आहे अथवा काय वाटते याने; आमच्या विचार व्यवहाराचे होणारे परिणाम आकार घेत नाहीत. कारण आम्ही `सत्याचा' शोध घेण्याऐवजी, `सत्याचा' मार्ग अनुसरण्याऐवजी आम्हाला काय वाटते याचा दुराग्रह धरून ठेवलेला आहे. आयुष्यभर `सत्याचा' आग्रह धरणाऱ्या महात्म्याची उद्या जयंती आहे. सगळ्यांना `सत्यमार्गाची' आस लागो हीच त्या महात्म्याने कधीही ज्याचा हात सोडला नाही त्या ईश्वराला प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१८

रक्तदान

आज राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे पण रक्तदान करता आलं नाही याची रुखरुख आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त  स्वतःच्या जन्मदिनाला दरवर्षी रक्त द्यायचं असं ठरवलं. आजवर तसं होतही आलं. त्याशिवाय वर्षातून एक दोनदा मागणीनुसार देत आलो. आतापर्यंत ५० वेळा देऊन झालं आहे. ६० चा आकडा गाठण्याची इच्छा आहे. अजून पाच वर्ष हाती आहेत. तीन चार महिन्यांपूर्वी रक्तपेढीतून फोन आला. त्याप्रमाणे गेलो. पण पहिल्यांदाच त्यांनी परत पाठवलं. हिमोग्लोबिन कमी आहे म्हणाले. मला हरकत नव्हती. म्हटलं, ही काही मोठी गोष्ट नाही. हिमोग्लोबिन लवकर पूर्ववत होईल. त्यांनी मात्र नकार दिला. आशा करतो की हिमोग्लोबिन लेव्हल त्यांना समाधानकारक होऊन पुन्हा रक्त देता येईल आणि ६० पर्यंत पोहोचता येईल. यातील 'मी'कडे दुर्लक्ष करून सदिच्छा असू द्याव्या.

सध्या देशभरातील रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या ०.९० टक्के एवढीच आहे. ती वाढायला हवी. त्यामुळे सगळ्या सुदृढ महिला पुरुषांनी वर्षाला एकदा तरी रक्त देण्याचे ठरवावे. एखादा दिवस निश्चित करता येऊ शकेल. आजकाल रक्त न देता प्लेटलेट्स देता येतात. माझा भाचा गेली काही वर्षे देतो आहे. त्याला रक्त देण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पण दोन दानामधील काळ कमी असला तरी चालतो. त्यामुळे अधिक लोकांची गरज पूर्ण करता येते. ज्याला जे योग्य वाटेल त्यानुसार करावे. सगळ्यांनी पुढाकार घ्यावा.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१९

मर्यादा

व्यक्तिगत संबंधांमध्ये मा. न्यायालये आजकाल खूप निर्णय देतात आणि मतप्रदर्शन पण करतात. यावर साधकबाधक विचार झाला पाहिजे. व्यक्तिगत संबंध हे केवळ व्यक्तिगत असतात म्हणून नाही, तर त्यांचे स्वरूप असे असते की, ते सरसकट कायद्याने define करता येत नाहीत. शिवाय त्यातील अनेक खाचाखोचा कितीही बुद्धिमान वकील किंवा न्यायाधीश असले तरीही लक्षात येतील वा समजतील असेही नसते. गुण, अवगुण, गरजा, परिस्थिती, क्षमता, स्वभाव, अन् या सगळ्यांची व्यक्तिगत संबंधात असलेली सरमिसळ ही कठोर चौकटीत बसवता येईल का? त्यामुळे व्यक्तिगत संबंधातील समस्या हाताळण्याचा वेगळ्या पद्धतींवर भर दिला पाहिजे. न्यायालयांनी देखील लोकांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. तसेच शक्यतो अशा केसेस दाखल करून घेण्यास नकारही द्यावा. छोट्या मोठ्या गोष्टीत किमान समजूतदारपणा न दाखवणाऱ्या लोकांसाठी न्याय व्यवस्थेने तरी आपला वेळ आणि ऊर्जा का खर्च करावी?

अशाच प्रकारे सरकारने काय करावे आणि करू नये याचाही विचार व्हायला हवा. जुन्या इमारती कोसळतात. त्यावेळी जुन्या इमारतींची तपासणी करण्याचे आदेश इत्यादी देण्यात येतात. त्याप्रमाणे तपासणी होते का आणि त्याचे पुढे काय होते हे ठाऊक नाही, पण या खाजगी इमारतींची तपासणी सरकारने का करावी? जोवर प्रत्यक्ष, दृश्यमान स्वरूपात समाजाला त्याचा त्रास नसेल तोवर सरकारला त्यात लक्ष घालण्याचे काय कारण? कारण जुन्या इमारतींची देखभाल इत्यादीमध्ये पुष्कळ गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. त्याची आर्थिक बाजू ही तर फारच महत्त्वाची असते. सगळ्या खाजगी जुन्या जीर्ण इमारतींची डागडुजी, बांधणी, देखभाल इत्यादी खर्च आणि अन्य बाबी सरकार करेल का? ती जबाबदारी जर सरकार घेत नसेल तर उगाच त्या लोकांमागे सरकारी ससेमिरा का लावायचा? ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडावे. आपल्या मर्यादा ओळखाव्या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

संस्कृती, व्यवस्था, कायदे, नियम, उत्तेजन, धोरणे, सल्ला, उद्दिष्टे, इत्यादी अनेक उपायांनी समाजाला सुशासित ठेवता येते, पण ते समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी लागणारी क्षमता राज्यकर्त्यांच्या ठाई अभावानेच आढळते...

कळप नसावे

सध्या प्राजक्ता माळी या अभिनेत्रीच्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे. तिला हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्नही होतो आहे. ज्यांना हिंदुत्वाला विरोध करायचा आहे त्यांनी तसे करणे ठीक आहे पण ज्यांचा हिंदुत्वाला विरोध नाही त्यांनी प्राजक्ताचे हिंदुत्ववादी projection करू नये. याच प्रक्रियेतून गांधी काँग्रेसचे, आंबेडकर दलितांचे, टिळक सवर्णांचे असे होत जाते. सावरकर हिंदूंचे याचीही प्रक्रिया अशीच असेल. मुळात या सगळ्या महापुरुषांचे विचार, भावना यांचे आवाहन अखिल मानवजातीसाठी आहे. त्यांच्या धोरणाबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु त्यांना कळपात ढकलणे हे जेवढे चुकीचे तेवढेच त्यांना कळपात स्वीकारणे हेही अयोग्य. ने मजसी ने परत मातृभूमीला... ही प्रभू रामापासून सावरकरांपर्यंत एक परंपरा आहे. तो भारताचा इथॉस आहे. विरोधकांनी असो वा समर्थकांनी त्याचा कळप बनवू नये. विचारांना, भावनांना आणि महापुरुषांना लहान करू नये. तसे न केले तर बाजू थोडी पडती झाल्यासारखे वाटेल, कळप तयार केला तर थोडा पुरुषार्थ केल्यासारखे वाटेल, संघर्षाची अन् विजयाची थोडी खुमखुमी जीरेल; पण तेवढेच. त्यापेक्षा अधिक काही नाही. आपण सगळेच मोठं होण्याचा प्रयत्न करू या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

चीड

चीड यायलाच हवी कधीकधी. प्रत्येक वेळी समजून घेण्याचा अतिरेक नकोच. अर्थात राग, चीड हेही प्रमाणात हवे. पण हवेच. कोणत्याही कारणाने अन्न बाहेर टाकणाऱ्यांबद्दल चीड यायलाच हवी. १) अन्नाचा अपमान, २) अस्वच्छता, ३) दुसऱ्यांना त्रास; यासाठी कारण ठरणाऱ्या लोकांची चीडच यायला हवी. अन्नाला आपण खूप महत्त्व देतो. सगळ्यांनी पोटभर जेवले पाहिजे (कधीकधी पोटापेक्षा जास्त झाले तरी चालेल पण आग्रह करायचा) ही आपली वृत्ती असते. कोणाला उपाशी ठेवले तर शाप लागतील असे आपल्याला वाटते. परंतु या वृत्तीचा अतिरेक झालेला आहे की काय असे वाटते. दोन घास कमी जेवावे पण अन्न टाकण्याची वेळ येऊ नये, असे सांगण्याची वेळ आलेली आहे. पाहुणे असतील तर त्यांना दोन घास कमी खाऊ घालावे किंवा स्वतः दोन घास कमी खावे पण अन्न रस्त्यावर, उघड्यावर, टाकू नये. भूकेचे शाप लागत असतील तर अन्नाचे शाप लागत नाहीत का? आपल्याला मोठाल्या मोटारी हव्यात, महागडे फोन हवेत पण वृत्ती मात्र गावंढळ. आपल्याला भूकेचे शाप नकोत पण अन्नाचे चालतात. मुळात आपण ग्राम संस्कृतीतून एका वेगळ्या नागर संस्कृतीत आलेलो आहोत. गाय खाऊन घेते, कुत्री खाऊन घेतात वगैरे करणं आपल्याला शोभत नाही. कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा यजमानाला सांगितले पाहिजे - अपेक्षित लोकांपेक्षा दहा वीस कमी संख्येचा स्वयंपाक करा. वेळेवर कमी पडलं तर काय करायचं याची पद्धत विकसित करायला हवी. कारणं सांगत अन्न फेकून वा टाकून देण्याची सवय मोडली-च पाहिजे.

अन् अन्न बाहेर टाकून दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या, अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांबद्दल आपला कटाक्ष तिटकाऱ्याचाच असला पाहिजे. मोक्ष वगैरे नाही मिळाला तरी चालेल.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२३

द्वेष प्रवचन

आज राहुल गांधी केरळमध्ये जे बोलले त्याचं मी स्वागत करतो. द्वेष करणं सोपं आहे पण योग्य नाही. त्याने राष्ट्र निर्माण होत नाही, असं ते म्हणाले. हे विचार योग्यच आहेत. फक्त एक प्रश्न विचारावा वाटतो की, त्यांचे हे विचार त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक अन् ते स्वतः यांच्यासाठीही आहेत की नाहीत. म्हणजे द्वेष बाकीच्यांनी केला तर वाईट पण आपण केला तर वाईट नाही, असे तर नाही ना? कारण महात्मा गांधीजींच्या हत्येपासून, तर आणीबाणी, त्यानंतर इंदिरा गांधी यांना झालेली अटक, नागपूरचे nsui अधिवेशन ते तहत श्री. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात येईपर्यंत; देशाचा अनुभव शंका घेण्यासारखा आहे. अन् देशाचा अनुभव केवळ ऐकीव नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या अटकेनंतर तर घरावर दगड आल्याचेही अनुभवले आहे. तेव्हा राहुलजींनी त्यांचे विचार थोडे आणखीन स्पष्ट केले तर बरे. अन् रोजच संघावर तोंडसुख घेत असतानाच आपण संघाचा द्वेष करतो की नाही हेही सांगून टाकावे. संघाचा द्वेष करत नसतील तर मोठे मन दाखवून नागपूरला भेट घ्यायला येणार का? तसेही त्यांचे भाऊ वरुणजी नागपूर संघाच्या उत्सवात आले होतेच. त्यामुळे संघाला गांधींचे वावडे नाहीच. आता आपल्याला संघाचे वावडे नाही, आपण संघाचा द्वेष करत नाही हेही स्पष्ट झाले तर दुधात साखर.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२२

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

भैणी साहिब

GNT नावाची एक वृत्तवाहिनी आहे. त्याचा full form आहे good news today. नाव इंग्रजी असलं तरी आहे हिंदी वाहिनी. त्याच्यावर पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील भैणी साहिब इथली माहिती दाखवली. तिथे बारावीपर्यंतच्या सगळ्या मुलामुलींना शास्त्रीय संगीताचं शिक्षण अनिवार्य आहे. गेल्या शंभर वर्षांपासून ही पद्धत आहे. मुलेही आवडीने शास्त्रीय संगीत शिकतात. काही मुलांनी जे शिकलो त्याची थोडी झलक दाखवली. तीही फार छान होती. सगळी मुले पुढे जाऊन गायक, वादक होणार नाहीत. पण किमान सगळ्यांचा कान आणि मन तयार होतं. गोडी लागते. अन् अनायासे शास्त्रीय संगीताची भरपूर माहिती तर होतेच होते.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०२२

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

अधीरता आणि गाणी

अधीरता (anxiety), धीराचा अभाव ही अलीकडे मोठी समस्या झाली आहे. या समस्येला खतपाणी घालणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये, आजकालची गाणी हे देखील एक कारण आहे. त्यातील शब्द, नृत्य या गोष्टी तर आहेतच पण ताल/ ठेका/ तालवाद्यांचा वापर हा खूपच मोठा भाग आहे. सामान्य आवाजात सुद्धा ऐकली तरीही त्यांचा परिणाम विपरीतच होतो. शिवाय न ऐकणाऱ्यांना त्रास हा भाग वेगळाच. घराघरात यावरून होणारे वाद हा आणखीन एक मुद्दा. शिवाय दुसऱ्यांचा विचार करणे म्हणजे पाप ही समजूत. अशा स्थितीत या गाण्यांच्या निर्मितीवरच बंदी का घातली जात नाही? हेही तर प्रदूषणच आहे नं? गाड्यांच्या प्रदूषणासाठी हजारो रुपयांचा दंड करता येऊ शकतो तर या प्रदूषणासाठी काहीच का नाही? अशी गाणी वाजवणारे 'माणूस' म्हणण्याच्याही लायकीचे नाहीत एवढे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

२४ सप्टेंबर २०१९

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कष्ट आणि पैसा

वर्तमान व्यवस्थेत केवळ लोकसंख्येचे केंद्रीकरण होत नाही तर; संपत्तीचे, सत्तेचे, निर्णय प्रक्रियेचे, उद्योगांचे, शहरांचे, साधनांचे, बुद्धिमत्तेचे; सगळ्याच गोष्टींचे केंद्रीकरण होते. संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याने आर्थिक विषमता सतत वाढत राहते. यातून एकीकडे १०२ कोटी रुपये रोज मिळवणारे बोटावर मोजण्याएवढे लोक निर्माण होतात तर, दुसरीकडे अनेक पिढ्या मिळूनही १०२ कोटी रुपये ही स्वप्नापलीकडील बाब ठरणारे बहुसंख्य तयार होतात. यातून खोटी स्वप्ने, फसवे प्रयत्न, खोटी प्रतिष्ठा तयार होत जातात. जगण्यासाठी लागणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी अधिक पैसा गाठीशी असणारे तरीही पैशाकडे धावत राहतात. त्या पैशाचे काय करणार? काय करायचे? कशासाठी? हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. पैसा हे एक व्यसन होऊन जाते. अन् ज्यांना जगताना ओढाताण करावी लागते त्यांचा सगळा वेळ त्यातच जातो. त्यांची दृष्टीही अपरिहार्यपणे, नाईलाजाने पैशाकडेच असते. जीवनाचे अन्य पैलू त्यांनाही लाभत नाहीतच.


अब्जावधी रुपये कमावणारी माणसे आपल्या कष्टाने तो कमावतात. कोणाला त्यावर आक्षेप का असावा, असा वरवर बिनतोड वाटणारा प्रश्न केला जातोच. परंतु त्यांच्या या कष्टाची तुलना कष्टकरी व्यक्तीच्या कष्टाशी होऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या तथाकथित कष्टात आणखीन काय काय मिसळलेले असते तेही ध्यानात घ्यावे लागतेच. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक शोषण किती होते; विविध ठिकाणी लाच, चापलुसी, दबाव, धमक्या इत्यादींचा वापर किती होतो; वलयाचा गैरफायदा किती घेतला जातो; संबंध कसे तयार केले जातात आणि वापरले जातात; या सगळ्याचा विचार केला तर; रोज करोडो रुपये कमावणाऱ्या लोकांच्या तथाकथित कष्टाची काळी बाजू आपोआप स्पष्ट होते. याशिवाय त्यांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षा समाजातील अन्य घटकांवर जो अप्रत्यक्ष अन्याय करते तोही गुन्हेगारीपेक्षा कमी म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०२२

(अनिवासी भारतीयांच्या बाबत आज प्रकाशित एक बातमी वाचल्यावर एकूण वर्तमान अर्थकारणात बद्दल आलेले विचार.)

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

योग नव्हे योगासन

गोष्टी सोप्या करत जाण्याला मर्यादा असावी. फार जास्त सोपिकरण गोंधळ आणि विकृती निर्माण करतात. कठीण गोष्टी समजून घेण्याची वृत्ती हवी. त्याने आपलीही उंची वाढते. उदाहरण म्हणून - योग - हा शब्द घेता येईल. योग म्हणजे कसरती नाहीत. पण हल्ली योग करतात म्हणजे कसरती करतात एवढाच अर्थ झाला आहे. मग वेगळं सांगावं लागतं की, योग म्हणजे काय ते. त्यामुळे मी किंवा ते किंवा ते किंवा ते योग करतात असे न म्हणता/ बोलता/ सांगता; योगासन करतो/ करतात असं प्रचलित करावं.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०२२


संघशाखेत विनोबाजी

संघ कार्यालयात राहणारे ज्येष्ठ प्रचारक शंकरराव तत्ववादी यांनी लिहिलेली एक आठवण काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. भूदान आंदोलनाच्या वेळी देश भ्रमण करताना, १९६० मध्ये विनोबा भावे काशीला गेले होते. त्यांना संघाच्या शाखेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आणि ते स्वीकारून विनोबा काशी येथील संघाच्या शाखेत गेले होते. तिथे थोडा वेळ बोलले होते. ही आठवण लिहिणारे शंकरराव यांनी स्वतः त्या कार्यक्रमात गीत म्हटले होते. एक ऐतिहासिक तथ्य म्हणून ही आठवण महत्त्वाची आहेच, पण भारत जोडो म्हणजे काय किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजे काय किंवा साधे सहजीवन म्हणजे काय; हे सांगणारी ही आठवण आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विनोबांना बोलावणे आणि विनोबांनी शाखेत जाणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. ही आठवण लिहिताना शंकररावांनी विनोबांचा उल्लेख पूज्य विनोबा असा केलेला आहे हेही आवर्जून सांगितले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०२२

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

जगणं म्हणजे

माणूस जगतो, वागतो म्हणजे काय? खूपदा वर्णन केलं जातं- जन्म आणि मृत्यू यांच्या मधील काळ म्हणजे जगणं. तरीही जगणं म्हणजे काय याचा उलगडा होत नाहीच. जो जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? त्यामुळे हे वर्णन फार काही पदरात टाकत नाही. मग जगतो, वागतो म्हणजे काय? तर जगणे, वागणे म्हणजे respond करणे. अगदी आईच्या पोटातून निघालेल्या बाळापासून तिरडीवर ठेवण्याच्या अवस्थेपर्यंतचा माणसाचा प्रवास म्हणजे रिस्पॉन्स देणे. प्रत्येक क्षण म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिसाद !! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजांना प्रतिसाद. अगदी कोणतीही कृती घ्या किंवा कोणताही विचार घ्या; कशा ना कशाला दिलेला तो प्रतिसाद असतो. आपण प्रत्येक जण जिला प्रतिसाद देतो, ती साद येते कोठून? ती आपल्याच आतून येते. भूक लागली की आतून साद येते. प्रश्न पडतो तो आतून येतो. कोणतीही गरज जाणवते ती आतून जाणवते आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण कृती वा विचार करतो. ही प्रत्येकाला येणारी साद वेगळी असते. म्हणूनच एकाच वातावरणात राहणारे वेगवेगळा प्रतिसाद देतात. एखादं निसर्गदृश्य किंवा चित्र किंवा अपघात किंवा घटना किंवा काहीही; त्याला किती प्रकारांनी प्रतिसाद मिळतो. का? कारण त्या बाह्य सादाला दिलेला आतला प्रतिसाद वेगळा असतो. हा आतला प्रतिसाद पुन्हा आपल्याला साद घालतो आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देतो. ही आतल्या - बाहेरच्या साद आणि प्रतिसादाची एक अखंड मालिका म्हणजे जीवन. हे प्रतिसाद आपल्या गरजा भागवण्यासाठी असतात. गरज भागली की प्रतिसाद थांबतो वा बदलतो. यातूनच सुखदु:ख, हर्षविषाद, आकर्षण अपकर्षण, उत्साह निराशा; एवढंच काय सगळं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक, शिक्षण, कला, साहित्य सगळं सगळं आकाराला येतं. सांगण्याची गरजसुद्धा साद घालते आणि त्यातून साहित्य, ग्रंथ आकाराला येतात. कला जन्म घेतात. अनेकानेक व्यवस्था याच गरजांना दिलेल्या प्रतिसादातून विकसित होतात. आपल्या गरजांचे प्रकार आणि प्रमाण यानुसार आपण विविध व्यवस्था, संघटना, गट इत्यादीत सामील होत असतो. अन गरज पूर्ण झाली की त्यातून बाहेर पडतो. एवढेच काय त्या त्या व्यवस्थेत, गटात वा संघटनेत, संस्थेत सुद्धा गरजेप्रमाणे बदल घडवून आणतो. अन आपल्याला suit होईल त्याप्रमाणेच त्यांचे आचारविचार पाळतो. याला कोणीही अपवाद नाही. कोणता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आपापल्या धार्मिक आज्ञा वा नियम आदी काटेकोरपणे पाळतो? कोणता कम्युनिस्ट कम्युनिझमच्या तत्वांचे तंतोतंत पालन करतो? किती कम्युनिस्टांनी व्यक्तिगत संपत्तीचा त्याग केलेला आहे? किती जण आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यघटना वाचली आहे? अन पूर्ण राज्यघटना वाचणाऱ्यांपैकी किती जण रोज ती वाचत वाचत आपले दैनंदिन व्यवहार करतात? जेव्हा कुठेही कधीही व्यवहाराचा संघर्ष होतो तेव्हा, घटना म्हणा, कायदा म्हणा, धर्मग्रंथ म्हणा वा कोणताही प्रमाणग्रंथ काढून त्यानुसार चर्चा सुरु होते. पण तेव्हाही फक्त चर्चाच. वरचढ ठरतात गरज आणि तिला द्यावयाचा प्रतिसाद हेच. मग काय, हे सगळे ग्रंथ, शास्त्र, घटना, व्यवस्था, संस्था, संघटना, रचना निरर्थक म्हणायच्या? नाही. त्या निरर्थक नक्कीच नाहीत. नसतात. ते वरवर चढतानासाठी आधाराचे कठडे असतात. आपल्यापूर्वी जे चढले त्यांनी तयार केलेले. तोल जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग. तसेच त्याला टेकून अंमळ दम खाता येतो. अन त्याच्या आधारे थोडे थांबून किती चढलो याचा अंदाज घेता येतो. मात्र कठडा म्हणजे शिखर नाही. जगणे म्हणजे कठडा धरून ठेवणे नाही. जगणे म्हणजे शिखर सर करणे. शिखर गाठणे. अन प्रत्येकाला हे शिखर गाठावे लागते. इतके लोक चढले, असं म्हणून भागत नाही. आपल्या पूर्वी अनेकांनी शिखर गाठले म्हणून थांबता येत नाही. आपल्या पूर्वीचेही चढले, आपल्यालाही चढायचे आहे आणि आपल्यानंतरचेही चढणारच आहेत. नव्हे शिखर चढणे हीच होऊन गेलेल्या, असलेल्या वा येणाऱ्या सगळ्यांची नियती आहे. अन प्रत्येकाला चढाईची ही सुरुवात पहिल्या पावलानेच करावी लागणार आहे. ही relay race नाही. हे शिखर सतत साद घालत असते आणि आपण त्याला प्रतिसाद देत पुढे पुढे चालत असतो. ग्रंथ, गट इत्यादी आधाराला घेऊन. शिखर चढताना असंख्य वाटावळणे. कधी वाटतं आलं शिखर अन पोहोचावं तर लक्षात येतं किती फसगत झाली ते. मग कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून बोटे मोडणे, नावे ठेवणे, आणखीन किती चालायचे आहे? असे प्रश्न उपस्थित करणे; असे सगळे सुरु असते. पण थांबता येत नाही. कारण शिखराची साद थांबू देणार नसते. शिखर गाठेपर्यंत. हो- अज्ञात शिखर गाठेपर्यंत. शिखर गाठले की मग सगळं निवांत...!!! ना प्रतिसाद देणे, ना कठडे धरणे.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१७

पाणीपुरवठा

निसर्ग सध्या भरपूर पाणी देतो आहे. बहुतेक सगळीकडे साठवण क्षमता उरलेली नाही. आणखीन मिळणारे पाणी साठवण्यासाठी असलेले वापरावे लागेल. त्यामुळे रोज पाणीपुरवठा करावा. परंतु पाऊस थांबल्यावर, पुढचे चार-पाच महिने एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. असे केल्यास उन्हाळ्यात रोज पुरवठा करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील आणि पुढील मान्सून विलंबाने आला तरीही फार ओढाताण होणार नाही. पुढले चार-पाच महिने पाण्याची गरज तशीही कमी असते. रोज पाणी देऊन लोकांची वाया घालवण्याची सवय पोसण्यापेक्षा एक दिवसाआड देऊन पाणी वापराला थोडी शिस्तही लावता येईल.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१९

कळकळ ठीक, समाजवाद नको

- वेळ आलीच तर मुले आई वडिलांनाही सांगतात, आमची जास्त काळजी करू नका.

- सरकारनेही कधी लोकांवर असं सांगण्याची पाळी आणू नये.

- समाजाविषयीची कळकळ आणि समाजवाद या भिन्न बाबी आहेत. कळकळीच्या भावनेतून समाजवाद यायला नको.

- आपल्या देशात व्यवहाराची गरज म्हणून नियम आदी राहिले आणि सोबत जीवनाच्या आदर्शांचा जागरही राहिला. त्यातून व्यक्ती आणि समाज यांचं संतुलन साधण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.

- आज आदर्शांचा जागर मोडीत काढून केवळ नियमांच्या आधारे समाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न होतो. तो अपूर्ण, चुकीचा, अयोग्य आणि घातक आहे.

- व्यक्तीने समाजाची आणि समाजाने व्यक्तीची बूज राखली तरच शांति आणि संतुलन राहील. वरचढ होण्याचा प्रयत्न विनाशकारी.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१९

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

भोंदू संतांची यादी

संत समाजाने (???) भोंदू संतांची यादी जाहीर केल्याची एक बातमी आज वाचली. गमती किती प्रकारच्या असू शकतात याची मौज वाटली. परंतु हा प्रकार इथेच थांबला तर बरे, असेही वाटले. आजच्या एकूणच engineered thought process मध्ये ज्या मुलभूत गडबडी आहेत त्यावर व्यापक चर्चा होऊन विचारपद्धतीला नवीन वळण लावण्याची गरज आहे. १) `जगणं' ही गोष्टच मुळात मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही बाबींनी मिळून साकारली आहे. २) त्याचा एक भोग पक्ष आहे, तर एक भाव पक्ष आहे. ३) परस्पर विरोधी किंवा चांगल्या आणि वाईट, हव्या असलेल्या आणि नको असलेल्या; अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती ही एकच क्रिया असते. एकाच क्रियेचा एक भाग हवासा आणि एक नकोसा असतो. एक भाग चांगला तर दुसरा वाईट असतो. वाईटाशिवाय चांगलं किंवा नकोशा गोष्टीशिवाय हवीशी गोष्ट; हे असंभाव्य आहे. `जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात' हे शाश्वत सत्य आहे. हवा असणारा प्राणवायू घेणे आणि त्याचाच नको असलेला कार्बन डायऑक्साईड तयार होऊन त्याचा त्याग करणे; ही एकच क्रिया आहे. सुग्रास अन्नाचे आंबलेले अन्न होणारच. कितीही पौष्टिक अन स्वादिष्ट अन्न खाल्ले तरीही त्यातून त्यागण्याच्याच योग्यतेची विष्ठा तयार होणारच. नव्हे ती व्हायलाच हवी. हे जसे मूर्त, दृश्य, आकलनीय गोष्टींच्या बाबतीत आहे; तसेच ते अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय गोष्टींच्या बाबतीतही असते. मात्र त्यांच्या अंगभूत मर्यादांमुळे मूर्त, दृश्य, आकलनीय भोग पक्षाचे चौकटबद्ध शास्त्र बनवता येते. वास्तविक तेही वारंवार तपासून पहावे लागते आणि बदलावेही लागतेच. ते अंतिम नसते. त्याचे अर्थही वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे असतात. अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षाची तर गोष्टच वेगळी. त्याचे धड शास्त्रही बनवता येत नाही. चाचपडत चाचपडतच अनेक गोष्टी कराव्या लागतात. धरून बांधून त्यांची चौकट तयार करणे अनिष्ट आणि घातक ठरते. धर्म, आध्यात्म, साधना इत्यादी गोष्टी या अमूर्त, अदृश्य, अनाकलनीय भाव पक्षात मोडतात. त्यामुळे त्या चौकटबद्ध, संघबद्ध होऊ शकत नाहीत, होऊ नयेत. हिंदूंच्या धर्मविचारात ही फार महत्वाची गोष्ट आहे. या भाव पक्षाला चौकटबद्ध, संघबद्ध न केल्यानेच त्याचा अद्भुत विकास आणि विस्तार झाला. भारताबाहेरील धर्मविचार चौकटबद्ध, संघबद्ध असल्याने तो आध्यात्मिक उंची तर गाठू शकला नाहीच उलट, त्याने मूर्त आणि अमूर्त; भोग पक्ष आणि भाव पक्ष; दोन्ही बिघडवून टाकले. आमच्यावर कोणत्याही कारणाने साचलेली भारतेतर विचारांची पुटे खरवडून काढल्याशिवाय हे लक्षात येणे कठीण आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे. `आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही' किंवा `तुम्ही म्हणता त्यात आम्ही तुमच्यापेक्षा आघाडीवर आहोत' हे प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज नाही. चुकीच्या विचारांवर पोषित आजचा मानव समाज त्याच्या पद्धतीने मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करीत असतो. त्या जाणून फेकलेल्या अथवा अजाणपणे अंथरलेल्या सापळ्यात अडकणे योग्य नाही. आजच्या बातमीच्या संदर्भात बोलायचे तर `धर्म'संघ निर्माण करणे पूर्णत: चुकीचे. `धर्म'संघ, विश्व हिंदू परिषद, आखाडे, उपासना पंथ, आश्रम हे सारे वेगवेगळे आहेत. त्यांची गल्लत होऊ नये.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ११ सप्टेंबर २०१७

देव नसण्याची श्रद्धा

'`देव नाही' असे अद्याप कोणीही सिद्ध केलेले नाही. अगदी विज्ञानानेही. देव दिसत नाही, बोलत नाही म्हणून तो नाही. पण हे अनुमान झाले, सिद्धांत नाही. उलट `देव आहे', आपण तो पाहिला आहे, त्याच्याशी बोललो आहे, असे म्हणणारे अनेक आहेत. मुळात `देव' ही पाहणे, स्पर्शणे, ऐकणे याची बाबच नसून तो याच्या अतीत आहे असा तर्क करणारेही आहेत. थोडक्यात काय तर, `देव आहे' हे जसे सिद्ध झालेले नाही; तसेच किंवा त्याहूनही अधिक `देव नाही' हेदेखील सिद्ध झालेले नाही. मग `देव नाही' असे आग्रही प्रतिपादन करून तेच सत्य आहे आणि देव मानणे ही भावना व श्रद्धा आहे, असे जे म्हणतात त्यांचे काय? सिद्ध न झालेली गोष्ट सत्य कशी काय म्हणता येईल? `देव आहे' ही जशी श्रद्धा, तशीच `देव नाही' हीदेखील श्रद्धाच नाही का?

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१५

अमेरिकेचा ढोंगीपणा

अमेरिकेचा ढोंगीपणा आणि अंतर्विरोध वेळोवेळी उघड होत असतोच. जगभरातील त्याची युद्धखोरी तर प्रसिद्धच आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ते ठळकपणे दिसतं. काल एक जण सांगत होते- तिथे उदबत्ती लावता येत नाही. कारण प्रदूषण होतं. हे नेमकं कुठलं माहीत नाही. कारण तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे कायदे आहेत. पण प्रदूषणासाठी उदबत्तीवर निर्बंध घालतानाच -

१) स्वयंचलित वाहनांनी होणारे प्रदूषण,

२) फटाक्यांनी होणारे प्रदूषण, (नववर्ष, नाताळ आणि अन्य वेळी किती आतिषबाजी होत असते)

३) औषधे, सौंदर्यप्रसाधने, air purifiers, deodorants, शेतीपासून अन्य अनेक ठिकाणी वापरण्यात येणारी रसायने,

या वा यासारख्या असंख्य गोष्टींनी होणारे प्रदूषण दुर्लक्षित केले तर चालते का?

american culture चा ढोंगीपणा आणि अंतर्विरोध तर आहेच; पण आपले अमेरिकाधार्जिणेपणही काही कमी नाही. अमेरिकेतील सगळे छान, आदर्श, अनुकरणीय इत्यादी. अन त्याचवेळी आपण, आपला देश, जीवन सगळं बोगस, त्याज्य, किळसवाणं किंवा किमान आवडू नये असं. आमचे रस्ते, व्यवस्था इत्यादी इत्यादीही. मात्र २ दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका व्हिडीओने अशा लोकांना वेगळे दर्शन घडवले आहे. १०-१२ मिनिटांचा हा व्हिडिओ अमेरिकेतील एका गणेशोत्सवाचा आहे. स्थापनेपूर्वी तिथे जी मिरवणूक काढली त्याचा. ते चित्रण पाहताना हा भारतच असावा अशी शंका यायला भरपूर वाव. कारण रस्त्यांना ठिगळे, रस्त्याच्या कडेला कागदाचे कपटे वगैरे, विजेच्या तारा लोंबत असणाऱ्या असं चित्र. अमेरिका अशीही आहे हे सांगणारं. परंतु तिथे गेलेल्यातील बहुसंख्य (काही अपवाद अर्थात आहेतच) आणि जाण्याची सुप्त इच्छा असणारे यांचे अमेरिका कौतुक मात्र विसविशीत आहे असेच वाटते.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१६

ध्वनी प्रदूषण व सिमेंट रस्ते

नागपूर शहरात ध्वनी प्रदूषण खूप वाढलं असून ५५ ठिकाणे red zone आहेत. यावर उपाय करण्यासाठी एक मोठी बैठक झाली. यात NEERI या महत्त्वाच्या संस्थेचाही सहभाग होता. त्यामुळे या प्रयत्नाला वजन प्राप्त होते. या बैठकीत ज्या उपायांची चर्चा झाली त्यात 'डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान' असा एक उपाय आहे. हा उपाय थोडा संभ्रम निर्माण करणारा वाटतो. डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान म्हणजे रस्ते डांबरीच असावेत याचा पुरस्कार का? तसे असेल तर झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या सिमेंट रस्त्यांचे काय? किंवा झाले गेले सोडून देऊन पुढे जायचे असल्यास, यापुढे सिमेंट रस्ते बंद अशी काही भूमिका असू शकते का? तसे असेल तर सध्याचा सिमेंट रस्त्यांचा निर्णय आणि आग्रह नीट विचार न करता घेतला होता असं म्हणावं का?

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०२१

ऋषीपंचमीनिमित्त मनातले दोन तरंग...


*********

मानव जातीच्या इतिहासात इतके महान लोक होऊनही जग सुंदर, सुखी का झालं नाही? हा प्रश्न प्रत्येक माणसाला कधी ना कधी पडतोच. अन हे सत्यही आहे. कोणीच हे नाकारू शकत नाही. हां, त्रास आणि दु:ख यांचे विषय आणि प्रकार बदलले असतील, पण ते संपले मात्र नाहीत. आशावादी माणसाने सारवासारव करायची आणि निराशावादी माणसाने तक्रारीचा सूर वाढवायचा हे चालूच राहतं, बदलत मात्र काही नाही. का? कारण ते कधीच बदलणार नाही. हे मान्य करायला कठीण आहे. पचायला तर त्याहून कठीण आहे. पण सत्य हेच आहे की हे जग बदलणार नाही. मग दुसरा प्रश्न येतो, महान लोकांचा उपयोग काय? महान लोकांचं प्रयोजन काय? त्यांचा उपयोग आणि प्रयोजन एवढंच की; प्रत्येक जण, प्रत्येक कण, प्रत्येक क्षण, प्रत्येक भौतिक व अभौतिक (मानसिक, भावनिक, बौद्धिक इत्यादी) तरंग; महानतेकडे निघालेला आहे हे सांगणे. प्रत्येक प्रारंभ वेगळा आहे आणि पूर्णता ही त्या प्रारंभाची नियती आहे. हा प्रवास प्रत्येकाचा स्वतंत्र आहे. इकडून तिकडून काही घेणे, काही सोडून देणे, काही टाकून देणे; असं करत करत; प्रत्येक स्पंदन, प्रत्येक तरंग, प्रत्येक सृजन, प्रत्येक निर्मिती, प्रत्येक माणूस; पूर्णतेच्या दिशेने जातो आहे. प्रत्येकाचा प्रारंभबिंदू वेगवेगळा आहे. प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे. ही प्रारंभाची वेळ आणि गती यामुळे अनंत विविधता, विषमता, संघर्ष असं सगळं दिसतं. हा प्रत्येकाचा प्रवास आहे. कोणाचाही प्रवास कोणी दुसरा करत नाही, करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणत असत, या विश्वाचे असंख्य केंद्रबिंदू आहेत पण त्याचा परीघ मात्र एकच आहे. मग काय स्वतःसाठी किंवा इतरांसाठी चांगल्याचा प्रयत्न वगैरे करायचा नाही? किंवा का करायचा? तर प्रयत्न करायचाच. प्रयत्नाशिवाय, काहीतरी केल्याशिवाय कोणीही राहूच शकत नाही. फक्त एवढेच की, काही करताना स्वतःचं किंवा जगाचं अमुक असं होईल/ होऊ शकतं/ व्हायलाच हवं/ होणारच; असं जे काही त्या कृतीला चिकटलेलं असतं, ते सोडून द्यायचं. निरपेक्ष कर्म करत राहायचं. कारण ना आपल्या ना महान लोकांच्या काही करण्याने जगबिग बदलणार आहे. तर, आपलं कर्म, आपलं करणं, आपली कृती, आपली क्रियाशीलता आपल्याला पूर्णतेकडे नेणार आहे. प्रत्येक कणाला पूर्णतेकडे नेणे हेच या जगाचं प्रयोजन आहे. जग घडवणे वगैरे मानवाचं प्रयोजन नाही.

*********

'शेवटी सत्याचाच विजय होतो' हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इथे दोन प्रश्न निर्माण होतात - १) सत्याचा विजय शेवटीच का होतो? आधी का होत नाही? नेहमीच का होत नाही? या जगाच्या रहाटगाडग्याचा शेवट ठरवायचा कसा? २) विजयी होणारी प्रत्येक गोष्ट सत्यच असते का? दोन्ही प्रश्न एकत्रितच मनात ठेवून विचार करू.

एक ताजं उदाहरण घेऊ. छगन भुजबळ निर्दोष सुटले. त्यांची बाजू सत्याची आहे का? कोणी म्हणतील हो, कोणी म्हणतील नाही. वादाला अंत नाही. मग सत्य नेमके काय? कसे ठरवायचे? थोडं आजूबाजूला पाहिलं, थोडा इतिहास चाळला, थोडी तर्कबुद्धी वापरली; तर लक्षात येतं की; विजय पराजय हा तर एक खेळ आहे. कधी उजेडाचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी सद्गुणांचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी हिंसेचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी शौर्याचा विजय होतो कधी पराजय. कधी बुद्धीचा विजय होतो कधी पराजय होतो. अगदी देवांचा सुद्धा कधी विजय तर कधी पराजय होतो. कधी प्रयत्नांचा विजय होतो कधी पराजय. कधी जीवनाचा विजय होतो कधी मृत्यूचा. कधी प्रेमाचा विजय होतो कधी द्वेषाचा. मग आपण स्वाभाविकपणे एक कौल देतो, आपल्याला पटणाऱ्या बाजूने. आपल्याला suit होईल तो शेवट आपण ठरवतो आणि आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा उद्योग करतो. थोडा बुद्धीचा ताणतणाव झाला, आपलं वाटणं सिद्ध करताना ओढाताण झाली तर आपण तडजोडीवर येतो आणि हे चक्र फिरत असतं असं म्हणायला लागतो. पण हे चक्र फिरत असतं असं म्हणताना आपल्या हे लक्षात येत नाही की, 'शेवटी विजय सत्याचा होतो' हे वाक्य अर्थहीन ठरतं आहे. कारण चक्र फिरत राहणे याचा अर्थ शेवट नाहीच. अन कधी विजय सत्याचा तर कधी असत्याचा. मनाचा हा गुंता होतो कारण 'सत्याचा विजय' याचा नीट अर्थ आपल्याला प्रतीत झालेला नसतो. सत्याचा विजय याचा अर्थ, मर्यादित सापेक्ष सत्याचा विजय असा नसतो; तर निरपेक्ष, कालातीत, सार्वकालिक, सार्वजनीन, सार्वदेशिक परम सत्याचा विजय असा त्याचा अर्थ असतो. एखाद्या मर्यादेपर्यंत जाऊन थांबणाऱ्या शारीर-मनो-बौद्धिक अस्तित्वाला प्रतीत होणाऱ्या सत्याचा तो विजय नसून, ज्यातून या सगळ्याची सुरुवात आणि ज्यात या सगळ्याचा लय; त्या परम सत्याचा तो विजय असतो. ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. दुर्गुण पराभूत होवो की सद्गुण, हिंसा पराभूत होवो की अहिंसा, एखादा गट पराभूत होवो की दुसरा, बुद्धी पराभूत होवो की भावना, एक देश पराभूत होवो की दुसरा, स्त्री पराभूत होवो की पुरुष, प्रेम पराभूत होवो की द्वेष, मृत्यू पराभूत होवो की जीवन; हे विजय आणि पराजय ज्या तत्वातून प्रसूत होतात - ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. चांगल्याचा विजय झाला तरी तेच विजयी असते आणि वाईटाचा विजय झाला तरीही तेच विजयी असते. परम सत्य नेहमीच विजयी ठरते.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०१८

कठोर... पण‌ कुठे?

रस्ता अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी अधिक कठोर उपाय अवलंबिण्यात येतील, असे वाहतूक मंत्र्यांनी काल बंगलोर येथील कार्यक्रमात सांगितले. त्याचे स्वागत करतानाच फक्त एक सुचवावेसे वाटते की, हा कठोरपणा दोषींबाबत असावा. आजच्या वृत्तपत्रात नागपुरात काल झालेल्या अपघातांची जी माहिती आली आहे ती उदाहरण म्हणून घेता येईल.

नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी पडले. तीन दुचाकींना एका भरधाव मोटारीने धडक दिल्याने हा अपघात झाला. दुसऱ्या बातमीनुसार पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या बतामीतही अवजड वाहन धडकल्याने अपघात झाला असे आहे. यात दोषी कोण, निर्दोष कोण याची चर्चा करायची तर, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते का हे विचारता येईल. किंवा कोणी पदपथावर का झोपावे असे विचारता येईल. किंवा वाहनचालकांची बाजू योग्य होती की अयोग्य हेही विचारता येईल. हे सगळे प्रश्न येतीलच. त्यावर काथ्याकुट होईल. अन् मृत्युमुखी पडणारे दोषी होते असं आढळलं तर त्यांना बोलही लावला जाईल. या सगळ्यात ज्या कारणामुळे अपघात होतात त्याकडे दुर्लक्षच होईल. कायदेशीर दृष्ट्या कदाचित बेफाम गाडीचालकांना शिक्षा होईलही पण अपघात कमी होणार नाहीत अन् त्यात प्राण गमावणेही थांबणार नाही. कारण बेल्ट, हेल्मेट, दंड इत्यादी कठोर करत जाणे हे जखम पायाला अन् पट्टी कपाळाला असे आहे. चोरी करणे हा चोराचा अधिकारच आहे. तुम्ही कुलूप व्यवस्थित का लावले नाही, असे विचारण्यासारखे आहे. कठोर उपाय मूळ कारण जिथे आणि जे आहे त्यावर करायला हवेत.

सक्करदारा उड्डाणपुलावरील अपघातात बेफाम मोटार चालवणारा हाच मुख्य दोषी आहे हे स्पष्ट आहे. हाताच्या काकणाला आरसा कशाला अशी स्थिती आहे. अशा वेळी त्या दोषीला लगेच आठ पंधरा दिवसात अपघाताच्या ठिकाणीच जाहीर मृत्युदंड द्यावा. पोलिस, न्यायालय, प्रसार माध्यमे आणि सामान्य माणूस यांच्या मदतीने; संपूर्ण अधिकृतपणे ही कठोर कारवाई करावी. अनागोंदी माजणार नाही आणि कायदा हातात घेण्याची वृत्ती तयार होणार नाही, याची काळजी घेऊन हे करावे. देशभरात अशा पाचपन्नास कठोर कारवाया झाल्या की आपोआप धाक निर्माण होईल. शासनाचा धाक असलाच पाहिजे पण तो दोषींना. निर्दोष लोकांना नव्हे. आजच्या उपायांमुळे पापभिरू माणसे दहशतीत राहतात आणि मग्रूर माणसे मनास येईल तसे करत राहतात. कठोरता या मग्रूर लोकांसाठी हवी. कायदा कायदा करून सामान्य निरुपद्रवी माणसांना वेठीला धरल्यास दोनच गोष्टी होतात : शासनाला/ राज्यकर्त्यांना/ मंत्र्यांना शिव्याशाप मिळतात आणि अपघात होतच राहतात.

अपघात आणि त्यातील मृत्यू हे बाकी घटकांपेक्षा मानसिकतेचे बळी आहेत. पैसा, तंत्रज्ञान, वय, सामाजिक स्थान, आधुनिकतेच्या कल्पना, राजकीय ओळखीपळखी; यातून येणारी बेफिकिरी वृत्ती, बेपर्वा वृत्ती, अहंकार, दादागिरी इत्यादी कठोरपणे चिरडायला हवे. तसे झाल्यास अपघात आपोआप कमी होतील. बाकी कठोरपणा निरर्थक आहे.

कमीत कमी वेळात का आणि कुठे पोहोचायचे आहे? या प्रश्नावर समाजाला विचार करायला लावणेही गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

११ सप्टेंबर २०२२

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

रस्ते अपघात

सध्या रस्ते, वाहतूक यांची पुष्कळ चर्चा होते आहे. स्वाभाविकच सीट बेल्ट, हेल्मेट यांचीही चर्चा आहे. सहज एक दोन गोष्टी मनात आल्या.

- बेल्ट न लावता, हेल्मेट न घालताही बहुसंख्य लोक सुखरूप आहेत, अन् सुखरूप गाड्या चालवतात.

- शहरात एखादा अपघात वगळल्यास, वेगच कमी राहत असल्याने जीव गमावण्याचे प्रमाण कमी असतेच. मग बेल्ट, हेल्मेट यांचा अमर्याद आग्रह शहरात/ गावात असावा का?

-  रस्ते अपघातात जे जीव जातात ते वाईटच पण, अपघातांपेक्षा वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न नाही का? अपघातात चार जीव जात असतील तर चारशे लोकांचे वाहतूक कोंडीमुळे किरकोळपासून गंभीरपर्यंत नुकसान होते. शिवाय मनुष्यतास, मानवी ऊर्जा, मानवी मन, पेट्रोलियम ऊर्जा यांच्या स्वरूपात राष्ट्राचे फार मोठे नुकसान होते.

- बाकी रस्त्यांची स्थिती, सिग्नल इत्यादी इत्यादी इत्यादी आहेच.

- भर कशावर हवा? आग्रह कशासाठी हवा?

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०२२

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

संघर्ष

जीवनात प्रत्येक ठिकाणी आपण संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतो. दोन माणसांचे संबंध असोत की दोन देशांचे, संघर्ष टाळण्यालाच प्राधान्य दिले जाते. ते योग्य आहे अन आवश्यकही. पण खरंच-

१) संघर्ष पूर्णपणे टाळता येऊ शकतो का?

२) संघर्ष टाळणे केवळ आपल्यावर (म्हणजे एकावर) अवलंबून असते का?

३) संघर्ष नेहमी वाईटच असतो का?

४) संघर्ष योग्य की अयोग्य हे कसे ठरवायचे?

५) संघर्षबिंदूपर्यंत ढकलणाऱ्याचे काय करायचे?

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१३

जातीव्यवस्था

जाती व्यवस्थेबाबत बहुसंख्य लोकांचा गैरसमज आहे की, जाती तयार करून त्या लादण्यात आल्या. आजच्या संसदेप्रमाणे किंवा अन्य एखाद्या व्यवस्थेने त्या तयार करून लादल्या. खरे तर आजच्या व्यवस्थेनुसार सर्वशक्तिमान व्यवस्थाच (तुरळक अपवाद सोडल्यास) नव्हती. त्यामुळे लादण्याचा प्रश्नच नाही. जाती या विकसित होत असत. अन खरे तर जाती या सतत विकसित होत असतात. अगदी आजही. या मानवी जीवनाच्या प्रवासात विकसित होत असत. म्हणूनच सगळीकडे वेगवेगळ्या शेकडो जाती पाहायला मिळतात. त्यांचे आचार, त्यांच्या समजुती वगैरे भिन्न आहेत. काही जाती एखाद्या भागात उच्च मानल्या जातात, तर दुसऱ्या भागात निम्न. त्या तयार करून लादल्या असत्या तर असे झालेच नसते. या जाती कायम राहत असत असेही नाही. जुन्या जाती क्षीण होऊन लयाला जाणे अन नवीन जाती तयार होणे सतत चालत असे. तसेच निम्न जाती उच्च होणे अन उच्च जाती निम्न होणे हेही चालत असे. आजच्या संदर्भात पाहायचे तर- विजेचे काम करणारे, टीव्हीचे काम करणारे, संगणकाचे काम करणारे, ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारे, प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे... अशा शेकडो जाती विकसित झाल्या आहेत. त्यांच्या संघटना, त्यांचे प्रश्न, त्यांचे नफा-नुकसान हे सगळे सुरूच असते. वास्तविक, ही जगभरात अखंडपणे चालणारी बाब आहे. मात्र भारत हा एकमेव देश आहे ज्याने या स्वाभाविक, नैसर्गिक प्रक्रियेला नीट रूप देऊन तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया दुर्दैवाने मध्येच खंडित झाली. अन तिचे फक्त विकृत रूप आणि विकृत चित्रण आपल्यापर्यंत पोहोचले. मान-सन्मान, उच्च-नीचता, रोटी-बेटी निर्बंध या मानवी वैगुण्यांनी तिचे मूळ रूप व उद्देश निकालात काढले. अन ही मानवी वैगुण्ये आजच्या व्यवस्थांनाही सुरुंग लावीत आहेतच. ही मानवी वैगुण्ये व्यवस्था निर्मितनसतात, उलट व्यवस्थांना नासवून टाकतात. त्यांचा स्वतंत्र सखोल विचार व्हायला हवा. हे समजून न घेता येताजाता जाती अन जातीव्यवस्था यावर तोंडसुख घेणे, अन त्यावरून भांडत बसणे, संघर्ष करणे; फारच झाले तर मनोरंजक असू शकेल एवढेच.

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१५

तटकतोड

'इस्रो प्रमुखांनी रडायला नको होते' या मतावर काय म्हणाल?

- हे सांगणारे आपण कोण? असं मत व्यक्त करणाऱ्या टीकोजीरावांना व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे मान्य आहे की नाही?

- असं मत व्यक्त करणाऱ्यांना कशातलंही काही समजतं असं वाटत नाही.

- ज्यांना काही समजत नाही त्यांच्यासाठी वेळ, ऊर्जा वाया घालवत नाही.

- आणखीन काही हवं?

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१९

उगाच भरकटणे

जग ज्यांना माझी माणसं म्हणतं वा म्हणू शकतं त्यांना कदाचित आवडणार नाही. तरीही - 'विक्रम'चा संपर्क तुटणे हा पराजय आणि 'विक्रम'चा ठावठिकाणा सापडणे हा विजय, असं असतं का/ असावं का/ असू शकतं का? माझ्या खांद्यावर असलेले पिल्लू गाईचे आहे की बकरीचे आहे की गाढवाचे आहे की घोड्याचे आहे; हे मला निश्चित माहीत असणे पुरेसे का नसावे? कोणी तरी भरीस घालतात म्हणून लगेच अरे ला का रे करून; साध्य काय होते आणि नुकसान काय होते, याचा हिशेब मांडायला हवा की नको? माणसाला माणूसपणाच्या दिशेने नेणाऱ्या गोष्टीच करण्याचा प्रयत्न योग्य वाटतो. बाकी गोष्टी टाकून देणे वा दुर्लक्षित करणेच श्रेयस्कर. स्वतःला वाया घालवणे कसे थांबवता येईल हा माणसांच्या चिंतनाचा विषय होऊ शकला तर ते अधिक उपयोगाचे होईल, असं वाटतं.

- श्रीपाद कोठे

८ सप्टेंबर २०१९

संस्कृतीचा विस्तार

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशोदेशीचे गणेश, त्यांची मंदिरे, त्यांच्या कथा, परंपरा, रीतीरिवाज; या साऱ्याचा उहापोह होतो आहे. सोबत एक वाक्य असतं - भारतीय संस्कृती किती पसरलेली आहे, प्राचीन आहे इत्यादी. असं वाटतं की, या चर्चा अधिक खोल आणि अर्थपूर्ण व्हायला हव्यात. संस्कृती म्हणजे प्रतिमा, मंदिरे, कथा, कहाण्या, परंपरा, रीतीरिवाज नाही. संस्कृती म्हणजे या साऱ्यातून प्रवाहित होणारा भाव, विचार, चिंतन, दृष्टी, जीवनाशय. मूर्त, दृश्यमान गोष्टीतून प्रतीत होणारे अमूर्त म्हणजे संस्कृती. जसे शरीरातून प्रवाहित होणारे चैतन्य म्हणजे 'मी'. तसेच. चैतन्य विरहित शरीर असले काय, नसले काय. तसेच कला, साहित्य, शिल्प, प्रतिमा किंवा मूर्त, दृश्यमान, वचनीय अशा गोष्टीतून वाहणारी अमूर्त बाब कोणती? ती म्हणजे संस्कृती. त्याची चर्चा, त्याचे विवेचन व्हायला हवे. त्या अमूर्त भावाचा, विचारांचा, चिंतनाचा, दृष्टीचा, जीवनाशयाचा विस्तार म्हणजे संस्कृतीचा विस्तार; त्यांचा विकास म्हणजे संस्कृतीचा विकास. या अंगाने पाहिलं तर लक्षात येतं की ज्या काही खुणा आढळतात त्या बाहेरील सांगाड्याच्या खुणा आहेत. संस्कृतीचा विकास आणि विस्तार खऱ्या अर्थाने थोडाच झाला आहे. म्हणूनच एक खंडप्राय भारत वगळला तर उर्वरित ठिकाणी मानवी जीवन फारसे वेगळे नाही. गणेशोत्सव किंवा अशा निमित्ताने भारतीय संस्कृतीची चर्चा होते तेव्हा ती खऱ्या अर्थाने ज्याला संस्कृती म्हणता येईल अशा गाभ्याची जर होत राहिली तर तो मानवी जीवनाला आकार देणारा, संस्कृतीचा विकास आणि विस्तार राहील.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ८ सप्टेंबर २०१९

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

रस्ते अपघात

रस्ता अपघात यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सीट बेल्ट न लावणे यापासून रस्ता तयार करताना सादर केले जाणारे अहवाल इथवर अनेक कारणे देण्यात येत आहेत. अन् त्यावर उपाय यांचा खल होतो आहे. मात्र, रस्ते अपघातांना सर्वाधिक जबाबदार असलेल्या वेगावर मात्र कोणी बोलायला तयार नाही. वेग कमी करा हे ठणकवण्याची आज कोणाची छाती नाही. पालक, शिक्षक, मित्र, सहकारी, नेते, विचारक, संत महंत; कोणीही वाईटपणा (???) घ्यायला तयार नाहीत. आकार कमी करा, वेग कमी करा, पैसा कमी करा (कारण पैसा खूप झाला की त्यांच्यासोबत माज वाढतो); हे म्हणायलाही जीभ रेटत नाही. रस्ते अपघात कमी होणार कसे?

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०२२

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

आर्थिक महासत्ता नसावी

काल महालक्ष्मीच्या मुहूर्तावर एक बातमी झळकली - इ.स. २०३० पर्यंत भारत तिसरी आर्थिक महासत्ता होणार. मनापासून सांगतो, मला थोडं वाईट वाटलं. कारण भारतीयांच्या मनात असलेल्या महालक्ष्मी भावाशी ते विसंगत आहे. महालक्ष्मी सगळ्यांना पोषण देणारी, सगळ्यांना सुख देणारी आहे. सत्ता गाजवणे हा तिचा ना स्वभाव आहे ना धर्म. अन हा केवळ शब्दांचा खेळ नाही. त्यापाठी जीवनाला वेढून टाकणारी आशयगर्भता आहे. सायरस मिस्त्री आणि झुनझुनवाला ही दोन नावे सहजच आठवतात. दोघांचाही अंत फार दुर्दैवी आहे. पण आर्थिक महासत्ता म्हणजे काय याची ती दोन उदाहरणे आहेत. त्यांच्या अकाली अंताबाबत करुणा बाळगूनही एक मान्य करायला हवे की, महासत्तेचा हा भाव स्वीकारणीय नाही. आजचीच एक बातमीही या संदर्भात लक्षणीय आहे. पुणे - देहू या सहा पदरी रस्त्याची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे कदाचित हा रस्ता बारा पदरी करतील, नंतर अठरा पदरी किंवा असेच. किंवा सहा पदरी रस्त्यावर सहा पदरी उड्डाणपूल बांधतील. काहीही केलं तरी ते पुरणार मात्र नाही. मग माणसांना सांगितलं जाईल : बाबांनो, आता तुमच्यासाठी या पृथ्वीवर जागाच नाही. इथे रस्ते, पुल, उड्डाणपूल, विमानतळे, लोहमार्ग, कारखाने बांधायचे आहेत. तेव्हा तुम्ही इथून कुठे निघून जा. आम्ही अब्जावधी रुपये भरपाई देतो. पण जा. अन् मग त्या रस्त्यांचा, पुलांचा, गाड्यांचा उपयोग करायलाही या पृथ्वीवर कोणी उरणार नाही. आमची राक्षसी महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्वप्ने या भस्मासूरी स्तराला पोहोचली आहेत. मिडास राजाची गोष्ट माणसाने बासनात गुंडाळून ठेवली आहे. हा भस्मासूर केवळ नाही रे वर्गाची कुरकुर नाही हेच मिस्त्री व झुनझुनवाला यांचे अंत सांगताहेत. परंतु ते ऐकण्याची क्षमता कदाचित हा भस्मासूर गमावून बसला आहे.

आध्यात्मिकता ही अपूर्ण आणि असंबद्ध जगात माणसाला शांति आणि समाधान देणारी बाब आहे असे मलाही काही काळ आधीपर्यंत वाटत होते. पण आता हे लख्ख दिसू लागले आहे की, आध्यात्मिकता केवळ आतील अवकाश, आतील पोकळी भरण्यासाठी नाही. बाह्य, ऐहिक जीवनदेखील सुखी व संतुलित करण्यासाठी गरजेची आहे. भारत आणि भारतीय समाज आध्यात्मिक होता, हे विश्लेषण, भारत व भारतीय समाज आध्यात्मिक आहे, येथवर यायला हवे. त्यासाठी भारताने आर्थिक महासत्ता न होणेच इष्ट.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०२२

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

समतेचे गुऱ्हाळ

'समता' हे तत्व स्वीकारल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं आहे. आज मोठ्या प्रमाणावर दिसून येणारी असहिष्णुता हा त्याचाच परिणाम आहे. कारण त्यामुळे चांगलं- वाईट, योग्य- अयोग्य, चूक- बरोबर यांचं विश्लेषण थांबलं, त्यामुळे काय स्वीकारायचं अन काय नाकारायचं याचा विवेक आपण गमवायला लागलो. परखड, स्पष्ट, तर्कपुर्ण विश्लेषण करणे; आणि ते समजून घेणे ही प्रक्रियाच बंद पडली. तशी तर रोजच नवीन उदाहरणे देता येतील अशी स्थिती आहे. ताजे उदाहरण म्हणजे- दिल्लीतील औरंगझेब रस्त्याला डॉ. कलाम यांचे नाव देण्याच्या निर्णयावरून होणारी चर्चा. सगळ्यांनाच समानता बहाल केल्याने राजे, धर्म, व्यवस्था, तत्वज्ञान, कल्पना, वैविध्य या सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे सुरु झाले. गुजराथेत नुकतेच झालेले आरक्षण आंदोलन हाही या समतेच्या बेगडीपणाचा परिणाम. यामुळे मागासलेले असो की पुढारलेले, शिक्षित असो की अशिक्षित, लहान असो की मोठे, अनुभवी असो की अननुभवी, श्रीमंत असो की गरीब, सगळ्यांना एकच फुटपट्टी लावणे, सगळ्यांकडून सारखीच अपेक्षा बाळगणे असे प्रकार होतात. नुसते घोषणा देणे, प्रवाह चुकीचा आहे की बरोबर हे न तपासून पाहता मोठ्या आवाजात आपलाही आवाज मिसळणे; या गोष्टींवर मुळातून विचार व्हायला हवा. समतेच्या तत्वालाही ही बाब लागू होते.

- श्रीपाद कोठे

१ सप्टेंबर २०१५

मनुवादी??

जातपात, ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद, आरक्षण हे विषय सतत चर्चेत असतात. त्यालाच जोडून मनुस्मृती असते. त्यातूनच `मनुवादी' असा शब्द आला. एक विचार आला- जगातील कोणताही हुकुमशाह धड एखादं तपसुद्धा टिकला नाही. मग मनुस्मृती कशी टिकली असावी? सम्राट अशोक, बौद्ध मताचा विस्तार, शीख पंथ, वारकरी संप्रदाय, शिवाजींची प्रशासन पद्धती इत्यादी किती मोठा अन किती विविधांगी काळ आहे भारताच्या इतिहासात. इंग्रजांची १५० वर्षे अन स्वातंत्र्याची ६८ वर्षे या उण्यापुऱ्या सव्वादोनशे वर्षांचा तर प्रश्नच नाही. त्या काळात मनुस्मृतीची मातब्बरी काय होती? काय असेल? मनुस्मृती लागू करावी वगैरे मला मुळीच म्हणायचे नाही. पण आम्ही किती भुसभुशीत विचार करतो असे वाटले. थोडी वैचारिक घुसळण केली तर अभिनिवेश थोडे कमी होतील का? मला तसे वाटते.

- श्रीपाद कोठे

१ सप्टेंबर २०१५

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

दर्जा आणि प्रमाणीकरण

डॉक्टरांनी generic औषधेच लिहून द्यावीत हा आदेश national medical commission ने मागे घेतला. यामागे औषध कंपन्यांची लॉबी नसेल का? या आदेशात केवळ जेनरिक औषधे लिहावी एवढेच नव्हते तर डॉक्टरांनी औषध कंपन्यांच्या कॉन्फरन्स आदींना जाऊ नये असेही आदेश होते. वैद्यकीय व्यवसायातील सध्याची व्यापारी वृत्ती लोकांना दिवसेंदिवस त्रासदायक होत असताना हा आदेश मागे घ्यावा लागणे हे दुर्दैवी आहे.

हा आदेश मागे घ्यावा यासाठी Indian Medical association आणि औषध निर्माण कंपन्या यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या चर्चेत औषधांचा दर्जा हा मुद्दा मांडण्यात आला आणि आदेश मागे घेण्यात आला. मी या विषयातला तज्ञ नाही. अभ्यासक देखील नाही. परंतु नेहमीच सतावणारा एक सामान्य प्रश्न याही निमित्ताने मनात आला की, दर्जा (quality), प्रमाणीकरण (standardization) या गोष्टी आपापली पोतडी भरण्यासाठी वापरल्या जातात का? हे केवळ औषधी या विषयापुरतेच नाही. अन्न, औषधी, शिक्षण, विभिन्न उद्योग, वस्तू, सेवा अशा अनेक बाबतीत दर्जा आणि प्रमाणीकरण हे लोकांना लुबाडण्याचे साधन झालेले नाही का? कालच बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी देशभरातून जी प्रचंड गर्दी उसळली आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाची जी चर्चा सुरू आहे; त्यालाही हा मुद्दा लागू होतो.

शिवाय प्रमाण वा दर्जा नेमका ठरवायचा कसा आणि कोणी? आणि हा दर्जा निश्चित केल्यावर सुद्धा अपेक्षित परिणामांची शंभर टक्के खात्री देता येईल का? अत्यंत चोख दर्जेदार औषधे घेतल्यावर माणूस मरण पावणार नाही किंवा नेमके डोज घेतल्यावर perfectly fit होईल याची खात्री देता येईल का? खाद्य पदार्थात मीठ, साखर, तिखट इत्यादी गोष्टी एकदम दर्जेदार आणि प्रमाणात असतील तर त्याची चव उत्कृष्टच राहील आणि सगळ्यांना आवडेल; तसेच त्याने काडीचाही अपाय होणार नाही याची खात्री देता येईल का? शिक्षक सगळ्या मापदंडावर तंतोतंत बसत असेल तर विद्यार्थी अगदी बृहस्पतिचा अवतार होतील असे सांगता येईल का? अचूक कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी याने समाजातील दुष्ट वृत्ती नाहीशा होतील अशी खात्री देता येईल का?

मूळ प्रश्न हा की, दर्जेदार (म्हणजे काय ते सोडून देऊ) input आणि तेवढाच दर्जेदार output यांचा संबंध किती आणि कसा असतो? याचा अर्थ दर्जा, प्रमाण नकोत असे नाही. परंतु त्याचाही विचार तारतम्याने करावा लागतो. Over stretching ही चांगली गोष्ट तर नाहीच पण तिचा वापर स्वार्थ, अनैतिकता, शोषण यासाठी केला जातो. परिणाम हा केवळ input वर अवलंबून नसतो. क्रिया सिद्धी: सत्वे भवती महतां नोपकरणे. एखाद्या क्रियेची सिद्धी उपकरणांवर नाही तर सत्वावर अवलंबून असते.

टीप : औषधांच्या पाकिटावर त्याचा net उत्पादन खर्च लिहिणे बंधनकारक करून नफा किती घ्यावा याला कायदेशीर बंधन घालावे. परिषदा आणि अभ्यास इत्यादींना उत्पादन खर्च आणि फायदा यात जागा देऊ नये. फक्त एवढं केलं तरी सगळा तमाशा बंद होईल.

- श्रीपाद कोठे

२६ ऑगस्ट २०२३

बेकायदा इमारती

दिल्लीजवळच्या नोएडा येथील दोन टोलेजंग इमारती उद्या पाडण्यात येणार आहेत. त्याही केवळ नऊ सेकंदात. आधुनिक तंत्रज्ञानाने हे शक्य होईल. वाहिन्यांवर सकाळी सहा-सात वाजेपासून त्याचे live प्रसारण देखील होणार आहे. आपण किती फसवं, ताळमेळ नसलेलं जीवन जगतो आहोत; त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. टोलेजंग इमारती नऊ सेकंदात पाडण्याचं कसलं कौतुक करायचं? एवढ्या मोठ्या इमारती उभ्या होईपर्यंत त्यातील नियमांचे उल्लंघन, भ्रष्टाचार होऊ द्यायचा. मग भ्रष्टाचाराविरुद्ध कळकळ असल्याने त्या इमारती पाडून टाकायच्या. काय पोरखेळ आहे? या सगळ्या सव्यापसव्यात वाया जाणाऱ्या वेळ, ऊर्जा, पैसा, मनुष्यतास, मनुष्यबळ, सामुग्री यांना काहीच किंमत वा अर्थ नाही का? शिवाय इमारती पाडताना पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी वाया जाणार त्याचे काय? काहीही गुन्हा नसताना आजूबाजूच्यांनी का suffer व्हायचं? पर्यावरणाचं काय? बरं तर बरं - झालेल्या भ्रष्टाचाराचे सगळेच्या सगळे पैसे वसूल होणार का? इमारती बांधून होईपर्यंतच्या काळात ज्यांनी ज्यांनी बक्कळ पैसा कमावला आणि त्याचा उपभोग घेतला, त्याची वसुली कशी होईल? म्हणजेच शून्य निर्मिती करूनही जे कोणी फायद्यात राहतील त्यांचे काय वाकडे करून घेणार? ज्यांनी तिथे पैसे गुंतवले असतील त्यांना परत मिळणार का? सगळाच सावळागोंधळ.

यासाठी कारणीभूत आहे आजची कार्यपद्धती. विचार करून काम करणे याऐवजी काही तरी करून दाखवण्याच्या नादात काहीबाही करत राहायचे अन मग आरडाओरडा करून जबाबदाऱ्या अन न्यायाची नाटके करायची. खरं तर ही कार्यपद्धती तरी का विकसित झाली याचा विचार करायला हवा. माणसाची हाव हे त्याचे एकमेव उत्तर आहे. कसलेही नियंत्रण आणि मर्यादा माणसाला आज मान्यच नाही. आपल्या परंपरेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची चर्चा आहे. अर्थ आणि काम धर्माने नियंत्रित असावे असे सांगणे आहे. दुर्दैवाने धर्म, परंपरा मान्य असणारेही ही पुरुषार्थ कल्पना किमान व्यवहारात तरी धुडकावून लावतात. अर्थ आणि काम अनिर्बंध असायला हवे असे मत काही जण खुलेआम मांडतात तर बहुसंख्य लोकांना मनाच्या आतल्या कप्प्यात तसे वाटते. अत्यंत ढोंगी आणि दुटप्पी जीवनाच्या कालखंडात आपण आहोत. विकासाच्याच नाही तर मानवी प्रयत्न आणि मानवी बुद्धिमत्तेच्या धुंदीत योग्य, अयोग्य, सारासार आणि सम्यक विचार करण्याची शक्तीही आम्ही गमावून बसतो आहोत.

- श्रीपाद कोठे

२७ ऑगस्ट २०२२

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

अर्थकारण आणि प्रतिष्ठा

भाववाढ, महागाई, चलनवाढ इत्यादी बाबी कशाने होतात या प्रश्नाला, मागणी-पुरवठ्याचे तत्व, दुष्काळ, अतिवृष्टी, साठेबाजी अशी काही उत्तरे मिळू शकतात. पण या बाबी केवळ तेवढ्यावरच अवलंबून नसतात. पैशाची प्रतिष्ठेशी घालण्यात आलेली सांगड हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्यावर कधीही, कुठेही बोलले, लिहिले जात नाही. थोडी नजर इकडेतिकडे फिरवली तरीही ही गोष्ट स्पष्ट होते. रेल्वे स्थानक आणि विमानतळ येथील वाहनतळाच्या दरात मोठी तफावत असते. रस्त्याच्या कडेचा चहा, साध्या हॉटेलातील चहा अन पंचतारांकित हॉटेलातील चहा (तेथील maintainance लक्षात घेऊनही) यांच्या भावातही मोठी तफावत असते. हीच बाब खाण्यापिण्याच्या गोष्टी, कपडे, अन्य सामान, गाड्या अशा बहुतेक सगळ्या गोष्टींना लागू होते. वाहनतळाच्या दरातील तफावतीला जसे काहीही कारण नाही, तसेच ५-१० लाखाची गाडी आणि काही कोटींची गाडी यातील किमतीच्या फरकाला काही कारण नाही. एखादा चांगल्या कापडाचा आपल्या शिंप्याकडून शिवलेला शर्ट आणि पीटर इंग्लंडचा शर्ट याच्या किमतीत मोठा फरक का असावा? या सगळ्याचे कारण एकच- प्रतिष्ठा. मिळणारा पगार किंवा पगारवाढ यांचे तरी कारण काय असते? मिळणारा पगार न पुरणे की प्रतिष्ठा? याचे उत्तर प्रतिष्ठा हेच आहे. नाही तर आमदारांची नुकतीच झालेली पगारवाढ का झाली असती? मोठमोठ्या कंपन्यांच्या संचालकांचे, अधिकाऱ्यांचे कोटीत जाणारे पगार वा भत्ते जगण्यासाठी असतात की प्रतिष्ठेसाठी? यातूनच एक साखळी तयार होते. ही साखळी जपण्याचे प्रयत्न सतत केले जातात, करावे लागतात. एक तर खालच्यांची प्रतिष्ठा वाढू न देणे किंवा ती वाढली तर वरच्यांची आणखीन वाढवणे, असे चक्र सुरु राहते. याच्या मध्ये अनेक पायऱ्या गरजेपोटी तयार होतात. शिवाय आजचे status उद्या खाली यायला नको. म्हणजेच चल, अचल संपत्ती, गाड्या, घरे इत्यादी वाढतच राहिले पाहिजे. कमी होता कामा नये. या साऱ्याचा जगण्याशी संबंध नसतो. संबंध असतो प्रतिष्ठेशी. या दुष्टचक्रातूनच आर्थिक विषमता, शोषण, भ्रष्टाचार जन्माला येतात, वाढतात, फोफावतात. जागतिक स्तरावर देखील हेच चालते. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या गोष्टीदेखील याच साखळीचा भाग होत्या. याला अंत नाही आणि अनेक आर्थिक प्रश्नांनाही अंत नाही. कारण आर्थिक प्रश्न केवळ अर्थशास्त्राने सुटत नाहीत. तसे करणे अप्रगल्भता आहे. सेवेची अनेक कामे, गरिबांसाठीच्या योजना, रोटरी वा लॉयन्सच्या असंख्य शाखा आदींनी हे प्रश्न सुटत नाहीत. अर्थकारण हे अर्थशास्त्रासोबतच समाजकारण, राजकारण, संस्कृतिकारण, विचार, भावना इत्यादी गोष्टींनी घडत वा बिघडत असते. त्यामुळेच पैसा आणि प्रतिष्ठा यांचा संबंध तोडणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय चिंतन, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गोळवलकर गुरुजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आदींनी यावर मुलभूत चिंतन मांडलेले आहे. यातूनच भारताची ऋषी कल्पनाही विकसित झालेली आहे. ही गोष्ट मुळातून नीट समजून घेतल्याशिवाय हिंदू संस्कृती/ भारतीय संस्कृती इत्यादी कळू शकत नाही. हिंदू वा भारतीय ही फक्त लेबले नाहीत.

- श्रीपाद कोठे

२० ऑगस्ट २०१६

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

रूप मृत्यूचे

१९८४ साली आलेल्या हिमवादळात सियाचीन येथे १९ जवान बर्फाखाली दबले होते. त्यातील १४ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले होते. अन्य पाच जवान मात्र सापडले नव्हते. त्यातील एक चंद्रशेखर हरबोला यांचे अवशेष मात्र नुकतेच सापडले आणि ते त्यांच्या हलदानी या गावी पाठवून काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ३८ वर्षांपूर्वी त्यांचे शव सापडले नव्हते तेव्हा नियमाप्रमाणे लष्कराने त्यांच्या घरी सूचना दिली आणि त्यावेळी तेथील प्रथेप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी २७ वर्षांची, एक मुलगी आठ वर्षांची आणि दुसरी मुलगी चार वर्षांची होती. आज पत्नी ६५ वर्षांची, मुली ४६ आणि ४२ वर्षांच्या आहेत.

मृत्यूची किती विविध रूपे असतात नाही? कोणत्याही व्यक्तीचे मरण दु:खदायकच असते. अकाली मृत्यू त्याहून दु:खद. मृत्यूनंतर मृतदेह हाती सुद्धा न लागणे आणखीन वेदनादायी. हे सगळे आपल्याला कमीअधिक माहिती असते. पण ही सगळी दु:ख काळप्रवाहात मागे पडल्यावर पुन्हा एकदा समोर उभी ठाकणे कसे असेल? त्यातही संपूर्ण अभंग देह समोर न येता अवशेष समोर येणे. त्यावर पुन्हा अंत्यसंस्कार. या सगळ्यालाच मन कसा प्रतिसाद देत असेल? उमाळे आणि उसासे कसे असतील? दु:खाचे कढ न येणे हे असभ्य आणि अस्वाभाविक, पण कढ येणे हेही अस्वाभाविक. दु:खाचीही अशी कुचंबणा. ओल्या आणि सुकलेल्या जखमेप्रमाणे, ओले आणि सुकलेले दु:ख. ना औपचारिकता ना अनौपचारिकता. चेहरा मागे पडलेला. आठवणी पुसून गेलेल्या. अन तरीही भूतकाळ समोर उभा राहतो अन म्हणतो 'दाखवा ओळख.' हे मृत्यो - किती तुझे रंग? किती तुझी रूपे?

- श्रीपाद कोठे

१६ ऑगस्ट २०२२

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

स्वातंत्र्याचा मुशायरा

न्यूज-२४ वाहिनीवर आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक उर्दू मुशायरा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान असा हा मुशायरा होता. म्हणजे न्यूज-२४ च्या दिल्लीतील स्टुडीओत काही शायर (महिला, पुरुष) आले होते आणि लाहोरच्या स्टुडीओत पाकिस्तानचे शायर (महिला, पुरुष) आले होते. न्यूज-२४ च्या स्टुडीओतील संचालन एक पुरुष करीत होता आणि लाहोर स्टुडीओतील संचालन एक महिला करीत होती. एक कलाम दिल्लीतून आणि एक कलाम लाहोरहून सादर केला जात होता. भारत आणि पाकिस्तानातील दोन टीव्ही वाहिन्यांनी असा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेणे सुखद म्हटले पाहिजे. लाहोर स्टुडीओतील महिला बुरख्यात नव्हत्या. एकीकडे सीमेवर घुसखोरी, दहशतवादी कारवाया, शरीफ यांची सतत उलथून टाकण्यासाठी पाकिस्तानात त्याच्या स्वातंत्र्य दिनी निघालेले दोन मार्च, हे चित्र; तर दुसरीकडे संयुक्त मुशायरा.

गंमत म्हणजे, लाहोर स्टुडीओतील प्रत्येकाने भारताचा उल्लेख `हिंदुस्तान' असाच केला. प्रत्येक वेळी. `हिंदुस्तान' की आवाम, `हिंदुस्तान' की कलाम, `हिंदुस्तान' की शायरी, `हिंदुस्तान' के फनकार वगैरे. पाकिस्तान टीव्हीच्या बातम्यांची आठवण यावी असे. त्यातही असतेच ना- `हिंदुस्तान' के वजीरे आझम, `हिंदुस्तानी मुल्क' वगैरे. मनात आले, आपल्याला `हिंदुस्तान' चालत नाही, पण जगाच्या मनात, जाणीवेत; एवढेच नाही तर आपल्या कट्टर शत्रूच्या मनात आणि जाणीवेतही आपण `हिंदुस्तान'च आहोत. त्यांच्या मनात मुळीच संभ्रम नाही.

एक गोष्ट मात्र नोंद घ्यावी अशीच- दिल्ली स्टुडीओतील संचालनकर्त्याने लाहोरमधील शायरांना धन्यवाद देतानाच स्वातंत्र्यदिनाची `मुबारक बात' दिली; मात्र लाहोर स्टुडीओतील संचालन करणाऱ्या महिलेने दिल्लीतील शायरांना फक्त धन्यवाद दिले, स्वातंत्र्याची `मुबारक बात' नाही दिली.

- श्रीपाद कोठे

१५ ऑगस्ट २०१४

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने...

श्रीमती मृणालिनी बोस यांना २३ डिसेंबर १९०० रोजी देवघर येथून लिहिलेल्या दीर्घ पत्रात स्वामीजींनी व्यक्ती व समाजाच्या संबंधांवर सखोल विचार मांडले आहेत. स्वामीजी म्हणतात- `व्यक्तीला व्यक्तिगत स्वाधीनता म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य आहे किंवा नाही; असेल तर ते किती प्रमाणात असणे उचित; व्यष्टीने समष्टीसाठी स्वत:च्या इच्छाशक्तीचा, स्वत:च्या सुखाचा अगदी संपूर्णपणे त्याग करावा किंवा नाही; हे प्रश्न प्रत्येक समाजापुढे अगदी अनादि काळापासून उभे आहेत. सर्वच समाज या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात गुंतले आहेत. आधुनिक पाश्चिमात्य समाजात हेच प्रश्न प्रचंड लाटांसारखे उसळून धुमाकूळ घालत आहेत. जे मत, व्यक्तिगत स्वाधीनतेचा वा व्यक्तीस्वातंत्र्याचा समाजाच्या सत्तेपुढे बळी देऊ इच्छिते त्या मताचे इंग्रजी नाव आहे `सोशॅलिझम' आणि व्यक्तित्वाची तरफदारी नि समर्थन करणाऱ्या मताला म्हणतात `इंडिव्हिज्युअॅलिझम'. पुढे स्वामीजी म्हणतात- `नियम आणि शिस्त यांच्या जोरावर व्यक्तीला समाजाचे गुलाम बनविण्याचे व तिला जबरदस्तीने आत्मसमर्पण करावयास भाग पाडण्याचे काय फळ आणि काय परिणाम होत असतात याचे आपली मातृभूमी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या आपल्या देशात माणसे शास्त्रोक्त विधीनुसार जन्मतात, खाणेपिणे वगैरे गोष्टीही जन्मभर शास्त्रीय नियमांनुसारच करतात, विवाह वगैरे तद्वतच शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करतात. फार काय पण प्राणदेखील शास्त्रातल्या साऱ्या विधींच्या अनुसारच सोडतात. या कठोर शिस्तीमध्ये फक्त एकच मोठा गुण आहे, बाकी सारे दोषच दोष आहेत. गुण हाच की, एखाददुसरे काम पिढ्यानपिढ्या रोज करीत गेल्याने अंगवळणी पडून लोक ते अगदी थोड्या श्रमात अतिशय चांगल्या रीतीने करू शकतात. चिखलाचे तीन पेंड आणि चारदोन लाकडे यांच्या मदतीने या देशातला आचारी जी चवदार भात भाजी बनवतो तशी आणखी कुठेही बनावयाची नाही. कुठल्या की जुन्या जमान्यातला एक रुपया किमतीचा माग अन पाय ठेवायला एक खळगा एवढ्या सामग्रीवर वीस रुपये वाराचा किनखाप फक्त या देशातच होणे संभवनीय आहे. एक फाटकी चटई, एक मातीची पणती अन तिच्यात एरंडीचे तेल - एवढ्या साहित्यावर दिग्गज पंडित या देशातच होतात. वेड्याबिद्र्या बायकोवर सर्वसहिष्णू प्रीती आणि फक्त कुंकवाला आधार अशा कुचकामाच्या, बदमाश नवरोजीवर आमरण भक्ती फक्त या देशातच शक्य आहे. हे झाले गुणाविषयी.'

`परंतु या साऱ्या गोष्टी माणसे अगदी निष्प्राण यंत्रांप्रमाणे करीत असतात. त्या साऱ्यात मनाचे स्फुरण नसते. हृदयाचा आविष्कार नसतो. प्राणाचे स्पंदन नसते. आशेचा आवेग नसतो. इच्छाशक्तीचा प्रबल आवेश नसतो. सुखाची उत्कट अनुभूती नसते. दु:खाचाही दाहक स्पर्श नसतो. कल्पक बुद्धीची लखलख नसते. नवलाईची आस नसते. नवीन गोष्टींची कदर नसते. असल्या मनावरचे मळभ कधीच विखरत नाही. उगवत्या सूर्याचे उज्वल दृश्य असल्या चित्ताला कधीच मोहवीत नाही. या अवस्थेपेक्षा काही चांगले असेल काय असे या असल्या मनात कधीही यावयाचे नाही. आले तरी त्याचा त्यावर विश्वास बसावयाचा नाही. विश्वास बसला तरी त्याच्याकडून उद्योग व्हावयाचा नाही आणि उद्योग झाला तरी उत्साहाच्या अभावी तो तसाच जिरून जाईल.'

या पत्रात पुढे ते म्हणतात- `तर मग काय आत्मत्याग हा धर्म नाही? आत्मसमर्पण हा गुण नाही? अनेकांप्रीत्यर्थ एकाच्या सुखाचा, एकाच्या कल्याणाचा होम करणे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म नव्हे? अगदी बरोबर. पण आपल्याकडे म्हणतात ना की, घासल्यापुसल्यानं का रूप येतं? मारूनमुटकून का प्रेम उद्भवतं? जो कायमचाच भिकारी आहे तो त्याग तरी कसला करणार अन त्याच्या त्यागाचे गोडवे तरी कसले गायचे? ज्याची इंद्रिये कुचकामाची आहेत, त्याच्या इंद्रियसंयमात काय पुण्य? भावभावना नाहीत, हृदय नाही, महत्वाकांक्षा नाही, समाज कशाशी खातात हेही माहीत नाही अशा इसमाचा कसला आला आहे परत समाजाप्रीत्यर्थ आत्मत्याग अन आत्मसमर्पण? जुलुमाने सती जाणे भाग पाडण्यात कसला आला आहे पातिव्रत्याचा आविष्कार? खुळचट समजुती अन अंधविश्वास लोकांच्या डोक्यात कोंबून त्यांना पुण्य करावयास लावण्यात काय स्वारस्य? माझे म्हणणे आहे की बंधने मोकळी करा. लोकांची बंधने मोकळी करा. जितकी शक्य आहेत तितकी बंधने मोकळी करा. समाजासाठी जेव्हा स्वत:ची समस्त सुखेच्छा बळी देऊ शकाल तेव्हा तर तुम्ही बुद्ध होऊन जाल. तुम्ही मुक्त होऊन जाल. पण ती फार दूरची गोष्ट आहे. मात्र ते सारे जुलूम जबरदस्तीने साधता येणे शक्य आहे असे का तुम्हाला वाटते? जो वीर आहे तोच आत्मत्याग करू शकतो. तोच आत्मसमर्पण करू शकतो. जो भ्याड असतो तो चाबकाच्या भयाने एका हाताने डोळे पुसतो नि दुसऱ्या हाताने दान देतो. काय उपयोग त्याच्या त्या दानाचा?'

शिकागो येथून २४ जानेवारी १८९४ रोजी आपल्या मद्रासी भक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात- `जातीभेद राहील अथवा नष्ट होईल या प्रश्नाशी मला काहीच कर्तव्य नाही. भारतात किंवा भारताबाहेर मानवजातीने ज्या उदात्त विचारांना जन्म दिला त्या साऱ्यांचा प्रचार अगदी खालच्या वर्गापर्यंत, अगदी गरीब लोकांपर्यंत करणे हेच माझे उद्दिष्ट होय. मग त्यांना जे काय करावयाचे असेल त्याचा विचार तेच करतील. जातीभेद राहावा की नष्ट व्हावा, स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे की नसावे याविषयी डोके शिणविण्याचे मला काहीच कारण नाही. जीवन, विकास व सुखशांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट होय आणि ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर मानव म्हणा, मानववंश म्हणा, की राष्ट्र म्हणा, त्यांचे पतन अटळ होय. जातीभेद राहो की न राहो, एखादी विशिष्ट मतप्रणाली प्रचलित असो की नसो, ; जी व्यक्ती, जो वर्ग, जी जात, जे राष्ट्र वा जी संस्था मनुष्याच्या स्वतंत्र आचारविचार शक्तीला वाव देत नाही ती अन्यायी आहे असे समजावे व तिचे अध:पतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात या स्वतंत्रतेमुळे दुसऱ्याचे अनिष्ट होता कामा नये हे ध्यानात ठेवले पाहिजे.'

मेरी हेल यांना १ नोव्हेंबर १८९६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी खूप मुलभूत आणि आधारभूत असा विचार मांडला आहे. हिंदू जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी आणि आज माणसाच्या जगण्यापुढे उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याची शक्ती त्या विचारात आहे. स्वामीजी म्हणतात- `सुवर्णाचे सुवर्णत्व, रजताचे रजतत्व, मनुष्याचे मनुष्यत्व, स्त्रीचे स्त्रीत्व, प्रत्येक वस्तूचे यथार्थ स्वरूप ब्रम्हच होय. या ब्रम्हाची अनुभूती बाह्य जगतात करून घेण्याचा प्रयत्न आपण अनादि काळापासून करीत आहोत. या प्रयत्नात आपले मन पुरुष, स्त्री, बालक, शरीर, मन, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, जगत, प्रेम, द्वेष, मालमत्ता, संपत्ती इत्यादी, तसेच भुते, सैतान, देवदूत, देवदेवता, ईश्वर इत्यादी अद्भुत गोष्टी निर्माण करीत आहे. सत्य असे आहे की, ब्रम्ह आपल्या आतच आहे. आपणच ब्रम्ह आहोत. तो शाश्वत द्रष्टा, तो यथार्थ `अहं' आपणच आहोत. तो कधीही विषय होऊ शकत नाही. त्याला विषयीभूत करण्याचा सगळा प्रयत्न म्हणजे काळ आणि बुद्धी यांचा अपव्यय होय. जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते तेव्हा तो ब्रम्हाला `विषयीभूत' करण्याचा (समजून घेण्याचा) नाद सोडून देतो आणि अंतर्जगताकडे वळून अंतरात्म्यात अधिष्ठित होण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. यात क्रमश: शरीराकडे कमी लक्ष दिले जाते व मनाकडे जास्त लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील `मनस'पासून बनला आहे. मनस म्हणजे विचार. मनुष्य म्हणजे मननशील म्हणजेच विचार करणारा प्राणी होय. केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारा प्राणी नव्हे. यालाच धर्माच्या शास्त्रात त्याग असे म्हणतात. समाजरचना, विवाहसंस्था, अपत्यप्रेम, सत्कृत्ये, सदाचरण, नीतिशास्त्र ही सर्व त्यागाची विविध रूपे होत. आपले सर्व प्रकारचे सामाजिक जीवन म्हणजे इच्छाशक्ती, तृष्णा व वासना यांचा संयम होय. या जगात जेवढे समाज किंवा सामाजिक संस्था आहेत त्या सर्व म्हणजे या जगातील एकाच गोष्टीची निरनिराळी रूपे वा स्तर होत. ती गोष्ट म्हणजे, इच्छाशक्तीचा वा भासमान `अहं'चा त्याग होय. स्वत:तून जणूकाही बाहेर उडी मारण्याची जी इच्छा आहे तिचा त्याग. जो नित्यज्ञाता आहे त्याला ज्ञेय बनविण्याचा जो प्रयत्न चालू असतो त्याचा त्याग. सर्व सामाजिक संस्था म्हणजे याच त्यागाची विभिन्न रूपे होत. या आत्मत्यागाचा, अर्थात इच्छाशक्तीच्या निरोधाचा सर्वात सोपा अथवा सरळ असा मार्ग म्हणजे प्रेम होय; द्वेष हा अगदी त्याविरुद्ध मार्ग होय.'

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०२२

अखंड भारत : काही मुद्दे

समाज माध्यमांवर अखंड भारताच्या संदर्भात अनेक पोस्ट आज पाहायला मिळाल्या. माझ्याही तीन पोस्ट आहेत. (तिन्ही वेगवेगळ्या आहेत.) त्यातल्या काही पोस्ट, काही प्रतिक्रिया वाचल्या. काही चाळल्या, काही भाषणेही पाहिली/ ऐकली. काही गोष्टी जाणवल्या.

- एक म्हणजे, अखंड भारत म्हणून भारताच्या विभाजनाची चर्चाच केली जाते. अखंड भारत आणि भारताचे विभाजन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे.

- दुसरी लक्षात घेण्याची बाब म्हणजे, अखंड भारत म्हणजे फक्त दोन राज्यांचे एकीकरण नाही. ते मनांचे, भावनांचे अखंड होणे आहे. दोन राज्यांचे एकीकरण हा अखंड भारताचा परिणाम असेल.

- तिसरी बाब म्हणजे, अखंड भारत साकारला नाही तर, भारत अखंड राहणार नाही. त्यामुळे अखंड भारत ही optional गोष्ट नाही.

- वैश्विक मानवी सहअस्तित्वाची ती सुरुवात असेल. अखंड भारताएवढं सार्थ उदाहरण त्यासाठी कोणतंही नसेल. अखंड भारत नाकारणं हे वैश्विक सहअस्तित्व नाकारणं असेल. 

- अखंड भारत साकार होईल का? कसा होईल?टिकेल का? पेलवेल का? या प्रश्नांची उत्तरे आहेतच. ती परिपूर्ण असतीलच असेही नाही. परंतु कोणत्याही समस्येचे असेच असते. त्यावर एकच उत्तर असू शकते - we will cross the bridge when we reach it. त्यामुळेच का? कसे? या प्रश्नांपेक्षाही महत्वाची बाब आहे ती म्हणजे, अखंड भारत ही आवश्यक गोष्ट आहे. अन महत्वाचा प्रश्न आहे त्यामागील हेतू काय? स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू असेल, अन त्याची आवश्यकता ठसली असेल तर अखंड भारत साकार होण्यात अडचण असणारच नाही.

- अखंड भारताचा एक भाग असणारे पाकिस्तान पेलवेल का, हा प्रश्न ३७० रद्द केल्यानंतर पडायलाच नको. अखंड भारत झाल्याबरोबर इकडचे तिकडे अन तिकडचे इकडे येतील जातील असे नाही. सगळे काही सर्वसामान्य होईपर्यंत काही बंधने घालता येतातच. काश्मीर हे ताजे उदाहरण आहे. शिवाय दहशतवाद हा युद्धाचा प्रश्न न उरता, नक्षलवादासारखा एक प्रश्न राहील.

बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातल्या काही विचारार्थ.

- श्रीपाद कोठे

१४ ऑगस्ट २०२२

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

राजकीय वातावरण

विदर्भ साहित्य संघात काल सरसंघचालकांचे भाषण झाले. भाषणात त्यांनी केलेला एक उल्लेख फार छान आहे. ते नागपुरात प्रचारक म्हणून आले तेव्हा प्रांत प्रचारक म्हणून त्यांना एक व्हेस्पा स्कुटर मिळाली होती. जुनी भरपूर वापरलेली होती. संघाकडे अशा दोन व्हेस्पा स्कुटर होत्या. अर्थात विकत घेतलेल्या. पण त्यावेळी गाड्या आजच्यासारख्या मिळत नसत. नंबर लावून ठेवावा लागे. कोटा राहत असे. कोटा अलॉट होईल, नंबर लागेल तेव्हा स्कुटर मिळणार. तर तशा घेतलेल्या या दोन व्हेस्पा काँग्रेस नेत्याच्या कोट्यातून घेतलेल्या होत्या. संघ सोडून बाकीच्यांना आज हे अविश्वसनीय वाटेल. पण असेच होते. ती मानसिकता, ते सहकार्य, ते वातावरण पुन्हा येवो.

- श्रीपाद कोठे

१० ऑगस्ट २०२२

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

देव आणि भक्त

Victim या तमिळ चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. तथागत बुद्धाच्या मूर्तीवर एका शेतकऱ्याची मुलगी चढते. तो मुलीला तसे करू नये म्हणून सांगतो, तेव्हा ती प्रश्न करते - बुद्धाने तर देव नाही असे सांगितले आहे नं? मग तुम्ही त्याला देव का मानता? या विषयाची चर्चा रंगते आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओ एका राजकीय नेत्यानेही ट्विट केला आहे. त्यामुळे चर्चा आणखीन खमंग होते आहे. चित्रपटातील दृश्याचे आणि त्या मुलीच्या तोंडच्या मताचे समर्थक आणि विरोधक दोन्ही आहेत. खुद्द बौद्ध मतानुयायी लोकांमध्येही विरोध आणि समर्थन असे दोन पक्ष आहेत. मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

इथे प्रश्न हा आहे की एखाद्याला देव मानले तरच त्याचा आदर करायचा का? मोठी, मार्गदर्शक व्यक्ती म्हणून आदर करायला नको का? बुद्धाने देव नाकारला म्हणून त्याच्या मूर्तीवर चढणे कसे समर्थनीय होऊ शकेल? पण सध्या जमाना समानतेचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही की, पायथा आणि शिखर हे दोन्ही हिमालय म्हणून एक असले तरीही; पायथा आणि शिखर म्हणून ते वेगळेच असतात. माणूस म्हणून सगळे एकच असले तरी व्यक्ती म्हणून सगळे वेगळे असतात. ब्रम्ह म्हणून सगळं अस्तित्व एक असलं तरीही प्रत्येक आविष्कार वेगळा असतो. हाच विवेक. हा विवेक जागो.

अर्थात, संतांना अंगाखांद्यावर खेळवणारी विठुरायाची मूर्तीही आपल्या परिचयाची आहेच. पण भक्तीतील वात्सल्यभाव आणि समतेच्या नावाखालील अगोचरपणा यातला फरकही लक्षात घ्यायला हवाच. स्वतः विठू झाल्याशिवाय त्याच्या अंगाखांद्यावर बागडण्याचा अधिकार नाही प्राप्त होत.

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०२२

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

अराजकीय चर्चा

टीव्हीवरील चर्चा हा नेहमीच टीकेचा विषय असतो. मीही त्यावर बहुतेक टीकाच करतो. पण कधीकधी चांगलं काही पण ऐकायला मिळतं. आज CNBC वर झालेली चर्चा अशीच होती. एक तर ती चर्चा होती, भांडण नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा विषयही राजकीय नव्हता आणि चर्चा करणाऱ्यात एकही राजकीय व्यक्ती नव्हती. दोन विषयांवर अर्धा अर्धा तास चर्चा झाली. एक विषय शिक्षण आणि दुसरा आरोग्य. १९४७ पासून आजपर्यंत या दोन्ही क्षेत्रातील विकास आणि त्याचे आजचे स्वरूप अशी चर्चा होती. सगळ्यांना या दोन्ही गोष्टी चांगल्या, दर्जेदार, परवडणाऱ्या कशा मिळतील ही चर्चेची दिशा होती. या चर्चेवर आणि त्यातील बिंदूंवर पुष्कळ लिहिता येईल, पण चर्चा ऐकत असताना मनात आलेले दोनच बिंदू सगळ्यांच्या विचारार्थ.

१) राजकीय व्यक्ती कटाक्षाने पूर्णपणे बाजूला ठेवून चिंतन, चर्चा, विचार केल्यास खूप चांगलं काही घडू शकेल.

२) सगळा विचार करता - पाच लाख लोकवस्तीची तीन ते पाच हजार शहरे विकसित करणे हे पुढील पाच दशकांचं लक्ष्य ठेवायला हवं. त्यासाठी ज्या ज्या गोष्टींवर पाणी सोडावे लागेल ते सोडण्याची संकल्पशक्ती तयार करावी लागेल. त्यात प्रत्येकाला भरपूर काही मिळेल आणि पुष्कळ काही सोडावे लागेल.

पण चांगलं स्वप्न पाहायचं असेल अन ते प्रत्यक्षात यायचं असेल तर हे करावंच लागेल नं?

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०२२

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

IT returns

ज्यांचं उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी आहे त्यांनाही returns भरणं आवश्यक असण्याचं कारण काही कळत नाही. आज आधार, पॅन, बँक खातं सगळं एकमेकांशी जोडलं असताना; सगळी बारीकसारीक माहिती लगेच मिळत असताना; हा व्याप वाढवण्याचं कारण अनाकलनीय आहे. संबंधित विभागाचा भार वाढवण्यासोबतच, सामान्य माणसाला अकारण काही तरी मागे लावून देण्याची ही कल्पना ज्या कोणा विद्वानांच्या डोक्यातली असेल त्यांना भारतरत्नच द्यायला पाहिजे.

तसंच tds प्रकरणाचं. आपण मोहीम काढून बँक खाती काढली. करोडो लोकांची बँक खाती आहेत. ते आपापले किडुकमिडुक FD वगैरे करून ठेवतात. त्यावर करपात्र पाच लाखाचे उत्पन्न तर दूर, काही हजारात व्याज त्यांना मिळते. त्यातूनही पैसे परस्पर कापून घेतले जातात. हे खरं आहे की, त्यासाठीचा फॉर्म भरून दिला असेल तर पैसे कापले जात नाहीत. पण अनेकदा अनेक कारणांनी फॉर्म भरले जात नाहीत. कोव्हीड काळातही असे झाले होते. अन्यही कारणे, परिस्थिती असू शकते. अशा वेळी परस्पर पैसे कापले जातात. नियम करणाऱ्यांना दोन चार हजाराने फरक पडत नाही पण ज्यांचे पैसे असे कापले जातात त्यांच्यासाठी हजार रुपयेही मोठे असतात. (त्यांना returns फाईल करून पैसे परत घेता येतात हा फुकटचा सल्ला पुन्हा असतोच. म्हणजे पुन्हा एक अतिरिक्त भार.) Minimum government, Maximum governance याचा हाच अर्थ असेल तर तो फारसा चांगला नाही. माणसे आणि माणसांचा समाज हा रोबोचा जमाव नाही. विचार, व्यवहार, प्रशासन सगळ्याच गोष्टींचं असं; अंदाधुंद, अमानुष, एकांगी यांत्रिकीकरण चुकीचेच म्हटले पाहिजे.

बरं इतकं करूनही; लोकांच्या घरात घबाडच्या घबाड सापडतातच. देशात राहणारे सगळेच्या सगळे लोक बदमाश, अतिरेकी असतात वा असू शकतात असं समजून त्यांना अधिकाधिक बांधून ठेवणे, नजरेत ठेवणे; हे चांगले नाही. पण आपलेच सरकार आहे. त्यामुळे सगळेच बरोबर असू शकते. शेवटी राष्ट्रनिर्माण करायचे आहे नं?

- श्रीपाद कोठे

३ ऑगस्ट २०२२

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

सुबोध भावे यांचे भाषण

सुबोध भावे या अभिनेत्याच्या एका भाषणाची सध्या चर्चा होते आहे. मी भाषणाची बातमी वाचली. भाषण ऐकलेले नाही. मला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. 'आपण देशाचं (पर्यायाने आपलंही) जीवन राजकारणी लोकांच्या हाती सोपवलं आहे.' हे त्यांचं म्हणणं. हे मत मांडताना त्यांनी राजकारणी लोकांना लावलेल्या विशेषणाचा राग येऊ शकतो. पण आजवरचा अनुभव मात्र त्या विशेषणांची पुष्टीच करतो. भावे जेव्हा देश अयोग्य राजकारण्यांच्या हाती सोपवला असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ, 'आजचे सत्ताधारी' असा होत नाही, हे भाषण नीट वाचलं समजून घेतलं तर लक्षात येतं. अर्थ काय कसेही काढता येतात. पण हिशेब मांडून बोलायला भावे हे काही (आज तरी) राजकारणी नाहीत. त्यामुळे सोयीस्कर अर्थ काढूही नये आणि पूर्ण भाषण लक्षात घेतलं तर तसा अर्थ निघतही नाही. स्वतःचं वा देशाचं जीवन पूर्णपणे राजकीय लोकांच्या हाती सोपवणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण त्याच्याशी सहमत होतील. मी शंभर टक्के सहमत आहे.

आणखीन दोन गोष्टी त्यांनी या भाषणात मांडल्या आहेत. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे चूक आहे. तसेच थोर लोकांची चरित्र आणि विचार सगळीकडे पोहोचायला हवेत. दोन्हीवर मतभेद होण्याचे कारण नाही. पण या दोन गोष्टींच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावे लागतील. आपण करियरच्या मागे धावतो आहोत हे फक्त विद्यार्थ्यांना भाषणात सांगण्यापुरतेच असावे का? ज्या मनोरंजन क्षेत्रात भावे काम करतात तिथे त्यांच्यासह सगळेच करियरमागे धावणे यापेक्षा वेगळं काय करतात? यासाठी महापुरुषांचा, ऐतिहासिक घटनांचा वापर केला म्हणजे ते करियर मागे धावणे नसते का? किंवा केवळ पैसा, नाव आणि प्रसिद्धी यांच्यासाठी काहीही करत राहणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नाही का? लोकांना खऱ्या खोट्या, गरजेच्या वा अवास्तव मनोरंजनात गुंतवून ठेवणे म्हणजे करियरच्या मागे धावणे नसते का? राजकारण्यांनी देशाचे वाटोळे केले असेल पण कलाकारांनी देशाचे किती अन कसे भले केलेले आहे? किती कलाकार पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक यांना 'आता पुरे' असं म्हणतात? किती कलाकार विशिष्ट प्रमाणात पैसा, प्रसिद्धी मिळवली की, मुंबई सोडून एखाद्या जिल्हा वा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एखाद्या मूलभूत कामात स्वतःला गाडून घेतात? तुमची स्वतःची तशी काही योजना आहे का?

अन महापुरुषांचे विचार वा चरित्र लोकांमध्ये पोहोचवणे म्हणजे तरी काय? फक्त त्यांच्या नावाचा जयजयकार? की अस्खलितपणे त्यांचं जीवन कोणाला सांगू शकणे? की त्यांचे विचार कसे योग्य आहेत यावर तर्कशुद्ध वादविवाद? कशाला म्हणायचं महापुरुषांचे अनुकरण? खरं तर महापुरुषांचे ना अनुकरण करायचे असते ना त्यांच्याबद्दल खूप माहिती गरजेची असते ना जयजयकार करत मनमौजी पद्धतीने जगायचे असते. महापुरुष हे जीवनाची प्रेरणा असतात. या प्रेरणेनुसार जगणारे लोक आजूबाजूला पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा महापुरुष आणि त्यांचे विचार रुजत जातात. त्यातून समाज घडतो. राजकारणी लोक समाज घडवत नाहीत, घडवू शकत नाहीत. त्यांनी तो घडवू नये. या तुमच्या मताशी सहमत होतानाच; केवळ महापुरुषांचे विचार आणि चरित्र तांत्रिकतेने लोकांपर्यंत पोहोचवून सुद्धा समाज घडत नाही, हे नमूद करणे आवश्यक आहे. एका गीताची एक ओळ आठवते आहे - 'शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदी नैतिक आधार नहीं है'. हा नैतिक आधार देण्यासाठी आपण आणि आपण ज्याचा अविभाज्य भाग आहात ते मनोरंजन विश्व किती तयार आहे? किंवा तशी तयारी होण्यासाठी आपलं योगदान काय आहे?

- श्रीपाद कोठे

२ ऑगस्ट २०२२

बुधवार, २६ जुलै, २०२३

रेवडी कल्चर

'रेवडी कल्चर' आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. अनेक मुद्दे समोर येतील. अनेक विषयांवर चर्चा होईल. यात भाजपसह सगळ्याच पक्षांची कसोटी लागणार आहे. एक मुद्दा सहज मनात आला. सध्या फक्त तेवढाच.

- गरजूंना मदत वा सवलती द्याव्या. बाकीच्यांना नको. हे बरोबरच आहे. पण पाचेक हजार कमावणाऱ्यांना साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... अन लाखो किंवा करोडो कमावणारे किंवा देशातले पहिले अमुक इतके श्रीमंत यांनाही साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... याचाही विचार व्हायला हवा.

************

एक इशारा : भाजपचे अश्विनी उपाध्याय यांनीच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अन या फुकट संस्कृतीवर आळा नाही घातला तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ शकेल, असेही त्यात म्हटले आहे. समर्थकांनी किती अन कसे समर्थन करत राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

- श्रीपाद कोठे

२७ जुलै २०२२

सोमवार, २४ जुलै, २०२३

सिलेंडर पोहोचवणारे

गॅस सिलेंडर संपलं होतं. नंबर लावला अन आज आलं. त्याला बिल दिलं अन नेहमीप्रमाणे त्याने वरचे पैसे घेतलेच. त्याला सहज म्हटलं - एकीकडे सरकार लुटते, दुसरीकडे तुम्हीही. त्याला ते लागलं. नंतर वाटलं बरं झालं आपण असं बोललो अन त्याला ते लागलं. कारण त्यावर तो मनातलं सगळं बोलला. तो म्हणाला, 'आम्हाला एका सिलेंडरमागे १४ रुपये मिळतात. दिवसाला २०-२५ सिलेंडर पोहोचवतो. गाडी आमचीच. गाडीत डिझेल आमचं. दुरुस्ती वगैरे आमचीच. गोडाऊनला जाणे. गाडी भरणे. सिलेंडर पोहोचवणे. सगळं मीच करायचं. साथीदार वगैरे नाही. कंपनी पगार देत नाही. फक्त कमिशन. काय करावं आम्ही?' खरंच वाईट वाटलं. रागही आला. अन लाजही वाटली. एका सिलेंडरचे १४ रुपये म्हणजे, दिवसाला ३५० रुपये. त्यातले १०० रुपये तरी गाडी, डीझेलवर जात असणार. कसा चालवत असेल घर? गाडीचे हप्ते कसे भरत असेल? अन तो वरचे पैसे घेतो त्याचा राग मावळला. त्याला विचारलं - 'सगळ्याच कंपन्यांचं असं आहे का?' ते काही तो सांगू शकला नाही. पण एवढं बोलला जाता जाता - 'पगार मिळाला असता तर कशाला तुम्हाला दहा वीस रुपये मागितले असते?'

एक मनात आलं - गॅस कंपन्यांचे चपराशासह general manager पर्यंतचे सगळेच कर्मचारी नक्कीच एवढ्या हलाखीत नसणार. इकडे रोज भाव वाढत असतातच. कारण त्यांचे पगार, भत्ते, बोनस सांभाळायचे असतात. नफेखोरी आणि संवेदनहीनता फोफावली आहे एवढं खरं.

खूप लिहिता येईल. बोलता येईल. ते अनेकांना न पटणारं असतं. कारण, 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' हे फक्त प्रतिज्ञेपुरतं तोंडात असतं. ते हृदयात उतरतच नाही. भारत माझा आहे अन सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण तूप फक्त माझ्या पोळीवर आलं पाहिजे. ते आलं म्हणजे बाकी काही उरतच नाही. जग हे नंदनवनच असतं. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात तरी ही प्रतिज्ञा सगळ्यांच्या हृदयात उतरो. प्रत्येक घरावर तिरंगा हा उत्सव न राहता, ती उर्मी व्हावी; हीच अमृत महोत्सवी प्रार्थना.

अशा विचारांसाठी कोणाला मला डावा वगैरे म्हणायचं असेल तर खुशाल त्याचा आनंद घ्यावा. मी मात्र 'जे का रंजले गांजले...' सांगणाऱ्या तुकोबांचा वारसा जपत राहणार.

- श्रीपाद कोठे

२५ जुलै २०२२

शनिवार, २२ जुलै, २०२३

एकांगीपणा

धावपळ, दगदग, पळापळ करणारी माणसे, कामे, संस्था यांच्याबद्दल सगळ्यांना आदर, उत्सुकता, विश्वास, आस्था वगैरे असतात. हे लोक समाजासाठी, लोकांसाठी बरंच काही करत असतात असा सामान्य समज असतो आणि तो समज खराही असतो. परंतु कुठलीही धावपळ न करणारे झाड किंवा दिवा किंवा अगदी दगड सुद्धा; सावली देणे, उजेड देणे, विश्रांती देणे; अशी फार मोठी कामे करत असतातच. समाजातही अशी झाडे, दिवे आणि दगड असतात. त्यांच्याबद्दल मात्र फार आदर, उत्सुकता, विश्वास, आस्था दिसून येत नाही. समाजाच्या रक्तातच थोडासा एकांगीपणा भिनला असावा बहुतेक.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०२२

विश्लेषण ठीक, उपाय काय?

अनेक दिवसांनी आज चर्चा ऐकली. सुसह्य होती म्हणून. प्रा. शरद कोहली हे एक अर्थतज्ज्ञ आहेत. टीव्ही चर्चांमध्ये अनेकदा येतात. त्यांच्या मते इथून पुढचा काळ आर्थिक दृष्टीने आणखीन कठीण राहणार आहे. कल्पना करता येणार नाही असा. भारतातील inflation जगाच्या तुलनेत खूपच नियंत्रणात आहे असंही मत त्यांनी मांडलं. तरीही काळ कठीण राहणार हे त्यांचं मत होतं. प्रा. कोहली हे उजवे, भांडवलवादी, भाजपच्या धोरणांचे समर्थक समजले जातात. यावर उपाय काय या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते. सगळ्या तज्ज्ञ लोकांची म्हणूनच नेहमीच गंमत वाटते. ते फक्त शास्त्राच्या चौकटीत बोलतात आणि विचार करू शकतात. Original thinking शून्य म्हटलं तरी चालेल. त्यांना अन्य काही सुचतच नाही. अन समजतही नाही. ही एक विडंबना आहे. सगळ्या अर्थकारणाची मुळातून फेरमांडणी करण्याची गरज आहे. गेली काही दशके तरी ही गरज जाणवते आहे पण कोणीही... अगदी कोणीही (भाजपसह) त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही. बाकी आकडे, तर्क अन भांडणे माझ्या दृष्टीने अर्थशून्य आहेत.


By the way - पश्चिम बंगालमध्ये कॅश मोजणे सुरू आहे. अशा शेकडो बातम्या येत असतात. गेल्या दहा वर्षात अशा प्रकारे जप्त केलेली संपत्ती किती आहे आणि त्याचे काय केले, हे जाहीर व्हायला हवे. (तसे जाहीर झाले असेल वा होत असेल तर सांगावे.) अन देशातल्या प्रत्येक घराची अन सरकारी, गैरसरकारी, कॉर्पोरेट इमारतींची अशीच झडती घेऊन एकदा सोक्षमोक्ष लावून टाकावा. सुरुवात नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या अन उद्योगपतींच्या घरांपासून करावी. तसेच tds चे चिंधी अर्थकारण करण्यापेक्षा सगळ्या बँका आणि वित्तसंस्थांचे सगळे लॉकर्स तपासावे.

- श्रीपाद कोठे

२३ जुलै २०२२

बुधवार, १९ जुलै, २०२३

Gst

ब्रँडेड पॅकेज वस्तूंवर gst लागणार आहे. आजकाल स्थानिक छोटे घरगुती उत्पादक सुद्धा पापड, शेवया, सांडगे, सोजी सारख्या वस्तू पॅकेज करून विकतात. त्यांना ब्रॅण्डेड म्हटले जाईल का? अन त्यावर gst लागेल का?

******

ज्या देशात मीठ, दूध, दही, पाणी या गोष्टी उसन्या दिल्या तरी परत घेत नाहीत; ज्या देशात अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा विकू नये अशी परंपरा होती; त्या देशात... ... ... असो.

*********

भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व केवळ मंदिरे, उपासना, लोकसंख्या, मारामाऱ्या यांच्यापुरते नाही. भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व हे जीवनाचे प्रतिशब्द आहेत. हे भारतीयत्व, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व मानणाऱ्या व्यक्ती, संस्था, सरकारे यांच्या व्यवहारातून सिद्ध व्हायला हवे.

*********

(कृपया प्रश्न विचारण्यात बुद्धी वाया घालवू नये. उत्तरे शोधण्यात बुद्धी लावावी.)

- श्रीपाद कोठे

२० जुलै २०२२

मंगळवार, १८ जुलै, २०२३

निरुपयोगी

ज्या गोष्टींचा उपयोग नसतो त्या गळून पडतात. उदा. माणसाचे शेपूट.

असंच जाती, धर्म यांचा उपयोग बंद केला की त्या गोष्टीही गळून पडतील. अगदी कोणाच्या भल्यासाठी किंवा बुद्धीची खाज बोळवणारी सर्वेक्षणे, अभ्यास यासाठीही जात, धर्म यांचा वापर बंद केला; तर या गोष्टी आपोआप गळतील. सवाल वाईटपणा घेऊनही उपयोग बंद करण्याची हिंमत दाखवण्याचा आहे.

असेच अल्पसंख्य, बहुसंख्य या शब्दांचेही.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०२२